NEWSPAPER REVIEWजिनांनी २७ जुलै १९४६ रोजी मुस्लीम लिगच्या कौन्सिलच्या सभेत भाषण केले. त्यात ‘थेट कृती’ (Direct Action) करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही थेट कृती हिंसक की अहिंसक? यावर जिनांचे उत्तर होते, ‘मी त्याबद्दलच्या कोणत्याही नैतिक बाबींबरोबर चर्चा करणार नाही.’ ंतर मुस्लीम लिगच्या छापलेल्या एका पत्रकातून म्हटलं होतं, ‘केवळ कमनशिबामुळे तुम्ही हिंदूंचे आणि ब्रिटिशांचे गुलाम झालेले आहात. पण तुम्ही या रमजानच्या महिन्यात एका जिहादला प्रारंभ करणार आहात... अरे काफरांनो, तुमचे दिवस आता भरत आले आहेत... आता एक सार्वत्रिक कत्तल सुरू होईल!’ त्यावेळी मुस्लीम लीगचे सुऱ्हावर्दी बंगालमधील महत्त्वाचे पुढारी होते. त्यांच्या चिथावणीचा निदर्शकांनी फायदा उठविला. १६ ऑगस्ट १९४६ रोजी एकट्या कलकत्यांत ६००० पेक्षा जास्त हिंदूंना ठार करण्यात आले. १५००० पेक्षा जास्त हिंदू जखमी झाले. हिंदुस्थानभर त्याचे पडसाद उमटले.. मृत्यू आता थैमान घालू लागला होता... ‘नौखाली’ हा शब्द पुढे अत्याचारांचा निदर्शक बनला. त्याकाळी गांधीजी ‘सेवाग्राम’मध्ये आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर पोहोचले होते. काँग्रेस त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करीत चालली होती. गांधीजी दंगल शांत करायला पुन्हा बाहेर पडले, नौखालीकडे! हिंदुस्थानची फाळणीची प्राक्रिया या ‘थेट कृती’मुळे जलद होऊ लागली... आता ‘घटना’ माणसांना धरून पुढे नेत होत्या!’
‘जिना : हिंदुस्थान, फाळणी, स्वातंत्र्य’ या जसवंत सिंग लिखित, अशोक पाध्ये अनुवादित पुस्तकातील अखेरच्या भागांतील वरील अंश. ‘माझ्या बऱ्याच हितचिंतकांनी मला ‘जिना व फाळणी’ या विषयावर न लिहिण्याचा सल्ला दिला होता. पण हा निर्णय शेवटी माझा होता. त्याचे भले-बुरे परिणाम भोगण्यास मी तयार होतो. १९४७ची फाळणी का झाली याचा पुन्हा एकदा शोध मला घ्यायचा होता’, असे जसवंत सिंग सुरुवातीलाच सांगतात अन् पुस्तकाच्या अखेरीस ‘फाळणीला जबाबदार कोण’ याचा निष्कर्षदेखील काढतात! यात जिनांची भूमिका कोणती? काहींच्या मते जिना खलनायक होते, तर काहींच्या मते ते प्रतिनायक होते. पाकिस्ताननिर्मितीनंतर तर ते पाकिस्तानसाठी ‘महानायक’ ठरले! खरंच कोण आणि कसे होते जिना?
काठेवाडातील पानेली येथील एका ‘खोजा’ कुटुंबात २५ ऑक्टोबर वा डिसेंबर १८७८ रोजी जिनांचा जन्म झाला. लंडनला ‘बार’ची परीक्षा देऊन ते मुंबईला आले. २४ ऑगस्ट १८९६ रोजी बॉम्बे हायकोर्टात अॅडव्होकेट म्हणून त्यांनी नाव रजिस्टर केले - ‘महंमद अली जिना’ (पूर्वी त्यांचे आडनाव होते ‘जिनाभाई.’) नंतर ५१ वर्षे मुंबई हेच त्यांचे घर होते. बर्नार्ड लुई म्हणतो, खोजा म्हणजे पातळ मुस्लीम आवणाखालील हिंदूच! तर १९१७ मध्ये सरोजिनी नायडू म्हणाल्या, ‘जिना हे मानववंशशास्त्रीयदृष्ट्या हिंदूच आहेत आणि धर्माने मुसलमान आहेत. त्यामुळे ते हिंदू-मुसलमान एकतेचे दूत आहेत. आणि हा केवळ आदर्श कल्पनाविलास नाही!’
अशा धर्मनिरपेक्षतेकडून धर्मांधतेकडे झालेला जिनांचा पन्नासएक वर्षांचा प्रवास या पुस्तकातून उलगडला जातो.
राजद्रोहाच्या खटल्यात टिळकांना जस्टिस दावर यांनी सहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. तेव्हा जिनांनी टिळकांच्या वतीने जामिनासाठी अर्ज केला, तो फेटाळून दावर यांनी शिक्षा कायम केली. त्याबद्दल जेव्हा ब्रिटिश सरकारने जस्टिस दावर यांना ‘नाईट हूड’ हा किताब दिला, तेव्हा त्यावर टीका करून जिनांनी त्या समारंभावर बहिष्कार टाकला होता! गांधी आणि जिना यांची तुलना कठीण व गुंतागुंतीची, पण दोघांचे राजकीय गुरू एकच होते, गोपाळ कृष्ण गोखले! जिनांना त्या काळात ‘मुस्लीम गोखले’ म्हणत असत. गांधी व जिना दोघांनी लंडनमध्ये असताना ‘ब्रिटिश जेंटलमन’ लकब व शैली उचलली. पण २१ वर्षे दक्षिण आफ्रिकेत राहून गांधी जेव्हा हिंदुस्थानात परतले, तेव्हा त्यांनी वेशभूषेत आमूलाग्र बदल केला, पण जिनांनी ‘थ्री पीस सूट’ हा वेश कधीच सोडला नाही. त्यामुळे जिनांनी गांधींना नुसताच स्पर्धक न मानता, लोकांच्या भावनांचा फायदा उठविणारा- खोटारडा- बडबड्या राजकारणी मानलं. तरीही गांधींना आव्हान देणारे जिनाच होते तर नेहरूंना प्रतिस्पर्धी ठरलेले जिनाच होते. फाळणीपर्यंत जिनांचा सुसंवाद फक्त गांधींशीच होता. नेहरू-जिना यांच्यात तसा तो कधीच नव्हता.
१९२८च्या अखेरपर्यंत ‘हिंदू-मुसलमान ऐक्य’ हा शब्दप्रयोग ‘स्वराज्य’ या शब्दाला समानार्थी आहे असे जिना मानीत. तर ‘कोणत्याही धर्माचा, जातीचा हिंदुस्थानचा नागरिक असो’, त्याला घटनेनुसार समान अधिकार मिळण्याची ग्वाही दिली जाईल, एवढे पुरेसे आहे, ही नेहरूंची भूमिका. महंमद इक्बालसारख्या काहीजणांनी १९३० मध्ये याच हिंदुस्थानात आपला ‘मुस्लीम इंडिया’ हा देश साकारावा म्हणून आव्हान केले, तर १९३३ साली रहिमत अलींनी ‘मुस्लीम इंडिया’ हा देश हिंदुस्थानपेक्षा वेगळा असावा असा आग्रह धरला. ‘पाकिस्तान’ हा या रहिमत अलींनी निर्माण केलेला शब्द. त्या वेळीदेखील जिनांनी महंमद इक्बाल यांच्या कल्पनेला विरोध केला होता. १२ नोव्हेंबर १९३०च्या लंडन येथील गोलमेज परिषदेचा ‘मँचेस्टर गार्डियन’ मधील वृत्तांत जिनांसमोरील पेच स्पष्टपणे व्यक्त करतो. ‘मिस्टर जिना यांची गोलमेज परिषदेतील अवस्थाही एकमेव अशी झाली होती. हिंदूंना वाटले की जिना हे एक मुस्लीम जातीवादी आहेत, तर मुस्लिमांना वाटले की जिना हे हिंदूंकडे झुकणारे आहेत. संस्थानिकांना वाटले की जिना हे अति लोकशाहीवादी आहेत. ब्रिटिशांना वाटत होते की जिना हे डोक्यात राख घालून टोकाशी जाणारे आहेत. यामुळे असे झाले की, जिना हे म्हटले तर सर्वत्र आहेत, आणि म्हटले तर कुठेच नाहीत. कोणालाच ते नको आहेत.’ हा जिनांच्या राजकीय कारकीर्दीचा उलटत चाललेला मध्यान्ह काळ होता. १९३३च्या सुमारास जिना एके ठिकाणी म्हणतात, ‘खऱ्याखुऱ्या हिंदू-मुसलमान ऐक्याशिवाय हिंदुस्थानला कसलीही आशा नाही. हे ऐक्य साधणं बहुसंख्य असलेल्या हिंदूंनाच जमू शकेल. मुळात आपल्या अंत:करणात त्यासाठी बदल झाला पाहिजे.’ पुढे १९३८ मध्ये अलीगढ अँग्लो-मुस्लीम कॉलेजात ते म्हणतात, ‘हिदूंच्या भावना-हिंदू मन व दृष्टिकोन पाहिल्यावर मी निष्कर्ष काढला की, ‘हिंदू-मुस्लीम ऐक्याची आशा धरण्यात अर्थ नाही. मला माझ्या देशाविषयी प्रथमच निराशा वाटली. ही स्थिती अत्यंत दुर्दैवी आहे. मी खचलो आहे... असहाय्य झाल्यासारखे वाटत आहे.’ गांधींची अवस्थादेखील वेगळी नव्हती. ‘मी असहाय्य आहे. माझी ऐक्यावरील श्रद्धा तेवढीच घट्ट आहे. पण माझ्यासमोर घनदाट अंध:कार पसरला असून, कुठेही प्रकाश दिसत नाही, अशा परिस्थितीत मी फक्त देवाला ‘मला प्रकाश दाखव’ अशी प्रार्थना करू शकतो. १९३८ साली काँग्रेसचे अध्यक्ष असताना सुभाषचंद्र बोस यांनी स्वत: हिंदू-मुसलमान प्रश्नात लक्ष घालून तो सोडवायचा प्रयत्न केला. पुढे हे सारे एकांडे प्रस्ताव अपुरे पडले. मार्ग ठप्प झाला. कदाचित हाच फाळणीचा टर्निंग पाँर्इंट होता!
हिंदुस्थानात अशी चमत्कारिक परिस्थिती असताना दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटलं. २३ मार्च १९४० रोजी मुस्लीम लीगच्या खुल्या अधिवेशनात एक ठराव पास करण्यात आला. बलुचिस्तान-सिंध-पंजाब व वायव्य सरहद्द प्रांत यांचे एक वेगळे फेडरेशन बनवावे. या चारही प्रांतांना स्वायत्तता व सार्वभौमत्व बहाल करावे. हा ‘पाकिस्तान’चा जन्म होता! म्हणून आजही पाकिस्तानात २३ मार्च हा दिवस ‘पाकिस्तान दिवस’ म्हणून पाळला जातो. नंतर इकडच्या १९४२च्या ‘चले जाव’ चळवळीमुळे, ऐन युद्धकाळात इंग्रजांना हिंदुस्थान सोडण्यास सांगण्यामुळे बहुतांशी काँग्रेस नेत्यांची धरपकड झाली. १९४२ ते १९४६ या काळात बरेचसे काँग्रेस नेते तुरुंगात असल्यामुळे सरकारशी बोलणी करण्यास कुणीच उरलं नव्हतं, त्यामुळे राजकीयदृष्ट्या जिनांचे फावले! दरम्यान, गांधी तुरुंगात असताना १९४३ मध्ये जिनांनी जाहीर केले की, खुद्द गांधींना मुस्लीम लीगबरोबर समझोता हवा असेल तर त्यांचे स्वागत होईल, अन्य कुणाचे नाही. १९४४ रोजी जिनांच्या १०, माऊंट प्लेझंट रोड, मुंबई या घरी जिना-गांधी बोलणी सुरू झाली, ती १८ दिवस चालली... आणि ब्रिटिश अस्वस्थ झाले, हिंदू-मुसलमान ऐक्याच्या भीतीने, हिंदूमहासभावाले चिडले या कृतीनेच, तर लीगची पाकिस्तानची मागणी गांधी मान्य करतील म्हणून शीखही बिथरले अन् बाहेर पडले ते ‘शिखीस्तानची’ मागणी घेऊनच! अर्थात वाटाघाटी फिसकटल्या. गांधींनी जिनांना लिहिलं, ‘इस्लामचा उदय होण्यापूर्वी हिंदुस्थान एक राष्ट्र होते. ते अजूनही एकच राष्ट्र राहावं, जरी त्या राष्ट्राच्या पुत्रांनी आपला धर्म बदलला असला तरीही. तुमची नव्या राष्ट्राची कल्पना मी स्वीकारली तर नव्या समस्यांना तोंड द्यावे लागेल.’
यानंतर जिनांच्या ‘थेट कृती (Direct Action)च्या २७ जुलै १९४६च्या आवाहनानंतरचा इतिहास, हा दंगली-अत्याचार-नरसंहार-मानवतेच्या हत्येचा होता. अखंड हिंदुस्थानचे कट्टर पाठीराखेदेखील म्हणू लागले, ‘आता फाळणी झाली तर बरे पडेल. निदान संहार-अत्याचार- हत्याकांडातून तरी सुटका होईल. भूतकाळातील अनेक वर्षातील छळवाद संपेल.’ ६ मे १९४७ रोजी जिना-गांधींची शेवटची भेट दिल्ली येथे घडून आली. जिनांनी गांधींच्या संमतीने एक पत्रक काढले. ‘हिंदुस्थानच्या फाळणीवर आमच्यात चर्चा झाली; परंतु गांधींनी फाळणीचे तत्त्व स्वीकारले नाही. फाळणी अपरिहार्य आहे, हे त्यांना पटत नव्हते. माझ्या मते पाकिस्तान निर्माण होणे हे नुसते अपरिहार्यच नव्हे तर, हिंदुस्थानच्या आजच्या राजकीय समस्येवर तोच एक उपाय आहे.’ तत्पूर्वी १ एप्रिल १९४७ रोजी माऊंट बॅटन यांनी गांधींची भेट घेतली तेव्हा, माऊंट बॅटनला दचकविणारा प्रस्ताव गांधींनी ठेवला, ‘जिना यांना पंतप्रधान करा आणि संघटित हिंदुस्थानचे सरकार बनवा.’ नंतर ५-६ एप्रिलला माऊंट बॅटन जिनांना भेटले, तेव्हा जिना म्हणाले, ‘फक्त एकच उपाय आहे, हिंदुस्थानवर शस्त्रक्रिया नाहीतर हिंदुस्थान नाश पावेल.’ आता जिनांचा धर्मांधतेकडचा ‘पाकिस्ताननिर्मितीचा’ प्रवास पूर्ण होत आला होता!
हिंदुस्थान पूर्वी कधीही न पाहिलेल्या सर सिरील जॉन रॅडक्लिफ याला हिंदुस्थान-पाकिस्तान सरहद्द ठरविण्याचे काम देण्यात आले. ‘रॅडक्लिफ अवॉर्ड’ १२ ऑगस्ट १९४७ला तयार झाले. १४ ऑगस्टला हिंदुस्थान अस्तित्वात आला. जन्माला आलेल्या दोन्ही देशांना आपल्या सरहद्दी माहीत नव्हत्या. कारण ‘अवॉर्ड’ १७ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालं! मग पुन्हा दंगली उसळल्या. नरसंहार-हत्याकांडाचा रक्तरंजित इतिहास पुढे चालूच राहिला!
तत्पूर्वी ७ ऑगस्ट १९४७ रोजी विमान जेव्हा जिनांना घेऊन दिल्लीहून कराचीकडे सुटलं, तेव्हा जिना स्वत:शीच पुटपुटले, ‘इट्स द एन्ड ऑफ दॅट!’ पुढे वर्षभराने ११ सप्टेंबर १९४८ रोजी जिनांचा मृत्यू झाला, तेव्हा दिल्लीत राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाला. नेहरूंनी शोकसंदेश दिला, ‘जिनांनी हिंदुस्थानचा इतिहास रचला, पण तो चुकीच्या मार्गाने... भूतकाळातील घटनांबद्दल त्यांना खेद वाटला असेल की पश्चात्ताप झाला असेल? बहुधा असे काहीच वाटले नसेल, कारण त्यांनी आपल्याभोवती द्वेषाचा बुरखा पांघरून घेतला होता!’ पुढे १९७१ मध्ये पाकिस्तान फुटून बांगलादेश निर्माण झाला, हा जिनांच्या सिद्धांताचा पराभव होता हा अलीकडचा इतिहास.
जिनांच्या मृत्यूपूर्वी, ३० जानेवारी १९४८ ला गांधींची हत्या झाली. १९४६च्या नौखालीच्या दंगलीत पीडीतांचे सांत्वन करताना, एका कागदाच्या तुकड्यावर शिसपेन्सिलचे थोटूक वापरून गांधींनी लिहिलं होतं, ‘I don`t want to die a failure, but I may be a failure.’ आपल्या सत्य व अहिंसा या तत्त्वांचा पराभव झाल्याचे त्यांना स्पष्ट दिसत होते! पुस्तकाच्या प्रास्ताविकात जसवंत सिंग कबूल करतात की, अखंड हिंदुस्थानासाठी कुणी आपला आवाज उठवत होते की नाही, याचे उत्तर दु:खाने असे द्यावे लागते की, ‘फक्त महात्मा गांधी.’ पण पुस्तकाच्या अखेरीस, फाळणीची टोकाची भूमिका जिनांना घ्यायला भाग पाडल्याबद्दल, फाळणीला मुख्यत्वेकरून नेहरू’च जबाबदार आहेत, असा निष्कर्ष काढतात.
‘नेहरूंच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने फाळणीला मान्यता दिली होती. पण पक्षाच्या सर्वोच्च अधिकारपदावर असलेले नेहरू आणि नंतर सत्तेवर आलेल्या सरकारचे प्रमुख म्हणून नेहरूच होते. तेव्हा नेहरूंकडेच फाळणीची जबाबदारी जाते... काँग्रेसचे १९३४, १९४२, १९४५ व १९४७ चे ठराव अप्रत्यक्षरीत्या पाकिस्ताननिर्मितीला कारणीभूत ठरले.’ पुढे फाळणीची ही शोकांतिका अटळ नव्हती असा निष्कर्ष काढताना ‘जर संघराज्याचा (फेडरल) विस्तृत पाया आपण स्वीकारला असता, तर हे शक्य होते,’ असे देखील जसवंत सिंग सुचवितात. असो. जसवंत सिंग यांच्या या विषयातील अधिकाराबद्दल प्रश्नच नाही. अर्थात स्वतंत्र भारतात अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारात ते परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री, अर्थमंत्री होते हा काही योगायोग नव्हे.
१९४८ साली निजामाची राजवट संपल्यावर, हैद्राबाद संस्थान भारतात विलीन झाल्यावर तिथले मुसलमान स्वत:ला ‘अल्पसंख्याक’ म्हणवून घेऊ लागले. ज्या Minority Syndrome मुळे पाकिस्तानची निर्मिती झाली, त्याचा संसर्ग स्वतंत्र हिंदुस्थानभर पसरला... हेच जर सध्याचे वास्तव असेल, तर मग फाळणीला जबाबदार कोण, हा प्रश्नच निरर्थक आहे. ‘कोणत्याही धर्माचा, जातीचा हिंदुस्थानचा नागरिक असो, त्याला घटनेनुसार समान अधिकार मिळण्याची ग्वाही दिली जाईल,’ या नेहरूंच्या सुरुवातीपासूनच्या भूमिकेचे महत्त्व, आज स्वतंत्र्याच्या साठ वर्षांनंतरदेखील सत्तेच्या लोभपायी मान्य होत नाही, हेच या देशाचे दुर्दैव!
या पुस्तकातील, जिना-गांधी यांच्यातील वाटाघाटी, गांधी-नेहरू यांच्यातील दुरावा दर्शविणारा पत्रव्यवहार, वेव्हेल-गांधी-नेहरू चर्चा, मौ. आझाद यांचे जामा मशिदीतील भाषण, डॉ. लोहियांचे फाळणीच्या योजनेवर झालेले भाषण, बॅ. जिना यांची भाषणे पत्रव्यवहार वगैरे सारं मुळातून वाचण्यासारखे आहे. त्या काळी झालेले विविध काम गोपनीय पत्रव्यवहार, करारांचे मसुदे वगैरे संदर्भासाठी हे पुस्तक महत्त्वाचं ठरतं. पुस्तक वाचून झाल्यावर एवढंच जाणवतं, फाळणीची घटना हा एक कॅलिडोस्कोप आहे. जसा ‘दृष्टिकोन’ बदलेल, तसं घटनाचित्र बदलत जातं, निष्कर्ष बदलत जातात. इतिहास कधी बदलत नाही! ...Read more