महाराष्ट्र टाइम्स अज्ञात..... एक विस्तृत परीघ .....
डॉ. छाया महाजन ह्यांचा नवा कथासंग्रह वाचनात आला. वाचक कितीही सर्वश्रुत असला, सर्वज्ञानी मानला, तरीही मानवी मनाचे अनेक कंगोरे/विषय त्याला अज्ञातच राहतात. `असं का व्हावं ह्या प्रश्नाला त्याच्याकडे उत्तर नसतं अशया अनेक जाणिवांना, विषयांना स्पर्श करणाऱ्या कथा, ह्या कथा संग्रहात आहेत. काही कथांचे विषय जरी पूर्वी इतर लेखकांच्या कथांमधून वाचनात आलेले असले तरी लेखिकेचा असा स्वतःचा दृष्टीकोन, त्या कथांना `स्पेशल` करून टाकतो.
`सावलीचा दाह` कथेतील वृद्ध आईच्या वाट्याला सून-मुलांकडून येणारी त्रयस्थ-तिरस्कृत वागणूक अनेकदा कथांमध्ये येऊन गेली असली तरी छायाताईंनी, मुलानं विचारलेल्या `परतफेडीला एनी लिमिट?` ह्या प्रश्नावर काढलेला तोडगा , वेगळा व स्पेशल आहे. `प्रत्येकाचा भोग व प्रारब्ध वेगळं, जे ज्याचं त्यालाच भोगू द्यावं` - हे गुरूंनी सांगितलेलं वाचन तिला संसाराच्या मायेतून अचानकपणे मोकळं करतं, मुक्त करतं ती कुठेहि जायला राहायला तयार होते.
`निचरा` मधील देवदासींच्या मुलगी मोठी कलावंत होते, पण आपल्या भूतकाळापासून तिला फारकत घेता येत नाही. `भूतकाळाची लाज वाटू द्यायची नाही` गोष्टी सोप्या होतात,` हा उपाय कथेतील रामबाण ठरवत. उत्कृष्ट उतरलीये ती `वेदना चिरेबंदी` घरातल्या विधवा सुनेचा उपभोग , घरातल्याच जेष्टांनी घेणं, ह्या एके काळच्या परिस्थितीवर खूप लिखाणं झालं. पण छायाताईंनी त्या कथेत रंगवलेलं दुर्दैवं व वेदना, सबंध कथाभर वाचकांच्या मनाच्या चिंध्या करत राहत.
`अज्ञात` कथेतला भविष्य सांगणारा पोपट `पत्र आलंय` मधला परदेशातल्या मुलाचं `येऊ नका म्हणणारं पत्र लपवणार बाप `सूरास्त` मधील शेजाऱ्याच्या लहानग्या नोकराचे नातवांप्रमाणे लाड करणारा वृद्ध `अस्मिता` मधील कामाच्या बदल्यात उपभोग घेऊ इच्छिणाऱ्या पीचडी च्या गाईडचं गलिच्छ वास्तव , ( त्या विरुद्ध तडफेने उभी राहिलेली विद्याथीनी ) , `प्रतीक्षा` मधील नोकरी करणारी त्यामुळे मुलाच्या अपेक्षेनुसार पारंपरिक कर्तव्य पार न पाडणारी ` आई `मोकळं आकाश` मध्ये सरकारं गुंड घालून मारपीट करून जमीन काढून घेतलेला हतभागी शिवाप्पा व सगळ्यात शेवटी वास्तव घटनेवर बेतलेली कुष्ठरोग्यांवरची कथा `वास्तव` लेखिकेचे सूक्ष्म निरीक्षण शक्तीतर जाणवतेच पण स्वतःला पटतील असे निष्कर्षही त्या काढतात. ते सर्व वाचकांना पटतील , भावतील अशीही काळजी घेतात.
प्रवाही भाषेत लिहिलेला , स्वतःबरोबर घेऊन जाणारा हा मेहता पब्लिशिंग हाऊस प्रकाशित संग्र्ह वाचून लॉकडाऊनच्या काळात आलेली मरगळ एका झटक्यात दूर झाली. म्हणून वाचकांकरता हे छोटस परीक्षण डॉ. छाया महाजन ह्यांची विद्वत्ता नाव ख्याती लेखन, सर्वच समृद्ध आहे प्राचार्य म्हणून जरी त्या रिटायर झालेल्या असल्या तरी सर्वदूर ऑनलाईन कार्यक्रम करण्यातील त्यांची तडफ जाणवण्यासारखी आहे. दरवर्षी अनेक दिवाळी अंकातून त्या वाचकांच्या भेटीला यायच्याच . आता ह्या वर्षी दिवाळी अंक कोणत्या स्वरूपात निघताहेत व त्यातून त्या आपल्या भेटीला काय आणताहेत हे बघायचं.
...Read more
MAHARASHTRA TIMES 03-01-2021अज्ञाताच्या शोधाचे कथारूप...
डॉ. छाया महाजन या मराठीतील महत्त्वाच्या लेखिका आहेत. त्यांनी कथा, कादंबरी आणि ललितगद्य लेखनातून आपली स्वतंत्र शैली प्रस्थापित केलेली आहे. निरनिराळ्या अनुभवांना सामावून घेणारे त्यांचे लेखण वैशिष्ट्यपूर्ण ठरलेले आहे. मानवीजीवनाचा विविध कोनातून शोध घेत, त्यांनी जगण्याच्या अनेक मिती साहित्यातून साक्षात केलेल्या आहेत. जीवनातील व्यमिश्रता आणि अलक्षित पेचांना त्यांनी मुखरित केला आहे. रूढ अर्थाने त्या स्त्रीवादी लेखिका नाहीत, परंतु भारतीय अवकाशात स्त्रियांच्या वाट्याला येणाऱ्या दु:ख भोगाची अनेकविध रूपे त्यांच्या लेखनातून उजागर होतात. शमाजातील बहुस्तरीय जीवनजाणीवांना कवेत घेण्याचा प्रयत्न डॉ. महाजन यांच्या कथेने केलेला आहे. त्यांचा नुकताच प्रसिद्ध झालेला ‘अज्ञात’ हा कथासंग्रहही याला अपवाद नाही.
मानवी जीवन आणि त्यामधील आशयविश्व हे विस्तीर्ण आहे. त्याला अनेकविध संदर्भ आहेत. ते सर्वच संदर्भ साहित्यातून प्रकट करणे अशक्य आहे, तरीही केंद्रवर्ती आशयापेक्षा अलक्षित जाणीवविश्वाला प्रकट करणे, ही बाब नेहमीच साहित्याच्या दृष्टीने महत्त्वाची असते. अशा ‘अज्ञात’ असणाऱ्या विषयांना कथारूप देण्याचा सातत्याने प्रयत्न डॉ. महाजन यांनी केलेला दिसतो. परिघाबाहेरच्या आशयाला कथेच्या कक्षेत सामावून घेणे, ही त्यांची लेखनप्रकृती आहे. हेच भान प्रस्तुत कथासंग्रहातूनही दिसते. अज्ञात, पत्र आलंय, मोकळं आकाश, वास्तव, सावलीचा दाह, निचरा, प्रतीक्षा, विस्कळित, सुरास्त, वेदना चिरेबंदी, अस्मिता अशा अकरा कथांचा समावेश या संग्रहात आहे. बेकारी, दारिद्र्य, नियती, सांस्कृतिक ताण, कौटुंबिक तणाव, नात्यातील तकलादूपणा, गुंडगिरी, भ्रष्टाचार, शेतकऱ्याची असहायता, भांडवली विकासाच्या नवप्रारूपाने सर्वसामान्य माणसांना आलेले क्षुद्रत्व, कुष्ठरोगी व्यक्तीच्या आयुष्याची शोकांतिका, वयोवृद्ध जगण्याची फरफट, देवदासींच्या वास्तव, नाचणाऱ्या स्त्रीबद्दलच्या समाजधारणा, लहान मुलांचे केले जाणारे शोषण, समाजाच्या दृष्टीने अनैतिक असणारे नातेसंबंध, अशा अनेकविध विषयांना मध्यवर्ती ठेवून या कथा आकाराला आल्या आहेत.
या कथासंग्रहातील कथांमध्ये विषय-आशयाचे वैविध्य दिसते. वेगवेगळ्या समाजस्तरांच्या जाणीवा आणि वृत्ती-प्रवृत्तींना या कथांनी कवेत घेतले आहे. ही कथा बहुविध जीवनजाणिवा आणि त्यातील ताण्याबाण्यांना मुखरित करताना दिसते. या सर्वच कथा अंतर्मुख करायला लावणाऱ्या आणि मानवी वर्तन व त्या वर्तनामागील कार्यकारणभाव स्पष्ट करणाऱ्या आहेत. नागेश, अण्णा, बिरजूशेठ, शिवाप्पा, महादेव, सविता, हेमा, राजेश, रमणी यांसारखी अनेक सुष्ट-दुष्ट पात्रे आपल्या भवताली दिसणारी आहेत. त्यांचे नेमके रेखाटन डॉ. महाजन यांनी केले आहे. ही सर्व पात्रे आशयाला तोलून धरत, वास्तवाची प्रचिती देणारी आहेत.
कथांच्या भाषेत प्रमाणभाषेतील वळणदारपण आहे; त्यामुळे वाचनीय सुलभताही आलेली आहे. चिंतनशीलता आणि वैचारिकता हा महत्त्वाचा गुणधर्म या कथांच्या भाषेचा आहे. मांडणीत रहस्यमयता असल्याने, ही कथा वाचकांना पकडून ठेवते. सर्वच कथांची सुरुवात उत्सुकता निर्माण करणारी आणि शेवट संदेशसूचक आहेत. निवेदन-मांडणी आणि रचनेच्या प्रयोगामुळेही हा संग्रह महत्त्वाचा ठरतो. आशय अभिव्यक्तीचे एकजीवीकरण आणि अज्ञाताच्या शोधाचे कथारूप म्हणून या कथासंग्रहाचे मोल लक्षात घेणे आवश्यक आहे.
-केदार काळवणे ...Read more