- LOKPRABHA 07-06-2019
वास्तुविश्वाचा कलात्मक प्रवास...
कोणत्याही प्रदेशात बहरणाऱ्या कलापंरपरेवर त्या त्या देशातील समाजाचा अमिट ठसा असतो. वास्तुकलाही त्याला अपवाद नाही. भारतातील गावखेड्यांतील लिंपलेल्या घरांपासून ते अमेरिकेतील भव्यदिव्य वास्तूंपर्यंत विविध प्रकारच्या रचनाचे रसग्रहण करणाऱ्या, त्यांचे मनावर उमटलेले ठसे जपून नवनिर्मित मग्न झालेल्या वास्तुविशारदाचा प्रवास म्हणजे ‘मॅग्नोलिया’.
ठाण्यातील मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात वाढलेल्या आणि वास्तुकलेची मनापासून साधना करत यशस्वी वास्तुविशारद म्हणून नावारूपाला आलेल्या अनिता कुलकर्णी यांचा कलाप्रवास त्यांच्याच नजरेतून पाहण्याची संधी ‘मॅग्नोलिया’तून मिळते. जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या वास्तूपासून सुरू होणारा हा प्रवास बोस्टनमधला हिमवर्षाव, जॉर्जियातला सुंदर तुरुंग, अमेरिकेतील जंगलात दडलेली काचेची घरं, तिथली ऐसपैस पसरलेली महाविद्यालयं अशी बरीच ठिकाणं दाखवून पुन्हा एकदा भारतात घेऊन येतो. त्यानिमित्ताने त्या त्या प्रदेशातील समाजजीवनाची झलक अनुभवता येते. वास्तुविशारदाला त्याचा व्यवसाय करताना कलात्मक आणि व्यावहारिक पातळ्यांवर अनेक संघर्षांना सामोरं जावं लागतं. मात्र, कलेच्या साधनेतून समृद्ध होणारं अनुभवविश्व पाहता, कलाकाराचा संषर्घ सार्थकी लागल्याचीच भावना उरते, हे यातून जाणवतं.
ठाण्यातील मराठमोळ्या तुलनेनं एकसुरी वातावरणातून थेट दक्षिण मुंबईतील विविधरंगी विश्वात प्रवेश करताना उडालेली तारांबळ, जे. जे. मध्ये शिकताना जगाविषयीच्या बदलत गेलेल्या धारणा, कलाभ्यासात गढून जाणं, वर्गाबाहेर कॅम्पसमध्ये सहाध्यायींबरोबर समृद्ध होत गेलेलं आयुष्य हा नवखा काळ यात मांडण्यात आला आहे. उपनगरातून शहराच्या झगमगाटात प्रवेश करताना आलेल्या दडपणाचं यथार्थ चित्रण यात दिसतं. कलाभ्यास पूर्ण करून प्रत्यक्ष व्यावसायिक जगात पाऊल ठेवल्यानंतर स्वप्नांचे इमले कोसळून पडताना ‘आपल्याला नेमकं काय करायचं नाही’, हे कळण्याचा काळही इथे दिसतो.
त्यानंतर सुरू होतो शेकडो संधींनी भरलेला प्रवास. अमेरिकेत पाऊल टाकताच तिथल्या वास्तुवैभवाने केलेलं स्वागत, पहिला हिमवर्षाव यांची चित्रमय वर्णनं वाचणं ही पर्वणी ठरते. तिथल्या विविध लहान-मोठ्या कंपन्यांमध्ये काम करतानाच्या अनुभवांतून तिथली कार्यसंस्कृती, व्यावसायिकता, प्रत्येक समाजघटाचा विचार करून निश्चित केलेले आणि काटेकोरपणे पाळले जाणारे वास्तुरचनेचे नियम, कागदावरच्या आराखड्यांची प्रत्यक्ष बांधकामस्थळी अंमलबजावणी करताना येणारी आव्हानं, कौशल्याला व्यवहाराची जोड देण्याचं नकळत मिळालेलं प्रशिक्षण, परस्परांना यथोचित मान देऊन एकत्र काम करण्याची अमेरिकन वृत्ती यांचे कृतज्ञ दाखले पुस्तकात आढळतात. आपल्या व्यवसायापलीकडेही आपलं एक आयुष्य असावं याविषयी तिथले लोक किती जागरूक असतात, या दोन्ही आघाड्यांचा समतोल, ते कसं साधतात, याची उदाहरणंही जागोजागी आहेत. अनिता यांनी अमेरिकेत काम करताना लॅण्डस्केपमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलं. तेव्हा तिथल्या आणि इथल्या शिक्षणातील तफावत पाहताना वाटलेला विषाद लेखनात प्रतिबिंबित झाला आहे.
निसर्गाची अमेरिकेवरील कृपादृष्टी आणि तिथल्या समाजात त्याविषयी असलेली कृतज्ञता यांची प्रशंसा वारंवार दिसते. घर, विद्यापीठ, कार्यालये, हॉटेल, रस्ते, चौक अशा सर्व वर्णनात निसर्गाची स्तुती आहे. ऋतूनुसार फुलणारी विविधरंगी फुलं, प्रत्येक घराला घेरून उभ्या असलेल्या बागा यांची चित्रमय वर्णनं आहेत. तिथल्या आणि भारतातल्याही अनेक कुटुंबांनी वास्तुकलेची पार्श्वभूमी नसताना स्वत:च रसिकतेने आणि डोळसपणे बांधलेली, सजवलेली घरं इथे दिसतात. भारतातील खेडेगावातील मातीशी नातं जोडलेल्या आणि वयाबरोबर परिपक्व दिसू लागणाऱ्या वास्तूही इथे पाहायला मिळतात.
या कलाप्रवासाच्या विविध टप्प्यांवर सान्निध्यात आलेल्या व्यक्तींच्या निमित्ताने तिथल्या आणि इथल्या नातेसंबंधांचीही तुलना दिसते. व्यक्तिस्वातंत्र्यासाठी नात्याची किंमत मोजायला तयार असणारे अमेरिकन आणि चिवटपणे नाती जपणं म्हणजेच आयुष्य अशी श्रद्धा असलेले भारतीय अशा टोकाच्या मानसिकता इथे दिसतात.
भारतात परतल्यानंतर तिथल्या आणि इथल्या कार्यसंस्कृतीची तुलना होणं स्वाभाविकच। इथल्या अघळपघळ व्यवहारांविषयीची नाराजी स्पष्टपणे मांडण्यात आली आहे. भारतीय कारागिरांची कला, अत्यल्प मोबदल्यातही प्रामाणिकपणे काम करण्याची त्यांची वृत्ती वाखाणली आहे. पुस्तक भारत आणि अमेरिकेतील वास्तुकलेचा एक समृद्ध पट वाचकांसमोर मांडतं. त्याच्या सौंदर्याविषयीची कृतज्ञता सतत व्यक्त होत राहते.
– विजया जागळे ...Read more
- DAINIK LOKSATTA (LOKRANG) 09-09-2018
अनुभवांचे चिंतनशील कथन...
प्रत्येकाचे आयुष्य ही एक कथाच असते आणि ती तिच्या परीने तरी सुरसच असते. हे स्वरस्यच मग लेखनाला प्रवृत्त करते. ‘मॅग्नोलिया’ हे अनिता कुलकर्णी यांचे आत्मकथनही तसेच आहे.
सुरुवातीलाच हे नेहमीसारखे आत्मकथन नाही, हे लेखिकेने स्पषट केले आहे. म्हणजे शाळेतल्या गमतीजमती, कुटुंबाची माहिती, एकूणच ‘मी कशी घडले?’ किंवा त्या स्वरूपाचे वैयक्तिक तपशील याबद्दल जवळजवळ काहीच या पुस्तकात नाही. त्यामुळे त्या अपेक्षेने हे पुस्तक वाचायला जाणाऱ्या वाचकांचा भ्रमनिरासच होईल. लेखिकेने आसुसून जगलेल्या आयुष्यातील त्यांना जे भावलं, भिडलं ते इतरांना सांगावे या हौसेतून, तशी गरज वाटल्याने हे लेखन केले आहे. आपल्या व्यवसायातील टप्पे आणि आयुष्यात घेतलेल्या रसरशीत अनुभवांना उजाळा... थोडक्यात– ‘जगले अशी’ असं या पुस्तकाचं स्वरूप आहे.
अनिता कुलकर्णी या व्यवसायाने वास्तुविशारद आहेत. जे. जे. आर्किटेक्चर कॉलेज आणि अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स विद्यापीठातून त्यांचे शिक्षण झाले. त्यांचे वास्तव्यही दोन देशांत असते. वास्तुशास्त्राचे अध्यापन, लिखाण याबरोबरच त्यांनी ललित लिखाणही केले आहे. शास्त्रीय संगीताचा त्यांचा दीर्घ व्यासंग आहे. आणि मुख्य म्हणजे आयुष्य भरभरून जगण्याची आस त्यांना आहे. त्यामुळे जिथे सौंदर्य दिसते, मनाला ओढ लावणारे काही सापडते, तिथे त्या रेंगाळतात. त्यामुळे आठवणी, वेगवेगळे अनुभव, चिंतन यांचा एक मोहक कोलाजच आपल्याला या पुस्तकात पाहायला, वाचायला मिळतो. अर्थातच त्यात सुसंगतपणा किवां नियमितपणा नाही. लेखिका म्हणतात त्याप्रमाणे, भौतिक, भावनिक, बौद्धिक, आध्यात्मिक पातळ्यांवर जगत असताना मनात सहज उलगडलेले हे पदर आहेत. आपल्याला सुरुवातीला अशा आत्मकथनात्मक लेखनाची सवय नसल्याने गांगरायला होते. परंतु नंतर हाच मांडणीतील मोकळेपणा आवडायला लागतो.
सुरुवातीलाच जे. जे. महाविद्यालयातील आठवणी आल्या आहेत. त्या इतक्या छान उतरल्या आहेत, की त्यांच्या मनातला तो परिसर, वर्गातील प्रयोग, प्रेझेन्टेशनची धावपळ, पायऱ्यांवर बसून मित्र-मैत्रिणींबरोबर मारलेल्या गप्पा, वाटून घेतलेले हास्यविनोद हे सगळं आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. पुढे अमेरिकेत लँडस्केप डिझाइनमधले प्रगत शिक्षण घेताना त्यांच्या मनाच्या कक्षा अजून रुंदावल्या. तिथली मोकळीढाकळी शिक्षणपद्धती, विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचा, क्षमतेचा अंदाज घेत पुढे जाण्याची मुभा, कुठलाही अभ्यासक्रम विशिष्ट वर्षातच पुरा न करण्याचे स्वातंत्र्य या गोष्टींमुळे ‘ही वर्षे समृद्ध करणाऱ्या कष्टांची वर्षे आहेत...’ असे लखिका म्हणतात. तेव्हा आपल्या चौकटबद्ध शिक्षणपद्धतीशी त्याची नकळतच मनात तुलना होते, हे नक्की.
जे. जे. महाविद्यालयातील आयुष्यात त्यांच्या विचारांना एक शिस्त लागली होती. पण त्यात लवचिकपणा आला तो अमेरिकेतील अभ्यासक्रमाने. या गोष्टीचा उपयोग त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केल्यावर झाला. वास्तुरचनेकरता सल्ल्यासाठी आलेल्या व्यक्तीच्या आपल्याला बांधायच्या असलेल्या रचनेबाबत काही कल्पना असतात. त्या सौंदर्यशास्त्रात नीट बसवण्यासाठी त्यांना मदत करणे आणि आपले म्हणणे किती योग्य असले, तरी त्यांच्यावर न लादणे, ही पथ्ये त्यांनी कायम पाळली. आपल्या काही विशिष्ट कामांचा त्यांनी उल्लेख केला आहे. त्यातही उत्तर कर्नाटकातील एका प्रकल्पाबाबत त्यांनी सविस्तरपणे लिहिले आहे. त्यांच्या निरनिराळ्या प्रकल्पात त्यांनी इतक्या वेगवेगळ्या झाडांचा वापर केलेला आहे, की ते वाचून अचंबित व्हायला होते.
त्यांनी देशात आणि परदेशात दोन्हीकडे काम केलेले असल्याने दोन्ही देशांच्या कार्यपद्धतीची तुलना होणे साहजिकच आहे. अमेरिकेतील नेमकेपणा, सुबकता, रेखीवपणा आणि अनेक गोष्टी लक्षात घेऊन काम करण्याची पद्धत हे गुण असले, तरी भारतातला साधेपणा, माणसांचा इरसालपणा, आपुलकी याच्या प्रेमात लेखिका आहे. इथल्या कामाचे स्वरूप अधिक जिवंत आणि उत्कट आहे, असे त्यांना वाटते. चांगल्या रचनांचा महागडेपणाशी किंवा दिखाऊपणाशी काही संबंध नाही. त्याचे खरे नाते आहे ते गुणवत्ता, सौंदर्याशी. ‘हवामान, व्यवहार यांची सांगड घालून नजरेला आणि मनाला आनंद देणारे, राहणीचा दर्जा वाढवणारे ते आर्किटेक्चर’ अशी या शास्त्राची व्याख्याही त्या सहजगत्या करून जातात.
मित्रांबद्दलही त्यांनी फार आत्मियतेने लिहिले आहे. या मित्रांत जे. जे. च्या सहाध्यायांपासून वयाने खूप ज्येष्ठ असलेले डॉ. गोसावी वा नलिनी इनामदार यांच्यापर्यंत अनेकजणांचा समावेश आहे. या बहुतेक सगळ्या व्यक्ती खूप हरहुन्नरी आहेत. या पुस्तकातील नेपाळच्या निर्वासित मुलांवरचा भाग मुळातूनच वाचावा असा आहे. लेखिकेची कलंदरी या पुस्तकात खूप ठिकाणी दिसत असली, तरी त्यांनी केलेली भटकंती हा त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर भाग असावा हे जाणवते. त्या म्हणतात, ‘एकमेवाद्वितीय ठिकाणं आम्ही पाहिली. रौद्र बर्फवादळात, प्रलयकारी वृष्टीत, दुधाळ, नीरव चांदण्यात पाहिली. अस्सल मराठी शिखरं, पर्वत, टेकड्या, नद्या, समुद्र, उन्हाळी उघडं आकाश, भरून येणारे ढग, किनारे, पळस-पांगारे, कॅशिया-गुलमोहोर आणि रसरसलेली चेरी ब्लॉसम्स, जलप्रपात, निळ्या समुद्रावर झुकलेले काळकडे, अटलांटिक महासागरातल्या बेटांवरचा भन्नाट वारा... ही शेकडो निसर्गरूपं माझ्यासाठी रूपक बनली. या भटकंत्यांनी माझ्या आयुष्याचा रंगच बदलून टाकला. सूर, अक्षर, रंग सगळ्यांना त्या प्रेरणा झाल्या.’ कामाच्या निमित्ताने किंवा केवळ भटकण्यासाठी कुठल्याही रूपानं त्यांनी खूप प्रवास केले आहेत. कधी एकट्याने, कधी साथीने. परंतु प्रत्येक वेळेस हा प्रवास त्यांना काही ना काही देऊनच गेला आहे. भारत, अमेरिका, युरोप फिरताना रस्ते, वेगवेगळ्या वास्तुरचना, निसर्ग या सगळ्याबरोबरच त्यांनी माणसेही खूप वाचली आहेत याचा प्रत्यय येतो.
लेखिकेची शैली सहज संवाद साधल्यासारखी आहे. आपण घडण्यात कुटुंबीयांचा, मित्रांचा वाटा आहे हे लेखिकेला मान्य आहेच; पण तरीही ‘आपलं’ असं एक कर्तृत्ववान, रसिक व्यक्तिमत्त्व आहे याचं भानही त्यांना आहे. त्यामुळे त्यांचे हे कथन खऱ्या अर्थाने ‘आत्मकथन’ आहे. ‘मॅग्नोलिया’ हे उत्तर अमेरिकेत फुलणारे फुल त्यांनी रूपकासारखे वापरले आहे. हे पांढरेशुभ्र फुल म्हणजे सौंदर्य, आनंद आणि शांतीचे प्रतीकच! आपल्या वाटचालीत लेखिकेलाही हे सौंदर्य कुठंतरी सापडलं आणि मग सगळी बेचैनी दूर होऊन या फुलासारखेच ‘लेट इट बी’ असं म्हणणं त्यांना सहज शक्य झालं.
–सीमा भानू ...Read more
- DAINIK SAKAL 9-09-2018
वास्तुशिल्पकार, मनस्वी कलाकार अनिता कुलकर्णी यांनी मांडलेला हा स्वत:चा प्रवास. जे. जे. कला-वास्तुशास्त्र महाविद्यालयात मिळालेला प्रवेश, तिथले अनुभव, नंतर परदेशात उमेदवारी करताना आलेले अनुभव, भेटलेल्या वेगवेगळ्या व्यक्ती, पुन्हा भारतात परतल्यानंतर व्यसायातला प्रवास, टेरेस गार्डन ते टाऊनशिप असा प्रवास, भटकंती, आकलन, अनुभवलेली निसर्गाची रूपं अशा सगळ्याच गोष्टींवर त्यांनी लिहिलं आहे. या निमित्तानं त्यांना जाणवलेलं सर्जनाचं सूत्रही त्या उलगडतात. ...Read more
- अंजली पटवर्धन
चिंतनशीलतेने जीवनाला भिडताना त्यातील प्रसन्नता अधोरेखित करणारे आत्मकथन...
मेहता पब्लिशिंग हाऊसने आतापर्यंत स्त्रियांची अनेक आत्मचरित्रं/आत्मकथनं (स्वतंत्र आणि अनुवादित) प्रकाशित केली आहेत; अर्थातच प्रत्येक आत्मचरित्राचा रंग वेगळा आहे. आत्मचरित्रातूनआत्मकथनातून त्या स्त्रीचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रतीत होत असतो. अनिता कुलकर्णी यांचं ‘मॅग्नोलिया’ हे आत्मकथन जीवनाकडे अतिशय चिंतनशीलतेने पाहतानाही त्यातील प्रसन्नता टिपणारं आहे.
जे. जे. कला-वास्तुशास्त्र महाविद्यालयात त्यांना मिळालेला प्रवेश, त्यावेळचं त्यांचं महाविद्यालयीन जीवन, त्यांच्या खास मध्यमवर्गीय जाणिवा, जे.जे.तील वास्तुशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर परदेशात उमेदवारी करताना नोकरीत आणि व्यवसायात आलेले अनुभव आणि त्यादरम्यान भेटलेल्या व्यक्तींबद्दल त्यांनी लिहिलं आहे. परदेशात गेल्यानंतर केन मिचेलकडे त्यांनी उमेदवारी केली. त्याच्याकडून त्यांना काय काय शिकायला मिळालं, हे त्या कृतज्ञतापूर्वक सांगतात. अशाच कृतज्ञतेने त्या बोलतात मार्था स्ट्रोक्सबद्दल. केन मिचेलनंतर त्यांनी मार्थाकडे उमेदवारी केली तिच्याकडून त्यांना काय शिकायला मिळालं, हेही त्या नमूद करतात. मार्थाकडे काम करणारा स्टीव्ह, वास्तुशास्त्रज्ञ डेव्हिड मार्किन्स, एमिली, पीटर, लारा इ. अनेक व्यक्तींचा कधी तपशीलाने तर कधी जाता जाता उल्लेख करतात.
भारतात परतल्यानंतर त्यांनी आर्किटेक्ट म्हणून व्यवसाय सुरू केला. टेरेस गार्डन ते टाउनशिप असा त्यांचा व्यावसायिक प्रवास झाला. त्या प्रवासातील अनुभव त्यांनी सांगितले आहेत. तसेच वास्तुशास्त्राचं सौंदर्याच्या आणि भावनांच्या चष्म्यातून केलेलं आकलनही त्या मांडतात. वास्तुशास्त्राच्या क्षेत्रातील अपप्रवृत्तींबद्दलही त्या लिहितात. भारतात आणि भारताबाहेर केलेल्या भटकंतीचे अनुभवही त्यांनी सांगितले आहेत. या भटकंती दरम्यान त्यांनी अनुभवलेली निसर्गाची विविध रूपं त्यांनी शब्दबद्ध केली आहेत. आपल्या मित्र-मैत्रिणींबद्दलच्या, ज्येष्ठांबद्दलच्या भावना त्यांनी अतिशय उत्कटतेने व्यक्त केल्या आहेत.
त्यांचे व्यावसायिक अनुभव असोत, शिक्षणाच्या बाबतीतले अनुभव असोत, भटकंती असो किंवा व्यक्तिचित्रण असो, भारत आणि परदेश यांची तुलना त्या करतात. परदेशात काही वर्षं राहूनही भारतीय माणसाचं साधं जगणं, आपली कुटुंबसंस्था, नातेसंबंध याविषयी त्यांना अभिमान आहे; मात्र तिथलं शिक्षण आणि भारतातील शिक्षण यातील फरक त्यांना प्रकर्षाने जाणवतो. तिथल्या शिक्षण पद्धतीतील खुलेपणा आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना मिळणारा आत्मविश्वास यावर त्या भाष्य करतात. नवोदितांना घडवण्याची अमेरिकेतील आणि भारतातील पद्धत, यांची तुलना करताना त्या लिहितात,‘ विचारांना पुरेसं खाद्य मिळत होतं आणि माझे विचार कसाला लागत होते. तुलनात्मक निरीक्षणं घडत होती. मुंबईतल्या त्या ऑफिसच्या आठवणी अजून अगदीच ताज्या असताना केन मिचेलकडचा काळ आला आणि संपलाही. मला या दोन ऑफिसांमध्ये हजारो विरोधाभास जाणवले. मुंबईतल्या नोकरीत मला पुरेसं आव्हान मिळालं नाही. परिणामी, चांगल्या कार्यपूर्तीतून येणारा आनंद, समाधान हेही दूरवरच राहिलं. शिकण्याची इच्छा होती, परंतु आजूबाजूचे सीनिअर्स शिकवण्यात रस घेणारे नव्हते. केनने मात्र पहिल्या दिवसापासून माझ्या अभ्यासाचा, अभ्यासक्रमाचा आणि व्यक्तिशः माझा- संपूर्ण आदर केला. क्षेत्रात नवोदित म्हणून शिरतानाच्या काळात मिळालेल्या या आदरामुळे माझ्या ठिकाणी नैसर्गिकपणे, त्या आदराचा मान मी चांगल्या कामाद्वारा ठेवला पाहिजे, ही एक प्रामाणिक भावना रुजू लागली.’
आपल्या व्यवसायाविषयी बोलताना जाता जाता एखादी टिपही देतात. उदा. ‘स्वतःच्या क्षेत्रात नुसतं तांत्रिकदृष्ट्या ठीकठाक राहून भागत नाही. प्रॅक्टिसच्या सगळ्या अंगांनी चालू असणा-या उलाढालींचा ताबा घ्यावा लागतो. छंदिष्ट एकटेपणातून उत्तम डिझाइनच्या निर्मितीची उपासना करत असताना चांगल्या जनसंपर्काचं भानही ठेवावं लागतं. कागदावर सुंदर चित्र रंगवत असताना संबंधित जगातलं राजकारणही जगावं लागतं.’ त्यांच्या या आत्मकथनातून वास्तुशास्त्रज्ञ किंवा आर्किटेक्टचं काम नक्की कसं चालतं, या व्यवसायातील आव्हानं काय आहेत, व्यवसाय करताना कोणती पथ्यं पाळावी लागतात इ. या व्यवसायाशी निगडित अनेक गोष्टींवर प्रकाश पडतो. लालित्यपूर्ण भाषा हे या आत्मकथनाचं वैशिष्ट्यं आहे.
जीवनात भौतिक गोष्टींसाठी किंवा मानसिक, भावनिक संघर्ष आला नाही तरी आपलं आपल्या मनाशी जीवनविषयक चिंतन चालू असतं. ते चिंतन त्यांनी शेवटच्या प्रकरणात मांडलं आहे. एकूणच त्यांच्या या आत्मकथनाला चिंतनशीलतेची, अध्यात्माची किनार आहे. लौकिक अनुभव आणि सौंदर्यपूर्ण अनुभव या हिंदोळ्यावर त्यांचं मन झुलताना दिसतं. जीवनाला चिंतनशीलतेने भिडताना त्यातील सौंदर्य, आनंद आणि शब्दातीत अनुभूती त्या टिपतात. म्हणूनच या आत्मकथनाला ‘मॅग्नोलिया’ असं सार्थ नाव त्यांनी दिलं आहे. मॅग्नोलियाबद्दल त्या स्वत:च लिहितात, ‘मॅग्नोलिया म्हणजे मूर्तिमंत सौंदर्य, आनंद आणि शांती!’ त्यांचं हे आत्मकथनही वाचकाला या तीन गोष्टींची अनुभूती देतं. तेव्हा जीवनाला विविध सकारात्मक अंगांनी कवेत घेऊ पाहणारं हे आत्मकथन मुळातून आणि आवर्जून वाचावं असं आहे.
-अंजली पटवर्धन
...Read more