डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके मंडळी,
कालच्या ऱ्हासचक्रानंतर मी विचार करत होते की आज काय? पुस्तकं तर काही वाचून ठेवली होती (म्हणजे वाचली आणि ठेवून दिली बाजूला... अक्षरशः). आत्ताची समोर आहेत ती. कदाचित त्यातलं एखादं उद्या घेईन. मध्ये अचानक या पुस्तकाची जाहिरात वाचली, अगदी गेल्या ठवड्यातली गोष्ट. उत्सुकता चाळवली. समूहात काहीतरी आगळं वेगळं पुस्तक घ्यावं हा विचार सतत मनात असतोच. तसं पुस्तक घरी येताच (जय amazon) चाळायला म्हणून बसले, आणि काय सांगू, हातात मार्कर कधी आलं, मी खुणा कधी केल्या, पुस्तक कधी संपलं... कळलंच नाही. एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगते... प्रेयर पुस्तकाला तुम्ही जो भरघोस प्रतिसाद दिलात, अनेकांनी ते विकत घेण्याचा विचार केला तेव्हाच सांगायचं होतं, पण राहिलं. ओळख करून दिलेलं पुस्तक पूर्णपणे वाचनीय असतं असं नाही. त्याचा बरचसं भाग बोजड असतो. पण ते नाही का, डेटिंगच्या काळात मुलगा मुलगी स्वतःमधलं केवळ उत्तम ते दाखवतात, तसं मला प्रेयर बद्दल वाटलं. आय मीन प्रेयर पुस्तकाबद्दल वाटलं आणि गणिका या पुस्तकाबद्दल मला नेमकं तेच वाटत आहे.
==========
‘भारतीय कामशिल्प’ या पुस्तकाचं लेखन करत असताना प्राचीन भारताच्या समाजजीवनाची माहिती देणारे अनेक संदर्भग्रंथ वाचण्यात येऊन लेखकांची उत्सुकता चाळवली गेली आणि जेव्हा या विषयावर मराठीत एकही परिपूर्ण संदर्भग्रंथ नाही हे लक्षात आलं, तेव्हा त्यांनी स्वतःच या पुस्तकाचं लेखन मनावर घेतलं. केवळ सनसनाटी विषय सवंगपणे हाताळला आहे असं कुठेही वाटत नाही. अतिशय अभ्यासपूर्वक लेखन आहे. सोबत जोडलेली संदर्भग्रंथांची यादी (एकूण संख्या ६४) पुरेशी आहे.
गणिका आणि उर्वरित श्रेणी या शरीरविक्रय करतात, हा वैश्विक व्यवसाय आहे. कैक काळापासून या व्यवसायाला मान्यता मिळाली आहे आणि त्याची आवश्यकता वाटली आहे. प्राचीन काळात भारतीय गणिका यांना एक संस्कृती आणि दर्जा होता. नीतीनियम होते, ते पाळावे लागत होते.
पुस्तकाची प्रकरणं – प्रास्ताविक, विदेशी गणिका, भारतीय साहित्यातील गणिका, गणिकेची प्रशिक्षण व वर्णन, गानिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने, विट, गणिकामाता, प्रियकराचा राग-रंग, कथांविषयी थोडेसे आणि कथा (या शेवटच्या प्रकरणात एकूण १३ कथा आहेत – अगदी सुरस आणि चमत्कारिक वाटाव्यात अशा, त्यांचा परिचय मी देणार....... नाही.)
प्रास्ताविक – (नऊ पानांचं प्रकरण)
कुटुंब किंवा विवाहसंस्था कधी आकाराला आले हे नक्की सांगता येत नसलं तरी स्त्री-पुरुष शरीरसंबंध हे आदिम असून ते पशु – पक्ष्यांप्रमाणेच जनन हेतुस्तव नैसर्गिक होते आणि राहतील. फलन हे स्त्रीदेहामध्ये होतं या जाणीवेतून तिला आदरस्थान प्राप्त झालं. सर्जनाची गूढ शक्ती धारण करणारी ती आदिमाया/माता/ अद्याशक्ती होय. जवळपास प्रत्येक धर्मात प्रजा, पशु आणि धान्य समृद्धीसाठी सुफलता विधी आहेत.
भारतीय हिंदू धर्म शास्त्रीय ग्रंथांतून स्त्री पवित्र्याच्या कथा वाचायला मिळतात. पतीला परमेश्वर मानलं जाई. त्याही काळात गणिका हा व्यवसाय होता आणि त्याकडे सहिष्णू वृत्तीने पाहिलं जाई.राजे महाराजे त्यांचे पोशिंदे असतं. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रिया तिरस्काराला पात्र असत, पण गणिका नाही. त्यांना नगर भूषण, नगर अलंकार, नाग्त रत्न मानलं जाई. प्रसंगी, राजे त्यांचा सल्ला घेत. त्या बहुश्रुत असतं चौसष्ट कलांत पारंगत असतं. संभाषणचतुर, हुशार, समंजस, उदार, योग्य आदर राखणाऱ्या, विनयशील आणि अनुपम सौंदर्यवती असत. एखाद्या गणिकेमुळे त्या राज्याची कीर्ती वाढत असे. धार्मिक समारंभ, सामाजिक कार्यक्रम (विविध झुंजी, शर्यती), करमणुकीचे कार्यक्रम (जलक्रीडा, वनविहार), रंगमंचावर अभिनय, अशा नानाविध ठिकाणी त्यांची ठळक उपस्थिती असे. रथारूढ अथवा सिंहासनाधिष्ठ राजाला वारा घालणे, चवरी ढाळणे, छत्र धरणे अशी कामं त्या करत. त्यांच्याशी संबंध ठेवणं समाजमान्य होतं. प्रतिष्ठितांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यापक, अगत्यशील आणि स्नेहिल होता. मात्र, त्यांना कडक आणि कठोर नियम पालन करावे लागे.विजयनगर साम्राज्याच्या अस्तानंतर ते पेशवाई संपेपर्यंतच्या काळात, मोगल राजवट येऊन गेली, ब्रिटीश वसवतवादाचा प्रसार सुरू झाला, समाज व्यवस्था बदलली, गणिका संस्कृतीला ओहोटी लागली. ब्रिटीशांचा अंमल सुरू झाल्यावर गणिका संस्था नष्ट होऊन वेश्या व्यवसाय वाढीला लागला. यामागे औद्योगिक क्रांती हे एक कारण आहे. वेश्यागमन निंद्य कृत्य मानलं जाऊ लागलं. तरुण अधिकाधिक सुशिक्षित होऊ लागला तसा शरीरसंबंधांपायी स्वास्थ्य गमवावं लागलं तर काय, हा विचार थोडाफार मूळ धरू लागला. आणि या शौकाची आसक्ती कमी झाली. चरितार्थाकरता पैसे मिळवण्यासाठी वेश्याव्यवसाय हादेखील विश्वसनीय आर्थिक व्यवसाय मानण्यात यावा असा निकाल १९११मध्ये युरोपियन न्यायालयाने दिला.
विदेशी गणिका – (२७) बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतीत गणिकांचे पुरावे मिळतात. इजिप्त, बबिलोन, सिरीया, फिनिशिया, ही काही उदाहरणं. ग्रीस, इटली, भारत इथे त्यांना विशिष्ट दर्जा प्राप्त झाला.
त्यांचेही प्रकार होते, सामान्य वेश्या अलेत्रय्डी, आणि सर्वोच्च म्हणजे हेटीअरा (या शब्दाचा अर्थ सोबती). काही हेटीअरा वादविवादपटू होत्या. क्लेप्सीड्रा हिच्या वक्तशीरपणामुळे तिला ते नाव मिळालं होतं त्याचा अर्थ जलघटिकापात्र असा होतो. थीओफ्रत्स याने इ.पू. ३७२ – २८७ या काळात ‘ऑन मरेज’ हा ग्रंथ लिहिला, याचा सविस्तर अभ्यास करून लिओंटीयम या हेटीअराने त्यावर प्रगल्भ टीका लिहिली.
रोमन समाजात कोर्टीझन अस्तित्वात होत्या. पॉम्पेई इथे व्हिकोली बाल्कोन पन्सिली नावाच्या इमारतीत शेकडो रमणी वास करत. या संदर्भातली रतिक्रिडेची मूळ चित्रं पॉम्पेईन wall paintings म्हणून प्रसिद्ध असून ती इटलीच्या वस्तुसंग्रहालयात सुरक्षित आहेत. रोमन साम्राज्यात हेटीअरा ऐवजी कोर्टीझन शब्द रूढ झाला.
युरोपात पंधरा-अठरा शतकांत कोर्टीझन आणि कलावंतीण यांना समाजात विशिष्ट स्थान आणि आदर मिळत होता.
फ्रान्समध्ये सतराव्या शतकात रमणींची सत्कारगृहं (सलो) प्रसिद्ध होती.
जपानमध्ये गै (कलात्मक क्षमता) आणि शा (व्यक्ती) यावरून गैशा ही संज्ञा रूढ झाली. त्यांच्यात अलंकारिक सुरावट, सौजन्य, निष्कपट, सुसंस्कृतपण असे. बाराव्या शतकापासून कार्यरत असलेली ही प्रथा इडो काळात (इ.स.१६००-१८६८) अधिक वाढीला लागली. ओकिया ही त्यांची निवासस्थानं होत. विसाव्या शतकात त्यांचं वर्चस्व राजकीय क्षेत्रात वाढीला लागलं. १९२०-३० मध्ये त्यांची संख्या साधारण ८० हजार होती, ती १९७०-८० दम्यान १७ हजार इतकीच उरली आहे.
चीनमध्ये पूर्वी पीकिंग (बीजिंग) इथे सिंगसॉंग हाउस हा भाग राखीव होता. शांघाय इथे अत्यंत विलासी वारांगना गृहं आहेत.
सिंगापूरमध्येगिटार गर्ल्स (पीपाचाई) या नावाने त्या ओळखल्या जातात.
पाकिस्तानात त्या तवायफ, कान्जारी आणि गश्ती नावाने ओळखल्या जातात.
आज मात्र सर्वत्र आमुलाग्र बदल झाला आहे.
भारतीय साहित्यातील गणिका – (३२) संस्कृत, प्राकृत, पाळी भाषांत, हिंदू, बौद्ध, जैन वान्ग्मयात, त्यांचा उल्लेख आढळतो. त्या वैदिक काळात भारतात होत्या हे काही ऋचांवरून समजतं. (ऋचा १.१६७.४ – अनेक पुरुषांशी सांग करणारी ती साधारणी). पंचचुडा अप्सरेपासून त्यांची उत्पत्ती झाली असं मानतात. महाभारत काळात त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. (राज, नागरी, गुप्त, देव आणि ब्रह्म असे पाच प्रकार होते). रामायणात फार स्थान नव्हतं.
अमरकोश, महाभाष्य, वार्त्तिके, दशरूपक, कौटिलीय अर्थशास्त्र जातक कथा, पंचतंत्र, वेताळकथा, शुकबहात्तरी, गाथासप्तशती, अशा विविध ग्रंथांत त्यांचा उल्लेख आहे. कामसूत्र या ग्रंथात वात्सायनाने ‘वैशिक’ या प्रकरणात त्यांची माहिती दिली आहे.
कथासरीत्सागर, राजतरंगिणी, शृंगारतिलक, सरस्वतीकंठभरणा, कलाविलास, मेघदूत, मृच्छकटिक, रत्नावली, नागानंदा, अशा नाटकांतून त्यांचा उल्लेख येतो.
भारतात इ.पू. पहिल्या सहस्रकात ती प्रथा अस्तित्वात येऊन ब्रिटीशांच्या आगमनानंतर एकोणिसाव्या शतकात लोप पावली असावी असं समजलं जातं.
गणिकेची प्रशिक्षण व वर्णन – (१६) गणिकेला बालपण जवळपास नव्हतच. वयाच्या सहा-सात वर्षापासून तिला घडवायला सुरुवात होत असे. त्यांच्या प्रशिक्षणात आचार, विचार, शिष्टाचार, विविध कला, खेळ, भाषा, वर्तन, सौंदर्यवर्धन, गायन, वादन, नृत्य, अलंकरण, शरीर सौष्ठव, बुद्धिवर्धन अशा प्रत्येक अंगाचा व्यापक विचार होता. काही हस्तकला शिकाव्या लागत. पाककला, सुगंधी द्रव्य निर्मिती, कामशास्त्र, प्रणायाराधन, हिकाव्म लागे. स्वसंरक्षण शिकावं लागे.
गणिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने – (५) आधीच्या प्रशिक्षणात हाही एक महत्त्वाचा भाग होता.
विट – (७) हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला. त्याचा इथे दिलेला अर्थ – शृंगाररस नायकानुचराप्रमाणे संपत्तीचा भोग न घेणारा किंवा जो आपल्या पैशाचा वापर कधी करत नाही, असं नाटकातलं लबाड, धूर्त पात्र. गणिका संस्थेत त्याच्या जोडीने वयस्य, अनुचर, धूर्त आणि डिंडिक ही पुरुष पात्र वावरतात. प्रतिवेशिनी ही गणिकेची शेजारीण. ती विश्वासातली. ती गणिकेसाठी विट आणि प्रियकर यांच्याशी संवाद साधते.
गणिकामाता – (७) हे पात्र फार महत्त्वाच. तिला संरक्षित स्त्री, कुट्टनी किंवा कुट्टीनी म्हटलं जाई. तिचं काम शिस्त राखणे, थोडक्यात रेक्टर. कामकुजानांना आळा घालणं, गणिकांना खऱ्या प्रेमापासून वंचित ठेवणं. कामुकांचं मानसशास्त्र तिला मुखोद्गत. पुरुषांच्या गुणदोषाच्या’ आधारे अचूक आडाखे बांधत ती गणिकेला सल्ला देता. तिचा दबदबा असतो. ते नसती तर गणिका ही संस्था कधीच नामशेष झाली असती. कारण स्त्रिया या स्त्रिया असल्याने स्त्रीसुलभ भावनेनुसार गणिकागिरीत न रमता त्या केव्हाच संसाराला लागल्या असत्या.
प्रियकराचा राग-रंग – (९) रग हे बारा छटांमधली काम आसक्ती असं म्हणता येईल. पुरुषाची मनोवृत्ती, प्रवृत्ती, स्वभाव, गुणविशेष आणि खास करून राग-लोभ जाणून घेत गणिकेला त्याच्याशी वर्तन करावे लागते.
कथांविषयी थोडेसे आणि कथा (४८) – ‘शृंगारमंजरीकथा’ हा राजा भोज रचित संस्कृत ग्रंथ असून त्यात स्त्री-पुरुष मनोवृत्ती दर्शन घडवणाऱ्या तेरा कथा आहेत. त्यापैकी काही जीर्ण, काही अपूर्ण आहेत. पैकी एक कथा वाचून दाखवते.
संदर्भग्रंथ (४) सोबत फोटो दिले आहेत त्या पानांचे.
या पुस्तकात आढळलेले सुंदर शब्द – गरती, लीलासहचारी, पृथुल (अर्थ कळला नाही अजून), रूपाजीवा, सूरसुंदरी
परिचय फार लांबला. या विषयावरच्या इतक्या अभ्यासानंतर एखादा पेपर सहज देता येईल. परत अभिमानाने म्हणता येईल, ‘मा, मै फर्स्ट क्लास फर्स्ट आया!’
मनापासून धन्यवाद.
माझी परिचय पाळी नसती तर मी हे पुस्तक वाचलंच नसतं. मजा आली मला वाचताना.
तशी तुम्हालाही आली असेल अशी खात्री आहे.
थांबते. ...Read more