Akshay Tajneलेखक , कथाकथनकार , आर्किटेक्ट , व्हायोलिन व हामोनियम - वादक , उत्तम रसिक आणि उत्तम फोटोग्राफर , सुंदर हस्ताक्षर आणि सुंदरतेचं वेड असणारे , सुंदर रस्ता , सुंदर इमारत , सुंदर सजावट आणि मनाने सुंदर असणाऱ्या माणसांचे चाहते . म्हणूनच त्यांच्या कथा ह्या सुदर मनांवर अणि विचारांवर आधारित असणाऱ्या . मनाचे कंगोरे उत्तम निरीक्षणामुळे मांडता येणाऱ्या . विनोदी कथांमध्येही एक सत्यतेची किनार असणाऱ्या कथा , खरं तर त्या कथा नाहीतच , कारण त्या अतिरंजित किंवा काल्पनिक नाहीत . एका व्यक्तीच्या विचार - आचारांची पद्धत . वपु त्याला ` पॅटर्न ` म्हणायचे . वपुंनी पॅटर्न्स मांडले . जे आपल्यासहित , आपल्या आवती - भोवती दिसतात . आणि म्हणूनच त्या पॅटर्न्सना दाद मिळते . विनोदी कथांमधून हसवता - हसवता एक शल्य भिडत राहातं आणि चटका लावून जातं . ही अशीच जीवनाची तहा आहे , हे सहज सोप्या शब्दांत आकलन होत जातं . महाराष्ट्र सरकारनं त्यांना ` उत्तम लेखक ` म्हणून सन्मानित केलं आहे .
CONCERN :
गीतेतला , महाभारतामधला अर्जुन आणि मी स्वत : किंवा मला भेटणारी प्रत्येक गोंधळलेली व्यक्ती ह्यांत मला फरकच वाटत नाही . कृष्णावतार संपला , तो संपलाच ! अर्जुनाचा वंश विसाव्या शतकापर्यंत चालूच आहे . अर्जुनाच्या शंभर पटीनं धृतराष्ट्राच्या शंभर मुलांचाही वंश तितक्या पटीनं वाढतोय . निवडणुकीच्या तिकिटांच्या रांगेत उभा आहे . ह्या निवडणुकीपुरता तरी श्रीविष्णूंनी ‘ शेषा`ला रजा देऊन कदाचित डनलॉप घेतला असेल आणि शेषन रूपानं शेषाला पाठवला असेल . पुन्हा मत देताना विचारवंतांचा अर्जुन होणार . अर्जुनाला समोर शत्रू दिसेचना ; आप्त दिसले , कारण ते आप्त होतेच . ज्यांना दाखवण्यासाठी सिंहासन मिळवायचं , त्यांनाच मारल्यावर राज्याभिषेक कुणासमोर करायचा ? ...Read more
DAINIK SAKAL (MADHURA) 22-06-2005‘माणूस परमेश्वराची सर्वोत्कृष्ट निर्मिती’ - व. पु. काळे यांच्या ‘आपण सारे अर्जुन’ या पुस्तकातील हे पहिले वाक्य. सहजगत्या निसटलेल्या या वाक्यातून माणूस उलगडायचा अयशस्वी प्रयत्न, तरीसुद्धा त्यालाच चिकटून राहून घसट करून कोण माझा आणि कोण माझा नाही असं गणत पुन:पुन्हा मांडूनही नापास होणारा तो माणूस.
खरं तर माणूस म्हणजे एक कोडं! आणि एक माणूस एकदाच हे तर महाकोडं. माणूस जन्म घेतो तो एकटाच आणि शेवटपर्यंत एकटाच राहतो; पण आयुष्यभर नात्यांमध्ये लपेटून वावरतो. माणूस माणसाला ओळखतच नाही. अगदी माझी माझी म्हणवणारी माणसं जेव्हा केसानं गळा कापतात, तेव्हा रक्ताचा एक टिपूसही न येता रक्तबंबाळ होणं म्हणजे खरा खून! कोण, केव्हा, का, कधी, कुठे, कुणाशी कसा वागेल? सांगता येतच नाही. उरतात ते प्रश्न निरुत्तरीत.
एका प्रश्नानं तर गीतेचा जन्म झाला. श्रीकृष्णाला रणागंणावर गीता सांगावी लागली; पण अर्जुनाला समजतच नव्हतं. प्रश्न, प्रश्न आणि पुन्हा प्रश्न. गुरुवर्य व्यासांनी महाभारात लिहिलं. व.पु.च्या मते तो ग्रंथ इतका परिपूर्ण आहे की त्यानंतर काहीच लिखाण झालं नसतं. तरी चाललं असतं, असं म्हणणाऱ्या व.पु. काळ्यांनी अनेक पुस्तकं लिहिली. त्यातील हे एक ‘आपण सारे अर्जुन’. आपली अवस्थाही कायम प्रश्न सोडवताना, ते न सुटता दुसऱ्या प्रश्नाची निर्मिती करणाऱ्याची असते. संजयसारखी दूरदृष्टी आपल्याकडं नाही आणि श्रीकृष्णासारखं निर्विचारी होणं आपल्याला जमत नाही. आपण कायम संभ्रमावस्थेत हेलकावे खात असतो. म्हणूनच अर्जुन होतो. आपण अर्जुनासारखे प्रश्नांच्यात लोंबणारे! निरुत्तरित प्रश्नांचा, मागोवा घेत उत्तराला चाचपडणारे.
महाभारतातील घटना, व्यक्ती, गीतासार हे सगळं कसं जसंच्या तसं आजच्या काळात लागू पडतं हे फार हळुवारपणं पण मार्मिकतेनं व.पु.नी या पुस्तकात मांडलंय. अर्जुन म्हटलं की, दुर्योधन आलाच. आंधळ्याचं राज्य आलंच. आज अनेक आंधळ्या राजकर्त्यांची हाताखाली राज्य करतात. आयएएस. प्रामाणिक कस्टम अधिकारी, कमिनशर्स, धृतराष्ट्र जन्मांध आणि आता सारे डोळे असून आंधळे.
व.पु. म्हणतात, ‘‘आपल्या मुलाची जन्मत:च नैसर्गिकरित्या लाभलेली कुवत किती आहे हे किती पालकांनी जाणून घेतलंय? प्रत्येक मुलाची क्षमता वेगळी; पण अभ्यासक्रम सरसकट एकच. औरंगजेब कसा होता हे कोणाला जाणून घ्यायचं? आपण स्वत: कसे आहोत, याचा अभ्यास का नाही करायचा?’’
या पुस्तकात माणूस, त्याचे आचार-विचार, मानसिक कोंडी, त्याची उकल, पलायनवाद, आत्मीयता, कलेले बहाणे, पांघरलेले पडदे, अपेक्षा, अपेक्षाभंगाचे क्षण, तो झटका, नंतरची तडफड.... हे असं सगळं अपरिहार्य म्हणून स्वीकारार्ह. त्यातूनच सापडणारा प्रकाशकिरण दूरवर दिसणारं यशोशिखर आणि मधील धूसर पाऊलवाट. अशी सारी गंमत या पुस्तकात आहे.
आयुष्यातील अनेक घटनांचं एका शब्दात वर्णन म्हणजे - टाळ्या, हशे, चेष्टामस्करी, आनंद, समाधान, चैतन्य, जोम, जोश, उत्साह, लाजणं, सुधारणं, घसरणं, आपटणं, निर्मितीक्षण, राग, क्रोध, संताप, तापटपण, भांडण, हेवेदावे, पश्चात्ताप, मारणं, अश्रू, माया, वात्सल्य, शीतयुद्ध... आणि असेच खूप काही या पुस्तकात आहे.
माणसाची अपरिहार्यता, संभ्रमावस्था, असहायता काय असते? आत्मघृणा, आत्मप्रौढी, आत्महत्या, अहंभव हे काय आहे? मैत्री म्हणजे काय? आत्मा, परमात्मा, देव, दैव, प्रारब्ध, दिव्यशक्ती, तपस्या, श्रद्धा्र, भक्ती, संकल्प, व्रतवैकल्य, उपवास, उपासना, गुरू हे कशासाठी? अर्पणभाव, टेलिपथी, पलायनवाद कशाला म्हणतात? या पुस्तकात या सर्वांचा ऊहापोह केला आहे. दिवसेंदिवस कोरड्या होत चाललेल्या समाजाला अत्यावश्यक असलेले मनमंथन केलं आहे आणि ते एका भावनाप्रधान लेखकाने - व.पु.नी त्यांची ख्यातीच आहे की, मनाला हात घालणारे, स्पर्श करून उकल करणारे लेखक.
व.पु. काळे म्हणतात, ‘‘विसाव्या शतकातला मी अर्जुन आहे.’ २१वे शतक त्याहून वेगळे नाही. ओशोची गीता प्रवचने ऐकल्यावर व.पु. नी हे पुस्तक आपोआप लिहिलं आणि ते वाचल्यावर माझा अर्जुन झाला. माझ्या आयुष्यातील प्रश्नमालिका एकामागून एक सरकत गेल्या आणि मी हरवले.
शेवटी सांगावंस वाटतं गीता, महाभारत, गीतासार, ओशो प्रवचनं वाचाल तर उत्तमच; पण निदान हे १४६ पानाचं ‘आपण सारे अर्जुन’ हे पुस्तक प्रत्येकानं वाचावंच वाचावं. लेखक व.पु. काळे म्हणजे हलकंफुलकं पण मनात घुसणारं लिखाण. त्यांनी लिहिलेले सुंदर प्रश्नचिन्हाचं पुस्तकं.
-वंदना धर्माधिकारी ...Read more