DAINIK SAKAL (NASIK) अत्यंत अभ्यासपूर्ण मीमांसा...
‘ग्रामीण साहित्य’ या संकल्पनेचे चिंतन, मनन करणारे, ग्रामीण जीवन अगदी जवळून पाहिलेले, त्यावर कथा, कादंबऱ्या, आत्मकथन आदी साहित्यप्रकार विपुलतेने आणि सखोलपणे हाताळणारे आनंद यादव. एक साक्षेपी समीक्षम. त्यांचे १९६० नंतरची समाजिक स्थिती आणि साहित्यातील नवे प्रवाह हे पुस्तक मराठी साहित्याशी जवळीक ठेवू पाहणाऱ्या प्रत्येक रसिक अभ्यासकाने आपल्या संग्रही ठेवावे असे विचक्षक आहे.
१९६० हे वर्ष मराठी साहित्यातील मैलाचे दगड ठरणारे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. जिल्हा परिषदा, तालुका पंचायत समित्या, अस्तित्वात आल्या. ग्रामस्वराज्यापासून आपल्या मराठी (?) महाराष्ट्र राज्यापर्यंतचे सप्तरंगी स्वप्न साकार होणार म्हणून ग्रामीण भागातल्या तरुणांना अतिशय दिलासादायक वाटलं. ठिकठिकाणी महाविद्यालये निघू लागली आणि दहावीपर्यंत (तेव्हा ११वी) कसेबसे शिक्षण रेटणारे काही मोजके तरुण शिक्षण घेऊ लागले. लिहू लागले ही सारी परिस्थिती या राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक सचिवाला समृद्ध करणारी अशीच होती. याचा मागोवा आपल्या अभ्यासपूर्ण शैलींनी श्री. आनंद यादवांनी या पुस्तकात ठायी ठायी घेतलेला आहे. हा विचारवेध घेताना सोयीसाठी त्यांनी जवळजवळ सोळा उपविभाग पाडले आहेत. साहित्यप्रवाहाच्या स्वरूपापासून साहित्यसंमेलन, ग्रामीण आणि दलित साहित्यप्रवाहांचा तौलनिक अभ्यास, साहित्य संस्था, एवढंच नव्हे तर साहित्यचळवळी - त्यात समाज आणि साहित्यिक यांची होणारी कोंडी, उदयोन्मुख तरुण पिढीची आजच्या समाजातील अनंत दाब दबावामुळे होणारी घुसमट हे सर्व खूपच सूक्ष्म आणि तपशिलवार अशा रीतीने मांडणारे आनंद यादव आपल्चा विचारसरणीत अत्यंत प्रांजळ, परखड आहेत.
‘आधुनिकतेने निर्माण केलेले साहित्यिक प्रश्न’ या लेखात ते म्हणतात - आजच्या साहित्य चळवळीमध्ये असलेले नवजागृत सगळेच तरुण चळवळे असले, तरी ते सगळे ‘साहित्यिक’ असतात असे म्हणणे धाडसाचे होईल. चळवळीतून दर्जा नसलेले, अतिशय सामान्य साहित्य मोठ्या प्रमाणावर निर्माण होते. तो संस्कार साहित्यिक प्रतिभेची शक्यता असलेल्या तरुणावर होतो व त्यांचीही साहित्यनिर्मिती गढूळ होऊन जाते. यावर त्यांनी तितकाच सुयोग्य मार्ग सुचवलेला आहे. त्यांच्या मते अशा तरुणांनी साहित्यपणाचा सर्वांगीण विचार करावा, उत्सवी साहित्य संमेलनापेक्षा शिबिरे, संस्कार केंद्रे यांचा परिणामकारक मार्ग त्यांनी अवलंबावा!
आजची तरुण पिढी शिक्षित असली, तरी दिशाहीन आहे. ग्रामीण शिक्षण व्यवस्था आणि जागतिक असा सर्व स्तरांवर होत असलेला तांत्रिक, यांत्रिक, माहितीपर, संगणकीय बदल यापासून फार दूर आहे. शिवाय ग्रामीण भागातील सर्व सत्तास्थाने राजकीय पक्षांनी काबीज केलेली, त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणाच्या व्यथा, वेदना, खंत, दु:ख हे ना ग्रामीण आणि ना शहरी सामाजिक, सांस्कृतिक संस्थाना कळत. साहित्य निर्मितीसाठी वैचारिक जागृती व्हावी लागते. १९४५-५० चे खांडेकरी, फडके साहित्य हे आताच्या क्षणाक्षणाला बदलत जाणाऱ्या जीवनाशी मूल्यात्मक मानसिकता राखू शकत नाही म्हणूनच आजचे कोणतेही मराठी साहित्य हे आंतरराष्ट्रीय जाऊ दे; पण भारतातल्या इतर भाषक साहित्यातील अनेक. समृद्ध प्रवाहांजवळही जात नाही. तरीही लेखक काही लेखांमध्ये आशावादी दृष्टिकोन मांडतो. आज पुणे-मुंबईकडील मराठी दैनिकांच्या शाखा ग्रामीण भागात निघत आहेत. ग्रामीण लेखकांच्या ऊमीला ही दैनिक बळ देतील आणि त्यातून समाजजागृती व माहितीवर लेखन लिहिले जाईल, तरच त्यांच्या दृष्टीने ते सच्चे समाजपरिवर्तन असेल.
साहित्याबद्दल एका मुलाखतीत ते म्हणतात - ‘मी साहित्याचे प्रकार पाडण्याच्या विरोधी आहे. मानवी मन आणि त्याने टिपलेले विविध स्वरूपांचे अनुभव हे अनाकलनीय, अनेकपेडी व गुंतागुंतीचे असतात. चांगला लेखक प्रकार व्यक्त न करता मन वा अनुभव व्यक्त करीत असतो. त्यांचे स्वत:चे जे बहुविध लेखन आहे. त्यात त्यांनी अनुभवांचंच आविष्कारण प्रभावीपण केलंय!
श्री. म. माटे या उपेक्षितांचं अंतरंग लिहून माणुसकीचा अनोखा गहिवर मराठी साहित्यात पाझरवणाऱ्या लेखकाला पुष्कळदा उपेक्षित ठेवलं गेलं किंवा पुढील साहित्य चळवळीत बेसकॅपचा उल्लेखही झाला नाही. याबद्दलही त्यांच्यावरील लेखात त्यांनी केलेलं विवेचन अभ्यासूंनी मुळात वाचण्यासारखं आहे. कोणतेही साहित्य त्या समाजाचे कधी होऊ शकते? याबद्दलचे १९४३च्या सांगली साहित्य संमेलनात श्री. म. माटे यांनी मांडलेले व लेखकाने सर्वंकषपणे या लेखात ग्रथित केलेले विचार आजही तंतोतंत लागू पडतात, हे त्यांचे द्रष्टेपण लेखक आवर्जून सांगतात.
एकंदरित या पुस्तकात गेल्या ४० वर्षांतील परंतु विशेषत: गेल्या ५-६ वर्षांतील बदलत्या सामाजिकतेची लेखकाने केलेली मीमांसा अत्यंत तर्कशुद्ध आहे. त्याचबरोबर साहित्याचे वाहणारे प्रवाह, मध्येच त्यांचा झालेला डोह, त्यातील आवर्ते, त्या प्रवाहांची परस्परभिन्नता या सगळ्यांचा होईल तितका शोध नितांत साक्षेपाने लेखकाने घेतलेला आहे. असाच प्रपंच स्त्रीलेखिकेचे गेल्या ५० वर्षांतील साहित्य - त्याचं उद्याचं अस्तित्व, त्यामागील प्रेरणा आणि त्यांचं आत्मभान या वेगवेगळ्या मुद्यांचा विवेचनपूर्ण स्वतंत्र लेख - वा दीर्घ शोधप्रबंध त्यांच्याकडून लिहिला जावा. ही अपेक्षा करणं अप्रस्तुत होणार नाही.
-भावना भार्गवे ...Read more
VIVEK MAGEZINEमराठी समाज, साहित्य व संस्कृतीचा मार्मिक वेध...
आनंद यादव हे कथाकार, कादंबरीकार आणि समीक्षक म्हणून मराठी साहित्यातील एक वजनदार नाव आहे. ग्रामीण साहित्याचे प्रणेते म्हणूनही त्यांनी आपले एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले आहे. मराठी साहित्याची सर्वागीण अभ्यासाची सूत्रे त्यांनी वेळोवेळी मांडली असून समीक्षक व अभ्यासकांना ती चिंतनीय ठरली आहेत. मराठी साहित्यक्षेत्रात त्यांनी ग्रामीण साहित्याच्या प्रवाहाचे वेगळेपण सांगितले तेव्हा मोठी खळबळ उडून गेली आणि त्यानंतर समरसता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले भाषण वाचून अनेक साहित्यिकांसमोर काही मूलभूत प्रश्न निर्माण केले. मराठी साहित्यात वेगळे वेगळे प्रवाह आहेत. ते सामजिक परिवर्तनाला दिशा देणारे आहेत असा सूर त्यांनी वारंवार व्यक्त केला आहे. साहित्य, संस्कृती व सामाजिकता यांची त्यांची निरिक्षणे सूक्ष्म आहेत. सामाजिक प्रश्न साहित्याचा आशय होऊ शकतो पण त्याची अविष्कार पद्धती वाङ्मयीन मूल्यांशी प्रतारणा करणारी नसावी असे मत मांडले जाते.
आनंद यादव यांनी गेल्या अठरा-वीस वर्षांत साहित्यातील विविध प्रवाह, वेगवेगळे प्रकार अभ्यासले, त्यावर केलेले चिंतन मराठी भाषेच्या आणि साहित्याच्या अभ्यासकांना मार्गदर्शक ठरले आहे. त्यांच्या लेखांचे एकत्रित संकलन ‘१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणि साहित्यातील नवे प्रवाह’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे. साहित्य प्रवाहांच्या निर्मितीचे स्वरूप आणि ध्येय विशद करतांना ते लिहितात, ‘‘दलित, ग्रामीण, जनवादी, स्त्रीवादी, कामगार साहित्य हे साहित्यप्रवाह काय किंवा मुस्लीम खिश्चन, जैन यांचे साहित्यप्रवाह काय, हे सर्वच समाजव्यवस्थेत कोणत्या ना कोणत्या प्रकारची कोंडी, कुचंबणा, अन्याय, शोषण, दैन्य, दु:ख, उपासमार, उपेक्षा यांच्या कैचीत कुचंबणाऱ्या लोकसमुहाचे होते. या सर्वच प्रवाहांना शोषणरहित समाजरचना हवी होती आणि त्यांचा मूलभूत गाभा ‘समग्र परिवर्तन’ हाच होता.’’ या साहित्य प्रवाहांची समीक्षा एकांगी झाली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. साहित्यप्रवाह आणि साहित्यप्रकार एक नसून त्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत असे सांगून प्रवाह व प्रकार यातला भेद स्पष्ट केला आहे. समाजातील जो स्तर अगोदर साहित्यनिर्मिती करतो त्याची वैशिष्ट्ये त्या समाजाच्या साहित्यात अगोदर येतात, आणि ते साहित्य त्या संपूर्ण समाजाचे प्रातिनिधीक साहित्य म्हणून मान्यता पावते. (पृ.३) हे त्यांचे मत अनेक साहित्यप्रवाहांच्या निर्मितीतील महत्त्वाचे सूत्र आहे. हेच सूत्र धरून ते म्हणतात, ‘‘मध्यमयुगीन साहित्याचा आशय धर्मनिष्ठ पारलौकिकवादी, आध्यात्मिक स्वरूपाचा होता, तर आधुनिक साहित्याचा आशय लौकिक जीवनाशी निगडीत, भौतिकवादी, धर्मनिरपेक्ष व बुद्धिनिष्ठ स्वरूपाचा होता. (पृ.६) मध्ययुगीन आणि आधुनिकता या बाबतची त्यांची मते साहित्याच्या प्रवाहातील परिवर्तनाचा विचार करायला मार्गदर्शक ठरतात. एकाच एका विचारप्रणालीची सरळधोपट पद्धतीने सतत साहित्यनिर्मिती केल्याने त्या साहित्यिकाची एकूणच साहित्यकृतीची निर्मिती एकसुरी होते. (पृ.१३) याबाबतचे ठळक उदाहरण देतांना त्यांनी दलित साहित्यप्रवाहाकडे बोट दाखवले आहे. ‘‘किंबहुना समाजातील एकूणच वर्ण, जाती ही नष्टप्राय, अस्तित्वशून्य होऊन जातील, तसे झाल्यास त्याला पुढे तथाकथित दलितत्वाचे अनुभव येऊ शकणार नाहीत.’’ लेखकांनी व्यक्त केलेला आशावाद खरा ठरावा. जातींचा अभिमान अनेकांना उघड स्वरूपात दिसत नाही. ती एक मानसिकता असते. जातीभिमान ही देखील एक प्रवृत्ती आहे. समग्र परिवर्तनाचा जातीबद्दलची प्रवृत्ती आणि मानसिकता महत्त्वाची मानली आहे. ही स्थिती बदलून टाकणारी साहित्यकृती अपेक्षत असते. जातीविरहीत समाज हे केवळ स्वप्नरंजन ठरू नये असाच रोख लेखकांचा आहे.’’ अर्थात ही तत्कालीन स्थिती कधी बदलली जाईल किंवा नवमूल्ये अपेक्षेप्रमाणे समाजात नीटपणे कधी रूजतील, याचा काळ निश्चित करता येत नसतो. कधी तो प्रदीर्घ असेल, तर कधी पाच-सात दशकांचाही असू शकेल, तोपर्यंत ते ते साहित्यप्रवाह वाहते राहणारच. (पृ. १५)
‘‘वाङ्मयीन नियतकालिके आणि साहित्यप्रवाह’’ या लेखात त्यांनी १९४५ ते १९७५ च्या कालावधीतील नियतकालिकांनी मराठी साहित्यप्रवाहांना कसे साहाय्य केले त्याचा मागोवा घेतला आहे. या तीस वर्षांत अभिरूची मौज, सत्यकथा, मोहिनी, वीणा, किर्लोस्कर, या नियतकालिकांमध्ये नवसाहित्य व वाङ्मयीन भूमिका तात्त्विक पातळीवर विशद करणाऱ्या लेखनाला प्रामुख्याने प्रसिद्धी देत. नवसमीक्षा प्रसिद्ध करणारी म्हणून समीक्षा, छंद, आलोचला, युगवाणी, प्रतिष्ठान, म. सा. पत्रिका या नियतकालिकांचा आवर्जून उल्लेख केला आहे. लेखकाचे याबाबतचे संशोधन स्पष्ट आहे. १९४५ ते ९५ या पन्नास वर्षांतील वाङ्मयीन नियतकालिकांचा इतिहास पाहताना असे दिसून येते की, पहिल्या पस्तीस वर्षांत महाराष्ट्रात वाङमयीन नियमकालिकांची संख्या विपुल होती. या काळात साहित्याला समाजजीवनात प्रतिष्ठा होती. साहित्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि अभ्यासासाठी नियतकालिकांची गरज असल्याने प्रतिपादन लेखकांनी केले आहे. (पृ. ३२)
‘‘कादंबरी आणि आधुनिक समाज’’ यातील संबंध दाखवताना लेखक लिहितात, ‘‘समाजाची आधुनिक मूल्ये ही प्रामुख्याने भौतिकवादी असल्याने ती सतत विकसनशील राहतात. ती जीवनशैलीच सतत विकास पावणारी असते, कादंबरीतून व्यक्त होणाऱ्या आशयद्रव्याला ही शैली उपकारक असते.’८ (पृ. ३४) कादंबरीच्या बदलत्या स्वरूपाविषयी लेखकाचे मत अभ्यासनीय आहे.’’ स्वातंत्र्यपूर्व काळात मराठी कादंबरीत सामाजिक प्रेरणा प्रभावी होती. तर स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या पर्वात व्यक्तिवादी प्रेरणा कादंबरी लेखनाला विशेष कारणीभूत झालेली दिसते. (पृ. ४०) समाजाची साहित्यातील रूची म्हणजे अभिरूची नव्हे.’’ याचे विवेचन करताना लेखक नमूद करतात की, ‘‘साहित्यकृतीच्या आस्वादाला कल्पकतेची गरज असते.’’ (पृ. ४८) ‘‘समाजात किंवा व्यक्तीच्या जीवनात अभिरूची स्थिर नसते. ती प्रवाही असते, तिच्यात बदल, विकास होऊ शकतो.’ लेखकाने अभिरूचीचे तीन स्तर कल्पिले आहेत. (१) स्वरूपाची घटनाप्रधान पातळी (२) जाणकरीची पातळी (३) बौद्धिक स्वरूपाची पातळी.’’ पुढे ते म्हणतात, ‘अभिरूचीचे हे तीन स्तर वॉटरटाईट कंपार्टमेंट’ सारखे नसतात. त्यांच्या सीमरेषा एकमेकित मिसळलेल्या असतात. (पृ. ५१)
‘‘मराठी साहित्यातील ग्रामीण स्त्री कशी रंगवण्यात येते त्याचे विवेचन करताना लेखक लिहितात, १८७० ते १९४० या साठसत्तर वर्षांच्या काळात आधुनिक मराठी स्त्रीची सुखदु:खे आणि तिच्याविषयीच्या सामाजिक, सांस्कृतिक जाणिवा मराठी साहित्यात प्रकट झाल्या आहेत, पण ही स्त्री मध्यमवर्गीय, पांढरपेशी शहरी जीवनातील आहे. तिच्या जोडीने सर्वसाधारण ग्रामीण स्त्रीची सुखदु:खे, तिच्याविषयीच्या सामाजिक सांस्कृतिक जाणिवा प्रकट व्हायला हरकत नव्हती, पण त्या प्रकट झाल्या नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्याला सामाजिक, सांस्कृतिक, पारंपरिक, रूढीविषयक, अनेक कारणे आहेत. (पृ. ५२) तथापि, र. वा. दिघे, विभावरी, शिरूरकर, कुसुमावती देशपांडे, ग. ल. ठोकळ, श्री. म. माटे, श्री. ना. पेंडसे, गो. नी. दांडेकर, अण्णाभाऊ साठे, शंकर पाटील, रणजीत देसाई, उद्धव शेळके, रा. रं. बोराडे, आनंद यादव, चंद्रकुमार नलगे, महादेव मोरे यांनी त्यांच्या साहित्यात ग्रामीण स्त्रीयांचे वस्तुनिष्ठ दर्शन घडविले असल्याची ते नोंद घेतात.
‘कथाकार माटे आणि मी’ हा लेख म्हणजे गुरुवर्य माटेमास्तर यांच्या स्मृतींना उजाळा देणारा आहे. लेखकाला ग्रामीण जीवन हे गद्य साहित्याचाही विषय होऊ शकते याची जाणीव माटे यांच्या पुस्तकांनी करून दिली. (पृ. ६०) समाज प्रचंड पसरला आहे याची जाणीव मराठी कथात्मक साहित्याला प्रथम माटे यांनी करून दिली. (पृ. ६३) ‘समाजापासून स्वत:ला दूर ठेवणाऱ्या, स्वत:च्या हस्तिदंती मनोऱ्यातून मौजमजा म्हणून साहित्यनिर्मिती करणाऱ्या, प्रतिष्ठीतपणाची, उंचपणाची, तिऱ्हाईतपणाची बुद्धी ठेवणाऱ्या ज्या साहित्यिक प्रकृतीचा माटे यांनी निषेध केला त्या प्रकृतीला त्यांचे वाङमयीन वंशज गोंजारत आहेत त्याबद्दल लेखक खेद व्यक्त करतात (पृ. ६७) उदयोन्मुख पिढीविषयी लेखक लिहितात की ग्रामीण विभागातील सुशिक्षित तरुणांची पिढी ग्रामीण साहित्याच्या चळवळीमुळे म्हणजे १९७५ नंतरच्या काळात साहित्यनिर्मितीकडे जाणीवपूर्वक वळलेली आहे. (पृ. ७६)
प्रा. मो. म. कुलकर्णी यांनी लेखकाची १९८५ साली मुलाखत घेतली होती. त्यात त्यांनी दलित साहित्याच्या प्रवाहाविषयी व दलित कवितेविषयी मतं व्यक्त केली आहेत. ग्रामीण आणि दलित साहित्याबद्दलची त्यांची मते स्पष्ट आहेत.’’ दलित साहित्य एका विशिष्ट जातीपुरतेच मर्यादित राहिले तर समतेला प्रतिष्ठा देऊन ब्राह्मणांपासून भटक्यापर्यंत समाजाचे सर्व स्तर समान पातळीवर आणण्याचे कार्य करते, अशी विधाने त्यांनी केली आहेत. दलित साहित्याच्या विरोधात ही चळवळ मुळीच नाही, पण काळाच्या ओघाने दलित साहित्याच्या चळवळीला वा प्रत्यक्ष साहित्याला पडलेल्या मर्यादांच्या पलिकडे जाण्याच्या प्रयत्नात ही चळवळ आहे. (पृ. ७९) या संदर्भात एका मुद्याचा विचार होणे आवश्यक आहे, तो म्हणजे दलित साहित्य जात आणि समाजिक विषमता नाकारते, ग्रामीण भागातील बहुजन समाजातील सवर्ण समाजाच्या मनातून जातीबद्दलचा अहंकार जोवर शाबीत आहे. तोपर्यंत जातीच्या विरोधात दलित साहित्य बंडाची भाषा करीतच राहणार. त्यामुळे सांस्कृतिक संघर्ष वाढण्यास मदत होते असते. सामाजिक परिवर्तनासाठी साधन म्हणून साहित्याचा वापर करणं, हे धोक्याचं आहे. (पृ. ८२) हे लेखकाचे मत दलित साहित्याला मान्य नाही. साहित्य संमेलनाचे व्यासपीठ व साहित्य संस्था, साहित्य विकासाच्या वाट’’ या लेखात मराठी वाङमयाच्या विकासासाठी काय करणे आवश्यक आहे ते सांगून ते लिहितात, ‘‘समाजाचे खरे प्रातिनिधिक मराठी साहित्य जन्माला यावयाचे असेल, तर मराठी समाजाचे सर्व थरातून स्वत:चे, समाजाचे, स्वत:च्या संस्कृतीचे व स्वत:च्या मराठीपणाचे भान घेऊन अनेक तरुण साहित्यिक पुढे आले पाहिजेत. (पृ. १०५) साहित्य म्हणजे नुसत्याच कथा, कादंबऱ्या आणि कविता, नाटके यांची पैदास नव्हे, साहित्यात त्याचा वाटा तर प्रमुख असतोच. पण समाजाला आवश्यक असे प्रबोधनयोग्य असे लेखन हेही साहित्यच असते. (पृ. १०७)
‘स्वातंत्र्योत्तर समाज व वाङमयीन संस्कृती,’ या लेखात त्यांनी दलित व ग्रामीण साहित्यातील भेद पुन्हा एकदा स्पष्ट केला आहे. मराठी साहित्याच्या क्षेत्रातील दलित साहित्याचे युग प्रवर्तकत्व आज कोणीही नाकारू शकत नाही. प्रस्थापित व्यवस्था मोडून उद्ध्वस्त करण्याची प्रेरणा आणि या व्यवस्थेपासून तुटून, स्वतंत्रपणे राहण्याची प्रेरणा सांगून ग्रामीण साहित्य विधायक भूमिका घेते अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. (पृ. ११७) साहित्यसंस्थांच्या कार्याबद्दल असमाधान व्यक्त करून लेखक म्हणतात, ‘प्रस्थापित साहित्य संस्था, ज्या पद्धतीने आज कार्य करीत आहेत, ती कार्यपद्धती लक्षात घेता त्यांना व्यापक सामाजिक, सांस्कृतिक संदर्भ नजीकच्या भविष्यकाळात तरी लाभेल असे वाटत नाही.’’ (पृ. १२६)
१९९२ मध्ये कोल्हापूर येथे झालेल्या ६५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लेखकांची मुलाखत घेण्यात आली. तेथे त्यांनी मांडलेली मते अशी आहेत. (१) माझी ग्रामीण कथा व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, रणजीत देसाई, द. मा. मिरासदार यांच्या कथापेक्षा वेगळेपणानं उठून दिसली, याला कारण माझं वेगळं व्यक्तिमत्व हेच आहे. (२) माझ्या ग्रामीण साहित्यात मी सरसकट ग्रामीण भाषा वापरत नाही. (३) भिंती घालून साहित्याचे प्रकार पाडण्याच्या विरोधात आहे. (४) भालचंद्र नेमाडे हे एक तऱ्हेवाईक समीक्षक आहेत, त्यांनी दिलेल्या मुलाखतीतील बहुतेक विधान अशा टोप्या उडवण्याचेच प्रकार असतात, अशा विधानांकडे कुणी गंभीरपणे पाहण्याची गरज नाही. नेमाडेंनी आता असे वेळ वाया घालवणारे ताशेरे मारणे बंद करावे. वयोमान लक्षात घेऊन त्यांनी आपली लेखणी आता गंभीर लेखनाकडे वळवावी नि हिंदू कादंबरी लिहावी. (५) सर्व मराठी समाज एकसंघ, एका पातळीवर यावा हेच माझं स्वप्न आहे. ग्रामीण साहित्याची चळवळ त्यातील एक पायरी आहे.
जळगाव येथे भरलेल्या पहिल्या समरसता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्यांनी भाषण केले ते या पुस्तकात आहे. समरसता साहित्य संमेलन हे संघाच्या लोकांचे आहे, संघाची ती एक बैठक आहे. संघाचे लोक प्रतिगामी आहेत, त्यांच्या व्यासपीठावर लेखक गेले त्याबद्दल त्यांच्यावर टीका झाली. आपल्यावर टीका कशी गैरलागू आहे ती विशद करून लेखकांनी साहित्याच्या वेगवेगळ्या व्याख्याची पुनर्मांडणी केली ती चिंतनीय आहे. ते म्हणतात. ‘‘सामाजिक समरसतेचा पहिला प्रयत्न महाराष्ट्रात वारकरी संतांनी मध्ययुगात साहित्यनिर्मितीच्या आणि प्रत्यक्ष वर्तनाच्याद्वारे केला. डॉ. आंबेडकरांनी जो बौद्ध धर्म स्वीकारला त्यातील करुणेचं तत्त्व हे समरसतेचंच तत्त्व आहे. (पृ. १८८) समाजाशी समरस होऊन साहित्यिकाने केलेल्या निर्मितीत अनुभवाच्या पातळीवर सामाजिक मूल्ये एकजीव झालेली असतात. (पृ. १९२) समाजिक बांधिलकी व साहित्याकांची भूमिकाही समरसता साहित्याला परवडणारी नाही. नुसती शाब्दिक समरसता ‘समरसता मंचा’कडून अपेक्षित नाही ती सक्रीय असण्याची गरज आहे. (पृ. १९६) सामाजिक समरसतेची कल्पना संबंध भारतीय समाजाला गवसणी घालणारी आणि भारतीय नवयुगाला सामोरी जाणारी आहे. समाज निर्मितीला उपकारक, प्रेरक आणि उत्थानकारक साहित्यनिर्मिती समरसता मंचाला अभिप्रेत आहे. (पृ. १९७)
प्रा. यादव यांनी व्यक्त केलेली मते प्रक्षोभक नाहीत, त्यात विधायकता आहे. मराठी साहित्यात निर्माण झालेल्या आवर्तांचा वेध घेताना त्यांनी साहित्य प्रवाहांची समीक्षा केली आहे. ग्रामीण साहित्य चळवळीला वैचारिक अधिष्ठान देऊन परिवर्तनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन विशद केला आहे. आस्वादक टीकेचे स्वरूप त्यांनी लक्षात आणून दिले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात जे बदल झाले त्याचा आढावा घेऊन युवक साहित्यिकाकडून त्यांनी अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. साहित्यिकाने समाज, संस्कृती, परंपरा, इतिहासाबाबतचा सखोल अभ्यास करणे कसे आवश्यक आहे त्याचे मार्गदर्शन केले आहे.
मराठी साहित्य, समाज आणि संस्कृती यांचा मार्मिकपणे वेध घेतलेले पुस्तक म्हणून या लेखनाकडे पाहिले पाहिजे. ...Read more
DAINIK SAKAL (KOLHAPUR) 05-08-2001पन्नास वर्षांतील मराठी साहित्य संस्कृतीचा आढावा…
‘आनंद यादव यांचे १९६० नंतरची सामाजिक स्थिती आणि साहित्यातील नवे प्रवाह’ हे नवे पुस्तक असेल, तरी यातील विविध लेखांच्या अनुषंगाने यादवांची साहित्य आणि समाजविषयक जी भूमिका सर्वज्ञात आहे, तीच संकलित स्वरूात एकत्र केलेली आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील वाङ्मयीन जाणिवांचा बदलत्या सामाजिक जीवनाच्या संदर्भात वेध घेत असताना साहित्यप्रवाह वेळोवेळी कसे जन्मले या प्रवाहाची उपेक्षा नको, असे प्रतिपादन करीत असताना साहित्यातील विकासाचे टप्पे हे समाजाच्या विकासाच्या टप्प्याशी संबंधित कसे आहेत याचे विस्ताराने विवेचन ते करतात. जीवनवादाचा आग्रही पुरस्कार आणि तथाकथित कलावाद्यांची ‘रूपलक्ष्मी’ भूमिका यामुळे सुरुवातीस या प्रवाहांना शहरी व्यासपीठे, नियतकालिके आणि संमेलनीय व्यासपीठे येथेही कसा न्याय मिळाला नाही हे सांगत असतानाच ‘या प्रवाहानी मराठी साहित्याला मराठी मातीचा गंध दिला, जनसामान्याच्या सांस्कृतिक अंतरंगाचा मातकट लाल टीळा त्याच्या कपाळी लावला,’ असा गौरवपूर्ण उल्लेखही करतात आणि या प्रवाहाच्या विकासासाठी ‘अभ्यासपूर्ण गांभीर्य’, ‘सर्जनशील सुजाणपण’ व ‘मन:पूर्वकता’ यांची आवश्यकता प्रतिपादन करतात. हे नसेल तर हे प्रवाह आवर्तात सापडतील याची जाणीव करून देत असतानाच एकूणच आजच्या मराठी साहित्यातील आवर्ताची योग्य कारणमीमांसाही स्वतंत्र लेखाद्वारे यादवांनी केलेली आहे.
बदलत्या साहित्य समाजाच्या अनुषंगाने नियतकालिके समाजाची अभिरूची नवा जीवनार्थ शोधण्यातील साहित्य चळवळीचे अपयश, सामाजिक समरसता आणि साहित्य, मराठी साहित्यातील ग्रामीण स्त्री अशा विविध विषयांच्या अनुषंगाने यादवांनी गेल्या पन्नास वर्षांतील मराठी साहित्य संस्कृतीचा आढावा घेतला आहे. आधुनिक मानसिकतेला कादंबरी हा प्रकार कसा जवळचा आहे आणि आसपासच्या दशकभराचा काळ कादंबरी लेखनाला कसा अनुकूल आहे, याचे विवेचन ‘कादंबरी आणि आधुनिक समाज’या लेखात त्यांनी केलेले आहे.
‘सांस्कृतिक आणि वाङ्मयीन सत्वाचा अभाव’ असणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यामुळे संमेलनाला प्राप्त होणारे उत्सवी स्वरूप हे ग्रामीण साहित्याला न्याय देऊ शकत नसल्याने समाज आणि साहित्य यांच्या परस्परसंबंधातून निर्माण झालेले गंभीर प्रश्न चर्चिले गेलेच नाहीत. त्यामुळे साहित्यविषयक जाणिवा समृद्ध केल्याशिवाय वाङ्मयीन संस्कृती प्रगत होणार नाही, याची स्पष्ट जाणीव ते करून देतात.
दलित साहित्य आवर्तात सांगण्याचे कारण स्पष्ट असताना त्यातील सामाजिक आशय, विद्रोह आणि या साहित्याच्या अनुषंगाने मंद होत चाललेल्या दलित चळवळीचाही उल्लेख येतो. ‘ग्रामीण साहित्य चळवळ अलगतावादी नाही.’ ग्रामीण साहित्यिकाचे व्यक्तिमत्व सामाजिक आणि वाङ्मयीन पातळीवर घडविण्याचे कार्य ग्रामीण साहित्य चळवळ करते.’ अशी विधाने करीत असताना यादवांना अन्य सामाजिक जीवन जाणिवेच्या प्रवाहाला या पुस्तकात न्याय देता आलेला नाही, तेही स्पष्ट होते. दलित साहित्याचा वाङ्मयबाह्य कारणासाठी गवगवा झाला किंवा विद्रोहामध्ये विधायकता अभिप्रेम नसते, असे मानणे हे या समर्थ प्रवाहाना न समजून घेण्यासारखेच आहे. ग्रामीण साहित्य एकूण मराठी साहित्य विश्व व्यापणारे आहे आणि अगदी कमी कालावधीत त्यातही तीन पिढ्या यशस्वी झाल्या, असे मानणे यातील अभिनिवेषाचा भाग सोडून द्यावा लागेल, कारण तोही ग्रामीण साहित्य चळवळीला मारक ठरणारा आहे. ठरलेला आहे. तो तसा आज जाणवतो हे खुद्द लेखकांनीच मान्य केलेले आहे. ग्रामीण साहित्याची नवी वाट कशी असावी याबद्दल यादव म्हणतात, ‘‘सरंजामदार बागायतदार सत्ताधारी वर्गांचे मध्ययुगात वावरणारे जुनाट मगरूर मन, दुसऱ्या बाजूला नव्याने सुशिक्षित झालेल्या नी बहुजन समाजातून आलेल्या ग्रामीण तरुण मनाचे गुदमरणारे उमेदीचे मन यातील तणाव समजून देणारे आणि समजून घेणारे मन साहित्यातून यावे, असे म्हणत असताना ग्रामीण जीवनाची आणि पर्यायाने साहित्याचीही झालेली कोंडी यादव निर्देशित करतात.
संपूर्ण पुस्तकात नव्या प्रवाहाची चिकित्सा करणाऱ्या यादवांची सामाजिक .... आणि साहित्य या लेखातील भूमिका मात्र अभ्यासकांनाच संभ्रमात पाडणारी आहे. ‘सामाजिक समरसतेची कल्पना संबंध भारतीय समाजाला गवसणी घालणारी आणि भारतीय समाजाला नवयुगाला सामोरी जाणारी आहे. म्हणून ती म. ज्योतिबा फुले, डॉ. आंबेडकर, डॉ. केशव बळिराम हेडगेवार, गोळवलकर गुरुजी यांच्या उत्तम विचाराचा आणि नवसमाजाच्या निर्मिती मूल्यांचा समन्वय साधते आहे.’ हे वाचल्यानंतर इतर सर्व लेखातील त्यांच्या आग्रही प्रतिपादनालाच छेद जातो. एकूण स्वातंत्रोत्तर मराठी साहित्याचा आणि त्यातील विविध प्रवाहांचा सविस्तर घेतलेला आढावा मराठीच्या अभ्यासकांना उपयुक्त ठरणारा असल्याने हे पुस्तक ती गरज बऱ्याच प्रमाणात भागवेल असे वाटते. मराठी ग्रामीण साहित्यासंबंधीची यादवांची भूमिका परत एकदा या पुस्तकाने ठळकपणे अभ्यासकांसमोर आलेली आहे.
-अच्युत माने ...Read more