DAINIK TARUN BHARAT 21-03-1999‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत हे मराठी साहित्यातील सिद्धहस्त लेखक. साहित्याशी जिवाशिवाचे नाते जडलेल्या सावंतांनी उत्तुंग व्यक्तिरेखांना कांचनाच्या कोंदणात बद्ध केले. त्यांच्या साहित्यकृतीच्या आकृतिबंधात उदात्ततेचा साक्षात्कार, सखोल चिंतन व श्रद्धाळू मनजाणवत राहते. ‘कांचनकण’ या ललित लेखात विविध विषयांवरचं त्यांचं मुक्त चिंतन आहे. आदरणीय व्यक्तींच्या स्मृती, पूजनीय व्यक्तींच्या स्मृती आहेत. व्यक्तिगत जीवनाशी निगडित घटना, उपेक्षितांसाठी लढा देणाऱ्याची चरित्रकहाणी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्यपूर्ण पैलू, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांवरील, ज्ञानेश्वरीवरील चिंतनमय, रसाळ लेख, ‘मृत्युंजय’ च्या संदर्भातील दूरदर्शनचे दुर्दर्शन, कलावंतनगरी - उद्यमनगरी कोल्हापूरचे वर्णन, बाजीराव - मस्तानी ही वादग्रस्त ऐतिहासिक घटना अशी विषयांची विविधता प्रस्तुत पुस्तकात आढळते.
‘दिवस छाव्या’ चे या लेखात संभाजी राजें सारख्या दुहेरी व्यक्तिमत्त्वाला योग्य न्याय मिळावा म्हणून केलेली जिवापाड मेहनत, धडपड लेखक सांगतो. झपाटलेल्या अवस्थेत असंख्य गडकोटांची केलेली पायपीट, दहा वर्षे ऐतिहासिक संदर्भग्रंथांचा केलेला अभ्यास अशा अथक परिश्रांतून डोळसपणे त्यांनी व्यक्तिरेखा उभी केली. संभाजीराजेंचे राष्ट्रप्रेम, अपूर्व बलिदान त्यांच्या दोषांमुळे झाकोळून जाऊ नये म्हणून केलेले श्रम त्यासाठी मृत्यूलाही सामोरे जाण्याची जिद्द दिसते. सहचारिणी, मित्रपरिवार यांचं पाठबळ, जगदंबेने दिलेले मनोबल यामुळे मिळालेले यश व कुसुमाग्रजांकडून मिळालेली शाबासकीची थाप यात ते धन्यता मानतात.
ऐतिहासिक सत्याचा विपर्यास करणाऱ्या एका बखरवजा लेखाचा परामर्ष घेताना लेखकाने सत्याचा पाठपुरावा करून बखरवाङ्मयाचा सुप्त अभ्यास केला. शिवप्रभूंसारख्या उत्तुंग, पूजनीय, सकलागुणांनी युक्त अशा नृपश्रेष्ठांचे चारित्र्यहनन व राणीच्या नावाला लागलेला कलंक असह्य होऊन लेखकाने बखरीतील अवास्तव, रंजकतेचा मुलामा चढवलेला असत्यास वाचा फोडून ऐतिहासिक घटनेचा अपलाप करणाऱ्या घटनेवर प्रकाश टाकलाय.
‘कुलस्वामिनी’ या लेखात आदिशक्ती, आदिमातेचा महिमा, आदिशक्तीची तीन शक्तिपीठे, विविध रूपे, जागृत दैवते, त्यांचे माहात्म्य, त्यांच्यावरील श्रद्धा, जगन्मातेची विविध रूपे, प्रेरणाशक्ती, निरनिराळ्या प्रसंगी कारणपरत्वे धारण केलेली रूपे यांचा उल्लेख आहे. कलावंतनगरी कोल्हापूरचे ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध रंगांचे आंतर्बाह्य रूप उलगडून दाखवताना त्या शहराशी असलेली लेखकाची भावनिक जवळीक जाणवते. श्रीकृष्णासारख्या अवतारी पुरुषश्रेष्ठांची भूमी (पौराणिक संदर्भ), राजर्षी शाहू महाराजांसारखा प्रजाहितदक्ष, प्रजेवर पुत्रवत प्रेम करणारा, राज्याच्या जनतेच्या सर्वांगीण हितासाठी झटणारा राजा, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोल्हापूरचे सुपुत्र वि.स.खांडेकर, नाट्यचित्रपट कलावंत, शैक्षणिक क्षेत्रातील महारथी अशी वैभवशाली परंपरा वर्णिताना लेखक रंगून जातो. कला, क्रीडा, उद्योगव्यवसाय, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रांत अग्रगण्य असलेले कोल्हापूर या शहराने महाराष्ट्रास उदंड दिले. त्या शहराबद्दलची आत्मीयता, अभिमान व्यक्त होतो.
छत्रपती शिवाजी महाराज व मिर्झाराजे जयसिंह यांच्यामधील समरप्रसंगावरील संवादातून एका श्रीमान योग्याचे मर्मस्पर्शी चित्रण अरविंदबाबू घोष या सिद्धपुरुषाने केले आहे. अरविंदबाबूंबद्दलचा आदरही प्रस्तुत लेखात व्यक्त झाला आहे.
ज्ञानेश्वरीतील साहित्य सोनेचिया खाणीतील अनमोल रत्नांचा खजिनाच ‘एक तरी ओवी अनुभवावी’ या विवेचनपर लेखात वाचकांसाठी उघडा केला आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या कवित्वशक्तीचा साक्षात्कार, त्यांची अलौकिक प्रतिभा, तत्त्वज्ञान, शब्दसृष्टीच्या सामर्थ्यावर उभी केलेली प्रतिमासृष्टी त्यातून भावाशयाचे नवनवे पदर तरलपणे उलगडत जातात. या महाकवीच्या अनुभवविश्वाचे अफाट, विशाल सामर्थ्य प्रकटते त्याच्या प्रत्येक ओवीओवीतून. शब्दसृष्टीच्या अलौकिक किमयेतून नाट्य उभे राहते. ‘विश्वाचे, आर्त माझ्या मनी प्रकाशले अवघेंचि झाले देह ब्रह्म’ असा विश्वकल्याणाचा महन्मंगल महान विचार ज्ञानेश्वर महाराज मांडतात. भारतीय संस्कृतीशी निगडित दृष्टांत, प्रतीके, जीवनाचा अर्थ, कल्पनाशक्ती, रसाळपणा, माधुर्य, सूक्ष्म अर्थछटा, अर्थाची श्रीमंती या हृदय हेलावून टाकणाऱ्या ज्ञानेश्वरीशी लेखकाचा आत्मा एकरूप झाला आहे.
‘मृत्युंजय’ ने लेखकास मराठी साहित्यात एक वेगळे स्थान प्राप्त झाले. या साहित्यकृतीची भाषांतरे झाली. महाभारतातील प्रत्येक व्यक्तिरेखेचे सूक्ष्म चित्रण, सखोल चिंतन, व्यक्तिरेखेला न्याय देण्याचा आग्रह यामुळे मृत्युंजय एका वेगळ्या उंचीवर पोचले आहे. मात्र याच मृत्युंजयची दूरदर्शनने केलेली दुर्दशा पाहून लेखकाचे मन खंतावते. आपल्या अभ्यासपूर्ण चिंतनशीलतेतून केलेले चित्रण वास्तव भासते. वास्तव व कल्पित यांच्यातील सीमारेषा रुंदावल्या की व्यक्तिरेखेतील प्राणच निघून जातो. हे त्याने सोदाहरण स्पष्ट करतात.
‘गोदीच्या किनाऱ्यावर’ मध्ये लेखक १९४२ चे मंतरलेले दिवस वाचकांच्या नजरेसमोर उभे करतो. राष्ट्रप्रेमाने भारावून गेलेल्या प्रत्येकाच्या आयुष्याने एक क्रांतिकारी वळण घेतले होते. महात्मा गांधी, पं.नेहरू, राजेंद्रबाबू, जयप्रकाश नारायण, यशवंतराव चव्हाण, साने गुरुजी, वसंतदादा पाटील, आचार्य कृपलानी, स्वा.सावरकर, अच्युतराव पटवर्धन, इंदिरा गांधी अशा नेत्यांनी स्वातंत्र्यासाठी जे अपार कष्ट उपसले त्याचा उल्लेख आहे. स्वातंत्र्यानंतरचा भारत, गांधी हत्येनंतरचा भारत, जनसामान्यांची मानसिकता, सामाजिक समस्या, उपेक्षितांची दैन्यावस्था यांचे विश्लेषण केले आहे. भाई मनोहर कोतवालांचे ‘पाम व्ह्यू’ तील दिवस, कामगारांसाठी केलेला संघर्ष, लढा, त्यांना मिळवून दिलेला न्याय या त्यांच्या महत्त्वपूर्ण जीवनकार्याचा गुणगौरव लेखकाने विस्तृतपणे केला आहे.
इतिहासातील प्रसिद्ध, पराक्रमी, गुणी, मुत्सद्दी व्यक्तींच्या आयुष्यातही वादग्रस्त घटना घडू शकतात. त्यामुळे त्यांचे जीवन झाकोळून जाऊ शकते. त्या व्यक्तिमत्त्वात एक स्खलनशील माणूस सामावलेला असतो. या सत्यावर प्रकाश टाकताना लेखकाने बाजीराव-मस्तानी यांच्यातील हळुवार नातेसबंध व छत्रपती शिवाजी महाराज या दोघांच्या जीवनातील समान प्रसंगाचा आधार घेतला. राष्ट्रनिष्ठा, पराक्रम, आदर्श राजा हे समान गुण असूनही एका मोहास बळी पडल्याने एका व्यक्तिरेखेचे पतन होते.
प्रस्तुत पुस्तकातील अनुभवांचे कांचनकण हृदयात अमोल ठेवा म्हणून साठवून ठेवावेत असे लेखकाच्या खास वैशिष्ट्यांसह हे कांचनकण झळाळून उठतात. कोणत्याही व्यक्तीतील, कलाकृतीतील दिव्यत्वाचा, अलौकिकत्वाचा शोध घेण्याचा लेखकाचा हव्यास या ललित लेखांतून दिसतो. त्यांच्या भावस्पर्शी, हळुवार पण सखोल चिंतनाचा स्पर्श असलेल्या या ललित लेखांचा आस्वाद घेताना हे मनात दरवळत राहते. ...Read more