- MAHARASHTRA TIMES
‘जीवघेण्या’ साहित्य प्रकाराची मीमांसा...
झोंबी, नांगरणी, घरभिंती आणि काचवेल या चार भागांत ज्यांनी आपले आत्मचरित्र लिहिले आहे, त्या डॉ. आनंद यादव यांनी आत्मचरित्राची वाङ्मयीन व तात्त्विक चर्चा करण्यासाठी ‘प्रस्तुत ग्रंथाचा प्रपंच’ केला आहे. कथा-कादंबीपेक्षा हा साहित्यप्रकार वेगळा कसा, तो वेगळा साहित्यप्रकार म्हणून मानला गेला आहे का, तो वेगळा साहित्यप्रकार म्हणून मानला गेला आहे का, स्वातंत्र्योत्तर काळात आत्मचरित्रे कथा-कादंबऱ्यांपेक्षा जास्त प्रमाणात का आली, तरीही त्यांची एकूण संख्या कमी का, अशा तऱ्हेचे विवेचन कुठेही डॉ. यादव यांना मराठत आढळले नाही. ही उपेक्षा दूर करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे.
आत्मशोध ही कल्पना भारतीय तत्त्वज्ञानात पूर्वीपासूनच असली, तरी एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासूनच मराठीत आत्मचरित्रे येऊ लागली आहेत. त्यामध्ये ‘स्व’चा भौतिक शोध असला, तरी पाश्चात्त्य आत्मचरित्रांपेक्षा ती भारतीय दृष्टिकोनामुळे वेगळी झालेली आहेत. आत्मचरित्र लेखनामागे विविध प्रेरणा असू शकतात. दादोबा पांडुरंग किंवा बाबा पदमनजी यांच्या आत्मचरित्रांमध्ये वैयक्तिक जीवन गौण स्थानी; तर सामाजिक, सांस्कृतिक कार्याचे इतिवृत्त सांगण्यावर भर हाता. सार्वजनिक जीवनात प्रसिद्ध अशा व्यक्ती, आपल्याबद्दल गैरसमज होऊ नयेत म्हणून आत्मवृत्त लिहितात. व्यक्तिगत इतिहास लिहिणे ही काही आत्मचरित्रांची प्रेरणा असते. तर काही भूतकाळात रमण्याच्या उद्देशान लिहिली जातात. लिखाणाच्या प्रेरणेप्रमाणं त्या त्या आत्मचरित्राला विशेष आकार प्राप्त झालेला असतो.
आत्मचरित्र हा चरित्राचाच उपप्रकार आहे हे आन्द्रे मौरॉज यांचे मत डॉ. यादव यांना मान्य नाही. ‘नायकाच्या व्यक्तिमत्त्वावरून आत्मचरित्रांचे अंतर्मुख व बहिर्मुख आत्मचरित्रे संकुचित होतात. उदाहरणार्थ, आनंदीबाई विजापुरे, कांचन घाणेकर, कमल पाध्ये यांची आत्मचरित्रे.
आत्मचरित्रे ही झाडाझडती नसून त्यात घटनांची निवड केलेली असते. निवडीचा दृष्टिकोन लेखकाचा असतो आणि तो मान्य करूनच आत्मचरित्र वाचायचे असते, असे डॉ. यादव सांगतात. ‘आत्मचरित्र हा एका व्यक्तीने स्वत:च, स्वजीवनाचा नेटकेपणाने काढलेला चैतन्यपूर्ण व कलात्मक आलेख असतो.’ या वस्तुस्थितीद्वारे आत्मचरित्र समीक्षेची सुत्रे निश्चित करता येतील असे मत मांडून अखेर आत्मचरित्र हा एक जीवघेणा साहित्यप्रकार आहे, असा समारोप डॉ. यादवांनी केला आहे. प्रत्यक्ष जीवन जगलेला ‘मी’ आणि आत्मचरित्र लिहिणारा ‘मी’ यांच्यातील सखोल ताणाचा अपरिहार्य परिणाम अभिव्यक्तीवरही होणारच!
आत्मचरित्रांसंबंधी स्वतंत्र असे हे पहिलेच पुस्तक असले तरी ‘चरित्र आणि आत्मचरित्र’ या श्री. सदा कऱ्हाडे यांच्या ग्रंथात आत्मचरित्रावर एक स्वतंत्र प्रकरण लिहिलेले आहे; परंतु त्यातल्या पहिल्याच वाक्याशी डॉ. यादव सहमत नाहीत. ते वाक्य असे, ‘‘आत्मचरित्र हा चरित्राचाच एक प्रकार आहे.’ आत्मचरित्राच एक प्रकार आहे.’ आत्मचरित्रातील सत्यासत्यता हा फारच गुंतागुंतीचा प्रश्न वाटतो. स्वाभाविक विस्मरण, औचित्यासाठी केलेला सत्यापलाप, आठवणींची कल्पनाशक्तीने केलेली भरपाई, इत्यादींमुळे आत्मचरित्रातील सत्य धूसर बनत जाते. चरित्रातील सत्याप्रमाणे ते पडताळून पाहता येत नाही, हे खरेच आहे; परंतु आत्मचरित्राच्या वाचकांनी लेखकावर पूर्ण विश्वास टाकावा, की इतर मार्गांनी त्याच्या लेखनातील खरेखोटेपण शोधून काढावे, हे स्पष्ट होत नाही. त्यामुळे व ‘प्रांजळपणा’ हे मूल्य कसे सिद्ध करता येईल, ते कळत नाही. असे प्रकार करता येतील. त्यातील पहिला प्रकार वैयक्तिक, प्रापंचिक, आत्मकेंद्रित असा असून सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची आत्मचरित्रे बहिर्मुख स्वरुपाची असतात. लेखनाच्या मांडणीला प्राधान्य देऊन आत्मचरित्रांचे तत्त्वज्ञानात्मक, इतिहासात्मक आणि साहित्यरूपी असे वर्गीकरण करता येईल. बहुसंख्य आत्मचरित्रे इतिहासात्मक असतात. कादंबरीच्या स्वरुपात लिहिलेली ‘पोएटिक’ आत्मचरित्रे (श्यामची आई, तुंबाडचे खोत) ही डॉ. यादवांच्या मते कादंबऱ्याच असतात; कारण त्यात काल्पनिक घटना व पात्रे निर्मिलेली असतात. ‘साहित्यरूपात्मक आत्मचरित्र मला आत्मचरित्रच वाटत नाही,’ असे ते म्हणतात.
निदान ६० वर्षांचे होईपर्यंत आत्मचरित्र लिहू नये, असे सांगून डॉ. यादव म्हणतात की, १९७० नंतर नवजागृत समाजातल्या तरुण पिढीने लिहिलेली आत्मचरित्रे रोचक असली तरी अर्धकच्ची झाली आहेत.
स्वत:पासून अलिप्त होऊन स्वत:बद्दलचा विचार करण्याची एक विघटनाची प्रक्रिया आत्मचरित्रात असते. घटनाची निवड, रचना, त्यातून आकृतिबंध व नीटसपणा यासाठी प्रतिभेची आवश्यकता असते. त्यात स्मरणशक्ती, संवेदनशक्ती, कल्पकता, उत्कटता इत्यादींचाही सहभाग असतो. आत्मचरित्रातील संभाव्य दोघांबद्दल विवेचन करतानाच ते कसे टाळता येतील, अशीही चर्चा डॉ. यादव यांनी केली आहे. विस्मरण, निवडक स्मरण, वस्तुस्थिती विपर्यास, लज्जास्पद गोष्टी टाळणे असे अनेक धोके या लिखाणात संभवतात. त्यावर कालिक परिणामही होतो. मराठीत आत्मचरित्रांची लाट आल्यावर जी आत्मचरित्रे लिहिली गेली, त्यात उत्साह जास्त, अभ्यास कमी होता. तत्कालीन प्रश्नांना प्राधान्य दिल्याने ती खूप प्रसिद्धी पावली; पण नंतर कालबाह्य ठरली.
‘जो ललित लेखक असतो तो आपल्या कथा, कादंबरी किंवा नाटकात एक प्रकारे आत्मचरित्रच लिहित असतो... त्यामुळे एखाद्या साहित्यिकाचे समग्र साहित्य हे त्याचे एका अर्थाने परिपूर्ण आत्मचरित्रच असते,’ असे मत जयवंत दळवी यांनी ‘आत्मचरित्राऐवजी’च्या प्रस्तावनेत लिहिले आहे. परंतु डॉ. यादव यांच्या प्रत्यक्ष घटना व त्यावर ‘एका पानाची कहाणी’च्या प्रस्तावनेत आत्मकथा हा लेखनाचा सर्वांत अवघड प्रकार आहे असे मान्य करून वि. स. खांडेकर म्हणतात, की ‘‘पूर्ण सत्य सांगता आलं नाही, तरी मर्यादित सत्याला स्पर्श करण्याचा आपण प्रयत्न करावा, असं मला वाटू लागलं, आणि म्हणून त्यांनी आत्मकथा लिहिली. तर आत्मचरित्र हा एक लपवाछपवीचा खेळ आहे, असे जयवंत दळवींचे मत असल्याने ते आत्मचरित्राऐवजी लेख लिहितात!
घटनांच्या निवडीइतकेच त्यांचे शब्दांकनही कठीण असते. कारण लेखनसरावाचा आत्मचरित्राला उपयोग होऊ शकत नाही. हे म्हणजे, ‘पहिल्याच बॉलवर षटकार मारण्याची जोखीम’ आहे, अशा योग्य शब्दात डॉ. यादव त्याचे वर्णन करतात. ज्या आत्मचरित्रांमध्ये स्वत:च्या कर्तृत्वाबद्दल अतिशयोक्ती दिसते ती ‘आत्मपूजेची खाजगी देवळे वाटतात’ हे विवेचनही अतिशय नेटके वाटते. तर ‘मनातली मळमळ व्यक्त करण्यासाठी आत्मचरित्रे लिहिणे म्हणजे ढेकूण, डास मारण्यासाठी तोफा डागण्याचा प्रकार असतो’ या विधानात त्यांना आत्मसमर्थनाची वाटणारी चीड व्यक्त होते.
‘विशेषत: स्त्रियांची आत्मचरित्रे संकुचित भावनेने प्रेरित होऊन पूर्व घटनांच्या केवळ स्मरणावर लिहिली जात असावीत’ हे डॉ. यादव यांचे मत सहजी मान्य होईलसे वाटत नाही. नवजागृत समजातल्या तरुण पिढीची आत्मचरित्रे आयुष्यात फार लवकर लिहिलेली म्हणून अर्धीकच्ची राहतात, असे डॉ. यादव म्हणतात; तर चंद्रकुमार नलगे व डॉ. गंगाधर पानतावणे यांना असे वाटते की, त्या आविष्काराला आत्मचरित्र न म्हणता आत्मकथन म्हणावे. आत्मचरित्र आयुष्याच्या मावळतीला लिहिली जातात. प्रौढत्वामुळे ती स्थिर व संयमी असू शकतील; परंतु आत्मकथने आयुष्याच्या ऐन उमेदीत लिहिलेली असतात. त्यात तारुण्याच्या तीव्र प्रतिक्रिया असतात. त्यात प्रवाह असतो. आत्मकथेने बहुतांशी नाकारलेल्या समाजघटकांनी लिहिलेली आहेत. त्यामुळे त्यांचा सामाजिक संदर्भ महत्त्वाचा असतो. त्यात आत्मपरीक्षण आढळते, इतिहासलेखन नव्हे. आधारित साहित्यकृती या दोन भिन्न गोष्टी आहेत. त्यामुळे साहित्यिक आत्मचरित्र लिहू शकतो व त्यात त्या त्या घटनांचा साहित्याचा कसा वापर केला हेही सांगू शकतो; परंतु अनेक साहित्यिकांची आत्मचरित्रे फसली आहेत. कारण त्यात जीवनाचा सर्वांगीण अभ्यास दिसत नाही.
‘आत्मचरित्रात्मक कादंबरी’ हा डॉ. यादवांना वदतोव्याघात वाटतो. कारण आत्मचरित्र हे घटित; तर कादंबरी काल्पनिक असते. आत्मचरित्र लिहिण्यासाठी लेखनकौशल्य हवेच. घटनांची काटेकोरपणे निवड न केल्यास ‘कऱ्हेचे पाणी-तल्या प्रमाणे अस्ताव्यस्तपणा येतो. निवडीत अतितटस्थता आली तर ते महर्षी कर्वे यांच्या ‘आत्मवृत्ता’प्रमाणे कोरडे होते. एकाच हेतूने लिहिलेली प्रत्येक माणसाला स्वतंत्र व्यक्तित्व असते; म्हणून सैद्धान्तिकदृष्ट्या प्रत्येकच जण आत्मचरित्राचा विषय आहे; परंतु प्रत्यक्ष आत्मचरित्र लेखन हा साहित्यप्रकार किती कसोट्यांमधून उतरावा लागतो हे ‘आत्मचरित्रमीमांसा’ वाचल्यावर लक्षात येते, म्हणूनच तो ‘जीवघेणा’ आहे, या डॉ. आनंद यादव यांच्या मताशी आपण सहमत होतो!
-उषा तांबे ...Read more
- DAINIK SAKAL
चरित्र लिहिणाऱ्यांसाठी मार्गदर्शक...
आपल्याला आलेल्या अनुभवांचे कथन करावे, विविध प्रकारच्या संकटांशी कशी झुंज दिली हे विस्ताराने सांगावे तसेच स्वत:चे गुण-दोष तपासून योग्य ते आत्मपरीक्षण करावे, असे नेहमी नसले तरी काही वेळा मनात येते. परंतु हे सर्व शातपणे मनापासून ऐकून कोण घेणार? अगदी आपल्या कुटुंबातील व्यक्तीही त्याच त्या गोष्टी प्रसंग, आठवणी ऐकून कंटाळलेली असतात. आपले अनुभवाचे बोल ऐकण्यास श्रोता नसणे यासारखी दु:खद गोष्ट दुसरी कोणतीही नसेल. मनातील विचार शब्दबद्ध करून अनेकापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘आत्मचरित्र’ या साहित्यप्रकाराकडे व्यक्ती जेव्हा वळते त्यावेळी मात्र अनेक वाचक ‘त्या’चे विचार जाणून घेण्याचा मनापासून प्रयत्न करतात. त्या व्यक्तीच्या जीवनाप्रमाणे आपले जीवन आहे का? किंवा त्यांचे कौटुंबिक जीवन कसे आहे? आपण त्याच्यापेक्षा सुखी आहोत का ती व्यक्ती आपल्यापेक्षा समाधानी आहे? इत्यादी प्रश्नाची उत्तरे वाचक ‘त्या’च्या आत्मचरित्रातून शोधत असतात. अशा अनेक कारणांसाठी वाचकवर्गाला अन्य कोणत्याही साहित्यप्रकारापेक्षा आत्मचरित्र हा साहित्यप्रकार अधिक भावत असावा. आत्मचरित्राचे लेखन हे स्वत:भोवती गुंफलेले असल्याने नीर-क्षीर तत्त्व अभावाने आचरले जाते आणि शीर्षकाप्रमाणेच केवळ स्वत:चे चरित्र लिहिले जाते. आत्मचरित्राचेही प्रकार असतात, विषय असतात. आत्मचरित्र म्हणजे स्वचरित्र नाही. प्रस्तुत विषयाचे यथायोग्य आकलन होण्यासाठी आनंद यादव यांनी ज्ञानवर्धक असे ‘आत्मचरित्र मीमांसा पुस्तक वाचकांसमोर ठेवलेले आहे. भावी आत्मचरित्रकार, वाचक यांना पुस्तक उपयुक्त तर आहेच पण त्याचबरोबर मराठी वाङ्मयाच्या अभ्यागतांना संशोधनात्मक मार्गदर्शक ठरणारा आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये.
श्री. यादव यांनी ग्रंथ शीर्षकानुसार आत्मचरित्राची मीमांसा करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रस्तुत ग्रंथ लेखनामागील भूमिका स्पष्ट करताना यादव यांनी मराठी वाङ्मयाच्या इतिहासापासून आजपर्यंतच्या आत्मचरित्राचा थोडक्यात आढावा घेतलेला आहे. त्याप्रमाणेच हा प्रकार कमीअधिक प्रमाणात का लिहिला गेला असावा याबाबतीत शोध घेतलेला दिसून येतो. सुरुवातीला आत्मचरित्र या शब्दांची संकल्पना स्पष्ट केलेली आहे. पाश्चात्य आत्मचरित्रे आणि भारतीय आत्मचरित्रे यामधील तुलानात्मक फरकाचे विवेचन केले आहे. आत्मचरित्र लिहिण्यामागील प्रेरणांचा शोध लेखकाने पुढील प्रकरणात घेतलेला आहे. या प्रेरणाबरोबरच आत्मचरित्र म्हणजे काय याबद्दलही विस्तृत विवेचन केले आहे. यानंतरची प्रकरणे अभ्यागतांना आणि भावी आत्मचरित्रकारांना अत्यंत उपयुक्त आहेत. या प्रकारणामुळे वाचकांनाही कोणतेही आत्मचरित्र वाचताना ते अधिक जाणीवपूर्वक वाचल्यामुळे आनंदप्राप्ती होईल.
आनंद यादव यांच्या प्रस्तुत पुस्तकाचे मुखपृष्ठ छोटे, ठसठशीत आणि कमालीचे बोलके आहे. व्यक्तीच्या हातामधील दर्पणात त्याचा चेहरा दर्शविण्याऐवजी जीवनातील विविध रंग दर्शविलेले आहेत. हे रंग एकमेकांत मिसळूनही पूर्णपणे एकरून झालेले नाहीत. प्रत्येक रंग हा स्वतंत्र आहे. जीवनातील अनुभवांतही असेच अनेक रंग असतात. आत्मचरित्रकाराने अलिप्तपणाने प्रत्येक रंग नव्याने कागदावर उमटावयाचा असतो. विविधरंगी जीवनवस्त्राचा आविष्कार या चित्राद्वारे साधलेला आहे. असे वाटते. ग्रंथ शीर्षकामुळे आणि मलपृष्ठावरील मजकुरामुळे पुस्तकाच्या अंतरंगाची कल्पना येते. ग्रंथ शीर्षकापासून मलपृष्ठांपर्यत वाचनीय असे हे पुस्तक आहे. पुस्तकाच्या अखेरीस संदर्भ ग्रंथ सूची दिलेली आहे. आत्मचरित्र या वाङ्मयप्रकारचे विवेचन करणारे हे पुस्तक अभ्यागतांनी अभ्यासावे. ‘आत्मचरित्राचे प्रकार आणि त्यांचे योगदान’ हा विषय पीएच.डी साठी अभ्यागतांना सुचवावासा वाटतो. यादृष्टीनेही यादव यांचे पुस्तक उपयुक्त ठरेल. वाचक, जिज्ञासू, अभ्यागतांना सहज समजेल अशी भाषाशैली आहे. एकंदरीत यादव यांचे ‘आत्मचरित्र मीमांसा’ हे पुस्तक मराठी वाङ्मय क्षेत्रात मोलाची भर टाकू शकेल, यात शंका नाही. आपल्या ग्रंथालयातील कपाटामध्ये एका पुस्तकाची भर टाकण्यापेक्षा आपल्या ज्ञानात भर टाकण्यासाठी, संशोधनात्मक कार्य करण्यासाठी, साहित्यिकांनी आत्मचरित्र लिहावे का या प्रश्नासाठी भावी आत्मचरित्रकारांच्या मार्गदर्शनासाठी पुस्तक उपयुक्त आहे.
-भागश्री कुलकर्णी ...Read more
- NEWSPAPER REVIEW
आत्मचरित्र या वाङ्मय प्रकाराचे सर्वांगीण विवेचन...
मराठीमध्ये कथा, कादंबरी नाटक इ. जो अनेक साहित्य प्रकार आहेत त्यांचे मूलभूत घटक कोणते, स्वरूप काय याचे सविस्तर मार्गदर्शनवर विवेचन असणारे ग्रंथ उपलब्ध आहेत. पण आत्मचरित्रावर मात्र असे एकही पुस्तक नाह, ही उणीव आनंद यादव यांनी ‘आत्मचरित्रमीमांसा’ लिहून दूर केली आहे. आणि मराठीच्या अभ्यासकांची ही चांगलीच सोय केलेली आहे यात शंका नाही.
आत्मचरित्र या शब्दांचा अर्थ काय, स्वचरित्रापेक्षा हाच शब्द योग्य कसा, पाश्चात्य व भारतीय संस्कृती भेद, वेगळी मानसिकता यामुळे आत्मचरित्रांतही मूलभूत फरक कसा पडला याचे सुंदर विवेचन पहिल्या प्रकरणात केले आहे. पाश्चात्य संस्कृती व्यक्तिकेंद्रीत म्हणून व्यक्तीचा स्वभाव, मन, व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये, प्रमादांची चर्चा हे आत्मचरित्राचे ध्येय समजले जाते, तर भारतीय संस्कृतीत कुटुंबाला महत्त्व म्हणून व्यक्तींच्या गुणदोषांपेक्षा समाज संस्कृती देश यासाठी केलेल्या कार्याला जास्त महत्व दिले जाते.
आत्मचरित्र लेखनाच्या प्रेरणा शोधण्याचा प्रयत्न दुसऱ्या प्रकरणात केला आहे. इतिहास लेखनाची प्रेरणा जी प्रबोधन काळात विशेष प्रमाणात दिसते अशा प्रकारच्या आत्मचरित्रात व्यक्तिगत इतिहास असतो, पण गौण स्थानावर आणि सामाजिक सांस्कृतिक कार्याचा घेतलेला आढावा हा महत्त्वाचा असतो. कारण तो तरुणांपुढे आदर्श म्हणून मांडायचा असतो. याच्या मर्यादा काय, याचे महत्त्व काय, इतिहास म्हणून याचे स्वरूप काय याचे सविस्तर विवेचन यादवांनी केले आहे. याचे आणखी एक वेगळे स्वरूप म्हणजे व्यक्तिगत इतिहास लेखनचे. पण चुकीची माहिती वा बातम्या कशा चुकीच्या आहेत हे सांगण्यासाठी लिहिलेले आत्मचरित्र, गतकाळात रमण्याची प्रेरणा असलेले, ऐतिहासिक दृष्टिकोनाचा अभाव असलेले म्हणून ललित गद्य, वाङ्मयीन गुणवत्ता असणारे पण आशयाच्या दृष्टीने दुय्यम ठरणारे केवळ अनुभवाची रास वाटणारे असे आत्मचरित्र आत्मप्रतिमेच्या जाणिवेची प्रेरणा असणारे; पण त्याबरोबर समाज, कुटुंब, शासन इत्यादीचे विविधांगी योगदान दुर्लक्षून आत्मपूजक व एकांगी आत्मचरित्र. ज्याचा स्वत:च्या अन्यायाला वाचा फोडताना दुसरी बाजू मुळीच नसते वा असलीच. तर सोयीची तेवढीच दिली जाते. आत्मशोधाची प्रेरणा असणारे उच्च कोटीचे संत, तत्त्वज्ञ यांचे आत्मचरित्र हा आणखी एक प्रकार तर आत्मविष्काराची प्रेरणा असलेले रोमॅण्टिक प्रकृतीचे कलावंत व साहित्यिक यांचे आत्मचरित्र याची कारणमीमांसा अगदी सविस्तर केलेली आहे.
चरित्र हा शब्द तरी ‘लीळाचरित्र’ ‘हर्षचरितम’ आदींमध्ये असला तरी चरित्र या साहित्यिक संज्ञेला या कलाकृती उतरत नाहीत आणि पाश्चात्य साहित्य संपर्कानंतर चरित्र व आत्मचरित्राचा उदय मराठीत झाला हे दाखवून यादव पुढे स्पेनमन यांनी दिलेले आत्मचरित्राचे प्रकार वर्णन करतात. नायकाला प्राधान्य देऊन सार्वजनिक क्षेत्रात कार्य करणारे कारखानदार, उद्योगपती, कार्यकर्ते इ. चे आत्मचरित्र व दुसरा खासगीरित्या वैयक्तिक जीवन जगणारे कलावंत, नट, नट्या इ. आत्मचरित्र. या दोन्ही प्रकारांतील मांडणीची भिन्नता, त्यांचे स्वरूप उदाहरणे यांचा सखोल परामर्श घेऊन पुढे मांडणीला प्राधान्य देऊन झालेले तीन प्रकार - (१) तत्त्वज्ञानात्मक (२) इतिहासात्मक (३) साहित्यरूपात्मक यादव सांगतात. या तिन्ही प्रकारांचा सखोल व सोदाहरण उहापोह यादव करतात, पण तिसऱ्या प्रकाराबाबत स्वत:ची मतभिन्नत का व कशी यांचे जे सांगोपांग विवेचन त्यांनी केले आहे ते मुळातून वाचून अभ्यासण्याजोग झाले आहे. याबरोबर आत्मचरित्राला जवळचे असणारे स्मृतिचित्रे, संस्मरणे, दैनंदिनी इत्यादीचाही विचार मांडला आहे.
मानव आणि समाज निसर्ग व स्वत: मी यांची अटळता, आत्मचरित्राच्या ‘मी’च्या जीवनाचे स्वरूप, वैशिष्ट्ये, त्याचे इतरांपेक्षा असलेले वेगळेपण, अर्धकच्ची आत्मचरित्रे कोणती व कशी, कालिकदृष्ट्या योग्य वेळ कोणती, कोठे थांबावे, आत्मचरित्राचे स्वयंप्रकाशिपण यांची मीमांसा आत्मचरित्राचा विषय मध्ये येते.
आत्मचरित्राची प्रक्रिया तार्किक पद्धतीने कोणत्या ४ कारणांनी सिद्ध होते व सोपा वाटणारा हा प्रकार अभ्यासाअंती कशी गुंतागुंतीची निर्मिती प्रक्रिया आहे हे यादव लक्षात आणून देतात. आत्मचरित्र दर्जेदार व कलात्मक होण्यासाठी कशाकशाची जरूरी आहे याचे सुबोध स्पष्टीकरण आत्मचरित्र लेखनाची पूर्वतयारीमध्ये आले आहे.
आत्मचरित्र लेखनातील संभाव्य दोष हे आहे पुढचे प्रकरण. यात संभाव्य धोके कोणते, त्यावर इतरांची उत्तरे याची चर्चा, आत्मनिष्ठा प्रांजळ वा एकांगी आत्मचरित्रावरचे दोन प्रकारचे कालिक परिणाम, लाटेवर आरूढ होऊन वा उपेक्षांना वाचा फुटावी म्हणून लिहिलेले आत्मचरित्र कालबाह्य, अर्धागविकल किंवा आत्मगौरव गाथा कसे बनते याचे दिग्दर्शन केले आहे. आणखी एका नैतिक स्वरूपाच्या समस्येचा उहापोह केला आहे. समकालीन व्यक्तीविषयक लिहिणे गैरसोयीचे असल्यास पर्याय कोणते तसेच पुननिर्मिती अशक्य असल्यामुळे विसंवादी व्यक्तींची भूमिकासुद्धा समजून घेण्याची गरज कशी आहे, शेवटी या चर्चेत फलित व आत्मचरित्र कशामुळे महान साहित्यकृती बनते याचे विवेचन आले आहे.
कथा, कादंबरीसारख्या साहित्य प्रकाशन लेखकाचे अनुभव पर्यायाने आत्मचरित्र प्रतिबिंबीत होत असताना वेगळ्या आत्मचरित्राची गरज काय? यामुळे होणारी पुनरुक्ती किंवा त्रुटी या निर्माण होणाऱ्या अडचणीतून मार्ग कसा काढावा, साहित्यिक असूनही आत्मचरित्रे का फसतात याचा विचार साहित्यिकाने आत्मचरित्र लिहावे काय याच्या अनुषंगाने घेतली आहे.
आत्मचरित्र आणि कादंबरी यातील साम्यस्थळे, भेद, दोघांच्या हेतूतील फरक, प्रकारातील फरक, दोघांत असलेले योगायोगाचे स्थान तसेच आत्मचरित्रात्मक कादंबरी या शब्दप्रयोगाचे दोन अर्थ, त्यातील निवेदन, नावाबद्दल घेतलेले स्वातंत्र्य, चरित्रात्मक कादंबरीची केलेली तुलना हे सर्व विवेचन आत्मचरित्र आणि कादंबरी या प्रकरणात येते.
आत्मचरित्रकाराचे लेखकीय गुणधर्म या पुढच्या प्रकरणात असाहित्यिक व्यक्तींना मोलाचे मार्गदर्शन यादवांनी केले आहे. कच्च्या सामग्रीची संकलन, आत्मचरित्राचे हेतू, विषय या निश्चितता, त्याच्या अनुरोधाने घट प्रसंग यांची निवड गौणप्रधानता इ आवश्यकता आत्मचरित्र रेखीव घाट होण्यासाठी प्रतिपादली आहे. कलावंताना अलिप्ततेची गरज, संकुचित वृत्ती येणारी एकाग्रता, इतर .... जीवनहेतूकडे त्यामुळे होणारे दुर्लक्ष आयुष्यातल्या मोठ्या चुकांबाबत प्रांजळ मीमांसेची अभाव, त्यामुळे येणारा अप्रमाणिकपणा, गाजलेले आत्मचरित्रांची कारणे व त्यांचा ... अंतर्मुख वृत्तीने अनुभव व घडामोडी याचे येणारे जिवंतपण या सर्वांची दखल प्रकरणात घेतली आहे.
आत्मचरित्र वाचनाने जीवनाला कशी समृद्धता, सुंदरता, उत्साहाची अनुभव मिळते याचे विवेचन केले आहे. आत्मचरित्र हा एक जीवघेणा साहित्यप्रकार कसा आहे, चरित्राचा तो एक उपप्रकार कसा नाही यांचा शोध प्रकरणात घेतला आहे.
मुखपृष्ठ अन्वर्थक, चंद्रमोहन कुलकर्णी यांनी रेखाटलेले आहे. एवढं सगळ्या विवेचनाला जर एखादे आत्मचरित्र घेऊन त्याची समीक्षा आनंद यादवांनी केली असती तर पूर्णत्व आले असते असे वाटते. एवढे सोडले अभ्यासकांना संग्राह्य, महाविद्यालयात वाचनालयात हे पुस्तक असणे आवश्यक आहे यावर दुमत नसावे.
-गीता देशपांडे ...Read more
- DAINIK LOKSATTA
आत्मचरित्राचे आत्मचरित्र…
आत्मचरित्रमीमांसा हे आत्मचरित्रांचे आत्मचरित्र विशद करणारे आनंद यादव यांचे पुस्तक म्हणजे मराठी साहित्यास व विशेषत: आत्मचरित्र या साहित्यप्रकारात विशेष रुची ठेवणाऱ्या वाचकास एक देणगीस्वरूप ग्रंथ आहे.
हा ग्रंथ लिहिण्यामागचाप्राथमिक हेतू यादवांनी आपल्या ‘आत्मगतात’ स्पष्ट केला आहे अन् तो म्हणजे सध्या आत्मचरित्रांचा विद्यापीठीय पातळीवर मोठ्या प्रमाणात अभ्यास केला जात आहे. पदव्यांसाठी संशोधनात्मक लेखन केले जाते, परंतु कथा-कादंबरी या साहित्यप्रकारापेक्षा आत्मचरित्र. या साहित्यप्रकाराचा अभ्यास त्यामानाने खूपच विरळा अन् दुबळा वाटतो. आत्मचरित्र या साहित्यप्रकाराच्या अभ्यासाच्या वेगळेपणाच्या वाटा दाखविण्याचा किंवा नव्या दिशा शोधण्याचा कुणी जाणकार समीक्षकाने मन:पूर्वक प्रयत्न केलेला दिसत नाही.
आनंद यादव हे स्वत: एक चांगले लेखक आहेत. झोंबी, नांगरणी, घरभिंती अन् काचवेल अशा चार भागांत वाचकांना दिले आहे. जवळजवळ १५-१६ वर्षांच्या प्रदीर्घ काळाचे चिंतन अन् मंथन यादव यांनी आपल्या या चार खंडांच्या आत्मचरित्रात संवेदनशील लेखनशैलीत मांडलेले आहे.
स्वत:लाच सतत शोधीत राहण्याचा वास्तव आविष्कार म्हणजे आत्मचरित्र. कथा-कादंबऱ्यांचा ज्याप्रमाणे एक विशिष्ट वाचकवर्ग असतो तसा आत्मचरित्र या वाङ्मयाच्या वाचकांची संख्या कमी असेल, परंतु हा वाङ्मयप्रकार स्वातंत्र्योत्तर काळात अधिक लोकप्रिय होऊ लागला आहे. याचबरोबर आत्मचरित्राची मराठी साहित्यसृष्टीतील उपेक्षा पाहूनही यादव यांनी आपली खंत व्यक्त केली आहे.
‘आत्मचरित्रमीमांसा’ या पुस्तकाची मांडणी, विशेषत: ‘मीमांसा’ या विषयाचा मूलाधार पकडून अनुक्रमाने तात्त्विक अन् सर्वांगीण चर्चा वाचकांना सूत्र रूपात मिळते, आत्मचरित्रकाराचे लेखकीय गुणधर्म आत्मचरित्र अन् इतर साहित्यप्रकार इत्यादीविषयी सविस्तर चर्चा या ग्रंथाच्या निमित्ताने प्रथमच मराठीत उपलब्ध होत आहे. असा होरा प्रकाशकाने केला आहे. प्रस्तुत ग्रंथ वाचल्यानंतर हा होरा मान्य करण्यास कुठलीच हरकत राहत नाही.
स्वत:च स्वत:ला समजून घेण्याचा, स्वत:च स्वत:ला मुक्तपणे व्यक्त करण्याचा आत्मचरित्र हा सामर्थ्यवान व अजोड साहित्यप्रकार आहे. आत्मचरित्राच्या वाचनामुळे समाजातील समसंवेदन जनांना जगायला, काहीतरी करायला आत्मस्पर्शी बळ निर्माण होते. कधी कधी हे आत्मबळ जीवनाच्या नव्या वाटा दाखवून जाते, तर कधी आपण जगतो आहोत त्या जीवनातही नवी ऊर्मी निर्माण होऊन जीवन आकलन होण्याची नवी खिडकी उघडते. अर्थातच अशा आत्मचरित्रात लेखकाची आत्मनिष्ठ प्रांजळ व प्रामाणिक असावी लागते, अशी टिपणी डॉ. यादव यांनी आत्मचरित्राच्या लेखनगुणाची मीमांसा करताना केली आहे. वर मी म्हटल्याप्रमाणे या ग्रंथाची सूत्रबद्ध मांडणी अशी आहे की, सुरुवातीसच ‘आत्मचरित्र’ या शब्दाची संकल्पना विस्तृतपणे सांगितली आहे तर त्यानंतर आत्मचरित्राची लेखनप्रेरणा जी आत्मप्रेम, आत्मशोध व आत्मपरीक्षणाद्वारे निर्माण होते याची मीमांसाही बऱ्याच दीर्घपणे केली आहे. पुढे या आत्मचरित्राचे प्रकार, चरित्रलेखनाचे विविध विषय व विषयानुरूप त्याच्या लेखनाची पूर्वतयारी व लेखनशैली याविषयी सांगून आत्मचरित्र का लिहावे अथवा का लिहिले जाते, आत्मचरित्र लेखनातील संभाव्य दोष कसे टाळावे, साहित्यिकाने आत्मचरित्र लिहावे का, आत्मचरिकाराचे लेखकीय गुणधर्म याविषयी अभ्यासपूर्ण खाणाखुणा मोठ्या खुबीने समजावून दिल्या. आहेत. आत्मचरित्र या साहित्यप्रकाराची बांधेसूद चर्चा केल्यानंतर शेवटच्या एक दोन प्रकरणात एखादे आत्मचरित्र लोकप्रिय का होते किंवा वाचक अशा आत्मचरित्र वाचनाकडे का वळतो, मानवी जीवनाशी आणि अनुभवांशी संबंधित असलेल्या व स्वत:च्याच जीवनाचा अलिप्तपणे विचार व चिंतन करणाऱ्या या लेखनप्रकारची लोकप्रियता व वाचनीयता वाढीस कशी लागेल याबाबतही डॉ. यादवांमधील आत्मचरित्रकार लेखकाने मोठ्या खुबीने व अभ्यासपूर्ण वर्णनाने सांगितले आहे.
चंद्रमोहन कुलकर्णी यांचे विविधरंगी मुखपृष्ठही ग्रंथशीर्षकाशी सुसंगत आहे.
यादवांच्या अभ्यासपूर्ण प्रयत्नाने आता वाचकांसमोर असा पहिलावहिला ग्रंथ आला आहे. अशी प्रकाशकाची गर्वोक्तीही खरी ठरावी. आत्मचरित्राची मराठी साहित्यसृष्टीतील सर्वांगीण उपेक्षा अल्पशा प्रमाणात तरी कमी व्हावी म्हणून हा ग्रंथ मी लिहिला आहे. असे यादव प्रांजळपणे सांगतात, त्यांच्या या ग्रंथामुळे मराठी साहित्यातील आत्मचरित्राची तात्त्विक चर्चा गतिमान होवो, मराठी समीक्षकांनी केलेली या ग्रंथप्रकाराची उपेक्षा ही आनंद यादव यांच्या ‘आत्मचरित्रमीमांसा’ या ग्रंथामुळे थांबली नाही तरी प्रतिभा व काल्पनिक साहित्यप्रकारांच्या वाचनापेक्षा आत्मचरित्राचे वाचन अधिक प्रमाणात करणारा वाचकवर्ग वृद्धिंगत होवो. कारण या वृद्धीतच आत्मचरित्र या साहित्यप्रकाराची समृद्धी दडली आहे. यात दुमत नाही. ...Read more