NEWSPAPER REVIEWझोपडपट्टीतील कुटुंबावर कायम घोटाळणारे अस्थिरतेचे कृष्णमेघ...
अंधाराचे वारसदार ही झोपडपट्टीच्या जीवनाची एक विदारक झलक दाखवणारी कादंबरी. `गबाळ` मध्ये कुडमुड्या जोशी जमातीचे चित्रण करणाऱ्या दादासाहेब मोरे यांनी आता त्या जमातीबाहेरच्या जगाकडे, शहरातील झपडपट्ट्यांमधील स्थलांतरितांच्या जीवनसंघर्षाकडे आपले लक्ष वळविले आहे.
कॉलेजमध्ये नव्यानेच जाणारा तरुण रमेश सिनेमाची तिकिटं ब्लॅकनं विकणाऱ्या एका टोळीत नकळत ओढला जातो आणि पहिल्याच झटक्यात पोलिसांच्या तावडीत सापडतो. गणपा हातभट्टीवाला व त्याचे साथीदार त्याला जामिनावर सोडवतात खरा, पण दारू, मटका, गर्द, वेश्या, पान सिगारेट– या सर्वांची चटक त्याला लागते; आणि ब्लॅकमध्ये तिकिटे विकून या व्यसनांची नशा पूर्ण करण्याची त्याची धडपड चालू राहते. पैसे मिळतात पण ते कधीच पुरे पडत नाहीत. नेहमीच कडकी चालू राहते. उधार उसनवार करावी लागते. तशात शहरातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन स्थलांतर करण्याची योजना कार्यान्वित होते. आठ-दहा झोपडपट्ट्यातील हजार-बाराशे कुटुंबांना शहरापासून दोन-तीन किलोमीटर अंतरावरच्या काळ्या रानात हलवण्यात येते. प्रत्येकी पंधरा बाय दहा फुटांची जागा, अशा चाळीस-पन्नास घरांची रांग, दोन रांगांमध्ये कच्चा मुरुम टाकून केलेले रस्ते– नगरपालिकेनं तयार केलेल्या यादीनुसार जागांचे वाटप होत राहते.
घरे कधी बांधून होणार याचे वेळापत्रक कोणालाच ठाऊक नसते. तात्पुरती सोय म्हणून प्रत्येक कुटुंबाला थोडे कळक दिले होते. त्या बांबूच्या कळकांनी खोपटं किंवा झोपडी उभी करून तात्पुरता निवारा ज्याचा त्यानं उभा करायचा होता. त्याप्रमाणं लोक कुठून-कुठून पालापाचोळा, पत्रे, प्लॅस्टिक शीट वगैरे आणून आपला उघड्यावरचा संसार झाकण्याचा प्रयत्न करत होते. उघड्यावरच चुल धडधडत होत्या. खाणं-पिणं चालू होतं. बायाबापड्या चार-सहा घरात धुणं-भांडी करून संसाराला हातभार लावत. शाळा लांब. त्यामुळं मुलं आळस करत.
झोपडपट्टीतल्या लोकांचे नाना उद्योग. कोणी माकडवाले होते, कोणी चिंध्या कागद गोळा करणारे. कोणी गवंड्याच्या हाताखाली बिगारी काम करीत. कोणी आडत दुकानात हमाली करत. पोपटवाले जोशी पोपटाचा पिंजरा घेऊन भविष्य सांगत. कोणी भाकरीचे शिळे तुकडे वाळवून बिस्किटाच्या कारखान्यात, पाव-ब्रेडच्या बेकरीत देत.
दादासाहेब मोरे या झोपडपट्टीतील वेगवेगळ्या माणसांचे व समस्यांचे वैविध्य दाखवू पाहतात. त्यासाठी रमेशच्या कुटुंबाप्रमाणेच सुनीलच्या कुटुंबालाही मध्यवर्ती स्थान देतात. स्थानांतरामुळे अनेकांच्या रोजी-रोटीतही व्यत्यय येतो. सुनीलचा बाप रामाप्पा व आई सावित्रीबाई चौथ्या मजल्यावरच्या स्लॅबचं सिमेंट ओतण्याच्या कामाला जातात. शिडीवरून पाट्या वर पोचवताना रामाप्पा खाली पडतो. लोखंडी सळ्यांवर पडल्याने, त्याच्या मांडीत सळ्या घुसतात. रक्त वाहू लागते. त्याला ठेकेदार हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. सावित्रीबाईही त्याच्या मागोमाग जाते. डॉक्टर उजवा पाय मांडीपासून कापतात. ते म्हणतात, ``महिनाभर हालचाल करायची नाही. कुबड्या लावून चालायची सवय करावी लागेल. दर आठवड्याला तपासणीसाठी या.`` मुलगा सुनील शाळा चुकवू लागतो. आईलाही कामावर जाणे कठीण होते. इमारतीचा मालक औषध-पाण्यासाठी थोडे पैसे देतो.
झोपडपट्टीवाल्यांच्या घरबांधणीच्या कामाकडे कोणीच लक्ष देत नाही. तेव्हा मोर्चा काढण्याचे ठरते. सुदाम, नऱ्या, रमेश व इतर तरुण मोर्चाची तयारी करतात. ``तुम्ही मोर्चात आला तरच तुम्हाला घर मिळेल. निवेदनावर सही नाहीतर आंगठा करा.`` त्या निवेदनाच्या प्रती कलेक्टर, पोलीस स्टेशन, वृत्तपत्रे यांना देण्यात येतात. कापडी बॅनर्स तयार करण्यात येतात. मोर्चापुढे सुदामचे भाषण होते. निवेदन नगराध्यक्षांना देण्यात येते.
रमेशचा दोस्त नऱ्या एकदा रमेशच्या बहिणीला– शेवंतीला एकटीच गाठतो. ``तुझ्या भावाचा दोस्त तर आहेच. मग तुझा दोस्त झालो तर काम बिघडलं? ... ``शेवंता त्याच्या अंगावर तांब्या भिरकावते. डोकं धरून तो झोपडीबाहेर पळतो. लोक झोपडीपुढे जमतात. पण गुंड नऱ्याशी वैर घ्यायला कोणीच तयार नसते. पण तेवढ्यात रमेश चाकू घेऊन नऱ्याचा बदला घ्यायला येतो. गणपाला बघून मात्र तो पाय मागे घेतो.
नगरपालिकेच्या निवडणुकांची धांदल सुरू होते. तशात या झोपडपट्टीला आग लागते. अग्निशामक दलाच्या गाड्या येईपर्यंत बहुतेक झोपड्या जळून खाक होतात. पुढारी झोपडपट्टीला भेट देतात. आश्वासने देतात. गुंड नऱ्या इतर टोळीवाल्यांना सांगतो, ``आपण मदतीसाठी फेऱ्या काढू. धान्य, पैसा इ. काही हाती लागले तर बघू. नाहीतर झोपडीही गेली आणि संधीही गेली असं होईल. आपल्यातली परस्परांची दुश्मनी या प्रसंगापुरती विसरून कामाला लागलं तरच! ज्याच्या ज्याच्या गँगच्या हाताला जे लागेल ते त्याचं.``
मग हे तरुण गटागटानं शहराच्या वेगवेगळ्या भागात फिरून पैसे– मदत गोळा करतात. लोकही कमी-जास्त मदत करतात. धान्य, कपडे, भांडी, ब्रेड, पैसे– निवडणुकीतले उमेदवारही साड्या, चादरी वाटतात. मताला शंभर रुपये भाव देतात. प्रत्येक टोळी प्रमुखाला उमेदवार गणपा दहा-दहा हजार रुपये देतो. मते न आणली तर मात्र जिवंत ठेवणार नाही असा दमही भरतो. गणपा दारूवाला निवडून येतो.
ब्लॅकने तिकिटे विकताना रमेशची आणि अरुणची मारामारी होते. नऱ्याही रमेशला मारतो. रमेश कसाबसा पळत घरी येतो. आई त्याला हळद मलमपट्टी करते. रमेश रात्री नऱ्याला रस्त्यात गाठून त्याच्यावर चाकूचे वार करतो. त्याच्याबरोबरचे सुनील व अकबर पळ काढतात. पोलिसांच्या हाती सापडू नये म्हणून रमेशही पळ काढतो. आपण पोलिसांच्या हाती सापडलो तर अंधारकोठडीत डांबले जाणार; नाहीतर झोपडपट्टीत लपून राहून अंधाराचे वारसदार म्हणून दिवस काढणार. आपल्या जीवनाला लागलेले हे भेसूर भयानक वळण; त्यातून आपली सुटका नाही. या विचाराने तो त्या भेसूर अंधारात रस्ता दिसेल तिकडे धावत सुटतो... त्याची सगळी स्वप्ने उद्ध्वस्त झालेली असतात.
झोपडपट्टीत राहण्याची पाळी आलेल्या तरुणांना जी संगत मिळते ती त्यांना गुन्हेगारीकडे आणि व्यसनांकडे नेते आणि शेवटी त्यांना अंधाराचे वारसदार बनवते.
दादासाहेब मोरे यांनी या झोपडपट्टीतील गरीब रहिवाशांच्या आयुष्यातील परवड वेगवेगळ्या संदर्भासह वाचकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला आहे. रमेश हा नायक म्हणून प्रामुख्याने त्यांनी रंगवला आहे. नऱ्या हा खलनायक. सुनील व इतर गँगवाले, रमेश व सुनील यांची कुटुंबे व त्या झोपडपट्टीतील एकमेव धनिक गणपा दारूवाला– या मोजक्या पात्रांनिशी झोपडपट्टीतील लोकांच्या सुख-दु:खाची एक झलक या कादंबरीत मोरे यांनी दाखवली आहे. तटस्थपणे झोपडपट्टीवासीयांच्या ससेहोलपलटीचे भिन्न-विभिन्न प्रकार मोरे पेश करतात; गुन्हेगारी जगाचाही फेरफटका घडवून आणतात. क्रौर्याला सामोरे जाताना मोरे हे काहीसे दचकत दबकतच पुढे जातात. फार खोलात जाण्याचे टाळतात. झोपडपट्टीबद्दल लिहितानाही त्यांना आपण अप्रिय कर्तव्य करत आहो असे काहीतरी जाणवत असावे. त्यात तसा त्वेष नाही. चीड नाही. असहाय अगतिकता आहे. साक्षीभावाने सगळे अध:पतन बघताना या जीवनाचा भेसूर भयानक शेवट होणार ही खंत त्यांना सर्वाधिक सतावते. ``उद्याच्या भेसूर जीवनाची कल्पना कोणीतरी आपल्याला वेळीच द्यायला हवी होती`` अशी पश्चात्तापाची भावना रमेशमध्ये शेवटी जागी होते. पण आता ती निरुपयोगी असते. सरळ रेषेत जायचे कितीही मनात असो, अंधारात वाट वाकडी-तिकडी होण्याची शक्यता अंधाराच्या वारसदारांबाबत विशेषच राहते– असा इशारा ही कादंबरी देते. ...Read more
DAINIK SAKAL 16-06-2002संयमित आविष्कार...
समकालीन जीवनाचा तलस्पर्शी वेध घेणारा साहित्य प्रकार म्हणून ‘कादंबरी’चा उल्लेख केला जातो. त्यामुळे जीवनात प्रत्यही घडणारी परिवर्तने कादंबरीतून पाहायला मिळतात. मध्यमवर्गीय जीवनातली स्थित्यंतरे हा अगिणत कादंबऱ्यांचा गाभा आहे, त्याच्य जोडीला साठोत्तरी कालखंडात झोपडपट्टीवासीयांचे जीवन, त्यांच्या व्यथा वेदनांसह टिपण्याचा प्रयत्न सुरू झाला. शहरांशी निगडीत झोपडपट्ट्यांची दखल मराठीत ‘चक्र’, ‘वासूनाका’, ‘माहीमची खाडी’ आदी कादंबऱ्यांनी प्रथमच प्रभावीपणाने घेतली, त्यांच्यामधून झोपडपट्टीचे सांस्कृतिक अनुबंध, सामाजिक संबंध, आर्थिक आकृतिबंध यांचा मराठी वाचकांना परिचय होत गेला. हा संपन्न वारसा सांभाळत दादासाहेब मोरे यांची ‘अंधाराचे वारसदार’ ही कादंबरी अवतरली आहे. तिच्यात झोपडपट्टीतील जीवनकलहाचा मुकाटपणा, सोशिकपणा आणि भाबडेपणाही अनेक घटना, प्रसंगांतून वर्णन केलेला आहे.
ग्रामीण भागातील माणसे जिवंत राहण्यासाठी शहरात येऊन स्थायिक होतात, त्यांना झोपडपट्टीचा आश्रय मिळतो. अशा माणसांना शहरी जीवनात रुळताना दुभंगलेपणाचा भोग अटळपणाने भोगावा लागतो. भकासपणा त्यांच्या जीवनाचा भाग बनतो. अशा माणसांच्या पुढील पिढीला बकालपणा शाप वाट्याला येतो. भय, भूक आणि भ्रष्टाचार यांच्या विळख्यात झोपडपट्टीचे जीवन सापडते. साहजिकच एकेकाळी प्रकाशाचे शिल्पकार असलेल्या ग्रामीण कुटुंबातून शहरी पर्यावरणात ‘अंधाराचे वारसदार’ कसे निर्माण होतात याचे हृदय आणि सुरेख चित्रण दादासाहेब मोरे यांनी केले आहे.
‘तमसो मा ज्योतिर्गमय’ ही आदिम काळापासूनची मानवी शुभेच्छा असूनही जगातील अगणित मानवगटांना अंधारातून अंधाराकडे वाटचाल करावी लागत आहे. अशा अभावग्रस्त ‘अंधाराचे वारसदार’ या कादंबरीत असाच एक उल्लेखनीय प्रयत्न झाला आहे. स्वत:च्या पोटासाठी, मुलांच्या पाटी, पेन्सिलीसाठी शहराच्या आश्रयाला आलेल्या ग्रामीण समूहाच्या नशिबी ‘आगीतून फुफाट्यात पडणे’ कसे येते याचे विदारक चित्रण या कादंबरीत केले आहे.
प्रातिनिधिक स्वरूपात ही कादंबरी सिद्रामचे कुटुंब, नऱ्याची टोळी, गणपा दादाचा गोतावळा, झोपडपट्टीची दिनचर्या यांच्याशी निगडीत आहे. सिद्राम आपली पत्नी राधाबाई आणि मुले रमेश, सुरेश शेवंतासह लवंगी गावाहून सांगली शहराच्या झोपडपट्टीत राहू लागतो. इथे त्याला आणखी दोन मुले होतात. एकवीस वर्षांचा रमेश महाविद्यालयीन युवक आहे. तो सिनेमाची तिकिटे काळ्या बाजारात विकणाऱ्या नऱ्याच्या टोळीकडे ओढला जातो. यानिमित्ताने पहिल्या प्रकरणात सिनेमा तिकिटांच्या काळ्या बाजाराच्या यंत्रणेवर भेदक प्रकाश टाकला आहे. सहज मिळणाऱ्या पैशामुळे नऱ्या, सुनील, विलास, अकबर, रमेश असे अनेक युवक व्यसनांच्या आहारी जातात. मद्यप्राशन, वेश्यागमन, धूम्रपानही त्यांच्या अंगवळणी पडतात.
एका झोपडपट्टीची दिनचर्या हा कादंबरीचा गाभा आहे. दुसऱ्या प्रकरणाच्या प्रारंभी रिमांड होमजवळील झोपडपट्टीचे नव्या जागेत पुनर्वसन होणार म्हणून तेथील लोकांच्या आशा पल्लवित होतात. तिसऱ्या प्रकरणात झोपडपट्टीला पुनर्वसन मंत्री ना. पोटारते साहेब भेट देतात. त्यांच्या कार्यक्रमाचा आँखो देखा हाल सादर केलेला आहे. पाचव्या प्रकरणात झोपडपट्टीचे नव्या जागेत स्थलांतर होते. त्यामुळे शिक्षण, सुविधा, रोजगारविषयक नव्या समस्या निर्माण होतात. सहाव्या प्रकरणात झोपडपट्टीला पाऊस झोडपून काढतो. आठव्या प्रकरणात गणपा दादाच्या पुढाकारने झोपडपट्टीवासीयांचा मोर्चा काढण्यात येतो. दहाव्या प्रकरणात नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने झोपडपट्टीचे जीवन ढवळून निघते. याच वेळी तिला भीषण आग लागते. अकराव्या प्रकरणात जळितग्रस्तांच्या मदतीसाठी झोपडपट्टीतील युवक गावभर फिरून मदत गोळा करतात. तिच्या वाटपात भ्रष्टाचार होतो. निवडणुकीच्या आदल्या रात्री पद्धतशीर पैसे वाटप होऊन गणपा दादा निवडून येतो, अशा झोपडपट्टीच्या दिनचर्येत दादासाहेब मोरेंनी अनेक नाट्यपूर्ण घटना, प्रसंग कौशल्याने गुंफले आहेत. दलित, मुस्लिम, मातंग, गोसावी, साप गारुडी, माकडवाले, मराठा, कुणबी अशा लोकांचीही बहुजिनसी झोपडपट्टी आहे. हे लोक उपजीविकेसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग, व्यवसाय, नोकऱ्या करतात. त्यापैकी अहमद, रशीद आणि मुन्ना यांच्या नाग-मुंगसाचा सार्वजनिक खेळ तपशीलवार वर्णन केला आहे. त्यांची लुटुपुटूची लढाई खरोखरची होऊन त्यात मुंगूस नागाला मारून टाकतो. या कादंबरीच्या शेवटी रमेश नऱ्याचा खून करतो. या दोन्ही घटनांमधील सूचकता लक्षणीय आहे.
झोपडपट्टी जीवनाच्या पार्श्वभूमीवर नऱ्या, रमेश, सुनील, विलास, अकबर अशा काही प्रातिनिधिक युवकांचा अध:पात दाखवणे हे या कादंबरीचे मध्यवर्ती अंत:सूत्र आहे. पहिल्या प्रकरणात साक्षीभूत असलेला रमेश पुढे गुन्हेगारी जगताचा एक भाग बनतो. त्याचे घरांपासून तुटत जाणे अधिक तपशिलात हवे होते. कदाचित, घुमेपणा, निमूटपणा, नेमस्तपणा हे रमेशचे व्यक्तिमत्त्व विशेष कादंबरीकाराला अभिप्रेत असावेत. आपल्या तरुण बहिणीवर- शेवंतावर नऱ्याने अतिप्रसंग केला म्हणून सूडाच्या भावनेने रमेश पेटतो. त्याच्या नैतिक कल्पनांना धक्का बसून तो नऱ्याची हत्या करतो. सुनील गर्दच्या आहारी गेला आहे. नशा करण्यासाठी तो घरातील भांडी विकतो. त्याचे वडील रामाप्पा आणि सावित्रीबाई यांची कहाणी करुणामय वाटते. या संपूर्ण कादंबरीत ‘अंधाराचा वारसदार’ म्हणून खऱ्या अर्थाने नऱ्या वावरतो. तो रगेल, रंगेल, दिलदार, बेंडर, समजदार अशा वृत्ती प्रवृत्तीचा आहे. सुरेश रमेशच्या पावलावर पावले टाकू लागतो. तेव्हा, रमेश, सुनील, सुरेश ही तरुण मुले प्रकाशाचे वारसदार होण्याचे टाळून अंधाराचे वारसदार कसे होतात, याचे प्रभावी चित्रण दादासाहेब मोरे यांनी केले आहे. ते करताना त्यांनी भडक, उथळ, बटबटीतपणा न दाखवता, सूक्ष्म, संयमशील, संवेदनायुक्त आविष्कार साधला आहे. आततायी, आक्रस्ताळी दृष्टी न ठेवता विवेकपूर्ण अभिव्यक्ती केली आहे म्हणून ही कादंबरी वाचनीय झाली आहे.
प्रा. विजय काचरे ...Read more