DAINIK SAKAL 21-11-1982ग्रामीण साहित्याचे वादग्रस्त विवेचन…
ग्रामीण साहित्य आणि वास्तव हे प्रा. आनंद यादव यांचे ग्रामीण साहित्यविषयक स्वतंत्र भूमिका मांडणारे दुसरे पुस्तक आहे. ग्रामीण साहित्याची निर्मितीप्रक्रिया, याचे वेगळे स्वरूप याविषयी चिंतन करून ग्रामीण साहित्यविषयक ्वत:ची अशी भूमिका आनंद यादव गेली काही वर्ष मांडी ऐतिहासिक, सामाजिक, दलित, चरित्रात्मक, प्रादेशिक ही साहित्यविषयक वर्णनात्मक विशेषणे टीकाकारांनी यापूर्वी स्वीकारली आहेत. साहित्याचे ‘ग्रामीण’ हे विशेषण लेखकाने केवळ स्वीकारलेले नाही तर त्या साहित्यविषयीची स्वतंत्र ठाम पण वादग्रस्त ठरू शकणारी अशी भूमिका त्यांनी ‘ग्रामीणता: साहित्य आणि वास्तव’ या पुस्तकात मांडली आहे.
प्रस्तुत पुस्तकात एकूण बारा लेख आहेत. त्यापैकी तीन लेख- पहिला मराठी ग्रामीण कादंबरीकार पिराजी पाटील, मराठी मातीचा पहिला कादंबरीकार र. वा. दिघे, पहिली मराठी ग्रामीण कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्याचा परामर्श घेणारे आहेत. अन्य नऊ लेख ‘ग्रामीण साहित्य सवतासुभा आहे काय?’, ‘ग्रामीण साहित्य आणि सामाजिक जाणीव’, ‘मराठी खेडे नवे आणि जुने’, ‘ग्रामीण साहित्य आणि शहरी संस्कार’, ‘ग्रामीण साहित्य आणि बदलते खेडे’, ‘ग्रामीण साहित्याचे टीकाकार’, ‘ग्रामीण हे विशेषण काय अपेक्षिते?’ ‘साहित्यातील ग्रामीणता’, ‘आधुनिक ग्रामीण साहित्याची भूमिका’- ग्रामीण साहित्याच्या स्वरूपाची चर्चा करणारे लेख आहेत.
प्रा. स. वि. भावे यांनी या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत आनंद यादवांच्या वेगळ्या ग्रामीण साहित्यविषयक भूमिकेचे समर्थन केले आहे. स. शि. भावे यांची मते अशी ‘ग्रामीण’ हे विशेषण वर्णनात्मक असून मूल्यमापनात्मक नाही. यादवांचीही तशी भूमिका नाही. ग्रामीण या वर्णनात्मक विशेषणातून ग्रामीण साहित्याचे आकलन होण्यास साहाय्य होईल. एखाद्या लेखकाचे ‘अनुभवविश्व’ व त्याचे मर्म समजल्याशिवाय त्याचे लेखनविश्व समजणार नाही. ग्रामीण हे विशेषण मूल्यमापनात्मक नसूनही त्याचा आग्रह धरला जातो कारण भाषेच्या, साहित्याच्या अभ्यासकांना अध्यापकांना पडणाऱ्या प्रश्नांचा विचार करण्यासाठी या विवेचनाचा उपयोग होणार आहे; असा निर्वाळा देऊन प्रा. स. शि. भावे यांनी साहित्याच्या सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीने निर्माण होणारे काही प्रश्न प्रस्तावनेत अभ्यासकांसमोर ठेवले आहेत. आपण निर्माण केलेल्या प्रश्नांचा विचार करण्यासाठी यादवांचे चिंतन उपयोगी ठरेल, असा विश्वासही स. शि. भावे यांनी प्रस्तावनेत व्यक्त केला आहे.
ग्रामीण साहित्याचे स्वरूप समजून घेण्यासाठी, त्याचा अभ्यास करण्यासाठी यादवांचे विवेचन उपयुक्त ठरणारे आहे यात वादच नाही. त्यांच्या विवेचनामागे एका समर्थ कलावंताची चिंतनशीलता आहे, अर्थात त्यांना पडणारे प्रश्न ग्रामीण स्वरूपाची साहित्यनिर्मिती करणाऱ्या सर्वांना पडतीलच असे नाही, परंतु यादवांच्या ग्रामीण साहित्यविषयक भूमिकेचा विचार करताना जे अन्य प्रश्न उपस्थित होतात त्यांचा परामर्श घेतला पाहिजे.
ग्रामीण साहित्य वेगळे का?
‘ग्रामीण साहित्य सवतासुभा आहे काय?’ हा या पुस्तकातील महत्त्वाचा असा लेख आहे. ‘जगातील सर्व ललित वाङ्मय एका व्यापक पातळीवरून एकच आहे’- असे सांगून साहित्यातील वैश्विकतेचे स्वरूप लेखकाने विशद केले आहे. लेखक अनुभवांना शब्दरूप देत असतो. अंतिमत: अनुभवांना शब्दरूप देणे, त्याचा अविष्कार करणे हेच कलादृष्ट्या महत्त्वाचे असते. म्हणून साहित्यप्रकार हे अनुभवांच्या आकाराचे विशेष ठरतात. ते अनुभवविशेष नव्हते. अनुभव व्यक्त करणे हेच साहित्यिकांचे अंतिम ध्येय असते, तेव्हा त्या दृष्टीने हे प्रकारही गौणस्थानी जातात. साहित्याच्या विकासाच्या दृष्टीने हे प्रकारही गौणस्थानी जातात. साहित्याच्या विकासाच्या दृष्टीने, त्याची आस्वादकता यथार्थपणे आकलन होण्याच्या दृष्टीने अशा प्रकारच्या वर्गीकरणाची आवश्यकता असते. म्हणूनच साहित्यप्रकारांचे वर्गीकरण नाकारता येत नाही. साहित्याचा वेगळेपणा मानायला काही भौगोलीक आणि सांस्कृतिक कारणे सांगितली जातात. समाजाच्या अनेक प्रकारे झालेल्या विघटनात सांस्कृतिक प्रबोधन हा एक भाग आहे. या सांस्कृतिक प्रबोधनाचा १९६० नंतरचे ग्रामीण साहित्य आणि दलित साहित्य हा एक पैलू आहे. आपण वेगळे ग्रामीण साहित्य का अपेक्षितो याचे विवेचन आणि समग्र साहित्य मूलत: ‘साहित्य’च असते येथपर्यंतची यादवांची भूमिका आणि तिचे समर्थन स्वीकारार्ह आहे, पण या विवेचनाच्या ओघात निर्माण झालेल्या निसंगतींचा परामर्श घेतला पाहिजे.
गेल्या काही वर्षांत ग्रामीण परिसरात शिक्षणाचा प्रसार वाढला आहे. त्यामुळे नवा ग्रामीण वाचकांचा वर्ग निर्माण झाला आहे. हा वाचकवर्ग १९६० नंतरचे ग्रामीण साहित्य ‘आत्मप्रत्यया’साठी वाचतो. १९६० पूर्वीचा शहरी मध्यमवर्गीय वाचक आधीचे ग्रामीण साहित्य मनोरंजनासाठी वाचत होता. त्याच्या स्वप्नील कल्पनांसाठी वाचत होता. लेखकाचे हे विचार कच्च्या पायावर उभारलेले आहेत. महाराष्ट्रात १९६० नंत ग्रामीण परिसरातील शिक्षणप्रसारामुळे वाचकांची कितीशी वाढ झाली हे आकडेवारीने पाहावे लागेल. तसेच ग्रामीण वाचक कितीसे ग्रामीण साहित्य वाचतो ग्रामीण साहित्य का वाचतो आणि ग्रामीण वाचक शहरी साहित्य का वाचतो, याची अशी साचेबंद उत्तरे शोधणेही धोक्याचे आहे. आपल्या अनुभव विश्वाप्रमाणे इतरांच्या अनुभवविश्वात डोकवावे अशी कुणाही मग तो ग्रामीण असो वा शहरी असो वाचकाची इच्छा असते. मराठीतील बहुसंख्य वाचक, यादव म्हणतात ती भूमिका घेऊन साहित्याचे वाचन करीत असतील असे म्हणता येत नाही. १९६० नंतरच्या काळात चारूता सागर यांच्या सारख्या कसदार ग्रामीण साहित्यनिर्मिती करणाऱ्या लेखकाच्या कथांचे वाचन कितीशा ग्रामीण किंवा शहरी वाचकांनी केले आहे, असाही प्रश्न विचारता येईल. (या पुस्तकात रणजित देसाई, चारूता सागर किंवा मधु मंगेश कर्णिक यांच्या प्रादेशिक साहित्याचा निर्देश केलेला आढळत नाही.)
शहरी साहित्याबद्दलची यादवांची भूमिकाही वादग्रस्त आहे. दिलीप चित्रे, विलास सारंग, कमल देसाई, अनिल डांगे, विजय तेंडुलकर इ. लेखकांचे साहितय मराठी संस्कृतीचे, मराठी मनाचे प्रतिबिंब मुळीच नाही. ते आत्मभ्रष्ट झालेल्या, व्यक्तीकेंद्रित, काहीशा तोल गेलेल्या मनाचे, पाश्चात्त्य समाजरचनेतून निर्माण झालेल्या दाबाचे, पाश्चात्त्य मनावर जे परिणाम आहेत त्याचे अनुकरण करणारे साहित्य आहे, असे लेखकाला वाटते.
शहरातून निर्माण होणारे साहित्य आणि प्रतिष्ठा पावणारे शहरी मराठी साहित्य हे अनेक अर्थांनी मराठी साहित्य नाही. एक तर ते पाश्चात्यांचे भ्रष्ट अनुकरण आहे आणि दुसरे, ते ‘मराठी मना’चे प्रतिनिधित्व करणारे नाही. यादवांच्या या सर्व विवेचनातून ग्रामीण साहित्याचे समर्थन होत नाही; उलट शहरी साहित्याकडे पाहण्याची त्यांची संकुचित आणि मर्यादित मनोवृत्तीच प्रकट होते. इंग्रजी आमदानीत आणि स्वातंत्र्योत्तर काळात निर्माण झालेल्या सर्वच साहित्यावर शहरी मनोवृत्तीची छाप असणे, पाश्चात्त्य वाङ्मयाचा त्याच्यावर परिणाम होतो. अगदी अपरिहार्य होते. या काळात लिहिणारा लेखकवर्ग बव्हंशी लेखक वर्ग होता. १९४५ नंतरच्या काळात निर्माण झालेल्या नवसाहित्याच्या मर्यादांबरोबर त्याचे सामर्थ्यही विचारात घ्यावे लागेल. ज्याप्रमाणे ‘ग्रामीण’ हे विशेषण मूल्यमापनात्मक नाही त्याप्रमाणे ‘शहरी’ हे विशेषणही मूल्यमापनात्मक नाही, ही बाब यादवांनी लक्षात घेतलेली नाही. (या संदर्भात सत्यकथेने मध्यंतरी प्रसिद्ध केलेल्या एका अंकाची आठवण होते. पाश्चात्त्यांच्या सहवासात राहणाऱ्या मराठी माणसाच्या मनाचे सूक्ष्म प्रतिबिंब त्या अंकातील कथा साहित्यात पडलेले होते.) १९४५ नंतरच्या काळात निर्माण झालेल्या नवसाहित्याने अनुभवाच्या विविध पातळ्यांना स्पर्श केला आहे. मानवी मनाचे सूक्ष्म पदर उलगडून दाखविले आहेत. केवळ शहरी आहे म्हणून ते ग्रामीण साहित्याचया पाश्र्वभूमीवर एकदम निकालात काढणे केवळ धाडसाचेच नव्हे तर अविचाराचे ठरेल. आनंद यादवांची ही टोकाची भूमिका समग्र साहित्याला त्याच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करण्याच्या दृष्टीने न्याय देणारी मुळीच नाही.
‘ग्रामीण साहित्याचे टीकाकार’ या लेखात लेखकाने मराठीत ग्रामीण साहित्यावर वीस वर्षांत झालेल्या समिक्षेचे स्वरूप विशद केले आहे. माडगूळकरांची कथा शहरी टीकाकारांना अवाङ्मयीन कारणामुळे जवळची वाटली, ग्रामीण साहित्याची समीक्षा शहरी मध्यमवर्गीय दृष्टीकोनातून झाली, व्यंकटेश माडगूळकरानंतरच्या ग्रामीण साहित्याचा शहरी टीकाकारांनी नीट अभ्यास केला नाही किंवा त्या साहित्याकडे पुरेसे लक्ष दिले नाही, या आशयाचे यादवांचे विचार पुन्हा तपासून घ्यायला हवेत. शहरी रसिकाला ग्रामीण जीवनाचे, संस्कृतीचे, माणसांचे, वातावरणाचे, रागा-लोभाचे दर्शन घडविण्यासाठी ग्रामीण साहित्याचा अवतार आहे, अशी सुप्त भूमिका शहर मध्यमवर्गीय दृष्टीतून घेतली गेली आहे, असेही मत लेखकाने नमूद केले आहे.
शहरी टीकाकारांनी केलेल्या ग्रामीण साहित्याच्या मूल्यमापनाविषयी निश्चित अशी भूमिका यादवांनी घेतलेली दिसते. १९५०-५५ च्या सुमारास माडगूळकरांनी ग्रामीण स्वरुपाच्या लेखनाला सुरुवात केली. त्यानंतरच्या काळात शंकर पाटील, द. मा. मिरासदार हे लेखक वैपुल्याने लिहित होते. त्यातही माडगूळरांना अग्रस्थान होते. त्या काळात माडगूळकर सत्यकथा, मौज या नियतकालिकांतून लिहित होते. प्रा. गंगाधर गाडगीळांसारख्या समिक्षकाने त्यावेळी माडगूळकरांवर लिहिणे साहजिकच होते. प्रा. गंगाधर गाडगीळ यांनी माडगूळकरांच्या लोकप्रियतेचे अवाङ्मयीन कारण सांगितले आहे. माडगूळकरांच्या कथेतील माणदेशी माणसे भेटली, म्हणजे शहरी मनाला विसावल्यासारखे वाटते. काहीतरी हरवले होते ते मिळाल्यासारखे वाटते. अवाङ्मयीन कारणांनी एखादा लेखक कसा लोकप्रिय होतो याचे हे एक गमतीदार उदाहरण असल्याचे गाडगीळांनी सांगितले आहे.
यादवांनी माडगूळकरांच्या लेखन प्रक्रियेसंबंधी स्वत: जाणवणारी काही कारणे सांगितली आहेत. माडगूळकरांची व्यावहारिक अलिप्तता यादवांना माडगूळकरांच्या, ‘नागरमना’चे लक्षण वाटते. खेड्याचा अनुभव असलेली ‘नागरमन’ शहरी वाचकावर भान ठेवून सतत माहितीगार निवेदकाच्या शेलीचा अवलंब करते. गोष्ट सांगणाऱ्या (स्टोरी टेलरची) भूमिका स्वीकारते, यामुळेच त्यांची कथा शहरी मनोवृत्तीच्या टीकाकारांना आणि रसिकालाही जवळची वाटली असावी, असा निष्कर्ष लेखकाने काढला आहे. (माडगूळकरांच्या लेखनातील सहजता, त्यांची संवेदनशीलता अनुभव व्यक्त करण्याची पद्धती, कलावंताला आवश्यक असणारी अलिप्तता यांचा विचार करता माडगूळकरांनी शहरी वाचकांचे भान ठेवून लेखन केले असावे असे म्हणणे योग्य ठरणार नाही.) काही असले तरी माडगूळकरांचे मराठी नवकथेतील श्रेय ‘मूल्यमापनात्मक’ भूमिकेवरून मान्य करावे लागते.
माडगूळकर, पाटील, मिरासदार यांच्यानंतर यादव, बोराडे हीच नावे ग्रामीण साहित्याच्या संदर्भात नजरेसमोर येतात. मराठी समीक्षकांनी थोड्याफार प्रमाणात तयांचा विचार केला आहे. वस्तुत: गेल्या वीस वर्षांतील समग्र मराठी साहित्याचा विचार मराठी समिक्षेत व्हावा तितका झाला नाही. नियतकालिकातून समिक्षेला पुरेसा वाव नसणे, एखाद्या चांगल्या कलावंताकडे समिक्षकांचे लक्ष न जाणे, ही त्यामागील कारणे आहेत. तेव्हा केवळ ग्रामीणच नव्हे तर संपूर्ण मराठी साहित्यातच तसा फार विस्तृत असा समीक्षाविचार झालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. माडगूळकर, पाटील किंवा यादव यांच्याप्रमाणे सातत्याने साहित्य-निर्मिती करणारा ताकदीचा लेखक ग्रामीण साहित्यिकांच्या तिसऱ्या पिढीत निर्माण झालेला दिसत नाही, हे ‘तिसऱ्या पिढीची ग्रामीण कथा’ या यादवांनीच संपादित केलेल्या कथासंग्रहावरून दिसून येते. (आनंद पाटील या लेखकाचे नाव या संदर्भात अपवाद म्हणून आठवू शकते.) मराठी ग्रामीण साहित्याच्या दालनात यादव म्हणतात त्याप्रमाणे खरोखरच भर पडत आहे; पण त्या निर्मितीमधील गुणवत्ताही, अलिपतपणे व वस्तुनिष्ठपणे तपासून पाहायला हवी. तिसऱ्या पिढीतील ग्रामीण कथाकारांच्या निर्मितीबाबतचे असमाधान त्या कथासंग्रहाच्या प्रस्तावनेत यादवांनीच स्वत:च नमूद करून ठेवले आहे. ग्रामीण साहित्याच्या समिक्षेतबाबतही हाच प्रश्न विचारता येईल. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गेल्या वीस वर्षांत अनेक महाविद्यालये सुरू झाली आहेत. ग्रामीण परिसरात अध्ययन-अध्यापन करणाऱ्या प्राध्यापकांनी ग्रामीण साहित्याचे कितपत मूल्यमापन केले आहे? (या बाबतीतही प्रा. रा. ग. भोसले, प्रा. र. बा. मंचकर, प्रा. बाळकृष्ण कवठेकर ही हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच नावे नजरेसमोर येतात.) प्रा. यादव म्हणतात त्याप्रमाणे ग्रामीण वाचकांचा वर्ग तयार झाला आहे (?) त्याप्रमाणे समिक्षकांचाही वर्ग तयार होणे आवश्यक आहे.
साहित्यातील एका विशिष्ट भागाचा, वर्गिकरणदृष्ट्या स्वत:ची भूमिका मांडून विचार करण्यास कोणतीही हरकत नसावी. किंबहुंना साहित्यातील वैश्विकता स्वीकारूनच प्रा. आनंद यादवांनी आपली स्वतंत्र भूमिका मांडली आहे. साहित्याच्या आकलन-आस्वादासाठी ‘ग्रामीण’हे विशेषण लावण्यासही प्रत्यवाय नसावा, परंतु आनंद यादव यांनी ग्रामीण साहित्यविषयक स्वत:ची भूमिका मांडताना शहरी मध्यमवर्गीय साहित्य आणि मध्यमवर्गीय टीकाकार यांच्याबाबतीत पक्षपात केल्यामुळे त्यांच्या महत्त्वपूर्ण अशा विवेचनास मर्यादा पडल्या आहेत. ...Read more