इंजि वा.पां.जाधव अमरावती अमरावतीचे जी.बी. देशमुख तसे महाराष्ट्रात विविध वाङ्मयीन साहित्य प्रकाशित करून नामलौकिक मिळवलेले सिमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क म्हणजेच आताचे जीएसटी या विभागाचे अधिक्षक पदावरून निवृत्त झालेले उच्चाधिकारी पण महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांनाच लेखनाचा नद लागून आज महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखक म्हणून ख्याती प्राप्त साहित्यिक . त्यांच्यासोबत ज्यांचा स्नेह आला, संबंध आला त्यांना आपल्या अंगीकृत विनोदी शैलीतून आपल्या अनुभवातून गप्पात रंगविणारे हे व्यक्तिमत्त्व.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे फुटबॉलपटू राहून गेलेल्या त्यांच्या वडिलांवरील अंतर्मुख करणारे चरित्रात्मक पुस्तक `महारुद्र`, `कुलामामाच्या देशात` हा जंगलकथांचा संग्रह तसेच चित्रपट रसिकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या महानायक अमिताभ बच्चनच्या सुवर्ण महोत्सवी कारकिर्दीतील विविध ६२भूमिकांचे खुमासदार चर्वण असलेले `अ-अमिताभचा` ही त्यांची पुस्तकं आपण वाचलीच आहेत. `अ-अमिताभचा` ह्या पुस्तकासाठी खुद्द महानायकाने लेखकाचे कौतुक केले होते.
त्यांनी सन २०२२ ला `अमरावतीचे छप्पन स्वभाव` पुस्तकातून लिहिलेले अनेक विनोदी लघू लेख कथासंग्रहातून रसिकांना लोटपोट केले. हे पुस्तक देखील वाचकांना आनंद देऊन गेले.
आता त्याही पुढे जाऊन मुळात गप्पीष्ट स्वभाव असलेले, गप्पा छाटण्यात पटाईत असलेले श्री. जी.बी. देशमुख यांचे " छाटीतो गप्पा " हे विनोदी शैलीतील साहित्याची लूट असलेले पुस्तक माझ्या वाचनात आले.
विनोदी कथा संग्रहाची काही मुख्य वैशिष्ट्ये असतात. या कथांमध्ये विनोदाच्या विविध प्रकारांचा , संवादातील हास्य, अतिरेकी वर्णने इ. वापर केला जातो. वाचकाला खळखळून हसवणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट असते. कथांचा विषय हलकाफुलका, रोजच्या जीवनातील विनोदी प्रसंगांवर आधारित असतो, ज्यामुळे वाचकांना सहज रिॲक्ट करता येते.
जी.बी.देशमुख यांचा `छाटितो गप्पा` हा असाच ४५ लघुकथांचा कथासंग्रह ! या ४५ कथांमध्ये असलेल्या पात्रांचे,घटनांचे वर्णन अतिशयोक्तीपूर्ण, मजेशीर पद्धतीने लेखकाने केलेले आहे. व्यक्तिमत्त्वांचे वैशिष्ट्यपूर्ण चित्रण यात आढळते जे वाचकांच्या चेहऱ्यावर हास्य आणते.आकर्षक संवाद , मजेशीर आणि मार्मिक संवादाने यातील कथा प्रभावी बनल्या आहेत. कथांमध्ये वर्णने आणि प्रसंग ज्यामुळे वाचकाला कथा अधिक रंजक वाटतात. गंभीर व हास्याच्या माध्यमातून बोध देण्याचा प्रयत्नही लेखकांनी काही कथांमध्ये केला आहे.
विनोदी कथा संग्रह हा एक असा साहित्यप्रकार आहे, जो वाचकांना आनंद, विश्रांती आणि जीवनातील हलक्याफुलक्या बाजूंची जाणीव करून देतो.
लहानपणीच्या आणि शाळकरी मित्रांच्या खोडकरपणात आपलीच बाजू कशी सक्षम होती हे दाखवत पुन्हा एकदा वाचकांना बालपणात घेऊन जाणारा हा विनोद प्रचूर कथासंग्रह...
लहानपणापासून ते प्रौढत्वापर्यंतच्या आठवणिंनी आयुष्य धावत सुटतं, पण आपल्यातील मित्रत्व कधी सुटत नाही. कौटुंबिक, नातेवाईक गणगोतापेक्षा
आपल्या मित्रांच्या गोतावळ्यातील आनंद बरा, असं अनेकदा आपल्याला वाटतं. जुन्या आठवणींनी आपण भूतकाळात हरवून जातो. ज्या वेटाळात आपण जन्मलो, ज्या शाळेत शिकलो, ज्या सवंगड्यांत बसून जगातील घडामोडींवर आपण गप्पा मारल्या, सुट्टीच्या दिवशी जसे मनसोक्त हिंडलो, आदी प्रसंगांचा ह्या पुस्तकात मनोरंजक प्रवास आहे.
लेखक जी.बी देशमुख यांचे `छाटितो गप्पा` हे पुस्तक आपण सर्वांनी जरूर वाचावे ज्यातून आपणास निश्चितच एक वेगळाच आनंद मिळेल, यात शंका नाही.
थर्मास, गव्हातले खडे, मामुची उधारी ,फुकटची अकड, मुगाच्या डाळिचा शिरा इत्यादी ४५ लघुकथा आनंद विभोर करून जातात. त्यामध्ये अंतर्भूत घटना घडलेल्या गोष्टी डोळ्यासमोर साक्षात ऊभ्या करण्यात लेखक यशस्वी झालेले आहेत.
मनाला साद घालणाऱ्या अगदी साध्या साध्या गोष्टी घटना वऱ्हाडी भाषेच्या गोडव्यातून मांडून रंगतदार गप्पांचा फड लेखकाने रंगविला आहे. दैनंदिन जीवनातल्या साध्यासुध्या गोष्टी ज्यात कधी कधी वाचताना हास्यासोबतच डोळ्याच्या कडा ओलावून जातात इतके गांभीर्य सुद्धा त्यात आहे . मेहता पब्लिशिंग हाऊस पुणे यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे मुखपृष्ठ सुद्धा आकर्षक असून बोलके आहे. असा हा जी.बी देशमुखांचा अनोखा गोष्टीचा संग्रह हाती घेतल्यावर खाली ठेवू वाटणार नाही इतका वाचनीय आहे, एवढे मात्र नक्की. ...Read more
रवींद्र वानखडे, पुणे. `छाटितो गप्पा` आज वाचुन झाले. खुप छान लिहिले आहे. लेखकाशी प्रत्यक्ष गप्पाच मारतोय असे वाटले. काही भावुक गोष्टी मनाला हळवं करून गेल्या. विदर्भातील वर्हाडी भाषा आपसूकच आपली असल्याची जाणीव होत राहते. मनातील भाव व्यक्त करण्यास ती अधीक सक्षम असल्याच दिसून येते. लेखकाने असेच लिखाण सुरू ठेवून सर्वांना आनंद देत राहावा. आता पुढील पुस्तकाची प्रतिक्षा आहे. ...Read more