- Vijaya Hiremath
पुस्तक अभिप्राय
पुस्तक-बेधुंद
लेखक-अविनाश लोंढे
पृष्ठ संख्या-182
किंमत-250
प्रकाशन-मेहता पब्लिकेशन
आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे आपलं कॉलेज जीवन...हे वय असं असतं की जग जे शिकवेल ते पटेलच असं नाही आणि जगायचं कसं हे शिकायला जमेलच असंनाही...लहानपणापासून आई वडिलांचं बोट धरून चालणारी मुलं न कळत बोट सोडून जीवनाच्या या वळणावर चालायला सुरुवात करतात आणि मग खरी धडपड सुरु होते स्वतःला शोधण्याची, सिद्ध करण्याची......वयाच्या 16 व्या वर्षी घराच्या बंधनातून,गावकडील वातावरणातून मुक्त,स्वतंत्र शहरातील मोठ्या नावजलेल्या कॉलेज आणि हॉस्टेलमधील मोकळं,नवं पण आव्हानात्मक आयुष्य....कित्येक मुलं येतात या नव्या वातावरणात येणाऱ्या रॅगिंगसारख्या संकटाला तोंड देत दुनियादारी शिकता शिकतात, धडपडतात ,पडतात काही खंबीर मनाने उभे राहतात तर काहींच आयुष्यच संपायची वेळ येते... मुलं स्वतःला कसेबसे ऍडजस करत चार सहा वर्षात कॉलेज सोडून निघूनही जातात पण काहींच नाव आपल्या यशाने ,प्रगतीने तर कधी नको त्या कारणाने कॉलेजशी कायमच जोडलं जातं...
आजच्या काळात याच तरुणांना शिक्षणासोबत अनेक नव्या आव्हाहनांना सामोरे जावे लागते आहे ..अवखळ वय,सळसळत रक्त,डोळ्यांत अनेक स्वप्नं,ती सत्यात उतरवण्याची धडपड शरीरात होणारे बदल,भावनिक आणि व्यावहारिक आयुष्याची सुरवात त्याप्रमाणे निर्माण होणारे आकर्षण,सोशल मीडिया ,व्यसनाधीनता अश्या अनेक भुरळ घालणाऱ्या अनेक गोष्टी ...
*बेधुंद* मधून याच अनेक समाज विघातक गोष्टी लेखकाने त्यांच्या वास्तववादी लेखनातून समोर आणल्या आहेत....कॉलेज life मधील अनेक भयानक सत्य समोर येतात आणि वाटू लागलं की वयातच एक तर आयुष्य घडतं किंवा बिघडतं.... घडलं तर त्याचं श्रेय घ्यायला अनेकजण उभे राहतील पण बिघडलं तर जबाबदारी कोणाची??
आजच्या बेधुंद तरुणांकडून वेड्या अपेक्षा ठेवून त्यांच्या प्रेमापोटी त्यांना जगातील सगळी सुखं देऊ पाहणाऱ्या आणि मुलांनी यशस्वी होऊन आनंदी जीवन जगावं यासाठी सतत धडपडणार्या आई बाबांची???कळत नकळत पण प्रत्येकाच्या जीवनावर खूप मोठा परिणाम करणाऱ्या समाज व्यवस्था,जातीव्यवस्था आणि सामाजिक प्रवृत्ती आणि अप्रवृत्तीची????
सगळ्या जगातून अलिप्त होऊन भान हरपलेल्या जीवापाड एकमेकांवर प्रेम करणाऱ्या प्रेम युगलांची?? की जीवाला जीव देवून सुख,दुःखात, जिंकण्यात हरण्यात ,एकमेकांच्या चुकांसाठी ,एकमेकांच्या प्रगतीसाठी मनापासून खांबीतपणे साथ देणाऱ्या मैत्रीची ??की
प्रेम,मैत्री ,आनंद यांच्या नावाखाली नशेत धुंद,जगण्यात बेधुंद झालेल्या तरुणाईचीच???की
जीवापेक्षा बदल्याची आग,पत, प्रतिष्ठा, पैसे,मानसन्मान मोठा वाटणाऱ्या माणुसकीचा विसर पडलेल्या मानव जातीची???
जबाबदारी कोणी घेवो न घेवो पण भावी पिढी चांगलीच घडावी यासाठी कर्तव्य मात्र आपल्या सगळ्यांचच...
आपल घर,कुटुंबीय,घरची परिस्थिती याची सतत जाणीव असणारा,उघड्या डोळ्यांनी मोठी स्वप्नं पाहून ती सत्यात आणण्यासाठी धडपडणारा, उच्च ध्येय बाळगून ते साध्य करण्याची धमक बाळगणारा ,समाजातील विघातक प्रवृत्ती समूळ नष्ट करण्याची मनीषा बाळगणारा तरुण वर्गच भावी सदृढ पिढी घडवू शकतो फक्त गरज आहे ती त्याने भानावर राहण्याची......
या सगळ्यांवर विचार करायला लावणारी कॉलेज मधील 5 स्टार या ग्रुपच्या मित्रांची,त्यांच्या रॅगिंग,प्रेम प्रकरणे ,होकार ,नकार विरह,दोस्ती,टपोरेपण, व्यसनाधीनते बरोबरच जिद्दीची, धाडसाची आणि समाजातील राजकारण आणि सिस्टीम याविरुद्ध चिंता, चीड यांची कहाणी म्हणजे *बेधुंद* .....
कधी रोमांचित तर कधी मन हेलावून टाकणारी...कधी चेहऱ्यावर हासू तर कधी डोळ्यांत आसू आणणारी... कधी डोळे मिटून प्रेमाची अनुभूती देणारी तर कधी समाजाचे ,सध्य परिस्थितीचे दर्शन घडवून खाडकन डोळे उघडवणारी...कधी स्वमग्न होऊ देणारी प्रेरणादायी तर कधी चीड दुःख ,वेदनांची जाणीव करून देणारी ....कधी टपोऱ्या स्पष्ट शब्दांत मराठी भाषेत तर कधी हिंदी इंग्लिश मिश्रित मराठीत ...योग्य वेळी प्रवेश करणाऱ्या निरनिराळ्या पात्रांच्या प्रवेशाने खुलणारी आणि अचानक अपेक्षेपेक्षया वेगळीच कलाटणी घेणारी *बेधुंद* ही उत्कंठावर्धक कादंबरी
लेखकाने समाजभान राखून तरुणांसाठी खास लिहलेली ही कादंबरी मला मनापासून आवडली...एक वेगळा दृष्टीकोन आणि विचार दिल्याबद्दल लेखक अविनाश लोंढे सरांचे मनापासून आभार आणि त्यांच्या पुढील लेखन कार्यास खुप खुप शुभेच्छा🌹🌹🌹🌹🌹
सौ विजया कैलास हिरेमठ ...Read more
- दैनिक दिव्य मराठी ७ एप्रिल २०२०
तरुणाईच्या वादळी लाटा : बेधुंद
तरुणाई म्हणजे एकीकडे उत्साह , आनंद , दुसरीकडं अत्यंत आक्रमक अन हिंसक . त्यामुळे तिला योग्य दिशा मिळाली नाही तर ती किती भयावह रूप धारण करू शकते , स्वतः चेच नुकसान कसे करते , हे अविनाश लोंढे यांची `बेधुंद ` कादंबरी सागते . तेही तरुणाईच्या विशिष्ट , सळसळत्या , वादळी भाषेत . त्यामुळे नाविन्यपूर्ण , वाचनीय तर झालीच आहे , शिवाय सध्या वीस -पंचीविशीत असलेला मराठी तरुण स्वतःला कोणत्या दिशेने घेऊन जात असावा , चारित्र्य ह्या विषयी मुले तर सोडाच मुलींच्या संकल्पना काय आहेत , याचाही अंदाज येतो . तारुण्य प्रत्येकाला हवंहवंसं असतं . कारण त्या काळात शरीरात , मनात अभूतपूर्व ऊर्जा असते . विचारांचा प्रवाह नुसता खळखळत असतो , ओसंडून वाहत असतो . त्या विचारांच्या बळावरच तो प्रत्येक्ष कृती करतो . त्यातून त्याचे व्यक्तिमत्व ठरत असते . तो जीवनात पुढे नेमके काय करणार याची पायाभरणी तारुण्यातच होत असते .
शहरी संस्कृतीमध्ये अशा पायाभरणीचे मुख्य स्थळ म्हणजे कॉलेजातील लाईफ . तेथे दिवसाकाठी अक्षरशः शेकडो घडामोडी होत असतात . अभ्यासाच्या निम्मिताने नजरेला नजरा मिळतात . काहींच्या स्वतंत्र नजरा तयार होतात . काहींच्या कायमस्वरूपी भरकटून जातात . आणि कॉलेज लाईफ मध्ये हॉस्टेल हे एक स्वतंत्र जग आहे . तेथेही घडामोडी होतात . पण , त्यात भानगडीच जास्त असतात . गेल्या काही वर्षात कॉलेजात आणि होस्टेलात भानगडी धोकादायक वळणावर पोहचल्या आहेत . तरुणाई म्हणजे मौजमस्ती , धिंगाणा , सेक्स , भरपूर दारू पिणे अशी संस्कृती तयार होऊ लागली आहे . आपल्यावर देश , समाज घडवण्याची जबाबदारी आहे , असं तरुणांनी मानलेच पाहिजे असं नाही मी पण किमान आपल्यामुळं कोणाचं नुकसान होणार नाही , समाज बिघडणार नाही , याची काळजी घेतली पाहिजे . दुर्दयवाने ते होताना दिसत नाही . केवळ भौतिक सुखाच्या मागे धावाधाव सुरु आहे . प्रेम म्हणजे शारीरिक संबंध असा समाज सोशल मीडियामुळे होत चालला आहे . मोठ्या शहरांमधील कॉलेजेस , होस्टेल्स हाऊसफुल्ल आहेत . शिक्षणाचे बाजारीकरण होत आहे . शिक्षक म्हणजे गुरु ही भावना पालकांमध्ये राहिलेली नाही , शिक्षकांमध्येही नाही . त्याचे एक -एक परिणाम दिसणार आहेत , ते कसे असू शकतील , याचा अंदाज `मेहता पब्लिशिंग हाऊस` ने प्रकाशित केलेली `बेधुंद ` वाचताना येतो . एकेक प्रसंग अस्वस्थ , चिंताग्रस्त करून टाकतो . दुसरीकडं काही भरकटणारी मुलं विशिष्ट क्षणी भानावर येतात . उत्तम शिक्षण घेऊन स्वतः च जीवन घडवण्यासाठी चालू लागतात , हे पाहून मनात आशावादही जागृत होतो .
लेखक `लोंढे ` मूळचे सोलापूर जिल्यातील वेणेगाव येथील , सध्या इथिओपिया मध्ये कोकाकोला कंपनीत प्रोजेकट मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत . खरगपूर आय आय टी मधून एम . टेक . ची पदवी त्यांनी मिळवली आहे . पण त्यांचा मूळ पिंड लेखनाचा , शब्दातून व्यक्त होत राहण्याचा आहे . तो त्यांनी जाणीवपूर्वक जपला आहे , असं बेधुंद ची एकशे ब्यायांशी पाने वाचताना जाणवत राहते . तरुणाईचे अध:पतन , कोसळत जाणं किती भयावह आहे , हे लोंढे यांच्या लेखनाचे मुख्य सूत्र आहे . त्यासाठी त्यांनी जयंत , अक्षय , सुरेश , समीर आणि अण्णा या पाच मित्रांच्या व्यक्तिमत्त्वांना एकत्र गुंफले आहे . पाच मित्र वेगवेगळ्या स्वभावाचे . प्रत्येकाच्या घरची आर्थिक स्थिती वेगळी . ध्येय , भावविश्वही वेगळे , त्यात प्रवेश करणाऱ्या मुली तऱ्हेवाईक . छांदिष्ट आणि टिपिकल भारतीयही . पाच मित्रांचे कॉलेज , हॉस्टेल मधील जीवन जसजसे पुढे जाऊ लागते , तसतशी त्यातील गुंतागुंत वाढत जाते , राडे होत जातात . जातीवाद कश्या पद्धतीने पोसला , पेरला जात आहे हे कळते . लैंगिक सुखासाठी काय काय केले जाते , हे समोर येत राहते , आणि एकाचवेळी अनेक अंगांना कोसळत जाणारे हिमप्रपात दाखवण्याकरीता लोंढे यांनी काही नाट्यमय , वेगवान प्रसंग रचले आहेत . पुढील पानावर काय असावं , अशी उत्सुकता लागून राहते . शिवाय शहरी मुलं - मुली जी खूप टपोरी , खूप हिंदीमिश्रित भाषा वापरतात , तीच ठेवली आहे . तिला उगाच प्रमाण मराठीमध्ये सांगण्याचा आटापिटा केलेला नाही . जे म्हणायचे आहे , ते साध्या , सोप्यासरळ भाषेत मांडले आहे . त्यामुळं अनेक पानावरील वर्णने अंगावर येतात , पण हे करताना मूळ कथानक भरकटणार नाही , हाणामारी , सेक्स विषयीची वर्णने बटबटीत , लांबलचक अश्शील होणार नाहीत , याची काळजी त्यांनी घेतलेली आहे . तारुण्य हे निसर्गाने दिलेले वरदान आहे . त्याचा योग्य वेळी , योग्य वापर केला नाही तर आयुष्य उध्वस्थ होते , हा संदेश वाचकांच्या मनात कोरण्यात ते यशस्वी ठरतात .
मागच्या पिढीत `सुहास शिरवाळकरांनी` `दुनियादारी` कादंबरीत तरुणाईचे एक विश्व उभे केले होते . तसेच काहीसे `लोंढे` यांनी `बेधुंद` मध्ये केले आहे , असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही . एखाद्या चित्रपटाच्या पटकथेचा पाया यात आहे . त्यामुळे कथानक , मांडणी , भाषा शैली आणि पटकथेच्या अर्थाने ` बेधुंद ` ची नोंद मराठी साहित्यात नक्कीच करावी लागेल . ...Read more
- Akash Alugade
प्रत्येकाला स्वतःची एक वेगळी अनुभवलेली कॉलेज लाईफ असते, काही जणांनी एन्जॉय केलेली, काही जण मनासारखी कॉलेज लाईफ जगतात तर काही जणांना अगदी वेगळ्या आठवणी किंवा निराशजनक घेऊन जगलेली असतात. मी हि माझ्या कॉलेज लाईफवर अनेक लेख लिहले आहेत. कॉलेज लाईफ हि आपण ्रगल्भ अवस्थेत जात असतो त्यात घडलेल्या घटना आपल्याला नेहमी आठवणीत असतात.. असच कॉलेज लाईफ वरील आधारित असलेले एक पुस्तक ,एक लहान कादंबरी "बेधुंद" हे माझ्या नुकतंच वाचनात आलं. बेधुंद हि कादंबरी माझ्या हाती आली आणि जस जस ते पुस्तक मी वाचायला सुरवात केली तस तस मला ती सर्व पात्रे आणि घडणाऱ्या घटना समोर प्रत्यक्षात दिसू लागल्या. लेखक अविनाश लोंढे हे आजच्या युवा युगातील तीक्ष्ण लेखणी घेऊन उमजलेले लेखक म्हणायला हरकत नाही... तर बेधुंद हि `फाईव्ह स्टार ग्रुप` वर आधारित एक कथा आहे. फाईव्ह स्टार म्हणजे जयंत, अक्षय, सुरेश, समीर आणि अण्णा. हे फाईव्ह स्टार इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षांपासून वेगवेगळ्या कारणाने ओळखी झालेले कथेचे "फाईव्ह स्टार" असतात.
लव्ह , सेक्स , ब्रेकअप , रॅगिंग, व्यसन आणि कॉलेज अभ्यास बद्धल सुरु असलेला त्या ५ जणांचा आणि त्याच्या मित्रांचा एकमेकांबध्दल असणारा विश्वास, मैत्री आणि अश्या सगळ्याचा प्रत्येकाच्या आयुष्यावर होणारा वेगवेगळा परिणाम... पुस्तक वाचताना असे अनेक हिस्से आले जे माझ्या सोबत घडले आहेत. ह्या पुस्तकात अश्या अनेक घटना तुमच्या कॉलेज जीवनात घडल्या असतील ज्या पुस्तक वाचताना नक्की समोर येतीलच .
जसे जसे त्यांच्या इंजनिअरिंगच्या सेमिस्टर संपत जातात आणि नवीन येत राहतात तशी तशी पुस्तकातील कथा अनेक रूप घेत राहते, पुस्तकात हिंदी आणि इंग्रजीचा उल्लेख भरपूर ठिकाणी आहे आणि तसा करणे लेखकाला भाग पडले आहे. तुम्हाला सांगतो मराठी भाषेतील किंवा "नवीन युगातील" असे एकमेव पुस्तक आहे जे बेफाम आणि नावाप्रमाणे "बेधुंद" असे लिहले गेले आहे.
सुरवातीला पुस्तक वाचताना जाणवते कि लहान लहान गोष्टीचा उल्लेख का केला असेल पण जसे जसे वाचत जातो तसे तसे उत्सुकता लागते कि आता पुढे काय होईल...??? तिसऱ्या सेमिस्टरपासून पुस्तकातील लेखकाच्या भावना जाणतात. कथेतील अक्ष्या ( अक्षय ) आणि हर्षल हे माझे आवडते पात्र आहेत. तसेच कॉलेज लाईफ मध्ये होणारे कार्यक्रम , त्यातील राजकारण , कमिटी आणि लेखकांनी आजच्या तरुणाईची भाषा, त्यांचे प्रश्न, विषय, बिनधास्त आणि मोकळेपणाने `बेधुंद` मध्ये मांडले आहेत.
जे शब्द प्रत्यक्ष कॉलेज लाईफमध्ये वापरले जातात ते `जसेच्या तसे` लेखात दिले गेले आहेत. खरं म्हणजे इंजनिअरिंग केलेल्या सर्वानी हे पुस्तक वाचले पाहिजेच. हे वय "धुंद" होण्याचे आहे की आपल्या आयुष्याला योग्य वळणं देण्याचे आहे याचा योग्य विचार करायला लावणारे पुस्तकं आहे. लेखक खूप धाडसी आहेत मला त्या पुस्तकाकडून आणि लेखकाकडून खूप प्रेरणा मिळाली आहे. खूप मोजकीच पुस्तके आहेत जी अशी लिहली गेली आहेत. १८२ पानांचे हे पुस्तक जेव्हा शेवटच्या पानावर वाचन येते तेव्हा डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही याची मी खात्री देऊ शकतो. इतक्या तीव्र भावना इतका विझूलाईझन त्या शब्दातून होतो कि हृदय हळहळ व्यक्त करतच...
ह्या पुस्तकातून मला फाईव्ह स्टार ग्रुपची कॉलेज लाईफ वाचन करत जगता आली ह्यासाठी मी लेखकाचे आभार व्यक्त करतो..
`मेहता पब्लिकेशन हाऊसने` हि लहान कादंबरी प्रकाशित केली आहे.
बेधुंद ऍमेझॉन वर https://amzn.to/2tmz85O ह्या लिंक वर उपलब्ध आहे.
पुस्तकाचे नाव - बेधुंद | लेखक - अविनाश लोंढे
आकाश आलुगडे, बेधुंद पुस्तक परीक्षण
२ जानेवारी २०२० ...Read more
- प्रमोदकुमार अणेराव
नमस्कार मित्रांनो!
मागील चार पाच दिवसांपूर्वी पोस्टाने एक जाडजूड पार्सल मला प्राप्त झाले.माझ्या स्वभावाप्रमाणे मी ते हावरटपणे उघडले तर त्यात बेधुंद ही देखणी कादंबरी निघाली.लेखक अविनाश लोंढे.हा तरुण लेखक आय आय टी खरगपूर वरून एम.टेक झालेला आणि आता इथिपिया देशात कोका कोला कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतो आहे .अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण असूनही मराठीत लेखन करण्याची त्याची अनन्यता पाहून खरेच अभिमान वाटतो.अविनाश चे सारे शिक्षण अभियांत्रिकी शाखेत झाल्याने तेथील सगळे अनुभव सहजपणे आणि कलात्मक बाज घेऊन या कादंबरीत लीलया प्रगट झालेले आहे.ही कादंबरी मेहता पब्लिकेशन सारख्या ख्यातनाम प्रकाशनाने प्रकाशित केलेली आहे.त्यामुळे त्याचे निर्मितीमूल्य अधिक वाढले आहे.कॉलेज जीवन म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनाची पायभरणी असते असा आपला सर्वसाधारण समज असतो.या जीवनात भविष्याचे वेध घ्यायचेही हे दिवस असतात.नवे ज्ञान ,नवे आव्हान ,नवे प्रश्न यांना पुढे जाण्यासाठीचा हा सुवर्णकाळ असतो.पण अभियांत्रिकी कॉलेजातील वास्तव मात्र खूप वेगळे असते.बुद्धीच्या वरच्या स्तरातील मुले जिथे एकवटल्या जातात तिथे काही भव्यदिव्य घडण्याचा ,नवे विधायक स्वप्न आकारण्याचा अपेक्षा असतात पण असे न होता रॅगिंगचे विकृत वाटावे असे स्वरूप , व्यसनाची आधिक्यता , टोळीयुद्ध वाटाव्यात असल्या मारामाऱ्या , त्यांच्यातील क्लेशकारक वाटावे असे अनिष्ट स्तरीकरण, मुक्त सेक्स असले विकृत जीवनरूप तिथे पाहायला मिळते .तेव्हा सामान्य वाचकांना सखेद आश्चर्य वाटल्या शिवाय राहत नाही.ही कादंबरी जयंत ,सूऱ्या ,अक्षय, समीर आणि अण्णा अश्या पाच फाईव्ह स्टार म्हणविणार्या मित्रांची स्खलनशीलता दर्शविणारी सकृतदर्शनी कथा आहे.पण हे सारे पात्र केवळ प्रातिनिधिक पात्र आहे.अभियांत्रिकी आणि मेडिकल कॉलेज मध्ये कुठेही जा ही प्रवृत्ती आपणांस अलीकडे दिसावे असे हे वास्तव आहे.या कादंबरीचे वैशिष्ट्य म्हणजे तिची वाचनियता .कुठेही ती वाचकाला थकवत नाही.तिच्यातील कथानुभव आणि त्यातील नाट्य वाचकांना आपल्यासोबत घेऊन जाते. यातील पात्राच्या सुखदुःखात आणि त्यांच्या नैसर्गिक वागण्यातही आपण नकळत ओढल्या जातो.
पण सारखा प्रश्न पडतो की , बुद्धीच्या वरच्या स्तरावरची ही सगळी मुलं विधायक , creative ,productive विचार करताना निदान या कादंबरीत तरी दिसत नाही.स्खलनशीलतेकडून स्खलनशीते कडे त्याच्या प्रवास संबंध कादंबरीभर आपल्याला दिसतो.पण लेखकाला बुद्धीच्या या स्तरावरील विद्यार्थ्यांची ही स्खलनशीलता च दाखवायची आहे.एक संदेश असावा कदाचित त्यातून
याबाबतीत अविनाश लोंढे हा लेखक यशस्वी झालेला आहे.अविनाश च्या लेखनात खूप प्रवाहीपण आहे.हा त्याचा स्वानुभव असल्याने त्यात आत्मनिष्ठ जाणिवा पण तीव्रतम पातळीवर प्रकट होतात.,पण त्याच बरोबर त्यात समूहनिष्ठता सुद्धा आहेच. ज्याचे आव्हान आणि आवाहन व्यक्तींना आहे तसे ते समूहालाही आहे.या कादंबरीची खूप वेगवेगळ्या पातळीवरून आणि मानसशास्त्रीय पातळीवरूनही समीक्षण करण्याची नितांत गरज आहे.युवकांचे मानसशास्त्रीय भावविश्व आणि प्रत्यक्षातील सर्वत्र अस्तित्वात असलेले सामाजिक आणि राजकीय वास्तव यातील गुंतागुंतीची आणि प्रश्नांना अधोरेखित करणारी ही कादंबरी आहे.
,एक रसिक म्हणून मला ही कादंबरी अतिशय आवडलेली आहे.कमालीची गध्यप्रायता आणि कथारहिता लेखनात येत चाललेल्या या काळात बेधुंद ही कादंबरी बरीच दिलासा देते ,एक आश्वासकता जागृत करते.तिचे अंतर्बाह्य स्वरूप कादंबरी विश्वात अधिक उठून दिसणारे आहे.
अविनाश तुला पुढील लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा ! ...Read more
- Read more reviews