Ram Jagtap- Maharashtra Dinmaan‘घाचर-घोचर’ ही अनुवादित कादंबरी मध्यमवर्गाच्या ‘नैतिक र्हासा’चं ‘गुह्यदर्शन’ घडवते!
गेल्या सहा वर्षांत भारतातल्या कुठल्या प्रादेशिक भाषेतलं पुस्तक हिंदीसह इतर अनेक प्रादेशिक भाषांमध्ये अनुवादित झालं आणि त्याचा इंग्रजी अनुवाद होऊन ते अगदी आंतरराष्ट्ीय पातळीवरही नावाजलं गेलं? या प्रश्नाचं उत्तर ‘घाचर-घोचर’ असंच द्यावं लागेल. कथाकार, कादंबरीकार व नाटककार विवेक शानभाग हे कन्नडमधले एक नावाजलेले लेखक आहेत. त्यांचे आजवर पाच कथासंग्रह, तीन कादंबर्या आणि दोन नाटकं प्रकाशित झाली आहेत. ‘घाचर-घोचर’ ही त्यांची जेमतेम 118 पानांची कादंबरी कन्नडमध्ये डिसेंबर 2015 मध्ये प्रकाशित झाली. तिचा लगोलग इंग्रजीमध्ये अनुवाद झाला. 2018 मध्ये ती हिंदीमध्येही अनुवादित झाली. याशिवाय नेपाळी, बंगाली, कोंकणी अशा भारतीय भाषांमध्येही तिचे अनुवाद प्रकाशित झाले आहेत.
प्रख्यात नाटककार दिवंगत गिरीश कार्नाड यांनी या कादंबरीचं दै. ‘इंडियन एक्सप्रेस’च्या 13 फेब्रुवारी 2016च्या अंकात ‘ङर्ळींळपस ळप झीशीशपीं ढशपीश’ या नावानं परीक्षण लिहिलं आहे; तर ‘न्यू यॉर्क टाइम्स’ या अमेरिकन आणि ‘द गार्डियन’ या ब्रिटिश वर्तमानपत्रानं ‘2017 मधील सर्वशेष्ठ दहा पुस्तकां’मध्ये तिची निवड केली आहे. एवढंच नाही तर आजवर सुकेतू मेहता, कॅथरीन बू, निलंजना एस. रॉय, रचना सिंग, सत्यव्रत के. के. उमा महादेवन, केशव गुहा, पंकज मिशा, पारुल सेहगल, डेबारा स्मिथ, लॉरीन स्टेन, प्राज्वल पराजुली, एलिन बॅटरर्सी, सॅम सॅक्स, अमित चौधुरी, एलिझाबेथ कुरुव्हिला, इयन जॅक अशा अनेक नामवंत लेखकांनी देश-विदेशातल्या इंग्रजी प्रसारमाध्यमांमध्ये तिची परीक्षणं लिहिली आहेत. सुकेतू मेहता आणि कॅथरीन बू या सुप्रसिद्ध लेखकांनी तर विवेक शानभाग यांची तुलना ‘चेकव्ह’शी केलीय.
तर या ‘कन्नड चेकव्ह’ची ही कादंबरी जुलै 2018 मध्ये मराठीतही अनुवादित झालीय. अपर्णा नायगांवकर यांनी तिचा अनुवाद केला असून तो मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलाय. हा मराठी अनुवाद अतिशय चांगला आहे आणि कादंबरी तर खरोखरच भन्नाट आहे. आचार्य अत्रे एकदा तेंडुलकरांचं नाटक पाहायला गेले होते. ते पाहून झाल्यावर ते तेंडुलकरांना म्हणाले, ‘नाटक कसं हवं? तर त्याने प्रेक्षकांच्या नरडीचा अक्षरक्ष: घोट घेतला पाहिजे.’ तेंडुलकरांच्या ‘शांतता! कोर्ट चालू आहे’ या नाटकासारखी ‘घाचर-घोचर’ ही कादंबरी आपल्या नरडीचा अक्षरक्ष: घोट घेते. अतिशय हळुवारपणे ती आपला गळा पकडते आणि मग तो हळुहळू आवळत जाते.
त्यामुळे इथंच वैधानिक इशारा दिलेला बरा. तुम्ही मध्यमवर्गीय असाल आणि तुम्हाला आपला सुखातला जीव नेहमीप्रमाणेच दु:खात घालायची इच्छा नसेल, तर तुम्ही या कादंबरीच्या वाट्याला जाऊ नये हे उत्तम. करकोचा जसा अचूक नेम धरून मासा पकडतो आणि मग चोच बाहेर काढून त्या माशानं जीवाच्या आकांतानं केलेली तडफड थांबण्याची वाट पाहतो, आणि ती थांबली की, त्याला गट्टम करतो, ही कादंबरी नेमकी तसंच करते. या कादंबरीचा निवेदक तुम्हाला तुमच्या सुरक्षित, आत्ममग्न आणि बेफिकीर जगातून पाहाता पाहाता उचलतो आणि बाहेर काढतो. आणि तेच जग तुम्हाला तटस्थपणे दाखवतो. त्यानंतरचा जीवघेणा अनुभव तुम्हाला अनुभवून पाहायचा असेल तरच तुम्ही या कादंबरीच्या वाट्याला जाऊ शकता.
या कादंबरीचा विषय तसा सामान्य आहे. 1990 नंतर, विशेषत: 2000 नंतर आणि खासकरून 2014 नंतर सातत्यानं ज्याच्यावर टीका होतेय, त्या मध्यमवर्गातल्या एका कुटुंबाची ही कथा आहे. पण ती ‘रामायणा’सारखी नाही, तर ‘महाभारता’सारखी (मध्यमवर्गीय) जीवनाचं विराटरूपदर्शन घडवणारी आहे. थेटच सांगायचं तर ‘नेकीनं नोकरी आणि टुकीनं संसार’ करणार्या बंगळुरूमधल्या एका कुटुंबाची ही कहाणी आहे. आधी नैतिकता हाच जगण्याचा स्थायीभाव असलेल्या या कुटुंबाचं नोकरीकडून व्यवसायाकडे स्थलांतर होतं..
पण या कादंबरीची गंमत या कथानकात नसून ते कसं सांगितलंय, यात खर्या अर्थानं दडलेली आहे. या कादंबरीचा निवेदक (मुलगा) आपल्या कुटुंबाची कथा स्वत:पासून सांगायला सुरुवात करतो. मग वडील, आई, बहीण, काका आणि बायको अशी तो सांगत राहतो मध्येमध्ये फ्लॅशबॅक घेत. ही संपूर्ण कादंबरी घटना-प्रसंग आणि त्यांच्या केंद्रस्थानी असलेले कुटुंबसदस्य या पद्धतीनं पुढे जात राहते. पण ती शेवटपर्यंत आपली सहजपणाची लय सोडत नाही.
ज्याला ‘अँटी हिरो’ असं सर्वसाधारणपणे म्हटलं जातं, तसा या कादंबरीचा निवेदक आहे. पण तो नायक नाही. ही कादंबरी नायकप्रधान नसून समूहप्रधान आहे. तिची सुरुवात निवेदकाच्या ‘कबुलीजबाबा’पासून होते. पण हे सांगताना निवेदक ज्या लयीत, ज्या भाषेत आणि ज्या प्रकारे निवेदन करतो, ते कमाल आहे! त्यात शब्दांची उधळमाधळ नाही, चिंतननामक गोष्टीचा बडेजाव नाही, भाष्याचा सोस नाही आणि उपमा, प्रतिमा, अलंकार यांचा तर जवळपास मागमूसही नाही.
भारतीय मध्यमवर्गाची भाषा त्याच्या जगण्या-वागण्यासारखीच ‘डबल स्टँडर्ड’वाली असते, तिचा आव मात्र ‘फर्स्ट स्टँडर्ड’चा असतो. पण या कादंबरीचा निवेदक मध्यमवर्गाचा प्रतिनिधी असूनही त्याची भाषा तशी नाही. ती अतिशय धारदार, तीक्ष्ण आहे. ती अचूक लक्ष्यभेद करत राहते.
अशी या कादंबरीची कितीतरी वैशिष्ट्यं सांगता येण्यासारखी आहेत. तिचं शीर्षकच पहा ना. ‘घाचर-घोचर’ हा शब्द कुठल्याही कन्नड शब्दकोशात नाही. त्याचा वापर फक्त बोलीभाषेत केला जातो. त्याचा अर्थ आहे ‘गडबडगुंडा वा गुंता’.
निवेदक एकेक घटना-प्रसंग सहजपणे सांगत जातो, तसतसा हिमनगाच्या टोकाखालचा एकेक भाग उघड होऊ लागतो. त्यातला भेदकपणा इतका अंगावर येतो की, कधी कधी वाचता वाचता मध्येच थांबावं लागतं. निवेदक एकाबद्दल सांगत सांगत पुढे जातो, तेव्हा आपण त्यालाच ‘दोषी’ मानायला लागतो, तोवर निवेदक दुसर्याची गोष्ट सांगायला लागतो आणि आपण आधीच्यावरचा ‘दोषारोप’ त्याच्यावर थोपवू लागतो, तोच निवेदक तिसर्याबद्दल बोलायला लागतो. आता हाच असणार ‘कलमुहाँ’ या विचाराला आपण येतो, तोच निवेदक चौथ्यावर जातो. त्यावरून पाचव्यावर. थोडक्यात एखाद्या थरारक सिनेमासारखा पाठशिवणीचा खेळ सुरू राहतो कादंबरीभर. आणि तोही अवघ्या 118 पानांत.
सामूहिक पापक्षालन ही काही आपली परंपरा नाही. त्यातही भारतीय मध्यमवर्गाची तर नाहीच नाही. मागे वळून पाहण्याची, थोडं थांबून विचार करण्याची आणि स्वत:ला चार प्रश्न खडसावून विचारण्याची क्षमता गमावून बसलेल्या भारतीय मध्यमवर्गाची ‘सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही’ अशी अवस्था होऊन बसलीय. स्वातंत्र्यपूर्वकाळात उदयाला आलेला आणि तेव्हापासून सातत्यानं वाढत राहिलेला, 1990 नंतर तर झपाट्यानं वाढलेला हा मध्यमवर्ग 2014 नंतर कुठल्या थराला गेलाय, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. ही कादंबरीही पापक्षालन करत नाही. ना निवेदक करतो, ना इतर कुटुंबसदस्य.
उलट या कुटुंबातला प्रत्येक जण वेळ प्रसंगी नैतिकतेचे हवाले देतो, स्वातंत्र्याचं गाणं गातो आणि आपल्या कृत्याचं समर्थनही करतो. पण कुणीच कुणाला जाब विचारू धजत नाही, कुणीच कुणाजवळ प्रामाणिकपणे सत्य कबूल करत नाही, कुणीच कुणाला कशाबद्दलही अडवत नाही. सगळे जण सामूहिकपणे आपल्या सत्त्वाची, प्रामाणिकपणाची, नैतिकतेची, विश्वासाची आणि परस्परसंवादाची हत्या करत राहतात.
‘स्मृतिचित्रे’ या मराठीतल्या ‘क्लासिक’ मानल्या जाणार्या आत्मचरित्राची सर्वांत मुख्य वैशिष्ट्यं आहेत – लेखिकेची शहाणीव आणि कुठलाही आडपडदा नसलेलं रोखठोक जगणं-वागणं-बोलणं. त्यामुळे साध्या साध्या घटना-प्रसंगांतून अतिशय उत्तम प्रकारची विनोद निर्मिती होते आणि त्या घटना-प्रसंगांमधून मानवी जगण्याची कितीतरी ‘दर्शनं’ पाहायला मिळतात!
‘घाचर-घोचर’ ही सुद्धा क्लासिक म्हणावी अशीच कादंबरी आहे. पण तिच्यामध्ये हे सगळं उलट्या पद्धतीनं घडतं. निवेदकाकडे शहाणीव आहे, पण त्याचं जगणं-वागणं सत्त्वहीन. स्वत:सह इतरांबद्दलचे साधे साधे प्रसंग तो सांगतो, त्यातून ‘कॉमिक-ट्रॅजेडी’ निर्माण होते. कॉमेडी कुणाचीही होऊ शकते, तशीच ट्रॅजेडीही. पण ‘कॉमिक-ट्रॅजेडी’ मात्र अध:पाताच्या प्रपातात सापडल्याशिवाय घडून येत नाही. हा प्रपात इतका जबदरस्त असतो की, तो एकट्यादुकट्याला थोपवता येत नाही. परिणामी सगळेच त्याच्या कचाट्यात सापडतात. या कादंबरीतल्या कुटुबाचंही नेमकं तसंच होतं. सगळेच जण सामूहिकपणे शहाणपणाची हत्या करत राहतात!
असं का होतं? तर ‘घाचर-घोचर’ अर्थात गडबडगुंत्यामुळे. तो गुंता नात्यांचा आहे, केलेल्या त्यागाचा आहे, भोगलेल्या दारिद्रयाचा आहे, सहन केलेल्या मानसिक त्रासाचा आहे, परस्परांवरील अवलंबित्वाचा आहे, एकमेकांकडून असलेल्या अपेक्षांचा आहे आणि आपापल्या सोयीचाही आहे.
त्यामुळे ही कादंबरी मध्यमवर्गाच्या दांभिकतेचा, कृतक जगण्याचा, खोट्या प्रतिष्ठेचा, भीतीपोटी येणार्या एकोप्याचा, गहिर्या जखमेवर थातुरमातुर मलमपट्टी करण्याच्या वृत्तीचा, जगाचा उद्धार करण्याच्या पण स्वत:ला एक प्रश्नही न विचारण्याच्या मानसिकतेचा, हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागे लागण्याच्या स्वभावाचा, अभावग्रस्त भूतकाळातील जगण्यावर उथळ वर्तमानाचा उतारा शोधणार्या संस्कृतीचा आणि मध्यमवर्गीय ‘शहामृगी’पणाचा एकेक पापुद्रा कुठलंही भाष्य न करता उलगडून दाखवते.
भारतीय मध्यमवर्ग टीकेनं खंतावतो आणि संकटानं अस्वस्थ होतो. पण करतो काय, तर टीका करणार्याला उडवून लावतो आणि संकटात आपल्या कुटुंबाचा ‘एकोपा’ दाखवतो. पण त्याला टीकेकडे ‘सद्हेतू’ आणि संकटाकडे ‘संधी’ म्हणून पाहता येत नाही. कारण तसं केलं की, त्याच्या आत्ममग्न मश्गुलतेच्या चिरफळ्या होतात. आणि ते होऊ देण्याची त्याची कुठल्याही परिस्थितीत तयारी नसते. त्यामुळे तो वादळाचा सामना सामूहिकपणे वाळूत डोके खुपसून करतो आणि वादळापूर्वीच्या व वादळानंतरच्या शांततेत बेफिकीरपणे आपला-आपला जगत राहतो.
भारतीय मध्यमवर्ग आंधळ्या धृतराष्ट्रासारखा आहे. त्याच्याकडे हजार हत्तींचं बळ आहे, पण तारतम्य नाही. त्याच्याभोवती भारतातलं विद्यमान राजकारण आणि संपूर्ण बाजारपेठ फिरत राहतेय, पण त्याच्याकडे विवेक नाही. जगातली प्रत्येक सेवा-सुविधा केवळ आपल्यासाठीच ‘प्रोव्हाईड’ केली जातेय, असा त्याचा गैरसमज झालेला आहे. अशा समाजाची झेप आपल्या पावलांपलीकडे सहसा जात नाही. त्यामुळे त्याला तुम्ही एकोणिसाव्या शतकातल्या कृतिशील आणि उत्तरदायी मध्यमवर्गाची कितीही उदाहरणं सांगा; त्याला मात्र संघर्ष, अभाव आणि सचोटी यांतच आयुष्य व्यतीत केलेल्या आधीच्या पिढ्यांना धुडकावून लावण्यातच भूषण वाटतं. त्यागाची तर त्याला फार म्हणजे फारच अॅलर्जी आहे.
‘बुद्धिजीवी’ असलेला, पण ‘बुद्धिवादी’ नसलेला हा वर्ग ‘व्यक्तिवादा’चा फार भोक्ता असतो. त्यामुळे त्याला ‘व्यक्तिस्वातंत्र्य’ ही संकल्पना खूप आवडते. पण तारतम्य, विवेक, आत्मसंयम, चिंतन-मनन यांचा मात्र मनस्वी तिटकारा असतो.
अशा या मध्यमवर्गाला ‘घाचर-घोचर’ ही कादंबरी त्याचा भेसूर चेहरा आणि रक्ताळलेले हात दाखवण्याचं काम करते. कदाचित त्यामुळेच महाराष्ट्रातला मध्यमवर्ग या कादंबरीच्या वाट्याला गेला नसावा. आणि समजा गेलाच तर तेंडुलकरांच्या ‘शांतता! कोर्ट चालू आहे’मधल्या बेणारेबाईंच्या ‘हे शरीर सगळा घात करतं’ या चालीवर ‘हा पैसा सगळा घात करतो’ अशी सम गाठू शकतो. पण ही कादंबरी केवळ पैशाला, सुबत्तेला किंवा कुणाही एकाला दोषी ठरवून स्वत: नामानिराळं व्हायला साफ नकार देते. ती तुम्हाला (कधीकाळी मूठमाती दिलेल्या) तुमच्याच अंत:पुरात नेऊन उभी करते आणि तुमचाच चलत्-चित्रपट दाखवते. ती तुमच्याकडे प्रश्नांची उत्तरं मागत नाही की, चिंतनशिबिराचं आयोजन करायलाही सांगत नाही. ती फक्त तुम्हाला तुमच्या आचार-व्यवहारांचं ‘गुह्यदर्शन’ घडवते. तुमच्या अहंभावाला चूड लावण्याचं काम करते.
हे फार जीवघेणं प्रकरण आहे! त्यामुळे आपल्या आयुष्याचं ‘घाचर-घोचर’ का होऊन बसलंय, हे जाणून घेण्याची इच्छा असलेल्या मध्यमवर्गीयांनीच आणि या वर्गात भविष्यात जाण्याची इच्छा-आकांक्षा-महत्त्वाकांक्षा असलेल्यांनीच या कादंबरीचा नाद करावा ...Read more