- Ajinkya Vishwas
कंथ पूशीत्यातीऽ रानी माह्यारवास कसाऽ
केळीच्या पानावरऽ जिरेसाळीचा भात तसाऽऽ
एका कार्यक्रमात डॉक्टर अरूणा ढेरे यांनी कवितेबद्दल बोलताना इंदिराबाईंच्या कामातल्या या ओळी म्हणून दाखवल्या. ऐकताना कानाला फार सुंदर वाटत होत्या. सर्वांची नकळत दाद निघून ेली. त्यापुढे त्या सांगताना म्हणाल्या,त्याचा अर्थ थोडक्यात देत आहे. (खाली फोटोमध्ये देखील आहे तो.)
आपल्याला केळीच्या पानावर वाढलेला भात आवडतो, ती भावनाही आवडते. पण सासर-माहेरचे अंतर दाखवताना त्यांनी हेच उदाहरण का निवडले असावे, तर केळीचे पानही सुंदर असते, जिरेसाळी भातही सुरेख चवीला असतो, पण तो केळीच्या पानावर वाढला असता, त्याची आणि पानाची काही प्रक्रिया होऊन एक कळत-नकळत अशी कडवट चव उतरते त्या भातात. आयुष्य असेच चांगले असले तरी मनाला कुठेतरी ती हलकी चव जाणवत असते, केळीच्या पानावरच्या जिरेसाळी भातासारखी!
पूर्ण सभागृह थोडा वेळ स्तब्ध झाले होते.
शब्द ओळखीचे असतात, त्यामागच्या भावना, त्या त्या काळात ज्या उपमा असतात त्याप्रमाणे येत राहतात. आपले राहणीमान बदलते, वाचन बदलते, जुन्या संस्कृतीतील काही शब्द नजरेआड होतात. शब्द जातातच, पण त्यामागच्या काळजाला हात घालणारे अर्थ पण सोबत घेऊन जातात.
अरुणाबाईंना नंतर ही आठवण करून दिली असताना, त्यांनी कविता कशी असावी आणि कशी उमजून घ्यावी याचे एक छानसे उदाहरणच, त्या इंदिराबाईंच्या सहवासात असताना शिकल्या होत्या ते दिले.
या ओळी शोधता शोधता ‘मालनगाथा’ मिळाली. संतकाव्य, पंतकाव्य आणि इतर काव्यप्रकार हे काळानुरुप कमी-अधिक प्रमाणात जिवंत राहतात. पण गावात राहणार्या स्त्रिया- त्या मालन स्त्रिया, ज्या पहाटे जात्यावर बसून दळण दळताना, त्यांची नित्यनेमाची कामं करत असताना ज्या ओव्या गुणगुणतात, त्या कुठे अशा शब्दबद्ध होतात? त्या ओव्या, त्या स्त्रियांच्या शतकानुशतकं चालत आलेल्या अनुभवांची शिदोरी इंदिराबाईंनी या ‘मालनगाथे’त एकत्र केली आहे. काय नाहीये त्यात? पहाट आहे, पाऊस आहे. सासर आहे, माहेर आहे, शृंगार आहे, ग्रहण आहे, देव आहे, चंद्रभागा आहे, आणि सर्वांचा पाठीराखा विठू माऊलीही आहे!
कुठून-कुठून जमवलेल्या आणि नुसत्याच जमवलेल्या नसून त्यांचे अर्थ सोप्या भाषेत प्रभावीपणे आपल्या मनात उतरावेत अशी शब्दकळा लेऊन ‘मालनगाथा’ उभी आहे. दोन भागात असणार्या मालनगाथेचा नक्की आस्वाद घ्या आणि आपल्या वाडवडिलांनी, मायमाऊलींनी आपल्या मागे ठेवलेला हा समृद्ध ठेवा नक्की जपा.
मालनगाथा भाग १ आणि २- मेहता पब्लिशिंग हाऊस
(‘मालनगाथा’ पुस्तक आणि इ-बुक स्वरूपातही उपलब्ध आहे. )
...Read more
- DAINIK LOKMAT 16-02-2003
ग्रामीण स्त्रीजीवनातील जिव्हाळ्याच्या ‘गाथा’
‘मालनगाथा’ हा कै. इंदिरा संत यांनी संग्रहित व संपादित केलेला ग्रामीण स्त्रीजीवनातील ओव्यां-(गाथा)-विषयीचा अभ्यासपूर्ण ग्रंथ आहे. ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ने तो ग्रंथ अतिशय देखण्या पद्धतीने प्रकाशित केला आहे.
आपल्या मनातील सुखदु:खाच्या तीव्र वेदना आणि संवेदना व्यक्त करण्यासाठी स्त्रीने ओवीचा आश्रय घेतला. ती ओवी गाऊन स्वत:ला व्यक्त करू लागली. मालनी या निसर्गकन्या. त्यांनी गायलेल्या ओव्या म्हणजेच ‘मालनगाथा’. गाथा गाताना मालनींचे श्रम हलके होत. जसे पीठ जात्यातून झरत जाते, तशा तिच्या ओठांतून जीवनानुभवांनी रसरलेल्या शब्दकळ्या उमलू लागतात. अवघ्या स्त्रीजीवनाला या ओव्यांनी व्यापले आहे, असे ग्रंथ वाचताना जाणवते. न्हाणवलीच्या सुखद सोहळ्यापासून तर मरणवेळेच्या काळापर्यंत आणि पुत्रजन्मापासून वैधव्यापर्यंत जे जे स्त्रीला स्पर्शून गेले, ते ते तिने गायले आहे.
ग्रामीण लोकसंस्कृतीने मौखिक परंपरेने जतन केलेले हे लोकसाहित्य संग्रहित करून त्यावर रसग्रहणात्मक विश्लेषण करण्याचे प्रचंड मोठे कार्य इंदिरा संत यांनी केले आहे. त्यांच्यामते ‘गाथा म्हणजे एक अमृतानुभवाचे अथांग असे मानससरोवर आहे.’
‘गाथागंठन’ या समर्पक शीर्षकाखाली ‘गाथाबंध’ या उपशिर्षकाने त्यांनी विविध विषयांच्या गाथा त्यांच्या रंगसरूपगंधस्पर्शासह रसिकांपुढे मांडल्या आहेत. सुरुवातीस विषयप्रवेश, मग प्रत्यक्ष गाथा, त्यानंतर गाथेविषयीचे सविस्तर वर्णन आणि त्यानंतर काही ग्रामीण शब्दार्थ- असा एकंदरीत हा लेखनप्रकार आहे.
मालनी साध्या-भोळ्या, कष्टकरी निसर्गकन्या होत. निसर्गाच्या विविध रुपांविषयी त्यांचा भारी जिव्हाळा. ‘पावस फेरीवाला’ या गाथाबंधामध्ये पावसविषयीच्या त्यांच्या भावना अतिशय उत्कटपणे मांडल्या आहेत. फेरीवाल्याप्रमाणे गावोगावी भटकणारा हा पाऊस म्हणजे जणू धरणीचा साजणच. मालन म्हणते-
‘‘पाऊस पडला करू नकाऽ गलबलाऽऽ
धरनी, ग, बाईऽ तुझा साजन आला आलाऽऽ’’
साधी शब्दरचना, प्रादेशिक भाषेतील शब्दालाघव आणि निर्व्याज भाव यामुळे गाथा स्पर्शून जातात. प्रासादिकता, सूचकता हेसुद्धा गाथेचे गुण सर्वत्र जाणवतात. मालनी मोजके शब्द योजण्यात खूप चतुर. ती पावसाळी हवा, मग माहेरची आठवण, भावांची खुशाली ऐकायला उत्सुक झालेलं मन हे सारंच त्यात आहे. मालन वाऱ्याबरोबरच माहेरा निरोप धाडते (मेघदूता प्रमाणे!) वरुणराजाची प्रार्थना, पीकपाणी, पावसाची हुलकावणी, दुष्काळ, पावसाशी निर्वाणीचं बोलणं हे सर्वच कामाधामात व्यग्र असतानाही मालनी सरळ आणि प्रसन्न चित्ताने गाथेतून गातात. पेरणी, पावशा पक्षी, तिफन, धान्याच्या राशी, आबादानी इत्यादींची अनुभवजन्य अभिव्यक्ती गाथेतून पाहायला मिळते. लेखिका म्हणते, त्याप्रमाणे‘गाथा म्हणजे एक आनंदमय समूहगान आहे.’
पेरणी आणि मळणी म्हणजे निर्मिती आणि निर्मितीसाफल्य! तो सर्जनाचा आनंद मालनी भरभरून गातात. धान्यलक्ष्मीमुळे त्या आनंदतात. ‘बैलाच्या खुराखाली मातीचे सोने झाले’ ही त्यांची भावना असते. कुठे उदार नवऱ्याचे कौतुक, तर कुठे उमद्या पोराचे कौतुकही त्या करतात. समृद्धी देणारी नगदी पिकं आणि हिवाळ्याच्या प्रारंभीची सुगी हेही मालनींचे गाथाविषय आहेत. ‘ऊसाचा गूळ इत्यादी अनेक विषय त्या गातात. गोठ्यातील धनसंपदा, बैलांविषयी कृतज्ञता, गायी-म्हशींशी असलेलं नातं असे अगणित विषय मालनींना साद घालतात. या प्रत्येक विषयांविषयी लेखिका भरभरून सविस्तर सांगते. शब्दार्थांमुळे वाचनात रूची वाटते.
मालनींचा साजशृंगार, वेणी-फणी-कुंकू, लाल पिंजर सौभाग्याचं महत्त्व, पतीचं प्रेम हे रोजचे विषयसुद्धा प्रासादिक शैलीत मालनी मांडतात. लांब केसांचे सौंदर्य काही वेगळेच. लेकीला न्हाऊ घालतानाचा सोहळा, शिकेकाई इत्यादी विषयी मालनी गातात तेव्हा नैसर्गिक प्रसाधनांचा बटवाच त्या खुला करतात. बांगड्या भरणे ही घटनाही अप्रूपाची. बांगड्यांचे किती तरी प्रकार नि रंग तसेच कासारा-(वैराळ) विषयीचा आदर त्या गाथांमधून गातात. या गाथा संवादरूप असून नाट्यपूर्ण आहेत. बांगड्या शक्यतो माहेराहून मिळतात. मालन म्हणते,
‘‘बारीक बांगडीऽ बारा आन्याला लेते जोडी
हौस, गऽ मला मोठी बंधू हासत चंची सोडी’’
‘माहेरा’ विषयीचे प्रेम अनेक गाथांमधून दिसते. त्याचं कारण पूर्वी स्त्रियांना खूप सासुरवास असे. कष्टप्रद जीवनामुळे माहेराचा आधार वाटे. माहेरून आलेल्या खणांचे गाठोडे ‘बासनी आला पूर’ या गाथाबंधात अतिशय तपशीलवार वर्णिला आहे. चोळ्यांचे रंग, प्रकार, किंमत, खुलणारे सौंदर्य यांचे मनोरंजक चित्रण त्यात आहे. बंधूची घेणावळ (औदार्य), तो अचानक बाजारात भेटल्यावर होणारा आनंद सारेच साधेभोळे तरी कल्पक!
‘काळी चंद्रकळा’ बद्दल मालनी भरभरून गातात. आईचं प्रेम, काळ्या वस्त्रांत खुलणारा गोरा रंग, बंधूने दिलेली चंद्रकळा, पतीचे प्रेम-विरह इत्यादी अनेक रागरंग लेवून गायली जाणारी मालनींची गाथा लोकसंस्कृतीचे समग्र दर्शन घडवते. इंदिराबाई प्रत्येक गाथेचे रसग्रहण करताना वाचकांसमोर प्रसंग उभा करतात. काही अंदाज वर्तवतात आणि लोकजीवनातील काही प्रथा, रूढीही सांगतात, त्यामुळे गाथा चित्रवाण (हा त्यांचाच शब्द!) होते. चंद्रकळेच्या तुलनेत ‘पैठणी’विषयीच्या गाथा संख्येने कमी आहेत. पैठणी ही श्रीमंतांची मालमत्ता. मालनी या सामान्य कष्टकरी स्त्रिया. त्या पैठणीविषयी जास्त काय गाणार?
‘दागिन्यांचा डबा’ या गाथाबंधात साजशृंगाराचे अप्रूप खूप सुरेख गायले आहे. तर ‘प्रणयचंद्रच्या कला’ या शीर्षकाखाली इंदिराबार्इंनी मालनींनी सूचकपणे तरी काहीसा मुक्तपणे सांगितलेला शृंगार विस्ताराने दिला आहे. पाणवठा हा मालनींचा विसावा असतो. पाणवठ्यावर सख्यांना त मनातले गूज सांगते, मन हलके करते, कष्ट सुसह्य करते. पाणवठा हे संकेतस्थळ असते. तिथे प्रियकरही भेटतो. स्त्रीवर लादलेली बंधनं, परपुरुषाशी कसे वागावे, कसे बोलावे हेसुद्धा गाथा सांगते.
‘‘हसू नगंऽ लेकीऽ हसन्याचा भरमऽ मोठाऽऽ
आपूला अस्तुरीचा ऽ जलमऽ, बाई, खोटाऽऽ’’
अशा बंदिस्त वातावरणात वाढलेली मालन आयुष्यात बराच संघर्ष करते. तरी ‘कुंकवाच्या चिरी’ साठी सासुरवास सहन करते. किती चिवट असतो बाईचा जन्म!
मानवसमुहाचे सातत्य टिकवण्याचे महत्त्वाचे काम स्त्री-पुरुष करीत असतात. स्त्री ही विश्वासातत्याची जननी. मुलगी ऋतुमती होते तेव्हा तो सर्जनोत्सव मालनी साजरा करतात. नटव्या भरताराचा, हौशाचा रंगमहाल आणि त्या रंगमहालात रंगलेली प्रणयक्रीडा मालनी मुक्तपणे सगळ्यांना ऐकवतात. ‘कापी बिलवर कशानं पिचकला’ हे सांगतानाच ‘भरताराच्या उशाखाली चुडा माझा दडपला’, असे मालनी बिनधास्त गातात. पतीपत्नींमधील संयत प्रेम हा लोकसंस्कृतीच्या दडपणाचा परिणाम आहे. कोवळ्या वयातील सुनेला तिची सासू व सासरा अनेक सूचना करीत असतात, त्यांच्याही गाथा होतात. सुनेचं कधी कौतुक तर कधी धूसपूसही! ‘सून ही घरातील समई आहे’ असे समंजस सासू म्हणते. काही गाथातील सासू आईप्रमाणे प्रेमळ आहे. मुलगा व सुनेचे प्रेम एका सासूने गावे हे नवलच वाटते. अशा मालनी सासरी रमतात, माहेर विसरतात.
‘मालनीची पहिली अस्मिता : डोहाळे’ या समर्पक शीर्षकाखाली इंदिराबार्इंनी अनेक रम्य गाथा दिल्या आहेत. स्त्रीसुलभ भाव, वात्सल्याची चाहुल, डोहाळ्यांचा त्रास तपशिलात वर्णिला आहे. मालनीला पुत्र झाला तर आनंद, कन्या झाली तर आनंद, कन्या झाली तर ‘लागंऽ गिराण चंद्राला’, ‘लेकीचा, ग जलम’ इत्यादी ओव्या त्या गातात. त्यानी सोसलेल्या दु:खातूनच त्या असं गातात. माहेरी चार दिवस आलेल्या लेकीला आईबाप समजावतात, की बाईचा जन्म म्हणजे वायारती (फुकटचा!) मालनींच्या मानहानीचे, सासुरवासाचे कष्टांचे प्रतिबिंब आजही समाजजीवनात, लग्नविधींत दिसते. अहेवपणीच मृत्यू यावा, ही भावना मालनी गातात; कारण वैधव्य म्हणजे मरणच! मृत्यूच्या सोहळ्याच्या गाथाही हृद्य आहेत.
साध्याभोळ्या मालनींचा जीवनपट उलगडून दाखवण्याचे आणि लोकसंस्कृतीचं दर्शन घडवण्याचं महत्त्वाचं काम या ग्रंथाने केले आहे. ...Read more
- DAINIK KESRI 01-12-2002
लोकसाहित्यातून उलगडणारे विविधरंगी स्त्रीरूप...
लोकसाहित्य म्हणजे समूहमनाचा अशरीरिणी आविष्कार. येथे विशिष्ट व्यक्तीची नाममुद्रा नसली, तरी अनेक मनांचे जणु ते भावचंदन असते. काळाचा जणु एक अखंड प्रवाह लोकसाहित्याच्या अंतरंगातून वाहत राहिलेला असतो. म्हणून सृजनशील कलावंतालाही लोकसाहित्याच्या झळाळत्या रूपाचा मोह होत राहतो. इंदिरा संत हे मराठी काव्यक्षेत्रातील एक अत्यंत ठसठशीत नाव. त्यांनी लोकसाहित्या अंतर्गत काव्यक्षेत्रात डोकावून या निसर्गकन्यांच्या मालनीच्या मनात प्रवेश करून या मालनींच्या अनेक व्यथा आपल्यापुढे उलगडल्या आहेत.
‘मालनगाथा’ या ग्रंथात चार गाथा गंठन आहेत. मालनी म्हणजे निसर्गकन्या या निसर्गकन्यांचे जीवन विविध ऋतूंशी, पावसाशी, चंद्र-सूर्याशी निसर्गातील वृक्षसृष्टीशी बांधलेले. त्या भावसंबंधाची विविध लावण्यकळा या विविध गाथांमधून व्यक्त होतात. सुख-दु:ख, प्रेम, हुरहुरे, अपमान, सोसावा लागणारा छळ, आपल्या सृजनशीलतेच्या जाणिवेतून दाटणारे आपले वेगळेपण, वंशसातत्य... अशा कितीतरी भावच्छटा येथे व्यक्त झाल्या आहेत. या मालनी निसर्गकन्या. त्यामुळे या लोकगीतांमधून व्यक्त झालेले विविध भाव अत्यंत मोकळेपणाने सहजपणाने व्यक्त झाले आहेत. कृत्रिमरीत्या येथे स्पर्श नाही. येणाऱ्या प्रतिमाही जीवनातून सहज उमटलेल्या. त्यामुळे डोंगरातून झरणाऱ्या निर्मळ झऱ्यासारखे हे लख्ख अक्षरधन वाचताना आनंदाची एक वेगळी अनुभूती आपल्याला जाणवते.
गाथागंठन एक चा विषय ‘वर्षागान’ असा आहे. पावसाळा हा या मालनींचा अत्यंत प्रिय विषय. मालनींची जीवनधारा हा वर्षाधारेशी संवादी अशीच. त्यामुळे स्त्रीमनाचे इतके उत्कट आणि हृद्य आविष्कार या ‘वर्षागान’ मध्ये आपल्याला भेटतात. वर्षागानमध्ये एकूण ५८ गाथांचा समावेश आहे. या गाथांमधून स्त्रीच्या भावनांची संवादी रूपात सृष्टीवर उमटणारी भावचित्रे अन्यत्र कुठे आढळणार नाहीत, इतकी विलक्षण आहेत.
‘शेताला जाईनऽ उभी ऱ्हाईन बांधालाऽऽ
होळी देईन भरतारलाऽ माझ्या दूरच्या चांदाला.
दुसरे गाथागंठन आहे मालनीच्या साजशृंगाराविषयी. हळद-कुंकू, चुडा आणि मंगळसूत्र यांचे कौतुक, लावण्य अनेक गाथांतून प्रकट होणे. हा सारा साजशृंगार कशासाठी, तर स्वत:च्या आनंदासाठी आणि मुख्य सजणासाठी. या गाथांमधून लोकजीवनातून व्यक्त होणारे जणु सांस्कृतिक वैभव आपल्यापुढे उलगडते. लोकसाहित्यातील स्त्रीची रूपे रेखाटावी अशा या चित्रमयी गाथा आहेत. आणि या साऱ्या साजशृंगाराचे स्त्रीचे मनही येथे अलवारपणाने उलगडले आहे.
तिसरे गाथागंठन ‘प्रणयचंद्राच्या कळा’ या नावाने आहे. प्रत्येक ‘गाथाबंधन सहापासून पंधरा सोळापर्यंतही गाथांचा समावेश झालेला आहे. पाणवठ्यावर, ऋतुमतीचा सोहळा, मालनीचा रंगमहाल, उरता लागली भेटीची, मालनीची पहिली अस्मिता, डोहाळे या शीर्षकांवरून या गाथागंठनामधील विषयाची सहज कल्पना येणे. विविध प्रणरंगाचे लास्य या गाथांतून पाहायला मिळते.
इंदिरा संतांनी या मालन गाथा (दोन) मध्येही लोकसाहित्याच्या अंतरंगातून प्रकट होणारी स्त्रीची खूपशी रूपे प्रकट केली आहेत. ही सारी रूपे माणसाच्या मूलभूत वृत्तीप्रवृत्तीशी नेमकेपणाने कशी जोडलेली असतात त्याचा आविष्कार येथे घडत राहतो. त्यामुळे आजही एकविसाव्या शतकात या गाथा सतेज वाटतात. कधीही हे पुस्तक हातात घ्यावे आणि अक्षरांच्या आरशातून ही स्त्रीरूपे माणसाच्या आदिबंधाशी आपली नाळ जोडून घ्यावी.
मेहता पब्लिशिंग हाऊसने पुस्तक उत्तम काढले आहे. पांढरा शुभ्र कागद, उत्तम छपाई तर आहेच. चंद्रमोहन कुलकर्णींच्या रंगरेषांचे लावण्य मनात भरणारे असल्याने, पुस्तक हातात घेऊन न्याहाळावे असे निश्चित वाटते. हे ‘लोकधन’ रसिकांपुढे ठेवल्याबद्दल इंदिरा संत, मेहता निश्चितच अभिनंदनीय आहेत. ...Read more
- Jui Kulkarni
" हसरी बाई ... तिचा संसार खरा नाही " अशी एक ओवी आहे मालनगाथेत ...
इंदिराबाईंची मालनगाथा वाचायला घेतली ती किंचीत न्यूट्रल मनाने. काय असतं बुवा हे ओवी प्रकरण बघूया तरी असं म्हणत.
माझ्या शहरी माॅडर्न जीवाचा आणि ओवीचा कधी संबंध आलेला नाही. नाही म्हणयला आजोळच्या घरात अडगळीच्या खोलीत पडलेलं जातं फार आवडायचं . शक्य झालं असतं तर जतन केलं असतं ते .
तर मालनगाथा मधूनच वाचायला सुरवात केली आणि वाचतच सुटले. लेकीच्या लांबसडक केसांची काळजी घेण्याच्या गोंडस मायाळू अतिशयोक्ती ओव्या आहेत.
" बयानं न्हानीलं येशीपत्तूर पानी गेलं
जीला न्हायी बाल तिला नवाल वाटीलं "
( नाहल्याचं पाणी पार वेशीपर्यंत गेलंय म्हणजे इतके लांबलचक केस आहेत 😃 )
चंद्रकळेवर असलेल्या सेक्सी ओव्या आहेत .
" काळी चंद्रकळा सारं दिसतं माझं अंग
कंथाला विचारती कशी खरेदी केली सांग "
(चंद्रकळा फार झिरझिरीत असल्याने, अशी साडी मला कशी आणलीस म्हणून बायको नवर्याला रागवतेय 😂 )
शेतीवाडीची काम , बाजारहाट, माहेरचं कवतिक आणि सासरचा तिरस्कार ,बांगड्या, कुंकू, साजशृंगार, चोळ्या , ऋतूप्राप्ती , सततचं कामकाज , सासूरवास , डोहाळे असं सगळंच या ओव्यांमधे दिसतं .
"वळवाचा पाऊस कुठं पडतो , कुठं न्हायी
भरताराचं सुख दैवापासून घ्यावं बाई "
हे आदिम सत्य तर आहेच ... सगळं भीषण पारतंत्र्यातलं जीवन . काही अस्तित्वचं नाही जणू .सासरच्या खुंटीला बांधलेली गायच जणू , वंश चालवायला मशिन, फुकटची कामकरीण अशीच बहुतेक बायकांची अवस्था...
किती वर्षे किती अंधारयुगात मृतवत जगली बाई . अनेक पिढ्या बाईची बुद्धी फक्त संसारात पिचली . ना शिक्षण ना दुसरी काही दुनिया. शिक्षण नाही तरी
त्या काळातल्या बाईचं समस्त चित्रण बायकांनी ओव्यात गाऊन ठेवलंय. ते वाचताना छान वेगळं वाटतं आणि ते जग संपल्याबद्दल महाराष्ट्रातील सर्व समाज सुधारकांचे आभार मानावेसे वाटतात.
~ जुई ...Read more