- लोकसत्ता १०.९.२०२३ (लोकरंग) वंदना बोकील-कुलकर्णी
माणसांवाचून रिकामी गावं, रस्ते, घरं न पाहवणारी, अंजनमाळावरच्या नागदेवीच्या कातळावर रणरण उन्हात सर्वागाने उन्हं पिऊन घेणारी, आपली उन्हात तापून दग्ध तांबूस झालेली देहाकृती व्हिन्सेंटने (व्हान गॉग) पाहावी आत्ता या क्षणी आणि तिच्या मोहात पडून त्यानेती आपल्या कॅनव्हासवर रेखाटावी असं आसुसून वाटणारी एक अतिसंवेदनशील तरुणी कामायनी ही शर्मिला फडके यांच्या ‘फोर सीझन्स’ या कादंबरीची नायिका. या नायिकेची चार प्रदेशात, चार ऋतूंमध्ये, चार पुरुषांच्या सहवासात घडणारी कहाणी म्हणून तिचं शीर्षक ‘फोर सीझन्स’.
‘फोर सीझन्स’ ही खऱ्या अर्थाने आत्ताची कादंबरी आहे. कदाचित पहिली ब्लॉग कादंबरी. कारण लेखिकेने कादंबरीच्या नायिकेच्या नावाने ‘टय़ुलिप्स अॅण्ड ट्वायलाइट’ या ब्लॉगवर पोस्ट्स लिहिल्या. ‘कादंबरीने बऱ्यापैकी आकार घेतल्यावर, व्यक्तिरेखा सुस्पष्ट झाल्यावर’ मग हा ब्लॉग तिने बंद केला. ‘ब्लॉग अर्काइव्हमध्ये जमा झालेल्या शेकडो पोस्ट्सवरून मॅपिंग करत’ कादंबरीचा आत्ताचा आकार तिने सिद्ध केला. हिची निर्मितीप्रक्रिया आत्ताच्या तंत्रसाहाय्याने, समाजमाध्यमांचा शहाणा उपयोग करून घेऊन झाली आहे. या अर्थाने ही आत्ताची कादंबरी.
अलीकडे म्हणजे साधारण गेल्या दहा वर्षांत नव्याने लिहू लागलेल्या लेखकांत हिरिरीने आपली भूमिकावाहक पात्रे निर्माण करण्याची जी वृत्ती दिसते तिच्यात न अडकता आपल्या अनुभवांशी प्रामाणिक राहत आणि तरी कथनात्म साहित्याच्या मागण्या नीट कळून घेत लेखन करणाऱ्यांमध्ये शर्मिला फडके ही लेखिका लक्ष वेधून घेते. मोजके लेखन आहे तिचे पण खरेच लक्षात राहणारे. गेल्या पाच-सहा वर्षांत विविध दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झालेल्या तिच्या कथा पाहिल्या तरी हे पटेल. ‘ये शहर बडा पुराना है’ ही कथा वाचकांना ताबडतोब आठवेल. याशिवाय विविध ठिकाणी कलाइतिहास, कलासमीक्षा, प्रवास याही विषयांवर तिचे लेखन सातत्याने चालू आहे. तिचे मूळ शिक्षण वनस्पतीशास्त्र या विषयातलं. नंतर पत्रकारिता आणि कलाइतिहास यांचेही पदव्युत्तर शिक्षण तिने घेतले. ही तिन्ही क्षेत्रं भटकंतीला पूरक. शर्मिला फडके यांना प्रवासाचीही आवड आहे. फॅशनेबल पर्यटन नव्हे, प्रवास. खरीखुरी हवा, माती, झाडंझुडं, पाणी, नद्या अंगावर घेत केलेला प्रवास. आणि हे करताना त्यांच्या संवेदना तल्लखपणे आजूबाजू टिपून घेत असतात. त्यामुळे त्यांच्या लेखनाचे विषय अनोखे आणि साहजिकपणे त्यांच्या अभ्यासविषयाशी आतून नातं सांगणारे असले तरी आजूबाजूला असलेलं वातावरण, सामाजिक-सांस्कृतिक घडामोडी यांचं भान असलेल्या एका डोळस कलाप्रेमी स्त्रीचं अनुभवविश्व त्यातून आकाराला येतं.
‘फोर सिझन्स’ ही त्यांची कादंबरी लेखक म्हणून त्यांचे जे वृत्तिविशेष आहेत त्यांचा प्रत्यय देणारी आहे. स्त्रियांनी लिहायचे ते खास त्यांच्याच रूढ अनुभवविश्वाविषयी असा जणू पायंडा पडलेला असताना ही लेखिका मात्र अशा विश्वाचा पसारा मांडते की जे खरंच अनवट आहे.
या कथनाची नायिका कामायनी मुंबई, सुंदरबन, युरोप आणि माळरान अशा भूप्रदेशांमध्ये काही काळ वावरते. नुसती वावरत नाही तर जिवेभावे तिथे गुंतते. चार भूप्रदेश, तिथे भेटलेले चार पुरुष- तेही भिन्न विचारसरणीचे, प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे, त्यांच्या विचारांचा खोलवर परिणाम होऊन कच्च्या वयापासून वैचारिक, भावनिक आणि मानसिक गोंधळात वाढत गेलेली ही तीव्र बुद्धिमत्ता आणि कमालीची संवेदनशील असणारी मुलगी. मुंबईमध्ये वडिलांच्या वयाचा त्यांचा मित्र आणि तिला अगदी जन्मापासून ओळखणारा तिचा पालक म्हणावा असा जोसेफ, अनिर्बन बॅनर्जीच्या प्रभावाखाली सुंदरबनात दाखल, पण तिथे मनासारखे काहीच घडत नाही. उलट प्रेमात आणि कामात अपयश घेऊन पळून येणं. मग काही काळ पुन्हा मुंबई. मग जोसेफ तिला युरोपात पाठवतो. तिथे भेटतो इटालियन एरिक. तिथेही तेच घडते. विझून गेलेली, हरलेली आणि आत्मविश्वास गमावून बसलेली ती पुन्हा मुंबईत जोसेफच्या वळचणीला येते. तो तिला एक काम देऊन अंजनमाळ या माळरानावर पाठवतो. तिथे भेटतो विहान. माणूस आहे तिथे मतं आणि मतभेद आहेत, गुंतणं-गाठी बसणं आहे, संघर्ष तर आहेतच. पण या माळरानावर तेवढी ती तिची आहे. ती माळरानाच्याच प्रेमात पडते.
कादंबरीत पात्रे म्हणाल तर कामायनीचे आईबाबा, त्यांच्याच बंगल्याच्या दुसऱ्या भागात राहणारे बानिदा, इरादी बॅनर्जी आणि त्यांचा मुलगा अनिर्बन, जोसेफ, एरिक, माळरानावर संशोधन करणारा विहान आणि त्याचे काका आस्ताद, रघु, मधोक हे मित्र आणि ती जिथे काम करते तिथले श्रीरंजन, निर्मल, नाडकर्णी वगैरे सहकारी. गेस्ट हाऊसची राखण करणारे राणू व लाखी आणि दहाबारा वर्षांची त्यांची मुलगी मणी. मरून गेलेली मार्गारेट फिलीप ग्रॅहम ही वनस्पतींची अभ्यासक, तिच्याशी एकनिष्ठ असलेला येशा हा तिचा मदतनीस पोरगा- ज्याची आता शंभरी उलटून गेली आहे. बस्स. माणसांचा आणि त्यांच्या नात्यांचा मोठा पसारा नाही मांडत लेखिका. या सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात जिवंत आहे तो निसर्ग. तोही तुमच्या आमच्या नेहमीच्या सवयीचा, चकचकीत, कॅमेरा किंवा तत्सदृश शब्दांतून दिसणारा, जणू काय आपलं मनोरंजन करण्याच्या डय़ुटीवर नेमलेला नव्हे. इथे त्याची जिवंत स्पंदनं आपल्याला जाणवतात. आपण उन्हात तापतो, आपल्याला उन्हाचा खरपूस वास येऊ लागतो. आपण सुंदरबनातल्या काळय़ा पाण्यात आणि दलदलीत पाय टाकायला कचरतो.. हा असा साक्षात अनुभव लेखिका तुम्हाला देते.
अतिशय वैशिष्टय़पूर्ण रचना आहे या कादंबरीची. कधी प्रथमपुरुषी निवेदन, कधी तृतीयपुरुषी. कधी दैनंदिनीतल्या नोंदी. कधी नायिकेने स्वत:शीच केलेले विचार, कधी तिला पडणारी स्वप्नं तर कधी मार्गारेटच्या दैनंदिनीतल्या नोंदी. मुख्य प्रकरणं चार. ऋतू पहिला, ऋतू दुसरा.. अशा शीर्षकांची. त्यात उपशीर्षके असलेले लहान लहान परिच्छेद. कदाचित आधी ब्लॉग लिहून मग त्यातून कादंबरीचे कथानक रचल्यामुळे असेल, पण ही रचना एकाच वेळी अनेक पातळय़ांवर फिरते. त्यामुळे अनेक दिशीय, अनेक स्तरीय वास्तवाचा अनुभव वाचतावाचता येत राहतो. कादंबरीच्या आशयाशी इतकं थेट संलग्न असलेलं विविध पातळय़ांवर फिरणारं निवेदनतंत्र वाचकांच्या सवयीचे नाही. पण एकदा का तुम्ही या नायिकेबरोबर तिच्या पावलांनी चालू लागलात की.. आणि तसे चालताच तुम्ही.. की मात्र या निवेदनाची जादू आणि गंमत समजते. नायिकेची गोष्ट कधी ती सांगते तर कधी निवेदिका सांगते. निवेदनतंत्र इतक्या ताकदीने वापरणं आणि ते ‘वापरलं आहे’ याची जाणीव होऊ न देणं, यात या कादंबरीचं बरंच यश सामावलं आहे. उत्तम भाषाशैली आणि प्रतिमांचा फार नेमका वापर यांचाही त्यात वाटा आहेच.
नायिका जशी जगते आहे, निसर्गाच्या चक्रातून स्वत:चे आयुष्य समजून घेते आहे तसं हे लेखन आहे. आखीव नाही, असं वाटणारं. तिची नजर जाते तो तो निसर्गाचा आविष्कार ती सांगते. नायिकेच्या रंग, गंध आणि स्पर्शाच्या संवेदना विशेष तल्लख आहेत. त्यामुळे तिच्या वर्णनांत चित्रकाराच्या पॅलेटवरचे रंग आणि त्यांच्या अगणित छटा येत-जात राहतात. व्हान गॉग, मोने वगैरे चित्रकारांच्या चित्रांचे संदर्भ येतात. सुंदरबन आणि युरोपातल्या आठवणी त्यात आपले धागे मिसळत राहतात. ती मनातले गोंधळ उघड करते. ते गोंधळ का निर्माण झाले, याचा वाचकांच्या साक्षीने शोध घेते. पहिल्याच मोठय़ा प्रकरणात आता लेखिका हे सारे कसे सोडवणार, म्हणून उत्सुकता आणि काळजीही वाटते कारण सरधोपट निवेदनाचा रस्ता तिने सोडून दिला आहे.
या कादंबरीत आहे तसं रखरख माळरान कुणी कधी शब्दांतून क्वचितच मांडलं असेल. उन्हाच्या सुया डोळय़ांत घुसत असताना ही एका आंतरिक हट्टानं तिथे राहते. जगते. त्या उन्हात तिच्या आतले बर्फाचे गोठलेले प्रदेश वितळून वहाते होतात. तिची ती तिला सापडत जाते. ज्या प्रश्नांपासून ती पळत होती, त्या प्रश्नांना भिडण्याचे बळ ते ऊन तिला देते. अवघ्या तीस वर्षांच्या तिच्या आयुष्यात झालेले गुंते, गाठी हळूहळू सुटत जातात, सुरुवातीची ‘टय़ुलिपचे फूल वाटणारी ती अखेरीस एखादे रानफूल वाटू लागते.’ त्या प्रवासाची ही कहाणी आहे.
या नायिकेला मिथक, लोककथा, झाडं-पानं-फुलं-पक्षी या सगळय़ांत रस आहे. नागदेवीच्या कातळाची कहाणी, आदिवासी तिथे करत असलेले विधी समजून घेण्याचा तिचा प्रयत्न आहे. राणू, त्याचा शंभरी पार केलेला वृद्ध बाप येशा, यांच्याशी संवाद साधण्याची, त्यांच्याकडून जुनी घटितं जाणून घेण्याची आणि ते ठिपके जोडत सलग चित्र पूर्ण करण्याची तिला निकड वाटते. मणी तर तिची छोटी मैत्रीण होऊन जाते.
या कादंबरीच्या गाभ्याकडे अनेक वाटांनी जावं लागतं.. नायिकेच्या आई-वडिलांचं नातं विस्कटलेलं असणं, तिचं आईशिवाय मोठ होणं, वडिलांनी कामात बुडवून घेणं, अडनिडय़ा वयातल्या एकटेपणात बॅनर्जीकडे रमणं, त्यांच्या तरुण मुलाच्या प्रेमात पडणं. बाबांना दुखवायचं म्हणून वडीलधारेपण निभावणाऱ्या जोसेफकडे ओढा वाढणं, तरी त्याला जे नको वाटतं तेच तिनं निवडणं, अनिर्बनकडे जाणं.
मग तिथून पळून युरोपात. तिथे एरिकच्या प्रेमात पडणं, करियरची वाट लागून, पूर्ण खचून मुंबई- पुन्हा जोसेफ आणि मग माळरान. हा सगळा प्रवास एका स्तरावर आहे.
दुसऱ्या पातळीवर, माणसाचा जागतिक स्तरावरचा वावर, त्याला भेटणारी विविध देशीविदेशी माणसं, परदेशातील वास्तव्याची संधी, त्यामुळे होणारी भावनिक-शारीरिक जवळीक, त्यातून निर्माण होणाऱ्या वैयक्तिक जीवनातल्या समस्या आहेत. तिसऱ्या पातळीवर पर्यावरण आणि विकास यासंबंधीचे असंख्य स्थूल-सूक्ष्म धागे आहेत. नायिका जाहिरात क्षेत्रात करियर असणारी. ते क्षेत्र आणि पर्यावरण कायम विरोधी गटात. दोन्ही बाजू जनसामान्यांची करत असलेली अशुद्ध दिशाभूल, विस्थापितांचे पुनर्वसनाचे प्रश्न, ‘विस्थापितांचा प्रश्न केवळ जमिनी गमावण्याचा नसतो, तो मुळं उखडलं जाण्याचा असतो’, याविषयी असणारी कमालीची असंवेदनशीलता, प्रश्नांचा समग्र विचार न करता एकेका सुटय़ा घटकांचा विचार करून योजलेले तात्कालिक उपाय, हत्ती आणि सहा आंधळय़ांच्या प्राचीन गोष्टीतून आपण काहीच शिकलो नसल्याची चरचरीत जाणीव.. हे सगळं ही कादंबरी स्वत:त गुंफून घेते. म्हणजेच कालसमांतर आशय ती आपल्या पदरात घालते. नायिका ज्या जाहिरात क्षेत्रात काम करतेय तिथे येणारे कडवट अनुभव, स्वत:च केलेले सगळे नियम धाब्यावर बसवणाऱ्या सरकारी व्यवस्था, हिरव्या रंगाच्या ‘वॉश’खाली भयानक प्रदूषण करणाऱ्या उत्पादनांना मिळणाऱ्या परवानग्या आणि त्याविषयी उदासीन असणारी विविध पदांवरची माणसं. निकराने त्याला विरोध करणारे पर्यावरणस्नेही कार्यकर्ते आणि संस्था, याविषयी विचार करायला लावते ही कादंबरी.
ही सगळी वीण गच्च विणली आहे. म्हणूनच ती वाचायला मजा येते. म्हणजे हिच्यात काही कमतरता वा त्रुटी नाहीत का? नाहीत कशा.. पण दुर्लक्ष कराव्यात अशा नक्कीच. उदा. जोसेफ, रघु, मधोक, आस्ताद, विहान यांच्या आयुष्यात कोणीच स्त्रिया कशा नाहीत? इतक्या जवळिकीच्या आणि प्रदीर्घ काळाच्या नात्यात कधीतरी त्या व नायिका आमनेसामने येऊ शकल्या असत्या. अशा तिढय़ांना सफाईने बगल दिली आहे. त्यामुळे समग्र चित्रात फटी राहिल्या आहेत. सहसा लेखिका ज्या तऱ्हेचं लेखन करत नाहीत तसं वाचायला मिळालं की सुखद वाटतं. स्त्री असण्याच्या परीघरेषा ओलांडून ही नायिका व्यक्ती म्हणून वेगळे आयुष्य जगते. सहजधर्मानं, अभिनिवेशानं नव्हे म्हणून आणखी बरं वाटतं.
लेखिका, संपादक, संवादक, समीक्षक आणि कथा अभ्यासक अशा अनेक भूमिकांमध्ये सतत कार्यरत. ‘संवादसेतू’ या लक्षवेधी दिवाळी अंकाचे संपादन. कथक नृत्यांगना रोहिणी भाटे यांच्यावरील ‘रोहिणी निरंजनी’ हा गाजलेला ग्रंथ, ‘मंगला गोडबोले यांच्या निवडक कथां’ यासह अनेक पुस्तकांच्या संपादिका. ...Read more
- Vikram Bhagwat
द्रुतगत ते विलंबित खयाल ते द्रुतगत अशी स्वतःची स्वतंत्र मांडणी असणारी कादंबरी.
फेब्रुवारी २०१९ मध्ये प्रसिद्ध झालेली कादंबरी वाचायला मला डिसेंबर २०१९ उजाडले ह्यातच माझ्या वाचनाची सध्या जी परवड झाली आहे तिचे चित्र स्पष्ट व्हावे. अर्थात २०२०च्या सुरवातीपासूनच ह्यावर काही कठोर उपाय मी योजायचे ठरवले आहे. ते जाहीर करायची ही जागा नव्हे.
मी जे शीर्षक दिले आहे त्यातच ‘फोर सिझन्स’ चे मला जाणवलेले वैशिष्ट्य मी मांडले आहे. एखादी कादंबरी मला का आवडते? ह्याचे एका वाक्यात द्यायचे उत्तर, “तिने मळलेली पायवाट मोडून तोडून फेकून द्यावी. तिने प्रस्थापित संकेत झुगारून देऊन, स्वतःचे संकेत निर्माण करायचा प्रयत्न करावा. भले त्यात यश येवो अगर अपयश” आणि ह्या एका मापदंडावर शर्मिलाची कादंबरी एकदम खरी उतरते. मुळात एका झंझावातात ही कादंबरी सुरु होते. मग ती शांत डोहात उतरते आणि पुन्हा एकदा झंझावातात ती परावर्तीत होते आणि एका गूढतेत ती संपते.
अंजनमाळावर सुरुवात होते...आणि तिथे पडलेल्या स्वप्नात कामयानी काळातून प्रवास करीत आठवणीच्या प्रदेशात उतरते. त्या आठवणी भूतकाळाच्या कपाटात बंदिस्त असतात. त्यांना आता वर्तमानात थारा नसतो. त्या नको असतात कारण त्या खूप दुखावणाऱ्या असतात. पण अशा आठवणींचा प्रवास अनिवार्य असतो. तो केल्याशिवाय त्या पूर्ण आकळत नाहीत आणि त्यांच्यामधून बाहेर पडता येत नाही.
कामयानी युरोपमधून मुंबईत पहाटे उतरलेली आहे. आणि तशीच ती खारला तिच्या बंगल्याकडे प्रवास करते आणि तिथे पोचते तो काय? बंगला भुईसपाट, त्या जागेवर नवे बांधकाम सुरु झाले आहे. ती उन्मळते, आणि तिथूनचा ७५ पानांपर्यंतचा प्रवास एका वादळी स्त्रीव्यक्तीमत्वाच्या मनोवस्थेचा आहे. ती काय आहे? तिचे प्रश्न काय आहेत? तिचा गोंधळ काय आहे? हे कादंबरी वाचताना लक्षात येईल. त्याबद्दल लिहायची आवश्यकता नाही. पण त्या ओघात आलेल्या व्यक्तीर्रेखा, इरादी, जोसेफ, अनिर्बन, टॅक्सी चालवणारा सरदार, रघु, अश्विन मधोक,(माझ्या मनावर खोलवर रुजलेली व्यक्तिरेखा), बलदेव, सर्व व्यक्तिरेखा लांबी रुंदीचा विचार न करता ठसशीत उभ्या राहतात. अगदी खूप पार्श्वभूमीवर असलेली कामयानीची आई, सुनीता सुद्धा.
मग पुढे कामयानीचे अंजनमाळावर, पर्यावरण टुरिझमच्या संदर्भात कन्सल्टंट म्हणून येणे,,,इथे कादंबरी द्रुतगतीतून विलंबित खयालात प्रवेश करत. आता व्यक्ती व्यक्ती असल्यातरी त्यांचे अस्तित्व निसर्गाशी संबंधित असे उरते. निसर्ग नसेल तर त्यांच्या वैयक्तिक जाणीवांवर कामायनी फारसा प्रकाश टाकत नाही. तिला त्याची गरज वाटत नाही. Their existence is limited to Nature, the Eco Tourism, the environmental travel of Anjanmal. हे इतके स्पष्ट होते की कामयानी शेवटाकडे येईपर्यंत स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक जाणिवांबद्दल सुद्धा फक्त ह्याच संदर्भात बोलू शकते. मग ती मार्गारेटच्या सापडलेल्या नोट्स किंवा डायरी असू देत, राणू, एशा, विहान, आस्ताद, मणी, युरोपमधला एरिक, श्रीरंजन, नाडकर्णी, सर्वजण Nature Manipulation चे एक वेगळे अनोखे चित्र आपल्यासमोर उभे करतात. त्यातले काही पॅसिव्ह आहेत काही अॅक्टिव्ह आहेत. ह्या विलंबित खयालातील जाणिवांची प्रतवारी वेगळी आहे. त्या खूप अपरिचित आहेत आणि म्हणूनच त्या विलंबित खयालात आल्या आहेत असे वाटते. इथे प्रत्येक पानापाशी थबकून ते समजून घ्यावे लागते. हा झगडा मानवी भावानांइतका उद्दीपित नाही...तो खूप सटल आहे. पण तो मांडण्यात शर्मिला खूपच यशस्वी झाली आहे.
इथून पुढे कादंबरी पुन्हा एकदा द्रुतगतीमध्ये येते...आणि इथे मात्र शर्मिलाने आपल्याजवळचे सर्व व्यक्तिरेखांना देऊन टाकले आहे. त्यांची मानसिक आंदोलने, शारीरिक आंदोलने...सगळे इतक्या प्रखरपणे आपल्या समोर येते कि काही वेळ आपण स्तब्ध होतो. विशेषतः कामयानी आणि जोसेफ मधला प्रसंग....जोसेफ आणि सुनीता ह्यांचे संबंध त्याचा कामयानी आणि तिच्या वडिलांवर झालेला परिणाम....अनिर्बन मधील तिची गुंतवणूक, सुंदरबनचा तिचा प्रवास, विहानमधील झालेली तिची गुंतवणूक(मानसिक आणि शारीरिक), शरीराच्या अनिवार लाटा सर्वच...ताकदीने येते...आणि अनिवार्यपणे येते. ती टिटवी एक प्रतिक बनून राहते आणि एका खोल डोहांत कादंबरी त्याक्षणी संपते. कदाचित तिथेच पुढची सुरु होते.
ह्या कादंबरीचा आकृतिबंध काहीसा डायरीचा, काहीसा आत्मनिवेदनाचा, तर काहीसा तृतीयपुरुषी निवेदनाचा असा मिश्र आहे. हे बदलते आकृतिबंध वाचकाला कादंबरीशी बांधून ठेवतात.
मी शर्मिला फडके ह्यांचे अभिनंदन करतो. त्याचबरोबर अलीकडेच ह्याच कादंबरीसाठी त्यांना सोलापूरच्या लोकमंगल सार्वजनिक वाचनालयाचे पारितोषिक मिळाले आहे त्यासाठी पण त्यांचे अभिनंदन करतो.
मी त्यांच्या पुढील कादंबरीच्या प्रतीक्षेत.
...Read more
- HARSHAD SAHASTRABUDDHE
शर्मिला फडकेंची ‘फोर सीझन्स’ ही नवी मराठी कादंबरी नुकतीच वाचून पूर्ण केली. त्यांचे कलाविषयक ब्लॉग आणि लेख मी काही वर्षांपासून फॉलो करतो आहे. मिनिमलीझमबद्दलचं पूर्वी प्रकाशित झालेलं त्यांचं सदरही मी अधूनमधून आवर्जून वाचत असतो. त्यांची भाषा अतिशय सुरेखआहे. विषयानुसार ही भाषा बदलती असते. जेव्हा तुम्ही काही वर्षे एखाद्या लेखकाला फॉलो करत असता, तेव्हा त्याचा लेखक म्हणून साधारण स्वभाव तुम्हाला परिचित असतो. एखाद्या विषयाची मांडणी हा लेखक कशी करेल, त्याने वापरलेली भाषा कशी असेल, लेखाचे टप्पे साधारण कसे असतील इत्यादी आडाखे तुम्ही मनात बांधून ठेवता. त्या लेखक / लेखिकेचं पुढचं आर्टिकल / पुस्तक / नवं काम कधी एकदा येतंय याकडे तुमचं एक वाचक म्हणून लक्ष असतं. यामुळेच, जेव्हा शर्मिला फडकेंची कादंबरी येते आहे असं ऐकलं तेव्हा त्याविषयीची उत्सुकता वाढली. प्रकाशित झाल्यानंतर दुसऱ्या की तिसऱ्याच दिवशी मी ही कादंबरी आणली. केव्हाची वाचायची होती पण राहून जात होतं. एकदाचा मुहूर्त लागला. कामायनी नावाची अतिशय हुशार पण आयुष्यात आलेल्या काही वेगळ्या वळणांमुळे आत्मविश्वास गमावलेली मध्यमवयीन व्यक्ती, फोर सीझन्सची नायिका आहे. कादंबरीची सुरवात होते तेव्हा, सुरवातीची काही पाने वाचून टिपिकल अर्बन टर्ब्युलन्स कैद करू पाहणारी, आजकालच्या तरुण पिढीची अस्वस्थता टिपू पाहणारी ही कादंबरी आहे असा ग्रह होतो. पण साधारण पहिल्या तीस पानांनंतर कादंबरी आपली वेगळी वळणे घेणं सुरु करते. सुरवातीची शंभर एकशेवीस पाने ग्रीपिंग आहेत. या नंतर कादंबरी वेगवेगळे ट्रॅक्स घेते ज्यामुळे ती किंचित भरकटल्यासारखी वाटते. ही कादंबरी वाचकाला खिळवून वगैरे ठेवते, असं मी म्हणणार नाही. ही कादंबरी घटनाप्रधान अजिबातच नाही. अनेक पाने वाचून झाल्यावर याची साधारण कथा काय, असा विचार करता, फारसं ठोस काहीही आठवत नाही. लक्षात राहतील अश्या मेजर घटना यात घडत नाहीत. अतिशय संथ गतीने, आपल्या लयीत चालणारी ही कादंबरी आहे. लेखिका आपल्याला पाहिजे तितका वेळ घेते आणि या निवांत वेगाशी जुळवून घेऊनच वाचकाने ही कादंबरी वाचावी अशी तिची अपेक्षा आहे. सध्या येणाऱ्या नव्या मराठी कथा अथवा कादंबऱ्या वाचल्या, तर त्या फास्ट पेस्ड, असंख्य घटनांनी भरलेल्या, अनेक पात्रे असलेल्या, वैचित्र्यपूर्ण भाषा वापरणाऱ्या, मराठी-हिंदी-इंग्रजीची भेळ असणाऱ्या आहेत असं दिसून येतं.
यातल्या बऱ्याचश्या कादंबऱ्या, एकतर शहरात घडतात नाहीतर गावात. काही कादंबऱ्या समाज, त्यातल्या व्यक्ती किंवा एखाद्या विशिष्ट जातीपुरत्या किंवा एखाद्या विशिष्ट समूहापुरत्याच मर्यादित असल्याचं दिसून येतं. मॉडर्निझमच्या नावाखाली उगीचच काहीतरी क्लटर निर्माण केलेलं दिसून येतं. विचित्र भाषा, विकृत प्रसंग, कृत्रिमरीत्या केलेले अर्धवट शेवट, हे अनेकदा पहायला मिळतं. अनेक प्रसंग, पात्रे व घटनांची भेळ करता करता कथानकाची वीण कधी उसवते हे लेखकाच्या लक्षात येत नाही असं खूपदा वाटतं. लेखकाने मूळ कथानकाला जोडलेली ठिगळे, वाचक स्वच्छ पाहू शकतात. कादंबरी कुठे फसली हे अगदी साफसाफ कळू शकतं. आपण वाचलेली कादंबरी लेखकाने नेमकी कश्याकरता लिहिली असावी हे ही बरेचदा कळत नाही. `सध्या हे असलंच चालतं, तेव्हा हेच खपवा` असा धंदेवाईक विचार त्यातून दिसून येतो. या सर्व गोष्टींना, शर्मिला फडकेंची नवी कादंबरी ‘फोर सीझन्स’ मोठा अपवाद ठरते. बॉटनी तथा वनस्पतीशास्त्र हा लेखिकेचा अभ्यासाचा विषय. त्यांचं शिक्षण याच विषयातलं आहे. या विषयाची नाळ, पर्यावरण या अतिशय महत्वाच्या पण दुर्लक्षित विषयाशी जुळलेली आहे. चित्रसमीक्षा, कला इत्यादी क्षेत्रांमध्ये मोठं कार्य केलेली, विदेशात पर्यटन केलेली, विविध अनुभव घेतलेली उच्चशिक्षित व्यक्ती जेव्हा पहिल्या कादंबरीकरता ‘पर्यावरण’ हा विषय निवडते, तेव्हा विशेष कौतुक वाटतं. पण, त्याचबरोबर, अश्या विषयावरची कादंबरी कशी असेल, याची नेमकी कल्पनाही डोळ्यासमोर नेमकी साकारत नाही. ही कादंबरी तिच्या विषयापासूनच इतर समकालीन कादंबर्यांच्या तुलनेत वेगळी ठरते. या कादंबरीच्या केंद्रस्थानी कामायनी ही चाळीशीच्या उंबरठ्यावर असणारी स्त्री आहे. आयुष्यात पूर्वी घेतलेल्या अनुभवांमुळे ती डिप्रेशनमधे आहे. यातून बाहेर काढण्यासाठी जोसेफ नावाचा तिचा जुना वयस्कर मित्र तिला सर्वतोपरी मदत करतो. त्याने दिलेला मदतीचा हात कामायनी स्वीकारते आणि मुंबईपासून बऱ्याच दूरवर असणारं एक प्रोजेक्ट स्वीकारते. विदेशात काम पाहिलेली कामायनी नव्या उमेदीने `ग्रीन कन्सल्टंट` म्हणून नवं काम स्वीकारते आणि शहरापासून दूर असणाऱ्या, आपल्याच लयीत चालणाऱ्या एका वेगळ्या जगाचा भाग होऊन जाते. विकास आणि पर्यावरण या दोन्ही बाबी एकत्र नांदू शकत नाहीत हे कडवट सत्य आपल्या सर्वांनाच माहिती आहे. या गोष्टी एकत्र नांदाव्यात, याकरता ग्रीन कन्सल्टंट काम पाहतात. पण, सचोटीने काम पाहणं आणि केवळ कागदी परवानग्या आणून प्रोजेक्ट `ओके` करून देणं यात फार मोठं अंतर असतं.
सचोटीने काम पाहणारी व्यक्ती जेव्हा निसर्गावर मनापासून प्रेम करणारी असेल आणि दुसरीकडे तिला जेव्हा कामाचा भाग म्हणून नियमबाह्य गोष्टीदेखील चालवून घ्याव्या लागतात, तेव्हा तिची मोठीच कुचंबणा होते. अशीच कुचंबणा कामायनीची होते आहे. ग्रीन कन्सल्टंटची भूमिका ही तारेवरून चालण्याच्या कसरतीसारखीच. सेन्सिटिव्ह मनाची व्यक्ती अनेक गोष्टी मनाला लावून घेत असते. जर पूर्वायुष्यात खालेल्या फटक्यांची या संवेदनशील मनाला जोड असेल, तर आत्मविश्वास पुरेसा डळमळीत झालेला असतो. एखादं काम आपल्याला जमेल की नाही, याची खात्री वाटत नसते. आयुष्य अर्थहीन वाटू लागतं. अश्या परिस्थितीत अडकलेली कामायनी या नव्या कामाच्या माध्यमातून स्वतःचा शोध घेते. पूर्वायुष्याचा धांडोळा घेते. सध्याचं आयुष्य आणि गत-आयुष्य यांचे धागे जोडू पाहते. काय चूक काय बरोबर, याचा अदमास घेते. `फोर सीझन्स` मधे असलेली फर्स्ट आणि थर्ड पर्सनची सरमिसळ फार विशेष आणि वेगळी आहे. थर्ड पर्सन वेगळ्याच पद्धतीने मांडायचा अनोखा प्रयोग ही कादंबरी करते. यात बरीच पात्रे आहेत पण ती जाणीवपूर्वक योजलेली आहेत. पात्रांची फुकट भाऊगर्दी आणि विनाकारण केऑस होत नाही. यात ठोस घटना म्हटलं तर फारश्या नाहीत. टाईमलाईन्स बर्याचश्या आहेत. त्यांची सरमिसळ आहे. पण हे सगळं पुरेसा वेळ घेऊन संथ गतीने केलं जातं. शहर आणि गाव या भिन्न प्रवृत्तींचा सुरेख मेळ यात साधला जातो. फारश्या घटना आणि पात्रे नसलेली वर्णनात्मक कादंबरी लिहिणं हे अतिशय अवघड काम आहे. वाचकाला ही कादंबरी गुंगवून ठेवत नाही. पण, `पुढे काय` ची उत्कंठाही लागते. त्याचबरोबर हे सांगावंसं वाटतं, की घाईने वाचून एकदाची संपवून टाकायची ही कादंबरी नाही. हाताशी भरपूर वेळ असताना, कादंबरीमधल्या वातावरणाशी एकरूप होत, त्याच्या संथ,शांतपणाचा आस्वाद घेत, त्यातला हळुवारपणा अनुभवत वाचायची ही कादंबरी आहे. पृष्ठसंख्या १०० ते साधारण २४४ हा भाग बऱ्यापैकी ताणलेला वाटतो. तो पन्नासएक पानांनी कमीदेखील चालला असता असं वाटतं. साधारण २४५ व्या पानापासून ते शेवटपर्यंत कादंबरीमधे अनेक घटना घडू लागतात. कामायनीच्या गतआयुष्यातील रहस्ये उलगडू लागतात. पुढे काय? ची उत्तरे हळूहळू मिळू लागतात. पण २४४ व्या पानावर येईपर्यंत मधल्या साधारण सव्वाशे पानांमध्ये वाचकाचा पेशन्स पणाला लागतो. निसर्ग, पर्यावरण याची फारशी आवड नसलेल्यांना किंवा या गोष्टींचा दुरून, तटस्थपणे विचार करणाऱ्या व्यक्तींना हा भाग निश्चितपणे रटाळ वाटू शकेल.
ग्रीन कन्सल्टन्सी, आर्किटेक्चर, एखाद्या डेव्हलपमेंट प्रोजेक्टमधले बारकावे, शासकीय बाबी इत्यादी बराचसा टेक्निकल भागही यात बऱ्याच तपशीलात येतो. या फील्डशी तुम्ही फारसे संबंधित नसाल, त्याविषयी तुम्हाला फारशी आस्था नसेल, यासंबंधीची वृत्ते, बातम्या इत्यादी तुम्ही फारश्या वाचत नसाल तर तुम्हाला हा भाग समजायला किचकट वाटू शकेल. एक नक्की आहे, की ही कादंबरी करमणूक म्हणून वाचण्याकरता नाही. वर्ल्ड सिनेमा किंवा एखादं अमूर्त चित्र अथवा शिल्प पाहण्याकरता जसा भरपूर पेशन्स आवश्यक असतो, तितक्याच दर्जाचा पेशन्स ही कादंबरी वाचताना ठेवावा लागतो. २४४ पानांपर्यंत आल्यावरही अजून काहीही घडलेलं नाही, असं फीलिंगही वाचताना येऊ शकतं. आधीच सांगितल्याप्रमाणे, ही एकदा वाचून संपवायची गोष्ट नाही. ही एक वेगळी अनुभूती देणारी गोष्ट आहे. यातलं सज्ञान व डोळस जंगलवाचन / निसर्गवाचन रम्य आहे. फोर सीझन्सकरता पुरेसा वेळ हाती हवा. यातल्या वातावरणात रमायची तयारी हवी आणि लेखिका नेईल त्या वाटेने, त्या वाटेवरचा संथ-शांतपणा अंगी भिनवत वाचायची तयारीही हवी. कामायनीची मनोभूमिका समजून घेत, त्यात वर्णन केलेलं वातावरण डोळ्यांसमोर आणत, त्याचा फील घेत घेत, त्यातली पात्रे जी गाणी ऐकतात ती स्वतः ऐकत त्यात रमतरमत वाचायची मजा और आहे. ही फक्त वाचण्याची कादंबरी नसून फील घेत, रमत, मुरत करायची एक सुंदर, तरल गोष्ट आहे. मी अनेकदा म्हणतो, की हल्ली पुस्तके ‘चांगली’ असतात’ पण ती ‘संग्राह्य’ असतीलच असं नाही. ‘फोर सीझन्स’ ही कादंबरी चांगली तर आहेच. पण ती संग्राह्य देखील आहे. यातली भाषा, यातलं वातावरण, कथानक उलगडताना यात केलेले प्रयोग, वाक्य / परिच्छेद अर्धवट तोडायची यातली शैली, डायरीसारख्या छोट्या नोंदी, डायरीच्या आत आणि क्षणात डायरीच्या बाहेर, मनाच्या आतला संवाद, प्रत्यक्षात घडणारा संवाद अशी सतत बदलती असणारी रचना हे सगळं उत्तम आहे. कादंबरीचा एकूण आवाका, तिचा परीघ बराच व्यापक आहे. वेगवेगळ्या टाईमलाईन्स एकमेकांत सहजी गुंफून केलेलं कथनही एरवीपेक्षा वेगळं आहे. ‘पर्यावरण’ या, कादंबऱ्यांमधून फारश्या न-आढळणाऱ्या विषयाला वाहिलेली, बुद्धीला खाद्य देणारी, काही महिने उलटले की पुनर्वाचन करावं असं वाटायला लावणारी, अलीकडच्या काळातली ही एक उत्तम कादंबरी आहे.
...Read more
- Shruti Tambe
फोरसीझन्स वाचली. आवडली. पुरवून वाचली. बरेच दिवस ती संपूच नये असं वाटत होतं.
अभयारण्यं पाहिलेली आहेत. पण ग्रासलॅन्डचं नैसर्गिक, वरवर अनाकर्षक वाटणारं सौंदर्य, अभयारण्यामुळे उखडून टाकले गेलेले साधेभोळे लोक, निसर्गासोबत जगणारे आदिवासी-राक्षसी विकासाचया कल्पना आणि अतिशय संवेदनशीलतेनं हे पाहून बदलणारी एमराल्ड!-हे सुरेख बांधलं गेलंय.
सगळ्यात मनाला भिडली उभ्याआडव्या पसरलेल्या माळरानांची वर्णनं-टोचऱ्या, खुरट्या गवतापासून ते मोठ्ठ्या वृक्षांपर्यंतची सगळी दुनिया सांभाळणारं माळरान. भारत हा खरं तर निम्मापाऊण माळरानच आहे. या माळरानाची शान असणारे तरस, कोल्हे, लांडगे, हरणं, ससे-सगळंच मनोहारी. तुम्ही हे सगळंच रेखाटलंयत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुंदरबन, मुंबई, माळरान आणि इटली ही जगं वेगळीही आहेत आणि एकात्मही. हे तुम्ही मनाला भिडेल आणि पोहचवेल असं सांगितलंय.
कादंबरीचे तुकडे वाचतावाचता मुंबईकर विकासवादी मुलगी ते मानवी जीवन, स्थलांतरं, शोषण, अगतिकता, नैसर्गिकता, प्रयत्नवाद हे समजून घेणारी एक प्रगल्भ शहाणिव हळूहळू तिच्यात कशी येते ते तुम्ही उलगडून दाखवलंय.
कामासाठी सध्या पश्चिम महाराष्ट्रातल्या अभयारण्यात फिरत्येय. ओसाड होत चाललेली माळरानं, बेमुर्वत फोफावणारी ऊसशेती, जंगलात माणसं घुसत गेल्यानं धुपणारा निसर्ग, "मोठ्ठ्या" विकासाच्या स्वप्नात आंधळी झालेली मध्यमवर्गीय लक्षावधीची झुंड यात तुमची फोर सीझन्स एक समजुतदार, प्रगल्भ असा सूर लावते.
इतकं सुरेख प्रवाही गद्य बऱ्याच दिवसांनी वाचायला मिळालं ते तुमच्या या कादंबरीमुळे.
त्याबद्दल थॅंक्यू. आणि तुम्ही यापुढेही असंच सकस आणि सरस लिहित राहाल अशी शुभेच्छा.
आपली,
श्रुती तांबे
...Read more
- Read more reviews