DUE TO THE ADVENT OF ART DEVELOPMENT, THE MENTAL, FAMILY, ECONOMIC, POLITICAL, SOCIAL AND CULTURAL DIVIDE OF DIFFERENT COMMERCIAL DISPLACED PERSONS IN GAKKUSA DUE TO THE ADVENT OF ARTISTIC DEVELOPMENT OF THE PEASANTS AND PEASANTS. THE WHOLE OF TRADITIONAL AND NATURAL FOLKLORE AND SLOWLY GETTING POISONED! WAMAN NAVYA, WHO FACES MANY STRUGGLES AT THE SAME TIME, HAS TO DEAL WITH PEOPLE`S INTERESTS IN THE FIELD OF MARKETING, COMPETITION AND ADVERTISING. STILL, HE WAS GIVEN NEW ENERGY TO THE GROUP OF LONELY GROUPS AGAINST THE CORRUPT SYSTEM.
सावेगावच्या तिन्ही बाजूनं वाहणार्या नदीवर धरण मंजुरतं. गावातील सत्ताधार्यांच्या विरोधामुळे बांधाची उंची घटवून नदीकाठच्या अर्ध्या गावाचं माथ्याकडल्या हेटीवर पुनर्वसन होतं. पुनर्वसनाच्या पैशातून नव्या वस्तीत वामनच्या पुतण्यानं सुरू केलेल्या अद्ययावत सलूनमुळं, वामनची पोत्यावरच्या बैठ्या हजामतीची ग्राहकी कमी होते.
वामनच्या मुलाला- सागरला त्याचे मित्र बाजारात दुकान लावण्याचा सल्ला देतात. पण वामन दुकानासाठी घरची गाय विकायचं नाकारतो. सागरच्या शहरी बायकोला- प्रगतीला घरच्या हजामतीच्या केसांचा तिटकारा असतो. त्यातून सासरा-सुनेचे खटके उडतात. सागर बाजारात टिनांचं शेड उभारून त्याचं सलून सुरू करतो. वामनची उरलीसुरली ग्राहकी सागरकडं वळते. वामनच्या मुक्या मुलीचा शकूनचा पुलावच्या मजुराकडून विनयभंग होतो.
सागरला त्याच्या दुकानच्या सामानसाठी शेत गहाण करू दिलं नाही, म्हणून सागर एक दिवस घर सोडून किरायाच्या घरात हेटीवर राहू लागतो. नर्मदा पेचात पडते. पुलाजवळ सपाटीकरणाचे काम करणाऱ्या रोलरच्या पुढल्या चाकाखाली सावलीत लोटलेला रमेश- चिंधाईचा मुलगा रोलर सुरू होताच भुईसपाट होतो. चिंधाई आकांत मांडते.
धरण भरताच गावाभोवतीची नदी तुंबून शेतशिवाराचे रस्ते पाण्याखाली बुडतात. उंदीर, घुशी, मसण्याउद, सापांचा उपद्रव गावात वाढू लागतो. चिंधाईला सर्पदंश होतो. मुसळधार पावसानं गावाचं बेट तयार होतं. अवघं गाव सामानसुमानासह नव्या हेटीवरील धर्मशाळेत जातं. बापूरावची बंडी परतताना पुलाच्या नालीमुळं उलटते. बापूराव जायबंदी होतो तर धुरकरी लक्ष्मणाचा मृत्यू. स्मशानाची पूर्वापार वाट पाण्यात बुडाल्यानं शेताच्या कुपाटीतून शिरताना लक्ष्मणाचे प्रेत तिरडीवरून खाली पडते. लोक पळू लागतात.
वामनच्या मुक्या शकूनचं एका बिजवराशी लग्न होतं. नवऱ्याचा लैंगिक छळ असह्य होऊन ती परत माहेरी येते. नदीकाठची झाडी उखडल्यामुळे वामनला आसपास पत्रावळींकरिता पानं मिळत नाहीत. हजामत पत्रावळीच्या बुडालेल्या धंद्यामुळे विडीकाडीलाही महाग झालेला वामन बाजारात तट्ट्यांचं दुकान उभारतो. तिथेही धंदा चालेना म्हणून न पेलवणाऱ्या किरायाची खोली भाड्यानं घेतो. नर्मदा पोराकरिता त्याला विरोध करते, पण तो बायकोला जुमानत नाही. बापलेकांचे समोरासमोर दुकानं. ग्राहकांसाठी त्यांच्यात स्पर्धा सुरू होते. ’एका कटिंगीवर दाढी फ्री’सारख्या अनेक चढ्या व विनोदी जाहिराती बापलेकांकडून केल्या जातात.
चिंधाईची मुलगी अन् तिच्या चोळी-बांगडीची साधी अपेक्षाही भावानं पूर्ण न केल्यामुळे त्याला धरणात गेलेल्या शेताच्या रकमेत वाटा मागते. बहिणभावांत वितुष्ट येतं. गुलब्या हा कारागीर कुंभार त्याची चवचाल बायको धरणाच्या सुपरवायझरमागं लागलेली बघून पागल होतो. इमली सुपरवायझरचा हात धरून पळून जाते. वामनच्या घरामागच्या भिंतीत धरणामुळं तुंबलेल्या नदीचं पाणी मुरल्यामुळं रात्री झोपेतच भिंत कोसळते. वामन नुकसानभरपाईचा मिळालेला शंभर रुपयांचा चेक बँकेत फाडून टाकतो. कन्यालाल जहागिरराव- हुकूमसह यांचं पायखेच राजकारण गावाच्या मुलावर येते.
बापूरावचे दोन्ही पोरं पैश्यांचा वादामुळं कुटुंबातून वेगवेगळे होतात. बापूराव शेवंताईला गोठ्यात राहायला पाठवतात. वामन दुकानाचा थकलेला किराया भरता यावा म्हणून नर्मदाच्या विनंतीवरून म्हसी भादरायला जातो. त्याचवेळी निवडणुकीचा नारळ नेणारी मिरवणूक रस्त्यानं वाजतगाजत जाते. वाजंत्र्याच्या आवाजानं म्हैस भुजाडून वामनला पायाखाली तुडवते.
हाडं खिळखिळून लोळागोळा झालेला वामन गुबडं घासत दारात बसतो. नातवाला व उमेशला धरणामुळं झालेली गावाची वाताहत तळमळून सांगतो. पोरांना प्रेरणा मिळून ते निवडणुकीवर बहिष्कार घालायचं ठरवतात. लोकांना प्रवृत्त करण्यासाठी मोर्चा काढतात. मोर्चाच्या घोषणात वामन बसल्याजागी त्याचाही आवाज मिसळवतो. नदीकाठी पाण्यानं सडलेलं जुने चिंचेचं झाड उन्मळून पडतं. विझण्यापूर्वी वामननं दिलेल्या घोषणा वाऱ्यानं मोर्चापर्यंत पोचून मोर्चाला बळ येतं. भालचंद्रा सुतार खड्या आवाजात सूर धरतो-
तिफनीच्या नळीतून रे ऽऽ ...कष्टकऱ्या ऽ माझ्या ऽऽ
पेरू ठासून बारूद
आता होऊ द्या उठाव
करू गिधाडं गारद!