NEWSPAPER REVIEWपरमात्म्याच्या प्राप्तीची ओढ खरोखरच उत्कट असेल तर ध्यान हे सर्वाधिक प्रभावी माध्यम...
ध्यानसूत्र या पुस्तकातील नऊ प्रवचने ओशोंच्या ध्यानविषयक तंत्राचा एक छोटेखानी अभ्यासक्रम सादर करतात. ध्यानाची साधना करणे हा जीवन सफल करण्याचा एकमेव मार्ग आहे असे प्तिपादन ते करतात. आपल्या जीवनाचे आमूलाग्र रूपांतर करण्यासाठी कुठलाही धर्म व त्याचे कर्मकांड पाळण्याची जरुरी नाही. परमात्म्याच्या प्राप्तीची आस जर तीव्र असेल, सत्याचा साक्षात्कार व्हावा असे वाटत असेल, जीवनात संपूर्ण शांतीचा प्रत्यय यावा अशी आकांक्षा असेल तर त्यासाठी ध्यानाचे माध्यम सर्वाधिक फलदायी ठरेल. ``माणसाच्या चेतनेचा आणि आत्म्याचा जो अणू असतो त्याचा जर विस्फोट होऊ शकला तर ज्या शक्तीचा व ऊर्जेचा जन्म होतो, त्याचंच नाव परमात्मा. आपल्याच विस्फोटातून आपल्याच विकासातून ज्या ऊर्जेला वा शक्तीला आपण जन्म देतो, त्या शक्तीचा अनुभव म्हणजेच परमात्मा. त्याची तृष्णा जागी व्हायला हवी. ती तीव्र व्हायला हवी. ती तृष्णा नसेल तर परमात्मा प्राप्त होणार नाही. ती तृष्णा आपल्या अंतरंगात हवी, सत्य-शांती-आनंद मिळवण्याची अभिलाषा हवी. ही तृष्णा-अभिलाषा आपल्या आत आपण शोधून उत्कट पातळीवर न्यायला हवी. आपल्या अंतर्यामी ही तृष्णा असेल तर ती भागवण्याचा मार्ग नक्की सापडेल. ती तृष्णाच नसेल तर सामान्य जीवन तेवढे चालू राहील. ती तृष्णा भागवण्याचा संकल्प आपण आशावादी वृत्तीने केला तर नक्की यश लाभेल. ती तृष्णा जागृत करायचे आवाहन ओशो करतात आणि तेही आशावादी वृत्तीने.
ही तृष्णा आहे हे एकदा स्वतःलाच जाणवले, पटले की पुढची वाटचाल सुरू होते. त्या वाटेवर मार्गदर्शक म्हणून ओशो स्वतः बरोबर येतात. प्रत्येक टप्प्यावर ते आपले अनुभवसिद्ध तंत्र विशद करून सांगतात. पुन्हा बजावतात, ``निराशेच्या भावनेने या प्रयत्नाकडे पाहू नका. निराशा म्हणजे स्वतःचा सगळ्यात मोठा अपमान. आपण निश्चित यश मिळवू. या आत्मविश्वासाने वाटचाल सुरू केली तर खरोखर आपले ईप्सित नक्की साध्य होईल.``
तीन दिवसांचे हे ध्यान शिबिर. त्यात एकूण नऊ प्रवचनांद्वारे ध्यान प्रक्रियेचे रहस्य ओशो उलगडून दाखवतात. या तीन दिवसांत जास्तीत जास्त मौन बाळगावे. बोलण्यातील शक्तीचा उपयोग साधनेत होऊ शकतो. एकांताचीही थोडी साधना या ध्यान प्रक्रियेला पोषक ठरते. निसर्गाच्या सान्निध्यात, बाह्य संभाषण बंद केल्यावर आपल्या आंतरिक चेतनेचा आवाज आपल्या कानावर येण्यास आरंभ होईल. साधनेचे जीवन हे एकट्याचे असते, समूहात ध्यान करीत असलो तरी ध्यान वैयक्तिक असते. ध्यान, समाधी हा अंतर्प्रवेशाचा प्रयोग आहे. त्यासाठी प्रथम संकल्प सोडायला हवा. पूर्ण मनानं– मला शांत व्हायचं आहे, मला ध्यान प्राप्त करायचं आहे, असा संकल्प करा. दृढपणे संकल्प दृढ करण्याचा उपाय म्हणून ओशो एक तंत्र विशद करतात.
``सगळ्यात आधी हळूहळू पूर्ण श्वास आत घ्या. सगळ्या प्राणांमध्ये, फुप्फुसामध्ये घेता येईल तेवढा श्वास भरून घ्या. श्वास पूर्ण करल्यावर ``मी संकल्प करतो की मी ध्यानात प्रवेश करीनच.`` असा विचार मनात घोळवत राहा. या वाक्याचा पुनरुच्चार करीत राहा. ही एक अद्भुत प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्या अचेतन भागांमध्ये संकल्पाचा प्रवेश होईल असे ते म्हणतात. हा संकल्प प्रथम पाच वेळा करा. रोज झोपतानाही तो पुन्हा करा. (१७)
माणसाची सगळ्यात मोठी कृती स्वतः माणूस आहे.
माणसाची सगळ्यात मोठी निर्मिती म्हणजे स्वतःची निर्मिती.
परमजीवन किंवा परमात्मा किंवा आत्मा किंवा सत्य प्राप्त करण्यासाठी सचेतन लक्ष्याची तहान हवी. ती तहान भागवण्यासाठी चिंतन मनन हवं. जे काही घडतंय ते डोळे उघडे ठेवून चारी बाजूंनी बघा. त्या घडण्यातून चिंतन-मनन होईल; तहान जागी होईल.
त्याचबरोबर साधनेचं केंद्र किंवा साधनेचं शरीर व आत्मा हेही हवे.
साधना-साधनेचं केंद्र व साधनेचा परिणाम.
साधनेची भूमिका, साधना आणि साधनेची सिद्धी.
साधनेचा परीघ म्हणजे तुमचं शरीर. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचं परीघही शरीर हेच.
शरीर हे केवळ साधन आहे. पण शरीर हे अद्भुत साधन आहे. एक यंत्र आहे. साधनेचा आरंभ शरीरापासून होणं आवश्यक आहे. कारण हे यंत्र व्यवस्थित केल्याशिवाय पुढं जाता येत नाही.
म्हणून पहिलं पाऊल– शरीरशुद्धी.
शरीर शुद्ध होईल तेवढं अंतरंगाच्या प्रवेशात सहभागी होईल.
शरीरशुद्धीचा अर्थ असा की शरीराच्या यंत्रणेत अडथळा आणणाऱ्या ग्रंथी आणि मनोगंड असता कामा नयेत.
शरीरशुद्धीसाठी सगळ्या योगांनी, सगळ्या धर्मांनी अनेक प्रयोग केले आहेत. शरीरात ग्रंथी निर्माण होता कामा नयेत. हे शरीरशुद्धीचं पहिलं पाऊल. मनाचं कंपन जेवढं कमी होऊ लागेल तेवढं शरीर स्थिर वाटू लागेल. शरीरशुद्धीचं पहिलं पाऊल म्हणजे शरीराच्या ग्रंथींचं विसर्जन. (२८) साधनेची ही प्राथमिक पायरी होय.
आपल्या शरीरातील शक्ती आणि ऊर्जा यांचा सृजनात्मक उपयोग करणं हा स्वर्गाचा मार्ग आहे. त्यांचा नाश करणं हा नरकाचा मार्ग आहे. (३३) सृजनात्मक कामांतून आनंद मिळतो. एकदा बिंदू निवडून सृजन करा. चित्रे काढा, कविता लिहा, मूर्ती बनवा. सृजनात काही घ्यायचं द्यायचं नसतं. फक्त करायचं असतं. त्यात आनंद असतो. (३८)
शरीर आणि मन दोन्ही संयुक्त आहेत. शरीरावर जे होईल ते मनावर होते. सम्यक आहार, सम्यक व्यायाम आणि सम्यक विश्राम याद्वारे स्वास्थ्य लाभते.
शरीरशुद्धी, विचारशुद्धी आणि भावशुद्धी हे ध्यानाचे पहिले तीन टप्पे आहे. शरीरशून्यता, विचारशून्यता आणि भावशून्यता हे ध्यानाचे दुसरे तीन टप्पे आहेत.
श्वास पूर्णपणे आत घ्या. फुप्फुसं पूर्ण भरून घ्या. श्वास रोखणं शक्य होईल तोवर रोखून धरा. योगात पूरक, कुंभक व रेचक असे या प्रक्रियेला म्हटले आहे. (४३) त्याच वेळी संकल्प करीत राहा. तो संकल्प आपल्या पूर्ण अंतःकरणातल्या चेतन मनापर्यंत प्रविष्ट होईल. त्यातूनच संकल्पानंतरची आशा, आनंद, विश्वासाची भावना जागी होईल. आपल्या शरीराला स्वास्थ्याची, आनंदाची, भावना जाणवेल. शरीराचा कण न् कण प्रफुल्लित झाल्याचा आनंद वाटेल.
हा शांतीचा, आनंदाचा अनुभव चोवीस तास कसा टिकवून ठेवायचा याचे दोन मार्ग ओशो सांगतात.
१) ध्यानात अनुभवलेल्या चित्तवृत्तीचं सतत स्मरण करायचं.
२) रात्री झोपतानाही संकल्प प्रगाढ करीत राहायचे.
चोवीस तास त्यायोगे सतत अंतःस्मरण होत राहील. (४६)
आपल्या चित्ताची स्थिती आपण जशी टिकवून धरू तसं हे जग होत जातं. हा एक चमत्कारच आहे. आपण प्रेमानं भरून गेलो तर सगळीकडे प्रेमच प्रेम भरलेलं दिसतं. ज्यांचं स्मरण कराल त्या घटना वाढत राहतात. ध्यानातला जो अनुभव असेल– थोडासा प्रकाश, थोडीशी शांती, थोडीशी आशा– त्यांचं स्मरण ठेवा. त्या वाढत राहतील. प्रेम करायला शिका.
याच प्रवचनात ओशो सेक्स व प्रेम यांचं स्वरूप उलगडून दाखवतात. प्रेमामुळं सेक्सचं परिवर्तन होतं. सृजनशील होतं. सेक्स ही सृजनात्मक शक्ती व्हायला हवी. (५५) जगात जेवढे महापुरुष झाले ते सर्व अत्यंत सेक्स्चुअॅलिस्ट होते. अतिकामुक होते. पण त्या कामुकतेचं रूपांतर शक्तीत झालं की स्थिती बदलते. (६७)
शरीरशुद्धी, विचारशुद्धी व भावनाशुद्धी या तिन्ही गोष्टी साधल्या तर जीवनाचा नव जन्म होतो.(६८) ही बाह्यसाधना होय. अंतरंग साधना म्हणजे भाव, शरीर व विचार यांना शून्यावस्थेत नेणे. शरीर नाही, विचार नाही, भाव नाही अशा अवस्थेत प्रवेश करणे.(६९)
परमात्म्याचा साक्षात्कार होणं हा शब्दप्रयोग ओशोंना मान्य नाही. परमात्म्याशी मीलन होतं असं ते मानतात. एका बाजूला तुम्ही, दुसऱ्या बाजूला परमात्मा– असा हा प्रकार नसतो. तुम्ही सगळ्या सत्तेत लीन होता. थेंब समुद्रात मिसळतो. त्याक्षणी जो अनुभव येतो तो अनुभव परमात्म्याचा असतो.(११२)
तपश्चर्या म्हणजे काय? हे सांगताना ओशो म्हणतात, तपश्चर्या म्हणजे आत्महत्या नाही`. मृत्यू नाही. तपश्चर्या पूर्ण जीवनाच्या प्राप्तीसाठी असते. तपश्चर्या म्हणजे पलायन नाही तर ट्रॅन्सफॉर्मेशन. (अवस्थांतरण). तपश्चर्या म्हणजे त्याग नाही तर समपरिवर्तन.(१२१)
तपश्चर्या म्हणजे कष्ट नव्हे, आत्मपीडा नव्हे, शरीरदमन नव्हे. तपश्चर्या ही काही मिळवण्यासाठी नसते. ती लोभाचं रूप प्रलोभन म्हणून समोर येता कामा नये.
शरीरातील मूलाधार, स्वाधिष्ठान, अनाहत, आज्ञा आणि सहस्रार या पाच चक्रांवर ध्यान केंद्रित करून त्यांना सूचना देऊन ते अवयव शिथिल करा. त्यायोगे भाव आणि विचार शून्य होतील, मन शून्य होईल. हा ध्यानाचा प्रयोग करण्याची कृतीही शिबिरात रोज आवश्यक असते.
भावाची शून्यता उसळी घेते तेव्हा सत्य उपलब्ध होते. सत्य पूर्ण मिळते. समग्र मिळते. परमात्म्याचा अनुभव हा अखंड असतो. पण त्याच्यापर्यंत पोचण्याचा मार्ग हा खूप खंडांमध्ये विभागलेला असतो. त्यासाठी टप्प्याटप्प्यातं जाणे भाग पडते. सत्य हे शब्दांमध्ये सांगता येत नाही. मानवी वाणीला अजून ते सांगणं शक्य झालेलं नाही. भाषा पुरेशी विकसित झाली तर कदाचित ते सांगता येईल. सत्य सांगता येत नाही. ते जाणता येतं. अनुभवता येतं. सत्याचा अनुभव नेहमी वैयक्तिक असतो.
ओशो रजनीश यांच्या या प्रवचनातून त्यांच्या ध्यानधारणेच्या तंत्राची सूत्ररूप कल्पना येते.
१. प्रथम साधनेच्या, ध्यानाची उत्कटतम तृष्णा निर्माण होणे. संकल्प करणे.
२. साधनेची पहिली शिडी म्हणजे व्यक्तीचं शरीर. त्याच्या शुद्धीची गरज. शरीर ग्रंथीमुक्त करणं वासनाविकारांचे गंड दूर करणे.
३. चित्शक्तीचे रूपांतर सृजनात्मक क्रियेत करणे.
४. विचारशुद्धी करणे. जो जसा विचार करतो, तसा तो होतो. म्हणून विचारांची दिशा शुद्ध झाली की तुमच्या अचार-उच्चारात फरक पडेल.
५. भावशुद्धीची कला आत्मसात करणे. भावविश्वात परिवर्तन झाल्याशिवाय विचार विश्वातील विचारांनी क्रांती होत नाही. भावाच्या चार अवस्था.
६. सम्यक् रूपांतर, तपश्चर्या, उपवास, राग-विराग-वीतराग.
७. शुद्धी आणि शून्यता यातून लाभणारी समाधी सिद्धी.
८. समाधीचे रहस्य प्राप्त झाल्यावरची अवस्था.
९. एकावेळी एकच पाऊल उचलण्याचे आमंत्रण.
या प्रवचनात अनेक मार्मिक दृष्टान्त-कथा विखुरलेल्या आहेत. भगवान बुद्ध, भगवान महावीर, येशू खिस्त, महात्मा गांधी, रवीन्द्रनाथ टागोर, रामकृष्ण परमहंस इ. इ.
त्या सर्व कथांमधूनही आपल्या श्रोत्यांना व वाचकांना ओशो नव्या जाणिवांचे भान घडवतात.
एक कथा येथे देतो. ती वाचकांना अंतर्मुख करील.
एक आंधळा आणि त्याचा एक मित्र प्रवास करीत असतात. वाळवंटात एके रात्री कडक थंडीत तो आंधळा काठी म्हणून चुकून एक थंडीने गारठून कडक झालेला साप हाती घेतो. आपल्या नेहमीच्या काठीपेक्षा गुळगुळीत मऊ काठी मिळाली म्हणून तो देवाचे आभार मानतो. त्याच काठीने मित्राला ढोसून तो सकाळी झोपेतून उठवतो. मित्र साप पाहून घाबरतो, ``अरे, हा साप तू हातात का धरला आहेस? टाकून दे. चावेल तुला.`` पण आंधळा म्हणतो, ``काहीतरीच काय सांगतोस? मी आंधळा आहे. अडाणी नाही.`` मित्र म्हणतो, ``अरे तो खरोखरच साप आहे.``
थोड्या वेळाने सूर्य वर आल्यावर उन्हाने सापाचा ताठरपणा संपून तो तरतरीत होतो आणि त्या आंधळ्याला खरोखर चावतो.
ओशो म्हणतात, ``मी ज्या दुःखाची गोष्ट तुमच्यापाशी करतोय ते तेच दुःख आहे, जे त्या दिवशी सकाळी त्या डोळस माणसाला आपल्या अंध मित्राबद्दल वाटलं. मला चारी बाजूंना जे लोक दिसतात ते काठी समजून हातात साप धरून चाललेले दिसतात. मी त्यांना ते सांगू गेलो तर ते म्हणतील, मी असूयेपोटी बोलतोय. म्हणून मी हळूहळू समजावण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही जे पकडलंय ते चुकीचं आहे. आणखी पकडता येण्यासारखी चांगली काठी आहे आनंद, सत्य... आपण चुकीचं जगतोय हे लक्षात आलं तरच तुमच्यात नवी तहान निर्माण होईल.`` ...Read more