Ashwini Surveकथा परिणामकारकतेनं कथन करता येणं ही एक कला आहे. ही कला एखाद्या व्रतासारखी जोपासताना आलेल्या अनुभवांचं कथन म्हणजेच वपुंच ‘कथाकथनाची कथा’ हे पुस्तक.
प्रसिद्ध कवी ‘प्रवीण दवणे’ यांनी त्यांच्या फेसबुक वॉल वर सांगितलेला हा ‘वपुं’चा एक किस्सा..
कॉलेजमध्ये असताना एका वर्षाला, ‘प्रवीण दवणे’ सर, त्यांच्या कॉलेजच्या मराठी वाङमय मंडळाचे प्रमुख होते; तेव्हा सर्व मुलांनी ‘वपुं’ना कार्यक्रमाला आणण्याचा आग्रह धरला.
कथाकार आणि कथाकथनकार म्हणून वपुंनी लोकप्रियतेचे शिखर काबीज केले होते (अर्थात, अजूनही वपु तितकेच लोकप्रिय आहेत आणि राहतील).
तर, दवणे सरांनी, वपुंना कार्यक्रमाला बोलविण्यासाठी प्रयत्न करायचे ठरवले. त्यांनी वपुंना फोन करून कार्यक्रमाबद्दल सांगितलं. वपुंचे मानधन कॉलेजला परवडणारे नसेल याची त्यांना भीती होतीच; आणि ती भीती खरी ठरली.
मानधन अपेक्षेपेक्षा १० पटीने अधिक होते! कॉलेजला तर ते अशक्यच होते!
दवणे सर वपुंना एवढेच म्हणाले, “वपु, विद्यार्थ्यांना मला लेखकातील हिमालय दाखवायचेत, आपण नाही आलात तर ते स्पीडब्रेकरला हिमालय समजतील!”
१० सेकंदांचा विराम गेला; नि एकदम वपु म्हणाले, “मी येतो! तयारीला लागा”.
दवणे सर पुढे लिहितात, मित्रहो; त्या दिवशी आम्ही वपूर्वाई अनुभवली!
खरंच, काय लिहिलंय प्रवीण सरांनी! “स्पीडब्रेकर ला हिमालय समजतील”! अगदी, सर्वांच्या मनातले भाव व्यक्त केलेत. ‘वपु आहेतच हिमालय!’
असे अनुभव वाचताना, अंगावर काटा येतो! आपल्या आवडत्या लेखकाला भेटणं, त्यांचे अनुभव ऐकता येणं, ही खरंच भाग्याची गोष्ट आहे.
इथे सांगायचं मुद्दा हा की, प्रत्यक्षरित्या नाही पण वपुंच्या ‘कथाकथनाची कथा’ या पुस्तकामधून असाच अनुभव मला ही मिळाला.
अगदी योगायोगाने हे पुस्तक हाती आलं आणि एखादा खजिना सापडल्यासारख झालं. आमचा ‘येथे कविता लिहून मिळतील‘ हा कार्यक्रम सादर करण्यासाठी या पुस्तकामुळेच बळ मिळालंय.
या पुस्तकात वपुंनी, त्यांच्या ‘कथाकथन’ कार्यक्रमानिमित्त त्यांना आलेले चांगले वाईट-अनुभव अगदी दिलखुलासपणे मांडले आहेत. त्यानिमित्ताने, वपुंच्या आयुष्यातील मोठमोठ्या व्यक्तींची, त्या व्यक्तींच्या विचारांशी आपलीही ओळख होते; आणि एखाद्या कलेसाठी स्वतःला “झोकून देणे” म्हणजे काय, हे कळतं.
तुम्ही कथाकथनकार, कवी, लेखक किंवा कलाकार असाल, तर हे पुस्तक एकदा तरी वाचाच. सामान्य वाचक म्हणून देखील आपल्या आवडत्या लेखकाच्या आयुष्यातील हे अनुभव तुम्हाला हसवतील, अंतर्मुख करतील, कलाकाराने स्टेजमागे खाल्लेल्या टक्केटोणप्यांची जाणीव करून देतील आणि तुमचं अनुभवविश्व समृद्ध करतील.
कलेच्या क्षेत्रात काम करताना येणाऱ्या विविध परिस्थितींना कसं सामोरं जायचं, वातावरणनिर्मिती कशी करावी, एखादा कार्यक्रम करताना काय खबरदारी घ्यावी, कथा कशी निवडावी, ती सादर कशी करावी अशा अनेक प्रश्नांची उत्तरं उदाहरणांसहित यात मिळतील.
त्यांच्या पहिल्याच तिकीट लावून झालेल्या प्रयोगाला, ‘वसंताचा कार्यक्रम रुपया देऊन कसला ऐकायचा?’ असं म्हणत मित्रमंडळी आली. त्यातल्या एका मित्राने रुपया दिला पण दोन दिवसांनी, “परवा काही एवढी मजा नाही आली बुवा; रुपया वाया गेला” म्हणत तो रुपया पण परत घेतला.
गावोगावी प्रवास करताना, तिकीटांच्या सोयीपासून, राहण्याची व्यवस्था, बुडवलेले मानधन, काही आयोजकांचा तर्हेवाईकपणा, फुकटात प्रयोग करत नाहीत म्हणून किंवा असूयेने पसरवलेल्या अफवा यांबद्दल सांगतानाच, श्रोत्यांकडून भरभरून मिळालेल्या दानाबद्दलही ते मोकळेपणाने लिहितात.
वपु म्हणतात, “आपला श्रोता हाच आपला देव. बालगंधर्वांप्रमाणे मी जरी ‘मायबाप हो’ अशी हाक मारली नाही, तरी मनात भाव तोच आहे”.
‘कथाकथनाने काय दिलं?, असं विचारलं की वपु म्हणतात, ते शब्दात कसं मोजता येईल ?’
पण कृष्णामाईच्या चार हजारांवर श्रोत्यांची उपस्थिती असलेल्या उत्सवात, ‘आपण प्रचंड मोठा मंडप उभारू शकतो, हा इथल्या कार्यकर्त्यांचा गर्व तुम्ही उतरवलात’, असे सांगत एका वृद्ध गृहस्थाने व्यक्त केलेला आनंद, वपुंची ‘गार्गी’ कथा ऐकल्यानंतर, ‘माझ्या मुलाला मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं, ह्याचा मला अभिमान वाटतो’, हे सांगताना एक डॉक्टरच्या चेहऱ्यावरचा आनंद ,’तुम्ही स्त्रीला ज्या उंचीवर नेऊन ठेवलंय, तसं इतर कोणीच करू शकत नाही’, हा एका स्त्रीचा अभिप्राय, एका टॅक्सीवाल्याने दिवसभर ऐकवलेल्या वपुंच्याच कथा, एका दुकानदाराने वपुंसमोरच, त्यांना न ओळखता, “तुम्ही अगदी वपुंसारखे बोलता’ ही दिलेली दाद त्याचसोबत थोरामोठ्यांची संगत, त्यांनी दिलेली शाबासकीची थाप, अशा अनेक आठवणी या पुस्तकातून आपल्याला भेटतात आणि दवणे सरांना वपु ‘हिमालय’ का वाटले हे कळतं.
जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती, हे म्हणतात ते खरंच आहे. एखादी व्यक्ती कशी आहे, हे फक्त वरवर पाहून कसं कळणार? वपुंच्या शब्दात सांगायचं तर, ‘माणूस जन्माला येतो तो कोरी पानं घेऊन. त्या पुस्तकाला रॅपर्स चढवली जातात. एकदा हे बुक-जॅकेट चढलं की पोशाखी जगात मुखपृष्ठाकडे पाहूनच ग्रह करून घेतले जातात.
पुस्तकाची पुष्कळशी पानं इतरांसाठीच राखून ठेवलेली असतात. स्वतःला हवा तोच मजकूर लिहिण्याचं भाग्य कोट्यवधी माणसांत एखाद्याचंच’. अशाच अनेक पुस्तकांपैकी ‘वपु’ एक पुस्तक.
आपल्याला त्यांना वाचता येतंय हे आपलं भाग्यच म्हणायचं,नाही का?
तुमच्या आहेत का अशा, आवडत्या लेखकांच्या भेटीच्या आठवणी? जमलं तर खाली कॉमेंटमध्ये सर्वांसोबत शेयर करा. ...Read more