- मृगा वर्तक
ते एका पानावर म्हणतात, `डाग लागलेली बाय म्हणजे बिना गोठ्याची गाय` आणि मला आठवत गेलं सगळं. लहानपणीपासूनच हसत मस्करीत झालेलं सगळं. भावनांचे शब्द अर्थ लक्षात येण्यापूर्वीच आपण किती काय काय अनुभवलेलं असतं. त्या भावना आपल्याला असणं चूक बरोबर प्रमाणित की नही हे ठरवण्याईतका विवेक मात्र विकसित झालेला नसतो. आई कित्येकदा हसत म्हणालीय, तुला हवे ते नखरे तू तुझ्या घरी गेल्यावर कर.. आणि मग मला भीती वाटायची, मला घर मिळालंच नाही तर? मग स्त्रीला घर नसतं का? ती कोणच्याही घरात उपरीच असते का? मोडून का काढत नाहीत या बायका ही जहरी विवाहसंस्था? आज तर ती आर्थिक दृष्ट्या सबल आहे, बऱ्याच घरात नवरा कमावता असूनही सगळं घर स्त्रियाच चालवतात, मग स्वतःच असं एक घर असण्यासाठी तिला पुरुष व्हावं लागेल का? त्यासाठी तिला डाग असण्याचीही आवश्यकता नाही. असो. मुद्दा तो नाही. तर हे पुस्तक. विश्वास पाटील म्हणजे एक उत्कृष्ट चित्रकार आहेत. माणसांचे स्वभावविशेष ते असे रंगवतात की त्यांची सगळी पात्र एकाच संवादात आणली तरी एकमेकांत ती अगदी बेमालूम मिसळून जातील. त्यांच्या लेखणीचा प्रवाह पकड घेणारा असल्याने सहज जाणवत नाही, पण एक सोशो-पॉलिटिकल रेषा संपूर्ण कथानक जोडून असते. व्यासपीठावरची त्यांची भूमिका मला काहीशी खटकट असली तरी लिहिताना मात्र ते रमतात, सगळी आवरणं बाजूला सारून स्वतःच्याच भूमिकेशी विद्रोह करत व्यक्त होत असतात. कादंबरीकार म्हणून खांडेकरांच्याही आधी मी त्यांचं नाव घेईन. तमाशा फड, वगनाट्य, लोककला असा विषय असला तरीही स्त्रिपुरुष संबंधातलं अर्थकारण आणि त्यामागचं राजकारण हे तिचं मर्म आहे. स्त्री सत्तेची लालची असते आणि तिला सत्ता पुरुषांवरच हवी असते. तिचा संघर्ष केवळ स्त्रीशी असतो. असे मला वाटते. तिला तिचं अवकाश शोधायला आवडतं. आणि हो, ती तिच्या सुखांचा आदर करते. स्त्रिपुरुषांनी घरात त्यांच्या आर्थिक भावनिक आणि इतरही गरजा आणि इच्छा सर्वप्रथम स्वीकारल्या आणि त्यानंतर जाहीर व्यक्त केल्या तर त्यांच्यात केव्हाच वाद होणार नाहीत. होतील का? झालेच तर कशावरून होतील? पूर्वी माझं असं व्हायचं, का हवा असतो पुरुष स्वयंसिद्ध स्त्रीला? पण नाही, हवा असतो. तेच विवाहसंस्थेचंही. ही भल्या भल्यांना आदर्श वाटणारी विवाहसंथा आत्मभान जागृत झालेल्या तेवढ्या स्त्रियांनाच का झोंबते? पण तरीही, ही व्यवस्थाही तिला हवी असते. आपली आयुष्य दसऱ्यासारखी असतात. एकमेकांचं सोनं रूपं लुटायचं असतं. एकमेकांना पार लुबाडायचं असतं. दोघेही समेवर येईपर्यंत. आणि पुढेही.. टीप. या कादंबरीत असे असंख्य विषय लपलेले आहेत, समलैंगिक संबंधापासून कलाकाराच्या आपल्या कलेकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाबद्दल अनेक. मी केवळ एकच मांडला आहे.
...Read more
- Gitanjali Shitole
तमाशा कलावंतांची कला आणि त्यांचं जीवन यांच्या एकमेकांत गुंफलेल्या धाग्यांचं वास्तव चित्रण...
- प्रा. डॉ. प्रकाश खांडगे
तमाशाच्या टिपूर चांदण्यात न्हालेले लेखक...
भारतीय प्रशासकीय सेवेतील ज्येष्ठ अधिकारी, प्रख्यात कादंबरीकार विश्वास पाटील यांची ‘गाभुळलेल्या चंद्रबनात’ ही कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊसने अलीकडे प्रकाशित केली आहे. महानायक, पांगिरा, संभाजी, झाडाझडती, पानित, नागकेशर, चंद्रमुखी अशा एकापेक्षा एक सरस कादंबऱ्यांनी साहित्य क्षेत्रात क्षेत्रीय संशोधन आणि अभ्यासपूर्ण लेखनासह आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या विश्वास पाटील यांची साहित्य क्षेत्रातील पाटीलकी खरोखरच उल्लेखनीय आहे. मातीशी आणि मातीतल्या राष्ट्रपुरुष तसेच सामान्य माणसांशी जुळलेली नाळ हा विश्वास पाटील यांच्या साहित्य निर्मितीचा मूलाधार आहे.
‘गाभूळलेल्या चंद्रबनात’ या तमाशा सृष्टीतल्या लौकिक, अलौकिक गोष्टींचा वेध घेणाऱ्या, तमाशा सृष्टीतल्या लखलखत्या दुनियेसोबत परिस्थितीने गांजलेल्या, होरपळलेल्या जिंदगीचा तळ शोधण्याचा यशस्वी प्रयत्न विश्वास पाटील यांनी ‘गाभुळलेल्या चंद्रबनात’च्या निमित्ताने केला आहे. तमाशा क्षेत्राशी संबंधित आधीच चंद्रमुखी आणि आता ‘गाभुळलेल्या चंद्रबनात’च्या निमित्ताने या कलंदर लेखकाने अनुभवलेला अन् नंतर शब्दबद्ध केलेला तमाशा प्रत्यक्ष भेटीत समजून घेता आला. विश्वास पाटील गप्पांचा फड चांगलाच रंगवितात, नाही तर फड आणि महाराष्ट्र राज्य यांचे नाते वर्षानुवर्षे दृढ आहे. राजकारणाचा फड, तमाशाचा फड, कुस्तीचा फड, आणि उसाचा फड हे सर्व फड अगदी बालपणापासूनच विश्वास पाटील यांनी अनुभवले आहेत. त्यांच्याच भाषेत बोलायचं तर या फडाचा नादखुळा घेत ते मोठे झाले. व्यंकटेश माडगूळकर यांच्या ग्रामीण कथा, कादंबऱ्यांना जसा माणदेशी मातीचा गंध आहे तसाच विश्वास पाटील यांच्या तमाशा विषयक कादंबऱ्यांना अस्सल वारणा, कृष्णेच्या काठावरील मातीचा गंध आहे. गप्पांचा फड रंगविताना ‘गाभूळलेल्या चंद्रबनात’मधील वास्तव आणि कल्पनेतील पात्रांच्या आठवणी जाग्या करताना विश्वास पाटील म्हणाले, ‘सांगली आणि कोल्हापूरच्या सीमेवर उजवीकडे बत्तीस शिराळा आणि डावीकडे शाहूवाडी यांच्याजवळ नेरले हे माझं गाव. वारणेच्या काठी वसलेलं गाव. गावाजवळची कोकरूड, चरण ही बाजाराची गावं. इथे उरुसाला नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये ढोलकी तमाशाचे फड यायचे. इयत्ता तिसरीत असताना पहिल्यांदा तमाशा पाहिला. माझे चुलते आणि त्यांचे मित्र तमाशाचे कॉन्ट्रॅक्टर होते. त्यामुळे त्यांच्याकडे तमासगीरांची उठबस असायची. वडील मला तमाशाला घेऊन जायचे. पहिल्यांदा तमाशा पाहिला तो विठाबाई नारायणगावकर यांचा. त्यावेळी त्यांची मुलगी मंगल १८ वर्षांची होती आणि संध्या ११ वर्षांची होती. मंगल गाऊन नाचायची तर संध्या थाळीवर नाचून समई नृत्य करायची. ‘तू ग एक नंदाचे नारी’ ही तक्रारीची गौळण केशरबाई टिपलेल्या आवाजात गायच्या. वारणेच्या पात्रात आभाळातलं चांदणं उतरायचं अन् गौळणी पाण्याला निघायच्या. अंघोळी पांघोळी करायच्या. मथुरेच्या बाजारला निघायच्या. आमच्या तना-मनात गोकूळ उभं राहायचं. कारण काशिनाथ सोंगाड्या गौळणींबरोबर मावशीचं काम करायचा. तमाशातल्या गण-गौळणी आणि त्यांची भरजरी वाङ्मयीन महत्ता म्हणजे मोहरला आलेल्या आंब्याचा सुगंध राव.’
विश्वास पाटील तमाशातल्या गौळणींचा उल्लेख करत होते आणि ‘त्रेधा राधा’ कवितेची आठवण सहज डोकावून गेली. ‘सरींवर सरी आल्या ग सचैल गोपी न्हाल्या गं.’ कविवर्य बोरकरांच्या शब्दातल्या गोपी आई गोकुळ आठवलं.
पारंपरिक गौळणींना आपल्या अक्षरांचं कोंदण देणारे ज्ञात-अज्ञात तमासगीर, रचनाकरही आठवले.
विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ आणि ‘गाभूळलेल्या चंद्रबनात’ या दोन्ही कादंबऱ्यात प्रतिमांचा पाऊस पडतो. या पावसात या कादंबऱ्यांमधील नायिका चिंबचिंब होतात. विश्वास पाटील तमाशा सृष्टीच्या कविताच्या आणि वास्तवाच्या दोन्ही झुल्यांवर वाचक आणि कादंबरीतील प्रत्यक्ष पात्रांनाही झुलवतात. प्रतिमांच्या भरजरी दागिन्यांनी पात्रांना मढवितात आणि आपल्याला तमाशाच्या काजव्यांच्या जिंदगीची अनोखी सफर घडवितात.
दत्ता महाडिक पुणेकरसह चंद्रकांत ढवळीपुरकर यांची फार मोठी मोहिनी महाराष्ट्रातील तमाशा रसिकांवर होती. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, पाच तोफांची सलामी, रायगडची राणी या तमाशा मंडळाची वगनाट्ये खूप गाजली होती. चंद्रकांत ढवळपुरीकर बहुधा सर्वच वगनाट्यात खलनायक साकार करत. नेरलेचं ज्योतिर्लिंगाचे ठिकाण जागृत देवस्थान होतं. आमच्या ज्योतिर्लिंगाने पवळाचा तमाशा पाहिला आहे. त्यामुळे इतर तमासगीर आमच्या देवस्थानच्या यात्रेत आदबीने वागत. काळूबाळू, पांडुरंग मुळे मांजरवाडीकर, कौसल्या पुणेकर, आक्काताई कऱ्हाडकर, माधवराव गायकवाड, विठाबाई अशा अनेक तमाशा कलावंतांची तेजस्वी कलाकारांची कारकिर्द मी पाहिली आहे. झाडाखालच्या तमाशांचा पारंपरिक बाज हाळीच्या, तक्रारींच्या, विनवणीच्या टिपेतल्या गौळणी मी ऐकल्या आहेत. या तमाशांचे कटाव, रात्रभरचा तमाशा, सकाळची हजेरी, गावकऱ्यांनी तमासगीरांना दिलेला जत्रेचा शिदा सुपारी हे सगळं आज आठवताना गेले ते तमाशाचे सोनेरी दिवस असंच म्हणावं लागतंय. विश्वास पाटील तमाशाच्या स्मृतींमध्ये रेंगाळले होते. ‘चंद्रमुखी’, ‘गाभूळलेल्या चंद्रबनात’ या कादंबऱ्यांसोबत ‘बंदा रुपया’ या तमाशावर आधारित चार-पाच लेख विश्वास पाटील यांनी लिहिले आहेत.
‘गाभूळलेल्या चंद्रबनात’ या कादंबरीतील अनेक पात्रे ही वास्तव पात्रे असून आपल्या प्रतिभेच्या स्पर्शाने विश्वास पाटील यांनी या पात्रांमध्ये प्राण फुंकले आहेत. तमाशातील गणगौळण, लावण्या, पोवाडे, रंगबाजी, फार्स, वगनाट्ये याचे दर्शन या कादंबरीत विश्वास पाटील घडवितात. तमाशाच्या बोर्डावरचे कलात्मक जग आणि राहूटीतले वास्तवाचे चटके देणारे जग असे दुहेरी दर्शन ‘गाभूळलेल्या चंद्रबनात’ या कादंबरीत घडते. मोहना वटाव, असा झुंजला महाराष्ट्र, संत तुकाराम या वगनाट्यांची झलकही कादंबरीच्या लेखन ओघात विश्वास पाटील देऊन जातात. सातवीतल्या बराव बानगीकर, त्याच्या कलेवर फिदा झालेली सतरा अठरा वर्षांची त्यांच्या प्रेमसागरात मासोळीसारखी डुंबणारी रंगकल्ली आणि खलनायकी जीवन जगत बाकेराव आणि रंगकलीच्या प्रेमात बिब्बा घालणारा गगनआप्पा यांची ही कथा!
बाकेराव तमाशाच्या उभारणीसाठी वाट्टेल ती किंमत मोजणारा हजरजबाबी सोंगाड्या, गायक हा खरा तमाशाचा रंगनायक, बाकेराव संत तुकाराम वगनाट्यात तुकारामाची भूमिका करतात. गरूडवाहनात आरूड होतात. वैकुंठाला जातात. तुकारामांचे वैकुंठागमन आणि बाकेरावांचे गरूडवाहनातच देह सोडणे हे मनाला चटका लावून जाते.
ढोलकी फडाचा तमाशा ही काही अभिजनांची, समाजाची मनोरंजन परंपरा नव्हती आणि नाही. अशी लोकधारणा होती आणि आहे. ग्रामजनांची गावंढळ लोकांची उथळ करमणूक अशा दुगाण्या अगदी पठ्ठेबापूरावांच्या काळापासून आजपर्यंत तमाशावर झाडण्यात येतात. या भ्रामक कल्पनेला छेद देण्याचे काम विश्वास पाटील यांनी ‘गाभूळलेल्या चंद्रबनात’ या कादंबरीच्या रूपाने केले आहे. सुष्ट, दृष्ट प्रवृत्ती, श्रेयस, प्रेयस, प्रेम आणि विद्वेष या प्रवृत्ती सर्व समाजात असतात. तमाशासारखी कलासृष्टी त्याला अपवाद नाही हे विश्वास पाटील यांनी या कादंबरीतून अधोरेखित केले आहे. ‘गाभूळलेल्या चंद्रबनात’ कादंबरीची निवेदन शैली ओघवती आहे. प्रसंगांची लवंगी सरांची माळ आहे. प्रतिमांचा पाऊस आहे. भावभावनांचे हिंदोळे आहेत. तमाशाच्या वास्तवाचे दाहक चटके आणि कलेच्या चंदेरी जगताची मायावी महिरप या कादंबरीत आहे. एकूणच काय विश्वास पाटील यांच्या लेखणीतलं तमाशा जगतातलं हे टिपूर चांदणं आपल्याला शितलता देतं. ...Read more
- LALIT - MARCH 2021
तमाशा म्हटलं की सामान्यत: कपाळावर आठी चढते. याचं मुख्य कारण असं, की तमाशा म्हणजे काहीतरी चावटपणा असाच विचार अनेकांच्या मनात येतो. पण तमाशा ही एक लोककला आहे. तिची स्वत:ची अशी काही वैशिष्ट्यं आहेत. वर्षांनुवर्षं या कलेनं हजारो लोकांना मंत्रमुग्ध केलं. िवसरात्र अविरत कष्ट करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं. त्यांचं मनोरंजन केलं. आपलं दु:ख, वेदना, त्रास, परिस्थितीचा जाच, संसाराचा काच, सततच्या कष्टामुळं येणारा थकवा दूर केला. त्यांना चार घटका तरी एका वेगळ्या दुनियेची सफर घडवून आनंद दिला. नृत्य, गायन, वादन या कलांची जोपासना केली. ती वृद्धिंगत केली. प्रेम आणि प्रणय याच्याबरोबरीनं वीररसयुक्त आणि भक्तिरसमय कथन सादर करून प्रेक्षकांना विठ्ठलाच्या अंगणात नेलं. तमाशातला विनोद हा तर त्याचं एक शक्तिस्थानच आहे. क्वचित चावटपणाकडं किंवा अश्लीलतेकडं झुकणारा विनोद तमाशात असला, तरी कलाकाराचा हजरजबाबीपणा, प्रसंगानुरूप येणारं वर्तमानकाळावरील भेदक, बोचरं भाष्य हे प्रेक्षकांची चांगलीच करमणूक करतं.
अशा या तमाशाचं त्याचं म्हणून एक जग असतं. या जगात एकाचवेळी अनेकजण काम करत असतात. त्यामध्ये कलाकार असतातच, पण २५-३० बिगारीही असतात. चहा-स्वयंपाक करणारे, सांगकामे असे अनेक लोक असतात. थोडक्यात, एक तमाशा म्हटला, की त्यावर अनेकांचा चरितार्थ अवलंबून असतो. तमाशाच्या प्रेमासाठी आणि पोटासाठी एकत्र येणाऱ्या या कलाकारांमध्ये सामान्यत: कोणत्याही माणसामध्ये असणारे गुण-दोष असतात. हेवे-दावे असतात. भावना आणि विकार असतात. असूया आणि द्वेष असतो. प्रेम आणि सुप्त वैर असतं. महत्त्वाकांक्षा आणि लबाडी असते. अंत:करणानं उदार असणारी माणसे असतात, तशीच कमालीची स्वार्थलिप्त आणि अतिशय हिशेबीही असतात. या साऱ्याच वृत्ती-प्रवृत्तींसह तमाशाचा फड आपली वाटचाल करत असतो. साहजिकच तमाशाच्या जगातही अनेक नाट्यं घडत असतात. माणसाचं माणूसपण अधोरेखित करणाऱ्या या घडामोडींची कल्पना रंगमंचावर सादर होणारी कला भान हरपून पाहणाऱ्या सामान्य प्रेक्षकाला असतेच असं नाही.
सुप्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांनी आपल्या ‘गाभुळलेल्या चंद्रबनात’ या कादंबरीत तमाशाच्या जगात फुललेली एक उत्कट प्रेमकहाणी सांगितली आहे. ती सांगताना त्यांनी तमाशाचं जग त्याच्या साऱ्या रंग-रूपासकट, त्यातल्या ताण-तणावांसह, मानवी नात्यांतल्या अतर्क्याचा अन्वयार्थ लावत उभं केलं आहे. आयुष्याची उतरण सुरू होण्याच्या सीमेवर पोहोचलेला बाकेराव आणि रूपसंपन्न नवयौवना रंगकली यांची ही जगावेगळी उत्कट प्रेमकहाणी पाटील यांनी उमाळ्यानं सांगितली आहे. ती मांडताना त्यांनी त्यातलं सारं नाट्य सुरेखपणे उभं केलं आहे. बाकेराव हा मोठा नावजलेला तमाशा कलाकार. आपल्या प्रेक्षकांवर आपल्या कलेनं गारूड करणारा. त्यांना देहभान विसरायला लावणारा. विनोद करणं हा त्याचा हातखंडा आहेच, पण तेच त्याचं वैशिष्ट्य नाही. तमाशाच्या रंगमंचावर विठ्ठलाच्या भावभक्तीत आकंठ बुडालेले, मंबाजी-तुंबाजी यांना धीरोदात्तपणं तोंड देणारे आणि सदेह वैकुठाला जाणारे तुकाराम महाराज मूर्तिमंत साकारणारे म्हणूनही त्यांचं नाव चारी दिशांना झालं आहे. तुकारामांचा प्रयोग असला, की प्रेक्षकांच्या झुंडीच्या झुंडी येत असत. बाकेरावही आपल्या मायबाप प्रेक्षकांना कधी निराश करत नसे. तमाशाच्या व्यावहारिक गोष्टींकडं मात्र त्यानं कधीही लक्ष दिलं नाही. ती गोष्ट त्यानं आपला मित्र आणि भागीदार गगनआप्पा याच्यावर पूर्णपणे सोडून दिली होती.
बाकेराव-गगनआप्पा यांच्याप्रमाणंच अर्जुनराव पवार याचा वगही मोठा कीर्ती मिळवून होता. तमाशाच्या कलेपायी मामलेदार कचेरीत चांगल्या हुद्द्यावर असलेल्या अर्जुनानं आपलं मोठं घराणं विसरून, घराकडंही पाठ फिरवून तमाशाच्या प्रांतात उडी घेतली आणि फार मोठं नाव मिळवलं. सौंदर्याची खाण असणारी रंगकली ही त्याचीच मुलगी. तिनं बाकेरावांची कीर्ती ऐकली आहे. आणि वयातलं अंतर विसरून ती त्याच्या प्रेमात बुडाली आहे. तिच्या प्रेमानं आणि बाकेरावशीच लग्न करण्याच्या तिच्या निश्चयानं अर्जुन पवार कासावीस होतो. पण रंगकली आपल्या वडिलांचा फड सोडून बाकेरावकडं येते. खरंतर स्त्रियांच्या बाबतीत बाकेराव हा काही सरळ माणूस नाही. हे सारं समजूनही रंगकलीचं बाकेरावबद्दलचं प्रेम कमी होत नाही. बाकेरावची पत्नी गंगाबाईसुद्धा आपल्या नवऱ्याचं मन ओळखते आणि मोठ्या मनानं रंकलीचा स्वीकार करते.
रंगकलीच्या आगमनानंतर बाकेराव-गगनआप्पाच्या फडाला अधिकच बरकत आली. प्रेक्षकांच्या गर्दीला सीमा राहिली नाही. तुकारामांच्या जीवनावरील प्रयोगात बाकेरावनं साकारलेले तुकाराम महाराज आणि त्यांना भुलविणारी मोहिनी रंगकली यांचा प्रवेश कमालीचा रंगू लागला. रूपवती रंगकली आपली भूमिका फार सुरेखपणे करायची आणि बाकेराव तर तुकाराम उत्कटपणे उभा करीत असे. इतका की त्याच्या अंगात साक्षात तुकाराम महाराजच संचार करत आहेत की काय असं भासावं. तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला जातात, या प्रसंगासाठी फडात तंत्रज्ञानाची मदत घेण्यात ये असे आणि तुकाराम महाराज विमानातून वैकुंठाला जात असत. त्या प्रसंगानं तर प्रेक्षक कमालीचे हळवे आणि भावूक होत असत.
मात्र मिळत असलेल्या यशावर समाधान मानणं हा बाकेरावचा स्वभाव नव्हता. त्यामुळंच आपल्या फडामध्ये नवीन काय करता येईल, याचा सतत शोध घेऊन नवनवे बदल करणारा होता. प्रसंगी धाडसी वाटावा, असाही निर्णय तो घेत असे. ‘असा झुंजला महाराष्ट्र माझा’ या लोकनाट्यातल्या औरंगजेबाच्या भूमिकेसाठी आपल्या फडातल्या इस्माइल या ड्रायव्हरची त्यानं केलेली निवड अशीच धाडसी होती. त्यावरून फडातल्या लोकांत कुजबूजही झाली. पण बाकेराव आपल्या निर्णयावर ठाम राहिला आणि इस्माइलनंही बाकेरावचा विश्वास सार्थ ठरवला. संभाजीच्या भूमिकेसाठी त्यांनी युवराज पाटणे या तरुण गुणी कलाकाराची निवड केली. त्याला आपल्या फडात त्यांनी सन्मानानं आणलं. त्याची संभाजी राजांची, रंगकलीची महाराणी येसूबाईची आणि खुशबू यांच्या भूमिका गाजू लागल्या. प्रेक्षकांच्या उड्या पडू लागल्या. पण तरीही बाकेरावचं समाधान नव्हतं. त्यानं एका प्रसंगात ‘काचेचा चंद्र’ या सुप्रसिद्ध नाटकातल्या ‘खांदेबाज’ जाहिरातीचा प्रयोग करण्याचं ठरवलं. त्यासाठी युवराज आणि रंगकली यांची मानसिक तयारी करून घेतली. मग त्याप्रमाणं प्रयोगात होऊ लागले. पाटील लिहितात, ‘शंभूराजे बनलेला युवराज खुशबूजानम पेश करणाऱ्या रंगकलीला कचकन उचलून खांद्यावर घ्यायचा. त्या बहादुरीला प्रेक्षकांकडूनही चांगल्या टाळ्या पडायच्या.’ पण याच बहादुरीतून पुढं विपरीत घडतं. निमित्त काहीही झालं असलं, तरी युवराज आणि रंगकली यांच्यामध्ये होऊ नये, ते घडून जातं. त्यातूनच बाकेरावच्या मनात रंगकलीबद्दल एक अढी बसते. त्याचं मन तिच्याविषयी कडूजहर होतं. फडातही रंगकलीला बोचरे बोल ऐकावे लागतात. गर्भार असलेली रंगकली फड सोडून जाते.
पुढे अनेक नाट्यमय घटना घडतात. हिशेबी आणि स्वार्थी गगनआप्पा बाकेरावला फसवतो. बाकेराव स्वतंत्र फड काढतो. गगनआप्पाच्या फडाची परिस्थिती वाईट होते. त्यातच त्यानं ज्याच्यावर विश्वासानं आर्थिक व्यवहार सोपवलेले असतात, तो चारूस्वामी त्याला फसवतो. बाकेरावचा फड जोरात चालत असतो, पण रात्रीच्या प्रवासाच्या वेळी त्याच्या बसवर दरोडेखोर हल्ला करतात. बाकेराव जखमी होतात. मुंबईतच नाही, तर देशाच्या सीमा ओलांडून आपली कला सादर करणारी रंगकली बाकेरावकडं परत येते. विस्कटलेलं गाडं रूळावर आणण्याचा प्रयत्न होतो. पण तब्येतीची साथ नसताना तुकाराम सादर करायचाच, या हट्टानं रंगमंचावर पाऊल टाकणारा बाकेराव नाट्याच्या कळसाध्यायाच्या अखेरीस खरोखरच हे जग सोडून जातो.
हे सारं नाट्य विश्वास पाटील यांनी त्यातल्या बारकाव्यांसह उभं केलं आहे. यातल्या व्यक्तिरेखा त्यांनी अशा रंगवल्या आहेत, की त्या वाचकाच्या नजरेसमोर उभ्या राहतात. त्याच्या मन:पटलावर त्या व्यक्ती आणि ते प्रसंग दिसायला लागतात. गगनआप्पाची विकृती आणि त्याची दहशत, बाकेराचं कलासक्त मन, रंगकलीचं सौंदर्य आणि युवराजचं देखणेपण हे सारंच त्यांनी फार सुरेखपणे मांडलं आहे. विश्वास पाटील यांच्या मनात तमाशा या कलेबद्दल आणि त्यातल्या गुणी कलाकारांबद्दल प्रेम आहे. आदर आहे. तमाशा या लोककलेबद्दल आस्था आहे. कादंबरीच्या सुरुवातीला ‘चांदणसड’ या नावानं येणारं त्यांचं मनोगत याबाबत बरंच काही सांगून जातं. ही कादंबरी लिहिताना त्यांनी बारीकसारीक तपशील गोळा केल्याचं आणि त्यांचा सुरेखपणे वापर केल्याचं लक्षात येतं. वाचकाला आपलंसं करण्याची हातोटी तर त्यांच्याकडं आहेच आणि ती या कादंबरीतही दिसून येते. तमाशाचं जग कसं असतं, तिथले कलाकार कसं जगत असतात, आपल्या कलेसाठी ते किती आणि कसे कष्ट घेत असतात, त्यांच्या महत्त्वाकांक्षा काय असतात, त्यांचं कौटुंबिक जीवन आदी गोष्टींची माहिती सामान्य माणसाला नसते. या कादंबरीनं या लोककलेच्या जगाची एक खिडकी वाचकासाठी सताड उघडी करून टाकली आहे. खटकणारी एक गोष्ट म्हणजे कादंबरीत अनेक ठिकाणी भाषेची सरमिसळ झाली आहे. शहरी बोली बोलणारा पुढं एकदम ग्रामीण भाषा वापरायला लागतो. मात्र कादंबरी वाचकाला एका विश्वात नेणारी आणि वाचनानंद देणारी आहे, हे नक्की. ...Read more
- Read more reviews