AKHERCHE PARV BY VIJAYA RAJADHYAKSHA
विजयाताईंच्या ’अखेरचे पर्व’ या कथासंग्रहात पूर्वप्रकाशित बारा कथांचा अंतर्भाव आहे. त्या त्या दिवाळी अंकाचा स्वभाव किंवा अभिरुचीनुसार या लिहिल्या असल्या प्रत्येक कथेतून मानवी मनाचे... त्यातल्या भावभावनांचे वेगवेगळे पैलू अधोरेखित होतात.
कथांतून जे काही घडतं ते वास्तवाच्या परिघातलं असतं. स्वभावदोषामुळे कधी विस्कळीत होणारी, तर सद्भावनेमुळे जोडली जाणारी नाती नित्य प्रसंगांतून व्यक्त होत राहतात. पिढ्यांतील वैचारिक अंतर... मतभेद... क्वचित्प्रसंगी निर्माण होणारा संघर्ष हा सार्वत्रिक अनुभव विजयाताईंच्या सिद्धहस्त लेखणीतून वेगवेगळ्या रूपाने कथाबद्ध होतो.
या कथा वाचताना आपल्याला असे जाणवते, की त्या अतिरंजित किंवा अ-वास्तव नाहीत. त्यात कल्पनाविलास नाही. दाद मिळवण्याच्या अभिप्सेने अनिवार्यपणे येणारा लालित्याचा अभिनिवेश नाही. भाषा साधीसोपी मनाला भिडणारी... कथाप्रवाहात वाहून नेणारी आहे. कथेत नाट्य असलेच तरी ते जीवनानुभवाच्या स्तरावरचे आहे. कथा सुखांतिक असेल, तर आपण मोरपिसांचा स्पर्श अनुभवतो आणि शोकांतिक असेल, तर मळभ दाटल्यासारखे अस्वस्थ होतो.
कथांतील काही प्रसंग आपल्या पाहण्यातले किंवा कदाचित आपल्या घरात घडल्यासारखे वाटत राहतात. कधी त्यातल्या पात्रांची विचारसरणी आपल्याशी कुठेतरी जुळते असे जाणवत राहते. थोडक्यात, कथाबीजातील ’सर्वसमावेशकता’ हे विजयाताईंच्या लेखनातील महत्त्वाचे वैशिष्ट आहे.
या संग्रहातील काही कथांचा शेवट वाचकांनी कल्पावा, असा विजयाताईंचा मानस दिसतो. एकूणच अवश्य वाचावा आणि ’फील’ करावा असाच हा कथासंग्रह आहे.