Dipak Manjarekarडाॅ.आनंद यादव : (३० नोव्हेंबर १९३५ – २७ नोव्हेंबर २०१६).
आज त्यांचा जन्म दिवस...!
डाॅ. आनंद यादव हे नाव मराठी साहित्याशी मैत्री असणाऱ्या वाचकाला नवीन नाही. महाराष्ट्रातल्या ग्रामीण जीवनाचं यथार्थ दर्शन घडवणाऱ्या कथा, कादंबरी आणि कवितांचे लेखक म्हून त्यांचं कर्तुत्व वादातीत आहे. कथा, कविता, कादंबरी, ललितगद्य, समीक्षा इ. अनेक साहित्यप्रकारांमध्ये लक्षणीय स्वरूपाचे लेखन त्यांनी केले आहे. ललित साहित्यातील त्यांच्या कसदार लेखनामुळे आणि समीक्षात्मक लेखनात दिसणाऱ्या व्यासंगी वृत्तीमुळे आजच्या मराठी साहित्यातल्या यशस्वी लेखकांत डाॅ. आनंद यादव या नावाचा अंतर्भाव सहजपणाने होतो.
आजच्या नव्या पिढीला त्यांच्या नावाची ओळख `नटरंग` या लोकप्रिय चित्रपटामुळे होते. ग्रामीण तमाशा कलावंताच्या उपेक्षित जीवनाचा आविष्कार करणारी त्यांची `नटरंग` ही कांदबरी समकालीन समाजजीवनाचा वाङ्मयीन दस्तऐवज ठरली. तमाशा कलावंत गुणा कागलकर याची शोकांतिका थोडक्यात सर्व तमाशा कलावंतांची प्रातिनिधिक कथा ठरते. याच कादंबरीवर बेतलेला आणि त्यांची पटकथा असणारा ‘नटरंग’ चित्रपटही तुफान लोकप्रिय ठरला. आणि त्यांच्या बावनकशी सोन्यासारख्या वाड़मयीन गुणवत्तेला जगमान्यता मिळाली.
झोंबी, नांगरणी, घरभिंती आणि काचवेल या कादंबऱ्यांच्या निमित्ताने डाॅ. आनंद यादव यांनी आत्मचरित्रात्मक कादंबरीचा नवा मानदंड निर्माण केला. कारण या स्वरूपाचे कादंबरीलेखन यापूर्वी मराठी साहित्यात कधीही झालेले नव्हते. पण सर्वथा या चार पुस्तकापलिकडे त्यांच्या इतर साहित्यसंपदेकडे जिज्ञासू वाचकां शिवाय कुणी ही सरकत नाही.वस्तूतः गोतावळा किंवा खळाळ , नटरंग हे इतर साहित्य तितकेच उत्कृष्ट आहे..!
डाॅ. आनंद यादव याचा जन्म 30 नोव्हेंबर 1935 साली कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या गावी झाला. "झोंबी" ही त्यांची संपूर्ण आत्मकथा दहावी पर्यंत शिक्षण घेण्यासाठी लेखकाला खाव्या लागलेल्या खस्ता ह्या भोवती फिरते. दारिद्र्य,अंधश्रद्धा आणि वडिलांचा शिक्षणाला असलेला प्रखर विरोध ह्या विरुद्ध ठामपणे उभे राहत आनंद यादव आपले शिक्षण पूर्ण करतात.
पुढे रत्नागिरी मध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेताना पु.ल. देशपांडे यांच्याशी झालेल्या परिचयानंतर त्यांच्या `हिरवे जग`मधली नववळणाची अस्सल ग्रामीण कविता कुठेही प्रकाशित न होता त्यावेळेच्या ख्यातनाम साहित्यिकांपर्यंत पोहोचली.त्यांची वाड़मयीन गुणवत्ता उजळून निघाली. पुढे डाॅ. आनंद यादव यांनी प्रांजळपणे आपल्या साहित्यिक आणि वैयक्तिक आयुष्यात पु.ल. व सुनिताताई देशपांडे यांचे योगदान नांगरणी, घरभिंती आणि काचवेल या चरित्र-खंडात उल्लेखलेलं आहे. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर...1955 च्या संप्टेंबर-ऑक्टोबरात भाई (पु.ल. देशपांडे) आणि सुनिताताई माझ्या जीवनात अनपेक्षितपणे आले आणि त्यांनी माझ्या व्यक्तीत्वाच्या मूळ कंदाला हात घातला. तोपर्यंत मी माझ्या आवडीसाठी वाचन करत होतो. मनाला बरं वाटतं म्हणून भावनाप्रधान कविता करत होतो. त्या पलीकडे त्या लेखनात काही नव्हतं, पण भाईंनी नि सुनिताताईंनी नकळत माझ्या मनावर हळुवार फुंकर घातली. माझ्या साहित्यिक गुणांविषयी माझ्यात दाट विश्वास निर्माण केला. त्यामुळे परिस्थितीच्या टाचे खाली चुरगळून गेलेल्या माझ्या वाड़मयीन गुणांना एकाएकी खतपाणी मिळालं. मनाला चैतन्यपूर्ण जोमदारपणा आला. ते वाढू विकासू लागलं.अनावरपणे वाड़मयीन गुण माझ्या इतर गुणांवर मात करू लागले. त्यांना मागं लोटून आपण पुढं येण्यासाठी धडपड करू लागले. `तुझं शिक्षण पूर्ण करण्यास मदत केली तर उद्याच्या महाराष्ट्राला एक चांगला साहित्यिक मिळू शकेल, या विचाराने आम्ही तुझ्यासाठी धडपडत आहोत.` हे सुनिता ताईंच्या पत्रातील वाक्य मी मनावर संगमरवरात कोरावं तसं कोरून ठेवलेलं...त्यामुळे माझी जीवनविषयक महत्वाकांक्षा अधिक स्पष्ट झाली होती. प्राध्यापक आणि साहित्यिक दोन्ही व्हायचं असं मी ठरवलं होतं.
माझ्या मते डाॅ. आनंद यादव ही मराठी साहित्याला पु.ल. आणि सुनिताताई यांनी दिलेली अनमोल भेट म्हणता येईल!
1950 नंतरचा काळ सत्यकथेच्या उत्कर्षाचा आणि अत्युच्च प्रतीष्ठेचा होता. रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे या शहरात वाड़मयीन संस्कार घडल्यानंतर सत्यकथा आणि मौज यांनी त्यांच्यावर ग्रामीण कथाकार, कवी म्हणून प्रतीष्ठेचा पहिला शिक्का 1961 साली दिवाळी-पाडव्याच्या मुहूर्तावर मारला.हा शिक्का मिरवत ते झपाट्याने लिहीत राहिले..
आनंद यादव यांच्या १९६० पासून ५०-५५ वर्षांच्या साहित्यिक कारकिर्दीचा एक परिपूर्ण आढावा घेताना त्यांच्या साहित्यातून नवीन प्रवाह आणण्यासाठी त्यांनी यशस्वी पणे केलेली धडपड ठळकपणे जाणवते. आत्मचरित्र ही सर्वमान्य रूढ संकल्पना त्यांच्या ‘झोंबी’, नांगरणी’, ‘घरभिंती’, ‘काचवेल’ हे अनोख्या पद्धतीनं आलेल्या आत्मचरित्रात्मक कादंबरीला लागू होत नाही. हे चार खंड मराठी साहित्याला नवे मापदंड देणारे वाटतात. यापूर्वी अशा पद्धतीने आत्मचरित्र कुणी ही लिहिलं असेल वाटत नाही. झोंबी किंवा नांगरणी पासून माझ्यासारख्या आयुष्यात दिशा हरवलेल्या कितीतरी जणांनी प्रेरणा घेतली असेल, या पुस्तकांची किती तरी पारायणे केली असतील.
डॉ. आनंद यादव त्यांनी निर्माण केलेल्या आशयघन, प्रयोगशील, भरघोस साहित्यकृतींमुळे मराठी साहित्यातले एक महत्त्वाचे नाव आहेच ; परंतु तितकेच ते महत्त्वाचे आहे कारण त्यांनी ग्रामीण साहित्य लेखनाची, ग्रामीण साहित्याकडे बघण्याची एक नवी वाट शोधली आणि ती वाट पाठीमागून येणाऱ्या नव्या ग्रामीण साहित्यिकांसाठी खुली केली. त्यांनी नव्या लेखकांना जी दिशा, जो विचार, जो दृष्टिकोन दिला, त्यातूनच ग्रामीण साहित्याची चळवळ निर्माण झाली. `काचवेल` या त्यांच्या आत्मचरित्रात्मक शेवटच्या खंडामध्ये मध्ये यावर सविस्तर माहिती आली आहे. 1960 पुर्वी ग्रामीण साहित्यातील लेखक, कवी आणि सर्वसामान्य वाचकांच्या मनावर एक सवंग लोकप्रिय पण दिशाभूल करणारी कल्पनारम्य प्रतिमा रेखाटत असत. त्यांचं ग्रामीण जीवन आणि तिथला माणूस, त्याच्या आशा-आकांक्षा, सुख-दु:खं, आशा-निराशा ह्या समग्रपणे मांडल्या गेल्या नाहीत हा त्यांचा मुळ मुद्दा! या व्यतिरिक्त पुर्वीच्या ग्रामीण साहित्यात लेखकांनी बहुतांशी तृतीय पुरूषी भाषा वापरल्याने लेखक त्यांच्या साहित्यातील पात्रांना आपलं मनोगत
पुरेसे मांडू न देता स्वतःची मतं ही त्यामध्ये बेमालूम पणे मिसळून देतो हा त्यांचा एक मोठा आक्षेप.त्यांच्या मते या काळात ग्रामीण लोकांकडे बघण्याचा सांप्रत लेखकांचा साहित्यिक दृष्टीकोन हा करूणदायी, सहानुभूती दाखवणारा किंवा त्यांच्यावर इरसाल विनोदी कथा लिहून वेंधळटपणाचा शिक्का मारणारा होता. हे सगळं पुसून टाकून तिथे वास्तवाची धग पेरणे हे काम सोपे नव्हते; परंतु डाॅ. आनंद यादव यांच्या साहित्यप्रेरणांची मुळं ग्रामीण भागात घट्ट रोवलेली होती. त्यामुळे अशी भ्रामक प्रतिमा घट्ट करणारं लेखन त्यांच्या हातून होणं अशक्यच होतं. कदाचित यातूनच त्यांच्यातील प्रयोगशीलतेने उसळी मारून जुन्याला नकार देत नवी वाट चोखाळण्याला त्यांना प्रवृत्त केलं असावं. त्यांच्या समग्र लेखनाच्या गाभ्यात आपल्याला ग्रामीण जीवन आणि तिथला माणूस त्याच्या आशा-आकांक्षा, सुख-दु:खं, आशा-निराशेच्या प्रहरांसकट भेटतो. कारण तोच त्यांच्या जीवनास्थेचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळेच अस्सल ग्रामीण जीवनदर्शन हे त्यांच्या संपूर्ण साहित्याचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.ग्रामीण जीवनाचे खरे दर्शन बोलीभाषेतूनच घडवणे शक्य आणि योग्य आहे. अशा आग्रही विचाराने स्वत:ला बोलीभाषेतूनच प्रकट केले. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांतील पात्रे तर बोलीभाषेतून बोलतात; परंतु निवेदकही बोलीभाषेतून संवादी होतो हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले. त्याचबरोबर विविध लेखांतून बोलीभाषेचे समर्थन केले. मराठी साहित्यात एक वेगळा प्रवाह त्यांनी निर्माण केला. त्यांनी ग्रामीण भागातील लेखनाचे अंकुर जपणाऱ्या नव्या, तरुण लेखकांना लिहिण्यासाठी एक पायवाट तयार करून दिली. त्यांच्या प्रेरणेने खेड्यापाड्यातील अनेक तरुण कवी, लेखकांना लेखनाची ऊर्जा मिळाली. ग्रामीणतेचे खरे निकष त्यांनी स्पष्टपणे मांडले.
डाॅ.आनंद यादव यांनी विपुल आणि कसदार लेखन केलं. त्यांनी वेगवेगळे वाङ्मय प्रकार कुशलतेने हाताळले, ते केवळ सगळ्या साहित्यप्रकारात हात मारायचा या हौसेपोटी नव्हे, तर त्या-त्या साहित्यप्रकाराच्या स्वीकारामागे त्यांचा एक स्पष्ट दृष्टिकोन दिसतो. त्यातूनच कविता, कथा, कादंबरी, आत्मचरित्रात्मक कादंबऱ्या, समीक्षा असे त्यांचे बहुआयामी लेखन निर्माण होत राहिले. ‘हिरवे जगे’, ‘मायलेकरं’ सारखे कवितासंग्रह, ‘गोतावळा’सारखी मराठी कादंबरीला नवे रूप देणारी कादंबरी, ‘नटरंग’सारख्या कादंबरीतून मांडलेली कलावंताची फरपट, बहाल करणारे समीक्षात्मक ग्रंथ अशी एकूण चाळीस ग्रंथांची समृद्ध संपदा त्यांनी निर्माण केली. त्यांच्यातील प्रगल्भ साहित्य-जाणिवांचे दर्शन त्यातून घडले.
डाॅ.आनंद यादव यांनी महाराष्ट्रातील विविध साहित्य संमेलनांची अध्यक्षपदे भूषविली आहेत. त्यात, जुन्नर, असोदा, विटा, बेळगाव, भंडारा, नाशिक, औदुंबर, जळगाव, पुणे, मुंबई अशा अनेक ठिकाणी भरलेल्या साहित्य संमेलनांचा उल्लेख करता येईल.
2009 साली महाबळेश्वर इथे झालेल्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना मिळाले असतांना काही वादांमुळे ते संमेलन त्यांच्या अनुपस्थितीत पार पडले.आजपर्यंतच्या साहित्य संमेलनाच्या इतिहासातील ही एकमेव खंत देणारी घटना.
वस्तूतः त्यांच्या संपन्न वाड़मयीन साहित्यप्रवासात हा एक दुर्भाग्य योगच!. पुढे त्यानी 2013 मध्ये साहित्यनिर्मितीमधून सुद्धा जाहीर निवृत्ती स्विकारली.
त्यांना मिळालेल्या अनेक पुरस्कारांचीही नोंद घेणे आवश्यक ठरेल.
त्यांच्या झोंबी या आत्मचरित्रात्मक कादंबरीला १९९० मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच या कादंबरीला अन्य आठ पुरस्कार मिळालेले आहेत.
त्यांना शिवाजी सावंत पुरस्कार, पु. य. देशपांडे स्मृती पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार, लाभसेटवार पुरस्कार असे अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या साहित्याला महाराष्ट्र राज्य सरकारची एकूण दहा पारितोषिके मिळाली आहेत. राष्ट्रीय हिंदी अकादमीचा (कोलकाता) उत्कृष्ट साहित्य निर्मिती बद्दलचा पुरस्कार त्यांना १९९४ मध्ये प्राप्त झाला आहे. यादवांचे साहित्य महाराष्ट्रासह महाराष्ट्राबाहेरील विद्यापीठांमधूनही अभ्यासले गेले आहे. त्यांच्या साहित्यावर अनेक संशोधकांनी एम. फिल. आणि पीएच. डी. चे संशोधन केले आहे. तसेच त्यांच्या साहित्याची कन्नड, तेलगु, हिंदी, इंग्रजी, जर्मन इ.भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. त्यांच्या `गोतावळा` या कादंबरीने ग्रामीण कथात्मक साहित्याला आणि ग्रामीण बोलीभाषेच्या आविष्कार माध्यमाला महत्त्व मिळवून दिले. हे गोतावळाचे ऐतिहासिक महत्त्वाचे कार्य आहे. कथात्मक लेखनाबरोबरच आनंद यादव यांनी ललितगद्यलेखनही केले आहे. या लेखनात प्राधान्याने ग्रामीण अनुभवांचा आविष्कार आहे. ललितलेखन करीत असताना ते साहित्य व्यवहाराशी निगडित असलेल्या अनेक प्रश्नांचे चिंतन करीत होते. त्यातून त्यांचे समीक्षालेखन आणि वैचारिक स्वरूपाचे लेखन निर्माण झाले. अशाप्रकारे एकाच वेळी ललितलेखन आणि समीक्षालेखन या दोन्ही आघाड्या यादवांनी यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. या संदर्भात यादवांच्या रूपाने ग्रामीण साहित्याला चांगला भाष्यकार मिळाला आहे असा निर्देश गो. म. कुलकर्णी यांनी केला आहे.
शाळेत असताना मराठी बालभारती पुस्तकातील `पाटी आणि पोळी` किंवा झोंबी हे धडे वाचताना त्यांच्या साहित्या विषयी मनात अनावर ओढ निर्माण झाली होती. व्यक्तीशः मला आवडलेली किंवा माझं आयुष्य बदलून टाकणारी झोंबी आणि नांगरणी ही पुस्तकं मला खुप प्रेरणादायी वाटतात .
#झोंबी....
"आजच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीत अस्वस्थ होऊन धुमसणे हाच ग्रामीण जीवनाचा स्थायीभाव आहे. त्या अस्वस्थपणाचा स्फोट मराठी साहित्यात सुरू झालाच आहे. हे व्हायला हवेच होते. शिवाय, साऱ्या जगातलं साहित्य समृद्ध केलं आहे. ते या `झोंबी`सारख्या वाचकाला अस्वस्थ करणाऱ्या ग्रंथांनीच!" - पु. ल. देशपांडे
#नांगरणी...
कणखर सकसता आणण्यासाठी...
भूमीनं स्वत:वर धारदार अवजारांनी
आडवे उभे घाव घालून घेणे..
आणि सूर्यभट्टीत अंतर्बाह्य होरपळणे
म्हणजे नांगरणी.
उत्तम पिकांच्या समृद्धीसाठी
शेतमळ्यांवर हिरवीगार साय साकळावी;
अंगाखांद्यावरच्या गाईगुरांना,
माणसाकाणसांना, किड्यामुंग्यांना,
चिमण्यापाखरांच्या इवल्या चोचींना
मूठमूठ-चिमूटचिमूट चारचणा मिळावा;
म्हणून भूमीनं
स्वत:ची सोशिकपणे केलेली उरस्फोड
म्हणजे नांगरणी.
इच्छाआकांक्षाची पूर्तता करणारा पाऊस,
कृपावंत होऊन पडावा म्हणून...
तहानलेल्या पृथ्वीनं वासलेली चोच...
म्हणजे नांगरणी.
नांगरणी म्हणजे...
हिरव्या चैतन्याला जन्म देऊ पाहणाऱ्या,
सर्जनोत्सुक भूमीची घुसमटणारी..
निर्मितिपूर्व करुणावस्था.
झोंबी सुंदर आहेच पण नांगरणीत जकातेंचा `आंदा` महाराष्ट्राच्या कोन्या कपारीत जात `आनंद यादव` नावाचा लेखक होण्याचा हा प्रवास अतिशय सुंदर आहे...झोंबीमध्ये जकातें च्या आंदा चा दहावी पर्यंतचा प्रवास तर नांगरणी मध्ये आंदा ते लेखक आनंद यादव बनण्यापर्यंतचा प्रवास अधोरेखीत केलेला आहे. परिस्थितीसोबत दोन हात करायला शिकवणारे हे आत्मचरित्र, अतिशय सुंदर. नांगरलेलं शेत जसं सुंदर दिसावं तसं हे नांगरणी लेखन ही सुरेख उतरवलं आहे. प्रत्येकाची आपली अशी एक वाट असते. काहींची सरळ, धोपट, काहीची वळणावळणांची अडीअडचणींची लेखकाचीही आपली एक वाट काट्याकुट्यांनी भरलेली. दगडधोंडे आडवे येणारी. तरीही पुढे जायला प्रवृत्त करणारी. पुढे जायचंच या कल्पनेने झपाटलेला जीव काटेरी मार्गाची वाट त्या झपाटलेपणामुळं सहज पार करतो. आणि इच्छा आकांक्षांची पूर्ती; हवं ते मिळवल्याचं मनभरून राहिलेल्या समाधानानं, तृप्तीनं मागं वळून बघतानाचा क्षण, आयुष्याच्या वळत्या वाटेवरचं उमलण्याच्या कल्पनेनं झपाटणं, फुलार, बहरणं, आठवणींचे दवबिंदू पानावरून ओघळले तरी पानांच्या अंगोपांगी असलेलं ओलेपण जपणार्या स्मृतीची सहज उलगड जाणारी मालिका म्हणजे नांगरणी. एस. एस. सी. पूर्वीचा काळ यादवांच्या `झोंबी’मध्ये चित्रित झाला आहे. मध्ये त्या पुढील कॉलेज शिक्षणाचा काळ आला आहे. व्यक्तीत्वाचं रोपटं बहरावं म्हणून परिस्थितीच्या मातीची मशागत करताना, संकटाची तण उपटून फेकताना आलेले कडू गोड अनुभव, सहज सुलभ शैलीत मांडण्याचा यशस्वी प्रयत्न लेखकाने केलेला आहे. झोंबीपेक्षा नांगरणीतला लेखकाचा दृष्टीकोन अधिक व्यापक आहे. प्रतिकूल परिस्थितीच्या विरोधात उभा असलेला लेखक हा नांगरणीचा गाभा आहे. सहजसुलभतेने उलगडत जाणारी उत्कट आत्मकथा.....!
‘नांगरणी’तील आंदोलने ही,आपल्या कुटुंबासह आपल्याला माणसासारख्र जगता यावे म्हणून खालच्या सामाजिक स्तरातून वरच्या सामाजिक स्तरात जाऊ पाहणाऱ्यासंवेदनशील तरूण मनाची आहेत.
ता.क.
त्यांचा आयुष्यप्रवास इतका संघर्षमय पण प्रेरणादायी आहे की त्याच्यावर सुरेख चित्रपट, मालिका अथवा वेबसिरीज बनवता येईल. मध्यंतरी झोंबीवर मराठी चित्रपट ही येणार असल्याची चर्चा ऐकण्यात आली होती. ते खरं असेल तर तो जीवनपट भविष्यातील पुढच्या पिढ्यांना तो एका दिपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक म्हणून पुढे कार्यरत राहिल.
डाॅ.आनंद यादव यांची साहित्यसंपदा.
कथासंग्रह :
खळाळ (१९६७), घरजावई (१९७४), माळावरची मैना (१९७६), आदिताल (१९८०), डवरणी (१९८२), उखडलेली झाडे (१९८६), झाडवाटा (२०००), भूमिकन्या (२००१), शेवटची लढाई (२००२), उगवती मने (२००३).
कादंबरी: गोतावळा (१९७१), नटरंग (१९८०), एकलकोंडा(१९८०), माऊली (१९८५), कलेचे कातडे (२००१).
आत्मचरित्रात्मक कादंबरी :
झोंबी (१९८७), नांगरणी (१९९०), घरभिंती (१९९२), काचवेल (१९९७) ,
कविता संग्रह:
हिरवे जग (१९६०), मळ्याची माती (१९७८) , मायलेकरं(१९८९) हा दीर्घ कवितासंग्रह,
ललित साहित्य
माती खालची माती (१९६५) - व्यक्तिचित्रसंग्रह स्पर्शकमळे (१९७८), पाणभवरे (१९८२), साहित्यिकाचा गाव(२००४) हे ललित लेखसंग्रह.
समीक्षा आणि वैचारिक साहित्य :
ग्रामीण साहित्य : स्वरूप आणि समस्या (१९७९), ग्रामीणताः साहित्य आणि वास्तव (१९८१), मराठी साहित्य, समाज आणि संस्कृती (१९८५), साहित्याची निर्मिती प्रक्रिया (१९८९), ललित गद्याचे तात्त्विक स्वरूप आणि मराठी लघुनिबंधाचा इतिहास(१९९५) आत्मचरित्रमीमांसा (१९९८), ग्रामसंस्कृती (२०००) आणि १९६० नंतरची सामाजिक स्थिती आणि साहित्यातील नवे प्रवाह (२००१) अशा अनेक ग्रंथांची नोंद घ्यावी लागेल. मातीतले मोती (निवडक ग्रामीण कथा, १९७०), निळे दिवस (प्रभाकर पाध्ये यांच्या कथा, १९७६), तिसऱ्या पिढीची ग्रामीण कथा (बाबा पाटील यांच्या सहकार्याने, १९८१), बाबुराव जगताप यांच्या आठवणी, माझ्या आठवणी आणि अनुभव (विठ्ठल रामजी शिंदे, १९९९), मराठी ग्रामीण कथा (सहकार्याने, २००२) हे त्यांचे संपादित ग्रंथही लक्षणीय ठरले आहेत.
या व्यतिरिक्त महाराष्ट्र साहित्य पत्रिका आणि विचारभारती या नियतकालिकांचे संपादनही त्यांनी केले आहे.
संदर्भ : मराठी शब्दकोश , डाॅ. आनंद यादव साहित्य-संपदा. ...Read more