सौ. अपर्णा अनंत मिसेनमस्कार मंडळी, सुधा मूर्ती यांची *अस्तित्व* ही कादंबरी कन्नड भाषेत आहे. त्याचा अनुवाद प्रा. ए.आर.यार्दी यांनी केला. त्यांची मराठीतील ही पहिलीच कादंबरी आहे. सुधा मूर्ती यांचा जन्म १९५० साली कर्नाटक राज्यातल्या शिग्गाव येथे झाला. त्यांनी कॉम्प्युटर साय्स या विषयातील एम टेक ही पदवी प्राप्त केली आहे. पुणे येथे `टेल्को` कंपनीत निवडल्या गेलेल्या त्या पहिल्या स्त्री अभियंत्या होत्या. समाजोपयोगी कार्यासाठी त्या विख्यात आहेत.२००६ मध्ये भारत सरकार तर्फे `पद्मश्री` पुरस्काराने, तसेच २०२३ मध्ये `पदमभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. `पर्सन ऑफ द इयर` हा मानाचा पुरस्कारही त्यांना मिळाला. तर अशा या भारत भूषण सुधा मूर्तींची कन्नड ही मातृभाषा असली तरीही, मराठी भाषेची त्यांना जाण आहे. अस्तित्व ही कादंबरी बऱ्याच भाषेत वेगवेगळ्या नावाने भाषांतरित झाली आहे. १००पानी ही कादंबरी असून त्याचा सारांश लिहिण्याचा प्रयत्न करते.बघू जमते का? मुकेश व वासंती स्वित्झर्लंडला राहणारे भारतीय जोडपे. मुकेश चे वडील म्हणजे कृष्णराव, रावसाहेब म्हणून प्रसिद्ध. पण ते आपल्या मुलासोबत मित्रासारखे वागत.रावसाहेबांनी आपल्या मुलाला कोणत्याही बाबतीत कधी आग्रह केला नाही. वासंती मैसूरमधल्या ब्राह्मण वस्तीत सोवळेपणाच्या सावलीत लहान ची मोठी झाली. असे हे लव मॅरेज. घरातल्या कोणीच त्यांना नकार दिला नाही. कारण दोघेही एकमेकांना अनुरूप असेच होते. वधूपरीक्षेचे फक्त नाटक झाले. वासंती लग्न होऊन रावसाहेबांच्या घरात आली. ती सून म्हणून नव्हे तर मुलगी म्हणून. सून आल्याने तर सुमतीला आनंदाचे उधाण आले. वास्तविक मुकेश ला नोकरी करायची गरजच नव्हती. पण त्याला रावसाहेबांच्या उद्योगात रस नव्हता. पण त्याचा मेव्हणा सतीश (निरज चा नवरा)ला मात्र रस होता. मुकेश ला खूप शिकायची इच्छा होती .त्यामुळे रावसाहेबांनी त्याला नकार दिला नाही. त्या उलट आईचा म्हणजे सुमतीचा नकार होता .आई त्याला `मुन्ना` म्हणत असे आणि मुकेश आईला `अम्मा` म्हणत असे. जुन्या आठवणींना कवटाळून मुकेश उठून उभा झाला व तितक्यात समोरून वासंती स्केटिंग करत आली.तिचा तोल गेला आणि खाली पडली. तिच्या स्नायूंना दुखापत झाल्याने मुकेशने तिला दवाखान्यात अॅडमिट केले. स्नायू दुखावल्याने आठवडाभराची विश्रांती सांगितली.तिला अॅडमिट करून मुकेश घरी आला. तसा त्याला आपली बहीण नीरजाचा रडूनच फोन आला. "मुन्ना, बाबांना हार्ट अटॅक आलेला आहे लगेच निघून ये". मुन्नाने लगेच ट्रॅव्हल एजंटला सांगितले भारतात बेंगलोरला जायचे आहे एक तिकीट पाहिजे.त्याने लगेच कपडे चढवले व तडक हॉस्पिटलला निघाला. वासंतीच्या तब्येतीने तिला घेऊन जाणे अशक्य व तिला एकटीला ठेवणेही कठीण. अशा व्दिधा:मनस्थितीत असतांना वासंती म्हणाली,"माझी काळजी करू नका तुम्ही लगेच निघा. घरी आई व नीरजाची काय अवस्था असेल?"लाजऱ्या मुकेशला मित्र मोजकेच पण बडबड्या वासंतीला भरपूर ओळखी असल्यामुळे ती एकटी पडणार नाही याची खात्री मुकेशला होती. आणि म्हणून मुकेश बेंगलोर साठी रवाना झाला. रावसाहेब मोठे उद्योगपती ते लंडनला असून सुद्धा त्यांनी कधीही मांसाहार किंवा मद्यपान केले नाही. बाहेर कितीही मोठी पार्टी असली तरीही घरी येऊन ते सुमतीने केलेले परोठे खाणार व अम्माच्या हातच्या परोठ्याची चव फाइव स्टार हॉटेलला पण येणार नाही असे म्हणायचे .तेव्हा प्रेम असतं ते असं! वडिलांची तब्येत चांगली ठणठणीत होती. मागच्याच महिन्यात काही कामानिमित्त रावसाहेब लंडनला आले. जातांना त्यांनी दोन हजार पौंड रक्कमेचा चेक दिला." मुन्ना, तुझ्या वाढदिवसासाठी". एक जानेवारीला वाढदिवसासाठी दोन हजार पौंड पाठवले होते व आता परत हे कशासाठी ? " आई तुझा वाढदिवस बुद्ध पौर्णिमेला साजरा करते ना त्यासाठी आगाऊ रक्कम". असे मुकेशचे म्हणजे मुन्नाचे दोन वाढदिवस साजरा व्हायचे. रावसाहेबांच्या आठवणीने त्याचे डोळे पाणावले .`बाबांना काय झालं असेल`? आपण जाण्याच्या आत काही बरं वाईट झालं तर?..... या विचारांनी तो हादरला. त्याने गळ्यातल्या साखळी कडे हात नेले. प्रार्थना केली-`गुरुदेव वडिलांचं रक्षण करा`. तितक्यात एअर होस्टेस आली आणि तिने सांगितले बेंगलोर जवळ आलंय. विमानतळा बाहेर आल्याबरोबर मुकेशला गाडी घेऊन आलेला शफी ड्रायव्हर दिसला. गाडीत बसल्यावर शफीला विचारले,"शफी, बाबा कसे आहेत?" त्याने मान खाली घातली. "बाबा कसे आहेत, सांग ना!" आज पहाटे चार वाजता..... म्हणजे रावसाहेब आता नाहीत!......... त्याला कल्पनाच करवेना. वडील आपल्याला सोडून गेले. कोणतीही समस्या वडिलांसमोर ठेवल्याशिवाय मुकेशला चैन पडत नसे. ती समस्या चांगली असो या वाईट त्याच्यावर कधीच रागावले नाही. नेहमी म्हणायचे, "मुन्ना,माणूसच चूक करतो. त्यासाठी वाईट वाटून घेऊ नये". अशा या वटवृक्षाच्या छायेत मुन्ना व त्याची बहीण नीरजा दोघेही आरामात होती. आता तो वटवृक्ष कोसळला. गाडी दारापुढे उभी राहिली. खूप प्रथितयश, नामवंत लोकं आली होती .मुकेश सरळ वडिलांच्या पायाशी जाऊन बसला. एकटक त्यांच्या देहाकडे बघू लागला. निश्चिंतपणे झोपल्यासारखे दिसत होते.` खरंच, बाबा गेले?........ "मुन्ना!"sssss म्हणून नीरजाने त्याला मिठी मारली. अम्मा रडलीच नाही. "मुन्ना, तू आल्यावर तरी....?" दोघेही आईच्या कुशीत शिरले ओक्साबोक्सी रडू लागले . अस्थी विसर्जनासाठी श्रीरंगपट्टण येथे मुकेश जायला निघाला, तेव्हा वडिलांचे मित्र व वकीलही असलेले श्री जोशी काका आले व म्हणाले," राव साहेबांनी मृत्युपत्र लिहिले तुम्ही केव्हा मोकळे आहात ?"आणि मला त्या संबंधात एक कागद हवा आहे. तेव्हा मुकेश म्हणाला, "सध्या तरी दोन दिवस वेळ नाही. नीरूला विचारा ती देईल तुम्हाला हवं ते कागदपत्र." आणि आपण दोन दिवसांनी भेटू काका. दोन दिवसांनंतर वकील आले. मृत्युपत्र वाचून दाखवू लागले. बँकेत ठेवलेल्या सर्व एफडी चा अर्धा वाटा नीरजला व उरलेला अम्माला शिवाय उरलेली सर्व संपत्ती म्हणजे जवळपास २० कोटी असावी ही मुकेशच्या नावावर .त्यावेळेस मुकेश वकिलाला म्हणाला, की माझ्या संपत्तीतला अर्धा वाटा मी ताईला देऊ शकेल का? तसा सतीश म्हणाला, "मुन्ना, अर्धा वाटा लिहून द्यायला तुला हक्क नाही .कारण तू या संपत्तीचा वारस नाही. म्हणजे तू सख्खा मुलगा नाहीस. पाळलेला मुलगा आहे पाळलेला..... नीरजा ही त्यांची मुलगी आहे. माझ्याजवळ पुरावा आहे. सतीश ने मुकेश समोर एक फोटो धरला. मुकेश व नीरजाचा लहानपणीचा फोटो. हा कसला पुरावा?... ज्यावेळेस जोशी काकांना कागदपत्र पाहिजे होते, त्यावेळेस नीरजानी वडिलांच्या कपाटात कागदपत्र शोधतांना तिला लहानपणीचा फोटो दिसला. म्हणून ती उत्सुकतेने मुन्ना व माझा फोटो म्हणून धावतच घेऊन आली. पण सुरज ने तो फोटो बघितला व त्या मागील तारीख बघितली .झालं ....त्याला असुरी आनंद झाला. फोटोच्या मागे २-२-१९७०अशी तारीख होती. पिक्चर पॅलेस, जालना, महाराष्ट्र असा पत्ता लिहिलेला होता. सतीश एखाद्या वकीलासारखा मुकेश ला प्रश्न विचारू लागला. मुन्ना,"निरुचा वाढदिवस कधी आहे?" "३१डिसेंबर ६७" म्हणजे "नीरु ,तुझ्यापेक्षा किती मोठी आहे?" "दोन वर्षे एक दिवस ". "तुझी जन्मतारीख १-१-१९७० आणि या फोटोच्या पाठीमागे २-२-१९७० असे लिहिले आहे. म्हणजे हा फोटो काढला तेव्हा तुझं वय फक्त एक महिना एक दिवस एवढंच असायला हवे ना?" मग यात तुझी किंवा नीरजाची जन्मतारीख चुकीची आहे. सतीश चे वकिली डोके तसे फार तल्लख .तो नीरु व मुन्ना यांच्या जन्मतारखेचा हिशोब करू लागला. मुले लहान असताना दोन वर्षांमधले आणि चार वर्षांमधले अंतर सहजपणे लक्षात येते. नंतर ती मोठी झाली की अठ्ठावीस आणि तिशीच्या दरम्यान काहीच फरक जाणवत नाही. त्यामुळे यांच्या जन्मतारीखेत काहीतरी रहस्य दडलेले आहे. सतीश विचार करू लागला . सतीश ने अम्माकडे फोटो केला व विचारलं ,"अम्मा, खरं सांगा तुमचं अपत्य कोण? नीरजा की मुन्ना?" "अम्मा, तुम्ही खरं काय ते नाही सांगितलं तर नीरुचा संसार उध्वस्त होईल ." शांतपणाने पण अत्यंत दुःखाने, कष्टाने सुमती एक एक शब्द उच्चारू लागली. तिची नजर जमिनीशी बोलत होती. "नीरू, तू माझी मुलगी आहेस. मुन्ना हा माझा मानलेला मुलगा आहे .पण मी त्याच्यावर पोटच्या पोरापेक्षाही जास्त प्रेम केलंय." "अम्मा ,ही गोष्ट मला का सांगितली नाहीस?" मुकेशने विचारलं . "बाबा मला सगळं काही सांगत होते .मित्राप्रमाणे वागत होते मग त्यांनी सुद्धा मला का सांगितलं. नाही?"मुन्ना ,तुला खरी गोष्ट कळली तर, तू मोठा झाल्यावर जन्म दिलेल्या आईकडे जाशील. म्हणून मला भीती वाटत होती. तुझ्यावरच्या माझ्या मोहामुळे तुला सांगितलं नाहीस. तू आम्हाला सोडून गेला असता तर, मी नक्कीच जिवंत राहिले नसते. माझा जीव तुझ्यात होता." "अम्मा,मला जन्माला घातलेली आई जिवंत आहे का गं?" "आहे बाबा,आम्ही स्वतःहून अनाथाश्रमातून तुला आणलेलं नाही. तुझ्या आईने आपल्या हाताने तुला आमच्याकडे सुपूर्द केलं." आता ती कुठे आहे? आता ती अमृतसर मध्ये असून तिचं नाव रुपिंदर कौर आहे. मुकेशने आपल्या सामानाची बांधाबांध केली . सुमतीने त्याच्या केसातून हात फिरवत म्हटले," मुन्ना,रुपींदरला भेटल्यावर मला विसरणार का रे?" " माझ्यावर रागावलास ?".... "मुन्ना ,मी तुला माझ्या पोटात नऊ महिने वाढवलं नसेन; पण मी तुझी आईच आहे रे." अगदी दीन होऊन रडू लागली. मुकेशने प्रेमाने आपल्या आईचा हात हातात धरून सांगितले,"तू माझी आईच आहेस; पण एक कुतूहल म्हणून मला माझ्या जन्मदात्या आईनं असं का केलं? ती आता कशी आहे?" या प्रश्नांची उत्तर शोधायची आहे .म्हणून मी जात आहे. खूप ठिकाणी शोधा शोध केल्यानंतर रूपींदरचा पत्ता मुकेशला सापडला. रुपिंदरला मुकेश म्हणाला," मी तुम्हाला एक गोष्ट विचारायला आलोय? ". "कसली गोष्ट?" "आई -वडील आपल्या अपत्यांना कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्यांच्याकडं सोपवत नाहीत. कितीही गरिबी असली तरीही ते त्याचा सांभाळ करतात.मी माझ्या अम्माला खूपदा विचारलं. तुम्ही मला तिच्याकडे कसं सोपवलंत?" मला सोडून जायचं तुम्हाला धैर्य कसं झालं? "सुमती काय म्हणाली ?" परिस्थितीच तशी होती. तुमच्यासमोर दुसरा उपाय नव्हता असं तिने सांगितलं." "मुलगा अवलक्षणी असला तरी, वाईट पायगुणाचा असला तरी कोणतेही पालक आपला मुलगा दुसऱ्यांना देत नाहीत .माझ्या वडिलांना आपण केलेल्या चुकीबद्दल कधी पश्चाताप वाटला नाही का? आपल्या मुलाला परत घेऊन यावं असं कधी वाटलं नाही का?" रुपिंदर म्हणाली,"बेटा ,मला हजारदा वाटलं तसं. रात्री झोपलेली असतांना आकाशातल्या नक्षत्राकडे बघतांना मला वाटायचं, की माझा मुन्ना सुद्धा याच नक्षत्राकडे बघत असेल.आपण एकमेकांना पुन्हा भेटूच शकणार नाही,या कल्पनेने मी पूर्ण उद्ध्वस्त झाले. मुन्ना, मी अशिक्षित आहे. माझ्याकडं पैसा नाही. मी तर अशी परस्वाधीन . मग काय करू सांग?" " तू वडिलांना आग्रह का केला नाहीस?" तेव्हा शांतपणे रुपिंदर सांगू लागली "मुन्ना ,तू माझा आहेस. तू त्यांना त्यांचा मुलगा वाटत नव्हतास. हे खरं आहे. त्यामुळे तुला सोडून राहणं त्यांना कठीण गेलं नाही. पण माझं तसं झालं नाही." मुकेशच्या अंगावर वीज कोसळल्यासारखं वाटलं. म्हणजे आपण रुपिंदर सुरिंदर या जोडप्याला झालेला मुलगा नव्हे? तर मग आपला बाप कोण ?त्याचे मन चडफडू लागले. त्याने विचारले ,"माझे वडील कोण?" अश्या या वादळाने मुकेशचे आयुष्य पार बदलून गेलं..... कोण होता तो?????? वासंतीला कोणत्या शब्दात आणि काय सांगायचं? अश्या कितीतरी प्रश्नांनी त्याच्या मनात काहूर माजले होते. मानलेली नाती खरी की, रक्ताची नाती श्रेष्ठ ? अशा अनेक प्रश्नांचा शोध घेता घेता त्याचा स्वतःच्या *अस्तित्वाचा* शोध सुरू झाला. पुढे काय???........... अशी ही उत्कंठावर्धक कादंबरी नक्की वाचा. धन्यवाद! ...Read more
Vinayak Rajmaneकाल सुधा मूर्ती यांची "अस्तित्व" ही कादंबरी वाचली. ही कादंबरी म्हणण्यापेक्षा घराघरातील व्यक्तींच्या स्वभावांचे, घराघरातील घडणाऱ्या घटनांचे वास्तववादी चित्रणच वाटते. काही महिन्यांपूर्वी त्यांचे "गोष्टी माणसांच्या" हे पुस्तक वाचलं होतं, ते वाचूनच मानवीस्वभाव वैशिष्ट्य, किंवा नात्यांची हळुवार गुंफण वर्णन करणार त्यांचं हळवं, भावनिक मन दिसून येतं..
"अस्तित्व" मधील नायक मुकेश याच्या आयुष्यात अचानक आलेलं वादळ आणि त्यानंतर घडणाऱ्या घडामोडी यांच अतिशय सुंदर आणि भावोत्कट वर्णन सुधा मूर्ती यांनी केलं आहे.
नाती मग ती रक्ताची असो किंवा मानलेली असो ती निस्वार्थपणे कशी निभवायची असतात याचा सुरेख वस्तुपाठ त्यांनी या कादंबरीत दाखवला आहे.
आयुष्यात येणारी संकटे, येणारी वादळे किंवा वाईट दिवसांना कस खंबीरपणे तोंड द्यावं आणि यात आपलं अस्तित्व पण कस टिकवाव हे कादंबरी वाचताना लक्षात येतं. निस्वार्थपणा, त्याग, निर्मोही वृत्ती काय असते; नात्यांची गुंफण कशी असते, नात्यांमध्ये निर्माण झालेला तिढा कसा लीलया सोडवला पाहिजे हे सर्व ही कादंबरी वाचताना समजून येते.
अतिशय उत्कंठावर्धक असणारी ही पहिली कादंबरी असेल जी मी वाचायला घेतल्यानंतर पूर्ण संपवूनच खाली ठेवली असेल, अगदी पाषाणहृदयी माणसाच्यापण डोळ्यात पाणी उभं करण्याचं सामर्थ्य या कादंबरीत दिसून येत... ...Read more