LOKPRABHA 12-04-2019‘ललितकलादर्श’ इतिहासाचा धांडोळा...
पुरुषोत्तम श्रीपती काळे (पु.श्री. काळे) हे उत्कृष्ट नेपथ्यकार म्हणून ओळखले जातात. नेपथ्यकार म्हणून त्यांच्या नावावर ४२ नाटके, २१ चित्रपट आणि असंख्य लॅण्डस्केप जमा आहेत. ‘ललितकलादर्श मंडळी’ या नाट्यसंस्थेसाठी आणि राकमल चित्रमंदिर या चित्रपट संस्थेसाठी त्यांनी नेपथ्यकार म्हणून काम केले होते. याच पुश्रींनी मराठी रंगभूमीच्या इतिहासात महत्त्वाचे योगदान असलेल्या ‘ललितकलादर्श’ या नाट्यसंस्थेच्या इतिहासाचा धांडोळा या पुस्तकात घेतला आहे.
‘ललितकलादर्श मंडळी’ची स्थापना हुबळी येथे १ जानेवारी १९०८ मध्ये झाली. सुरुवातीच्या मालकवर्गात गणेश विनायक वीरकर, मारुतीराव पवार-गोंधळी, बाळकृष्णपंत मादुसकर, कृष्णराव पवार, दत्तोपंत निईकर, केशव विष्णू बेडेकर, दत्तोपंत भोसले आणि केशवराव भोसले ही आठ मंडळी होती. सुरुवातीची अडीच-तीन वर्षे कंपनीने हुबळी, बेळगाव, सांगली, मिरज, कोल्हापूर या भागात दौरे केले. १९१० मध्ये कंपनीतील समान भागीदारीची योजना संपुष्टात येऊन फक्त केशवराव आणि दत्तोपंत भोसले हे दोघेच कंपनीचे मालक राहिले. ललितकलादर्शने सुरुवातीला सौभद्र, रामराज्यवियोग, मृच्छकटिक, शारदा, गोपीचंद, मुद्रिका आणि अक्षविपाक अशी सात नाटके सादर केली होती.
१९१४ मध्ये जमखिंडीकर मंडळी संस्थेत काम करणाऱ्या व्यंकटेश बळवंत पेंढारकर ऊर्फ बापूराव पेंढारकर या अभिनेत्यांना केशवरावांनी ललितकलादर्शमध्ये बोलाविले आणि ‘शारदा’ नाटकातील नटीची भूमिका करून पेंढारकर यांनी ललितकलादर्शमध्ये कारकीर्दीस केलेली सुरुवात ‘ललितकलादर्श’च्या ‘शहाशिवाजी’ या नाटकासाठी पुश्रींनी दोन मोठे प्लॅटसीन आणि दोन कव्हरचे पडदे रंगविण्याचे केलेले काम, नावाप्रमाणे एक आदर्श कंपनी होण्यासाठी केशवराव भोसले यांनी केलेले प्रयत्न, नाट्यसंस्थेत नेपथ्य, गायन, अभिनय तसेच उत्तमोत्तम नाटके रंगभूमीवर आणण्यात त्यांनी घेतलेली मेहनत, संस्थेने सादर केलेली ‘हाच मुलाचा बाप’, ‘संन्याशाचा संसार’, ‘शहाशिवाजी’, ‘शिक्का कट्यार’, ‘वधुपरीक्षा’ आदी नाटके, ललितकलादर्शमध्ये कोणी नवा पाहुणा आला की त्याच्या नावापुढे लागणारी ‘मामा’ ही उपाधी, कंपनीतील वातावरण, ‘ललितकलादर्श मंडळी’चे संस्थापक आणि एक मालक केशवराव भोसले, भोसले यांच्यानंतर ‘ललितकलादर्श’चे उत्तराधिकारी बापूराव पेंढारकर आणि बापूरावांनंतर ‘ललितकलादर्श’ची धुरा सांभाळणारे भालचंद्र पेंढारकर आदींच्या आठवणींना काळे यांनी उजाळा दिला आहे.
महात्मा गांधी यांनी १९२१ मध्ये एक कोटी रुपयांचा लोकमान्य टिळक स्वराज्य फंड जमा करण्याचा संकल्प केला होता. त्यासाठी मुंबईतून ‘गंधर्व’ आणि ‘ललितकलादर्श’ या दोन कंपन्यांनी एकत्र येऊन ‘मानापमान’ या नाटकाचा संयुक्त प्रयोग सादर केला होता. मराठी नाट्यसृष्टीच्या इतिहासात गाजलेल्या या संयुक्त मानापमानचा प्रयोग ८ जुलै १९२१ रोजी मुंबईत बालीवाला थिएटर येथे झाला. नाटकात केशवराव भोसले हे ‘धैर्यधर’ तर बालगंधर्व ‘भामिनी’ झाले होते. रात्री साडेसात वाजता सुरू झालेला नाटकाचा प्रयोग रात्री अडीच वाजता संपला, अशी आठवणही काळे सांगतात. केशवराव भोसले यांच्या निधनानंतर ललितकलादर्शच्या ‘सत्तेचे गुलाम’ या नाटकाला मिळालेला प्रचंड यश आणि त्यानंतर ‘तुरुंगाच्या दारात’ला मिळालेले अपयशही ते मांडतात.
पुस्तकातील परिशिष्टांमध्ये ललितकलादर्शमधील नटवर्ग आणि अन्य कलावंत, व्यवस्थापक, संवादिनीवादक, तबला वादक, रंगमंच व्यवस्थापक, संवादिनीवादक, तबलावादक, रंगमंच व्यवस्थापक, चित्रकार, लेखक, दिग्दर्शक, संगीत कलाकार, रंगपट आणि कपडेपट सांभाळणारी मंडळी याची माहिती देण्यात आली आहे. तसेच पुस्तकात केशवराव भोसले, वीर वामनराव जोशी, व्यंकटेश बळवंत ऊर्फ बापूराव पेंढारकर, भा.वि. वरेरकर, नानासाहेब फाटक, कृष्णाजी प्रभाकर, खाडिलकर, काही नाटकातील देखावे यांची छायाचित्रे आहेत. नाट्य, चित्रपट, चित्रकला या क्षेत्रात यश आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असलेली अनेक दिग्गज मंडळी पुश्रींच्या सहवासात आली. त्यांचे गुण-दोषही काळे यांनी परखडपणे मांडले आहेत. ‘‘ललितकलादर्श’ या नाट्य संस्थेचा इतिहास, आठवणी आणि किस्से आणि पर्यायाने मराठी रंगभूमीचा एक काळ या पुस्तकात उलगडला आहे. मूळ पुस्तक १९५६ साली प्रकाशित झाले होते. नुकतीच या पुस्तकाची दुसरी आवृत्ती आल्यामुळे हा नाट्येतिहास वाचण्याची संधी वाचकांना मिळाली आहे.
– शेखर जोशी ...Read more