DAINIK LOKMAT 07-02-2007अॅड. हिलरीची कर्तृत्ववान कहाणी...
जगात सामर्थ्यशाली व समृद्ध म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षाची पत्नी फर्स्ट लेडी ऑफ यू. एस. ए. - हिलरी रॉडहॅम क्लिंटन या जगन्मान्य व जबरदस्त व्यक्तीचे हे तेवढेच जबरदस्त आत्मकथन होय. जगातील ‘पवरफूल लेडिज’ च्या दहा क्रमांकात हिलरी यांचा समावेश झाला, तो केवळ त्या राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी म्हणून नव्हे तर त्यांनी केलेल्या विविध क्षेत्रांतल्या प्रचंड कार्यामुळे! थोड्याच अवधीत एक स्त्री इतके प्रचंड कार्य करू शकते. अन् तेही जगभर सतत फिर राहून यावर सकृतदर्शनी विश्वास बसणे कठीण जाते. पण, वाचताना जसजशी पाने पुढे पुढे जाता तसतसे ते निखळ सत्य असल्याचे जाणवते. कारण प्रत्येक प्रसंग व घडलेल्या घटना तारीख वारासह सूक्ष्म तपशीलात दिलेल्या आहेत. आयुष्यातल्या सगळ्याच भूमिका त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. ‘पारदर्शी आत्मकथनाचा हा एक आदर्श नमुना वाटतो. त्यातून अनुवादिका सुप्रिया वकील यांनी मूळ आशयास मराठीचा सुंदर साज चढविला आहे.
मनोगतात लेखिकेने जरी म्हटले आहे, की हे पुस्तक त्यांच्या ‘व्हाईट-हाऊस’ मधील आठ वर्षांच्या अनुभवाचा परिपाक आहे’ तरी खरे ते तसे नसून त्या आठ वर्षांच्या आधीची कित्येक वर्षे व त्यानंतरचीही काही वर्षे यांचा समग्र इतिहास म्हणजे हे पुस्तक आत्मकथन होय. पुस्तकाची सुरुवात अमेरिकेच्या पार्श्वभूमीने होऊन त्याच प्रकरणात लेखिका हिलरी रॉडहॅम क्लिंटन हिने आपला जन्म (२६ ऑक्टों. १९४७), जन्मठिकाण, आपली आई, आजी, वडील, त्यांचा व्यवसाय, दुसऱ्या महायुद्धाचा त्यांच्या व्यवसायावर झालेला परिणाम, काका रसेल व त्यांचा झालेला शोकांतिक अंत अशा आपल्या माहेरच्या परिवाराची माहिती दिली आहे. आजीमुळे आपल्या आईचे बालपण किती खडतर गेले हे आठवून आजही त्यांना वाईट वाटते. आजीच्या वर्तणुकीचा एक प्रसंग त्यांनी सांगितला आहे. तो वाचून वाचकांनाही वाईट वाटते. एका छोट्या चुकीसाठी त्यांच्या आजीने त्यांच्या आईला (डोरोथी हॉवेल रॉडहॅम) एक वर्षभर एका खोलीत कोंडून ठेवले. या आजीचे वर्णन हिलरी यांनी ‘एक असमाधानी स्त्री... गूढ व्यक्ती’ असे केले आहे. त्यांच्यावर उत्तम संस्कार केले. आपल्या आई-वडिलांच्या आईचे-हन्नाह-वर्णन मात्र ‘एक धीट व निश्चयी स्त्री’ असे केले आहे. आईच्या आईने हिलरींना आपले माहेरचेही आडनाव लावण्याचा आग्रह केल्यामुळे त्यांच्या नावापुढे दोन्ही आडनावे आहेत. महायुद्धाच्या आर्थिक मंदीची झळ या कुटुंबाला लागून गरिबीच्या छायेत त्यांना कसे दिवस काढावे लागले, याचेही वर्णन लेखिकेने खूप मोकळेपणाने केले आहे. त्यांच्या कथनाला हा मोकळेपणा कायम शेवटपर्यंत टिकला आहे. आपल्या कुटुंबात झालेल्या अशोभनीय गोष्टी लेखक टाळत असतात, इथे मात्र लेखिकेने संदर्भाच्या ओघात सहजतेने सांगितल्या आहेत. बिल उच्चपदावर असताना बिलच्या रॉजर नावाच्या लहान सावत्र भावास कोकेन-सेवन व विक्री या गुन्ह्याबद्दल जबरदस्त शिक्षा झाली. त्या वेळी आपल्या अधिकाराच्या जोरावर त्याची सुटका करणे बिलला सहज शक्य झाले असते; पण त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले की, ‘तुम्ही तुमच्या कायदेशीर मार्गाने जा.’ आपल्या पतीची ही कर्तव्यकठोरता पाहून हिलरींना आपल्या पतीचा खूप अभिमान वाटला. आपल्या पतीबद्दल वाटणारा आदर व प्रेम त्यांनी प्रसंगानुसार अनेक ठिकाणी व्यक्त केलेला आहे. ‘जे घडले ते कथन केले’ या त्यांच्या दृष्टिकोनामुळे त्यांचे आत्मकथन इतके ‘पारदर्शी’ झाले आहे, की इतरत्र ते क्वचितच आढळते.
‘बिल क्लिंटन’ या पाचव्या प्रकरणात त्यांनी क्लिंटन यांच्या परिवाराविषयी सविस्तर सांगितले आहे. बिल यांचा जन्म १९ ऑगस्ट १९४६चा. त्याच्या वडिलांचा मृत्यू मे १९४६ मधला. म्हणजे बिलच्या जन्मापूर्वी साडेतीन-चार महिने अगोदर त्यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या २३ वर्षांच्या विधवा आईने भूलतज्ज्ञ परिचारिकेचे प्रशिक्षण पूर्ण करून त्या स्वयंनिर्भर बनल्या. याच प्रकरणात हिलरी, यांनी बिलशी झालेली पहिली भेट, त्यानंतर प्रेम व विवाह (११ ऑक्टो. १९७५) याविषयी वर्णन केले आहे. या वर्णनात त्यांचा दिलखुलास स्वभाव दिसून येतो. लग्ल अत्यंत साध्या पद्धतीने त्यांच्या दिवाणखान्यात झाले. सन १९८० मध्ये मुलीचा जन्म झाल्यानंतर त्या म्हणतात, १९८० हे वर्ष आमच्या दृष्टीने फार महत्त्वाचे होते. कारण त्या वर्षांत आम्हाला मातृपितृपद लाभलं होतं.’ संसाराला सुरुवात झाल्यानंतर जुन्या व स्वस्तातल्या वस्तू जमवून किती काटकसरीने त्यांनी दिवस काढले, याचे वर्णन पान १११ वर आलेले आहे. लग्नानंतर बिल अर्कान्सासला (त्यांचे गाव) युनियन ऑफ अर्कान्सास स्कूल ऑफ लॉ मध्ये शिक्षक म्हणून काम करू लागले तर हिलरी या ‘येल’ येथील आपले लॉचे शिक्षण सुरू असतानाच ‘चिल्ड्रेन्स डिफेन्स फंड’ (?.?.?.) येथे काम करू लागल्या. जेव्हा वेलस्ली इथे कायद्याचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले त्याच दरम्यान राष्ट्राध्यक्ष निक्सन यांच्यावर वॉटरगेट प्रकरणी महाभियोग चालवला जाणार होता. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या वकिलांच्या यादीत हिलरी यांचेही नाव होते. त्या निवडीने त्या खूप सुखावल्या, तरी मोठ्या जबाबदारीचे ओझेही त्यांना अस्वस्थ करू लागले. त्यातून ते कार्य अत्यंत गुप्तपणे चालणार असल्याने तीही काळजी त्यांना वाटत होती.
व्हाईट हाऊसमध्ये राहत असताना (आठ वर्षे) एकदा अठरा हजार डॉलरच्या धनादेशाचा हिशेब लागत नव्हता. त्या वेळी ‘ट्रॅव्हल गेट’या नावाने त्यांच्यावर माध्यमांनी गदारोळ सुरू केला. अधिक तपासाअंती तो कार्यालयीन घोटाळा झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणाबद्दल त्या म्हणतात, ‘बिल व मी व्हाईट हाऊसच्या भूमिकेत अननुभवी असू, पण राजकारणासारख्या आडदांड विश्वात पुरेसे मुरब्बी होतो. आघार दूर सारून सत्य जीवनावर आपले लक्ष कसे केंद्रित करायचे हे आम्ही जाणून होतो.’ (२०९). राजकारणातील आपला आत्मविश्वास, खंबीरपणा, चातुर्य व बुद्धिचापल्य हे अनेक प्रसंगी दोघांनी सिद्ध केले होते. परराष्ट्रीय धोरणाच्या बाबतीत अत्यंत उदार सर्वसमावेशक धोरण स्वीकारून त्यांनी जवळजवळ ७८ देशांचा सदिच्छा दौरा करून अमेरिकेबद्दल अनुकूल मत बनवण्यात ते यशस्वी झाले. अनेकदा हिलरी यांनी एकटीनेही दौरे केले आहेत. जवळजवळ सर्व खंड, उपखंड, युरोपातील श्रीमंत व तंत्रज्ञानात विकसित असलेल्या राष्ट्रांपासून ते दक्षिण आफ्रिकेतल्या अत्यंत गरीब व मागासलेल्या राष्ट्रांपर्यंत व भारत, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका यासारख्या विकसनशील देशांत त्यांनी दौरे करून त्या त्या ठिकाणच्या समस्या जाणून घेतल्या. काही राष्ट्रांना सढळ मदतही केली. या विषयी एके ठिकाणी त्या म्हणतात, ‘मी जेव्हा राष्ट्राध्यक्षांच्या समवेत दौऱ्यावर असायची तेव्हा स्त्रिया व मुले यांच्याशी निगडित समस्या, आरोग्य सुविधा, सार्वजनिक शिक्षण, मानवी हक्क व पर्यावरण अशा प्रश्नांवर विशेष भर द्यायची’ (४१८). जॉर्डन इस्रायल यांच्यातील शांतता करारावर बिल यांच्या स्वाक्षऱ्या असून, हा करार बिलच्या पराराष्ट्रीय संबंधातला एक अत्यंत महत्त्वाचा ‘माईल स्टोन’ ठरला. त्या वेळी त्यांनी इजिप्तलाही भेट देऊन मैत्रीचे संबंध अधिक घट्ट केले. नेल्सन मंडेला यांच्या २७ वर्षांच्या प्रदीर्घ कारावासानंतर दक्षिण आफ्रिकेचे ते राष्ट्रप्रमुख बनले तेव्हा त्यांच्या सन्मान सोहळ्यास जाताना हिलरी यांनी आपल्या सोबत अनेक आफ्रिकन- अमेरिकन अधिकाऱ्यांनी नेले होते. हेतू हाच होता, की त्यांना ‘आपलं माणूस’ वाटणाऱ्या मंडेलांच्या भव्यदिव्य सत्काराचा आनंद त्यांनीही लुटावा. इतके हिलरी यांचे मन मोठे व कनवाळू होते. मंडेलांशी त्यांचे व त्यांच्या मुलीचे- चेल्सीचे सलोख्याचे संबंध होते. मुलीच्या निकोप वाढीसाठी दक्ष असणारी ही माता मुद्दाम आपल्या मुलीस दौऱ्यावर नेऊन वेगवेगळ्या अनुभवाची संधी द्यायची. एड्स जागृतीच्या कार्यासाठी बिल दांपत्य भारतात आले असताना सोबत त्यांची मुलगीही होती. तिनेही त्या कार्यात सहभाग घेतला होता. आपल्या मुलीने सामान्य मुलीप्रमाणे राहावे, असे संस्कार हिलरीने बालपणापासून तिच्यावर केले होते.
जगात निरनिराळ्या देशांत जी हत्याकांडे सुरू होती, त्यावरून बिलने दहशतवादाचा इशारा आपल्या संरक्षण विभागास दिला होता. भविष्याचा वेध घेण्याची दृष्टी त्यांच्याजवळ होती. ते ज्या मार्गावरून चालत होते तो राजमार्ग नव्हता, उलट सत्त्वपरीक्षेचे, चारित्र्यहननाचे अनेक प्रसंग त्यांच्यावर आले. पण प्रत्येक वेळी असीम मनोबल असलेल्या हिलरीने स्वत: कवच होऊन त्यांचे संरक्षण केले. परमेश्वरावर त्यांची अढळ श्रद्धा होती. गंमत म्हणजे व्हाईट हाऊसमधील घडलेल्या काही घटनांमुळे अतिंद्रिय शक्तीवरही त्यांचा विश्वास होता. त्या स्वत:बरोबर कायम छोटी डायरी ठेवून आपल्या खाजगी कामाच्या नोंदीबरोबर स्फूर्तिदायक वचने, म्हणी व आपल्या आवडत्या पवित्र ग्रंथातील सुवचने लिहून ठेवत. एका कॅन्सर रुग्णाने लिहिलेल्या एका पुस्तकातील एका वाक्याने त्यांना आपल्या कार्याची नवी दिशा मिळाली. ते वाक्य म्हणजे, ‘माझ्या आजाराम मला जाणवलं, की आपल्या समाजामध्ये काहीतरी हरवलं आहे. ते म्हणजे काळीज व बंधुत्वाची भावना.’ संवेदनशील मनच अशा वाक्यातून काही बोध घेऊ शकते. आपल्या वैचारिक घडणीत इलिनार रुझवेल्ट यांचा फार मोठा वाटा असल्याचे त्या आवर्जून सांगतात. सन २०००च्या फेब्रुवारीत ‘न्यूयॉर्क सिनेट’साठी स्टेटयुनिव्हर्सिटीत आपली उमेदवारी जाहीर केली तेव्हा तिथल्या जनसमूहाचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळाला अन् त्या न्यूयॉर्क सिनेटच्या पहिल्या महिला सदस्य ठरल्या. त्या आनंददायी निकालानंतर त्या म्हणतात, ‘‘आठ वर्षे मला बिरूद होतं, पण पद नव्हतं, आता मात्र मी ‘नवनिर्वाचित सिनेटर’ होते.’’ (५५५) . बिलच्या आठ वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर अल गोर यांना मागे टाकून बुश राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले अन् बिल, हिलरी व चेल्सी व्हाईट हाऊसमधून बाहेर पडले ते तिथल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या शुभेच्छा व आठवणीरूपी रंगीबेरंगी फुलांचा पुष्पगुच्छ बरोबर घेऊन!
मुखपृष्ठावर हिलरी यांचे प्रसन्न छायाचित्र आहे. पान २१४ ते २३४ मधील सुंदर छायाचित्रे म्हणजे या पुस्तकाचे एक आकर्षण आहे. जणू हिलरी व बिल यांचा जीवनपटच आहे. अनुक्रमणिकेत एकूण ३८ प्रकरणे आहेत. (पण त्यांना क्रम नाहीत.) एका जागतिक कीर्तीच्या कर्तृत्वान व संवेदनशील स्त्रीचे हे आत्मकथन असले तरी त्यात जगाचा इतिहास, खंड-उपखंडातील राष्ट्रांचे आपापसातील संबंध म्हणजेच जागतिक राजकारण, जागतिक राजकारणातील अमेरिकेचे स्थान याविषयी महत्त्वाची माहिती मिळत असल्यामुळे इतिहासप्रेमींनी, राजकारणात रुची असणाऱ्यांनी व करियर करणाऱ्या सर्व महिलांनी हे आत्मकथन आवर्जून वाचावे असे आहे. ...Read more