DAINIK SAKAL 12-05-2019गुलजार यांच्या पटकथांचं व्यामिश्र, तरल पट...
गुलज़ार... अतिशय संवेदनशील पटकथाकार, कवी, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक. म्हणजे गुलज़ार यांच्या या प्रत्येक भूमिकेमागे संवेदनशील हे विशेषण अत्यंत चपखल बसतं. यापैकी पटकथाकार ही गुलज़ार यांची भूमिका त्यांच्या पकथांच्या संहितांसहित अधोरेखित केली आहे मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी. त्यांनी सहा पुस्तकांतून गुलज़ारांच्या एकोणीस पटकथा अनुवादित स्वरूपात वाचकांच्या भेटीला आणल्या आहेत.
व्यावसायिकतेचा विचार न करता मनाची स्पंदनं टिपणारी पटकथा लिहिणं या वैशिष्ट्यामुळे गुलज़ार यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:चं स्वतंत्र आणि अढळ असं स्थान प्राप्त केलं. (कवी, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक म्हणूनही त्यांचं हे वैशिष्ट्य आहे आणि त्याही बाबतीत त्यांचं स्थान स्वतंत्र आणि अढळ आहेच.) वरवर साध्या वाटणाऱ्या, पण मानवी मनाला आणि जीवनाला आरपार भिडणाऱ्या या पटकथा आहेत. पडद्यावर आपण त्या अनुभवल्या आहेत; पण आता लिखित स्वरूपात त्या अनुभवताना आपण परत एकदा गुलज़ार यांच्या तरल भावविश्वात सहभागी होणार आहोत. त्या कथांतील वातावरणाशी, व्यक्तिरेखांशी एकरूप होणार आहोत.
गुलज़ार यांनी स्वत: त्यांच्या पटकथांचं दिग्दर्शन केल्यामुळे (काही अपवाद वगळता) त्या पटकथांतील संवेद्यता, तरलता ते पडद्यावरही अबाधित ठेवू शकले. किंबहुना, पटकथा लिहिताना हे दृश्य आपण पडद्यावर कसं चित्रित करणार आहोत, याचा विचार त्यांच्या मनाशी पक्का असावा, असं म्हणायला वाव आहे; कारण त्यांच्या चित्रपटांच्या प्रत्येक फ्रेममधून हे जाणवत राहतं.
गुलज़ार यांनी त्यांच्या पटकथांमधून विविध विषय हाताळले आहेत. आँधीतील राजकारणाच्या पार्श्वभूमीवरील ‘आरती’ (सुचित्रा सेन) आणि जे. के. यांचे मनोव्यापार आपण पडद्यावर अनुभवलेत. ‘अचानक’मधील खुनी मेजर रणजीत खन्ना (विनोद खन्ना) आणि त्याच्या आजूबाजूच्या माणसांचं व्यामिश्र भावविश्वही टिपलंय आपण पडद्यावर. ‘किताब’मधील बाबला (मा. राजू)ची भावनिक आंदोलनंही अनुभवली आहेत आपण पडद्यावर.
’खुशबू’ या आगळ्यावेगळ्या प्रेमकहाणीतील डॉक्टर वृंदावन (जितेंद्र) आणि कुसुम (हेमामालिनी) अजूनही आपल्या स्मरणातून पुसले गेले नाहीत. ’मासूम’मधील डी. के. (नसिरुद्दीन शाह), इंदू (शबाना आझमी) आणि राहुल (जुगल हंसराज) या व्यक्तिरेखांच्या मनाची स्पंदनंही अनुभवली आहेत आपण. सुधा (रेखा), महेंद्र (नसिरुद्दीन शाह) आणि माया (अनुराधा पटेल) या प्रेमाच्या त्रिकोणातील व्यामिश्रता ‘इजाज़त’द्वारे अस्वस्थ करून गेली आहे आपल्याला. आणि ‘नमकिन’, ‘किनारा’, ‘लेकिन’, ‘हुतूतू’, ‘लिबास’, ‘माचिस’, ‘मीरा’ ‘न्यू देहली टाइम्स’, ‘मेरे अपने’, ‘परिचय’, ‘कोशिश’ या पटकथांतूनही त्यातील सशक्त व्यक्तिरेखांच्या माध्यमातून जीवनाला भिडण्याची एक समृद्ध अनुभूती देतात गुलज़ार. ‘अंगूर’मधून ते आपल्याला मनमुराद हसवतात.
पडद्यावरही व्यक्तिरेखा व्यामिश्रतेने साकार होईल, याची पुरेपूर काळजी पटकथा लिहिताना गुलजार घेतात. त्यामुळेच त्यांच्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनावर ठसतात. फ्लॅशबॅक आणि वर्तमान यांची सांगड घालताना त्या पटकथेत निर्माण होणारं नाट्य, विपरीत परिस्थितीमुळे उभा राहणारा मानसिक, भावनिक संघर्ष ही त्यांच्या पटकथेची बलस्थानं आहेत. पटकथेतील या नाट्याला, मानसिक, भावनिक संघर्षाला गुलज़ार त्यांच्या तरल गीतांमुळे अधिक उंचीवर नेऊन ठेवतात. उदा. जे. के.ची आरतीच्या सहवासाची ओढ व्यक्त करताना ते सहज लिहून जातात तुम जो कह दो तो आज की रात चाँद डूबेगा नहीं । रात को रोक लो। रात की बात है और ज़िन्दगी बाकी तो नहीं ।
तर असा आहे गुलज़ारांच्या पटकथांचा हा मनोरंजक आणि अंतर्मनाला आवाहन करणारा प्रवास. या पटकथांबरोबरच गुलज़ार यांची दीर्घ मुलाखत, त्या त्या चित्रपटाच्या पटकथेविषयी त्यांनी केलेलं भाष्य, त्या त्या चित्रपटांतील गीतं (हिंदीमध्ये), त्या चित्रपट चित्रीकरणाच्या प्रसंगीची छायाचित्रंही या पुस्तकांमध्ये समाविष्ट केली आहेत. अंबरीश मिश्र, सविता दामले आणि वसंत पाटील यांनी या पटकथांचा अनुवाद केला आहे. परिस्थिती आणि व्यक्तिरेखा यांचं अत्यंत संयत चित्रण करणाऱ्या या पटकथा आस्वाद आणि अभ्यास (विशेषत: आकृतिबंधाच्या दृष्टीने) दोन्हीसाठी आवर्जून वाचाव्या अशा आहेत.
-अंजली पटवर्धन ...Read more
बिगुल २३ फेब्रुवारी २०१८ कथाकार ,कवी ,गीतकार ,दिग्दर्शक ,निर्माता असलेल्या गुलजारजींनी अतिशय संवेदनात्मक मार्मिकतेनं,सहानभूतीनं आणि करुणेनं ओतप्रोत भरलेल्या अनेक चित्रपटांचे पटकथालेखन केलेले आहे. पटकथा हा साहित्यातला सर्वांगसुंदर प्रकार.त्यामुळे मूळ रचनेचा आस्वाद वाचकाला घेत येतो. गुलजारजींच्या मीरा ,अंगूर,न्यू देहली टाईम्स, मेरे अपने ,परिचय ,कोशिश ,हुतूतू ,लिबास ,माचीस ,खुशबू, मासूम ,इजाजत ,किनारा ,नमकीन ,लेकीन ,आँधी ,अचानक ,किताब ,मौसम अशा एकूण १८ पटकथांचा समावेश असलेला ‘गुलजार पटकथा ‘ हा सहा पुस्तकांचा संग्रह वाचकाला या फॉर्मविषयी रुची निर्माण व्हावी याकरताच मेघना गुलजार यांनी तयार केलाय. मेहता पब्लिशिंग हाऊसनं हा संच मराठीतून प्रकाशित केलाय.अंबरीश मिश्र वसंत पाटील व सविता दामले या दिग्गज अनुवादकांनी त्याचा सुंदर अनुवाद केलाय. या १८ पटकथांसोबतच गुलजारजींची यशवंत व्यास यांनी घेतलेली मुलाखतही या पुस्तकांत वाचयला मिळते.त्यातून कवी ,पटकथाकार व दिग्दर्शक म्हणून गुलजार यांची विचार करण्याची पद्धत , बैठक लक्षात येत जाते .त्यांचा आतले अनेक मूड समोर येत जातात .
सर्वसामान्य चित्रपटांपेक्षा गुलजार यांच्या चित्रपटातलं वातावरण वेगळं असतं आणि पात्रदेखील. चित्रपटांमुळे ते जीवनाच्या जवळ येण्याचा, त्यात खोलवर शिरण्याचा प्रयत्न करत आले आहेत व ती इच्छाच त्यांच्या कलानिर्मितीचं कारण आहे. माणूस नावाच्या प्राण्याविषयी त्यांना अपार प्रेम आहे. ‘कोई शक्स’ पुरा काला नही है ‘कोई पुरा सफेद नही है ‘ हे त्यांना नीट समजलेलं आहे त्यामुळेच माणसात गुण असतात व दुर्गुणही असतात .ह्या स्वीकारातून त्यांचा व्यक्तिरेखा घडतात. मानवी नातेसंबंधांचा शोध हा त्यांच्या चित्रपटांचा मध्यवर्ती विषय असतो .त्याचबरोबर आपल्या लेखनाद्वारे कित्येक परंपरागत समजुती धारणांदींना त्यांनी धक्का दिला आहे .त्याच्या चाहत्यांचा लेखी तर त्यांनी कॅमेऱ्याचा डोळ्यांतून कविताच रेखाटली आहे .कथानकाच्या गूढार्थाला आपला असा स्पर्श देऊन दृष्यात्मकेला एक वेगळ व विलक्षण वळण दिलं आहे .संवाद आणि गीतांमधून पात्रांना साजिवंत केलं आहे .त्यानं त्यांच्या अनुभूती ज्या भाषेत साकारल्या आहेत त्या अनुभवताना शब्दा –शब्दागणिक त्या भाषेचा प्रभाव अधिकाधिक गडद होत गेलाय. अन् त्या भाषेमागं आहे गुलजारजींच्या अनुभवांचा विस्तीर्ण पटल . तो या पुस्तक संचातून उलगडत जातो .
गुलजारांची आपली म्हणून एक जिद्द आहे .या जिद्दीची म्हणून एक मात्तबरी आहे आणि तिची अशी एक उंची आहे. एक फिल्म म्हणजे आपल्यामध्ये काही-एक रुजवणं असतं.एखादा सब्जेक्ट मला स्पर्शून जातो. एखादे चरित्र आकर्षित करते. एखाद्या घटनेच्या जटीलतेत मी आपल्या शक्यतांचा मागोवा घेतो .गुंता उकलण्याचा आटापिटा सुरु होतो .एखादं समोर उभं राहतं .नंतर योग्य वेळ आल्यावर ते प्रकट होतं.
पात्राशी संवाद व्हायला हवा .त्यांचा इरादा ,त्यांचे उद्दीष्ट आणि आवड वगैरे स्पष्ट असावे .नात्याचे जितके म्हणून पदर असतात ,हर्ष नि विषाद असतात ,त्याआधारे त्यांना आत्मगत करावे .त्यांचा गंध अनुभवावा.त्यांचा स्पर्श जागून पाहावा .’
केवळ चित्रपटाच्या अभ्यासकांनी हे पुस्तक वाचावे असे नाहीये तर ज्यांना कोणताही चित्रपट उत्तम रितीनं समजावून घ्याचाय त्या प्रत्येकानं वाचावं असं हे पुस्तक आहे .कारण चित्रपट हे माध्यम मनोरंजनाचं असलं तरी त्याहीपलीकडं आरपार जाऊन त्यातून जीवनाची अनोखी सुक्ते मिळत असतात .ती टिपता यावी लागतात .चित्रपट नुसता बघण आणि समजणं यात फरक असतो .ती समजण्याची प्रत्येकाची पातळी ही वेगवेगळी असते .ती वाचन व अभ्यासातून सातत्याने वाढवत ठेवावी लागते. तरच उतमोत्तम चित्रपटांचा रसरशीत आस्वाद घेता येतो .भावना व विचारांचा परिपोष वाढवता येणं शक्य होतं .ते या पुस्तकानं नक्कीच होईल . कारण पटकथा तर यात वाचायला मिळतातच पण प्रक्रियाही वाचयला मिळते . ज्यातून आपण नक्कीच श्रीमंत होतो . म्हणजे असं की गाडी , बंगला , बँकबँलन्स यापलीकडंही एक श्रीमंती असते ती श्रीमंती . जी कायम आपल्यासोबत असते .
...Read more
LOKPRABHA - 19-01-2018मराठीत गुलजार पटकथांचा खजिना...
हिंदी सिनेमा तसंच साहित्याच्या क्षेत्रात गुलजार हे महत्त्वपूर्ण नाव. जगण्यातल्या वेगळ्या जाणिवा शोधणारे, भाषेची श्रीमंती लाभलेले, भावभावनांचा अतिशय तरल आविष्कार करणारे गुलजार कवी म्हणून जितके भावणारे आहेत तितकेच पटकथालेखक, संवादलेखक, गीतकार, दिग्दर्शक म्हणून त्यांनी महत्त्वाचे योगदान दिलेले आहे.
विशाल भारद्वाजच्या ‘ओमकारा’सारख्या सिनेमात ‘बिडी जलायले जिगर से पिया’सारखं गीत लिहिण्याची क्षमता वयाच्या सत्तरीनंतरही बाळगणं ही गुलजारांची लवचिकता खरोखरच चकित करणारी आहे. त्यांनी लिहिलेली गाणी, संवाद पटकथा यांच्यामुळे त्या त्या चित्रपटांना एक वेगळंच महत्त्व येत. त्यांनी आजवर लिहिलेल्या १८-१९ सिनेमांच्या पटकथा मराठीत आणण्याचं महत्त्वाचं काम मेहता प्रकाशनाने केलं आहे. अंबरीश मिश्रा, सविता दामले आणि वसंत पाटील या तिघांनी या १८-१९ पटकथांचा अतिशय उत्तम असा मराठी अनुवाद केला आहे. त्यांच्या या कामामुळे गुलजार पटकथांचा खजिनाच मराठी वाचकांच्या हातात आला आहे.
सिनेमाचं वेड असणाऱ्या बहुतेकांना एकतर सिनेमाच्या पडद्यावरच्या सादरीकरणात म्हणजे पडद्यावर तो कसा दिसतो आहे यात रस असतो किंवा तो पडद्यावर आणणाऱ्या नट-नट्यांमध्ये, त्यांच्या ग्लॅमरसमध्ये रस असतो. पण हे ग्लॅमर म्हणजे सिनेमाचं हिमनगाचं टोक असतं. त्यापलीकडे पटकथा, दिग्दर्शन, गीतरचना, संवाद, सिनेमॅटोग्राफी अशा वेगवेगळ्या आघाड्यांवर सिनेमा घडत असतो. पटकथा हे त्यातलं अत्यंत महत्त्वाचं अंग. पटकथा नीट बांधेसूद असेल, आपल्याला नेमकं काय दाखवायचं आहे याबद्दल दिग्दर्शकाला स्पष्टता असेल तर तो सिनेमा पडद्यावर नेमका उतरत जातो. पटकथा चांगली असेल तर सिनेमा निम्मी आघाडी आधीच जिंकतो. संवाद हा तर सिनेमाचा प्राण.
समोर पडद्यावर दिसणारी चालतीबोलती जिवंत माणसं जे बोलतात, ते खरं विश्वासार्ह वाटावं अशी प्रेक्षकांची अपेक्षा असते. ती माणसं काहीतरी जडजंबाळ बोलायला लागली तर त्यांच्यावरचं लक्ष उडून जाऊ शकतं. ती माणसं पडद्यावर जी व्यक्तिरेखा सादर करत असतात, तिला अनुरूप त्यांचे संवाद असावे लागतात. नाही तर पडद्यावर जे चाललं आहे ते सगळंच नाटकी वाटू शकतं. साधारण दहा-बारा वर्षांपूर्वी सिनेमातली लहान मुलं लहान मुलांसारखी बोलायचीच नाहीत. ती मोठ्या माणसांना लहान मुलांनी जे बोलणं अपेक्षित असतं ते बोलायची. ते बघणाऱ्याना लहान मुलं कुठं असं बोलतात असं वाटत राहायचं. हे लक्षात घेतलं तर संवाद लेखनाचं महत्त्व लक्षात येतं.
संवाद हे त्या व्यक्तिरेखेला व्यक्तिमत्त्व प्रदान करत असतात. आणि गीत-गाणी हा तर भारतीय सिनेमांचा आत्मा आहे. निव्वळ गाण्यांवर चाललेल्या कित्येक सिनेमांची उदाहरणं देता येतील. मग लेखन, पटकथा, लेखन, दिग्दर्शन, संवादलेखन, गीतलेखन या सगळ्याच आघाड्यांवर आपला ठसा उमटवणाऱ्या गुलजार यांचं सिनेरसिकांना किती अप्रूप वाटत असेल हे वेगळं सांगायला नको. या पार्श्वभूमीवर गुलजार यांच्या १९ पटकथांचा समावेश असलेला हा संच सच्च्या सिनेमाप्रेमीला समग्र गुलजारच आपल्या हातात आल्याचा आनंद देतो.
वर म्हटल्याप्रमाणे चांगली पटकथा ही चांगल्या सिनेमाने जिंकलेली निम्मी लढाई असते. पण सिनेमा तांत्रिकदृष्ट्या फारसा माहीत नसल्यामुळे सामान्य माणसाच्या दृष्टीने पटकथा म्हणजे रचनेच्या दृष्टीने अवघड असं काहीतरी असतं. प्रत्यक्षात आपल्या नजरेला जे पडतं त्याला आपण दृश्य म्हणतो आणि एकानंतर दुसरं दृश्य असं दृश्यमालिकेच्या रूपात सांगितलं जातं ती पटकथा. या पुस्तकांच्या प्रस्तावनेत म्हटलं आहे त्याप्रमाणे पटकथेसाठी इंग्रजीत दोन शब्द वापरले जातात, ते म्हणजे स्क्रीनप्ले आणि सिनारिओ. स्क्रीनप्ले हा दिग्दर्शकासाठी महत्त्वाचा, कारण त्यात अनेक तांत्रिक सूचना असतात. तर सामान्य वाचनासाठी सिनारिओ हा प्रकार योग्य वाटतो. त्यात कोणत्याही सूचना नसतात. तो एखाद्या कादंबरीसारखा वाचता येतो. सामान्य वाचकासाठी ती इतर साहित्यकृतीसारखीच एक कलाकृती ठरते.
सिनेमा बघणाऱ्या प्रेक्षकाला त्या सिनेमांची पटकथा कशी लिहिली जाते, ती नेमकी कशी असते याचं कुतूहल असतं. खुपदा गाजलेल्या कादंबरीवरून सिनेमा तयार केला जातो आणि तो कादंबरीइतका चांगला जमलेला नाही अशी प्रतिक्रिया सहज दिली जाते किंवा एखाद्या कादंबरीचं नाट्यरूपांतर किंवा नाटकाचं सिनेमात रूपांतर होताना कथानकात बदल होत गेले आहेत असं म्हटलं जातं. त्यात कधी मूळ कथानकातल्या काही गोष्टी काढून टाकाव्या लागतात किंवा मूळ कथानकात नसलेलं काहीतरी समाविष्ट करावं लागतं. असा बदल करणं ही त्या त्या माध्यमाची गरज होती असा दावाही केला जातो.
हे सगळं नेमकं काय असतं, का केलं जातं, हे समजून घ्यायचं असेल तर पटकथा वाचायची सवय असायला हवी. चांगल्या सिनेमांच्या पटकथा प्रसिद्ध व्हायला हव्यात. तशा त्या इंग्रजीत आहेत, पण मराठीत फारशा नाहीत. गुलजार पटकथा संचाच्या निमित्ताने मराठी चित्रपट रसिकांना पटकथा नेमकी कशी असते हे समजून घ्यायची संधी मिळाली आहे. अडीच-तीन तासांचा सिनेमा बघण्यासाठी सिनेमाच्या चाहत्यांना एका जागी बसून दोन अडीच तास वेळ देऊन तो बघावा लागतो. तेवढं केलं की ‘सिनेमा काय भारी होता’ किंवा ‘अगदीच फडतूस होता’ अशा प्रतिक्रिया द्यायला तो मोकळा होतो. पण सिनेमा निर्माण होताना अनेक वेगवेगळ्या पातळ्यांवरून गेलेला असतो. पटकथा ही त्याची पहिली पायरी असते. आपण ज्याच्यावर सहज प्रतिक्रिया देतो तो सिनेमा कसा बेतला आहे, हे या पटकथांमधून समजू शकतं.
गुलजार पटकथा या संचामध्ये ‘खुशबू’, ‘मासूम’, ‘इजाजत’, ‘मेरे अपने’, ‘परिचय’, ‘कोशिश’, ‘मीरा’, ‘अंगूर’, ‘न्यू देहली टाइम्स’, ‘हुतूतू’, ‘लिबास’, ‘माचिस’, ‘किनारा’, ‘नमकिन’, ‘लेकिन’, ‘आँधी’, ‘अचानक’, ‘किताब’, ‘मौसम’ या १९ सिनेमांच्या पटकथा आहेत. त्यातल्या काही सिनेमांचे लेखन गुलजार यांनी केलं आहे, तर बहुतेक सिनेमांचे पटकथा लेखन, दिग्दर्शन, गीतलेखन गुलजार यांचं आहे. काही सिनेमांचे संवाद त्यांनी लिहिले आहेत. हे सगळे गुलजार यांचे गाजलेले सिनेमे आहेत. यातले बहुतेक सिनेमे रसिकांनी बघितलेले असतात. आपण एखादा सिनेमा बघतो तेव्हा त्यातलं दृश्य आपल्या मनावर ठसत जातं. पण ते दृश्य म्हणून पडद्यावर येण्याआधी ते प्रत्यक्ष कागदारव उतरलेलं असतं. ते पडद्यावर उतरवणं हे दिग्दर्शकाचं कसब असतं. उदाहरणार्थ ‘इजाजत’ हा गुलजार यांचा गाजलेला सिनेमा. बहुतेकांनी तो पडद्यावर पाहिलेला असतो. पटकथेच्या पातळीवर त्याची सुरुवात अशी होते की ‘मुसळधार पाऊस. सतत पाऊसच. डोंगरातून चातेय एक आगगाडी, अखंड वाहणाऱ्या, कधीही न संपणाऱ्या गोष्टीप्रमाणे आगगाडी जाते आहे. इवलीशी गोष्ट. पावसाचं पाणी. सारं सारं भरून गेलं. काळजातही भरून आलं. का ते ठाऊक नाही. पण डोळेही भरून आले. ट्रेन अखेरीस एका छोट्याशा स्टेशनात दाखल झाली. पहिल्या वर्गाच्या डब्यातून महेंद्र डोकं बाहेर काढतो आणि हमालाला हाक मारतो, कुली... कुली...’
‘इजाजत’मधलं हे पडद्यावर असलेलं दृश्य पटकथा वाचताना असंच्या असं आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. ही पटकथा लेखकाची ताकद असते. पडद्यावर मांडायच्या दृश्याची तो कागदावर मांडणी करत असतो. हे सगळं सिनेमात, पडद्यावर दिसतं. बघता येतं मग पटकथा कशाला वाचायची, असा एखाद्याला प्रश्न पडू शकतो. त्याचं एक उत्तर म्हणजे सिनेमा बघताना खूपदा दृश्य इतकं परिणामकारक असतं की बाकी अनेक महत्त्वाच्या बारकावे आपल्या नजरेतून सुटून गेलेले असतात. दृश्यामध्ये आपण इतके गुंगून गेलेले असतो की कधीकधी कानावर पडणारे शब्दही तितक्या प्रभावीपणे मनापर्यंत पोहोचत नाहीत. किंवा खूपदा असंही होतं की अभिनेत्यांच्या उच्चारणाच्या विशिष्ट सवयींमुळे काही संवाद कळलेलेच नसतात. ‘इजाजत’मध्ये महेंद्रची मध्यवर्ती भूमिका करणाऱ्या नसिरुद्दिन शहाचे पुष्कळ उच्चार तोंडातल्या तोंडात असल्यामुळे कळतच नाहीत. संपूर्ण सिनेमा समजला तरी काही गोष्टी सिनेमा समजायच्या राहून गेल्या आहेत, असं अनेकांना वाटत राहतं. ते सगळे निसटलेले दुवे या पटकथांच्या पुस्तकांच्या माध्यमातून जोडता येणं शक्य आहे.
दुसरं म्हणजे कथा, कादंबरी, कविता हे सगळे महत्त्वाचे साहित्यप्रकार आहेत सिनेमा हे या सगळ्याच साहित्य प्रकाराचं एक प्रकारे एक्स्टेंशन आहे. कथा, कादंबरी, कविता हे साहित्य प्रकार आहेत. चित्रपट ही कलाकृती आहे. तर मग तो ज्या पटकथेवर आधारित असतो, त्या पटकथेला कलाकृती का मानलं जाऊ नये? कथेचं किंवा कादंबरीचं नाट्यरुपांतर झालेलं असतं तेव्हा नाटक आवर्जून पाहिलंही जातं आणि त्याची संहिता वाचलीही जाते. मग तेच चित्रपटाच्या संहितेसोबत म्हणजे पटकथेबाबत का होऊ नये? पटकथा वाचायला मिळणं हे एक प्रकारे सिनेरसिकांचं शिक्षणच आहे. आपण पडद्यावर पाहतो तो सिनेमा मूळ रूपात कसा असतो, हे समजलं तर कदाचित सिनेमाकडे बघण्याची दृष्टी बदलून जाऊ शकते. गुलजार यांच्या या पटकथा वाचकाच्या हातात येतात त्या पूर्ण तयार स्वरूपातल्या. त्यामुळे कदाचित त्या वाचताना हे सगळं लिहिणं खूप सहजसोपं आहे, असाही समज होऊ शकतो. पण प्रत्यक्षात नाटककाराला नाटक लिहिताना जसा रंगमंचाची मर्यादित जागा, तिथल्या मर्यादित हालचाली, वेळकाळाचं बंधन लक्षात घेऊन लिखाण करावं लागतं तसंच पटकथा लिहिताना कॅमेरा, स्टुडिओ, आऊटडोअर या सगळ्याचा विचार कुठे तरी मनात असावाच लागतो. गुलजार यांच्या पटकथा वाचताना तो सिनेमा त्यांच्या डोळ्यांसमोर घडत असतो, असं वाटत राहतं.
या सगळ्या पार्श्वभूमीवर गुलजार यांच्या चित्रपटांकडे आणि या पटकथांकडे पाहिलं तर त्यातलं वेगळेपण लक्षात येतं. गुलजार यांच्या ‘मासूम’सारख्या सिनेमातली छोटी तीन गोड मुलं आपल्या भावविश्वाचा भाग कधी बनून जातात ते कळतही नाही. कारण ती खरोखरच कुणाच्याही घरातल्या छोट्या मुलांसारखीच वागतात, बोलतात. ती विनाकारण अकाली प्रौढत्व आल्यासारखी वागत नाहीत तेच ‘परिचय’सारख्या सिनेमातून दिसतं. गाणी, कथा दिग्दर्शन असं सबकुछ गुलजार असलेल्या या सिनेमात जया भादुरी, अमोल पालेकर यांचा उत्तम अभिनय उत्तम पटकथेच्या जोरावर पडद्यावर सकारला गेला. ‘साऊंड ऑफ म्युझिक’ या इंग्रजी सिनेमावरून ही पटकथा साकारली गेली असं म्हटलं गेलं आहे. पण गुलजार यांनी तिचं असं काही भारतीयीकरण केलं आहे की ती या मातीतलीच वाटते.
गीत, संवाद, लेखन, दिग्दर्शन असं सबकुछ गुलजार असलेला आणखी एक नितांतसुंदर सिनेमा म्हणजे ‘अंगूर’. शेक्सपीअरच्या ‘हाऊस ऑफ एरर्स’वर बेतलेला. पण शेक्सपीअरनेही ऊद्या तो बघितला तर तोही त्याला भारतीय सिनेमाच म्हणेल असा. अशोक आणि बहादूर या जुळ्या भावांच्या दोन जोड्यांवरच्या या सिनेमांमध्ये गुलजार यांच्या संवादांनी खरोखरच जान आणली आहे. त्यामुळेच सिनेमा बघताना आपण जितके हसून हसून बेजार होतो, तितकेच पटकथा वाचतानाही होतो. सिनेमा हे मुख्यत: दृश्यमाध्यम असलं तरी ती दृश्य पडद्यावर साकारायला शब्दच धावून येतात, गुलजार यांच्यासारख्या लेखकाच्या मागे तर ते हात जोडून निमूटपणे चालू लागतात, हे पटकथा वाचताना लक्षात येतं.
गुलजार यांनी ‘आँधी’, ‘हुतूतू’, ‘न्यू देहली टाइम्स’, ‘माचिस’सारखे राजकीय सिनेमेही लिहिले आणि दिग्दर्शित केले आहेत. तत्कालीन राजकारणावर सर्वसमावेशक असा सिनेमा काढणं, तोही कुणालाही न दुखावता आणि आपल्याला जे म्हणायचं आहे ते म्हणत ही अवघड गोष्ट गुलजार यांनी कशी साधली आहे हे या सिनेमांच्या पटकथांमधून लक्षात येतं. पटकथेतून प्रसंगांचं वर्णन जितकं महत्त्वाचं तितकीच ती व्यक्तिरेखा उभी करणं महत्त्वाचं ठरतं. कारण त्याबाबत लेखकाला जी स्पष्टता असते तिचा कलाकाराला उपयोग होतो. गुलजार यांच्या कथा-पटकथांमध्ये पुरुष व्यक्तिरेखा अत्यंत ठसठशीत आहेतच, पण स्त्री व्यक्तिरेखाही हिरोच्या भोवती पिंगा घालणाऱ्या नाहीत तर अत्यंत ठाम व्यक्तिमत्त्व असणाऱ्या आहेत. प्रत्यक्ष रोजच्या जगण्यातली भिडणारी, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून उभी राहणारी, वेळप्रसंगी ठोस निर्णय घेणारी असते. ‘आँधी’मधली पन्ना, ‘माचिस’मधली वीरा या स्त्री व्यक्तिरेखा अशाच स्त्रियांचं प्रतिनिधीत्व करतात. स्त्री म्हणजे निव्वळ परंपरांची वाहक, हिरोला पूरक ठरणारी, निव्वळ सुंदर दिसणारी कचकड्याची बाहुली हे मुख्य प्रवाहातले इतर सिनेमे दृढ करत असलेले स्त्रियांविषयीचे समज त्या धुडकावून लावतात. त्यांचं हे व्यक्तिमत्त्व सिनेमातून जेवढ्या प्रभावीपणे समोर येतं तितक्याच प्रभावीपणे ते पटकथेतूनही जाणवत राहतं.
रोमू सिप्पी यांच्या ‘कोशिश’ या संजीवकुमार आणि जया भादुरी अभिनित सिनेमाची गीतं आणि पटकथा गुलजार यांची आहे. हरी आणि आरती या मूकबधिर जोडप्याची ही अतिशय तरल अशी कथा. एरवी सगळा सिनेमा अतिशय बोलभांडा असताना मूकबधिर जोडप्याची प्रेमकथा मोठ्या पडद्यावर दाखवणं हीच धाडसाची गोष्ट. ते रोमू सिप्पींनी केलं आणि तिच्या पटकथेचं आव्हान गुलजार यांनी पेलंलं आहे. संजीवकुमार आणि जया भादुरी यांनी पडद्यावर जिवंत केलेल्या सिनेमाची पटकथा वाटणं हाही तितकाच जिवंत अनुभव आहे.
पटकथा, संवाद आणि गीतं असं सबकुछ गुलजार असलेला आणखी एक सिनेमा म्हणजे ‘मासूम’. नसिरुद्दीन शहा आणि शबाना आझमी या जोडप्याचं नातं आणि नंतर त्यांच्यात आलेले ताणतणाव, त्यांच्या दोन गोड मुली, त्यांना मिळालेला एक रेडिमेड भाऊ आणि गोड झालेला सिनेमाचा शेवट हे सगळं पडद्यावर जितक्या ताकदीने आलेलं आहे, तितवंâच ते कागदावर पटकथेचं वाचताना आपल्याला खेचून घेतं. पडद्यावरची दृश्यं डोळ्यांनी बघितली जातात आणि शब्दरूप असलेली पटकथा वाचण्याचं कामही डोळेच करतात. पण दृश्य पाहून त्याचा अर्थ लावणं या दोन्ही गोष्टींमधला फरक पटकथा वाचताना पटकन लक्षात येतो आणि दिग्दर्शक आपलं काम अधिक सोपं करत असतो. असंही वाटून जातं.
‘इजाजत’ या गुलजार यांच्या सिनेमाचा, तिच्या पटकथेचा उल्लेख केल्याशिवाय त्यांच्यावरचं लिखाण संपवता येऊच शकत नाही. रेखाच्या अभिनयाने गाजलेला हा सिनेमा. नसिरुद्दीन शहा, दीना पाठक, शम्मी कपूर, शशी कपूर, अनुराधा पटेल ही सगळी मंडळी असली तरी हा सिनेमा निव्वळ रेखाचा होता. नात्यांची गुंतागुंत, त्यातून सुटून पुढे गेलं तरी मनाने त्यातच अडकलेलं असणं, त्यातली अपरिहार्यता हे सगळं हा सिनेमा अतिशय तरलपणे मांडतो. या सिनेमाची पटकथा, दिग्दर्शन, गीतं असं सबकुछ गुलजार यांचंच होतं. ‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है, मेरा वो सामान लौटा दो’ सारखं अप्रतिम गाणं गुलजार यांनी दिलं ते याच सिनेमातून. पटकथालेखक आणि दिग्दर्शक एकच व्यक्ती असेल तर किती बांधेसूद पटकथा निर्माण होऊ शकते, ती पडद्यावर किती समर्थपणे उतरू शकते आणि चांगले अभिनेते मिळाले तर त्या सगळ्याचं किती सोनं होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘इजाजत’ हा सिनेमा. सिनेमा बघितला असेल तरी त्याची पटकथा वाचायला हवी आणि बघितला नसेल तरी त्याची पटकथा वाचायला हवी असा.
या सगळ्या पटकथांचां संच वाचताना एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे गुलजार यांनी त्यांच्या काळातल्या पटकथा लेखक, दिग्दर्शक यांच्या तुलनेत खूप वेगवेगळे विषय हाताळले. अगदी प्रेमकथा मांडतानाही त्यांनी त्या निव्वळ मनोरंजनासाठी न मांडता त्यांना वेगळं कोंदण दिले आहे. या सहा संचांमधून पटकथालेखक, संवादलेखक, गीतकार गुलजार अधिक जवळून पाहता येतात. अधिक समजतात आणि अधिक जवळचे वाटायला लागतात. म्हणूनच गुलजार यांच्या पटकथा प्रसिद्ध करणं हा प्रयोग इतका उत्तम आहे की आता अशाच इतरही सिनेमांच्या पटकथा मराठीत येणं अपेक्षित आहे.
-वैशाली चिटणीस ...Read more