DAINIK SAKAL 29-10-2006गांधर्वी प्रकृती आणि मानवी मनातील संघर्ष...
‘गांधर्वी’ ही प्रसिद्ध बंगाली लेखिका बाणी बसू यांची कादंबरी आहे. डॉ. मृणालिनी गडकरी यांनी त्याचा मराठीत अनुवाद केलेला आहे. डॉ. मृणालिनी गडकरी हे अनुवादित साहित्य क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण असे नाव आहे.
‘ांधर्वी’ ही अभिजात संगीताची पार्श्वभूमी लाभलेली कादंबरी आहे. सुस्वर कंठ लाभलेल्या अपालाची ही कहाणी आहे. गाणं हाच तिचा श्वास होता. तिच्या जगण्याचा ध्यास होता. तिच्या रक्तातूनच गाण्याचा प्रवाह अविरतपणे वाहत होता. अपाला सोशिक, समजूतदार तितकीच जिद्दी होती. वडिलांच्या निधनामुळे पोरकी झालेली, काकांच्या दबावाखाली राहणारी, आईची अगतिकता समजून घेणारी, रामेश्वर ठाकूरांकडे मन लावून गाणे शिकणारी, सोहम दिपाली, मितूल यांच्याशी जिवाभावाची मैत्री करणारी, सासरच्या सर्वच लोकांना त्यांच्या स्वभावात दोषासह स्वीकारणारी, मुलांवर अपार प्रेम करणारी अशी ही अपाला सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व लाभलेली होती. तिच्यामध्ये आत्मविश्वास, जिद्द, महत्त्वाकांक्षा होती; पण तिच्यातील अहंकार कधीच टोकाला पोहोचलेला नव्हता.
इतरांसाठी आपली ओंजळ रिती करणाऱ्या अपालाला काय मिळाले होते? संसार आणि संगीत या दोन्ही डगरींवर तोल सांभाळताना या कलावंत स्त्रीची घुसमट झाली होती. सासरच्या गाण्याबाबतच्या अज्ञानाला आणि उदासीनतेला मागे टाकून ती गात होती. म्युझिक कॉन्फरन्सला जात होती. चित्रपटांतून गात होती. घरातल्यांचे रोष पत्करून ती हे करत होती. तिच्या मनातली दु:खं तिच्या सुरातून बाहेर येत होती. सुरांच्या चढ-उतारातून, तालांच्या माध्यमातून तिची मनोव्यथा प्रगट होत होती. तिची सुखदु:खं, आनंद, संताप, अधीरता, अगतिकता या सगळ्या भावना गाण्यातून व्यक्त होत होत्या. एकीकडे गाणं होतं. ज्यात ती हरवली होती आणि दुसरीकडे भोवतालच्या माणसांचे पाश होते. ज्यांच्यात गुंतणं तिला क्लेषकारक होत होते.
तिच्या आयुष्यात तिची गांधर्वी प्रकृती आणि मानवी मन यांच्यात इतका मर्मभेदक संघर्ष सुरू होतो, की त्याचा शेवट तिचा आवाज संपण्यात झाला. ती मूक झाली; पण तिच्यातला कलावंत मूक राहिला नाही. तो चित्रातून मुखर झाला. आवाज गेल्यानंतर आयुष्याच्या अखेरीस तिने असंख्य चित्रे काढली. तिच्या हृदयातले गाणे तिने चित्रांच्या साह्याने कागदावर उतरवले. एका कलावंताची त्याच्या कलेशी असणाऱ्या बांधिलकीचे दर्शन या कादंबरीतून प्रत्ययाला येते.
कलावंताचे मन आणि त्याच्या आजूबाजूचे वास्तव याचे वस्तुनिष्ठ चित्रण लेखिकेने या कादंबरीत केलेले आहे. त्यांच्या व्यक्तीचित्रणात, वातावरणनिर्मितीत, विषयाच्या मांडणीत सखोलता, सूक्ष्मता आणि तरलता दिसून येते. ही उत्तम बंगाली कलाकृती अतिशय कौशल्याने मराठीत आणण्याचे श्रेय डॉ. मृणालिनी गडकरी यांच्याकडे जाते.
-डॉ. जोत्स्ना आफळे ...Read more
MAHARASHTRA TIMES 25-02-2007तरल सौंदर्यानुभव...
‘कंठात वैखरी, हृदयात मध्यमा, स्वाधिष्ठानात पश्यंती. त्यापुढे गभीरात गेल्यावर ती वाणी माणसाला ऐकू येत नाही. ती मग होते परा. सूरलोकांच्या मार्गावरून चालता चालता एखादा अन्यमनस्क देवगंधर्व मत्र्यलोकात येऊन पडला तर त्याच्या दु:खाला पाावार राहत नाही. त्याला जेवढं देता येईल तेवढं तो देऊन जातो. त्याला आणखीही द्यायची इच्छा असते. पण आम्हा माणसांना - माणसांनाच कशाला - माणसातल्या गंधर्वांनाही तरी कुठे कळतं!
ईश्वरी वस्तू धरून ठेवण्याचं सामर्थ्य आमच्यात कुठलं! हे सारं आहे गांधर्वीचं!
एक अशी कादंबरी, जी संगीताच्या प्रदेशात घेऊन जाते. तेथील रागदारीने मनावर अजब मोहिनीचे जाळं पसरते. त्या अनवरत सुरात, एक प्रकारच्या बेहोषीत धुंद व्हायला होतं आणि हेच सूर या वास्तवाशी फारकत घेऊन दिव्य अद्भूतांचा साक्षात्कार घडवितात. ही कथा आहे अपालाची. कोलकत्याची अपाला एक सच्ची कलावंत. भिडस्त, पापभीरू, शांत, संयत, दिसायला फारच साधी, परंतु तिच्या बाह्य वर्णनाश आपण थबकतच नाही. देवदत्त किन्नर कंठ लाभलेल्या अपालात आपण इतकं गुंतून जातो की तिच्या साऱ्या घुसमटीला हे समाजवास्तवच जबाबदार आहे. हेच विसरतो.
शापित गंधर्वकन्येसारखी अपालाची कहाणी. अलौकिक सूरांचा गळा लाभूनही लग्नानंतर तिचे गाणे येणाऱ्या-जाणाऱ्यांना रिझवण्यासाठी वा क्लास काढून. थोड्याशा रियाझावर जगण्यासाठी बंदिस्त होतं... अपालाची कुचंबणा सोहम व मितूलच्या प्रसिद्धी प्रवासाने ठसठशीत होते... विशेष क्षमता नसलेली मितूल ‘मितश्री ठाकूर’ म्हणून लोकांच्या गळ्यातील ताईत बनते. मानसिक असंतुलनाच्या धक्क्यातून केवळ अपालामुळे सुरांच्या सान्निध्यात परतलेला सोहम देश परदेशात मैफिली गाजवतो. प्रेम वा लग्नासाठी व्याकुळणारी दिपाली अपालामुळेच परदेशात लग्न करून राहू शकते. अपालाच्या पैशांमुळेच मध्यमवर्गीय दत्तगुप्तांचं घर सुस्थितीत येतं... वास्तवात ती एक परिस वाटू लागते. तिच्या आवाजाची किंमत कुणी पैशात मोजतं.. मात्र अपाला! तिच्या पदरात नियतीने दु:खाचाच प्याला का द्यावा? गाणं हाच तिचा श्वास, तोच तिचा सहवास. त्याच्याशी तडजोड नको, म्हणत लखनौला नाजनीन बेगमकडे जाण्याची संधी मिळताक्षणी आनंदणारी... आणि नाजनीन बेगमचा उल्लेख ‘तवायफ’ असा झाल्याक्षणी हादरणारी...
अपालाच्या गुरूंची मुलगी मितूल, जिला अपालातील या अद्भूत आवाजाचे मार्केटिंग केले की काय धमाल उडू शकेल. याचं प्रोफेशनल भान आहे. ती अपालाला निर्व्याज हेतूतून पैसा मिळवून देते. प्रसिद्धीची कवाडं खुली करून देते. गाणं हा या दोघींचाही धर्म, फक्त काळानुरुप बदललेलं त्याचं रूप मितश्री पकडून ठेवते.
वेगवान कथानक, रहस्यमय घटनांची विखुरलेली बीजे, काळजावर कोरले जावे असे कैक प्रसंग, संगीताच्या परिभाषेचा नितांत सुंदर वापर. अभिजात संगीतावर मन:पूत प्रेम करणाऱ्या गुरुंचा, गुरु-शिष्यांचा स्वरसोहळा वाचकाला स्तिमित करतो. वाचका का? कशामुळे? च्या फेऱ्यात घुसमटतो. पुन्हा त्याची सुटकाही होते. ‘गांधर्वी’ अनेक प्रश्न निर्माण करते. मात्र नातेसंबंधाची विविध रूपे सामोरी आणण्यात ही कादंबरी यशस्वी ठरते. निकोप-विशुद्ध मैत्री, मुलगी आणि आई यांच्यातील नात्यातूनच लिहिला गेलेला उपसंहार. त्यात मुलीचे आलेले ‘कन्फेशन’ हे इतकं सच्चं, अस्सल की या अडीचशे पृष्ठांमध्ये आपल्या सामान्यतत्वाची प्रत्यही जाणीव व्हावी... परिसस्पर्श करणाऱ्याच्या सान्निध्यात असूनही आपण कोरडे ठणठणीत व निब्बर राहतो याची खंत झाल्यावाचून राहात नाही.
बाणी बसू या सिद्धहस्त लेखिकेच्या लेखणीतून उतरलेली, मूळ बंगाली कादंबरी ‘गांधर्वी’चा हा मराठी अनुवाद आहे. हा अनुवाद न वाटता विलक्षण प्रत्ययकारी रितीने तो मृणालिनी गडकरींनी वाचकांसमोर ठेवला. बंगाली वातावरण, कुटुंबपद्धती, चालीरिती, परंपरा, गाणं व संगीताबद्दल येणारे उल्लेख कादंबरीची उंची वाढवितात. तरल असा हा सौंदर्यानुभव आहे. यात संघर्ष आहे. छंदासाठी आयुष्य कवटाळण्याची धडपड आहे. व्यक्तिचित्रणातले वैविध्य, ते संस्मरणीय करण्यासाठी येणारे निवेदन, वापरलेले संवाद सारेच केवळ अनुभवण्यासारखे आहे.
कलावंतातील माणूसपण व त्याला छेद देणारे सामाजिक वास्तव यांच्या संघर्षासाठी तसेच अपालाच्या अघटित जीवनकहाणीतल्या रोमांचक प्रवासासाठी ही कादंबरी वाचायलाच हवी. हे सारे अचूकपणे चंद्रमोहन कुलकर्णीनी मुखपृष्ठातून व्यक्त केले आहे.
-वृन्दा भार्गवे ...Read more
DAINIK PUDHARI 10-12-2006अभिजात संगीताचे तोषविणारे हृदय दर्शन…
‘गांधर्वी’ कादंबरीमध्ये जीवनाचे अधिष्ठानच संगीत असलेले अभिजात संगीताची जणू प्रत्यक्ष मैफलींना उपस्थित असल्याचा गहिरा आनंद वाचकांना गहिवरून टाकतो. मूळ बंगाली लेखिका बाणी बसू यांच्या मानवी मनाचा गुंता, कौटुंबिक अनबंध – स्तरांची वैशिष्ट्ये, संगीत, नृत्य, चित्रकला इ. कला, स्त्रीची मानसिकता इ. चा सखोल, सर्वंकष अभ्यासाची जाणीव ‘गांधर्वी’मध्ये होते. व्यक्तिचित्रण, वातावरण निर्मिती, विषय मांडणी, सामाजिक पार्श्वभूमी, स्वभाव भिन्नता, नियतीची खेळी इ. मधील सखोलता, सूक्ष्मता, तरलता, सहजता लेखिकेची खासियात ठरते. अनुवादक मृणालिनी गडकरी यांनी पारदर्शकतेने बाणी बसू यांच्या प्रतिभासंपन्नतेचे, अभिजात अभिरुचीचे आणि संवेदनशीलतेचे सतेज दर्शन अनुवादाद्वारा घडविले आहे. मानवी स्वभावाच्या कंगोऱ्याचे, विविधतेचे, वास्तविकतेचे व संघर्षाचे मनोज्ञ दर्शन घडविताना समाजातील, कुटुंबातील कलानिपुण स्त्रीची तडफड, तळमळ, घुसमट अतिशय नेटकेपणाने, कोणत्याही कृत्रिम, अलंकारिक अतिशयोक्ती. इ. शैलीचा आधार न घेता भडकपणाच्या आहारी न जाता वस्तुनिष्ठतेची कास लेखिकेने धरली आहे.
अपाला, सोहेम, दीपाली, प्रशांत, विद्युत, मिताली, रामेश्वर ठाकूर, शिवनाथ इ. व्यक्तिरेखांमध्ये वाचक पूर्ण गुंततो. कलकत्ता, भारत, परदेश इ. कलावंताचे स्वत:ला असोशीने व्यक्त होणे, स्पर्धांतील राजकारण, योगायोग, स्वभावभिन्नतीचे परिणाम, कादंबरीची वाचनीयता वर्धित करतात. कलानैपुण्यप्राप्तीसाठी कलादर्शनासाठी, यशसिद्धीसाठी झोकून देणारे कलावंत, त्यांचे अपार कष्ट धडपड, प्रगल्भता, अपयश, अपमान ढासळणे... सगळेच अप्रतिम वाटते. माणसांतील गंधर्व, नृत्यनिपुन अप्सरा, तापसी गुरू ‘गांधर्वी’मध्ये भेटून थक्क करतात. स्वत:ची खास वैशिष्ट्ये, ढब, वकूब, आस, दृष्टिकोन, वृत्ती सावधपणे जपणारी, दुसऱ्यांमध्ये स्वत:चे अस्तित्व विरघळून टाकणारी पात्रे आपआपल्या पिढीचे ठसे गडद करतात, पात्रांच्या प्रीती, शृंगार, वासना, भावनिक गुंतवणूक, मनोभंग, प्रेमभंग, रक्तातून टाकणारी वंचना, वात्सल्य इ. भावनांचे आविष्कार वाचकाला कथानकाशी खिळवून ठेवतात. कादंबरीच्या पृष्ठापृष्ठांवर वाचकांना गुंतवणून टाकणारी जाळी जणू लेखिकेने लावली आहेत. स्वत:जवळचे जेवढे काही देता येण्यासारखे आहे ते देऊन टाकण्याचा लेखिकेचा प्रयत्न आवाक् करतो. मृणालिनी गडकरी त्या दातृत्वाचे दान अनुवादक म्हणून देत राहतात.
शास्त्रीय संगीत, नृत्य, चित्रकला, चित्रपट दिग्दर्शन इ. च्या क्षेत्रांमध्ये नसणाऱ्या वाचकांनाही मैफली, प्रयोग इ. ची सुगम वर्णने रसमयतेमुळे आकलनक्षम वाटतात. मनहारी तोषविणारी ठरतात.
ईश्वरी देणगीमुळे मधुर स्वरकंठ, प्रगल्भ आकलनशक्ती, अनोखी ताकद लाभलेल्या अपालाचे गाणे हाच धर्म-सर्वस्व-प्रकृती-संस्कृती-प्रेम, श्वासोच्छ्वास! स्वर्गीय आवाजाच्या अपालाला कोणत्या वणव्यातून कोणाच्या प्रेरणा-संरक्षण-साथ, आधारामुळे वाटचाल करावी लागली? समस्यांच्या निबीड अरण्यांमध्ये समस्यांशी मुकाबला करताना कोणते शिखर तिने गाठले? वाचकांना विलक्षण अविस्मरणीय, अतुलनीत अनुभूती लेखिकेच्या आविष्कार, आशय, अभिव्यक्तीद्वारा लाभते. तन-मन-चेतापेशींना संपूर्णतेने कवेत घेणारा चित्रपटच पाहात असल्याचा ‘गांधर्वी’ वाचनाने प्रत्यय येतो. मेहता पब्लिशिंगच्या खानदानामध्ये शोभावेच असे बाह्यांग/अंतरंग लेखक लाभलेली ‘गांधर्वी’ संग्राह्य वाटते!
-प्रा. अनुराधा गुरव ...Read more