* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: INDIRA
  • Availability : Available
  • Translators : LEENA SOHONI
  • ISBN : 9788177664942
  • Edition : 6
  • Publishing Year : OCTOBER 2004
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 592
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THE EARLY MORNING HOURS OF 31ST OCTOBER 1984; SHE WAS STROLLING THROUGH HER GARDENS WITH A SMILE ON HER FACE. HER BOTH HANDS JOINED IN A `NAMASTE. INDIRA GANDHI WAS ASSASSINATED BY HER OWN BODY GUARDS. HER DEATH WAS SIMILAR TO HER LIFE. THOUGH SURROUNDED BY THOUSANDS OF PEOPLE SHE WAS ALWAYS ALONE. A GREAT EPIC, A GREAT LIFE CAME TO AN ABRUPT END, IN A WRONG WAY, BY THE WRONG DEEDS. SHE WAS BORN IN THE ERA WHEN INDIAN NATIONALISM WAS BORN. HER FATHER PANDIT JAWAHARLAL NEHRU ALWAYS REFERRED TO HER AS THE BABY OF REVOLUTION. SHE WAS STRONG PHYSICALLY AS WELL AS MENTALLY. IT WAS THE WISH OF DESTINY THAT INDIRA WOULD PLAY A VITAL ROLE IN THE POST INDEPENDENT INDIAN POLITICS. IN THE BEGINNING SHE FLINCHED A BIT. SHE WAS INITIALLY VERY SHY, INTROVERT AND FRAGILE. BUT AS SHE ACCEPTED THE RESPONSIBILITY SHE DID NEITHER TURN BACK NOR FLINCH. SHE WAS ONE OF THE TOPMOST, POWERFUL, INFLUENTIAL, INTERNATIONAL POLITICAL FIGURE. SHE WAS THE PRIME MINISTER OF THE LARGEST DEMOCRATIC COUNTRY OF THE WORLD, BUT IT WAS A FACT THAT THIS COUNTRY WAS SHATTERED DUE TO THE VARIOUS RELIGIONS. IT WAS EXTREMELY DIFFICULT TO UNDERSTAND THE MENTALITY OF THE PEOPLE HERE. IT WAS MAINLY A MALE CHAUVINISTIC SOCIETY. KATHARINE FRANK HAS TRIED TO TAKE A REVIEW OF THE `WOMAN OF THE MILLENNIUM`, THE LADY WHO WAS THE LEADER OF THE BIGGEST DEMOCRATIC COUNTRY AND WHO CARRIED IT OUT VERY COMPETENTLY; AND WHOSE NAME WAS IMPRINTED ON THE 20TH CENTURY THROUGH THE WORK SHE DID.
३१ ऑक्टोबर, १९८४....सकाळची वेळ. त्या आपल्या बगिच्यातून चालत निघाल्या होत्या. चेहऱ्या वर स्मितहास्य. दोन्ही हात जोडून नमस्कार करत. इंदिरा नेहरू गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांनी हत्या केली. त्यांनी आपलं जीवन जसं व्यतीत केलं, अगदी तसाच मृत्यू त्यांना प्राप्त झाला. माणसांच्या गर्दीत असूनही शेवटी एकाकीच! एका महानाट्याचा, एका आयुष्याचा हा असा महाभयंकर शेवट झाला. ज्या युगात भारतीय राष्ट्रवादाने जन्म घेतला त्याच युगात इंदिराजींचा जन्म झाला. त्यांचे पिता जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना `क्रांतीचे अपत्य` म्हणून संबोधले. -शरीर मनाने कणखर अशा इंदिराजींनी स्वातंत्र्योत्तर भारतातील राजकारणात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावायची आहे, हे मुळी विधिलिखितच होतं. ही भूमिका अंगिकारताना सुरुवातीला त्या काहीशा कचरल्याही होत्या. एकेकाळी शरीरप्रकृतीने नाजूक व स्वभावाने लाजाळू व अंतर्मुख असलेल्या इंदिराजींनी एकदा राजकारणातील ही आपल्यावर पडलेली जबाबदारी स्वीकारली व त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. जगातील सर्वात सामथ्र्यशाली व महत्त्वपूर्ण नेत्यांमध्ये त्यांची गणना होऊ लागली. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या त्या पंतप्रधान बनल्या, परंतु येथील समाजात धर्माधर्मांमध्ये दुफळी माजलेली होती. या अवाढव्य देशातील समाजाची मानसिकता समजण्यास अत्यंत क्लिष्ट होती. येथे पुरुषांचे वर्चस्व होते. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचे नेतृत्व ज्या स्त्रीने समर्थपणे सांभाळले, विसाव्या शतकाच्या इतिहासात ज्या स्त्रीने आपली नाममुद्रा उमटवली व ज्या स्त्रीला `वूमन ऑफ द मिलेनियम` म्हणून गौरवण्यात आले अशा एका स्त्रीच्या जीवनाचा मागोवा कॅथरीन फ्रँक यांनी येथे घेतला आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #लीना सोहोनी #INDIRA #LEENASOHONI #KATHERINE FRANK #इंदिरा
Customer Reviews
  • Rating Starदैनिक सागर, 22 जुलै 2018

    इंदिरा नेहरू गांधी... आपल्या वादळी व्यक्तिमत्त्वाने भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात छाप पाडणार्या पोलादी महिला. 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांच्याच अंगरक्षकांनी त्यांची हत्या केली. त्यांनी आपलं जीवन जसं व्यतीत केले. अगदी तसाच मृत्यू त्यांना प्राप्त ाला. माणसांच्या गर्दीत असूनही शेवटी एकाकीच! एका महानाट्याचा, एक आयुष्याचा हा असा महाभयंकर शेवट झाला. ज्या युगात भारतीय राष्ट्रवादाने जन्म घेतला त्याच युगात इंदिरांजींचा जन्म झाला. त्यांचे पिता जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना ’क्रांतीचे अपत्य’ म्हणून संबोधले. शरीर मनाने कणखर अशा इंदिराजींनी स्वातंत्र्योत्तर भारतातील राजकारणात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावायची आहे. हे मुळी विधिलिखितच होते. एकेकाळी शरीरप्रकृतीने नाजूक व स्वभावाने लाजाळू व अंतर्मुख असलेल्या इंजिराजींनी एकदा राजकारणातील ही आपल्यावर पडलेली जबाबदारी स्वीकारली त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही. जगातील सर्वात सामर्थ्यशाली व महत्त्वपूर्ण नेत्यांमध्ये त्यांची गणना होऊ लागली. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या त्या पंतप्रधान बनल्या. परंतु येथील समाजात धर्मांधर्मांमध्ये दुफळी माजलेली होती. या अवाढव्य देशातील समाजाची मानसिकता समजण्यास अत्यंत क्लिष्ट होती. येथे पुरुषांचे वर्चस्व होते. ’वूमन ऑफ द मिलेनियम’ म्हणून गौरवण्यात आलेल्या इंदिराजींचे हे चरित्र अनेक वादळी घटनांनी भरलेले आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 24-10-2004

    खरं पाहिलं तर इंदिरा आपल्या आईसोबत जेव्हा भोवालीला गेली तेव्हा फिरोज पहिल्यांदा तिच्या आयुष्यात आला. एव्हाना त्याने किमान दोनदा तरी तिला लग्नाची मागणी घातली होती. आनंदभवनात सर्वत्र सहजतेने वावरणारा आणि आता भोवालीला कमलेबरोबर सोबत म्हणून आलेला हा फिरो गांधी होता तरी कोण? त्याचं महात्मा गांधींशी काहीही नातं नव्हतं. तो धर्माने पारशी होता. (जरी आडनाव गुजराथी असलं तरीही) त्याचे वडील जहांगिर फरेदून गांधी हे मरीन इंजिनीयर होते. त्याच्या आईचे नाव रत्तीमाई. जहांगीर आपल्या कुटुंबासह मुंबईत राहात होते. पण फिरोजला मात्र त्याच्या अविवाहित आत्याने वाढवले. तिचे नाव डॉ. शिरीन कमिसारियात. हिने त्याला दत्तक घेऊन त्याच्या संपूर्ण पालनपोषणाची जबाबदारी उचलली. डॉ. कमिसारियात या एक निष्णात सर्जन होत्या. अलाहाबादमध्ये लेडी डफरीन हॉस्पिटलच्या अखत्यारित येणाऱ्या बावन्न जिल्ह्यांच्या त्या प्रमुख होत्या. अलाहाबादच्या उच्चभ्रू वर्तुळात तिची ऊठबस होती. मग तिने आपल्या या तरुण भाच्याची सर्वस्वी जबाबदारी का उचलली असावी? कदाचित असंही असेल की तो तिचा भाचा नसून मुलगाच असावा आणि खरोखरच तसं असेल तर मग त्याचे वडील अलाहाबादेतील एक नावाजलेले वकील राजबहादूर प्रसाद कक्कर असावेत, अशी शक्यता होती. याचं एक कारण असं की फिरोज गांधीच्या जन्माचा दाखला कुठेही उपलब्ध नाही. मुंबईच्या पारशी मॅटर्निटी हॉस्पिटलमधील नोंदी पडताळल्या तेव्हा रत्तीमाई हिने त्याठिकाणी १२ सप्टेंबर १९९२ रोजी मुलाला जन्म दिल्याची नोंद कुठेही आढळत नाही. त्यामुळेच डॉ. शिरीन कमिसारियात हीच फिरोजची आई असावी असा तर्क लागतो. फिरोजचे आई किंवा वडील कोणीही असले तरी १९२०च्या सुमारास जहांगीर गांधी यांच्या मृत्यूनंतर रत्तीमाई आपल्या चार मुलांसह अलाहाबादेस डॉ. शिरीन कमिसारियात यांच्या घरी राहण्यास आली. फिरोज हा आधी विद्या मंदिर हायस्कूलचा आणि नंतर एविंग खिश्चन कॉलेजचा विद्यार्थी एबिंग कॉलेजात त्या दिवशी झालेल्या निदर्शनाच्या वेळी तो नेहरूच्या वर्तुळात ओढला गेला. तोपर्यंत प्रॉव्हिन्समध्ये शेतकऱ्यांची शेतसारा न भरण्याची जी चळवळ सुरू होती त्यात फिरोजने सक्रिय सहभाग घेतला. १९३२ साली परत एकदा त्याला जेलमध्ये टाकण्यात आले. त्यानंतर १९३३ मध्ये नेहरूंनी या चळवळीत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे ब्रिटिशांनी कसे हाल चालवले आहेत याची पाहणी करण्यासाठी फिरोजला खेड्यांमध्ये पाठवले. त्यानंतर त्याला परत अटक झाली. वैयक्तिरित्या फिरोज आणि जवाहरलाल यांच्यात काहीही साम्य नव्हते. फक्त दोघे उंचीने कमी होते, एवढेच काय ते साम्य! फिरोज उंचीने केवळ पाच फूट सहा इंच होता. पण तो अंगापिंडाने मात्र जाडजूड होता व त्याला डोक्यावर भरपूर दाट केस होते; तो दिसायला देखणा होता, पण नेहरूंप्रमाणे राजघराण्याला शोभेल असे रूप त्याच्याजवळ नव्हते. फिरोज हा कधीच उदास किंवा मरगळलेला नसे. तो खास बुद्धिमान नव्हता आणि इंदिरेप्रमाणेच शिक्षणात त्याला फारशी रुची नव्हती. परंतु इंदिरेप्रमाणेच शास्त्रीय संगीत आणि फुले या दोन गोष्टींची त्याला आवड होती. काही लोकांना तो जरा खळाळत्या उत्साहाचा व दांडगंट वाटे, तर काहींना तो त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे आवडे. एक खरं की तो मर्दानी भडक होता व त्याला आयुष्याबद्दल आसक्ती होती. खाणे, पिणे आणि सेक्स या सर्वांबद्दलच. फिरोज जन्मभर स्त्रीलंपटपणासाठी प्रसिद्ध होता. अत्यंत साधी व धार्मिक जीवनपद्धती असलेला कमलेचा तो इतका निस्सीम भक्त कसा बनला हेही एक कोडेच आहे. कमलेला फिरोजविषयी नक्की काय वाटत होते तेही पुरेसे स्पष्ट नाही. त्या दोघांच्या या परस्पराविरोधी व्यक्तिमत्वामधील संबंध स्पष्ट करताना कित्येकदा ते दांते व बियास्ट्रीस यांच्याप्रमाणे संबंध असल्याचे सूचित केलं होतं. अशा प्रकारच्या बदनामीकारक अफवा पसरवण्यास ब्रिटीश सरकारचे समर्थक जबाबदार नव्हते. तर खुद्द काँग्रेस पक्षाचेच काही सदस्य होते. (व हीच गोष्ट जेलमध्ये नेहरूंच्या कानावर गेल्यावर ते संतापले होते.) ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 21-08-2005

    इंदिराजींचं वादळी जीवन... हिंदुस्थानचे पहिले पंतप्रधान जवाहरलाला नेहरू यांनी सलग १७ वर्षं राज्य केलं. त्यांच्या कारकीर्दीची शेवटची एखाद्दोन वर्षं सोडता जनमानसातील त्यांची लोकप्रियता कधीच उणावली नव्हती; आजही उणावलेली नाही. त्यांची कन्या इंदिरा हिने ५ वर्षं राज्य केलं. इंदिराजींची कारकीर्द १९६६ ते ७७ आणि १९८० ते ८४ अशी दोन टप्प्यांत झाली. देशाच्या अलीकडच्या इतिहासात त्यांची कारकीर्द अतिशय वादळी ठरली. इंदिराजी अत्यंत कर्तबगार होत्या यात वादच नाही. त्यामुळे आपल्या वडिलांपेक्षाही जास्त लोकप्रियता त्यांच्या वाट्याला आली. परंतु त्यांच्या कर्तबगारीने सत्तांध हुकूमशाहीचं रूप धारण करताच समाजाने त्यांना जबर पराभवाचा फटका दिला. हिंदुस्थानी जनमानस आणि इंदिरा गांधी यांच्यातल्या घट्ट भावबंधाची खरी गंमत पुढेच आहे. इंदिराजींचे राजकीय विरोधक हिंदुस्थानसारख्या खंडप्राय देशाचा कारभार हाकण्यास समर्थ नाहीत हे लक्षात येताच त्याच जनमानसाने सगळ संताप विसरून पुन्हा इंदिराजींच्याच हाती सिंहासन सोपवलं. अफाट लोकप्रियता आणि अफाट लोकसंताप यांच्या आंदोलनाचा इंरिाजींच्या जीवनातला हा चढउतार अतिशय अभ्यासनीय आहे. इंदिराजींनी आपल्या राजकीय जीवनात चुकीचे अनेक निर्णय घेतले. शिखांबाबतचा त्यांचा निर्णय त्यांना स्वत:ला आणि देशाला फारच महाग पडला हे तर आता इतिहासानेच सिद्ध केलं आहे. त्यांच्या मृत्यूला आता २१ वर्ष पूर्ण होतील. म्हणजे एक संपूर्ण पिढी उलटली आहे. नवी पिढी उगवली आहे आणि तरीही इंदिरा गांधी या व्यक्तिमत्त्वाची जादू, त्यांच्या व्यक्तिमत्त्वामागचं वलय जराही कमी झालेलं नाही. इंदिराजींसारखा वादळी व्यक्तिमत्त्वाचा पंतप्रधान देशाने पूर्वी पाहिलेला नाही आणि भविष्यकाळात तर त्यांच्या तोलाचं व्यक्तिमत्त्व सिंहासनावर येईल याची कुठे चाहूलसुद्धा नाही. अशा या कर्तबगार, महत्त्वाकांक्षी स्त्रीचं एकही चांगलं चरित्र आपल्याकडे उपलब्ध नाही. मराठीत तर नाहीच, पण इंग्रजीतही नाही. चांगलं चरित्र याचा अर्थ समतोपणे, तटस्थपणे घेतलेला जीवनाचा वेध. इंग्रजी-मराठीतली इंदिराजींची जी काही छोटी-मोठी चरित्रं उपलब्ध आहेत त्यांना चरित्र म्हणण्यापेक्षा स्तुतिस्तोत्रच म्हणावं लागेल. अशा स्थितीत कॅथरील फ्रॅंक नावाची एक महिला अवर्तीण झाली आहे आणि तिने चांगलं पाचेकशे पानांचं ‘इंदिरा : दि लाईफ ऑफ इंदिरा नेहरू गांधी’ या मथळ्याचं भलंभक्कम इंदिरा चरित्र लिहून काढलं आहे. या कॅथरीन फ्रॅंक बाई कोण, इंदिराजींसारखं बहुचर्चित, वादग्रस्त व्यक्तिमत्त्व शब्दांत पकडण्याची त्यांची कितपत पात्रता आहे याचा उलगडा पुस्तकातल्या त्यांच्या परिचयावरून होत नाही. त्यांचं शिक्षण अमेरिकेत झालं. सध्या त्यांचं वास्तव्य ब्रिटनमध्ये असतं आणि इंदिराजींच्या प्रस्तुत चरित्रलेखनाचं काम त्या सतत सहा वर्ष करत होत्या एवढाच उल्लेख केलेला आहे. तसेच यापूर्वी त्यांनी एमिली ब्रॉन्ते, मेरी किंग्जले आणि ल्यूसी गॉर्डन या महिलांची चरित्रं लिहिलेली आहेत असा उल्लेख आहे. परंतु इंदिराजींच चरित्र आपल्याला का लिहावंस वाटलं याबद्दल लेखिकेने कोणतंही मनोगत व्यक्त केलेलं नाही. लेखिकेचा चरित्रलेखनामागचा हेतू अशाप्रकारे धूसर आहे. हा मुद्दा बाजूला ठेवू खुद्द पुस्तकं कसं आहे? कॅथरीन फ्रॅंक यांनी भरपूर ग्रंथ आणि कागदपत्रं अभ्यासली आहेत हे नक्कीच, परंतु प्रस्तुत इंदिरा चरित्रातला मोठा भाग इंदिराजी पंतप्रधान होण्यापूर्वीच्या कालखंडाने व्यापलेला आहे. इंदिराजींच्या जन्मापूर्वीचं नेहरू घराण्याचं पूर्ववृत्त, इंदिरेचा जन्म, बालपण, स्वातंत्र्यआंदोलन, अतिशय गाजलेला फिरोजबरोबरचा विवाह, पंतप्रधान म्हणून नेहरूंची कारर्कीद, काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा म्हणून, केंद्रातील एक मंत्री म्हणून इंदिराजींची उभारणारी कारर्कीद यांनी मोठा भाग व्यापला आहे. हा भाग महत्त्वाचा आहेच, परंतु इंदिराजींचं चरित्र वाचणाऱ्या सुबुद्ध वाचकाना ज्या मुद्यांबद्दल अधिक माहिती हवी असते त्यांच्याबद्दलचं त्याचं कुतूहल इथे शमत नाही. १९६६ साली ज्या स्त्रीला ‘गुंगी गुडिया’ म्हणून हिणवण्यात आलं होतं तीच स्त्री १९७१ सालच्या मध्यावर ‘गरिबी हटाव’ या एका घोषणेवर अख्खी निवडणूक खेचून नेते हे कसं घडलं? तीच स्त्री १९७१च्या अखेरीस एक जबरदस्त युद्धनेता म्हणून जगाला हादरवून टाकते. शत्रूराष्ट्राचे दोन तुकडे करून समाजाला दुर्गा, रणरागिणी म्हणून स्वत:ला परिचय करून देते हे कसं घडलं? तीच स्त्री सत्तांध होऊन १९७५मध्ये आणीबाणी घोषित करून अख्ख्या देशाला तुरूंग बनवते. हे कसं घडलं? अशा मुद्यांचा जास्त उलगडा व्हावा, असं वाचकाला वाटत असतं. कॅथरीन फ्रॅंकबार्इंना हे जमलेलं नाही. आपलं चरित्र समतोल तटस्थ व्हावं महणून त्यांनी खूप आटापिटा केलेला जाणवतो. इंदिराजींचा जन्म ते मृत्यू असं एक सलग जीवनचरित्र त्याला वाचायला मिळतं एवढंच समाधान. आता मूळ पुस्तकाच्या अनुवादाबद्दल. प्रस्तुत ‘इंदिरा नेहरू गांधी यांचे जीवनचरित्र’ या मथळ्याचा हा मराठी अनुवाद लीना सोहोनी यांनी चांगला केला आहे. त्यांचं हे चौदावं अनुवादाचं पुस्तक असून मूळ संहितेत जराही बदल न करता त्यांनी हे काम केलं असल्याचा उल्लेख प्रारंभी आहे. प्रकाशक मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी मात्र मूळ ग्रंथ जसाच्या तसा न छापता काही बदल केले आहेत. काही छायाचित्रं, कॅथरीन फ्रॅंक यांचं मनोगत, संदर्भग्रंथ सूची, नकाशे आणि शब्दसूची यांना सरळ कात्री लावली आहे. या गोष्टी मराठी वाचकांच्या दृष्टीने बिनकामाच्या आहेत असं प्रकाशकांना वाटत असावं. पण यामुळे मराठी अनुवादाचं संदर्भमूल्य कमी झालं आहे. मुद्रण, मांडणी निर्दोष, मुखपृष्ठ आकर्षक. -मल्हार कृष्ण गोखले ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 12-12-2004

    ‘इंदिरा’ची ओळख... स्वातंत्र्योतर काळात भारताच्या राजकारणावर समाजकारणावर प्रभाव टाकणारी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण करून देणारी महिला म्हणजे इंदिरा गांधी. त्यांची ही ओळख त्यांना पाहिलेल्या आणि कदाचित न पाहिलेल्या युवक वर्गालाही आे. पण त्याही पलीकडे जाऊन व्यक्ती म्हणून इंदिरा गांधी कशा होत्या, याची ओळख करून घ्यायची असेल तर कॅथरीन फ्रॅंक यांचे इंदिरा हे पुस्तक वाचणे योग्य ठरेल. श्रीमती गांधीचे राजकरणातील कर्तृत्व आणि पंतप्रधान म्हणून त्यांनी केलेली कामगिरी याबाबत अनेकदा विस्ताराने लिहिले गेलेले आहे. पण या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे या मध्ये श्रीमती गांधी यांचे बालपण आणि तरुणपणात त्यांनी जगण्यासाठी दिलेला लढा यांचा सविस्तर आलेखच मांडला आहे. मोतीलाला नेहरू यांच्या नातीला आणि भारतातील सर्वांत लोकप्रिय पुढारी असलेल्या जवाहरलाल नेहरू यांच्या लाडक्या कन्येला लहानपणी इतक्या समर प्रसंगांचा सामना करावा लागला असेल, याची अनेकांना कल्पनाही नसेल. आपल्या आईवर उपचार करून घेण्यासाठी तिच्या समवेत त्यांनी केलेला युरोप दौरा, त्यानंतर शिक्षणासाठी केलेले परदेशातील वास्तव्य आणि त्या काळात आलेले त्यांचे आजारपण या सर्वांचाच सविस्तर आढावा या पुस्तकात आहे. याच दरम्यान पंडित नेहरू यांनी आपल्या मुलीला लिहिलेली पत्रे आणि प्रसंगी इंदिरेने त्याला दिलेली उत्तरे यातून त्या वेळची राजकीय परिस्थती आणि नेहरूंची विचार पद्धतीही समजते. आपल्या नंतरच्या आयुष्यात पोलादी मन असलेली स्त्री असा लौकिक कमाविलेल्या इंदिराजी लहानपणी किती हळव्या होत्या. याचेही यथार्थ दर्शन या पुस्तकातून घडते. फिरोज गांधी यांच्याबरोबर त्यांची ओळख, त्यानंतर सर्वांचा विरोध पत्करून त्यांच्याशी केलेला विवाह या बाबतही या पुस्तकात सविस्तर माहिती आहे. त्यानंतर त्यांच्या दुरावलेल्या संबंधांचाही उहापोह आहे. पंडित नेहरू यांनी पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर त्यांच्याकडे लक्ष देतानाच आपल्या पतीकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत त्यांनी व्यक्त केलेल्या भावना याही त्यांच्या एका वेगळ्या पैलूचे दर्शन घडवितात. इंदिरा गांधीचा राजकारणातील प्रवेश, त्याची पार्श्वभूमी, लालबहादूर शास्त्री यांच्या मंत्रीमंडळात सामील होताना त्यांनी केलेला विचार या बाबतही या पुस्तकात चांगली माहिती आहे. त्यानंतर त्यांची पंतप्रधानपदाची कारकीर्द आलेले भलेबुरे अनुभव, सभोवतालच्या सहकाऱ्याबाबत त्यांची निरीक्षणे यातून त्यांच्या प्रगल्भतेची जाणीव होते. इंदिरा गांधी यांच्या जीवनातील महत्त्वाचे पर्व मानले गेलेल्या आणीबाणीबाबत मात्र या पुस्तकात निराशा होते. हा निर्णय घेण्यामागची श्रीमती गांधी यांची नक्की मानसिक अवस्था काय होती, त्याच्या परिणामाची त्यांना पुरेशी कल्पना होती का, या प्रश्नांची समर्पक उत्तरे या पुस्तकातून मिळत नाहीत. त्याचप्रमाणे आपले पुत्र राजीव आणि संजय यांच्याशी एक आई म्हणून त्या कशा वागत होत्या, त्यांच्या भवितव्याबाबत त्या काय विचार करीत होत्या या बाबतही हे पुस्तक पुरेसा प्रकाश टाकत नाही. अर्थात कॅथरिन फ्रॅंक या मूळ भारतीय नाहीत. सहा वर्षांच्या अनुभवावर आणि अनेक व्यक्तींच्या मुलाखतींमधून त्यांनी श्रीमती गांधी यांचा जीवनप्रवास उभा केला आहे. लीना सोहोनी यांनी त्याचा मराठीत अनुवाद करताना त्यातील प्रवाहीपण कायम ठेवण्यात यश मिळविले आहे. या पुस्तकाचा परियच करून देताना त्यांनीही एका परदेशी व्यक्तीचे भूतकाळाच्या पडद्याआड गेलेल्या व्यक्तीबाबत संशोधनाने काही सादर करणे आणि त्या व्यक्तीच्या परिचिताने त्यांचे चरित्र लिहिणे यात फरक असतो, असे नमूद केले आहे. हा फरक हे संपूर्ण पुस्तक वाचताना जाणवत राहतो हे नक्की. मात्र आपल्या मनात असलेल्या श्रीमती गांधी यांच्या प्रतिमेला एक वेगळा पैलू जोडण्यात हे पुस्तक नक्कीच यशस्वी होते. -पराग करंदीकर ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more