- Dakshata Pendhari
मी हे वाचले आहे, तुम्हासही वाचायला नक्कीच आवडेल. `इट्स ऑलवेज पॉसिबल` किरण बेदी यांनी लिहिलेलं, कैद्यांच्या जीवनावरील व सुधारणा वर आधारित छान पुस्तक. डॉक्टर किरण बेदी एक आयपीएस डायरेक्टर जनरल ऑफ दिल्ली प्रिझंस बनते. तिहार सेंट्रल जेल भारतातील सर्वात ठोर तुरुंग म्हणून प्रसिद्ध होता. तिथे कारभार हाती घेतल्यानंतर नरकवास भोगणाऱ्या कैद्यांच्या जीवनात नंदनवन फुलवत एक वेगळाच तुरुंगवास त्यांनी अनुभवला. `इट्स ऑलवेज पॉसिबल` हे स्वतः किरण बेदी यांनी लिहिलेले पुस्तक मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केले आहे. `आय डेअर ` हे पुस्तकही त्यांचेच. दोन्ही पुस्तके एका निधड्या छातीच्या स्त्रीचीच नव्हे तर शूरवीर रणांगनेची महती सांगणारी आहेत. तूर्तास पहिले `इट्स ऑलवेज ` पुस्तक सर्वप्रथम चाळलं तेव्हा लक्षात आलं हे नुसतं लेखन नव्हे तर किरण बेदींनी प्रत्येक कैद्याच्या हृदयात प्रवेश करून त्याचं मनोगत मोकळं केलं आहे. कैद्यांनी काढलेली चित्रे , त्यांनी लिहिलेली तक्रार व प्रशंसेची पत्रे असं बरंच काही, कैद्यांच्या जीवनाशी संबंध नसलेल्या या गोष्टींचा उल्लेख पुस्तकात आहे. सर्वप्रथम आश्चर्य तर याचंच वाटतं की पोलिसांचा पेशा असूनही या डॉक्टर किरण बेदींनी इतकं सर्वांगसुंदर लेखन करावं आणि काहीही न लपवता स्वतःची ही व्यथा जागोजागी स्पष्टपणे मांडावी. असे हे लेखन फक्त रोजनिशीचे आत्मचरित्रवजा लेखन नसून वैचारिक पातळी उंचावणारेही आहेत. कैदी म्हणून जाणं जेवढं वाईट तेवढेच तिथं तुरुंगाधिकारी म्हणून बदली होणार हेही शिक्षे समानच. तिहार ला 1 मे 1993 ला बदली झाल्यावर मे 95 पर्यंत तिहार जेल चे संपूर्ण रूप बदलून तिहार आश्रम हे नाव लोकांद्वारेच ठेवल्या गेल्याची कहाणी म्हणजे `इट्स ऑलवेज पॉसिबल`.
पहिल्याच प्रकरणात अक्षरशः रानटी व गुलामी अशा सर्व कैद्यांना किरण बेदी सामोरे जातात ते वेगळ्याच प्रकारे. आपण सर्व मिळून एक प्रार्थना म्हणून या असं म्हणत कैद्यांची जवळीक साधण्याचा प्रसंग अद्भूतच आहे तिहार जेलला अमाप प्रसिद्धी मिळाली होती अर्थात कुप्रसिद्धी. त्याचे वर्णन पहिल्या चार-पाच प्रकरणात करताना वैद्यकीय भ्रष्टाचार, पीडब्ल्यूडी तर्फे जेलच्या सुखसोयी पुरवण्याचे नावापुरते कॉन्ट्रॅक्ट , वरच्या स्तरापर्यंत असलेले कैदी व डॉक्टर, काही कर्मचाऱ्यांचे संबंध यांचे हृदय विदारक वर्णन यात केले आहे. स्त्रियांचे हाल हे माणुसकीला काळिमा फासणारे तर होतेच पण काही गोष्टी त्या पलीकडे गेलेल्या होत्या. त्यातील कुपोषणा सोबतच प्रसूती प्रसंगी च्या गैरसोयी फारच भयंकर होत्या. त्या सर्व गोष्टींना किरण बेदींनी उत्तम रित्या हाताळले व सुधारणा केल्या. कैद्यांनी जेलरला आपला हितैशी मानण्याची जादू कदाचित यामुळे झाली. प्रत्येक कैद्यांचे मनोगत चिट्ठी, पत्राद्वारे किरण बेदींना कळत असे. यात एका विदेशी कैद्याने कृतज्ञता व्यक्त केल्याची कविता या पुस्तकात आहे. तो म्हणतो -
या भयाण मृतप्राय जगात तू नवचैतन्य आणलेस
सुकलेल्या कारंजातून नव पाणी वाहू लागले
घुसमटलेल्या कंठातून आज उमटला हुंकार नवा
त्याचे ढोल ताशे सुद्धा दुमदुमू लागले
त्याचे नाद सुस्वर हीच तुझ्या यशाची मोहोर
वनराजा ची बेटी तू
आमच्या कोमेजलेल्या मनाला फुलवलेस तू
तुझे शत्रू मात्र झुरत बसले
तुझा नामोच्चार करत दुःख उगाळत बसले
तू अमर होशील तसेच होतील तुझा हेवा करणारे
पण या सुस्वर नादा मधून तू त्यांना पुरून उरशील
एकंदरीत किरण बेदींनी अशक्य ते शक्य करून दाखवले. पुढेही बऱ्याच घटनांचा या पुस्तकात उल्लेख आहे. सरकारी यंत्रणा, लाल फिती मध्ये अडकलेली सूचनावजा पत्रे अशा गोष्टींचाही किरण बेदींनी पाठपुरावा करत तिहार जेल ला तिहार आश्रम तर बनवलेच व कैद्यांचेही श्रद्धा स्थान झाल्या. असे हे ` इट्स ऑलवेज पॉसिबल` आपणही जरूर वाचा. ...Read more
- DAINIK SAKAL 02-05-2002
दुर्दम्य इच्छाशक्तीचा विजय...
शीर्षकावरूनच त्यातला आशावाद स्पष्ट करणारे किरण बेदी यांनी लिहिलेलं ‘इट्स ऑलवेज पॉसिबल’ हे पुस्तक प्रत्येकानं वाचायलाच हवं ते त्यातल्या प्रयत्नवादासाठी. माणूस शून्यातून विश्व कसं घडवू शकतो, हे वाचायचं असेल तर हे पुस्तक आर्श मानायला हवं. ही सत्यकथा आहे तिहार तुरुंगाची. हा प्रवास आहे तिहार जेलचा तिहार आश्रम होण्यापर्यंतचा. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर म्हटल्याप्रमाणे ही आहे जगातील एका प्रचंड मोठ्या तुरुंगाचा कायापालट. पण तो कायपालट इतका आमूलाग्र आहे. की त्यावर विश्वास बसणं कठीण आहे.
मिझोरात राज्याच्या इन्स्पेक्टर जनरल ऑफ पुलिस म्हणून काम केल्यावर नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर त्यांना इन्स्पेक्टर जनरल (प्रिझम) म्हणून बदली झाली ते थेट तिहार जेलमध्येच. त्या वेळी या पदावर यायला कुणी इच्छुक, उत्सुक नव्हतं. आणि कुणी महिला तर नाहीच नाही. त्या पदावर आलेल्या त्या पहिल्या महिला तिथं काहीही काम नसणार; अशी अनेकांची कल्पना; पण किरण बेदींना स्वत:वर विश्वास होता आणि त्या एके सकाळी तिथं जाऊन पोहोचल्या त्या ७२०० कैद्यांची अधिकृत पालक म्हणूनच. त्यांनीही आपलं स्वागत असंच करावं, अशी भूमिका घेऊन त्या कैद्यांना भेटल्या आणि पहिल्याच दिवशी त्यांनी कैद्यांच्या मनात स्नेह निर्माण केला. सगळ्यांच्या मनात आशावाद निर्माण केला जे त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं होतं. त्यांनी तुरुंगाला आपलं मानलं कारण त्या म्हणतात, ‘तिहार हीच माझी नियती होती, माझी कर्मभूमी होती.’
कैदी असले तरी त्यांना किमान जीवन जगता आलं पाहिजे, ही भूमिका घेऊन मानवतावादी दृष्टिकोनातून किरण बेदींनी या कैद्यांकडे बघायला सुरुवात केली. आणि त्याच दृष्टीनं तुरुंगाची पाहणी करायला सुरुवात केली. ते चित्र भीषण होतं. २५०० जणांच्या जागेत सुमारे आठ हजार कैदी राहत होते. नाश्ता तर नाहीच; पण जेवणही चांगलं नाही. गलिच्छ आचारी, अस्वच्छ जमिनीवर चपात्या लाटून तिथंच भाजल्या जायच्या. त्या इतक्या कडक असायच्या की कैदी त्या खाण्याऐवजी जळण म्हणून उपयोग करून त्याच्यावर मिळवलेलं अन्न शिजवत. डाळ म्हणजे तिखटजाळ पाणी. त्यातही अनेक किडे, कीटक तरंगत असायचे. इतके की कुणाला ते खायची इच्छा होऊ नये ती डाळ ज्यात घ्यायची ते लोखंडी भांडं जेवणाबरोरच अंघोळ आणि अन्यत्रही वापरायचं, पाण्याची प्रचंड टंचाई त्यामुळे ओसंडून वाहणारी, स्वच्छतागृह, प्रसाधनगृह, पिण्याचं पाणी नाही, तर आंघोळ, कपडे धुणं म्हणजे तर आनंदच. विजेची टंचाई, आजारी कैदी वैद्यकीय सेवा नाही, रोज भरती होणारे कुपोषित कैदी, त्यातच चालू असलेला भ्रष्टाचार पैशाच्या जोरावर चालू असलेली दादागिरी, वर्षानुवर्षे चाललेले खटले, स्त्री कैद्याचा तर वेगळाच प्रश्न. काहींबरोबर तर लहान मुलंही होती. त्यांची दैनावस्था भयानक होती हे एकूण चित्रच विदारक होतं. हे सगळं वर्णन करण्यासाठी किरण बेदी यांची पृष्ठक्रमांक १२ ते १५१ इतकी पानं खर्ची पडली आहेत. यावरून या प्रश्नांची व्याप्ती लक्षात यावी.
‘इच्छा तेथे मार्ग’ या प्रत्यय किरण बेदी अगदी पहिल्या महिन्यापासूनच आला. त्यांनी फक्त इच्छा व्यक्त केली आणि मदतीचा ओघ अक्षरश: त्यांच्याकडे वाहत आला. त्यात अगदी ब्रह्माकुमारीपासून मदर तेरेसापर्यंत सर्वांचा समावेश होता. वेगवेगळ्या संस्था होत्या.
किरण बेदींनी सुरुवात केली ती तक्रारपेटीपासून, त्यातून उलगडत गेली तिथल्या कैद्यांची गरज मोकळ्या मनानं लिहिलेल्या या पात्रातून अगदी प्रशासनाविरुद्धचा कडवा राग व्यक्त झाला, तसा गैरवर्तणूंक करणाऱ्या आपल्याच कैद्यांच्या तक्रारीही होत्या. आणि मग अस्वच्छतेनं, भ्रष्टाचारानं, निराशावादानं बरबटलेल्या, त्यात यथेच्छ बुडालेल्या तिहार तुरुंगानं कात टाकायला सुरुवात केली.
तुरुंगात पंचायत व्यवस्थेला सुरुवात झाली शैक्षणिकपंचायत, वैद्यकीयपंचायत, जेवणघरपंचायत, क्रीडापंचायत, योगपंचायत, नाईपंचायत, कायदेविषय सल्लाची पंचायत, विपश्यनापंचायत अशा अनेक पंचायतींनी आपलं काम सुरू केलं आणि हळूहळू बदल होऊ लागला. व्यसनमुक्ती केंद्र सुरू झालं. स्त्रियांसाठी प्रशिक्षण वर्ग सुरू झाले. त्यांच्या मुलांसाठी पाळणाघर, अभ्यासवर्ग सहली सुरू झाल्या आणि परिस्थितीमुळे नरक भोगायला लागणाऱ्या मुलांना या बदलानं स्वर्गप्राप्तीचा आनंद झाला. विपश्यना माणसात किती बदल घडवून आणते, याचा प्रत्ययही हे पुस्तक वाचताना येतो. आपल्या मनातली कटुता बाहेर काढून शांततेचं जीवन जगू पाहणाऱ्या या कैद्याचं मनोगत निश्चितच कौतुकास्पद आहे. आणि हे घडलं किरण बेदी आणि त्यांच्या सहकाऱ्यामुळे. निश्चित ध्येय, त्या दृष्टीनं प्रयत्न यामुळेच तिहार तुरुंगाचा तिहार आश्रम झाला.
-आरती कदम ...Read more
- DAINIK PUDHARI 13-02-2007
भ्रष्टचाराची मगर मिठी...
विविध तुरुंगांमधील अंतर्गत व्यवस्थापनाचा अभ्यास करण्यासाठी मी अनेक देशांचा दौरा केला. अमेरिकेतील अत्यंत कडक सुरक्षाव्यवस्था असलेले तुरुंग, इंग्लंड, जपान व फिलिपाईन्समधील तरुण गुन्हेगारांसाठी असणारे खास तुरुंग, जपानमधील बालसुारगृहे व तुरुंगाचे इतर अनेक प्रकार मला पाहायला मिळाले. तुरुंगाच्या व्यवस्थापनात कैद्यांचा सहभाग असणे हा प्रकार केवळ भारतातच आढळतो. इतरत्र कोठेही नाही. परदेशातील प्रत्येक तुरुंगात कैद्यांना आपल्याला नेमून दिलेल्या ठिकाणी जाऊन नेमून दिलेली कामे करावी लागत. तसेच काही काही ठिकाणी कैदी साफसफाई किंवा स्वयंपाकासारखी कामे करताना दिसत. परंतु एकाही ठिकाणी तुरुंगाच्या सुरक्षा व्यवस्थेशी अथवा एकंदर नियंत्रण व्यवस्थेशी निगडित असणारं एकही काम कोणत्याही कैद्यावर सोपवण्यात आल्याचं उदाहरण नसेल. अंतर्गत सुधारकार्यासाठी एक तर कर्मचाऱ्यांना काँट्रॅक्टवर भरती करण्यात येत असे, नाही तर पूर्णवेळ पगार देऊन नोकरीवर ठेवण्यात येत असे. तुरुंग सुधाराचे विविध कार्यक्रम विविध तुरुंगांमध्ये राबवण्यात येत असत. पण त्या कार्यक्रमाची गुणवत्ता त्या ठिकाणच्या व्यवस्थापनाच्या भूमिकेवर तसेच साधनांच्या उपलब्धतेवर अवलंबून असे.
पण भारत मात्र एकमेवद्वितीय आहे. जगातील सर्वात मुक्त लोकशाही म्हणून आपले वेगळेपण उठून दिसते हे खरे. पण त्याचबरोबर १८९४च्या प्रिझन अॅक्टसारख्या अत्यंत जुनाट कायद्याच्या पायावर येथील तुरुंगाची व्यवस्था चालवली जाते. इ.स. १९९४ मध्ये तिहारची जनसंख्या ९७००च्याही वर जाऊन पोचली होती. परंतु अंतर्गत सुरक्षाव्यवस्था व एकंदर व्यवस्थापनासाठी तेथे केवळ चाळीस वॉर्डर होते. एकट्या सुरक्षाव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून ही संख्या अपुरी होती, तर मग व्यवस्थापनाची गोष्टच सोडा. मात्र या जुन्यापुराण्या, ब्रिटिशांच्या काळातील प्रिझन अॅक्टनेच जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यांना रात्रीच्या वेळी जराशी मोकळीक दिली होती. याचा फायदा असा की रात्रीच्या वेळी त्यांच्या कोठड्यांचे दरवाजे बंद करण्यात येत नसत. व त्यांना हिंडण्या-फिरण्याची मुभा असे. त्यामुळे बाकीच्या कैद्यांच्या मानाने या कैद्यांचे स्थान जरा वरचढ मानले जाईल. मग साहजिकच तुरुंगात पहारा देणे, फेरफटका मारून पाहाणी करणे, काही दुर्घटना घडलीच तर पहारेकऱ्यांना त्याची तातडीने सूचना देणे इ. कामे या कैद्यांचा खास वेगळा वर्ग तयार झाला. ते कोठडीत बंदिस्त राहाणाऱ्या कैद्यांवर दादागिरी करू लागले. या जन्मठेपेच्या कैद्यांनी स्वत:च्या करमणुकीसाठी काही कोवळ्या वयाच्या कैद्यांना जबरदस्तीने स्वत:चे ‘साथीदार’ बनवण्याच्या घटनांची अहवालांतून नोंद सापडते. या लहान कैद्यांवर जबरदस्ती करून ते आपल्या शारीरिक वासनेचं शमन करीत. मी तिहारची सूत्रे हाती घेतल्यानंतर अशा तऱ्हेचा एक प्रसंग माझ्या समोरच घडल्यामुळे मला या प्रकाराविषयी समजले.
तुरुंगात जो काही भ्रष्टाचार चाले, त्यातही या कैद्यांचा फार मोठा होत असे. अनेक वर्षे तुरुंगात काढल्यानंतर या कैद्यांना तेथील नव्याने भरती झालेल्यांच्या व खटले चालू असणाऱ्या कैद्यांच्या गरजा ओळखता येत. मग त्यावर काय उपाययोजना करायची त्याचा सल्लाही ते देत. अर्थात त्याचा मोबदला आकारूनच. तुरुंगातच्या अंतर्भागात जे सेंट्रल अॅडमिनिस्ट्रेशन ऑफिस होतं, त्याला येथे ‘चक्कर’ असे नाव होते. कधीतरी ते आपले सावज हेरत येथे फेरफटका मारत. सावज नजरेनं एकदा हेरले की, त्याच्या समोर ते दुसऱ्या एखाद्या कैद्याला मुद्दाम जोरात मारहाण करीत, जणू काही त्यांना त्याद्वारे असाच संदेश द्यावयाचा असे ‘तुम्ही जर माझे पैसे चुकते केले नाहीत, तर तुमचीही अशीच गत होणार आहे, लक्षात ठेवा.’ बहुतेक वेळा रखवालदारांचा या दादागिरी करत हिंडणाऱ्या कैद्यांना पाठिंबाच असे. एखादा नव्याने भरती झालेला कैदी फारच धाडसी असला तर तो न्यायालयात धाव घेई. अशावेळी घडलेल्या प्रसंगाविषयी साक्ष देताना तुरुंगाधिकारी तो अगदी किरकोळ स्वरूपाची (अन्न किंवा पाणी वाटपाविषयी) तंटा होता, असे सांगून वेळ मारून नेत व ते प्रकरण मिटवून टाकीत. न्यायालयाने जर एखाद्या कैद्यात सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली तर त्याला तुरुंगाच्या आत राहून अत्यंत कठोर परिश्रमांची कामे करावी लागत. उदा. तुरुंगाच्या स्वयंपाकघरात लाकडांच्या उघड्या चुलीवर स्वयंपाक करणे. त्यामुळे तुरुंगातील अशा कैद्यांना रोजच विस्तवाशी खेळ करण्याची पाळी येई व स्वयंपाकघराचे तर अक्षरश: धुराडे होऊन जाई. एकंदर चार तुरुंग होते. प्रत्येक तुरुंगात सुमारे २३०० कैदी होते. प्रत्येक तुरुंगाच्या ‘लंगर’मध्ये सुमारे सत्तर स्वयंपाकी (हेही कैदीच असत) राहात. लंगर याचा अर्थ स्वयंपाकघराला लागून असलेली एक लहानशी खोली. त्या खोलीतच ते राहात. ते दोन वेळा स्वयंपाक करत. सकाळचे जेवण दुपारी बारापर्यंत चाले तर रात्रीच्या जेवणाचे काम दुपारी चारलाच सुरू होई. शिवाय सकाळी सात व दुपारी पाच वाजता चहा असे.
स्वच्छतागृहांच्या सफाईच्या कामात प्रचंड दादागिरी व भ्रष्टचार चालायचा. कारण हे काम न्यायालससंमत नसे. पण प्रत्यक्षात मात्र कैद्यावर या कामाची सक्ती होत असे. जेलमधील सर्व कैद्यांच्या स्वयंपाकाचे काम जसे २४० कैदी बिनपगारी फुकट करत होते त्याचप्रमाणे सुमारे २०० कैद्यांना स्वच्छतागृहांच्या साफसफाईचे काम मोफत, सक्तीने करावे लागे. या दोन्ही कामांसाठी लागणाऱ्या श्रमांच्या खर्चासाठी अंदाजपत्रकात तरतूद नव्हती. तुरुंगाच्या आतला परिसर स्वच्छ राखण्यासाठी आणखी १०० कैदी राबत होते. हेही मोफतच. अगदी उजळमाथ्याने अशाप्रकारची अन्याय वागणूक कैद्यांना दिली जात होती आणि हा मनमानी कारभार बाहेरच्या जगापासून सोयीस्करपणे दडवून ठेवण्यात आला होता. या अनागोंदी कारभारामुळे फार मोठ्या समस्या निर्माण होऊन बसल्या होत्या. तुरुंगात सातत्याने चालत आलेल्या भ्रष्टाचाराचं हे एक कारण होतं. सततच्या वाढत्या वापरामुळे स्वच्छतागृहे सारखीच साफ करावी लागत आणि हे घाण काम करण्यासाठी बळीचे बकरे शोधून काढावे लागत. असे कैदी शोधून काढणं हा दादागिरी करणारे कैदी व कर्मचारी दोघांच्या चिंतेचा विषय होत असे. मग पैशाने गरीब किंवा कमकुवत व दीनदुबळ्या कैद्यांच्या माथीचं हे भंगीकाम मारले जाणार हे तर ओघानेच आले. श्रीमंत आणि बलदंड कैदी नुसतेच लांबून मजा बघत. गरीब कैद्यांकडून वॉर्डर आणि सुपरवायझर जबरदस्तीने ही कामे करून घेत आणि मग त्यांनी बंड करू नये, हिंसाचाराला सुरुवात होऊ नये म्हणून त्यांना साबण आणि सरसूच तेल बक्षीस मिळे का? तर त्यांनी ‘आपण होऊन’, पुढे येऊन’ तुरुंगातील कर्मचाऱ्यांना व मुन्शींना मदत केली म्हणून! मुन्शींचे काम करणारे कैदी हे साधारणपणे जन्मठेपेची शिक्षा भोगणारे कैदी असत व ही मुन्शीची जबाबदारी त्यांना त्यांच्या कॉन्टेबल वॉर्डरने सोपवलेली असे इतर कोणत्याही लोकशाही देशात मी हा प्रकार पाहिला नाही.
स्वच्छतागृहे स्वच्छ राखणं अत्यावश्यक आहे. हे आपण समजू शकतो. पण काही मूठभर दीनदुबळ्या लोकांना एका पैशाचाही मोबदला न देता हे काम सक्तीने करायला लावणं हे मात्र मानवतेला काळिमा फासणारं कृत्य आहे. मुळात जेव्हा एखाद्या व्यक्तीची या ना त्या कारणाने तुरुंगात रवानगी होते, तेव्हाच तिच्या आत्मप्रतिष्ठेला जबरदस्त धक्का बसतो आणि त्यात तेथे पोहोचल्यावर जर त्या व्यक्तीला एखाद्या शुद्रासारखी वागणूक मिळाली तर ती गोष्ट किती असह्य होत असेल, याची कल्पनाच न केलेली बरी.
भ्रष्टाचाराच्या नानाविध पद्धती तुरुंगातील कर्मचाऱ्यांनी शोधून काढल्या होत्या. या भ्रष्टाचाराचा एक ठराविक साचा असून तो अगदी सर्वव्यापी स्वरूपाचा होता. त्यात अनेक भ्रष्टाचारी कृत्यांचा समावेश होता. वास्तविक हे कर्मचारी प्रशिक्षितच काय, परंतु शिक्षितसुद्धा नव्हते. पण तरीही भ्रष्टाचारी कृत्यू बेमालूम पार पाडण्याचे त्यांचे कौशल्य वाखाणण्याजोगे होते. पैशाची येथे सर्वाधिकाराशाही होती. हे कर्मचारी आपली कामे केवळ एकाच लालसेपोटी पार पाडत व ती म्हणजे द्रव्यलाभाची. वास्तविक हे कर्मचारी आपले काम करत असताना असे वागतात, पैसे खातात इ. गोष्टी त्यांच्या वरिष्ठांना माहिती होत्याच ना. पण तरीसुद्धा त्यांच्या भत्त्यांत वाढ करायला हवी आहे का, असा विचार मात्र हे वरिष्ठ कधी करत नसत. अप्रामाणिक होते त्यांची चांगली चंगळ होत असे व जे काही मूठभर प्रामाणिक लोक शिल्लक होते ते मात्र भरडले जात. काही कर्मचाऱ्यांना नाईलाजाने आपल्या राहत्या घराचं पैशासाठी गोठ्यात रूपांतर करावं लागलं होतं. काहींना पोटाची खळगी भरण्यासाठी पोटभाडेकरू ठेवावा लागला होता. तुरुंगातील कैद्यांच्या तोंडून ऐकलेली या भ्रष्टाचाराची वर्णने, त्यांनी लिहिलेली काही बोलकी पत्रे किंवा दिलेल्या मुलाखती, त्यांनी बाहेरच्या लोकांशी केलेले वार्तालाप या सर्वांमधून तुरुंगातील भ्रष्टाचाराचं व अधिकृतरित्या अगदी राजरोस घडत असलेल्या गुन्हेगारीचं स्वरूप स्पष्ट होतं. बाह्यजगाच्या नजरेआड, बंद दारापाठीमागे भ्रष्टाचाराचा हा भस्मासूर चांगलाच फोफावला होता. ...Read more
- DAINIK LOKSATTA 06-02-2000
कुणी विश्वास ठेवो अगर न ठेवो, पण काही गोष्टी जर घडायच्या असतील तर त्या घडतातच, पण ह्या पुस्तकाची निर्मिती हा मात्र फार मोठ्या ईश्वरी योजनेचा भाग आहे, असं मी मानते. इन्स्पेक्टर जनरल (प्रिझन्स)चं पद भूषंवावं, असं मला कधीही वाटलं नव्हतं. या तुरुंगात येणयापूर्वी मला दीर्घकाळ बदलीसाठी प्रतीक्षा करावी लागली होती. भारताच्या ईशान्य भागी असलेल्या मिझोराम राज्याची इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस म्हणून काम केल्यानंतर मी नऊ महिने बदलीसाठी वाट पाहत होते. भारत सरकारच्या ‘मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स’ने माझं भवितव्य ठरवण्यात खूप वेळा घेतला. त्यामुळे मी पूर्ण पगार घेऊन नुसती ‘प्रतीक्षा करीत थांबून होते, परंतु ऑडिटरच्या ऑफिसकडून त्यांना तंबी मिळाली. असं दीर्घकाळ काही न करता पूर्ण पगार देऊन मला ठेवता येत नव्हतं, म्हणे. मग मला इकडे टाकलं.
आय. जी. (प्रिझन)ची ही जागा अनेक महिने रिकामी पडून होती. तिथे बदली करून घेण्यास कोणीच उत्सुक नव्हतं आणि ज्या कुणाची बदली तिथे होई ती व्यक्ती तिहारच्या शक्यतो बाहेरच राहण्याचा प्रयत्न करी. खरं तर मला दिल्ली पोलीस खात्यात परत पाठवणं योग्य ठरलं असतं, पण तिथे जे दिग्गज जागा अडवून बसले होते ते काही केल्या हटायला तयार नव्हते, मग स्वाभाविकच त्या जागी बदलून जाण्याची ‘राजी खुशीची’ सक्ती माझ्यावर झाली. माझ्यासारख्या व्यक्तीला ‘टाकायला’ याहून चांगली जागा शोधूनही सापडली नसती! आमच्यासारख्यांच्या मनात तुरुंगासारख्या ठिकाणी बदली होणं म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षा, अशीच भावना असते. काही लोकांच्या मते माझ्या बाबतीत जे झालं ते योग्य होतं. उगीच प्रवाहाविरुद्ध जाऊन काहीतरी नवा मार्ग चोखाळायला निघालेल्यांची ही अशीच गत होते हे तरी निदान त्यामुळे मला समजून चुकलं.
माझ्या मनात खोलवर कुठेतरी नियती आपल्याला हाताला धरून नेत असल्याची जाणीव झाली आणि ही नियती आपल्याला अगदी योग्यच ठिकाणी नेऊन पोचवत आहे, ही पण जाणीव झाली. त्या ठिकाणी आपण जरूर जावं, अशी जबरदस्त अंत:प्रेरणा मला झाली. सुधारणावादी दृष्टिकोन आणि सर्वांना बरोबर घेऊन नेण्याचं धोरण तेथे जाऊन अवलंबावं, असं मला वाटू लागलं.
एका वीकएंडच्या आदल्या दिवशी या बदलीचा हुकूम माझ्या हातात पडला. मला ताबडतोब आय. जी. (प्रिझन्स) म्हणून कामावर रुजू व्हायचं होतं. बदली जेव्हा होते तेव्हा ती किती दिवसांसाठी असते, ह्याचा त्या आदेशात कधीही उल्लेख नसतो. मी दुसऱ्याच दिवशी सकाळी कामावर रुजू झाले. तो शुक्रवार होता. आता सुमारे ७२०० कैद्यांची मी ‘अधिकृत पालक’ होते.
माझा पोलीस खात्यातील २१ वर्षांचा अनुभव लक्षात घेता यात वेगळं असं काहीच नव्हतं. मला ती वर्षं अजून आठवतात. माझ्या हद्दीत कोणाही गुन्हेगाराला अटक झाली की त्याला काही विशिष्ट प्रश्न आम्ही विचारत असू. त्याच्या गुन्हेगारी वृत्तीपासून त्याला परावृत्त कसं करता येईल, हे तपासण्यासाठी ही प्रश्नोत्तरं असत. त्यातील काही प्रश्न असे होते-
१) त्याने तो गुन्हा का केला?
२) तो गुन्हा करण्यास त्याला कोणती परिस्थिती कारणीभूत झाली?
३) त्यामागे काही मानशास्त्रीय, सामाजिक व आर्थिक कारणे होती का? ती कोणती?
४) त्याच्या कुटुंबियांचा किंवा मित्रमंडळींचा त्याच्यावर किती प्रमाणात दबाव होता.
५) त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीविषयी पोलिसांना आधी काही माहिती होती का? (हा गुन्हा आम्हाला थांबवता आला असता का? आम्ही यात कुठे अपयशी ठरलो? याचे विश्लेषण.)
६) त्याची कोठडीतून सुटका झाल्यानंतर तो काय करण्याची शक्यता होती?
७) गुन्हा-तुरुंगवास-जामीन-गुन्हा-तुरुंगवास-जामीन हे दुष्टचक्र पोलिसांना अधिकृतपणे थांबवता आले असते का? त्याच्यासाठी त्या गुन्हेगारास आम्ही कशाप्रकारे मदत करू शकलो असतो?
अशा प्रकारच्या विश्लेषणात्मक प्रक्रियेद्वारा आम्ही-सामूहिकरित्या अनेक गुन्हेगारांमध्ये सुधारणा घडवून आणली होती. गुन्हा घडणेच कसे थांबवता येईल यासाठी आम्ही नवनवीन धोरणे विकसित करीत होतो. त्यातील प्रत्येक धोरण प्रमाणाबाहेर यशस्वी झाले होते. आम्ही पोलीस स्टेशन्सशी संलग्न अशी काही व्यसनमुक्ती केंद्रे चालू केली होती व त्यामुळेच न्यू दिल्लीच्या नॉर्थ डिस्ट्रिक्टमध्ये डेप्युटी पोलीस कमिशनर म्हणून माझी नियुक्ती झाली. ज्या व्यक्ती व्यसनाच्या अतिरिक्त आहारी जाऊन त्या व्यसनाची पूर्तता करण्यासाठी चोऱ्यामाऱ्या किंवा हिंसाचारासारखे गुन्हे करत, अशा व्यक्तींना व्यसनमुक्त करण्यासाठी हा उपक्रम आम्ही करत होतो. मी तेथे काम करत असतानाच या उपक्रमाची सुरुवात झाली आणि आज त्रूाची व्याप्ती फार मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आज या ‘नवज्योती’ केंद्रास युनायटेड नेशन्सनेसुद्धा मान्यता देऊन निरीक्षकाचा दर्जा दिला आहे. अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीने तिहार तुरुंग ओसंडून वाहत होता. त्याचा सामना मला तुरुंगाच्या बाहेरून करायचा होता आणि त्या कामात यश मिळवायचं होतं.
माणूस जेव्हा अथकपणे, सातत्याने, नि:स्वार्थीपणाने आणि कळकळीने सुसंवाद प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला त्यात नक्की यश मिळतं, असा माझा अनुभव होता. अगदी उलट्या काळजाच्या, कठोर व्यक्तीच्या सुद्धा हृदयास तो स्पर्श केल्यावाचून राहत नाही. केवळ आमच्या मनातील सच्च्या भावनांवर जोरावर आम्ही अनेक निर्ढावलेल्या अट्टल गुन्हेगारांना चांगल्या मार्गाला लावून त्यांचे पुनर्वसनसुद्धा केले होते. तिहारमध्ये मला एकलक्षीपणाने जे काही काम करायला मिळणार होते ते माझं सर्वांत आवडतं, माझ्या हृदयाच्या सर्वांत जवळचं काम होतं.
या सर्व तुरुंगांमध्ये अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा आणि काम करण्याच्या संधी उपलब्ध होत्या. मला विविध उपक्रमांची सुंदर माहितीपत्रके दाखविण्यात आली, पण त्यांना देण्यासाठी मात्र माझ्यापाशी असं काही नव्हतं. माझ्याकडे केवळ १८९४ सालच्या प्रिझन अॅक्टवरून तयार केलेलं जुनंपुराणं माहितीपत्रक होतं. त्या कैद्यांचा शैक्षणिक कार्यक्रम चालू असताना मी त्यांच्याशी बोलले. पण माझ्या तुरुंगात बिनसरकारी सेवाभावी संस्थांचे ३०० हून अधिक कार्यकर्ते जसे कैद्यांच्या बरोबरीने काम करीत होते तसे मात्र इतर कोठेही नव्हते. तेथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना तुरुंगाच्या आत पाऊल ठेवण्यासही परवानगी नव्हती, तर आमच्याकडे त्याच्या अगदी विरुद्ध परिस्थिती होती. आमच्याकडे मात्र या प्रतिनिधींना आम्ही भेटीची परवानगी देत होतो, तुरुंगातील परिस्थिती जशी आहे तशी दाखवत होतो आणि समाजहिताशी संबंधित मुद्दे समाजापुढे मांडण्यास सांगत होतो.
माझ्या या भेटींमध्ये विदेशी तुरुंगात उपलब्ध असलेल्या सुसज्ज शिस्तबद्ध यंत्रणेबद्दल मला त्यांचा हेवा वाटला आणि माझ्या तुरुंगातील प्रत्येक उपक्रमात आमचे कैदी ज्या आनंदाने, स्वेच्छेने सहभागी होत, त्याबद्दल त्यांना माझा हेवा वाटला. या दोन्ही गोष्टींचा समन्वय मी फक्त एकाच तुरुंगात पाहिला. तो यूके मधील ग्रेंडन प्रिझन येथे. इंग्लिश पीनल सिस्टिमच्या अखत्यारीत येणारी ही एक लक्षणीय संस्था आहे. या ठिकाणी गेली ३३ वर्षे मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्तींवर मानसोपचार करण्यात येतात. ग्रेंडन प्रिझनमध्ये संगीत, कला, मार्गदर्शन, ध्यानधारणा, कैद्यांना मात्र कैद्यांना इतका वेळ मोकळ्यावर सोडण्याची पद्धत नव्हती. त्याची कारणे असंख्य होती: जागेची कमतरता (व्हिएन्ना प्रिझन), हिंसाचाराची भीती (सान फ्रान्सिस्को), खराब हवामान इत्यादी. याला अपवाद फक्त कोपनहेगनच्या तुरुंगाचा. येथे मात्र शिक्षा झालेल्या कैद्यांना बसने शहरात जाऊन एखाद्या शिक्षणवर्गात जाऊन, शिकून सायंकाळी तुरुंगात परत येण्याची मुभा होती आणि हा विश्वास त्यांनी अनेक वर्षांच्या कालावधीमध्ये संपादन केला होता. यु. के. येथी ग्रेंडन प्रिझनमध्ये ही त्यांच्याशी मिळते-जुळते वातावरण मला बघायला मिळाले.
मला एका गोष्टीने सर्वांत मोठे समाधान मिळाले ते म्हणजे आम्ही ज्या प्रमाणात कैद्यांच्या जवळ जाऊन पोहोचलो होतो, त्यांच्या हृदयात शिरकाव केला होता, ते फार महत्त्वाचं होतं आणि त्याचे परिणाम फार उत्तम झाले होते. या खुल्या वातावरणामुळे देशभर सर्वत्र आमच्या उपक्रमाचे स्वागत झाले होते व त्याची प्रशंसा केली जात होती. याचीच परिणती १९९४ सालच्या रॅमन मॅगसेसे पुरस्कारात झाली. त्याचप्रमाणे नोबेल प्राइझ ऑफ एशिया आणि जोसेफ बॉइज फाऊंडेशनतर्फे जोसफ बॉइज पुरस्कार (१९९७ साली स्वित्झर्लंड येथे) प्राप्त झाला.
३१ ऑगस्ट १९९४ मध्ये मॅनिला येथे फिलीपाईन्सचे प्रेसिडेंट-हिज एक्सलन्सी-फीडेल रॅमोस यांच्या हस्ते प्रतिष्ठित एशियन अॅवॉर्डचा मी स्वीकार करत होते तेव्हा आपल्या देशात तिहारमधील सुमारे दहा हजारांच्यावर कैदी तुरुंगाच्या आत याबद्दल आनंदोत्सव साजरा करत होते. सुधार कार्यक्रमाची धुरा खांद्यावर घेऊन त्याचा पुरस्कार केल्याबद्दल हे अॅवॉर्ड आज आपल्यालाच तपशील व्यवस्थित ठेवले गेले. त्या सर्व तपशिलाचा उपयोग पुढे हे पुस्तक लिहित असताना पुरावा म्हणून होईल असे मला स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते. योगायोगाची गोष्ट अशी की, या काळात सुटून चाललेले अनेक कैदी मला व्यक्तिश: भेटण्यासाठी किंवा निरोप घेण्यासाठी आले. मी या फेलोशिपचे काम करत आहे हे त्यांना माहीत असल्यामुळे त्यांनी आपण होऊन मला कितीतरी माहिती पुरवली. त्यांनी त्यांचे मनोगत छापण्यास मला परवानगी दिली, त्याचप्रमाणे अनेक रेखाचित्रेही काढून दिली. हे काम ज्या सर्वांमुळे शक्य झालं त्या सर्वांनाच मी हे पुस्तक अर्पण करते. बदल घडवून आणण्यास मला ज्यांनी शिकवले त्या सर्वांना. ज्यांनी मला मार्ग दाखवला त्या सर्वांना आणि जे सामूहिक आणि सुधारणावादी समाजरचनेचा हिस्सा बनले त्या सर्वांना. पुस्तक वाचत असताना भारतातील सर्वांत मोठ्या तुरुंगाचा कायापालट कसा झाला व तो होत असतानाच्या प्रक्रियेत ज्या वेदना आणि जो आनंद आम्हाला मिळाला त्याचा प्रत्ययकारी अनुभव तुम्हालाही मिळेल. आणि सरतेशेवटी माझ्याप्रमाणे तुमचाही या वचनावर विश्वास बसेल- ‘इट्स ऑलवेज पॉसिबल’ (सारं काही शक्य आहे...)
या पुस्तकातून उभा होणारा निधी इंडियन व्हिजन फाऊंडेशनच्या कायमस्वरुपी उपक्रमास देण्यात येत आहे. ज्या बालकांचे आई-वडील तुरुंगात आहेत किंवा तुरुंगाबाहेर असूनसुद्धा त्यांच्या शिक्षणाची हेळसांड करत आहेत, अशा बालकांना शिक्षण देण्याचे कार्य या उपक्रमाद्वारे केले जाते. पुढच्या बळीस आणि तिहारमधील भविष्यकालीन कैद्यास वाचवणं हे आमचं उद्दिष्ट आहे. ...Read more
- Read more reviews