NEWSPAPER REVIEWबाळासाहेब ठाकरे यांच्या घणाघाती मुलाखती...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे ‘सामना’ चे संपादक, आणि १९९४ पासून संजय राऊत हे कार्यकारी संपादक आहेत. बाळासाहेबांना दैनिकाच्या दैनंदिन कामकाजाकडे पाहण्याएवढी उसंत मिळणे अशक्यच; त्यामुळं कार्यकारी संपादक ज कोणी असेल त्यालाच बाळासाहेबांची मानसिकता लक्षात घेऊन, त्यांच्या मनातले जाणून रोज अग्रलेखाची ‘लाईन’ ठरवणे क्रमप्राप्त असते. संजय राऊत यांनी बाळासाहेबांच्या वृत्ती-प्रवृत्तीला साजेलसे स्वत:चे व्यक्तिमत्व ‘सामना’ ची सूत्रे हाती आल्यावर घडवले आहे. सामना वाचला जातो तो शिवसेनेचे मुखपत्र म्हणून, बाळासाहेबांच्या मतांचे व्यासपीठ म्हणून! कार्यकारी संपादकाच्या वैयक्तिक मतांसाठी सामना कोणी वाचावा, अशी अपेक्षाही नसते; त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्याच भूमिकेत शिरून, त्यांच्याच भावभावनांना व धोरणात्मक व्यूहाला संपादकीय शब्दरूप देण्यातील कौशल्य उत्तमप्रकारे संजय राऊत यांनी प्रकट केले आहे, आणि बाळासाहेबांना रुचेल, शोभेल अशीच शैली घडवली आहे. क्वचितच कधी बाळासाहेबांची त्यांच्यावर खप्पामर्जी झाली असेल, इतक्या दोघांच्या वेव्हलेंग्थज् जुळलेल्या आहेत.
बाळासाहेबांना शोभतील असे विचार बाळासाहेबांना शोभेल अशा आक्रमक शैलीत मांडण्याची ही कसरत संजय राऊत गेली सात-आठ वर्षे करीत आहेत. तरीही बाळासाहेबांची त्या त्या वेळची मते ही शिवसैनिकांना व इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्याच ठाकरी भाषेत हवी असतात. ही वाचकांची गरज लक्षात घेऊन संजय राऊत यांनी बाळासाहेबांच्या विस्तृत मुलाखती महिन्या-दोन महिन्याने सामनात देण्याचा परिपाठ ठेवला. इतर कोणीही घेऊ शकणार नाही, असं स्वातंत्र्य संजय राऊत यांनी या मुलाखतींच्या बाबतीत घेतले आणि बाळासाहेबांना अडचणीचे वाटणारे प्रश्नही विचारले आहेत. बाळासाहेबांनी हे प्रश्न संजय राऊत यांच्या मनातले नाहीत, सर्वसामान्य मराठी माणसाचे आहेत, असे समजून उत्तरे देऊन, सरसहा हाताळले, क्वचितच उत्तर देण्याचे त्यांनी टाळले, किंवा क्वचितच प्रश्नांना बगल दिली असे दिसते.
एखाद्या दैनिकांत संपादकांच्या मॅरेथॉन मुलाखती वरचेवर येणे हा एकूण चमत्कारिकच प्रकार. पण ‘सामना’चे वैशिष्ट्य म्हणून त्याचा उल्लेख होऊ लागला.
बाळासाहेबांचा बाणा रोखठोक बोलण्याचा! तशात मराठीचा घणाघाती वापर करण्याचा त्यांच्या स्वभाव. मुलाखतीत बोलताना एखादी शिवी वा बदनामीकारक विधान तोंडातून गेले तरी ते जसेच्या तसे छापा असा बाळासाहेबांचा आग्रह; त्यामुळे संजय राऊत यांच्या प्रश्नातही आडपडदा वा हातचे राखून न ठेवणे हा प्रकार नाही; त्यामुळे या मुलाखती वादळी व वादग्रस्तही ठरल्या.
संजय राऊत यांनी बाळासाहेबांच्या एकूण ५२ मुलाखती त्यांच्यासाठी ते पंच्याहस्तीच्या पंधरा वर्षांत घेतल्या. पहिल्या दोन मुलाखती अनुक्रमे १९८७ व १९९२ मधील आहेत. परंतु पुढच्या पन्नास मुलाखती १ मे १९९४ पासून ३ जुलै २००१ या सात वर्षांतल्या आहेत. त्यात त्या त्या वेळच्या ज्वलंत समस्यांबाबतची बाळासाहेबांची मते त्यांच्या आक्रमक शैलीत व्यक्त झाली आहेत.
या मुलाखतीच्या रूपाने बाळासाहेबांनी दीड हजारावर प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. शिवसेना, हिंदुत्व, सरकार, भाजपा, समाजवादी, काँग्रेस, विरोधी पक्ष, निवडणुका, मतदार, दौरे, शिवसेनेतील फाटाफूट, बंडखोरी भाजपा-शिवसेनेतील तणाव, पत्रकारिता, मीडिया, कामगारक्षेत्र, राज्यघटना, लोकशाही, खंडणी, दहशत, गँगवार, भ्रष्टाचार, ठाकरे यांच्या कुटुंबातील वाद, अवैध मार्गाने संपत्तीची जमवाजमव, शिवसैनिकांचे वर्तन, मुंबईचे मराठीपण, झोपडपट्ट्या, भूमिपुत्रांवरील अन्याय, त्या त्या वेळेचे राजकीय वातावरण व गणित, गोवारीचे हत्याकांड, दंगली, बॉम्बस्फोट, देशाचे नेतृत्व, रिमोट कंट्रोल, शेतमालाचे भाव, श्रीमंतांचे मित्र झाल्याचा आरोप, नोकरशाहीचा नाकर्तेपणा, राजकीय संन्यास, कुपोषणाने मृत्यू, कॉन्व्हेंट शाळा, महागाई, आर्थिक दिवाळखोरी, पक्षहिंसा, पाकिस्तान, काश्मीर, कारगिल, श्रीलंका व लिट्टे, दुकानांवरील मराठी पाट्या, खिस्ती मिशनरी, मुसलमानांचा मताधिकार काढून घेण्याचा आग्रह, तहलका, इस्लामचे आक्रमण, मणिपूरमधील बंड, एन्रॉन, श्रीकृष्ण आयोग, राज-उद्धव यांचे संबंध, नेपाळमधील राजवंश हत्या इ. कितीतरी विषय या मुलाखतीमध्ये आले आहेत. विषय पुन:पुन्हा आले आहेत स्वत:बद्दलसुद्धा ठाकरे यांनी वेळोवेळी काही बोलकी विधाने केली आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू त्यातून स्पष्ट होतात.
या मुलाखतींमधून आपल्या सर्वच प्रश्नांची समाधानकारक किंवा मनासारखी उत्तरे मिळावीत, ही अपेक्षा करणे योग्य नाही. पारदर्शकतेलाही व्यावहारिक मर्यादा असतात; त्यामुळे काही ठिकाणी ‘बीटवीन द लाईन्स( वाचावे लागते. तशा जागाही खूप आहेत आणि अर्थपूर्ण, मार्मिक आहेत. असं खूप काही या मुलाखतींतून समोर येतं. ते विचारांना चालना देतं. ...Read more