* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MY LIFE WITH THE TALIBAN
  • Availability : Available
  • Translators : PRAMOD JOGLEKAR
  • ISBN : 9789386745095
  • Edition : 1
  • Publishing Year : AUGUST 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 352
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
  • Available in Combos :PRAMOD JOGLEKAR COMBO SET - 29 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
ABDUL ZAEEF DESCRIBES GROWING UP IN POVERTY IN RURAL KANDAHAR PROVINCE, WHICH HE FLED FOR PAKISTAN AFTER THE RUSSIAN INVASION OF 1979. ZAEEF JOINED THE JIHAD IN 1983, WAS SERIOUSLY WOUNDED IN SEVERAL ENCOUNTERS AND MET MANY LEADING FIGURES OF THE RESISTANCE, INCLUDING THE CURRENT TALIBAN HEAD, MULLAH MOHAMMAD OMAR. DISGUSTED BY THE LAWLESSNESS THAT ENSUED AFTER THE SOVIET WITHDRAWAL, ZAEEF WAS ONE AMONG THE FORMER MUJAHIDIN WHO WERE CLOSELY INVOLVED IN THE EMERGENCE OF THE TALIBAN, IN 1994. HE THEN DETAILS HIS TALIBAN CAREER, INCLUDING NEGOTIATIONS WITH AHMED SHAH MASSOUD AND ROLE AS AMBASSADOR TO PAKISTAN DURING 9/11. IN EARLY 2002 ZAEEF WAS HANDED OVER TO AMERICAN FORCES IN ISLAMABAD AND SPENT FOUR AND A HALF YEARS IN PRISON IN BAGRAM AND GUANTANAMO BEFORE BEING RELEASED WITHOUT CHARGE. MY LIFE WITH THE TALIBAN OFFERS INSIGHTS INTO THE PASHTUN VILLAGE COMMUNITIES THAT ARE THE TALIBAN`S BEDROCK AND HELPS TO EXPLAIN WHAT DRIVES MEN LIKE ZAEEF TO TAKE UP ARMS AGAINST THE FOREIGNERS WHO ARE FOOLISH ENOUGH TO INVADE HIS HOMELAND.
मुल्ला झैफ यांचा जन्म १९६८ मध्ये झांगियाबाद येथे झाला. दुष्काळ व राजकीय अस्थिरता यामुळे तो कुटुंबासह मुशान, रंग्रेझान, चारशाखा अशा ठिकाणी भटकत होता. याच दरम्यान त्याची लहान बहीण आणि वडील यांचा मृत्यू झाला. झैफच्या जन्मानंतर सातच महिन्यांनी त्याची आई देवाघरी गेली होती. राज्यक्रांती झाली आणि साम्यवादी राजवट उदयास आली. केवळ पंधराव्या वर्षीच त्याने शस्त्र हाती घेतले. सोव्हिएत फौजांविरुद्ध तो लढाईत उतरला. १९८५च्या दरम्यान त्याने पाकिस्तानात आयएसआयकडून शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण घेतले. सोव्हिएत फौजांनी माघार घेतल्यावर तो घराकडे परतला; परंतु अफगाणिस्तानातील यादवी युद्धामुळे तो पाकिस्तानला गेला. कंदाहार येथील एका मशिदीत तो ‘इमाम’ म्हणून राहू लागला. १९९४ मध्ये तो तालिबान चळवळीत सहभागी झाला. झैफ मुळात धार्मिक प्रवृत्तीचा होता. तालिबानने हेरात, काबूल काबीज केल्यावर तेथील बँकांचे प्रमुखपद झैफला देण्यात आले. ओसामा-बिन लादेन याचे अफगाणिस्तानात आगमन झाल्यावर प्रभारी संरक्षणमंत्री हे पद झैफला देण्यात आले. तालिबानी राजवटीत झैफने संरक्षणमंत्री तसेच पाकिस्तानातील तालिबानचा वकील म्हणूनही काम केले. सदर पुस्तकात झैफच्या दृष्टिकोनातून अमेरिका व पाकिस्तान यांचे अफगाणिस्तानाविषयी असणारे धोरण, राजकीय स्वार्थ त्याने स्पष्टपणे मांडले आहेत. ९/११च्या हल्ल्यानंतर निर्दोष असतानाही अमेरिकेने त्याला तुरुंगात टाकून पाच वर्षं त्याचा छळ केला. त्याचे ग्वान्टानामो तुरुंगातले अनुभव त्याने सांगितले आहेत. सदर पुस्तक म्हणजे एके काळच्या तालिबान नेत्याची सत्य कहाणीच आहे.

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MAZETALIBANIDIWAS #MYLIFEWITHTHETALIBAN #माझेतालिबानीदिवस #AUTOBIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #PRAMODJOGLEKAR #प्रमोदजोगळेकर #ABDULSALAMZAEEF "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKSATTA (LOKRANG) 20-01-2019

    तालिबानचे अंतरंग... अफगाणिस्तान हा भारतीय उपखंडातील एक महत्त्वाचा देश. असंख्य समस्यांनी ग्रासलेला. राजेशाहीपासून साम्यवादी एकाधिकारशाहीपर्यंत सर्व प्रकारच्या राजवटींचे दशावतार पाहिलेला. या ना त्या कारणाने गेली तीन ते चार दशके सतत आंतरराष्ट्रीय स्तरार चर्चेत राहिलेला. अशा या देशातून सोव्हिएत आक्रमक फौजेला परतवून लावण्याच्या इराद्याने उभी राहिलेली कट्टर मुजाहिदीनांची संघटना- ‘तालिबान’! इस्लाममधील ‘जिहाद’च्या संकल्पनेची झिंग चढलेल्या या फौजेला अमेरिकेने पोसले नसते तरच नवल मानावे लागले असते. रशियन कैद्यांच्या शरीराची सालडी ते जिवंत असताना सोलणाऱ्या आणि त्या सैनिकांच्या आक्रोशात आसुरी आनंद मानणाऱ्या या तालिबान्यांना एके काळी अमेरिकेने गौरवलेदेखील. तथापि, एकदा सोव्हिएत फौजा माघारी परतल्यानंतर या मुजाहिदीनांना जाणीव झाली ती अमेरिका तिच्या राष्ट्रीय हितसंबंधांच्या रक्षणाच्या नावाखाली अफगाणिस्तानात करत असलेल्या घुसखोरीची. मग ते अमेरिकेच्या साम्राज्यवादाविरुद्धही त्याच त्वेषाने लढू लागले. अमेरिकेने लष्कर पाठवून आणि आपल्या मर्जीनुसार राज्य चालवायला तयार असणाऱ्या नेत्यांना सत्तास्थानांवर बसवून तालिबानचे आव्हान मोडून काढायचा बरीच वर्षे प्रयत्न केला, पण तो सपशेल फसला. त्या देशातून बाहेर कसे पडायचे, हा अमेरिकी प्रशासनाला भेडसावणारा एक मुख्य प्रश्न आहे. अफगाणिस्तानच्या ७० टक्के प्रदेशावर तालिबानची हुकमत तरी आहे किंवा धोक्याचे सावट तरी आहे. अशी ही संघटना, तिची ध्येयधोरणे, तिची अंतर्गत रचना आणि सत्तासंघर्षांबद्दल आपल्याला पुरेशी माहितीच नसते. विशेषत: पाकिस्तानबरोबर या संघटनेचे नेमके संबंध कसे आहेत, याबद्दल भले भले राजकीय नेतेही अंधारात चाचपडताना दिसतात. त्या दृष्टीने अब्दुल सलाम झैफ या तालिबानी राजनैतिक अधिकाऱ्याचे आत्मकथन- ‘माझे तालिबानी दिवस!’ हे अनुवादित स्वरूपात का होईना, मराठी वाचकांना आता उपलब्ध झाले आहे. ‘माय लाइफ विथ द तालिबान’ हे मूळ इंग्रजी पुस्तक २०१० सालीच प्रसिद्ध झाले होते आणि चर्चेतही होते. पुस्तकाच्या प्रारंभीच झैफची अवघ्या सात ओळींची, परंतु ‘स्वातंत्र्य’ आणि ‘लोकशाही’ या दोन मूल्यांच्या व्यावहारिक आविष्कारातील प्रचंड अंतर्विरोधांवर अत्यंत तीव्र, बोचरी टीका करणारी कविता वाचायला मिळते. ग्वान्टानामो तुरुंगात असताना झैफने लिहिलेल्या या कवितेचा प्रमोद जोगळेकरांनी केलेला उत्कृष्ट भावानुवाद झैफबद्दल आस्था निर्माण करतो. पुढे मूळ पुस्तकाच्या संपादकांनी लिहिलेला प्रदीर्घ परिचयपर लेख आहे. त्यात झैफचे कंदहार शहराशी, त्या शहराचे अफगाण इतिहासाशी, त्या शहरात जन्मलेल्या तालिबान चळवळीच्या मूळच्या व नंतर बदलत गेलेल्या स्वरूपाचे त्या अभागी देशातल्या रक्तरंजित संघर्षांशी असणारे जवळचे नाते उलगडून सांगितले आहे. त्यापाठोपाठ असलेली पुस्तकातील पात्रांची यादी वैशिष्टय़पूर्ण आहे. त्यानंतर न्यू यॉर्क विद्यापीठातील ‘आंतरराष्ट्रीय सहकार्य केंद्रा’तील एक तज्ज्ञ बार्नेट रुबिन यांची प्रस्तावना थोडक्यात झैफच्या या आत्मकथनाचे महत्त्व स्पष्ट करते. पाठोपाठ वाचायला मिळते खुद्द झैफची भूमिका. या नऊ पानी निवेदनात ज्या चार कारणांसाठी तो हे आत्मकथन लिहायला तयार झाला, त्या कारणांचे स्पष्टीकरण मिळते. यापुढील मुख्य पुस्तकाच्या २२ प्रकरणांमध्ये झैफने अफगाणिस्तानातील संघर्षांचे असंख्य कंगोरे उलगडून दाखवले आहेत. त्या निवेदनात त्याच्या वैयक्तिक जीवनाचे उभे-आडवे धागे असे विणले गेले आहेत, की हे पुस्तक एकाच वेळी दोन स्तरांवरील घटनाचक्राचे बहुमिती चित्रण करते आहे असे आपल्याला जाणवते. आपण त्यात अधिकाधिक गुंतत जातो. असंख्य प्रसंगांतले थरारनाटय़ पोहचवण्यात अनुवादक चांगलेच यशस्वी झाले आहेत. प्रत्येक पानावरील मजकुराशी संबंधित संपादकीय टिपा त्याच पानावर तळटिपांच्या स्वरूपात वाचायला मिळत असल्यानेही वाचकांची बरीच सोय झाली आहे. अफगाणिस्तानच्या भू-सामरिक महत्त्वामुळे गेली कित्येक दशके तो देश बडय़ा देशांच्या सत्तासंघर्षांत तर पिसला गेला आहेच; परंतु प्रत्येक सत्तांतरानंतर सत्ताधारी अफगाण नेत्यांच्या विरोधात काही अफगाण नेते उभे राहिलेच आहेत. या अंतर्गत यादवीमुळे त्या देशात निर्माण झालेली विदारक स्थिती पुस्तकभर एखाद्या पार्श्वभूमीप्रमाणे सतत आपल्याला जाणवत राहते. अफगाणिस्तानातील परस्पर विरोधी गटांपैकी कुणाला तरी हाताशी धरून आपापले राष्ट्रीय स्वार्थाचे घोडे पुढे दामटू पाहणारे अन्य देशांचे नेते झैफच्या संतापाचे लक्ष्य बनावेत यात नवल नाही. परंतु पाकिस्तानचे लष्करशाह जनरल मुशर्रफ यांच्याबद्दल झैफने या पुस्तकात लिहिले आहे, ते अत्यंत महत्त्वाचे आहे. झैफ पाकिस्तानमध्ये तालिबानचा वकील म्हणून काम करत होता, तेव्हा त्याची मुशर्रफ यांच्याशी एकूण चार वेळा भेट झाली होती. त्या चारही भेटींचे अगदी थोडक्यात वर्णन करून झाल्यावर झैफने अवघ्या एका परिच्छेदात मुशर्रफ यांच्या हिडीस राजवटीबद्दल जी आगपाखड केली आहे, ती मुळातूनच वाचण्याजोगी आहे. ‘पाकिस्तान बीफोर एव्हरीथिंग’ या आत्मकथनपर पुस्तकात मुशर्रफ यांनी तालिबान्यांना व इतरही काही मुसलमानांना आपण कसे निर्दयपणाने वागवले, याची कबुली दिली होती. मुशर्रफ यांनी पैशाच्या मोबदल्यात अनेक अफगाण मुजाहिदीनांना अमेरिकेला विकले होते. ते लोक ग्वान्टानामोत खितपत पडले होते. त्या यमयातना भोगाव्या लागलेल्या अफगाणी कैद्यांमध्ये खुद्द अब्दुल झैफचाही समावेश होता आणि तब्बल चार वर्षांच्या तशा तुरुंगवासातून काही मित्रांच्या प्रयत्नांमुळे २००५ साली तो सुटला. हा संदर्भ लक्षात घेतला म्हणजे २०१० साली लिहिलेल्या या आत्मकथनात झैफने ‘मुशर्रफ म्हणजे पाकिस्तानच्या इतिहासाला लागलेला काळा डाग आहे’ असे म्हटल्याबद्दल मुळीच आश्चर्य वाटत नाही. मुशर्रफना ‘इस्लामशी गद्दारी करणारा ढोंगी, क्रूर नेता’ असे म्हणणारा झैफ अमेरिकेवरील विध्वंसक हल्ल्याबद्दल चुकूनही पश्चात्ताप व्यक्त करत नाही, हेही लक्षात घेण्याजोगे आहे. इस्लामचा नारा देत पुढे सरसावणारे सर्व जण एकाच झेंडय़ाखाली एकत्र उभे ठाकत नाहीत. त्या झुंडीत अनेक जण आपापले स्वतंत्र झेंडे मिरवत पुढे घुसण्याच्या प्रयत्नात असतात, हे वास्तव झैफच्या आत्मकथनामुळेही पुन्हा प्रकर्षांने पुढे येते. असे अनेक मुद्दे विचारासाठी समोर येत जातात आणि तालिबान हे प्रकरण कसे आणि का जगावेगळे आहे, हे हळूहळू समजू लागते. हे या आत्मकथनाचे यश आहे. -आनंद हर्डीकर ...Read more

  • Rating StarLOKPRABHA - APRIL 2018

    अफगाणींच्या नजरेतून तालिबान!... आज इस्लामिक स्टेट किंवा आयसिसबद्दल जे लिहिले बोलले जात आहे तेच काही वर्षांपूर्वी तालिबानबद्दल होत होते. वास्तविक तालिब म्हणजे धार्मिक शिक्षण घेणारा विद्यार्थी. तालिबचे अनेकवचन तालिबान. पण गणित इतके साधेसोपे राहिले नाह. अफगाणिस्तान-पाकिस्तान या प्रदेशातील सत्तासंघर्ष, त्यात अमेरिका, रशियासारख्या महासत्तांचा हस्तक्षेप, या संघर्षाला लाभलेली कट्टर धार्मिक किनार यातून ते प्रकरण अधिकच चिघळत गेले. आज तालिबान म्हटले की अनेकांना आठवते ती एक क्रूर, जुलुमी राजवट. तिने अफगाणिस्तान-पाकिस्तान या प्रदेशातील जनजीवन तर बदलून टाकलेच. पण ९/११ च्या अमेरिकेतील अफगाणिस्तानात चालवलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेमुळे त्याला जागतिक परिणामही प्राप्त झाले. अखेर तालिबानचा भर थेडा ओसरू लागला आणि त्यांच्याशी संबंधित साहित्य प्रसिद्ध होऊ लागले. त्यातून नेहमीच्या वार्तांकनाच्या पलिकडील अफगाणिस्तान आणि तेथील लोकजीवन बाहेरील जगाला कळू लागले. अशा पुस्तकांच्या बहुतांशी इंग्रजी आवृत्ती प्रथम बाजारात येऊ लागल्या. आता त्यातील बरेचसे साहित्य मराठीतही अनुवादित होत आहे. त्यात मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेली ‘द तालिबान क्रिकेट क्लब’ आणि ‘माझे तालिबानी दिवस’ ही दोन पुस्तके वाचनीय आहेत. आणि ‘माझे तालिबानी दिवस’ हे पुस्तक ‘माय लाइफ विथ द तालिबान’ या इंग्रजी पुस्तकाचा डॉ. प्रमोद जोगळेकर यांनी केलेला मराठी अनुवाद आहे. मूळ पुस्तक अलेक्स स्ट्रिक्स व्हान लिन्शोटेन आणि फेलिक्स क्यून यांनी लिहिले आहे. त्यात अब्दुल सलाम झैफ या माजी तालिबानीची हकिकत आहे. तर ‘द तालिबानी क्रिकेट क्लब’ या पुस्तकाचे मूळ लेखक तिमिरी मुरारी. त्याचा अनुवाद केला आहे अमृता दुर्वे यांनी आणि पुस्तकाचे मूळ नाव तसेच ठेवले आहे. यामध्ये रुख्साना नावाच्या अफगाण मुलीची कथा आहे. कथेला पार्श्वभूमी आहे ती तालिबानने प्रतिमावर्धनासाठी भरवलेल्या क्रिकेट सामन्यांची. या दोन्ही पुस्तकांना एकाच विषयाची पार्श्वभूमी असली तरी त्यातून तालिबान आणि अफगाण जीवनाचे वेगवेगळे कंगोरे वाचकांसमोर येतात. डॉ. प्रमोद जोगळेकर तसेच अमृता दुर्वे या दोघांनीही या दोन्ही पुस्तकांचा अनुवाद चांगला केला आहे. त्यामुळे ओघवत्या भाषेतील ही पुस्तके वाचनीय झाली आहेत. सोव्हिएत रशियाने १९७९ साली अफगाणिस्तानामधील साम्यवादी सरकारला पाठिंबा देण्याच्या मिषाने तेथे अतिक्रमण केले आणि पुढील दशकभर तेथे तळ ठोकला. सोव्हिएत आक्रमणाला प्रतिकार करण्यासाठी स्थानिक मुजाहिद्दीन लढवय्ये हाती शस्त्र घेऊन उभे ठाकले. त्यांना अमेरिकेने भरपूर मदत केली. अमेरिकेच्या सीआयए या हेरसंस्थेकडून पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस इटेलिजन्स (आयएसआय) या संस्थेच्या माध्यमातून मुजाहिद्दींनांना पैसा आणि शस्त्रांचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा झाला. त्यात पाकिस्ताननेही हात धुवून घेतला. अफगाण-पाकिस्तान सीमेवर असलेल्या निर्वासित छावण्या, मदरसे यातून मुजाहिद्दीनांची भरती होऊन त्यांना तेथील तळांवर प्रशिक्षण दिले गेले. अ‍ेखर १९८९ साली सोव्हिएत रशियाने अफगाणिस्तानातून माघार घेतली. त्यानंतर तेथे अनेक वर्षे सत्तासंघर्ष सुरू होता. देशाचे विविध भाग वेगवेगळ्या गटांच्या प्रभावाखाली होते. त्याच दरम्यान पाकिस्तानाच्या मदतीने तालिबान प्रबळ बनत गेले. १९९६ साली तालिबानने अफगाणिस्तानच्या बहुतांश भूभागावर सत्ता स्थापन केली. त्यानंतर २००१ सालापर्यंत तेथे तालिबानची सत्ता होती. या काळात तालिबानने तेथे शरियतवर आधारित कट्टर इस्लामी राजवट स्थापित केली. त्यात व्यक्तिस्वातंत्र्याचा लोप पावला. पुरुषांना दाढी राखणे, पाच वेळा नमाझ अदा करणे, सक्तीचे झाले. फुटबॉल सामने, सिनेमा यावर बंदी आली. स्त्रियांचे जिणे तर आणखीच हालाखीचे बनले. बुरख्याच्या आणि बंद दारांच्या आड त्यांचे जीवन होरपळले जाऊ लागले. या नियमांचा थोडा जरी भंग झाला तरी भर मैदानात डोक्यात गोळ्या घालून मरण ठरलेले. २००१ साली अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवरवर हल्ला झाला आणि अमेरिकेने अफगाणिस्तानात दहशतवादविरोधी मोहीम सुरू केली. त्यानंतर तालिबानचे दिवस फिरले. पण त्या संघर्षात संपूर्ण देशाच्या पायाभूत व्यवस्थांचे, जनजीवनाचे धिंडवडे निघाले. आजही तेथील जनतेचे वर्तमान होरपळत आहे आणि भविष्य झाकोळले आहे. बाहेरील जगासाठी अफगाणिस्तान-पाकिस्तान हा प्रदेश म्हणजे दहशतवादाचा मूलस्रोत आहे. पण तेथील स्थानिकांच्या दृष्टीतून तो प्रदेश कसा आहे, याचे थोडे फार दर्शन ‘माझे तालिबानी दिवस’ या पुस्तकातून घडते. अब्दुल सलाम झैफ हा तालिबानचा पाकिस्तानमधील वकील होता. दक्षिण अफगाणिस्तानमध्ये १९६८ साली त्याचा जन्म झाला. सोव्हिएत रशियाविरुद्धच्या लढ्यात तो मुजाहिद्दीन म्हणून लढला. थालिबान राजवटीत त्याने विविध पदांवर प्रशासकीय काम केले. ११ सप्टेंबर २००१ च्या अमेरिकेतील हल्ल्यानंतर त्याला पकडून ग्वांटानामो तुरूंगात ठेवण्यात आले. २००५ साली सुटका झाल्यापासून तो सार्वजनिक जीवनात सक्रिय असून अमेरिकेच्या पाठिंब्यावर सत्तेत आलेल्या हमीद करझाई सरकारवर टीका करण्यासाठी प्रसिद्ध आहे. तो सध्या काबुलमध्ये राहतो. त्याच्या मते परदेशी फौजा त्यांच्या फायद्यासाठी अफगाणिस्तानमध्ये घुसल्या. त्यांनी तेथील लोकांवर बॉम्बहल्ले केले. त्यात अनेक निष्पाप नागरिक मारले गेले. आमच्या देशाचा विनाश केला. त्याविरुद्ध शस्त्र उचलल्यावर आम्हीच गुन्हेगार ठरलो. आता पुन्हा आमच्या मरणयातना सुरू आहेत. अमेरिका आणि युरोपच्या नागरिकांना जगण्याचा जितका अधिकार आहे तितकाच तो येथील नागरिकांनाही आहे. आमच्या नागरिकांनाही त्यांचे धार्मिक आणि अन्य प्रकारचे स्वातंत्र्य प्रिय आहे. आमची संस्कृतीही महत्त्वाची आहे आणि ती टिकली पाहिजे, हे सांगण्याच्या भावनेतून त्याने लिखाण केले आहे. त्यातून तालिबानच्या दुष्कृत्यांचे परिमार्जन होत नसले तरी संघर्षाची दुसरी बाजूही वाचकांसमोर येते. झैफचे त्याच्या भूमीवर नितांत प्रेम आहे. तेथील संस्कृतीचा परकीयांकडून झालेला नाश त्याला पाहावत नाही. त्यांचे हाल त्याला अस्वस्थ करतात. संघर्षग्रस्त नागरिक शेजारील पाकिस्तानमधील निर्वासितांच्या छावण्यात आश्रय घेतात. आंतरराष्ट्रीय राजकारण्याच्या वेढ्यात अडकून आणि जिहादच्या कल्पनांना भुलून सशस्त्र लढ्याचे प्रशिक्षण घेतात. त्यानंतर केलेल्या कारवाया, सोव्हिएत संघाचे परतणे, त्यानंतरची सत्तापोकळी, त्यातील गटागटांचे संघर्ष, मग तालिबानची सरशी, त्यावेळचे बदललेले जीवन, राजकारणात भूमिका बजावण्याची मिळालेली संधी आदी बाबींचे वर्णन झैफ करतो. तसेच २००१ च्या अमेरिकेतील हल्ल्यानंतर अमेरिका चवताळून परत हल्ला करणार हेही त्याच्या नजरेतून सुटत नाही. पर्ल हार्बरवरील हल्ल्यानंतर जशी अमेरिका चवताळून उठली आणि हिरोशिमा, नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले, तसेच हल्ले अफगाणिस्तानावर होतील हे तो साथीदारांना पटवून देण्याचा प्रयत्न करतो, आदी वर्णन वाचनीय आहे. मात्र झैफची बाजू वाचकांना पूर्णपणे पटेलच असे नाही. त्याचे कथन बरेच सरळ असले तरी त्याने काही गोष्टी चतुराईने लपवलेल्या आहे आणि काही कृतींचे समर्थन करण्यासाठी इस्लामचा आधार घेतला आहे. इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण करून ते कंदहारला नेण्याच्या घटनेबाबत तो काहीच बोलत नाही. धर्माच्या बाबतीत तालिबानी इतके कट्टर का वागतात हे कदाचित या पुस्तकातून समजू शकेल. बामियानाच्या बुद्धमूर्ती उद्ध्वस्त केल्यानंतर त्याचे त्यांना काहीच वाटत नाही किंवा त्यात चूक आहे वाटत नाही, कारण आपला धर्म आणि त्याचा ग्रंथ याशिवाय वेगळं मत किंवा त्याच्यापलीकडे सत्य असूच शकत नाही, अशी त्यांची कडवी भूमिका आहे. याचा संघर्षाचा आणखी एक कंगोरा ‘द तालिबान क्रिकेट क्लब’ या पुस्तकातून पुढे येतो. रुख्साना ही अफगाण तरुणी काबूल डेली नावाच्या वर्तमानपत्रात पत्रकार म्हणून काम करत असते. घरी आजारी म्हातारी आई आणि धाकटा भाऊ जहानची जिवापाड काळजी घेत असते. पण तालिबानच्या राजवटीत रुख्सानाचं आयुष्य एका वेगळ्याच वादळात सापडतं. त्याच वेळी अफगाणिस्तानची आणि तालिबानची प्रतिमा जगात चांगली करण्यासाठी तालिबानी क्रिकेट सामने भरवण्याची घोषणा करतात. जिंकणारा संघ पाकिस्तानामध्ये प्रशिक्षणासाठी जाणार आणि अफगाणिस्तानाचं जगभरात प्रतिनिधित्व करणार असतो. थालिबान हा खेळ खऱ्या नियमांनुसार, सचोटीने कधीच होऊ देणार नाही याची रुख्सानाला खात्री आहे. टीम तयार करण्याची सर्वांना मुभा आहे. पण अफगाणिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्याचा अनुभव कोणलाच नाही. याला अपवाद म्हणजे रुख्साना. ती दिल्लीत असताना क्रिकेट खेळली आहे. यातून जे नाट्य आणि ताणतणाव निर्माण होतात त्यांचे दर्शन या पुस्तकात होतेच पण त्या अनुषंगाने अफगाण जीवनाची दाहकताही समोर येते. रुख्सानाला तिच्या भावाला व इतरांना क्रिकेट शिकवायचे असते. पण तालिबानी राजवटीत मुलींनी बुरखा काढणे किंवा घराबाहेर पडणेही मुश्कील. तेव्हा हे जमवण्याची कसरत तिला करावी लागते. त्यासाठी वेश बदलणे, पुरुषांप्रमाणे वागणे, प्रसंगी खोटी दाढी लावणे अशा क्ऌप्त्या लढवाव्या लागतात. या सगळ्या प्रयत्नांतून या पात्राने उभ्या केलेल्या अडचणी ओलांडतना तिचा जीव मेटाकुटीला येतो. त्यातच तिच्या दिल्लीतील वास्तव्यात जुळलेल्या प्रेमसंबंधांच्या कथानकाचीही जोड आहे. क्रिकेट हा त्यांच्यासाठी केवळ एक खेळ उरत नाही. थर या सर्व परिस्थितीतून मार्ग काढण्याठी, स्वातंत्र्याची अनुभूती देणारा मार्ग ठरतो. पण तोही किती आश्वासक ठरतो हे मुळातच वाचले पाहिजे. तिमिरी मुरारी हे मूळचे भारतीय, पण गेली अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय पत्रकारितेत वावरत आहेत. त्यांच्या अनुभवातून मूळ पुस्तक साकारले आहे. त्याचे तितकेच प्रवाही आणि परिणामकारक सार अनुवादात उतरले आहे. ‘माझे तालिबानी दिवस’ ही तसेच उद्बोधक आहे. ही दोन्ही पुस्तके अफगाणिस्तान विषयी अधिक जाणून घेऊ इच्छिणाऱ्या वाचकांसाठी उपयुक्त आहेत. या दोन्ही पुस्तकांना जशी ऐतिहासिक आणि जागतिक राजकारणाची पार्श्वभूमी आहे, तसाच मोठा भौगोलिक कॅन्व्हासही लाभला आहे. अफगाणिस्तान-पाकिस्तान या प्रदेशातील घडामोडींपासून भारत आपल्याला अलग ठेवू शकत नाही. एके काळी अफगाणिस्तानशी भारताचे खूप सौहार्दपूर्ण संबंध होते. ते आताही तसे असले तरी तेथील परिस्थिती बदलली आहे. रशिया आणि अमेरिकेच्या माघारीनंतर आता पाकिस्तान तेथे आपले हात-पाय पसरत आहे. अफगाणिस्तानमधील भारतीय हितसंबंधांना बाधा निर्माण करत आहे. तसेच तेथील दहशतवाद भारतात पसरत आहे. अफगाणिस्तानात नेमके काय चालते हे कुतूहल वाढते आहे. अशा स्थितीत या पुस्तकांचे भारताच्या दृष्टीने महत्त्व आणखी वाढते. -सचिन दिवाण ...Read more

  • Rating Starतरुण भारत, ११ फेब्रुवारी 2018

    साम्यवादी सोव्हिएत रशिया या भांडवलशाहीचा पुरस्कर्ता अमेरिका एकमेकांचे कट्टर शत्रू. यांच्या एकमेकांविरुद्ध कारवाया जगाच्या सारीपाटावर धुमाकूळ घालतात. त्यात छोटे देश ओढले गेले तर त्यांचा चुथडा होतो. गेल्या चाळीस वर्षात असा चुथडा झालेला देश म्हणजे अफगाणस्तान. झैफ हा अफगाणी. त्याचे शिक्षण मदरसा म्हणजे धार्मिक शिक्षण देणारी शाळा त्यात झाले. तालिबमध्ये शिकला तो तालिबान. त्यात जहाल व मवाळ असे दोन पंथ. झैफ हा मवाळ विचारसरणीचा. अमेरिकेच्या दृष्टीने पाकिस्तान, त्यातील बलुचिस्तान हा भाग आणि रेगिस्तानचा वाळवंट पार केल्यानंतरचा अफगाणिस्तान हे स्ट्रॅटेजिक पॉइंटनरचे राजकीय व भौगोलिक या दृष्टीने महत्त्वाचे देश. अफगाणिस्तान हा एकीकडे इराण, दुसरया बाजूने कझाक आणि तेथून यू.एस.एस.आर. सुरू होतो म्हणून पाकिस्तान महत्त्वाचा ठरतो. पाक व अमेरिका यात मैत्र निर्माण झाले ते यामुळे. कालची महासत्ता रशिया व उद्यांची महासत्ता चीन यावर लक्ष ठेवण्यासाठी पाकिस्तान हा सोईस्कर देश. अमेरिका बंद मुठीने पैसा व लष्करी साहित्य पाकला पुरवते त्याचे हे रहस्य आहे. अफगाणिस्तान १९७८ ला राज्यक्रांती होऊन तिथे साम्यवादी सरकार आले. अर्थातच या सरकारने धडाक्याने अतिरिक्त शेतजमिनी व संपत्ती जप्त करून गरजू लोकांना त्या वाटणे वगैरे कार्यक्रम सुरू केले. दडपशाही व मुस्कटबाजी सुरू झाली. अटकसत्र सुरू झाले. तालिबानांच्या अटकसत्रांना जोर चढला. अर्थातच मुजाहिद्दिन त्याविरुद्ध उभे राहिले. मुजाहिद्दीन म्हणजे पवित्र योद्धा, जिहादमध्ये भाग घेणार वीर. कुफ्र म्हणजे अश्रद्ध. साम्यवादी सरकार तालिबानांच्या व मुजाहिद्दीनांच्या दृष्टीने कुफ्र होते. इथल्या साम्यवादी सरकारला मदत करण्यासाठी रशियाने १९७९ मध्ये ८५००० सैनिक, रणगाडे व लष्करी सामुग्री अफगाणात पाठवली. इथल्या साम्यवादी सरकारने रेगिस्तानमध्ये मुजाहिद्दीनांना चिरडण्यासाठी विमाने पाठवली. झैफ व त्यांची भांवडे ही पोरकी होती. आई वारली तेव्हा झैफ सात महिन्यांचा होता. झैफ सात वर्षाचा असताना त्याचे वडील वारले. नातेवाइकांनी या मुलांचे पालनपोषण केले. १९७९ ते १९९८ हा कालखंड यादवी व अंतर्गत विध्वंसाचा. कंदाहार या शहराचे पार वाटोळे झाले. मुळात अफगाणांत अनेक वंश, कुल, जमाती (त्या उपजमातीही) मानापमानाच्या भावना तीव्र. अपमानाचा सूड घेण्याची प्रवृत्ती. त्यात बॉबिंग, घातपात, हत्या, घरदार देश सोडून जगण्यासाठी पाकिस्तानात जाणे यांचा कहर झाला. पाकने या निर्वासितांसाठी छावण्या उभ्या केल्या. अगदी रेगिस्तानमध्येही. पाणी नाही, छाया नाही, रस्ते नाहीत अशा ठिकाणी छावण्या. वाळवंटात सापांची व विंचवांची बिळे असत. १९९० ला रशियाने सैन्य मागे मागे घेतले. १९९१ ला कंदाहारमध्ये जबरदस्त भूंकप झाला. पुढे नबीबुल्ला सरकारचा पाडाव झाला. तालिबानीनी कंदहार, हेरात, काबूलवर ताबा मिळवला. १९९७ ला ओसामा बिन लादेन सुदानहून अफगाणिस्तानात आला. १९९६ पासून झैफला जबाबदारीची अनेक कामे करण्याची संधी मिळाली. मुल्ला उमरचा त्याने विश्वास संपादन केला. प्रशासकीय संचालक, प्रभार संरक्षणमंत्री, खाण व उद्योग मंत्री वाहतूक आयोगावर नेमणूक आणि २००० मध्ये पाकिस्तानात वकील म्हणून नेमणूक झाली. तिथे त्यांनी विस्थापित व निर्वासितांचे प्रश्न मार्गी लावले. ओसामा हा सौदी अरेबियाचा नागरिक-ओसामा जिहादच्या काळात अफगाणिस्तानमध्ये स्थिरावला. नंतर सुदानमध्ये अतिरेकी व दहशतवादी यांची संघटना बांधली. १९९६ ला तो अफगाणिस्तानात परतला. अनेक दहशतवादी हल्ल्यांच्या योजना आखल्या व पार पाडल्या. दहशतवादाचा हा प्रमुख सूत्रधार ११ सप्टेंबर २००१ ला वर्ल्ड ट्रेंड सेंटरवर हल्ला झाला तो कट ओसामाने आखला होता. ओसामा बिन लादेनला अमेरिकेने मुख्य आरोपी म्हणून जाहीर केले. तालिबानांचा पाडाव झाल्यावर आणि अमेरिकेने प्रचंड दडपण आणल्यावर तो फरारी झाला. परंतु त्याने अफगाणिस्तानी डोंगराळ भागात गुहांमध्ये आसरा घेतल्याचा अमेरिकेला संशय आला. या डोंगराळ भागात ओसामाने गुहांचा चक्रव्यूह उभारला होता. झैफ या काळात पाकिस्तानमध्ये अफगाण वकील म्हणून कार्यरत होता. पाकिस्तानी सरकार त्याला सहन करीत होते पण सहकार्य देत नव्हते. तरीही झैफ कामे निपटत होता. अमेरिकेने वर्ल्ड ट्रेंड सेंटरवर झालेला हल्ला हा प्रतिष्ठेचा प्रश्न बनवला होता. १८१२ ला ब्रिटिशांचा निर्णायक पराभव करून अमेरिका संकटमुक्त झाल्यापासून १९१४ ते १९१८ व १९३९ ते १९४५ अशी महायुद्धे झाली तरी अमेरिका कधी युद्धभूमी झाली नव्हती. अपवाद दोनच. जपानने पर्ल हार्बरवर केलेला हल्ला व वर्ल्ड ट्रेड सेंटरवरचा लोदनरचित हल्ला. नाटोची फौज अफगाणिस्तानात आली. तो कालखंड अमेरिकन सैनिकांच्या अरेरावीचा होता. (शेवटी लादेनने पाकिस्तानात अबोटाबादेत आसरा घेतला. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय दडपण असूनही लादेनचे पाकिस्तानमधील वास्तव्य मान्य केले नाही. अमेरिकेच्या निवडक कमांडोंच्या सील पथकाने पाकिस्तानात अबोटाबादमध्ये जाऊन लादेनचा खात्मा केलेला जगाने पाहिला. आता अमेरिकेला दहशतवाद हे केवढे जागतिक संकट आहे याचा प्रत्यक्ष अनुभव आला होता. २००१ ला खुद्द झैफला दहशतवादी गटांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली. नंतर झैफला वर्षभरात अमेरिकन सरकारच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर त्याला कुख्यात ग्वान्टानामो या तुरुंगात सडवण्यात आले. चार वर्षांनंतर झैफ सुटला. आता तो काबूलमध्ये असतो. झैफचे हे आत्मकथन बरेचसे प्राजंळ आहे. मात्र तालिबानी सरकारने स्त्रीचे शिक्षण विषयक हक्क नाकारले, नोकऱ्या करायला बंदी घातली, कडवेपणाने कारभार केला याबद्दल झैफ काही बोलत नाही. कदाचित असेही असेल की माणसाला स्वतःबद्दल पूर्ण सत्य सांगणे कठीण जात असेल. पण तरीही झैफचे आत्मकथन हे महत्त्वाचे पुस्तक आहे. एका देशाचा ऐतिहासिक आढावा त्यात आहे आणि अफगाण संस्कृतीची झलक त्यात व्यक्त होते. मेहता पब्लिशिंग हाऊसने या आत्मकथनाचा डॉ. प्रमोद जोगळेकर कृत सुरेख अनुवाद उपलब्ध करून दिला त्याबद्दल मराठी वाचक त्यांना धन्यवाद देईल. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 18-02-2018

    एका दुर्दैवी देशाची कहाणी... जागतिक राजकारणाचे धागेदोरे फार किचकट असतात; मात्र या राजकारणात अनेक देश अक्षरश: होरपळून निघतात. आपला फायदा असलेल्या देशांना जणू अंकित केलं जातं. आर्थिक-लष्करी किंवा अन्य मार्गांनी या देशांना आपल्या कच्छपी लावण्याचा उद्यो केला जातो. असाच एक होरपळणारा देश म्हणजे अफगाणिस्तान. महासत्तांच्या कात्रीत सापडलेला हा देश गेली कित्येक वर्षं यादवी युद्धानं भाजून निघतोय. तत्कालीन सोव्हिएत महासंघानं या देशात घुसखोरी केल्यावर सुरू झालेलं नष्टचर्य तीस वर्षांनंतरही संपलेलं नाही. सोव्हिएत महासंघाविरुद्ध प्रदीर्घ लढा देऊन त्यांना माघार घ्यायला लावल्यावर तरी शांतता प्रस्थापित होईल अशी आशा होती; पण यादवी युद्धानं ती फोल ठरवली. या युद्धातून ‘तालिबान’चा उदय झाला. त्यांनी सुमारे सहा वर्षं अफगाणिस्तानवर राज्य केलं; पण अमेरिकेच्या हल्ल्यापुढं त्यांना माघार घ्यावी लागली. मात्र, ते अद्याप पूर्ण संपले नाहीत. ‘तालिबान’विषयी सगळ्या जगालाच कुतूहल आहे. त्यांची कार्यपद्धती, त्यांचे नेते, त्यांची राजवट याबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही. काही पाश्चात्य लेखकांनी अफगाणिस्तानला भेटी देऊन केलेलं लेखन हाच काय तो माहिती मिळवण्याचा मार्ग; पण कोवळ्या वयापासूनच जिहादी लढवय्या (मुजाहिदीन) झालेला, अनेक कारवायांत भाग घेतलेला आणि नंतर त्यांचे सरकार आल्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळलेल्या मुल्ला अब्दुल सलाम झैफ यांचं ‘माझे तालिबानी दिवस’ हे पुस्तक वाचकांच्या भेटीला आलं आहे. मुल्ला अब्दुल सलाम झैफ यानं ‘तालिबान’चा पाकिस्तानातला वकील म्हणून काम केलं. नंतर तो कुख्यात ग्वांटानामो बे इथल्या तुरुंगातही होता. भरपूर छळानंतर पुढे त्याची सुटका झाली. मुल्ला झैफ सध्या काबूलमध्ये राहतो आणि विद्यमान सरकारचा कडवा टीकाकार म्हणून तो प्रसिद्ध आहे. My Life With Taliban या मूळ इंग्लिश पुस्तकाचं संपादन अलेक्स स्ट्रिक व्हान लिन्शोटेन आणि फेलिक्स क्यून यांनी केलं असून, डॉ. प्रमोद जोगळेकर यांनी त्याचा सरस अनुवाद केला आहे. सोव्हिएत महासंघाची घुसखोरी होण्यापूर्वी अफगाणिस्तानातली स्थिती बरीच चांगली होती; पण १९७८ मध्ये झालेल्या क्रांतीनंतर साम्यवादी राजवट आली आणि तिच्या नावाखाली सोव्हिएत महासंघांनं १९७९मध्ये अफगाणिस्तानात रणगाडे घुसवले. त्यानंतर सुरू झाला संघर्ष. अफगाणिस्तान हा टोळीसत्ताक देश असल्यानं विविध भागांत वेगवेगळ्या गटांनी सोव्हिएत महासंघाविरुद्ध संघर्ष सुरू केला. त्याचे परिणाम, देशात ‘तालिबान’ची सत्ता येणं, त्यांची कार्यपद्धती या सगळ्याची कहाणी या पुस्तकात आहे. मात्र, ‘तालिबान’ राजवटीतल्या वादग्रस्त निर्णयांबाबत, त्यांच्या कार्यपद्धतीबाबत मुल्ला झैफ काही बोलत नाही. पुस्तकाच्या पहिल्या भागात तो आपलं बालपण आणि देशातल्या परिस्थितीबाबत माहिती देतो. मुल्ला झैफचा जन्म १९६८ मधला. त्याचे वडील अभ्यासक होते. लहानपणापासून झैफनं कायम गरिबीच बघितली; पण तो त्याची तक्रार करत नाही. गरीब असले, तरी वडिलांनी मुलांच्या शिक्षणात अडथळे येऊ दिले नाहीत. स्वत: झैफही शिक्षणात रमणारा होता आणि आजही आहे. हलाखीत दिवस जात असताना १९७८ मध्ये साम्यवादी क्रांती झाली आणि देशाचं चित्र बदलू लागलं. सोव्हिएत महासंघाच्या घुसखोरीनंतर संघर्षाला प्रारंभ झाला. याच काळात झैफनं पाकिस्तानात पलायन केलं. मात्र, त्यानं शिक्षणात खंड पडू दिला नाही. हे सुरू असताना १९८३ मध्ये झैफ प्रथम जिहादमध्ये सहभागी झाला. नंतर त्याचं पाकिस्तान-अफगाणिस्तान असं येणं-जाणं सुरू राहिलं. अफगाणिस्तानात लढताना दमछाक झालेल्या सोव्हिएत महासंघानं १९८९ मध्ये सैन्य माघारी घेतलं; पण त्यांची जागा विविध टोळ्यांच्या नेत्यांनी घेतली आणि रक्तपात सुरूच राहिला. १९९४ मध्ये ‘तालिबान’नं कंदहार शहराचा ताबा घेत राजवट सुरू केली. राजधानी काबूल असली, तरी या सरकारचे सर्व महत्त्वाचे निर्णय कंदहारामधून होत असत. कंदहारमध्ये झैफनं तालिबानच्या न्यायालयात कामाला सुरुवात केली. पुढे त्याच्यावर विविध जबाबदाऱ्या येत गेल्या. त्यात सरकारी कार्यालयातल्या कामांचाही समावेश होता. पाश्चात्य देश समजतात तसं ‘तालिबान’ नव्हतं. त्यांची एक कार्यपद्धती होती, असा दावा तो करतो. मुल्ला झैफ यानं स्वत: सरकारी कार्यालयात काम करून तिथं शिस्त आणली. मात्र, आर्थिक तंगीमुळे आणि जागतिक निर्बंधांमुळे सुधारणा किंवा प्रगतीला मर्यादा पडल्याचं तो मान्य करतो. मुल्ला झैफ याच्यावरची सर्वांत मोठी जबाबदारी म्हणजे पाकिस्तानमध्ये वकील म्हणून काम करणं. ‘तालिबान’च्या राजवटीला सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि पाकिस्तान या तीनच देशांची मान्यता होती. त्यातही पाकिस्तान हा शेजारी असल्यामुळं तिथं वकील म्हणून काम करणं ही जबाबदारी फार नाजूक होती. या काळातल्या पाकिस्तानातल्या मुशर्रफ राजवटीचं झैफनं वर्णन केलं आहे. अमेरिकेच्या भूमिकेवरही तो संताप व्यक्त करतो. वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यानंतर (९/११) ओसामा बिन लादेनवर प्रकाशझोत वळला. या सगळ्या काळात तो विविध देशांच्या राजदूतांच्या संपर्कातही होता. स्थिती बिघडत असताना आणि ‘आयएसआय’च्या कचाट्यातून पळून जाण्याची संधी असतानाही झैफ पाकिस्तानातच राहिला आणि त्याची परिणती ग्वांटानामो बे तुरुंगात जाण्यात झाली. ‘आजचा अफगाणिस्तान’ या शेवटच्या प्रकरणात एकूण सगळ्या घटनांचा उहापोह असून, झैफ त्याच्या देशाचं भवितव्य सांगतो. अफगाण संघर्षात केवळ स्थानिक नागरिकच गुंतले नव्हते, तर पाकिस्तानपासून मध्य आशियापर्यंत आणि पार युरोप-अमेरिकेपर्यंतच्या नेत्यांचा त्यात संबंध असल्यानं या पुस्तकाचा आवाका मोठा आहे. अफगाणिस्तानवर प्रभाव टाकणाऱ्या नेत्यांबरोबर जागतिक नेत्यांचाही त्यात समावेश आहे. संबंधित प्रकरणांत डॉ. प्रमोद जोगळेकर यांनी तळटीपा दिल्या आहेत, त्यामुळं संदर्भ लगेच समजतात. अफगाणिस्तानबाबत आणखी काही वाचू इच्छिणाऱ्यांसाठी शेवटी आणखी काही संदर्भही दिले आहेत. अफगाणिस्तानविषयी कुतूहल असणाऱ्यांसाठी हे पुस्तक फार उपयुक्त ठरणारं आहे यात शंका नाही. –उदय हर्डीकर ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more