- DAINIK SAKAL 02-12-2001
विचारांना प्रगल्भता देणारी अनुभवकिरणे...
‘मजल... दरमजल...’ हे सरोज वशिष्ठ यांनी किरण बेदी यांच्याबरोबर घालविलेल्या क्षणांचे शब्दचित्र आहे. त्यांना भेटलेल्या अनेकविध प्रकृतीच्या व प्रवृत्तीच्या व्यक्तींनी पोलिस अधिकाऱ्यांबद्दल व्यक्त केलेली मते त्यांी मांडली आहेत. त्यामुळे केवळ जनहितार्थ विचार करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचे आकर्षक पैलू ल्यालेल्या किरण बेंदींचे वेगळेपण उभे राहते. गुन्हेगार हा काही कायमस्वरूपी गुन्हेगार नसतो. त्यास योग्य वाट दाखविली, तर ती वाट चालायला एका पायावर तो तयार असतो; पण प्रश्न आहे तो चांगली आणि योग्य जीवनाची वाट त्यास दाखवायची कोणी? किरण बेदी यांनी ही वाट दाखविण्याचा जो जीवन मार्ग स्वीकारला, त्याचा सर्वांनाच सार्थ अभिमान वाटतो. वाईटातून चांगल्याकडे जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशास हात धरून नेऊ इच्छिणाऱ्या किरण बेदी सर्वच कारागृहांना लाभाव्या आणि त्यांचा ..... जात राहावा. या त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नातून काही थोड्या लोकांना जरी आपले मत, आपली विचाराधारा सुधारली, तरी केवळ मोठे काम होईल.
अपराध्यांमध्ये मानसिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी, समाजाबद्दल असणाऱ्या त्यांच्या कर्तव्याची त्यांना जाणीव करून देण्यासाठी आणि स्वत:च्या पूर्वायुष्याचा त्यांना विसर पडावा, यासाठी तुरुंगामध्येच योग, खेळ, लहान-मोठी कामे किंवा कपडे शिवण्यासारखे व्यवसाय शिकविण्यात आले पाहिजे. याचा परिणाम उत्साहवर्धक झाला, शिवाय तुरुंगातील वातावरणही बदलून गेले.
तिहारमध्ये असलेल्या प्रत्येक कैद्याला विपश्यना शिकायची आहे हे अटळ आहे.
अमली पदार्थांच्या क्षेत्रामध्ये गुन्हेगारांचा माग काढणे आणि अमली पदार्थ जप्त करणे याला फार मोठी प्राथमिकता दिली जाते आणि ही गोष्ट वृत्तपत्रांमध्ये ठळक बातमी ठरते. नवज्योती दिल्ली पोलीस फाऊंडेशन सुधारणा, नशाबंदी आणि पुनर्वसन या कामासाठी या संस्थेची स्थापना झाली. अनेक तरुण व्यसनाधीन होताना आपण बघत असतो; परंतु त्यावरील उपाय मात्र आपणास ठाऊक नसल्याने आपण फक्त ‘बघ्याचीच भूमिका’ घेत असतो. ‘नशामुक्तीचा कार्यक्रम’ या प्रकरणामध्ये व्यसनाधीनतेपासून व्यसनमुक्तीपर्यंतचा प्रवास वर्णिला आहे. भविष्यामध्ये पोलिसांच्या सामाजिकरणाखेरीज पोलीस दलाचे पृथ्थकरण करणे अधिक महत्त्वाचे आहे. पोलिसांच्या या कामामध्ये सहकार्य करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. दर सहा महिन्यांनी अशा कामाचे मूल्यमापन करण्यात आले पाहिजे. या प्रकारच्या कामासाठी सुप्रसिद्ध विद्वान, लेखक आणि कवींचे सहकार्य मागितले गेले पाहिजे. त्याचबरोबर एक विवेकपूर्ण मानव संसाधन धोरण तयार केले गेले पाहिजे, असे मत पोलीस सुधारणेची आवश्यकता प्रकरणात आग्रहपूर्वक नोंदविण्यात आले आहे.
आजची व्यवस्था बदलण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न करावे लागतील, असे प्रतिपादन करीत असतानाच किरण बेदी हे सांगायला विसरत नाहीत की, सुधारणा ही एक लांबलचक व गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. देशाची सेवा करणे हे माझे ध्येय आहे. मग मी ते काम एक पोलीस अधिकारी म्हणून करीन किंवा बाहेर राहून करीन.
राजकीय बातम्या, घटना यांवर माध्यमांचे लक्ष केंद्रित झालेले असते. सामाजिक संस्था करीत असलेल्या चांगल्या कामांना नीटपणे प्रकाशित कण्यासाठी वृत्तपत्र, मासिकांमध्ये एक ‘आशेचे पान’ असणे आवश्यक आहे. अशामुळेच तर लोकांना गरीब, कमजोर वर्गासाठी नि:स्वार्थ बुद्धीने समर्पित होऊन काम करण्याची स्फूर्ती मिळेल. एखादा सरकारी कर्मचारी चांगले काम करीत असेल तर व्यवस्था त्याला ठोकून काढते किंवा बदलीच्या रूपाने शिक्षा तरी देते. त्या वेळी ही माध्यमे कोठे झोपा काढत असतात? मिटक्या मारत मीठ-मिरची लावून एक सनसनाटी बातमी बनवून पत्रकार ती आपल्या संपादकांच्या हाती ठेवून देतात. अशा प्रकारच्या आपल्याला आलेल्या अनुभवांची नोंद किरण बेदी यांनी या प्रकरणात केली आहे. शेवटी त्या असेही म्हणतात, ‘मी प्रसारमाध्यमांची ‘लाडकी’, आहे, मी जर चांगले काम करीत असेन, तर त्या कामाला प्रसिद्धी मिळवू देण्यानेच मी आणखी कोणाला तरी प्रेरित करू शकेन असे घडलेही आहे आणि यात वाईट काय आहे? या प्रकरणामध्ये प्रसारमाध्यमांच्याकडून त्यास अनुभवास मिळलेले बरे-वाईट याची नोंद करीत असतानाच प्रसारमाध्यमांतूनच चांगल्याचा शोध लागतो, हे सांगण्यास त्या विसलेल्या नाहीत.
कुटुंबाची भूमिका, युवकांना उद्देशून, स्त्रीशक्तीचा उदय, मी आणि माझे जीवन, कुटुंबातील हिंसा आणि नशेचे व्यसन, जगण्याची काही सूत्रे ही प्रकरणेही अनुभवकिरण असल्याने वाचनानंद देतात. मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रकाशित आणि भारती पांडे अनुवादित या पुस्तकातील शब्दागणिक पानापानावर विखुरलेली अनुभवकिरणे वर्तमानात विचारांना अधिक प्रगल्भता प्रदान करणारी आहेत, तसेच समाजधुरिणांच्या विचारप्रवाहांना नवे वळण देण्याचे सामर्थ्य राखणारी आहेत.
-रत्नाकर पंडित ...Read more
- DAINIK SAMANA 26-05-2002
ध्येयवादी पोलिसाचे आत्मकथन...
आपल्या कार्यावर निष्ठा ठेवून कर्तव्य पार पाडताना, कठोर निर्णय घेताना आलेल्या अनंत अडचणींचा सामना करण्याचे धैर्य फार थोड्या व्यक्तींमध्ये दिसून येते. अशा मोजक्या व्यक्तींमध्ये डॉ. किरण बेदी या पहिल्या महिला पोलीस अधिकाऱ्ाचा समावेश होतो. ‘मजल दरमजल’ हे या व्यवसायातील अनुभवांवर आधारित आत्मपर लेखन. ‘आय डेअर’ आणि ‘इटस् ऑलवेज पॉसिबल’ ही यापूर्वीची अनुभवकथनपर पुस्तके. या पहिल्या दोन पुस्तकांप्रमाणेच हे तिसरे पुस्तकही परखड व विचारप्रवर्तक ठरेल. प्रस्तुत पुस्तकलेखनासाठी सरोज वशिष्ठ यांनी डॉ. किरण बेदी यांना साह्य केले आहे, तर भारती पांडे यांनी अनुवाद केला आहे.
सरोज वशिष्ठ यांनी पुस्तकाच्या प्रारंभी किरण यांच्याबद्दल अत्यंत मौलिक माहिती दिली आहे. किरण यांच्या सहवासातील काळात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू जवळून निरखण्याची संधी सरोजना लाभली. किरण यांचे विचार त्यांनी वाचकांपुढे प्रस्तुत केले आहेत. ‘जगामध्ये बदल घडवून आणण्याचे तुमचे ध्ये असेल तर प्रथम स्वत:मध्ये बदल घडवून आणणे फार आवश्यक ठरते. सरोज म्हणतात की, हे किरण यांच्याबाबतीत शंभर टक्के खरे ठरले. अधमाहून अधम, अत्यंत नीच पातळीवरील व्यक्तीमध्येही परिवर्तन घडवून आणू शकेल अशी एक विलक्षण शक्ती त्यांच्यामध्ये आहे. त्यांच्यामध्ये एक प्रबळ, साहसी बंडखोर लपून बसलेला आहे, म्हणून त्यांना वेळोवेळी अडचणींना तोंड द्यावे लागते.
तिहार जेलमधील किरण यांचे कार्य अजोड व विलक्षण ठरले आहे. एक कार्यक्षम अधिकारी, कर्तव्यकठोर कडक व्यक्तिमत्त्वाच्या आत एक माणुसकीचा झरा वाहत असल्याचे जाणवते. तिहार माझे दुसरे घर असं मानणाऱ्या किरणनी तिहारमधील कैदीच नव्हे, तर एकूणच जेलचे स्वरूप बदलून टाकले. त्यांच्या प्रयत्नांनी विविध उपक्रमांनी कैदी व कर्मचारी यांच्यामधील दीर्घकाळचा तणाव, वैरभाव नाहीसा झाला. व्यसने, दुराचार, भ्रष्टाचार यांनी ग्रासलेले तिहार कारागृह, एक आश्रम, सुधारगृह, एक अद्वितीय संस्था बनले याचे सारे श्रेय किरण यांच्याकडे जाते. शंभर टक्के साक्षर झालेला तिहार हा जगातील एकमेव तुरुंग आहे. यात गैरसरकारी संघटना, व्यक्ती, शैक्षणिक संस्था व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ यांचा हातभार लागला आहे. अपराध्यांना शिक्षा देण्याऐवजी त्यांना मानसिकदृष्ट्या बलवान, निश्चयी बनवून निर्मितीक्षम होण्याच्या हेतून मार्गदर्शन केले गेले पाहिजे. माणुसकीचे वर्तन केले गेले पाहिजे. यासाठी त्यांनी अनेक योजना राबवून क्रांतिकारक परिवर्तन घडवून आणलेले दिसते. या परिवर्तनासाठी विपश्यना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे समाजात आजच्या तणावग्रस्त जीवनात अमली पदार्थांचे सेवनाचे प्रमाण खूप वाढलेले दिसते. त्यासाठी नशामुक्ती कार्यक्रम राबविला होता. यासाठी नवज्योत केंद्राची स्थापना करून उपचार सुधारणा व पुनर्वसन ही धोरणे अमलात आणली गेली.
पोलीस सुधारणेची आवश्यकता या लेखात पोलीस खात्यावरील राजकारणी नेत्यांच्या वाढत्या दबावाविषयी अत्यंत निर्भीड मते व्यक्त केली आहेत. आपल्या पोलीस दलाचा विकास एक न्यायसंगत दल, एक व्यावसायिक प्रामाणिक दल या रूपात केला गेला नाही याबद्दल त्या खंत व्यक्त करतात. त्या म्हणतात, ‘‘मी नेहमीच कठोर निर्णय घेतले आहेत. म्हणूनच मी नेहमी विवादाच्या चक्रामध्ये अडकलेली असते.’’ पोलीस दलातील भ्रष्टाचार, राजकारण्यांचे हितसंबंध व सर्वसामान्याकडे होणारे दुर्लक्ष या परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी नागरिकांचा सहभाग व शासकीय पातळीवरील धोरणात्मक बदल त्या अपेक्षितात. ‘कुटुंबाची भूमिका’ या लेखात स्त्रियांच्या समस्यांकडे होणारे दुर्लक्ष, स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण, संस्कार, त्यातील आईवडिलांचा सिंहाचा वाटा याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले आहे. ‘मी आणि माझे जीवन’मध्ये किरण आपली दिनचर्या सांगतात. खेळाचे महत्त्व सांगून टेनिस या आपल्या आवडत्या खेळातून ब्रीजशी आपल्या पतीशी मैत्री व विवाह झाला. पतीचे छंद, समजूतदारपणा याविषयी त्या समाधानाने बोलतात. त्यांची सासू हीच त्यांची सर्वांत मोठी समर्थक व चाहती आहे. इथे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील वेगळा पैलू उलगडतो. स्वत:बद्दल त्या म्हणतात, ‘जन्मल्यापासून मी एक प्रशिक्षिक श्रमिक आहे. माझे प्रत्येक पाऊल परिवर्तनाच्या दिशेने पडलेले आहे. अडचणींना, पेचप्रसंगांना मी आकड्यात मोजले आहे.
एक वादग्रस्त, पण माणुसकीचं मोल जपणाऱ्या, अपराध्यांमध्ये चैतन्य फुलविणाऱ्या, त्यांना नवजीवन देणाऱ्या डॉ. किरण बेदी यांच्या अजोड कार्याप्रमाणेच त्यांचे आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व सत्याकंगोऱ्यासह प्रकट होते.
-माधुरी महाशब्दे ...Read more
- DAINIK SAKAL 17-03-2002
किरण बेदी यांच्या जिद्दीला वाटचालीची ओळख...
कार्यक्षम पोलीस अधिकारी म्हणून डॉ. किरण बेदी सर्वपरिचित आहेत. त्यांच्या ‘आय डेअर’ आणि ‘इट्स ऑलवेज पॉसिबल’ या पुस्तकांच्या शीर्षकातूनही त्यांचं धडाडीचं व्यक्तिमत्त्व समोर आले आहे. ‘मजल... दरमजल’ या त्यांच्य भारती पांडे यांनी अनुवादीत केलेल्या पुस्तकातही बेदी यांचे अनेक व्यक्तिविशेष, कार्यपद्धती पानापानांतून प्रभावीपणे व्यक्त झाली आहे. पोलिसी वर्दीच्या पलीकडे जाऊन त्यांनी सामान्य माणसांशी आपल्या कामातून नाते जोडले. जे सामाजिक भान रोखले, सामान्यांच्या प्रश्नांविषयी जी कळकळ दाखवली, त्याचे मनोज्ञ दर्शन या पुस्तकातून घडते. व्यवस्थेच्या व पोलीस प्रशासनाच्या नियामांच्या चौकटीत राहून एकएक प्रश्न सोडविण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करीत त्यांनी केलेली मजल...दरमजल. वाचकांना कौतुकास्पद वाटेल अशीच आहे.
राजकारणी आणि काही प्रमाणात प्रसारमाध्यमांनी किरण बेदींना अनेकदा विवाद्य ठरवूनही, बदलीची शिक्षा देऊनही, सामान्य लोकांमध्ये मात्र त्या प्रेमाचे व कौतुकाचे स्थान निर्माण करू शकल्या कारण त्यांनी नेहमीच महत्त्वाची मानली ती सामाजिक बांधिलकी. त्यांच्या कारकिर्दीत सुधारात्मक सामाजिक भूमिकेची जबाबदारी पोलिसांनी प्रथमच मानली. सामान्य लोकांसाठी काही तरी करीन व ते त्यांना बरोबर घेऊनच’ या विचारांशी सुसंगत असेच नेहमी बेदींचे ध्येय व प्रयत्न राहिले. मानव अधिकारांसाठी व आपल्या दृढ तत्त्वांसाठी व्यवस्थेशी लढणे, चांगल्या कामासाठी भांडायला तयार होणे, हा त्यांचा स्वभाव. अशा ठिकाणी गप्प बसणे त्यांना अशक्य होते, तुरुंगातील सुधारणा असोत की अन्य काम, प्रत्येक ठिकाणी त्यांनी तेथील माणसाचा विचार सर्वप्रथम केला. त्याला बळ दिले. कर्तव्यकठोर असल्या तरी तितक्याच संवेदनशीलही आहेत. पुस्तकातील कविता याची साक्ष देतात. त्यांच्या गौरवशाली सहजीवनाचे पडसादही त्यात छान उमटले आहेत. समाज व पोलीस यामध्ये जे अंतर पडले आहे त्याचे चिंतनही अनेक जागी येते.
सुजनात्मक काम करण्याची, सतत कार्यरत राहण्याची व प्रश्न सोडविण्याची त्यांची इच्छाशक्ती व धाडस दुर्दम्य आहे. लढण्याची हिंमत त्या इतरांना देत आल्या आहेत. अनेकांची प्रेरणा ठरल्या आहेत. युवकांनी आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे. अनुवादातील आशयाचा बाज चांगला सांभाळला आहे.
-वंदना सुधीर कुलकर्णी ...Read more
- DAINIK LOKMAT 06-01-2002
किरण बेदी यांच्या जीवनाची सूत्रे...
किरण बेदी यांच्या ‘आय डेअर’ आणि ‘इट्स ऑलवेज पॉसिबल’ या पुस्तकांना मराठी वाचकांची भरघोस दाद मिळाली. एक तडफदार पोलीस अधिकारी या नात्याने त्यांनी केलेल्या कार्याचे वेगळेपण आणि मोठेपण सर्वांनाच स्तिमित करणारे वाटते. िहार जेलचा त्यांनी तीन वर्षांत कायापालट घडवून आणला आणि कैदी म्हणून तुरुंगात खितपत पडलेल्या गुन्हेगारातील माणूसपणाचा शोध घेत, त्यांनी त्यांचा आत्मसन्मान जागा केला. त्यांनी विपश्यना वगैरे मार्गाने आत्मचिंतनास, समाजोपयोगी कार्य करण्यात व आपल्यातील चांगुलपणाचर बूज राखण्यास प्रेरणादायक वातावरण निर्माण केले. आपल्या वैयक्तिक क्षमतांच सुयोग्य विकास करून त्यांना कलात्मक, सृजनशील स्वरूप देऊ शकणाऱ्या व्यक्तीच समाजाला दिशा दाखवू शकतात, हे वास्तव स्वीकारून किरण बेदी यांनी प्रत्येक कामाकडे नव्या नजरेने बघून अपारंपरिक अशा मार्गांचा अवलंब करून हाती घेतलेल्या कामांमध्ये हेवा वाटण्याजोगे यश मिळवले. त्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले. अनेक अडीअडचणींना असीम धैर्याने तोंड दिले.
‘मजल दरमजल’ हे त्यांचे नवे मराठी पुस्तक छोटेच असले, तरी त्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या कार्याचे व्यापक दर्शन घडवणारे आणि त्या कार्यामागची वैचारिक बैठक स्पष्ट करणारे आहे. ‘मोर्चा दर मोर्चा’ या सरोज वशिष्ट संपादति हिंदी पुस्तकाचे भारती पांडे यांनी केलेले हे मराठी भाषांतर आहे. तिहार जेल– माझे दुसरे घर, विपश्यनेची शक्ती, नशामुक्ती कार्यक्रम, पोलीस यंत्रणेतील सुधारणांची दिशा, माध्यमांची जबाबदारी, कुटुंब-स्त्रीशक्ती, युवाशक्ती यांचे महत्त्व वगैरे विषयांवरील किरण बेदी यांचे अनुभवसिद्ध चिंतन या पुस्तकात आले आहे. त्याचबरोबर मी आणि माझे जीवन, जगण्याची काही सूत्रे या लेखांमधून त्यांची जीवनसूत्रेही प्रकट होतात.
‘मी आणि माझे जीवन’ या छोटेखानी लेखात किरण बेदी यांनी आपल्या दिनक्रमाची व युवाशक्ती यांचे महत्त्व वगैरे विषयावरील लेखांमधून त्यांची जीवनसूत्रेही प्रकट होतात.
‘मी आणि माझे जीवन’ या छोटेखानी लेखात किरण बेदी यांनी आपल्या दिनक्रमाची व पूर्यायुष्यातील काही साक्षात्कारी क्षणांची कल्पना दिली आहे. सकाळी सहाला एक कप चहा पिऊन तासभर फिरायला जायचे; परतल्यावर एक कप दूध व फलाहार. दुपारचे जेवण हलके. रात्री एक पोळी डाळ, भाजी, फळे. संध्याकाळच्या पार्ट्या त्यांना आवडत नाहीत. अधेमधे काही खाणे त्या टाळतात. शारीरिक फिटनेसबरोबर मानसिक फिटनेसबाबतही त्या दक्ष असतात. संगीताची आवड आहे. वाचन, लेखनही चालू असते. नव्या लोकांना भेटायला आवडते. रिकामपण टाळतात. निरोगी राहण्यासाठी शांत स्वभावाचीही उपयुक्तता मोठी असते, असे त्या मानतात. आपल्या आवडीचा एक तरी खेळ असावा व तो नियमित खेळावा. खेळाने व्यक्तिमत्त्व सर्वांगीण विकसित होते. ‘‘आज मी जी काही आहे त्यामागे टेनिसकोर्ट आहे.’’ मी मुलगा की मुलगी हा सवालच कधी मला पडला नाही. मुलांना न जमणाऱ्या गोष्टीही सहजपणे करायची प्रवृत्ती, अंगात बाणली गेली. निर्भयपणा आला. विचारांत मोकळेपणा आला. कॉलेजातही लहानसहान प्रसंगातून त्यांची विद्रोही मानसिकता घडत गेली. नोटीस बोर्ड वाचताना उंच मुलेमुली पुढे उभ्या, किरण बेदी उंचीने कमी. त्यांनी मुलांना म्हटले, ‘अरे, तुम्ही दुसऱ्यांना नोटीस बोर्ड बघू देणार की नाही? वाहने उभी करण्याच्या जागी काही मुले मुलींची छेड काढत. किरण बेदींनी प्राध्यापकांना म्हटले, ‘‘मुलींच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किग करा.’’ डॉ. राधाकृष्णन यांची उपनिषदांवरची पुस्तके त्यांनी वाचली. मार्गारेट थॅचरचे पाथ टू पॉवर, राजमोहन गाधींचे द गुड बोटमन- वगैरे पुस्तकांनी झपाटले. वेळेचे नियोजन, आत्मविकास, अध्यात्मिक अनुभव, सकारात्मक जीवनदृष्टी याबद्दलची पुस्तके वाचण्यात त्यांना रस वाटू लागला. कविता लेखनाचीही उर्मी प्रबळ असे. टेनिसच्या आवडीमुळे ओळख झालेल्या ब्रिजशी लग्न. पती ब्रिजचे वास्तव्य व्यवसायामुळे अमृतसरला असते. दांपत्य जीवनाबद्दल किरण बेदींना समाधान आहे. सासूचे प्रेम आहे. आपले दैव आपल्या मुठीत आहे आणि जे काही घडेल ते आपल्या कर्माचा परिणाम म्हणून घडेल.’’ अशी त्याची श्रद्धा आहे. मी एक प्रशिक्षित कार्यकर्ती आहे. अभ्यास, धावणे, खेळणे- आपले प्रत्येक पाऊल विशिष्ट ध्येयाच्या दिशेने पडते आहे. नजर शिखरावर खिळलेली आहे. पेचप्रसंगांनीच जीवनाला गती येते, असे त्या मानतात.
आपल्या जीवनाची सूत्रे म्हणून किरण बेदी काही गोष्टींना महत्त्व देतात. वेळेचा सदुपयोग, मानसिक, आंतरिक बळावरचा विश्वास, आत्मसन्मानाची जाणीव, सतत क्रियाशील राहण्याची वृत्ती, ज्ञानप्राप्तीची लालसा, प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा व दुसऱ्याला आनंद देण्याचा निर्धार, विपश्यना, साधना, योग, चिंतन, प्रार्थना, मन, शरीर, व्यवसाय, मैत्री, प्रकृती या सर्वांत काही आंतरिक सुसंगती हवी तर मग आनंदाचा खरा अनुभव येतो. सृजनात्मक जीवनशैली ही आपल्या अस्तित्वाला, जगण्याला खरा अर्थ देते, अशी त्यांची श्रद्धा आहे. ...Read more