DAINIK LOKSATTA 25-06-2000ग्रामीण महाराष्ट्रातील परिवर्तनांचा मागोवा...
१९६० पासून ग्रामीण साहित्याचा जो प्रवाह मराठी साहित्यात जोर धरु लागला त्याचे आघाडीचे शिलेदार होते डॉ. आनंद यादव. ग्रामीण जीवनाचं वास्तव दर्शन त्यांनी आपल्या ‘गोतावळा’, ‘झोंबी’ आणि इतर कादंबऱ्यांतून तसेच थांतून घडवले. विशेष म्हणजे ग्रामीण साहित्याची संकल्पना मांडून, परंपरा दाखवून, समिक्षेसाठी उपयुक्त असे निकषही त्यांनी रुजवले, त्यांच्या ललित लेखनातून आणि समिक्षेतून त्यांची ग्रामजीवनाबद्दलची ओढ, ग्रामीण संस्कृतीत होणाऱ्या विघटनाबद्दलची खंत सातत्याने दिसते. ‘ग्रामसंस्कृती : दशा आणि दिशा’ या त्यांच्या लेख-संग्रहात आनंद यादव भारताचा कणाच असणाऱ्या एकेकाळच्या ‘ग्रामसंस्कृती’त होत गेलेली स्थित्यंतरे वाचकांसमोर मांडतात.
मुळात हे लेख म्हणजे ‘दैनिक सकाळ’ च्या रविवार आवृत्तीत (१९९८ मध्ये) प्रसिद्ध झालेले सदर आहे. सर्वसामान्य वाचकवर्ग डोळ्यांसमोर असल्यानेच बहुधा सोप्या, सुटसुटीत भाषेत ग्रामीण संस्कृतीची निर्मिती कशी झाली येथपासून ते आज ग्रामीण संस्कृतीचा ऱ्हास का होतो आहे येथपर्यंतचा मागोवा यादवांनी घेतला आहे.
प्रकृती, विकृती आणि संस्कृती या शब्दांतील नाते स्पष्ट करीत संस्कृती हा मानवी मूळ स्वभावाचाच एक भाग कसा आहे हे आनंद यादव स्पष्ट करतात. संस्कृती चांगल्या कृतींची आणि गतिमान असते. स्वास्थ्य मिळाल्यावरच माणूस संस्कृती निर्माण करु शकतो हे पहिल्या लेखातून स्पष्ट होते. ‘अंतरंगातील एकता’ या लेखात भारतात ग्रामसंस्कृतीचा आत्मा आहे आणि भारतात शेती कधीच संपुष्टात येणार नाही हे ठसवलं गेलं आहे. याच लेखात, भारतात ऐक्य राखणाऱ्या हिंदू धर्माच्या लवचिकतेबद्दलही थोडे विवेचन येते. पूर्वापार हिंदूंनी मुसलमान व खिश्चनांना सोबत घेऊनच विकास केला आहे. ‘अंतरंगातील एकात्मता हाच भारतीय संस्कृतीचा गाभा आहे’ असे विधान यादवांनी केले आहे.
भारतीय संस्कृतीत अंतरंगात एकात्मता असली तरी बहिरंगात विविधता कशी आहे त्याबद्दल लगेचच पुढल्या लेखात लेखकाने सांगितले आहे. विशेषत: महाराष्ट्रात कोकण, विदर्भ आणि मराठवाडा या भागातील प्राकृतिक वैशिष्टये वेगळी असल्याने तेथील माणसांची घरे, शेतीतील उत्पादने, पोशाख, राहणी या सगळ्यांतच फरक पडला आहे. याखेरीज त्या-त्या गावाची म्हणून काही वैशिष्टये असतात. (उदा. कोल्हापूरच्या तालमी) आणि त्यामुळेही ते गाव सांस्कृतिकदृष्टया इतर गावांहून कसे वेगळे ठरते याचे सोदाहरण विवेचन आनंद यादवांनी केले आहे.
शेतकऱ्याची निसर्गाबद्दलची जाण कशी असते, दिवसाचा कोणता प्रहर आहे हे त्याला कसे चटकन समजते, नुसत्या आवाजावरुन तो पक्षी कसा ओळखतो हे सांगत शेतकरी ‘निसर्गाचं लेकरुच’ असतो, असे यादव सांगतात. सुशिक्षितांपेक्षा शेतकऱ्यांची भाषाही कशी वेगळी असते याचेही नमुने त्यांना दिले आहेत. कष्टाचं, साधं पण सुखी-समाधानी आयुष्य जगणाऱ्या शेतकऱ्याचं एक आदर्श चित्रच यादवांनी वाचकांच्या डोळ्यांसमोर उभं केलं आहे.
‘ग्रामसंस्कृती’ या पुस्तकाचं स्वरुप बरंचसं माहितीवजा आहे. क्वचित लेखकाने स्वत:चे व्यक्तिगत अनुभव सांगितले आहेत, त्यामुळे शेतकऱ्याचा एकूण दिनक्रम कसा असतो, मोट जुंपून शेताला पाणी कसे दिले जाते, भांगलण-खुरपण सतत कशी करावी लागते, त्यासाठी कोणती साधने वापरतात याबद्दल बारकाईने माहिती आणि निरीक्षणे लेखकाने नोंदवली आहेत. प्रतिभावंत कवी ‘पावसाची गाणी’ लिहितात पण त्यांना पावसाने शेतकऱ्याची केलेली दैना दिसत नाही. तसेच ग्रामीण साहित्य लिहिणारे प्रारंभीचे लेखक इनामदार, पाटील, कुलकर्णी यांच्याच घरांची चित्रणे कशी करीत याबद्दलही यादव उपरोधाने लिहितात.
गावाची जीवनसरणी कशी असते, विशेषत: बलुतेदारी पद्धत कशी चालत होता, गावात पूर्वापार सहकाराने कामे कशी चालत, लग्नसोहळे गावकऱ्यांच्या मदतीनेच कसे पार पडत, जत्रेच्या दिवसात गावातला उत्साह कसा असे, सणांचा फराळ बायका एकत्र येऊन कसा करीत याबद्दल लेखक सांगतो. एकंदर, पूर्वीचा गाव व्यक्तिवादी संस्कृती मानत नव्हता, तरीही गावातच व्यक्तीचा, कुटुंबाचा आणि गावाचाही सर्वांगीण विकास कसा होत असे, याबद्दलची रोचक माहिती यादवांनी दिली आहे. पूर्वी ग्रामसंस्कृतीवर निसर्गाचे निरंकुश नियंत्रण कसे असे याबद्दलही यादव सांगतात. शेती करण्यापूर्वी शेतकरी पाच मावल्यांची पूजा करी, शेतावर कीड, टोळधाडी कशा येत, उंदीर कसे नुकसान करीत, शेतकऱ्याची अर्थव्यवस्था प्रत्यक्ष चलनाखेरीजच कशी चाले, पैसे घेऊन धान्य विकणे शेतकऱ्याला कमीपणाचे कसे वाटे, लोकसंख्येवर कोणाचेच नियंत्रण कसे नसे, रोगराईत माणसे कशी मरत, अशा अनेक गोष्टींबद्दलची माहिती या पुस्तकात आहे.
शेतकऱ्याचं काम हे निर्मितीचं आणि सृजनाचं कसं असतं हे काम किती हळुवारपणे, दक्षतेनं करावं लागतं या संदर्भातला एक लेख सदर पुस्तकात आहे. विहिरींचेही वेगवेगळे प्रकार कसे असतात याबद्दलची माहिती जिज्ञासूंना मजेशीर वाटेल.
‘मातीत उगवणारी मुलं’ या लेखात यादव ग्रामीण संस्कृती आणि शहरी संस्कृतीची तुलना करताना दिसतात. गावातील मुलं ‘मातीत पेरलेल्या बियाणासारखी’ सहज कशी वाढतात याबद्दल यादव सांगतात.
शहरी व ग्रामीण घरांची तुलना एका लेखात येते. शहरातली घरं म्हणजे बंद ब्लॉक्स अगदी ‘छानदार घरकुलं’ असतात, परंतु शेतकऱ्याचं रानातलं घर कसं सामान-सुमानाने भरलेलं, उंदीर, घुशींनाही आसरा देणारं असतं याचं चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं. मात्र घरात लग्न ठरलं की मग मात्र गावातली घरं कशी रुप पालटतात तेही कळतं.’
गावातली अस्वास्थ्याचीही कारणमीमांसा आनंद यादवांनी केली आहे. वाढत जाणाऱ्या लोकसंख्येमुळे गावातील शेतजमिनीवर खाणाऱ्या तोंडाचा भार अधिक पडू लागला, कुटुंबं मोडली, जमिनीच्या वाटण्या झाल्या. गावातल्या अस्वास्थ्याचं हे पहिलं कारण होतं, चातुर्वण्र्य व्यवस्थेमुळे कनिष्ठ जाती, भरडल्या जाऊ लागल्या हे अस्वास्थ्याचं दुसरं कारण सांगितलं आहे. व्यवसाय बदलण्याचे स्वातंत्र नसल्याने, गावगाड्यात उपाशी राहणाऱ्या जमाती चोऱ्या करु लागल्या हेही गावातील अस्वस्थतेला कारण ठरलं, अज्ञान, अंधश्रद्धा, संशयीपणा, वैर यामुळेही गावाचं स्वास्थ्य नेहमीच बिघडताना दिसतं. या अस्वास्थ्यामुळे, असुरक्षिततेमुळेच गावकरी खूप श्रद्धाळू बनतात आणि अघोरी शक्तींवरही विश्वास ठेवताना दिसतात.
‘अवनतीचा काळ’ या लेखापासून पुढचे सुमारे वीस -- महाराष्ट्रातील ग्रामजीवन कसे विस्कळीत, विघटित आणि उध्वस्त होत गेले ते सांगणारे आहेत. इंग्रजांच्या आगमनामुळे गावांची स्वयंपूर्णता नष्ट झाली, वस्तुविनिमय पद्धत मागे पडून चलनाला महत्व आले. औद्योगिक क्रांतीचे परिणाम म्हणून आगगाडी, मोटारी आल्या आणि गाव हळूहळू बदलू लागला. गुजराती, मारवाडी व्यापारी महाराष्ट्रात येऊन लुबाडू लागले, इंग्रज तर कच्चा माल त्यांच्या देशात पाठवून गावांची लुबाडणूक करीतच होते. फायदे झाले ते एवढेच की गावात आरोग्यसोयी वाढल्या आणि शिक्षण दिले जाऊ लागले.
लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य यासारख्या नव्या मूल्यांमुळे एकंदर भारताचे चित्रच बदलू लागले. भौतिकवाद, प्रवृत्तीवादाला महत्व आले. समाजसुधारणा चळवळी सुरू झाल्या. बहुजन समाजातूनही सुधारक मतांचे नेतृत्व पुढे येऊ लागले. म. फुले यांनी पहिल्यांदा शेतकऱ्याच्या दु:स्थितीकडे लक्ष वेधले. आनंद यादव तर त्यांना नव्या ग्रामसंस्कृतीचे आद्य प्रवर्तक म्हणतात. ते महाराष्ट्राचे मार्क्स होते असेही त्यांना वाटते. त्याखालोखाल शाहू राजांनी केलेल्या समाजसुधारणेच्या प्रयत्नांचाही ते गौरवाने उल्लेख करतात. भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेने शेतकऱ्यांना काम करता-करता शिकण्याची संधी दिली हेही महत्वाचे होते. महात्मा गांधींनी ‘खेड्याकडे चला’ ही घोषणा केल्याने खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांना ते कसे ‘आपले’ वाटले आणि त्यांचा काँग्रेसकडे ओढा कसा राहिला याबद्दलही यादव सांगतात. दुसऱ्या महायुद्धाची झळ भारतीय खेंड्यांना कशी लागली, रेशनिंग आले आणि शेतकरी मोठ्या संख्येने शहराकडे कसे धावू लागले हे सांगून ‘‘गांधीजी आणखी काही वर्षे राहिले असते तर ग्रामीण समाजात आणि संस्कृतीत मूलभूत परिवर्तने झपाट्याने घडली असती... आता ते स्वप्न फार दूर गेले आहे,’’ अशी खंत आनंद यादवांनी व्यक्त केली आहे.
पंचवार्षिक योजना आल्या, पण त्याचे फायदे बडे शेतकरीच खाऊन गेले आणि सामान्य शेतकरी मात्र भुके, कंगाल झाले हे वास्तव पुढे मांडले आहे. ग्रामीण जनतेची पिळवणूक स्वातंत्र्योत्तर काळात गावागावांत सतावणारा अस्पृश्यतेचा प्रश्न धसाला लागला. डॉ. आंबेडकरांच्या अथक प्रयत्नांमुळे अस्पृश्यांची स्थिती थोडीफार सुधारली पण आज लोकसंख्यावाढीमुळे सगळीकडेच बेकारी दिसते आहे. ‘कूळ कायदा’ ही आणखीन एक सकारात्मक गोष्ट स्वातंत्र्योत्तर काळात आली, पण इथेही बड्या जमीनदारांनी स्वतःचा फायदा करून घेऊन गरीब शेतकऱ्यांना नागवले. ही वस्तुस्थिती सांगून ‘‘देशाच्या विकास योजनांच्या माध्यमातून ग्रामीण विभागात जाणारे एस.टी.चे धूळमार्ग किंवा रेल्वेचे रुळमार्ग खेड्यांच्या विकासासाठी न जाता प्रत्यक्षात शोषणासाठीच गेले,’’ अशी खंत आनंद यादव व्यक्त करतात.
नव्या काळात शेतीसाठी नवी बियाणं, नवी खतं आली, पण त्याने उत्पादन वाढलं तरी चव गेली. मोट जाऊन आज विहिरींवर विजेचा पंप आला, पण त्याचा कारभार वीजपुरवठ्याच्या मर्यादेवर अवलंबून. तो बिघडला तर शेतकऱ्याला नवा खर्च. ट्रॅक्टर, मळणी यंत्रे आली आणि बैलांचं महत्व कमी झालं, पण या सगळ्यामुळे नैसर्गिक जीवनचक्रापासून शेती दूर गेली आणि आत्मनिर्भर असलेला शेतकरी परावलंबी झाला. शहरात आहे ते आपल्याकडेही हवं या ईर्षेपोटी शेतकऱ्याचा आत्माच हरवला. मोटरसायकल, रेडिओ, टी.व्ही. इ. गोष्टींमुळे गावात वरवरची आधुनिकता आली. सहकाराच्या नावाखाली बड्या शेतकऱ्यांनी राजकीय सत्ता राखल्या आणि छोट्या शेतकऱ्यांना लुबाडून स्वत: गब्बर झाले. ही परिवर्तने ग्रामीण संस्कृतीला विघातक ठरली.
जातीव्यवस्था हे ग्रामसंस्कृतीचे वैशिष्टय आणि आधुनिकतेतील अडचण. आज वरवर जाती विसरल्या गेल्या आहेत, पण त्या आहेतच ! फरक एवढाच की राजकारण आता जातीपेक्षा पैसा पणाला लावून खेळलं जातंय !
आज ग्रामीण कलांचा ऱ्हास होतो आहे, शिक्षणसंस्था राजकीय सत्ता टिकविण्याच्या नादात पैसे खेचण्याची केंद्रे बनल्या आहेत. ग्रामीण तरुणाला कुठेच काम मिळत नसल्याने तो गोंधळला आहे, नेतृत्व बहुजन समाजातलं असलं तरी भ्रष्टाचार, लाचलुचपतीने डागाळलेलं आहे. चळवळींमुळे थोडा आशावाद आहे. या साऱ्यांची कारणमीमांसा आनंद यादवांनी शेवटच्या काही प्रकरणांतून दिली आहे आणि यातूनही कसा मार्ग काढता येईल हे सांगणारे काही उपायही नोंदवले आहेत.
‘ग्रामसंस्कृती’ हा माहिती देणारा लेखसंग्रह असल्याने काही वैशिष्टयपूर्ण शब्द आनंद यादव वापरतात. त्यांचं स्पष्टीकरणही ते देतात. कित्येक ठिकाणी यादवांची भाषा लालित्यपूर्ण होते. उदा. ‘या वाटा किंवा रस्ते लेकुरवाळे वाटतात’, ‘पेहलवानांचे कळप हत्तीच्या कळपासारखे दिसत’, फताड्या शिंगांच्या म्हशींना ‘ओव्हरटेक’ करणं ट्रक ड्रायव्हरलाही महाकठीण!’ लेखांना दिलेली शीर्षकही बोलकी आहेत. उदा. ‘निसर्गाचं लेकरु’, ‘मोकळे राज्य’,‘मातीत उगवणारी मुलं’, दूर गेलेले स्वप्न’, ‘रस निघून गेलेला ऊस’, ‘नासलेल्या शिक्षणसंस्था’ इत्यादी.
एकंदर, ग्रामीण समाजशास्त्राच्या आणि ग्रामीण साहित्याच्या अभ्यासकाला उपयुक्त वाटणारा आणि जिज्ञासू वाचकाला नव्या - जुन्या ग्रामसंस्कृतीद्दल बरीच माहिती देणारा असा हा आनंद यादव यांचा हा लेखसंग्रह आहे. ...Read more