Krishna Diwateसुलभा प्रभुणे कोवळे दिवस, सत्तांतर, करूणाष्टके अशी अनेक पुस्तके लिहिणारे, जंगल वाटांबद्दल अतिशय आत्मीयतेने लिहिणारे व्यंकटेश माडगूळकर यांची वेगळी ओळख करुन द्यायला पाहिजे असे अजिबात नाही. कॉलजच्या त्या अधाशासारख्या वाचण्याच्या वयात माडगूळकर एकदा हातातपडल्यावर आपण त्यांच्या लेखनाच्या प्रेमात कधी पडलो हे समजतच नाही. अतिशय बारकाईने केलेले निरिक्षण, प्रत्येक अनुभव अतिशय मनापासून घेतलेला, अतिशय साधी सरळ पण थेट हृदयाला हात घालणारी त्यांची भाषा, ह्या त्यांच्या सगळ्याच गोष्टी अतिशय सुरेख आहेत. त्यांनीच लिहिलेले हे आणखी एक पुस्तक म्हणजे अशी माणसे : अशी साहसं. माडगूळकर स्वतः कायमच वेगळ्या वाटांनी चालत राहिले. त्यामुळे स्वतःच्या पावलांनी नव्या वाटा पाडणारे, कितीही कष्टदायक प्रवास असला तरी आपल्याला हवे ते मिळविण्याचा ध्यास घेतलेली माणसे हा त्यांच्या आवडीचा भाग. अशा अनेक लोकांची पुस्तके त्यांच्या संग्रहात असल्याने त्यांच्या वर वेळोवेळी लेख लिहिले. ते वाचकांना अतिशय भावले. त्यामुळे ही पुस्तके कुठे मिळतील? लेखकांबद्दल अधिक माहिती विचारणारे प्रश्न वाचक करत असत. तेव्हा श्री. ह.मो. मराठे हे किर्लोस्कर मासिकाचे संपादन करत होते. त्यांनी माडगूळकरांना अशा साहसी संशोधकांवर लेख लिहिण्याची विनंती केली. त्यानुसार सामान्य वाचक, वन्य प्राण्यांवर प्रेम करणार्या, वेगळेच साहस करण्याची आवड असणार्यांना ओळख व्हावी म्हणून हे लेख लिहिले आहेत. ह्या पुस्तकात एकूण 8 लेख आहेत. जिम कॉर्बेट, सलीम अली, जेन गुडाल, फर्ले मोवॅट, मारूती चितमपल्ली वगैरे नावे आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहेत. पण तरीही सगळेच फक्त जंगलात हिंडणारे नाहीत. तर नाईल नदी एकट्यानेच पार करणारा कूनो स्टुबेन आहे, सिंदबादसारखा सात सफरी करणारा टिम सेव्हरिन आहे. प्रत्येकाची गोष्ट वेगळी, प्रत्येकाचे त्यामागची कारणे वेगळी पण झपाटलेपण हे सगळ्यांमध्ये सारखॆच आहे. आपण एखादी अत्यंत अवघड गोष्ट ठरविणे आणि मग त्याचा न कंटाळा करता पाठपुरावा करणे हे सोपे नाही. ते ‘येरा गबाळ्याचे काम’ नाही. पहिला लेख टिम सेव्हरिनवरचा आहे. स्वतः आयरिश. भूगोल विषयाचा अभ्यासक, त्याने सिंदबादच्या सात सफरी वाचल्यावर ह्या गोष्टी खर्या आहेत का हे शोधण्यासाठी वयाच्या बेचाळीसव्या वर्षी आपणही असा प्रवास करू या हे ठरविले. त्याप्रमाणे तयारीला लागला. त्यासाठी त्याने नवव्या शतकातील जहाजे कशी असत, अरबी व्यापाराचे स्वरुप काय होते हे सर्व अभ्यासायला सुरुवात केली.बरीच शोधाशोध केल्यावर त्याला सोळाव्या शतकाच्या सुरुवातीचा नकाश मिळाला. एकही खिळा ना वपरता अरबी जहाजे तयार होत असत ही माहीती मिळल्यावर तो त्याच्या शॊधासाठी ओमानला गेला. बरेच निरिक्षण केले. या मध्ये बहुधा त्याची इच्छाशक्ती फार जबर असणार त्यामुळे ओमानच्या सुलतानाने ह्या त्याच्या संपूर्ण सफरीचा खर्च करण्याची तयारी दाखवली. मग तिथंपासून ते जुन्या पध्दतीने जहाज बांधणे व ते प्रत्यक्ष पाण्यात उतरवणे हा अतिशय रोमहर्षक प्रवास पुस्तकातूनच वाचायला हवा. नंतर त्या सोहर जहाजातून पुढचा केलेला प्रवास हा खरोखरच सिंदबादच्या सफरीइतकाच विलक्षण आहे. 3 नोव्हेंबर 1980 ला निघालेले जहाज 1 जुलैला 1981 ला चीनला पोहचले. ‘द सिंदबाद व्हॉयेज’ हे प्रवासवृत्तावर लिहिलेले टिम सेव्हरिनचे पुस्तक 1982 मध्ये प्रसिध्द झाले. ते मोठ्या आकाराचे व 20 पानांचे आहे. त्याचा संक्षिप्त अनुवाद म्हणजे हा पहिला लेख आहे. त्यानंतरचा लेख चिंपाझींचा अभ्यास करून पीएच.डी मिळवलेल्या जेन गुडाल बद्दल आहे. पण तिने पुढे ह्युगो ह्या छायाचित्रकाराशी लग्न केल्यावर दोघांनी मिळून टांझानियातील गोरोंगारो इथे राहून रानकुत्री, तरस, कोल्ही यांचा अभ्यास केला. त्यावर ‘इनोसंट किलर्स’ हे पुस्तक लिहिले त्याची ओळख ह्या लेखातून करून दिली आहे. त्यांनी बरोबर आपला नऊ महिन्यांचा मुलगा नेला होता. हे वाचताना आपल्याच छातीत धडधडायला लागते. दोघांनी केलेले निरिक्षण, न कंटाळता तासनतास बारकाईने पहाण्यात घालवलेले दिवस हे वाचताना तर थक्कच व्हायला होते. इतक्या लहान मुलाला सोबत घॆऊन जंगलात राह्यचे हे सुध्दा आपल्या सारख्यांना किती कठीण वाटते मग अशा कोणत्या प्रेरणांमुळे असे साहस करावेसे वाटते हे कळत नाही. पुढचा लेख ‘हरिण पारधी’ नावाचा असून तो फर्ले मोवॅट बद्दल आहे. त्याने उत्तरध्रुवाकडील ओसाड प्रदेशात केलेला प्रवास ही एक अदभूत वाटावी अशी कथा आहे. मूळ पुस्तक 1952 मधले आहे. 1935 मध्ये फर्ले जेव्हा पंधरा वर्षांचा होता तेव्हा आपल्या काका बरोबर त्याने आर्क्टिकचा पहिला प्रवास केला होता. तेव्हा त्याने रेल्वेने जाताना अर्धामैल रुंदी असलेला आणि सुमारे तासभर संथ गतीने रेल्वे रूळ ओलांडून पलिकडे जाणारा कॅरिबू हरिणांचा कळप पाहिला. त्याची आठवण त्याच्या मनातून कधीच पुसली गेली नाही. पण त्यानंतर 1946 मध्ये सक्तीने सैनिक म्हणून महायुध्दात सामिल व्हावे लागले, त्यामध्ये भयंकर संहार पाहिल्यावर युध्द संपल्यावर आता कुठेतरी शांत ठिकाणी जावे म्हणून तो परत 1947 मध्ये अगदी जुजबी तयारी करून हडसन बे च्या किनार्यावरच्या चर्चील बंदरावर रेल्वेने गेला. नंतर तिथून तो बॅरन्स येथे संशोधनासाठी गेला. अत्यंत प्रतिकूल परिस्थित तो तिथे काही काळ राहून एस्किमो लोकांचा इतिहास शिकला,त्यांची भाषा शिकला, त्यांच्या देवदेवता त्यांच्या ष्रध्दा , सुख-दुःख, त्यांच्या समस्या याबद्दल त्याने आपल्या पुस्तकात अतिशय प्रभावी वर्णन केले आहे. ते पुस्तक म्हणजे The country of the people of the deer. पुस्तकाविषयी माडगूळकरांनी अतिशय रसाळ भाषेत, प्रेमाने लिहिले आहे. खरंतर यावर आपण ही ते मूळ पुस्तकच वाचलं पाहिजे अगदीच शक्य नसेल तर निदान व्यंकटेश माडगूळकारांनी सविस्तरपणे करून दिलेला हा परिचय तरी वाचलाच पाहिजे. ह्याच फर्ले मोवॅट बद्दल अजून दोन दिवसांनी आपण परत वाचणार आहोत. ‘हत्तींच्या कळपात’ ह्या लेखात ओरिया या विलक्षण तरूणीची कहाणी आहे. ती आफ्रिकेतील जंगली हत्तींच्या कळपात चार-पाच वर्षे राहिली. टांझानियातील मन्यारा नॅशनल पार्कमध्ये जिथे 450 हत्ती, सिंह, मस्तवाल रानरेडे, म्हशी होत्या विषारी सर्प होते अशा ठिकाणी राहिली तिथेच जोडीदार मिळाला, ती आईही झाली. ह्या सगळ्या जगावेगळ्या अनुभवांचे चित्रण तिने आपल्या वाचकांसाठी केले आहे. तिचे अनुभव वाचता वाचताना आपल्या तोंडाचा विस्फारलेला ‘आ’ खरोखरच मिटत नाही. कशी ही जगावेगळी माणसे असतील!! दोन तीन महिन्याच्या लहान बाळाला पाठीला बांधून हिंडणारी, अनेक प्राणी सहजपणे पाळणारी, हत्तींबद्दल अतिशय प्रेम असणारी, त्यांच्यांशी मैत्री करणारी अशी तिची विलक्षण रुपे म्हणजे थक्क करणारी आहेत. हे जोडपे तिथे पाच वर्षे हत्ती सोबत राहिले. हत्तींचा सखॊल अभ्यास केला, शंभरहून अधिक हत्तींशी मैत्री केली. अनेक चित्तथरारक अनुभवांना सामोरे गेले. वाचताना तो थरार आपल्याला केवळ शब्दांतून ही जाणवतो. जिम कॉर्बेट् या धाडशी शिकार्यावर माडगूळकरांनी लिहिलेला लेख तर अप्रतिम आहे. जिम कॉर्बेट् च्या पुस्तकातून म्हणजे मॅन इटर्स ऑफ कुमाऊं, मॅन इटींग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग, माय इंडीया अशा अनेक पुस्तकातून आपल्याला त्याचा परिचय तर झालेला आहेच. जिम कॉर्बेट् हा निष्णात शिकारी असूनही सहृदय होता. शेवटपर्यंत तो एकटाच राहिला, तो कधीच पोशाखी बनला नाही, तो अक्षरशः आदिवासींसारखेच आयुष्य जगला. अतिशय काटक असलेला जिम निरिक्षण करण्यात निष्णात होता, तो जंगलात असताना कोणत्याही डबक्यातील पाणी न शंका बाळगता पीत असे. लेखक म्हणून जागतिक कीर्ती मिळवून दिलेली त्याची पुस्तके त्याने केवळ स्मरणावर लिहिली आहेत. त्याने कधीच त्याच्यासाठी डायरी ठेवून त्याच्या नोंदी केल्या नाहीत. आपल्या हयातीत त्याने एकूण पंचेचाळीस नरभक्षक वाघ मारल्याची नोंद आहे. कुमाऊ आणि गढवाल इथल्य़ा लाखो लोकांची त्याने मरणाच्या भयानक भीतीपासून सुटका केली. पण असे असले तरी जंगलाला आग लावणे, पाण्यावर बसून शिकार करणे, कारण नसताना जनावर मारणे या गोष्टीचा त्याला अतिशय राग होता. तो शिकारी असला तरीही निसर्गाचा समतोल बिघडणार नाही इतकीच शिकार करणारा, नियम पाळणारा शिकारी होता. शाळा, कॉलेज, हॉस्पिटल अशा ठिकाणी तो जंगलावर व्याख्याने देत असे. त्यामध्ये तो जंगलातील जनावरे कोणता आवाज काढून एकमेकांशी बोलतात, वाघ उठला की पाखरं कसे इशारे देतात ह्याचे प्रात्यक्षिक तो दाखवे. वाघ झाडाझुडूपात दिसेनासा होताना त्याचे आवाज कसे बदलत जातात हे तो दाखवत असे. पण व्याख्यानाच्या शॆवटी वने, आणि त्यातील जीव यांचा संभाळ करणे आपल्या सगळ्याच्या हिताचे आहे हे तो आवर्जून सांगत असे. तराईतील प्राण्यांची, पक्ष्यांची छायाचित्रे त्याने काढली आहेत. तोंडाने आवाज काढून वाघाला जवळ बोलावायचे विलक्षण कसब त्याच्याकडॆ होते. 1955 मध्ये प्रसिध्द झालेले ‘ट्री टॉप्स’ हे त्याचे शेवटचे पुस्तक. पुस्तकाच्या शेवटी पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली आणि मारूती चितमपल्ली यांच्या वरचे दोन छोटे लेख आहेत. सगळेच लेख आपल्याला भारावून टाकणारे. कोणत्या मूशीतून अशी माणसे जन्माला येत असतील. अशी कोणती प्रेरणा असेल की ज्यामुळे ती असे आपल्या दृष्टीने वेडे साहस करायला धजत असतात, आपल्या सारख्यांना हे कळणं ही कठीण आहे आणि जरी कळले तरी आपली रोजची रुळलेली वाट सोडून आपण अशा अनवट वाटांवर जायला तयार तरी होऊ का? असे अनेक प्रश्न आपल्या मनात नक्कीच तयार होतात हीच त्या पुस्तकाची ताकद आहे असे मला वाटते. ...Read more
Girish Waingankarव्यंकटेश माडगुळकर यांचे अशी माणसं :अशी साहसं हे पुस्तक नुकतंच हातावेगळे केले. माडगुळकर त्यांच्या कथा संग्रह, ललित लेखन, कादंबऱ्या, चित्रपट नाटक अश्या विपुल लेखनाद्वारे आपल्याला परिचित आहेतच. मात्र त्यांनी निसर्गात ही खूप भटकंती केली आहे. निसर्ग भ्रंती, चित्रे रेखाटने करणे हे त्यांचे विशेष छंद होते v निसर्गाशी एकरूप झाल्याने त्यांच्या सर्वच लिखाणाला एक वैयक्तिक अनुभूतीचा स्पर्श झाल्याचे त्यांच्या पुस्तकातून वाचकाला सतत जाणवते.
या पुस्तकात त्यांनी वेगळ्याच वाटा धुंडाळून असीम साहसी जीवनानुभव अनुभवणाऱ्या निसर्गप्रेमींचे कथन केले आहे.
त्यात समुद्रावर स्वार होणारा टीम Saverin, आफ्रिकेत तरस आणि चिंपांझी वर संशोधन करणारी Jane Gudal, arctic expedition करणारा Farley Movat, wild elephants सोबत राहणारी Oriya, Nile river cross करणारा Kuno Stuben,
संपूर्ण आयुष्य जंगलासाठी वेचणारा जिम कॉर्बेट, पक्षी तज्ञ सलीम अली आणि वृक्षमित्र मारुती चितमपल्ली यांच्या अप्रतिम शब्द रेखाटनाने हे पुस्तक खूप वाचनीय झाले आहे
एक नितांत सुंदर अनुभव
जरूर वाचा... ...Read more