प्रा.डाॅ. राहुल हांडे .... संगमनेर "जिसे भी देखिए वो अपने आप मे गुम है
जूबा मिली है मगर हुंजुबा नही मिलता
कभी किसिको मुकम्मल जहा नही मिलता..."
संज्ञापन व दळणवळण याची अत्यंत वेगवान साधने सहज उपलब्ध असलेल्या आजच्या जगात वावरणाऱ्या माणसाची व्यथा उपरोक्त गझल सहजपणे व्यक्त करून जाते. मणसाच्या जीवनात भौतिक समृद्धीचा अतिरेक झालेला असताना माणसाचा माणसाशी संवाद मात्र क्षीण होत चाललेला दिसतोय. आजचा माणूस मोबाईलवर बोलायला कितीही वेळ देतोय;परंतु प्रत्यक्षात भेटून दुसऱ्याशी संवाद साधण्यासाठी त्याच्याकडे अजिबात वेळ नाही. भौतिक सुख सोयी व संज्ञापन-संपर्क साधनांचा सुळसुळाट आपल्या समाजात झालेला नव्हता तेव्हा एकमेकांशी बोलणं हा मनोरंजनच नव्हे तर एकूण जीवन व्यवहाराचा अविभाज्य भाग होता. दैनंदिन जीवन व्यवहाराच्या पलीकडे जाऊन शिळोप्याच्या गप्पा मारण्यासाठी प्रत्येक जणाला त्याच्या सोयीची कंपनी देखील उपलब्ध होती. त्यावेळी माणसाची आर्थिक व भौतिक परिस्थिती दुबळी असली तरी मनस्थिती बळकट होती. आज हे सर्व इतिहास जमा झालेले आहे. असे असताना जी. बी. देशमुख यांचे `छाटितो गप्पा` हे भारतीय समाजाच्या गप्पामय जीवनाची आठवण पुन्हा ताजी करणारे पुस्तक नुकतेच मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे यांनी प्रकाशित केले आहे. घरातील छोट्या मोठ्या प्रसंगांपासून सुरू झालेल्या या गप्पा कार्यालयीन कामकाजात देखील रंगलेल्या आहेत. सुमारे गेल्या पाच दशकांचा मराठी समाज त्याच्या समग्र वैशिष्ट्यांसोबत ह्या गप्पांमध्ये मनमुराद वावरताना दिसतो. पुस्तकाचे लेखक जी.बी. देशमुख यांचे बोट धरून वाचक जेव्हा ह्या गप्पांच्या आखाड्यात उतरतो तेव्हा हौदातील मातीत केव्हा रंगून जातो याचे भान राहत नाही. माणसाशी माणसाचा संवाद तुटला आहे. अशी तक्रार सतत कानावर पडत असताना `छाटितो गप्पा` हे पुस्तक आपल्याला पुन्हा एकवार भोवतालच्या माणसांशी संवाद साधण्यासाठी नक्कीच प्रेरित करते. माणसाशी माणसाचा तुटलेला संवाद जोडण्याच्या प्रयत्नांमध्ये जी.बी. देशमुख यांचे `छाटितो गप्पा` हे पुस्तक निश्चितच महत्त्वाचे योगदान देणारे ठरेल यात शंका नाही.
...Read more