साप्ताहिक सकाळ.. अशोक कौतिक कोळी १९.डिसेम्बर २०२२ एकनाथ आव्हाड यांचे `खळाळता अवखळ झरा आणि इतर कथा` हे बाल -किशोर कथांचे बहुरंगी, दर्जेदार पुस्तक, आकर्षक मुखपृष्ठ, बहुरंगी चित्र व सुबक मांडणी यामुळे हे पुस्तक फारच देखणे झाले आहे.
एकनाथ आव्हाड यांनी खास मुलांसाठी म्हणून लिहिलेल्या ` खळाळताअवखळ झरा आणि इतर कथा ` या पुस्तकामध्ये नाविन्यपूर्ण, मनोरंजक तसेच डोक्याला खुराक पुरविणारा अद्भुत खजिना आहे. त्यात मौजमजेचा खजिना तर आहे, पण त्याशिवाय कल्पनाशक्तीला वाव आणि सर्जनशीलतेचा विकासही आहे.
पुस्तकातील पहिलीच कथा `खळाळता अवखळ झरा` खूपच टवटवीत रसरशीत झाली आहे. खरेतर हा झरा केवळ खळाळता नाही, तर चैतन्यदायी आहे. या कथेत एवढे चैतन्य, साहस, कल्पना, अद्भुतता, भूतदया भरलेली आहे,की ती एक सर्वांगसुंदर कथा होऊन जाते. साने गुरुजींप्रमाणे प्रचंड निरागसता, यशोदाबाईंची अतोनात प्रेमळ करूणा तीत काठोकाठ भरलेली आहे,. एकनाथ आव्हाड यांनी निर्माण केलेल्या पात्रांना निसर्गाची व गावाकडची ओढ आहे. `खळाळता झरा` या कथेतील बाळू आणि शमी यांना अशी ओढ आतुरतेने लागलेली आहे,. प्रचंड उकाडा आणि उन्हाळ्याची पर्वा न करता ती गावाकडे जाता. अर्थातच हा गाव मामाचा आहे. तेथील गमती जमती, निसर्गात ते आकंठ बुडून जातात. पोहणे, खेळणे, मजा करणे, गप्पा करणे यात रमून जातात. केवळ मजाच नाही , तर गावगाडा, तेथील निसर्गाशी एकरूप होऊन जातात, त्याही पुढे जाऊन गावात आलेल्या सर्कशीमधील जोकर मुलाशी मैत्री करत त्याला मदत करतात. अशी सुंदर कथा आहे. मनोरंजनासोबतच मुलांवर संस्काराची झूल पांघरते. त्यात कुठलाही बडेजाव किंवा अधिकारवाणीचा लवलेश नाही. हीच तर खरी गंमत आहे. आनंद, अभिमान आणि आचरण सहज शिकायला मिळते. लेखक एकनाथ आव्हाड यांच्या लेखनाचे हेच तर वैशिष्ट्ये आहे.
`सुंदर लखलखित मन` या कथेत कल्हई करणाऱ्या कारागिरावर लेखकाने लिहीले आहे. मला लेखकाचे कौतुक यासाठीच आहे, की ते शहरी-ग्रामीण अशा चौखूर विषयांना हात घालतात व आपल्या बालवाचकांची मने समृद्ध करतात. मनांना उभारी देत ज्ञानात भर घालतात. या कथेतून कल्हई म्हणजे काय? ती कोणत्या भांड्याना करतात? का करतात? याची सविस्तर माहिती मळते. या कथेत पण कल्हई करणाऱ्या कारागिरांवर, त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल नाह्कच शंका घेतली, याबाबतची पश्चातापाची भावना बाळू, शमी आणि त्यांच्या आईच्या मनात निर्माण होते. खरेतर हा सहअनुभव वाचकांनाही मिळतो. म्हणून हि गोष्ट सुंदर आणि परिणामकारक होते. मानलं लखलखकीत करून जाते. एकनाथ आव्हाड पुस्तकात विविध प्रयोग करतात. पुस्तक गोष्टीचे असले तरी त्यात गाणी, कविता, कोडी, खेळाचे विविध प्रकार, नाविन्यपूर्ण माहितीचा खजिना-असे खूप काही असते. या संग्रहातसुद्धा अशी धमाल आहे. एक कथा तर केवळ म्हणींवर आधारित आहे. मुलांच्या रोजच्या खेळातून कथा फुलत जाते व मजेशीर अनुभव देत जाते.
याच आशयाची `भाषेची गोडी` लावणारी दुसरी एक कथा या संग्रहात आहे. त्यामधून तर नवीनच गोष्ट शिकायला मिळते. वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज कसे असतात व त्यांचा मराठी भाषेत उच्चार कसा कला जातो, याची गोष्टीतून छान गुंफण केली आहे. हि गुंफण गंप्पाच्या ओघात काव्यमय आहे. यातून पक्ष्यांची किलबिल, कावळ्यांची कावं काव, कोकिळेची कुहूकुहू, गाईचे हंबरणे, म्हशीचे रेकणे, मोराचा केकराव, हंसाचा कलरव, मधमाशांचा गुंजारव, कुत्र्याचे भुंकणे, कोंबड्याचे आरवणे, बेडकाचे डरावणे, वाघाची डरकाळी, सिंहाची गर्जना, घोड्याचे खिंकाळणे ,हत्तीचे चित्कारणे अशा आवाजांची माहिती होते. मनोरंजनाबरोबरच शब्दसंग्रह वाढतो.
मराठी भाषा आणि या भाषेतील सौंदर्य जणू लेखक येथे उलगडत जातात. गोष्टीतून भाषेचा संस्कार रुजवण्याचे मोठेच काम लेखकाने केले आहे . हा संस्कार चिरकाल टिकणार आहे. `श्रावणसरी आल्या घरी` या कथेतून तर लेखकाने चक्क नामवंत कवी आणि त्यांच्या टोपणनावांची माहिती करून दिलेली आहे. सोबतच त्या त्या कवींच्या पावसावरील कवितांची मेजवानी सादर केली आहे. हा प्रयत्न मला खूपच मोलाचा आणि अनोखा वाटतो. अगदी घरातील गप्पांमधून हा प्रवास उलगडत जातो. एक आनंदी वातावरण पसरते. डोक्यात सकारात्मक विचार येतात. पहिल्या पावसासोबत येणार मृदगंध जणू आपल्या आसपास दरवळू लागतो.
भाषेतील हेच पावसाळी वातावरण लेखक बाळूच्या घरातून थेट शाळेत घेऊन जातात. घरी बाळूचे आई-वडील ज्ञानात भर घालतात, शाळेत हेच कार्य थोरात सर करतात. ते त्याचे मराठीचे शिक्षक आहेत. थोरात सर `पावसाची कविता` एवढ्या तन्मयतेने शिकवितात, की जणू पाहल्या पावसातील भाजलेला मातीचा मृदगंध वाऱ्याबरोबर वर्गात शिरतो. पाऊस नटखट होऊन नाचू-गाऊ लागतो. असे भारावलेले वातावरण येथे आहे.
या संग्रहातील सगळ्याच गोष्टी वाचनीय आहेत. यातील पात्रे परोपकारी आहेत. बाळू आणि शमी हि मुख्य पात्रे येथे भेटतात. त्यांच्याभोवती बहुतेक कथांचे कथानक गुंफलेले आहे. शिवाय या पात्रांचे आई-वडील, शिक्षक,मित्र, निसर्ग यांची खास मांडणी आहे. शमीची आई यशोदाबाईंसारखी परोपकारी आहे. वेळोवेळी प्रसंगातून ती शिकवण देते. मुलांचे वडीलसुद्धा तसेच आहेत. मुलांच्या आवडी निवडीची ते जोपासना करतात. शमी गावावरून आलेल्या सीताला शाळेत प्रवेश मिळवून देऊन `मदतीचा चिमुकला हात` पुढे करते. बाळू पिंजऱ्यातल्या पोपटांची सुटका करून `स्वातंत्र्याचे मोल` जोपासतो. पुस्तकाचे महत्व सांगणारी `गुगल आजी` येथे भेटते, तशाच चित्रकला व निसर्गाची गोडी लावणाऱ्या मुळे बाईसुद्धा भेटतात. निसर्ग जणू `परोपकारी संत` असे त्या सांगतात.
यात पारंपरिक कथानकाला फाटा देत लेखकाने नवेनवे प्रयोग केले आहेत, यासाठी `खळाळता अवखळ झरा आणि इतर कथा` हा कथासंग्रह महत्वाचा आहे. केवळ चिऊ चिऊ आणि पानाफुलांमध्ये रमणाऱ्या या काथा नाहीत. तसेच पारंपरिक सरळधोपट कथन पद्धतही टाकून दिलेली आहे. त्याउलट गप्पा, गोष्ट, खेळ, कोडी, दैनंदिनी प्रसंग यांतून कथा फुलत जातात. यातून नवनीताची शिकवण व प्रेरणादायी सर्जनाची निर्मिती घडत जाते. ...Read more
प्रा. सुहासिनी कीर्तिकरछोट्यामोठ्यांच्या मनाचा ठाव घेणारा
खळाळता अवखळ झरा
सुप्रसिध्द बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांनी आजवर जवळपास तीस पुस्तके वाचकांहाती देऊन आनंदाचा झरा खळाळता ठेवला आहे. चाळीसच्या दशकात लोकप्रिय असलेली कवितेतील एक ओळ या संदर्भात सहज आठवून गेली. जो मनोरंजन करी मुलांचे। त्याच्या मुखीं देव वसे।।’ इथे आव्हाडांच्या बाबतीत थोडा बदल करुन ‘मुखीं’ न म्हणता ‘लेखीं’ (म्हणजे लेखणीत असा दूरान्वयाने अर्थ घेऊन) म्हणावेसे वाटते. हे असे मनोरंजन पुस्तकाद्वारे करणे हेदेखील विशेषच कौतुकाचे आणि महत्त्वाचेही. कारण जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर घरोघरी होणारे पूर्वीचे संस्कार बदलत गेले. दैनंदिनी बदलली. समस्या वाढल्या. अशावेळी वाचनछंद हा सुखाचा ‘तिळा उघड’ मंत्र ठरतो. पण बालविश्वाशी एकरूप होऊन, त्यांच्या मानसिक जाणिवा समजून घेऊन, त्यांच्या आनंदाच्या कल्पनांशी समरस होऊन आणि ‘कुटुंब’ संस्थेतील जमेच्या बाजू ठळकपणे स्वीकारून ‘आज’च्या संदर्भातील तरीही काही नवे, अनोखे दिले तरच मुले हा मंत्र म्हणणार. वाचनछंद जोपासून त्यात डुंबणार. एकनाथ आव्हाड हे जाणतात.
‘डुंबणार’ हा शब्द इथे जाणीवपूर्वक वापरला आहे. कारण आव्हाडांनी कथासंग्रहाचे नावच ‘खळाळता अवखळ झरा’ असे ठेवले आहे. (...‘आणि इतर कथा’ हे अनुषंगाने येते.) मुखपृष्ठावर या झऱ्यात डुंबणारी, आनंद लुटणारी मुले दिसताहेत... म्हणून ‘डुंबणे!’ इथेच आणखी एक वैशिष्ट्य अधोरेखित करावेसे वाटते की, मुलांचे मानस रमेल अशा पद्धतीने सर्वभर रंगीत चित्रे येतात, रंगीबेरंगी पाने येतात आणि या कडेकडेने मजकुरातून वाचक पुस्तकभर वाचनप्रवास करतो. ही सर्वच मांडणी आनंददायी आहे. एकूण सोळा कथा आहेत या संग्रहात. पण बाळू, शमी, आई, बाबा, मामा-मामी, मित्रमंडळ असे हसरे, आनंदी कुटुंबच सर्व कथांत नांदते आहे. अक्षरश: ‘नंदंति देवता इति नांदी’ या व्याख्येनुसार हे नांदते कुटुंब वाचकांना आनंद देते. स्वत:चा एक मित्र बनविते. बाळू हा बालनायक सर्वांचाच मित्र बनतो. तो हुशार आहे, कामसू आहे, संस्कारी आहे अन् सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याला अक्षरांची, शब्दांची जादू माहीत आहे. त्यामुळे साध्या साध्या प्रसंगी त्याची कल्पना बहरून येते, तो यमक- अनुप्रास इत्यादी अलंकार न आठवताही त्यांच्याशी सहजपणे खेळतो, कविता करतो. शब्दांच्या लयीतील गंमत त्याला खुणावते... अगदी सहजपणे त्याला शमीचीही (बहिणीची) साथ आहे. जसे की; सुरुवातीच्याच पानांवर मामाच्या गावाला जाण्याची ओढ येते. संवाद येतो तेव्हा - बाळू म्हणाला, “आई, अगं मामाच्या गावी झाडांची दाटी, लपाछपी खेळण्याची तिथे गंमतच मोठी.” शमी लगेच म्हणाली, “आई, मामाचा गाव नदीच्या काठावर, आनंदाचे गाणे तिथे मुलांच्या ओठावर.” किती सहज असा वहाता संवाद हा. अशा संवादाने कौटुंबिक, खेळकर, प्रसन्न वातावरण तयार होते. या मुलांना आवडतो तो ‘पुस्तकांचा खाऊ.’ हा खाऊ इतका सकस की बाळू कविताच करू लागतो उत्स्फूर्तपणे. विदूषकावर कविता येते ती अशी.
फक्त कवितांच्या नादात नाहीत ही मुलं. चांगले शिकण्याच्या आणि घडण्याच्या संस्कारांचे चुंबकही आहे त्यांना माहीत. मासला म्हणून ‘स्वातंत्र्याचे मोल’ ही कथा पाहता येते. पिंजऱ्यात अडकवलेले पक्षी, त्याचीच होते मग कथेत नक्षी. प्रयत्नें बाळू समजावी, पक्षीविक्याही प्रतिसाद देई... हे प्रतिसाद देणे म्हणजे आदर्श माणुसकीचे दर्शन आहे. त्यामुळे या कथा आदर्श घडविणाऱ्या, कवितांचे सर्जन करणाऱ्या संस्कारी घटना आहेत. ‘ऐकू या चला’ ही बाळूची कविता ध्वनिदर्शक शब्दांची रेलचेल असलेली अनोखी कविता आहे. एकाच पुस्तकाच्या या जादूमय पोतडीत संवादनाट्य, घटनाचित्र, कुटुंबदर्शन, संस्काराचे ठसे, प्रसंगचित्रण, कविता अशी आनंदाचा आस्वाद असणारी भेळ आहे.
शेवटच्या कथेत शेवटी आई म्हणते, “बाळांनो, ‘थँक्यू’त मोठी जादू आहे बरं.” ...आपण ही जादू अनुभवून आव्हाडांना वाचनानंद दिल्याबद्दल मनापासून ‘थँक्यू’ म्हणूया. अशीच पुस्तके यापुढेही देत चला, फुलवित आनंदाचा मळा. बाळूला जशा आपल्या प्रतिक्रिया काव्यमय वाहत्या शब्दांत द्याव्याशा वाटतात ना; तसेच वाचक म्हणून ‘थँक्यू’ म्हणताना इतर वाचकांसाठी म्हणावेसे वाटते, -
काढून मुद्दाम वेळ
आस्वादा ही लेखनभेळ
गोष्ट, गाणी, संस्कारांचा हा मेळ
खाता खाता जाईल भुर्रकन् वेळ.
लेखक आपुले आव्हाड
आनंदाचे लाविले झाड
संस्कारांची येत त्यास फुले
ओंजळीत मग आनंद डुले.
...Read more