रमेश मोहितेआप्तस्वकियांचा अकाली मृत्यू, व्यवसायातील अपयश, अपेक्षाभंग, सेवानिवृती नंतरचे रिकामेपण आदि कारणामुळे आलेले नैराश्य या समस्येची उकल करणारे सलग सहा पुस्तक परिचय करून दिल्यानंतरही, समस्या निवरणाचा अजूनही एक पर्याय सुचवू इच्छितो तो म्हणजे, आपल्या आवडीच्य एखाद्या छंदात गुंतून राहणे.
सेवानिवृती नंतर मी बागकामात गुंतवून घेतल्यामुळे, बागकाम संदर्भातीलच एखाद्या पुस्तकाचा परिचय करून देवून या अभियानातील माझ्या सहभागाची सांगता करण्याचे ठरविले.
या संदर्भातील बरीच पुस्तके वाचली होती पण आजवर परिचय करून दिलेल्या पुस्तकांच्या तुलनेत ती फारसी भावली नाहीत. शेवटी आपल्या ग्रुपवरील,या क्षेत्राशी निगडीत असलेल्या बावचकर सरांशी संपर्क साधला, त्यांनी संगितलेल्या क्लू वरुन हे पुस्तक काल,
कोविड बंद काळात, दस्तुतखुद्द लेखिके कडूनच मिळविले.
मी कृषिपदवीधर असल्यामुळे बागकाम या क्षेत्राची थोडीफार माहिती असली तरीही, आज सौ. सुनीति देशमुख यांचे ” छंद बागेचा ” हे पुस्तक वाचल्यानंतर मात्र, मी ,आमच्याच बागेत किती चुका केल्या आहेत हे लक्षात आले.
केवळ पुस्तकी ज्ञानावरच कोणत्याही क्षेत्रात लगेचच प्रावीण्य प्राप्त होत नसले तरीही, संबंधित विषयाची माहिती वाचून, त्या क्षेत्रात गोडी निर्माण
झा/केली तर आपण, अगदी राष्ट्रीय स्तरापर्यन्त आपली ओळख निर्माण करू शकतो याचे उदाहरण म्हणजे या पुस्तकाच्या लेखिका.
पण,“अति परिचयात अवज्ञा” असे काहीसे, लेखिके बाबत झाल्याकडून झाले. नोव्हेंबर २०१३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकाची सुधारित तिसरी आवृति २०१८ मध्ये, मेहता पब्लिसिटी हाऊस सारख्या नामांकित प्रकाशन संस्थेने प्रकाशित करूनही, हे पुस्तक काल पर्यन्त मलाही परिचित नव्हते.
कदाचित लेखिकेचे , बोनसाय(वामनवृक्ष), बोनसाय म्युरल, ट्रे लँडस्केप, रॉक प्लांटिंग, पुष्परचना,इकेबाना, जपानी बगीचा आदिच्या कार्यशाळा, व्याख्याने आणि लेख हे फक्त, आर्थिक उच्चत्तरातील लोकांसाठीच आहेत असा गैरसमज करून घेतल्यामुळे हे झाले असावे. विशेष म्हणजे लेखिकेस, आपल्या घराभोवतालची बाग तसेच वर नमूद केलेल्या सर्व नावीन्यपूर्ण प्रयोगासाठी, कैकवेळा मिळालेल्या पारितोषक वितरण समारंभात, विविध संस्थांनी दिलेल्या सन्मानपत्र सोहळ्यात प्रत्यक्ष हजर राहूनही माझ्या कडून हे घडले आहे. असो.
चार विभागात विभागलेल्या या पुस्तकाच्या पहिल्या विभागात, बागेचा इतिहासात, ज्यात बुद्ध, महावीर, रामायण,महाभारत काळातील पुष्पवाटिका, पासून शालीमार, मुगल गार्डन,ते अद्ययावत बागांची माहिती, बागेची आखणी (ले आऊट) कशी असावी, लॉन,
गच्चीवरील बाग, वॉटर फॉल,
रोपवाटिका,अभिवृद्धी- कलम करून नवी रोपे बनविण्याची कला,
वॉटर गार्डन,
किचन गार्डन,
रॉक गार्डन,
बागेत वापरायच्या हत्यारांचा परिचय (हा परिचय हत्यारे खरेदी करण्यापूर्वीच होणे आवश्यक आहे), हंगामी फुलझाडे,
ऑकिड,
नेचे,
इनडोअर प्लांट (सावलीतील बाग) शिंकाळी (हँगिंग्ज) तयार करणे,
निवडुंग, शुष्क काष्ट (ड्रिफ्ट वूड)
तबक बाग (डिश गार्डन),बॉटल गार्डन आदि थोड्याफार ओळखीच्या किंवा अजिबात माहित नसलेल्या विषयांची खूप सोप्या भाषेत माहिती सांगितली दिली आहे.
माझ्या मते हे पुस्तक इतक्याच माहितीसह, याच किमतीत, जरी मिळाले, तरीही ,पैसे वसूल झाले असे म्हणता आले असते.
दुसर्या विभागात लेखिकेच्या आवडत्या-बोनसाय,बोनसाय म्युरल, ट्रे लँडस्केप, रॉक प्लांटिंग, ट्रे वॉटर गार्डन या विषयाची सविस्तर माहिती आहे. लक्षपूर्वक आणि चिकाटीने करायचे हे काम एकदा जमले की तुम्ही या क्षेत्रातील “मास्टर” झालात असे समजायला हरकत नाही.
तिसर्या विभागात- पुष्प रचना,इकेबाणा,
पाश्चिमात्य/भितीवरील/पाण्यावरील पुष्प रचना, काळजीपूर्वक समजावून घेवून करू लागलात की हाच छंद व्यवसाय म्हणूनही जमून जाईल/गरजूना सुचवू शकाल.
आजकाल शहरी भागात या व्यवसायास मागणी असून, मागणी करणारा वर्ग सधन असल्या मुळे फीच्या रूपाने अर्थार्जन ही होईल.
चौथ्या विभागात- पर्यावरणाचे र्हासपर्व,औषधी वनस्पती,रासायनिक खते आणि किटक नाशकांचे दुष्यपरिणाम ,गांडूळ खत निर्मिती,घरा जवळ लावायचे वृक्ष,रोपवाटिका,बागेतील अवजारे आणि काही उपयुक्त माहिती तक्ते दिले आहेत.
या पैकी रोप वाटिका या व्यवसायास खूप स्कोप असुन,जवळ जवळ सर्व भारतात,विशेषत: दक्षिण व पुर्व भारतात,लागणार्या रोपा पैकी बहूतेक रोपे ही बेंगलोर परिसर आणि द.गोदावरी जिल्ह्यात तयार होतात.
थोडक्यात सांगायचे तर सार्वजनिक,
व्यवसायभिमुख आणि घरगुती अशा बागेच्या तीन प्रकारा पैकी घरगुती बागेचे , फ्लॅट धारकांसाठी कुंडीतील,हँगिंग आणि गॅलरीतील बागकाम.
रो हाऊस,छोटीघरे असणार्याना, फ्लॅट धारकांचे सर्व प्रकार शिवाय टेरेस गार्डन. आणि घराभोवती जागा असणार्यांसाठी वरील दोन्ही प्रकारा शिवाय परसबाग,कुंपन,मोठे वृक्ष लागवड आदीचा समावेश. असे तीन प्रकार पाडता येतील.या तिन्हीही प्रकारच्या घरात राहणार्याना हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे.
मी वाचलेल्या अशा आशयाच्या पुस्तकांत हे सर्वाधिक माहितीपूर्ण पुस्तक आहे.
”कोल्हापूर बोनसाय क्लब” च्या अध्यक्षा असलेल्या सौ.देशमुख यांच्या बागकामा संदर्भातील प्रत्यक्ष आणि ऑन लाइन कार्यशाळाही सतत सुरू असतात. पुस्तकातील माहितीच्या आधारे प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात करून, आपल्या अनुभवातूनच पूर्णत्वाकडे जाण्यासाठी, ,याहून उत्तम हंगाम/वेळ असणार नाही .
तसेच या निमीत्त कोरोंना काळातील बंदीवासही सत्कारणी लागेल .
...Read more
LOKPRABHA 4-9-2015बागकामाची हौस व छंद यातून वनस्पती संवर्धनाचे शिक्षण घेणे आणि अनेक कार्यशाळा व क्लासेस घेत, ते इतरांपर्यंत पोहोचवण्याचे सामाजिक कार्य लेखिका सुनीती देशमुख यांनी ‘छंद बागेचा’ हे पुस्तक लिहून केले आहे. अनेक प्रकारच्या उद्यानपद्धतीचा शास्त्रशुद्ध अभ्यास,विकास आणि मार्गदर्शन करत अनेक निसर्गसंवर्धक त्यांनी निर्माण केलेत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
वैदिक काळापासून ते प्रागैतिहासिक काळापर्यंत म्हणजेच इ. स. पूर्व ५०० ते आत्तापर्यंतच्या काळात उद्यानकलेवर विभिन्न धर्म, संस्कृतीचा प्रभाव पडल्यामुळे त्यात कसे परिवर्तन होत गेले याचे सविस्तर वर्णन ‘बागेचा इतिहास’ या लेखात केले आहे.
हिरवळ म्हणजेच कुठल्याही बागेचे हृदय. हिरवळ कशा प्रकारची असावी, त्यासाठी कोणते खत वापरावे, हिरवळीची काळजी कशी घ्यावी, तसेच जुन्या हिरवळीला पुनरुज्जीवित कसे करावे याचे मार्गदर्शन ‘हिरवळ (लॉन)’ मध्ये वाचायला मिळते.
कमीत कमी जागेत गच्चीवरील बाग कशी तयार करावी? ती आकर्षक दिसण्यासाठी धबधबा कसा तयार करावा? गच्चीवरील बागेत कोणती झाडे लावावीत? छोट्या रोपांसाठी रोपवाटिका कशी असावी? अभिवृद्धी म्हणजेच रोप कसे तयार करावे? त्याची निगा कशी राखावी? या सर्व प्रश्नांची उकल केली आहे.
तसेच अश्मउद्यान म्हणजेच रॉकगार्डनच्या सजावटीचे मार्गदर्शन, बागेत वापरायच्या अलंकारांची (अॅक्सेसरीज) माहिती, हंगामी फुलझाडांची माहिती व त्यासाठी घ्यावी लागणारी काळजी, ऑर्किडच्या फुलांची, रोपांची माहिती. इनडोअर प्लँट्स, त्यांची काळजी कशी घ्यायची, हँगिग्जबद्दलची माहिती आहे.
कॅक्ट्स व सक्युलंट या निसर्गातील दोन सुंदर पण अंधश्रद्धेमुळे दुर्लक्षिलेल्या झाडाच्या प्रकारांची माहिती. त्यांच्या पोटजातीची माहिती, त्याचबरोबर हे दोन्ही प्रकार जगवण्यासाठी घ्यावयाची काळजी वर्णन केली आहे.
शुष्क काष्ठ (ड्रिप्टवूड) म्हणजेच झाडाचा वाळलेला भाग. जंगलातील मेलेल्या झाडाची खोडे, मुळं, फांद्या यांवर खूप दिवस ऊन, वारा, पाऊस या नैसर्गिक घटकांची प्रक्रिया होऊन विविध आकारांची शुष्क काष्ठे तयार होतात. हे नैसर्गिक ठोकळे बागकामासाठी कसे वापरावे? त्यांची निगा कशी राखावी? त्यात कुठल्या प्रकाराची झाडे लावावी? तबकातील बाग म्हणजेच डिश गार्डन कसे तयार करावे? तसेच काचहंडीतील बगिचा बॉटल गार्डन कसा असावा? या सर्वांची सचित्र माहिती विभाग एकमध्ये दिली आहे.
विभाग दोनमध्ये निसर्गाच्या सहवासाच्या आवडीपोटी मोठ्या झाडांना ‘बटुरुप’ देऊन निसर्गातील मोठ्या झाडांना आपल्या बाल्कनीत किंवा बैठकीत आणण्याच्या प्रकाराला ‘बोन्साय’ असे म्हणतात. त्याची सविस्तर माहिती लिहिली आहे. मूळची चीनमध्ये उगम पावलेली ही कला जपानला जाऊन कशी विकसित झाली? याची माहिती.
त्याचप्रमाणे भित्तिचित्र म्हणजेच बोन्साय म्युरल, तबकातील देखावा म्हणजेच ट्रेलॅण्डस्केप, दगडावरील झाडे म्हणजे रॉक प्लॉंटिंग, तबकातील जलोद्यान म्हणजेच ट्रे वॉटर गार्डन या विविध प्रकारांत कोणत्या प्रकारची झाडे कशा पद्धतीने लावावी? त्यासाठी कशा प्रकारचे साहित्य वापरावे तसेच नंतर त्याची काळजी कशी घ्यावी यावे विस्तृत मार्गदर्शन केले आहे.
विभाग तीनमध्ये सर्व प्रकारच्या पुष्परचनांची माहिती कलात्मकरित्या दिली आहे. भारतीय नृत्यप्रकाराचे हावभाव घेऊन त्या आधारे करता येणाऱ्या पुष्परचनेसाठी सचित्र माहिती दिली आहे. त्याचबरोबर इकेबाना पाश्चिमात्य शैलीची पुष्परचना, भिंतीवरील पुष्परचना, पाण्यावरचा गालिचा, फुले ताजी ठेवण्याच्या युक्त्या, त्याचबरोबर ड्रायप्लॉवर डेकोरेशनचे मार्गदर्शन केले आहे.
विभाग चारमध्ये पर्यावरणाचे ऱ्हासपर्वअंतर्गत मानवनिर्मित प्रदूषण, त्याचे दुष्परिणाम, त्यासाठीचे प्रतिबंधात्मक उपाय दिले आहेत.
परसबागेतील औषधींमध्ये घरातील कुंडीत व बागेत लावता येणाऱ्या विविध प्रकारच्या औषधी वनस्पती, त्यांचा विविध आजारांवरील उपयोग याची यादी दिली आहे. रासायनिक खते व किटकनाशकांचे दुष्परिणाम कसे टाळावे यावर मार्गदर्शन केले आहे. जैविक व वनस्पतीजन्य किटकनाशकांची उपयुक्त माहिती दिली आहे. गांडूळखत कसे तयार करावे? त्यासाठीच्या साहित्यापासून कृती आणि संवर्धनाची माहिती सचित्र दिली आहे. घराजवळील बागेत नारळ, आंबा यांसारखे मोठे फलवृक्ष कसे लावावे? त्यासाठी जागा किती व कशी असावी? त्या त्या वृक्षासाठी लागणारे हवामान, जमीन, त्याच्या जाती, लागवडीची पद्धत, त्यासाठी वापरायचे खत, त्याला लागणाऱ्या किडींचे प्रकार व त्यासाठी कसे नियंत्रण करावे याची विस्तृत माहिती दिली आहे. रोपवाटिका म्हणजेच नर्सरी कशी असावी? त्याची जोपासना कशी करावी? याचे मार्गदर्शन केले आहे. त्याचबरोबर या बागकामासाठी लागणाऱ्या अवजारांची सूची व त्यांचा उपयोग दिला आहे. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी होळीच्या सणाला जी वृक्षतोड होते त्याला पर्याय म्हणून घरच्या घरी छोट्याशा ताटलीत होळी कशी रचावी याचे अतिशय उपयुक्त मार्गदर्शन केले आहे.
हे पुस्तक वाचल्यावर आपण झाडे लावण्यास नक्कीच उद्युक्त होऊ आणि हरितक्रांतीला हातभार लावू यात तिळमात्र शंका नाही. ...Read more