NEWSPAPER REVIEWया विश्वात कितीतरी अशा गूढ गोष्टी आहेत की जेथे मती गुंग होते...
आपल्या जीवनात अनेक असे प्रसंग घडतात की आपली बुद्धी चक्रावून जाते, असे अनेक अनुभव लोक सांगतात की त्यांचे तर्कशक्तीच्या बळावर आकलन - स्पष्टीकरण करणे जड जाते. ज्या गोष्टींचे स्पष्टीकरण व कर्यकारणभाव सहजपणे उलगडत नाही, अशा गोष्टी संदिग्ध आणि गूढ ठरतात, त्यांची गूढरचना ही माणसाला पिढ्यान्पिढ्या भूल घालत राहिली आहे. आपल्या भविष्यात काय दडलेले आहे, आपल्या पूर्वजन्मी आपण कोण होतो, पक्ष्यांची भाषा आपल्याला कळू शकते का, मृत्यूनंतर माणसाचे काय होते, आत्मा हा दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करून काही कामे करून घेऊ शकतो का, भूत वगैरे प्रकार खरोखरच आहेत का, दूर अंतरावर असणाऱ्या दोन व्यक्तींच्या मनात एकाच वेळी एकच विचार होणे असा प्रकार संभवतो का, भावी अनर्थाची पूर्वसूचना मिळते का, काही विशिष्ट स्थळी गेल्यावर व विशिष्ट व्यक्तींच्या सहवासात गेल्यावर मनःशांतीचा अनुभव येतो हे खरे आहे का, चंद्र व ग्रह यांचा मानवी मनावर व जीवनावर प्रभाव पडतो का, ग्रहशांती-यज्ञयाग करून काही फायदा होतो का, केवळ स्पर्शाने रोग बरा करण्याची क्षमता कोणात असते का, पंचेंद्रियांनी होऊ शकत नाही असे काही ज्ञान आहे का, आणि तसे ते असल्यास त्याच्या आकलनासाठी अधिक ज्ञानेंद्रिये असणे संभाव्य आहे का, लहान वयातच संगीत, गणित वगैरे क्षेत्रांत विशेष प्रावीण्य दाखविणाऱ्या मुलामुलींच्या व पूर्वजन्माच्या स्मृती सांगणाऱ्या व्यक्तींच्या अनुभवाचा अन्वयार्थ कसा लावायचा इ. इ्... हे आणि असे अनेक प्रश्न हे जगभरच्या शास्त्रज्ञांनाही सारखे सतावत राहिलेले आहेत. गूढ व रहस्यपूर्ण असा त्यांच्यावर शिक्का मारून ते स्वस्थ बसलेले नाहीत. त्यांचा उलगडा करण्यासाठी ते प्रयोग करीत आहेत. अज्ञानाचा बोध व्हावा, त्याची उकल व्हावी म्हणून त्यांची खटपट चालू आहे.
अशा या प्रयत्नांची माहिती देण्याचा प्रयत्न डॉ. सुरेशचंद्र कुलकर्णी यांनी ‘अज्ञानाचे विज्ञान’ या पुस्तकातील चोवीस लेखांद्वारे केला आहे. मानवी सृष्टीतल्या अज्ञात, गूढ अशा अनेक बाबींवर प्रकाश टाकणारे हे लेख आहेत. त्यासाठी त्यांनी अनेक पाश्चात्त्य पुस्तकांचा उपयोग केला आहे. अडीच वर्षे खपून बारा-तेरा हजार पृष्ठांचे वाचन करून, टिपणे काढून, भरपूर श्रम घेऊन योग्य ते संदर्भ जमवून या लेखांची मांडणी केली आहे. पाश्चात्त्य देशात एखाद्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी काही व्यक्ती व संस्था सतत प्रयत्नशील असतात आणि आपल्या संशोधनाचे निष्कर्ष वेळोवेळी प्रसिद्ध करीत असतात. काही संशोधक हे निष्कर्ष काढताना नको तेवढी चलाखी दाखवून, दिशाभूलही करतात. परंतु एकूण या संशोधनामुळे अनेक बाबींवर वेगवेगळ्या अंगांनी प्रकाश पडत जातो हे खरेच आहे.
डॉ. नाडकर्णी यांनी पुढील विषय या पुस्तकात घेतले आहेत. वैश्विक चक्र व त्याचे परिणाम, चंद्राचा मानवी जीवनावर व स्वभावावर होणारा परिणाम, ग्रह आणि व्यवसाय, ग्रहावरून भविष्य सांगण्याचा प्रयत्न, आत्मा, उपद्व्यापी कंपनलहरी, मानसिक सामर्थ्य, प्रत्येक व्यक्तीभोवती असणारे तेजोवलय कोष, विद्युत चुंबकीय क्षेत्र, अॅक्युपंक्चर व शियात्सू इ. उपचार पद्धती, मनलहरी, इच्छाशक्ती, धातूचे सोन्यात रूपांतर करणारा परीस, आदिम समाजातील औषधोपचार पद्धती, हस्तरेखाशास्त्र, संमोहनशास्त्र, बाह्यमन व अंतर्मन, मंत्रविद्या व चेटूक, स्वप्ने व अबोध मन, दूर संवेदना, अंतःप्रेरणेने मिळणारे संकेत, काळावर मात करण्याचे प्रचत्न, भूतयोनीचे गौडबंगाल, मृत्यूनंतरचे अस्तित्व, मानवाचे भवितव्य.
ह्या लेखांतून अनेक शास्त्रज्ञ, अनेक प्रयोग, अनेक नव्या संकल्पना समोर येतात. आपल्या विचारांना त्यामुळे चालना मिळते.
पस्तीस आणि चाळीस सेल्सियस तापमानाच्या दरम्यान पाणी अत्यंत अस्थिर वागते. माणसाच्या शरीराचे तापमान नेमके याच तापमानाच्या टप्प्यात असते. हा केवळ योगायोग मानायचा का? (७)
पृथ्वीवर सापडणाऱ्या सुमारे ११० मूलद्रव्यांपैकी फक्त सोळा द्रव्येच सजीवांचे शरीर घडवितात. त्यांच्या क्रमवारीचे संयुग साखळ्या (कंपाउंड चेन्स) बनविल्या जातात. बुरशीपासून देवमाशापर्यंत सर्वांच्या बाबतीत हाच प्रकार होतो. (९) विशिष्ट क्रमवार मांडणीने होणारी सजीवांची निर्मिती हा एक चमत्कारच आहे.
मांजराचे कान इतके तीक्ष्ण असतात की त्यांचे वर्णन हाय फिडेलिटी इक्विपमेंट असे करता येईल. (११)
डॉ. सेमिअन किर्लेअन यांनी मानवी शरीराभोवती असणाऱ्या तेजोवलय कोषाचा फोटो घेणारे तंत्र विकसित केले. (८९)
हाताच्या पृष्ठभागावरचे किरणांचे पुंज या यंत्राद्वारे दिसल्यावर डॉ. मिखाईल गायकिन यांना अॅक्युपंक्चरच्या उपचारबिंदूच्या नकाशाशी ते जुळतात असे आढळून आले. (९०)
चरक व सुश्रुत यांनी मानवी शरीरावरील १०७ मर्मबिंदूंची नोंद केलेली आहे. (९१)
टोबिस्कोप या यंत्रामुळे बायोप्लाझ्मा (सूक्ष्मदेह), तेजोवलय (ऑॅरा) आणि अॅक्युपंक्चर व शियात्सू या उपचार पद्धतीत एक नवीनच दुवा निर्माण झाला आहे. (९२) सूक्ष्मदेह व तेजोवलय दोहोंना जोडणारे मन शरीरात कुठे आहे?
अंतर्मनात अनेक सुप्त भावना दाबून ठेवल्या जातात. कारणपरत्वे त्यांचा एकाएकी उद्रेक होतो, तेव्हा मनोगतिकीच्या घटना घडून येतात. त्यांना भानामती असे मानले जात असावे असे डॉ. नांदोर फॉडोर हे मनोविश्र्लेषणतज्ज्ञ मानतात. (९५)
डॉ. जेनेडी सर्जेयेव्ह यांनी म्हटले आहे की अत्यंत गाढ झोपेत वा समाधी अवस्थेत मेंदूतून प्रतिसेकंद चार लयीत ह्रदयाचे ठोके स्पंदन पावत असतात. त्यांना थिटा लहरी म्हणतात. (९६)
जपानमध्ये १९१०-१९१३ या अवधीत टोमाकिशी फुकुराई याने सीलबंद फोटोप्लेटवर आपल्या मनातील विचारांचे छायाचित्र उमटवून दाखविण्याचा प्रयोग केला. (९८)
निरनिराळ्या भाषांतील शब्दोच्चारणाची पद्धत व त्यातून निर्माण होणारे ध्वनी लक्षात घेऊन जागतिक ध्वन्यानुसारी (फोनेटिक) वर्णमाला तयार करण्यात आली. (५६)
विश्वातील सर्व अणू हे कंपनशील आहेत आणि एखाद्या गोलाकार घंटेप्रमाणे सतत नादनिर्मिती करीत असतात. परमाणू हे स्वरसमूह आहेत. सजीवांचे शरीर हे एक वाद्य आहे. त्यातून सतत संगीत बाहेर पडत असते. ‘सिंफोनी ऑफ लाइफ’ या ग्रंथात डॉ. डोनाल्ड अँड्र्यू यांनी ही कल्पना मांडली आहे. (५७)
दूर अंतरावरून, स्पर्श न करता दिवा पेटवता येतो हा प्रयोग १९३०-३१ साली डॉ. हॅरी प्राइस यांनी मार्गारेट एलिन या महिलेबाबत करून दाखवला. (६७)
नेलिया मिखाइलोव्हा या महिलेने स्लाइसच्या चळतीकडे रोखून पाहिले. त्यातील एक स्लाइस बाहेर पडून नेलियाच्या दिशेने सरकत गेली - ही रशियातील साहित्यिक लेव्ह कोलोनी आणि व्हादिन मरीन यांनी नोंदवलेली कहाणी. (७५) नेलियाचे विद्युत चुंबकीय क्षेत्र इतरापेक्षा अधिक शक्तिशाली होते. केवळ नजरेने अंड्याचा पांढरा व पिवळा भाग अलग केला. (७७)
लहान मेंदूच्या खालील भागात कल्पिलेले आज्ञाचक्र (थॅलॅमाय) हे अत्यंत महत्त्वाचे ज्ञानकेंद्र असन कुंडलिनी जागृती करणारे साधक त्याला शिवाचे स्थान मानतात. (७७)
प्रत्येक सजीवाच्या शरीराभोवती त्याचे स्वतःचे असे एक स्थितिज विद्युत क्षेत्र (स्टॅटिक इलेक्ट्रिकल फील्ड) असते.
गूढ विद्यासाधक हे तेजोवलय कोष पाहू शकतात वा तसा दावा करतात. (८३)
डॉ. ऑस्कर बॅग्नल आणि डॉ. वॉल्टर क्लिनर यांनी त्यावर प्रयोग केले. (८४)
शरीरातील सर्वात महत्त्वाची चेतासंस्था दिवसाकाठी तीन ग्रॅम पोटॅशियम उपयोगात आणते. आक्र्टिक व अंटार्टिक प्रदेशात दोन वर्षांपेक्षा जास्त काळ राहिलेल्या शास्त्रज्ञांच्या बाबतीतही हेच प्रमाण आढळते. यावरून पृथ्वीचे दिनमानचक्र आणि मानवी शरीराच्या क्रिया यांचा संबंध लक्षात येतो. (१३)
पहाटे चार वाजता मातेचे शरीर कमाल शिथिल अवस्थेत असते. त्याच वेळेस जन्मणाऱ्या बालकांचे प्रमाण जास्त आढळते. पहाटे शरीर क्रिया मंदावलेल्या असल्याने गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीस ही वेळ निवडतात.
सर्वाधिक मतिमंद मुले डिसेंबर-जानेवारी या कालावधीत जन्मलेली दिसतात. मे-जून मध्ये जन्मलेल्या मुलांचा बुद्ध्यांक सर्वात जास्त आढळतो. डॉ. हॅटिंग्टन व डॉ. हेन्री नॉब्लॉक यांचे संशोधन. (१४)
शुक्ल पक्षात चंद्रकला वाढताना व पौर्णिमेला केलेल्या शस्त्रक्रियांच्या वेळी हजारपैकी ८७० रुग्णांना रक्तस्राव जास्त होतो. (१९) अमावास्येच्या आसपास केलेल्या शस्त्रक्रियांत अतिरिक्त रक्तस्राव कमी होतो म्हणून ते दिवस शस्त्रक्रियांसाठी वापरावे असे डॉ. एडसन अँड्र्यू यांचे मत आहे. (२०)
चोरी, उचलेगिरी, आततायी बेदरकार ड्रायव्हिंग, अतिरिक्त नशापान, इ. गुन्हे पौर्णिमेच्या दिवशी अधिक घड़तात, असे अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ क्लायमेटॉलॉजीच्या अहवालात दिले आहे. (२०)
जन्मलग्नी शनि-मंगळाशी निगडित असलेल्या व्यक्ती वैद्यकीय व्यवसायात जास्त आढळतात असा डॉ. मायकेल गॉकिलिन यांनी निष्कर्ष नोंदवला आहे. (२६)
कर्करोग होण्यापूर्वी शरीराच्या अवयवांच्या विद्युतभारात लक्षणीय बदल घडून येतात असे डॉ. हॅरॉल्ड बर (येल युनिव्हर्सिटी) यांनी जाहीर केले. (३९) संपूर्ण शरीरात एकदिश विद्युत प्रवाह आहे. मात्र चेतासंस्थेतून निघणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरी वेगळ्या आहेत.
सजीवाचे विद्युतचुंबकीय क्षेत्र हे एकात्मीभूत कार्यतंत्र आहे आणि सजीवाचा मृत्यू झाल्यानंतर देखील ते काही काळ मागे उरते असे डॉ. एडवर्ड रसेल यांना आढळून आले. (४१) ‘नियतीची संकल्पना’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. हे क्षेत्र म्हणजे तर आत्मा नव्हे ना?
पिरॅमिडच्या विशिष्ट रचनेमुळे खाद्यपदार्थ काही काळ तसेच टिकून राहतात. पिरॅमिडच्या आत ठेवलेली विद्युत उपकरणे कोणताही बिघाड न होता बंद पडतात असे डॉ. अमर गोहेड यांना आढळून आले. (५१)
गोल, चौकोनी व दंडगोलाकृती डब्यापेक्षा मधे फुगीर असणाऱ्या पिंपात दारू वा बीअर स्वादिष्ट बनते. (५१)
बुरशीसारखे सूक्ष्म जीवजंतू व मानवासारखा विकसित गुंतागुंतीचा देह यांच्या अॅमिनो अॅसिडस एकाच पद्धतीने निर्माण होतात. निसर्गात आढळणाऱ्या विविध आकृतिबंधांच्या शास्त्राला ‘सायमॅटिक्स’ हे नाव आहे. (५४)
कंपनलहरी व त्यांच्या प्रभावामुळे घडवली जाणारी आकृती यांतील कार्यकारणभाव लक्षात घेऊन डॉ. हान्स येनी चांनी टोनोस्कोप हे यंत्र बनवले. ध्वनिलहरींची त्रिमिती आकृती रेखाटणारे हे साधन आहे. (५५) ...Read more