NEWSPAPER REVIEWस्वत:ची पुनर्रचना करण्यासाठी लागणारे गुण तुमच्या अंतर्यामीच आहेत...
एकनाथ ईश्वरन हे इंग्रजीचे प्राध्यापक. १९६१-६२ मध्ये त्यांना फुलब्राइट शिष्यवृत्ती मिळाली. बर्कले विद्यापीठात त्यांना अध्यापनाचे काम मिळाले. टेनिस कोर्टवर खेळायला गेल्यावर त्यांना तेील प्रशिक्षकाने काही गोष्टी सांगितल्या. उभं राहण्याची पद्धत, रॅकेट धरण्याची पद्धत, चेंडू हवेत उडवण्याची पद्धत, रॅकेटला स्विंग देण्याची पद्धत यातील चुका दाखवून म्हटले, ‘‘नाउमेद होण्याची गरज नाही. स्वत:हून टेनिस शिकणारे लोक बहुधा याच प्रकारे सुरुवात करतात.’’ आणि प्रत्येक गोष्ट कशी करायला हवी हे तो प्रशिक्षक समजावून सांगतो...त्यावर त्यांची प्रतिक्रिया ही सकारात्मक राहते याचे कारण ते जिला आपली आध्यात्मिक गुरू मानतात त्या त्यांच्या आजीने दिलेली शिकवण. त्यामुळे स्वत:कडे दुसऱ्यांच्या दृष्टीतून पाहता येणे.
आजीने सांगितलेली दुसरी गोष्टही ईश्वरनवर कायमची कोरली जाते. ‘‘रमण माझ्याशी उद्धटपणे वागला. म्हणून मीही त्याच्याशी तसाच वागलो’’ असे म्हटल्यावर आजी त्याला सांगते, ‘‘या दोन गोष्टींचा एकमेकांशी काही संबंध नाही. तो तुझ्याशी उद्धटपणे वागला या गोष्टीचा तू काय म्हणतोस किंवा करतोस याच्याशी काय संबंध आहे?.. तू जिच्यावर नियंत्रण ठेवू शकशील अशी फक्त एकच व्यक्ती या जगात आहे आणि ती म्हणजे तू स्वत: लोक तुझ्याशी कसे वागतात याचा विचार न करता तू लोकांच्या वागण्यावर आपली प्रतिक्रिया काय असावी याचा तू विचार कर. नाहीतर तुझी अवस्था रबराच्या चेंडूसारखी होईल. लोकांनी तुला भिंतीवर आपटायचं आणि तू टप्पा खाऊन परत यायचं.’’
मनाला वळण लावून, मनावर ताबा मिळवूनच अडचणीतून मार्ग निघू शकतो. त्यासाठी आपल्या मनातील विचारांकडे अलिप्तपणे पाहता यायला हवे - ही शिकवण जन्मभर उपयुक्त व उपकारक ठरते.
एकनाथ ईश्वरन हे आपल्या प्रतिपादनाच्या स्पष्टीकरणासाठी जागोजाग दृष्टान्तकथा देतात; उदाहरणे देतात. त्यामुळे त्यांच्या विवेचनाच्या कक्षा रुंदावतात. आशयाची व्याप्ती वाढते. मनाचे प्रशिक्षण हे खरे तर निरामय, सुखी, आनंदाचे निधान असते. आणि त्यासाठी अनेक कानमंत्र ईश्वरन देतात. काही कानमंत्र आपल्या रूढ विचारांनाच हादरा देतील. उदा. ‘‘जे लोक अधिक साहसी आहेत त्यांना आपला स्वच्छंदीपणा कमी करण्यासाठी एक व्यायाम आहे. ज्या व्यक्ती तुम्हाला आवडतात अशा व्यक्तींच्या सहवासातच राहण्याची सवय सोडून द्या. अधूनमधून तुम्हाला न आवडणाऱ्या व्यक्तींबरोबर राहण्याचा परिपाठ ठेवा. त्यामुळे तुमच्या जाणिवेच्या कक्षा रूंदावून, तुमच्या जगाबाहेरच्या विश्वाशी तुमचा संपर्क राहील.’’
एकनाथ ईश्वरन हे गेली तीस वर्षे अमेरिकन लोकांना ध्यानधारणेचे प्रशिक्षण देत आहेत; आणि त्या अनुभवाच्या आधारे त्यांनी आपल्या आयुष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी एका विशिष्ट अभ्यासप्रणालीची वा ध्यानधारणा तंत्राची निर्मिती केली आहे. ज्यांना खरोखरच ध्यानधारणा करायची इच्छा आहे, अशा लोकांसाठी त्यांनी काँक्वेस्ट ऑफ माइंड हे पुस्तक १९८८ साली लिहिले. ते अमेरिकेत खूप गाजले. त्यांना मोठा शिष्यवर्ग लाभला. त्या पुस्तकाचे मराठी भाषांतर मेहता पब्लिशिंग हाऊस तर्फे प्रसिद्ध झाले आहे. वैशाली जोशी यांनी हे भाषांतर केले आहे.
ध्यानधारणेत मनावर नियंत्रण ठेवण्यावर भर दिला जातो; मनावर ताबा मिळवला तर आयुष्याला वेगळी दिशा मिळू शकते. आपले जीवन आणि चारित्र्य यांना नवा आकार देता येतो, नवे नातेसंबंध प्रस्थापित करता येतात आणि नव्या जोमाने जीवनाला सामोरे जाण्याची मानसिक तयारी होऊ शकते, असा एकनाथ ईश्वरन यांना विश्वास वाटतो. ‘‘मन स्थिर करा आणि आपण स्वत: परमेश्वर असल्याची अनुभूती घ्या’’ हे बायबलमधील वाक्य त्यांना प्रेरक व मार्गदर्शक वाटते.
मुक्तपणे विचार करणे (मनाचे प्रशिक्षण, कौशल्यप्राप्ती, अधिक खोल पाण्यात शिरणे (जीन म्हणजे योगसाधना), मुक्ततेसाठी व्यूहरचना, अंतरंगातील अवकाश अशा चार मुख्य विभागात वेगवेगळे विषय मांडून एकनाथ ईश्वरन यांनी शेवटी ध्यानसाधनेचा आठ कलमी कार्यक्रमही दिला आहे.
ध्यानसाधना रोज पहाटे अर्धा तास करावी, अधिक वेळ करायची असेल तर सायंकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी आणखी अर्धा तास करावी. त्यापेक्षा जास्त करण्याची गरज नाही. ध्यानासाठी घरातलीच एखादी खोली वा जागा निवडा. त्या खोलीची ध्यानाशी मनोमन सांगड बसली की त्या खोलीत शिरल्याबरोबर आपले मन शांत होत असल्याचा अनुभव येऊ लागेल. ध्यानासाठी जमिनीवर किंवा सरळ पाठ असलेल्या खुर्चीवर बसा. डोकं, मान आणि पाठीचा कणा एका सरळ रेषेत येऊ द्या. एकाग्रता वाढू लागली की मज्जासंस्था शिथिल होऊ लागते. या अवस्थेत झोप येण्याची शक्यता असते. ती न यावी यासाठी स्वत:ला पाठीच्या आधारापासून दूर होऊन बसावे. डोळे मिटून मनातल्या मनात एखादी प्रार्थना करावी; ती आपल्या अंतरंगातील देवाला, दैवी अंशाला आवाहन करणारी असावी. प्रार्थनेवर पूर्ण लक्ष केंद्रित असावे. प्रार्थनेपासून मनाला भरकटू देऊ नका. प्रार्थना पुन:पुन्हा म्हणत राहा. प्रार्थनेसाठी निवडलेले उतारे सकारात्मक व व्यवहारी असावे.
ध्यानाबाबतचे रहस्य म्हणजे आपण ज्या विषयाचे ध्यान करतो, तसेच होतो. ध्यानाने प्रार्थनेतील भाव हा आपला अंतरंगात भिनत जातो. आपल्या प्रत्येक उक्तीत आणि कृतीत त्याचा प्रभाव प्रकट होऊ लागतो.
प्रार्थनेप्रमाणेच प्रत्येक धर्मात काही मंत्र वा पवित्र नावे असतात. त्यांचा मनातल्या मनात शांतपणे उच्चार करीत राहिले तर मनाची अवस्था बदलण्याची क्षमता निर्माण होते. रामनामाचा जप, अल्लाहो अकबर , रिबोनो शेल ओलाम (सगळ्या विश्वाचा देव), बरुख आट्टा अडोनाई (ज्यू - परमेश्वरा तू महान आहेस), ओम मणि पद्मेहम् (बौद्ध - हृदयकमळातील मौल्यवान रत्न) इ. काळजी वा निराशा वाटेल, मन क्षुब्ध होईल तेव्हा अशा मंत्राचा जप करा. त्यामुळे मन शांत होऊन तुमच्या विरुद्ध काम करणारी उर्जा तुमच्या भावनांना लगाम घालून योग्य दिशेला जाईल.त्याच प्रमाणे तणाव कमी करणे, चित्त एकाग्र करणे, ज्ञानेंद्रियांना प्रशिक्षण देणे, इतरांच्या हिताला प्राधान्य देणे, संत महात्म्यांच्या साहित्याचे वाचन करणे, सत्संग ठेवणे यांचाही एकनाथ ईश्वरन यांच्या आठ कलमी कार्यक्रमात समावेश केला गेला आहे.
आपल्याला या आठ कलमांमध्ये फार वेगळे असे काही आढळणार नाही; परंतु त्या सर्व गोष्टी गांभीर्याने करण्याला महत्त्व आहे; आणि त्याद्वारे मनाला स्वास्थ्य व शांतता लाभते आणि आपल्या व्यक्तिमत्वात बदल होत जातो; हा बदल आपल्याला व इतरांना उपकारक असतो. जीवनाच्या लाटा अंगावर घेऊन त्यांच्यावर सहजी स्वार होणे त्यामुळे शक्य होते. भविष्यावर ताबा मिळवायचा प्रयत्न व्यर्थ असतो, परंतु आपल्या प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवले आणि आपल्या विचारांना योग्य दिशा दिली तर भविष्यात आपण कसे असणार आहोत हे ठरत जाते - असे भगवान बुद्ध म्हणत; ते आजही तेवढेच रास्त आहे.’’ आज आपण जे आहोत ते आपल्या विचारांचा परिणाम म्हणून आहोत, हे आपण ज्या परिस्थितीत असतो ती आपणच तयार केलेली असते. आपल्या मनातील खोलवर चाललेल्या विचारांमुळे आपल्या हातून कृती घडते, त्या कृतीमुळे आपल्या भोवती विशिष्ट वातावरण तयार होते; आपले आयुष्यही त्यानुसार आकार घेत जाते. हे लक्षात घेतले तर परिस्थितीला आपणच जबाबदार असतो हे पटू शकते.
‘‘इतरांच्या गरजांबाबत अधिक संवेदनाक्षम व्हा आणि स्वत:च्या गरजांबाबतचा आग्रह सोडून द्या.’’ या व्यायामामुळे तुमचा स्वच्छंदीपणा कमी होईल.
आपल्या वैयक्तिक मागण्यांचे लाड जेवढे जास्त, तेवढा आपला अहंकार वाढत जातो. अशा अहंकारामुळे व स्वकेंद्री इच्छाशक्तीमुळे आपले सर्वांशी संबंध बिघडत जातात आणि आपली असुरक्षिततेची भावना वाढीला लागते.
आपल्या शरीरानं काय करायचं हे जसं आपण शिकायला हवं तसंच आपल्या मनानं काय करायला हवं हेही शिकावं लागतं. आपल्या आवडी तुम्ही इच्छेनुसार बदलू शकता. ज्यामुळे सुख होते त्या गोष्टी करा; ज्यामुळे दु:ख होते त्या गोष्टी टाळा हा रुढ संदेशही चुकीचा आहे. नावडत्या गोष्टी करतानाही तिच्यात मजा मानता येणे आवश्यक आहे. आवडीनिवडीबाबतचा आग्रहीपणा ही आपल्या मुक्तजीवनाच्या मार्गातील मोठी धोंड असते. त्यासाठी लवचिकता हवी. तीव्र आवडी निवडी म्हणजे तीव्र वासना. तीव्र वासना म्हणजे क्रोधाला आमंत्रण. अन्न , काम व माणसं यांच्या बाबतीतल्या आवडीनिवडींचा कडकपणा आपल्या मनोधारणेचा उत्स्फूर्तपणा दडपून टाकणारा ठरतो.
ध्यानधारणेला आरंभ केल्यावर आपल्याला काय काय अनुभव आले त्याचे टप्पे ईश्वरन यांनी पृष्ठ ४९ ते ५६ यावर उलगडून दाखवले आहे.
ध्यानामुळे जीवनविषयक दृष्टिकोनात बदल होऊ लागतो. कोणतीच गोष्ट आपल्यापुरती नसते. सर्व गोष्टी जीवनासाठी असतात हे जाणवून प्राधान्यक्रमात फरक पडत जातो.
ध्यानामुळे आपल्याला काय मिळतेय हे जाणवल्यावर इतर गोष्टींसाठी देण्यात येणाऱ्या वेळेबाबतचा तरतमभाव वाढत जातो.
निरंतर टिकणारा आनंद हवा असेल तर छोट्या आनंदावर पाणी सोडायला शिका. ध्यानामुळे तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीचे सौंदर्य वाढेल. तुमचे जीवन अधिक शांत, उत्साही, निर्मितीक्षम आणि सुरक्षित होईल.
मिनाची शक्ती वाढत जाते. मनाला वाटेल तसे वागण्याची कृती न करण्याएवढी अलिप्तता अंगी येत जाते.
ताबडतोब प्रतिक्रिया देऊ नका. नकारात्मक भावनांना तिथल्या तिथे रोखून धरा.
ध्यानातील अडथळे व त्यांचे निराकरण
स्वार्थी जीवनाच्या प्रवाहाविरुद्ध पोहत जाणे याला भगवान बुद्ध पतिसोनागामी असे म्हणतात. स्वतंत्र होण्यासाठी आपल्याला आपण गृहीत धरलेल्या त्याचत्या विचारांच्या चौकटीतून सुटका करून घ्यायला हवी. (६५) आनंद व दु:ख या भावनांच्या जंजाळातून बाहेर पडून आपल्या मज्जासंस्थेची संपूर्ण पुनर्बांधणी करायला हवी. मज्जासंस्थेला लागलेली एकतर्फी वाहतुकीची सवय मोडायला हवी.
स्वत:च्या मनावर ताबा मिळवणे हे सर्वात कठीण काम आहे. ध्यानामध्ये अडथळे आणणाऱ्या इतर विचारांबरोबरची ही प्राथमिक मारामारी म्हणजे पुढे येणाऱ्या मोठ्या लढाईची तयारी असते. सुप्त अंतर्मनाच्या डोहात नकारात्मक विचारांच्या वेगवान प्रवाहांमुळे भोवरे उठत असतात. ते प्रवाह बदलण्यासाठी मोठी लढाई करावी लागते. हा पराक्रम म्हणजे चमत्कारच असतो. पण तो ज्या प्रकारे साध्य केला जातो त्यात मात्र चमत्कार असू शकत नाही. त्यामागे कठोर परिश्रमच असतात.
आध्यात्मिक विकास ही झटपट घडणारी गोष्ट वा कविकल्पना नाही. ध्यान आणि दैनंदिन जीवन एकमेकांना आधार देत राहिले तर आध्यात्मिक विकासाचा वेग वाढेल.
तुमची ध्यानधारणा जसजशी वाढत जाईल तशी तुम्हाला अधिक चांगली झोप येत जाईल. मात्र ध्यान करताना झोप येत असेल तर ताठ बसा व झोपेला थोपवा.
भगवद्गीतेतील एक श्लोकाचा अर्थ आहे - जे नेहमी स्वत:च्या इच्छा, वासना पूर्तीच्या मागे असतात त्यांना ह्या आयुष्यात कधीच शांतता लाभत नाही.
स्वामी रामानुज म्हणतात : आपलं सर्वात उच्च ध्येय हे आपण स्वत:ला कोण समजतो यावर अवलंबून असतं. आपलं शरीर म्हणजेच आपण असं मानणाऱ्यांना शारीरिक समाधान मिळवण्यापलीकडे काय ध्येय गवसणार? शरीर व व्यक्तिमत्त्व या शारीरिक व जैवरासायनिक यंत्रापलीकडे आणखी काहीतरी आपण आहो हे जाणून घ्यायला हवे. व्यक्तिमत्त्वाचा पाया शारीरिक नसून आध्यात्मिक असतो - हे कळले की बरेचसे शारीरिक प्रश्न दूर होतात.
स्वत:ची पुनर्रचना करण्यासाठी लागणारे गुण (चांगुलपणा, प्रेम, निर्भयता, इ.) हे आपल्याच अंतर्मनात खोलवर रुजवलेले असतात. ते कुठून बाहेरून आणावे लागत नाहीत.
मनाला मुक्त करताना पाच अडथळे पार करावे लागतात असे भगवान बुद्धांनी म्हटले आहे. विषयासक्ती, शत्रुत्वभावना, आळशीपणा, चंचलता आणि चिंता (भीती). हे अडथळे आपल्याला जागृतीपासून दूर ठेवतात. बुद्ध हा एक प्रभावी आध्यात्मिक शास्त्रज्ञ आहे. आपल्या भावनांचे आनंददायी, दु:खदायी व तटस्थ असे वर्गीकरण त्यांनी केले आहे.
या अडथळ्यांना पार करण्यासाठी भगवान बुद्धांनी पाच व्यूहरचना सांगितल्या आहेत. मानसिक कौशल्यांच्या गतिशास्त्राच्या भाषेत त्या बसवता येतात.
१.एका विचाराच्या जागी दुसरा विचार ठेवणे
२.मनन चिंतन करणे - तीव्र भावना वासना उफाळून आल्यास थोडे थांबा. त्या भावनेच्या आहारी गेल्यास होणाऱ्या परिणामांचा विचार करा.
३.एखाद्या गोष्टीतून लक्ष काढून घेणे किंवा तिच्याकडे लक्ष न देणे.
४.मूळापाशी जा. अडचणीचं मूळ कारण असलेल्या इच्छाशक्तीचे स्वरूप समजावून घ्या.
५.अभिनिग्रह करा.तुमच्या अडचणीचं मूळापासून निराकरण करा. त्या नक्की नाहीशा झाल्या आहेत याची खात्री करून घ्या.
ईश्वरन हे श्रीकृष्णाला आपला आध्यात्मिक आदर्श मानतात. त्याचा भगवद्गीतेतील उपदेश हा परिपूर्ण आध्यात्मिक जीवनाचा जणू पाया आहे.
ईश्वरन यांना सेंट फ्रॉन्सिसची एक प्रार्थना अत्यंत प्रिय आहे. आपल्या प्रशिक्षणवर्गाला प्रारंभ करताना ते त्या प्रार्थनेचा आग्रह धरतात.
परमेश्वरा, मला तुझ्या शांततेचं साधन कर.
जिथं द्वेष असेल तिथं मला प्रेमाची प्रेरणा करू दे.
जिथं इजा असेल, तिथं क्षमा
जिथं संशय असेल, तिथं प्रेम
जिथं अंधार असेल तिथं प्रकाश
जिथं दु:ख असेल तिथं आनंद
हे प्रभो, मला वद्वान दे
लोकांनी माझं सांत्वन करावं असं मला वाटू देऊ नको
उलट लोकांचं सांत्वन करण्याची क्षमता मला दे.
लोकांनी मला समजून घ्यावं असं मला वाटू देऊ नको
उलट लोकांना समजून घेण्याची क्षमता मला दे.
लोकांनी माझ्यावर प्रेम करावं असं मला वाटू देऊ नको.
लोकांवर प्रेम करावे अशी क्षमता मला दे.
कारण काही दिलं तरच आपल्याला काहीतरी मिळतं.
आपण क्षमा केली तरच आपल्याला क्षमा केली जाते.
आपण मरण भोगले तर आपल्याला अमरत्व प्राप्त होते.
ईश्वरन यांचे हे पुस्तक आपल्याला प्रेरणादायक वाटेल. आपल्या मनावरची बुद्धीवरची गैरसमजाची जळमटे दूर करील. मनाला मुक्तता मिळवण्यासाठी आपल्या पूर्वग्रहांचे ओझे धुडकावून द्यायला हवे. ध्यानाच्या द्वारे हे काम सुलभ होऊ शकते. मुक्तीच्या मार्गातले अडथळे दूर होऊ शकतात. आपल्या जीवनात अक्षय आनंदसुखाचे अंत:प्रवाह मग अविरत संचार करू लागतात.
द वर्ल्ड्स रिलिजन्स या प्रो. हस्टन स्मिथ यांच्या पुस्तकाचा आधार घेऊन आपल्या उपनिषदांत ऋषिमुनींना माणसाच्या अंतरंगात प्रवेश करण्याचा, तिथे आपल्या इच्छेप्रमाणे विहार करण्याचा आणि तिथे लागलेले शोध परत येऊन इतरांना सांगण्याचा मार्ग सापडलेला होता व हे करण्याचा परंपरागत वारसा येथे दीर्घकाळ चालत आलेला होता असे ईश्वरन सांगतात, प्राचीन काळी भारतात ध्यानधारणेद्वारे आपल्या अंतरंगाच्या अमर्याद अवकाशात स्वैर संचार करणारे ‘आत्मानॉटस’ अस्तित्वात होते आणि ते जाणिवेच्या अवकाशात संचार करून दैवी आत्म्याचा शोध घेऊ शकत होते अशी त्यांना खात्री वाटते. उपनिषदांतील काही वर्णने या दृष्टीने अर्थपूर्ण आहेत. ‘‘मोठमोठ्या आकाशगंगांमध्येही न मावणारा माझा प्रियतम माझ्या छोट्याशा हृदयात राहतो’’ असे सुफी संत सांगतात. जेव्हा आपला आत्मा ह्या तेजाने तळपत असतो तेव्हा इतर सर्व गोष्टीही आपल्याला तेजस्वी भासू लागतात.’’
आपल्यातील परमात्म्याची ओळख पटण्यासाठी ध्यानधारणेचा मार्ग हाच सर्वोत्तम ठरतो असे पुन:पुन्हा ठासून सांगणारे हे विवेचन जिज्ञासूंना प्रेरणादायक वाटेल. ...Read more