DAINIK LOKSATTA 12-01-2008आई-बाप घडविणारे पुस्तक...
‘गर्भसंस्कार’ हे पुस्तकाचं नाव आणि लेखिका डॉ. गौरी बोरकर एवढं पाहिलं की गरोदर स्त्रियांना मार्गदर्शन करणारं हे पुस्तक आहे, हे कळतंच. विवाहित मध्यमवर्गीय मराठी तरुणींच्या डोळ्यांसमोरून लगेचच या विषयावरील अनेक सदरं, मासिक सापताहिकांतले लेख, क्वचित एक-दोन पुस्तकंही तरळून जातात अनुकूल पूर्वग्रह आणि वाचनाचा पूर्वांनुभव मनात ठेवून पुस्तक उघडल्यावर मात्र चांगल्या अर्थाने अपेक्षाभंग होतो. कारण गर्भावर संस्कार कसे करावेत, हे सांगण्यापुरतंच या पुस्तकाचं प्रयोजन नाही, तर सुजाण आई-बाप आणि आरोग्यपूर्ण कुटुंब घडवणारं हे पुस्तक आहे, हे त्याच्या पाना-पानांतून उलगडत जातं. बऱ्याच वाचकांना या डॉक्टर लेखिका यापूर्वी वर्तमानपत्री लिखाणातून भेटलेल्या आहेत. त्यामुळे त्या केवळ आजार, आहार आणि औषधाविषयीच सांगत नाहीत, जीवशैलीही घडवतात, हे आपल्याला माहीत आहेच. एका वाक्यात सांगायचं तर ‘गर्भसंस्कार : उद्याच्या बुद्धिमान व आरोग्यसंपन्न संततीसाठी’ हे पुस्तक बाळ आणि आई-बाप घडवणारं पुस्तक आहे. अपत्योत्सुक जोडप्याची आचारसंहिता कशी असावी, हे आयुर्वेदाशास्त्राच्या आधारे या पुस्तकात सांगितलेलं आहे.
स्थळं पाहून किंवा प्रेमात पडून लग्न होतं तेव्हा प्रथम ते नवविवाहित पती-पत्नी परस्परांच्या चालीरीती, स्वभाव, नोकरी-व्यवसायातील प्राध्यान्यक्रम समजून घेण्यात व्यग्र होतात. दरम्यान, नव्या पाहुण्याची चाहूल लागते आणि आणखी काही समजून घेण्याचंही बाकी राहिलंय, असं त्यांना अस्पष्टपणे जाणवतं. ते नेमकं स्पष्ट करतं- ‘गर्भसंस्कार’, आपण सुशिक्षित असलो, विविध प्रकारचं वाचत, ऐकत, पाहत असलो, तरी आणखीही कितीतरी गोष्टी समजून घेणं बाकी आहेत, हे समजावून सांगतं हे पुस्तक! नवा जीवन जन्माला येण्याआधी पती व पत्नी दोघानीही शरीर व मन योग्य स्थितीत राखलं पाहिजे. याबाबत काय पावलं उचलावीत, शरीर-मनाचं आरोग्य कसं ओळखावं, हे सुरुवातीलाच विशद केलं आहे. गर्भधारणेसाठी आपली पूर्वतयारी झाली आहे, हे पक्कं झाल्यानंतर जोडप्याला त्यानुसार नियोजन करता येईल.
प्रत्यक्ष गर्भधारणेसाठी काय काळजी घ्यावी, इथपासून गर्भवती स्त्रीचा आहार-विहार, गर्भाच्या वाढीचे दर महिन्यांतील टप्पे आणि त्या टप्प्यांतील दुखणी, वैशिष्ट्ये, बारकावे इथपर्यंत वैद्यकीय अंगाने या पुस्तकात विस्तृत चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर संशोधित औषधे, आयुर्वेदोक्त औषधे, प्राणायाम, योगासने याबाबतही मार्गदर्शन केलेले आहे. गर्भवतीच आहार व आचरणातून पोटातल्या बाळावर एक प्रकारे संस्कार होतच असतात, त्याचबरोबर जाणीवपूर्वक संवाद साधून संस्कार कसे करता येतात, हेही यातून समजतं. प्रसतीपूर्व काळजी, सुलभ प्रसूती, प्रसूतीपश्चात घ्यावयाची काळजी याविषयीही वाचकांशी संवाद साधत लेखिकेने मार्गदर्शन केलं आहे. गर्भावरचे संस्कार या ठिकाणी पूर्ण होत नाहीत, तर अर्भकाच्या जन्मानंतरही त्याला दिसामाने वाढवताना पावलोपावली संस्कार आवश्यक असतात. शैशवाचा टप्पा पूर्ण होईपर्यंत त्याच्यावर संस्कार कसे करावेत, ते किती महत्त्वाचे आहेत, हे डॉ. बोरकर यांनी समजावलं आहे.
ओघवती भाषा आणि सुटसुटीत प्रकरणे हे पुस्तकाचं वैशिष्ट्य. त्या-त्या प्रकरणातील महत्त्वाचा मजकूर प्रकरणाच्या शेवटी तक्त्याच्या रूपात देऊन तो ‘एका नजरेत’ समजावून घेण्याची सोय लेखिकेने केली आहे. त्यामुळे पुस्तकाची मांडणी साधी असली, तरी ते अत्यं उपयुक्त झाले आहे. संस्कृतप्रचुर शब्दांचा वापर टाळून (उदा. शीर्षके इ.) भाषेत आणखी सोपेपणा आणणे शक्य होते व त्यायोगे वाचकांच्या अधिक जवळ जाता आले असते. आज स्पर्धा हा परवलीचा शब्द झालेला असताना या धकाधकीच्या आयुष्यक्रमात थोडं थांबून आपल्याला काय हवं आहे, याचा मनाशी विचार करायला हे पुस्तक उद्युक्त करतं. एकाच अपत्यानंतर कुटुंबाचा आकार मर्यादित करण्याच्या आजच्या काळात त्या अपत्याकडून आई-वडिलांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. अपत्य सर्वगुणसंपन्न असावं आणि त्याचे सगळे गुण झळाळून समोर यावेत म्हणून त्यांचं आरोग्यही उत्तम असावं, असं पालकांना वाटतं. अशा परिस्थितीत आपलंही काही कर्तव्य आहे हे त्यांना जाणवलेलं नसतं. अशा पालकांना सावध करत हे पुस्तक सांगतं की, शाळेत जाणाऱ्या मुलांकडून स्पर्धेत टिकण्याची अपेक्षा करण्याअगोदर अनेक वर्षे आपण त्याकरता आवश्यक ती मशागत करायला हवी. अर्थात हे सारं आपल्या धर्मात, शास्त्रांत प्राचीन काळीच सांगून ठेवलेलं आहे. पुस्तकावर अभिप्राय देणाऱ्या डॉक्टरांनी- हे पुस्तक तरुणांनी लग्नापूर्वीच वाचावं, असं सुचविलं आहे.
एकत्र कुटुंबपद्धती विरत चालल्यामुळे वडिलधाऱ्यांचे मार्गदर्शन अलभ्य होत असताना एका आश्वासक, अनुभवी स्नेह्याची भूमिकाही हे पुस्तक पार पाडतं. गैरसमज व अनाठायी गंड दूर करून ते गर्भवतीला धीर देतं, तसेच भावी पित्याला त्याच्या कर्तव्यांची जाणीव करून देतं.
डॉ. बोरकर यांची अभ्यासू वृत्ती आणि समाजाला आपल्या परीने चांगलं देण्याची तळमळ पानोपानी जाणवत राहते. वाचकाच्या मनात आशादायक चित्र तयार करण्यात हे पुस्तक त्यामुळे यशस्वी होतं.
-सुलेखा नलिनी नागेश ...Read more