- श्री. अविनाश मणेरीकर
`संपत पाल` या उत्तर प्रदेशातील `गडरिया` या धनगर जातीतील एका स्त्रीची ही आत्मकथा आहे.दुर्बलांवर होणार्या अन्यायाविरुद्ध एकटीने आवाज उठवणारी ही रणरागिणी आहे.एक १२-१३ वर्षाची लहानशी मुलगी न्यायासाठी बंड करत `गुलाबी गँग` या गँगची लीडर कशी बनली याची ही हाणी तिच्याच शब्दांत आहे.विशेष म्हणजे एका फ्रेंच पत्रकार स्त्रीने या तिच्या कहाणीचे मूळ फ्रेंच शब्दांकन केले व त्यानंतर हे आत्मकथन "मेहता पब्लिशिंग हाऊस" कडून सुप्रिया वकील यांनी अनुवादित करुन प्रसिद्ध झाले आहे.खूप सुंदर शब्दांत,ओघवत्या शैलीत व वाचकाला अखेरपर्यंत खिळवून ठेवणारा असा हा अनुवाद प्रेरणादायी आहे.
१९६० मध्ये उत्तर प्रदेशमधील एका दुर्गम खेड्यात रामसरेय नि गुडिया पाल यांच्या पोटी संपत पाल देवी हिचा जन्म झाला.पशुपालन, शेती आणि मातीत घाम गाळून मजुरी हाच या कुटुंबाचा पिढीजात दिनक्रम!त्यामुळे शेतात राबायचं नि घरात चुलीपुढं रांधायचं हा मुलींसाठीचा रिवाज आहे. त्यातूनच शेतात राखणीला जाताना शेतातल्या पायवाटेवरुन मुलांची रांग पाहून संपतलाही उत्सुकता वाटते.त्यामुळेच ती त्या मुलांमागून जाते नि शाळा म्हणजे काय हे लांबूनच पाहते.त्या सार्या दृश्याचा तिच्या मनांवर सकारात्मक परिणाम होऊन ती रोज सगळ्यांच्याच नकळत तिथं जाऊन,लांब आडोशाला बसून ते सारं घोकायला सुरुवात करते. मग कधीतरी आठवड्याने तिच्या काकाला हे समजल्यावर तो तिची शिकण्याची इच्छा पाहून तिचे शाळेत नांव घालतो. तिची शिक्षणातील गोडी,प्रगती पाहून गुरुजीही थक्क होतात. सर्व मुलांमध्ये वरच्या नंबरला ती पोहोचते. तिची ज्ञानतृषा शमतच नाही.एकदा परीक्षेच्यावेळी गुरुजी गृहपाठ देतात तेव्हा "तुमच्या वार्षिक परीक्षेच्या दिवशीच तुमच्या आईवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली,तर तुम्ही काय कराल?" हा प्रश्न विचारतात.त्यावर तिचं उत्तर अशासारखं असतं की,"त्यामुळे मी परीक्षा चुकवणार नाही.माझ्या घरी राहण्याने तिचे प्राण पुन्हा परत येणार नाहीत. मी परीक्षेत नापास झाले तर माझं वर्ष वाया जाईल.आणि मी परीक्षा देऊन येईपर्यंत माझ्या घरचे थांबू शकतात.मी नंतर अंत्यसंस्कारांसाठी जाऊ शकेन!"
संपत देवीचा हा लहान वयातील समंजसपणा, जिद्दी वृत्ती आणि सातत्याने नव्याचा ध्यास हाच संपूर्ण कथनात प्रेरित करणारा विचार आहे.तिचं शिक्षण जेमतेम दोन वर्षच होऊन मग आई-वडील चित्रकूटच्या पर्वतराजीतील हनुमानधरा या डोंगराळ खेड्यात गेल्यानंतर थांबतं.पण ती म्हणते तसं,"आमची परिस्थिती खडतर असली तरी माझं बालपण तुलनेत चिंतामुक्त होतं.माझ्यावर कुणाचं दडपण नव्हतं."
तिच्या बेधडक वागण्याचं,बिनधास्तपणाचं,तसंच अन्यायाविरुद्ध लढण्याचं तिच्या काकांना,वडिलांना कौतुकच होतं.त्यामुळे ती वयाच्या ८-१०व्या वर्षापासूनच आपल्या न्याय्य हक्कांसाठी, मैत्रिणींसाठी शेजार्यांशी, जमीनदारांशी भांडत होती.अशावेळीही तिचे लाडके काका तिच्या पाठीशी असायचे.ती म्हणते,"त्यांचं माझ्या जीवनात खूप महत्त्वाचं स्थान होतं.ते नसते तर, माझी ज्ञानाची तृषा माझ्या वडिलांना कधीच समजली नसती.माझ्या लक्षात येत होतं की, काकांना मी इतरांच्या पुढे जायला हवी आहे.माझ्या संपूर्ण आयुष्यात ते माझ्या लेखी नैतिक आधार बनून राहिले आहेत.त्यांनी माझ्यात अत्यंत महत्त्वाची मूल्यं रुजवली,जी मी आजही मानते."
"कधीही चोरी करुं नये,खोटं बोलूं नये,खोटेपणा सहन करुं नये",असं ते नेहमी सांगायचे.काळाच्या ओघात मी त्यांच्या नियमांची चौकट पूर्णपणे आत्मसात केली आहे. त्यांच्यावाचून अन्यायाविरुद्ध लढा देणारी एकेकाळची ही छोटी मुलगी आज जी न्यायदात्री बनली आहे,तशी कधीच बनूं शकली नसती.
या पुस्तकात तिने वयाच्या बाराव्या वर्षी विवाह झाला,त्यानंतरचे सासरला गेल्यानंतरचे प्रसंग,तिथल्या ब्राह्मण जमीनदाराबरोबर झालेला संघर्ष,नवऱ्याचा गुरु म्हणून घरी येणाऱ्या साधूने लगट करण्याचा प्रयत्न केल्यावर केलेला विरोध,नवऱ्याबरोबरचे कळत नसलेल्या वयांत भोगावे लागलेले प्रसंग याबाबतही मोकळेपणाने मांडले आहे.त्यानंतर आजूबाजूच्या खालच्या जातीतील स्त्री-पुरुषांना जमीनदार,उच्चवर्णीय यांच्यापासून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध ती प्रथम एकटीने व त्यानंतर या सर्व स्त्रियांना संघटित करुन कसा लढा देत आली,त्याचेही वर्णन प्रेरित करणारे आहे.
संपत पालची ही कहाणी तिच्या अन्यायाविरुद्ध एकेका व्यक्तीशी,यंत्रणेशी,घटकांशी लढण्याच्या,शांततेच्या-समजुतीच्या मार्गाने प्रश्न सोडवण्याच्या प्रयत्नांची आहे.पण त्याच बरोबरीने या सार्या प्रवासात सासरची माणसं,जातीतील समाज, गावातील बलाढ्य शक्ती व प्रसंगी नवऱ्याबरोबरही संघर्ष कसा करावा लागला याचे प्रांजल कथन करणारी आहे.ती घरातून बाहेर काढल्यावर शिवणकाम शिकून कपडे शिवून विकणं,भाजीपाला,पान-सुपारी विकणं,शेती करुन धान्य विकणं असे चरितार्थासाठी व्यवसाय करते.या सार्या बरोबरच गावातील स्त्रियांना, अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रधान,पोलीस,सब मॅजिस्ट्रेट या नि अशाच अन्य सरकारी यंत्रणांकडे मोर्चा नेऊन,ठिय्या देऊन, लढा देऊन प्रश्न सोडवण्यासाठी सतत संघर्ष करत राहते.
या तिच्या रोजच्या दैनंदिनीत हळूहळू नवरा, मुले यांचा चरितार्थ चालवणे,मुलांना शिकवण्यासाठी धडपडणे हेही तितक्याच निष्ठेने ती करत राहते.हळूहळू उत्तर प्रदेशातील बुंदेलखंडच्या अनेक खेड्यात `संपत पाल आपल्याला मदत करुं शकते` हा दृढ विश्वास ती गडरिया,चमार,कोल, कहार अशा अस्पृश्य समाजातील सर्वांमध्ये निर्माण करते.या संघर्षात तिची सुपारी देऊन हत्या करण्यासाठी दादा लोक पाठवले जातात,तो प्रसंगही तिच्या धैर्याची परिसीमा दर्शविणारा आहे.
त्यानंतर गावां-गावांतून शिवणक्लास घेऊन,त्या स्त्रियांना संघटित करुन ती स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी झटते.बचतगट स्थापून, त्यांच्या हक्कांसाठी लढते.त्यातच जयप्रकाश म्हणून,अशा स्वयंसेवी संघटनांसाठी काम करणाऱ्या व्यक्तीसह ती पुढील काळात भागीदार म्हणून काम करुं लागते. अशावेळी एका प्रसंगानंतर शहरात तुटपुंज्या मिळकतीवर संघटनेचे कार्य आणि आपला निवास याची व्यवस्था करताना ती या जयप्रकाशच्या म्हणजेच बाबूजींसह एकाच खोलीत राहण्याचा क्रांतिकारी निर्णय घेते. लोकापवाद,अफवा यापलिकडे जाऊन निर्मळ,शुद्ध व्यवहारी व मैत्रीच्या नात्यातून ती नवरा-मुले यांच्यापुढे हे आदर्श नातंही दीर्घकाळ टिकवते.
त्यानंतर पोलीस,बीडिओ,वितरण अधिकारी,सब मॅजिस्ट्रेट यांच्या सार्या भ्रष्टाचारी यंत्रणेविरुद्ध वेळोवेळी आपल्या सहकारी महिलांना घेऊन ती उत्तर प्रदेशच्या अनेक प्रांतात न्याय्य मार्गाने समस्या सोडवणारी रणरागिणी असे नांव मिळवते.मग त्यातूनच या कष्टकरी, खालच्या जमातीमधील स्त्रियांबरोबरच ती अन्यायग्रस्त अशा उच्चवर्णीय,सर्व स्तरातील स्त्री-पुरुषांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत कार्यरत होते.
रोजगार हमी योजना, शिधावाटप योजना, कल्याणकारी योजना यामध्ये चालणारे मोठे घोटाळे आपल्या "गुलाबी गँग" या गुलाबी साडी परिधान करणाऱ्या महिलांच्या संघटनेद्वारा ती उजेडात आणते.सर्वत्र अधिकारीवर्ग,पोलीस अधिकारी,मुख्यमंत्री आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये `संपत पाल` या नावाची चर्चा घडत राहणं, तिला विविध ठिकाणी सभा,मेळावे,आंदोलने यासाठी बोलावणं असा सारा जवळपास ४०-४५ वर्षे ती संघर्ष उभा करते. या तिच्या कार्याची माहिती घेण्यासाठी फ्रान्स,ब्रिटन,अमेरिका अशा विविध देशातून भारतात पत्रकार येतात,पण इथला मिडिया मात्र दखल घेत नाही.एका फ्रेंच पत्रकार स्त्रीने तिला हे पुस्तक लिहायला प्रवृत्त केले आहे.आपल्या शिक्षित लहान भावाला पत्रकारांनी आपल्याबद्दल विचारलं तेव्हा तो "संपतजीचे शिक्षण झालेले नाही,त्यामुळे अशा अडाणी,अस्पृश्य लोकांची ती भाषा समजून घेऊं शकते,त्यांची व्यथा समजून घेऊन ती लढा देते,कारण ती अशिक्षित आहे." असे सांगितले याबद्दल तिच्या मनात अंगार आहे.तोच उच्चशिक्षित भाऊ आई-वडिलांनी ठरवलेल्या अशिक्षित मुलीबरोबर लग्न झाल्यावर तिला घटस्फोट द्यायचा ठरवतो त्यालाही ती बुद्धीचातुर्य व आपल्या कर्तृत्व,करारीपणा नि बळ याच्या जोरावर निर्णय बदलायला भाग पाडते.
भारतातल्या उत्तर प्रदेशसारख्या विशाल राज्यात चित्रकूटच्या पर्वतराजीतील धनगर समाजातील अशिक्षित मुलगी न्याय्य मागण्यांसाठी, अन्यायाविरुद्ध जनसामान्यांसाठी सतत लढा देते,संघर्ष करते नि सासरच्या मारहाणीला बळी पडणाऱ्या स्त्रिया, मालमत्ता लुटली जाणारे गरीब लोक,सवर्णांकडून वाईट वागणूक मिळणारे अस्पृश्य लोक,अन्याय झालेले प्रामाणिक उच्चवर्णीय लोक या साऱ्यांसाठी लढते आणि त्यांना न्याय मिळवून देते.....गरज पडली तर काठीच्या बळानेसुद्धा!हे सारं विलक्षण प्रेरणादायी आणि अचंबा वाटणारं असं कथन आहे.
या पुस्तकात तिने महाभारत,रामायण याचबरोबर राणी लक्ष्मीबाई,कबीर, तुलसीदास,सूरदास यांचे सांगितलेले सिद्धांत थक्क करणारे आहेत.अर्तारा विद्यापीठात "बुंदेलखंड प्रदेशातील राजकीय प्रक्रियेची मानवी बाजू" या विषयावरच्या परिषदेत सहभागी होण्याचे तिला निमंत्रण मिळते तेव्हा तिथे घडलेला एक प्रसंग, सोनिया गांधी राहुल गांधी तिला काँग्रेस पक्षात बोलवण्यासाठी उत्तर प्रदेशाच्या अध्यक्षांना सांगतात तेव्हाचा प्रसंग हे सुशिक्षित आणि उच्चवर्गातील सार्यांना डोळ्यात अंजन घालणारे आहेत.तिची संपूर्ण जीवनकहाणी-तिच्या `गुलाबी गँग` या संघटनेचे अस्तित्व-हे एका अशिक्षित पण संयमी, बेडर,धैर्यवान अशा लढवय्या रणरागिणीचं आजच्या समाज जीवनासमोर आदर्श ठेवणारं असंच आहे!एक आणखी विशेष घटना म्हणजे,"द गार्डियन"ने जगातील शंभर स्फूर्तिदायक स्त्रियांमध्ये "संपत पाल" यांची निवड केली आहे.एक स्त्री अन्यायाविरुद्ध स्त्री संघटन कसे उभारते,कसा यशस्वी लढा देते नि विदेशातही नांव मिळवते याची ही समर्थ,सशक्त कहाणी भावी पिढीतील स्त्रीसाठी...किंबहुना सर्वांसाठीच आदर्शवत अशीच आहे! ...Read more
- अविनाश मणेरीकर,पुणे
`संपत पाल` या उत्तर प्रदेशातील `गडरिया` या धनगर जातीतील एका स्त्रीची ही आत्मकथा आहे.दुर्बलांवर होणार्या अन्यायाविरुद्ध एकटीने आवाज उठवणारी ही रणरागिणी आहे.एक १२-१३ वर्षाची लहानशी मुलगी न्यायासाठी बंड करत `गुलाबी गँग` या गँगची लीडर कशी बनली याची ही हाणी तिच्याच शब्दांत आहे.विशेष म्हणजे एका फ्रेंच पत्रकार स्त्रीने या तिच्या कहाणीचे मूळ फ्रेंच शब्दांकन केले व त्यानंतर हे आत्मकथन "मेहता पब्लिशिंग हाऊस" कडून सुप्रिया वकील यांनी अनुवादित करुन प्रसिद्ध झाले आहे.खूप सुंदर शब्दांत,ओघवत्या शैलीत व वाचकाला अखेरपर्यंत खिळवून ठेवणारा असा हा अनुवाद प्रेरणादायी आहे.
१९६० मध्ये उत्तर प्रदेशमधील एका दुर्गम खेड्यात रामसरेय नि गुडिया पाल यांच्या पोटी संपत पाल देवी हिचा जन्म झाला.पशुपालन, शेती आणि मातीत घाम गाळून मजुरी हाच या कुटुंबाचा पिढीजात दिनक्रम!त्यामुळे शेतात राबायचं नि घरात चुलीपुढं रांधायचं हा मुलींसाठीचा रिवाज आहे. त्यातूनच शेतात राखणीला जाताना शेतातल्या पायवाटेवरुन मुलांची रांग पाहून संपतलाही उत्सुकता वाटते.त्यामुळेच ती त्या मुलांमागून जाते नि शाळा म्हणजे काय हे लांबूनच पाहते.त्या सार्या दृश्याचा तिच्या मनांवर सकारात्मक परिणाम होऊन ती रोज सगळ्यांच्याच नकळत तिथं जाऊन,लांब आडोशाला बसून ते सारं घोकायला सुरुवात करते. मग कधीतरी आठवड्याने तिच्या काकाला हे समजल्यावर तो तिची शिकण्याची इच्छा पाहून तिचे शाळेत नांव घालतो. तिची शिक्षणातील गोडी,प्रगती पाहून गुरुजीही थक्क होतात. सर्व मुलांमध्ये वरच्या नंबरला ती पोहोचते. तिची ज्ञानतृषा शमतच नाही.एकदा परीक्षेच्यावेळी गुरुजी गृहपाठ देतात तेव्हा "तुमच्या वार्षिक परीक्षेच्या दिवशीच तुमच्या आईवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली,तर तुम्ही काय कराल?" हा प्रश्न विचारतात.त्यावर तिचं उत्तर अशासारखं असतं की,"त्यामुळे मी परीक्षा चुकवणार नाही.माझ्या घरी राहण्याने तिचे प्राण पुन्हा परत येणार नाहीत. मी परीक्षेत नापास झाले तर माझं वर्ष वाया जाईल.आणि मी परीक्षा देऊन येईपर्यंत माझ्या घरचे थांबू शकतात.मी नंतर अंत्यसंस्कारांसाठी जाऊ शकेन!"
संपत देवीचा हा लहान वयातील समंजसपणा, जिद्दी वृत्ती आणि सातत्याने नव्याचा ध्यास हाच संपूर्ण कथनात प्रेरित करणारा विचार आहे.तिचं शिक्षण जेमतेम दोन वर्षच होऊन मग आई-वडील चित्रकूटच्या पर्वतराजीतील हनुमानधरा या डोंगराळ खेड्यात गेल्यानंतर थांबतं.पण ती म्हणते तसं,"आमची परिस्थिती खडतर असली तरी माझं बालपण तुलनेत चिंतामुक्त होतं.माझ्यावर कुणाचं दडपण नव्हतं."
तिच्या बेधडक वागण्याचं,बिनधास्तपणाचं,तसंच अन्यायाविरुद्ध लढण्याचं तिच्या काकांना,वडिलांना कौतुकच होतं.त्यामुळे ती वयाच्या ८-१०व्या वर्षापासूनच आपल्या न्याय्य हक्कांसाठी, मैत्रिणींसाठी शेजार्यांशी, जमीनदारांशी भांडत होती.अशावेळीही तिचे लाडके काका तिच्या पाठीशी असायचे.ती म्हणते,"त्यांचं माझ्या जीवनात खूप महत्त्वाचं स्थान होतं.ते नसते तर, माझी ज्ञानाची तृषा माझ्या वडिलांना कधीच समजली नसती.माझ्या लक्षात येत होतं की, काकांना मी इतरांच्या पुढे जायला हवी आहे.माझ्या संपूर्ण आयुष्यात ते माझ्या लेखी नैतिक आधार बनून राहिले आहेत.त्यांनी माझ्यात अत्यंत महत्त्वाची मूल्यं रुजवली,जी मी आजही मानते."
"कधीही चोरी करुं नये,खोटं बोलूं नये,खोटेपणा सहन करुं नये",असं ते नेहमी सांगायचे.काळाच्या ओघात मी त्यांच्या नियमांची चौकट पूर्णपणे आत्मसात केली आहे. त्यांच्यावाचून अन्यायाविरुद्ध लढा देणारी एकेकाळची ही छोटी मुलगी आज जी न्यायदात्री बनली आहे,तशी कधीच बनूं शकली नसती.
या पुस्तकात तिने वयाच्या बाराव्या वर्षी विवाह झाला,त्यानंतरचे सासरला गेल्यानंतरचे प्रसंग,तिथल्या ब्राह्मण जमीनदाराबरोबर झालेला संघर्ष,नवऱ्याचा गुरु म्हणून घरी येणाऱ्या साधूने लगट करण्याचा प्रयत्न केल्यावर केलेला विरोध,नवऱ्याबरोबरचे कळत नसलेल्या वयांत भोगावे लागलेले प्रसंग याबाबतही मोकळेपणाने मांडले आहे.त्यानंतर आजूबाजूच्या खालच्या जातीतील स्त्री-पुरुषांना जमीनदार,उच्चवर्णीय यांच्यापासून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध ती प्रथम एकटीने व त्यानंतर या सर्व स्त्रियांना संघटित करुन कसा लढा देत आली,त्याचेही वर्णन प्रेरित करणारे आहे.
संपत पालची ही कहाणी तिच्या अन्यायाविरुद्ध एकेका व्यक्तीशी,यंत्रणेशी,घटकांशी लढण्याच्या,शांततेच्या-समजुतीच्या मार्गाने प्रश्न सोडवण्याच्या प्रयत्नांची आहे.पण त्याच बरोबरीने या सार्या प्रवासात सासरची माणसं,जातीतील समाज, गावातील बलाढ्य शक्ती व प्रसंगी नवऱ्याबरोबरही संघर्ष कसा करावा लागला याचे प्रांजल कथन करणारी आहे.ती घरातून बाहेर काढल्यावर शिवणकाम शिकून कपडे शिवून विकणं,भाजीपाला,पान-सुपारी विकणं,शेती करुन धान्य विकणं असे चरितार्थासाठी व्यवसाय करते.या सार्या बरोबरच गावातील स्त्रियांना, अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रधान,पोलीस,सब मॅजिस्ट्रेट या नि अशाच अन्य सरकारी यंत्रणांकडे मोर्चा नेऊन,ठिय्या देऊन, लढा देऊन प्रश्न सोडवण्यासाठी सतत संघर्ष करत राहते.
या तिच्या रोजच्या दैनंदिनीत हळूहळू नवरा, मुले यांचा चरितार्थ चालवणे,मुलांना शिकवण्यासाठी धडपडणे हेही तितक्याच निष्ठेने ती करत राहते.हळूहळू उत्तर प्रदेशातील बुंदेलखंडच्या अनेक खेड्यात `संपत पाल आपल्याला मदत करुं शकते` हा दृढ विश्वास ती गडरिया,चमार,कोल, कहार अशा अस्पृश्य समाजातील सर्वांमध्ये निर्माण करते.या संघर्षात तिची सुपारी देऊन हत्या करण्यासाठी दादा लोक पाठवले जातात,तो प्रसंगही तिच्या धैर्याची परिसीमा दर्शविणारा आहे.
त्यानंतर गावां-गावांतून शिवणक्लास घेऊन,त्या स्त्रियांना संघटित करुन ती स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी झटते.बचतगट स्थापून, त्यांच्या हक्कांसाठी लढते.त्यातच जयप्रकाश म्हणून,अशा स्वयंसेवी संघटनांसाठी काम करणाऱ्या व्यक्तीसह ती पुढील काळात भागीदार म्हणून काम करुं लागते. अशावेळी एका प्रसंगानंतर शहरात तुटपुंज्या मिळकतीवर संघटनेचे कार्य आणि आपला निवास याची व्यवस्था करताना ती या जयप्रकाशच्या म्हणजेच बाबूजींसह एकाच खोलीत राहण्याचा क्रांतिकारी निर्णय घेते. लोकापवाद,अफवा यापलिकडे जाऊन निर्मळ,शुद्ध व्यवहारी व मैत्रीच्या नात्यातून ती नवरा-मुले यांच्यापुढे हे आदर्श नातंही दीर्घकाळ टिकवते.
त्यानंतर पोलीस,बीडिओ,वितरण अधिकारी,सब मॅजिस्ट्रेट यांच्या सार्या भ्रष्टाचारी यंत्रणेविरुद्ध वेळोवेळी आपल्या सहकारी महिलांना घेऊन ती उत्तर प्रदेशच्या अनेक प्रांतात न्याय्य मार्गाने समस्या सोडवणारी रणरागिणी असे नांव मिळवते.मग त्यातूनच या कष्टकरी, खालच्या जमातीमधील स्त्रियांबरोबरच ती अन्यायग्रस्त अशा उच्चवर्णीय,सर्व स्तरातील स्त्री-पुरुषांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत कार्यरत होते.
रोजगार हमी योजना, शिधावाटप योजना, कल्याणकारी योजना यामध्ये चालणारे मोठे घोटाळे आपल्या "गुलाबी गँग" या गुलाबी साडी परिधान करणाऱ्या महिलांच्या संघटनेद्वारा ती उजेडात आणते.सर्वत्र अधिकारीवर्ग,पोलीस अधिकारी,मुख्यमंत्री आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये `संपत पाल` या नावाची चर्चा घडत राहणं, तिला विविध ठिकाणी सभा,मेळावे,आंदोलने यासाठी बोलावणं असा सारा जवळपास ४०-४५ वर्षे ती संघर्ष उभा करते. या तिच्या कार्याची माहिती घेण्यासाठी फ्रान्स,ब्रिटन,अमेरिका अशा विविध देशातून भारतात पत्रकार येतात,पण इथला मिडिया मात्र दखल घेत नाही.एका फ्रेंच पत्रकार स्त्रीने तिला हे पुस्तक लिहायला प्रवृत्त केले आहे.आपल्या शिक्षित लहान भावाला पत्रकारांनी आपल्याबद्दल विचारलं तेव्हा तो "संपतजीचे शिक्षण झालेले नाही,त्यामुळे अशा अडाणी,अस्पृश्य लोकांची ती भाषा समजून घेऊं शकते,त्यांची व्यथा समजून घेऊन ती लढा देते,कारण ती अशिक्षित आहे." असे सांगितले याबद्दल तिच्या मनात अंगार आहे.तोच उच्चशिक्षित भाऊ आई-वडिलांनी ठरवलेल्या अशिक्षित मुलीबरोबर लग्न झाल्यावर तिला घटस्फोट द्यायचा ठरवतो त्यालाही ती बुद्धीचातुर्य व आपल्या कर्तृत्व,करारीपणा नि बळ याच्या जोरावर निर्णय बदलायला भाग पाडते.
भारतातल्या उत्तर प्रदेशसारख्या विशाल राज्यात चित्रकूटच्या पर्वतराजीतील धनगर समाजातील अशिक्षित मुलगी न्याय्य मागण्यांसाठी, अन्यायाविरुद्ध जनसामान्यांसाठी सतत लढा देते,संघर्ष करते नि सासरच्या मारहाणीला बळी पडणाऱ्या स्त्रिया, मालमत्ता लुटली जाणारे गरीब लोक,सवर्णांकडून वाईट वागणूक मिळणारे अस्पृश्य लोक,अन्याय झालेले प्रामाणिक उच्चवर्णीय लोक या साऱ्यांसाठी लढते आणि त्यांना न्याय मिळवून देते.....गरज पडली तर काठीच्या बळानेसुद्धा!हे सारं विलक्षण प्रेरणादायी आणि अचंबा वाटणारं असं कथन आहे.
या पुस्तकात तिने महाभारत,रामायण याचबरोबर राणी लक्ष्मीबाई,कबीर, तुलसीदास,सूरदास यांचे सांगितलेले सिद्धांत थक्क करणारे आहेत.अर्तारा विद्यापीठात "बुंदेलखंड प्रदेशातील राजकीय प्रक्रियेची मानवी बाजू" या विषयावरच्या परिषदेत सहभागी होण्याचे तिला निमंत्रण मिळते तेव्हा तिथे घडलेला एक प्रसंग, सोनिया गांधी राहुल गांधी तिला काँग्रेस पक्षात बोलवण्यासाठी उत्तर प्रदेशाच्या अध्यक्षांना सांगतात तेव्हाचा प्रसंग हे सुशिक्षित आणि उच्चवर्गातील सार्यांना डोळ्यात अंजन घालणारे आहेत.तिची संपूर्ण जीवनकहाणी-तिच्या `गुलाबी गँग` या संघटनेचे अस्तित्व-हे एका अशिक्षित पण संयमी, बेडर,धैर्यवान अशा लढवय्या रणरागिणीचं आजच्या समाज जीवनासमोर आदर्श ठेवणारं असंच आहे!एक आणखी विशेष घटना म्हणजे,"द गार्डियन"ने जगातील शंभर स्फूर्तिदायक स्त्रियांमध्ये "संपत पाल" यांची निवड केली आहे.एक स्त्री अन्यायाविरुद्ध स्त्री संघटन कसे उभारते,कसा यशस्वी लढा देते नि विदेशातही नांव मिळवते याची ही समर्थ,सशक्त कहाणी भावी पिढीतील स्त्रीसाठी...किंबहुना सर्वांसाठीच आदर्शवत अशीच आहे!
...Read more
- MILUN SARYAJANI, 2014
राजकारणाची समज, प्रशासनाच्या अधिकारांची आणि जनतेच्या हक्कांची जाण, धाडसी स्वभाव, भीती माहीत नाही, स्त्रियांचं-दलित गरिबांचं भलं व्हावं, त्यांच्यावरचा अन्याय दूर होऊन त्यांना त्यांचे हक्क मिळावेत ही मनापासूनची प्रामाणिक तळमळ, अन्यायाची चीड, कुणी एक लगवली तर त्याला दोन लगावायची तयारी असली तरी हिंसाचारावर विश्वासच नाही - या सगळ्याचं मिळून जे व्यक्तिमत्त्व तयार होतं ते म्हणजे सपंत पाल!
स्त्रीवादी विचार कृतीत उतरवण्याचं मूर्तिमंत उदाहरण! समाजातल्या सगळ्यात तिरस्कृत समजल्या जाणाऱ्या जातीत जन्मलेली - शिक्षणाची प्रचंड ओढ असलेली पण ते घेऊ न शकलेली एक हुशार मुलगी. परिस्थितीपुढे तिने हार मानली नाही. कुरकुरत बसली नाही. रडलीभेकली नाही. बाबा-बुवाच्या नादी लागली नाही. स्वत:च्या मनाचा कौल महत्त्वाचा मानला. आणि झुंजार लढवय्यी स्त्री बनली त्याची ही कहाणी.
उपजतच तिचे विचार स्त्रीवादी होते. काही स्वयंसेवी संस्थांच्या शिबिरांमुळे आपण योग्य पद्धतीनेच विचार करतो आहोत याची खात्री पटली आणि मग जसजशी समज वाढत गेली तिने आपले विचार कृतीत उतरवायला सुरुवात केली. हे काम सोपं अजिबात नव्हतं. उत्तरे प्रदेशातली ती खेडेगावं - जातीची उतरंड - अस्पृश्यता पाळणारा समाज - त्याचा फायदा घेणारे सवर्ण आणि या सामाजिक परिस्थितीत अन्यायाला बळी पडणारा दलित वर्ग. स्त्रिया या सर्वांच्या बळी होत्याच याशिवाय कुटुंबातही त्यांच्यावर अन्याय होत होता. गडरिया (धनगर) जातीत जन्म झालेल्या संपतजींनासुद्धा हे सगळं चुकलं नव्हतं. चालीरितीप्रमाणे संपतचं लवकर लग्न झालं. लग्नासंबंधी काहीही माहिती नसताना नवऱ्याबरोबरच्या पहिल्याच संबंधात भीतिदायक अनुभवाला सामोरं जावं लागलं. सासूने छळलं. हा अन्याय सहन न होऊन संपत त्या विरोधात उभी ठाकली. घर आणि नंतर गावही सोडावं लागलं. तरी माघार न घेता शेती केली, शिवणकाम शिकली, कष्टाला मागेपुढे पाहिलं नाही. पुन्हा घर उभं केलं. आणि असाच अन्याय सहन करणाऱ्या स्त्रियांना मदत करता करता त्यांच्यासह स्वत:ची एक गँग तयार केली. गुलाबी गँग! कुठल्याही कामगिरीवर निघताना ही गँग गुलाबी साडी नेसून, हातात दंडुका घेऊन तय्यार असते. गुलाबी साडी ही त्यांची निशाणीच झाली आहे. अन्यायग्रस्तांना या गँगचा आधार वाटतो तर अन्याय करणारे जरा दबकूनच असतात.
स्वत:ही अन्याय सहन करायचा नाही आणि दुसऱ्यावरही तो होऊ द्यायचा नाही. झाला तर तो दूर करण्यासाठी झुंज द्यायची. कुटुंबीयांशी त्यांनी नाही ऐकलं तर सरपंच, पोलीस यांची मदत घ्यायची, त्यांनी नाही जुमानलं तर वरचे अधिकारी, प्रशासकीय आधिकारी, जिल्हाधिकारी, मॅजिस्ट्रेट आणि वेळ आली तर थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत जायचं पण प्रश्न सोडवल्याशिवाय थांबायचं नाही. हीच त्यांच्या कामाची पद्धत. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक नियोजन करून करायची हेच संपतजींचं वैशिष्ट्य! स्वत:चे सामर्थ्य आणि मर्यादा याची स्पष्ट जाणीव त्यांना आहेच पण विरुद्ध पार्टीला जोखण्याची त्यांची ताकद विलक्षण आहे.
‘मी संपत पाल’ हे या लढवय्या स्त्रीचं आत्मकथन आहे. त्याचं मूळ फ्रेंच शब्दांकन अॅनी बरथॉड यांचं आहे. त्याचा सुंदर मराठी अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे. मूळचं पुस्तक मराठीच असावं इतका तो सहज आहे. हे पुस्तक वाचणं म्हणजे स्वत:लाच समर्थ बनवणं आहे. ते वाचताना आपण आश्चर्यचकित होतो, थक्क होतो. मनापासून संपतजींच्या कामाला दाद देतो आणि शेवटी एक कडक सलाम ठोकतो. विलक्षण आहे त्यांचं सगळं काम!
‘द गार्डियन’ या जगप्रसिद्ध वृत्तपत्राने जगातील शंभर स्फूर्तिदायक स्त्रियांमध्ये संपत पाल यांची निवड केली आहे.
संपत पाल यांची मुलाखत घेण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, कोरिया असे देशोदेशीचे पत्रकार येतात. बीबीसीने त्यांच्यावर डॉक्यूमेंटरीही केली आहे. भारतातल्या माध्यमांनी मात्र त्यांची पाहिजे तेवढी दखल घेतली नाहीये याची खंत त्यांच्या मनात आहे.
अलीकडे स्त्रियांवर, दलितांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण सतत वाढतंच आहे. कारण काहीही असोत परिणाम - स्त्रियांवर आणि दलितांवर होणारा हिंसाचार. अशा वेळी वाटतं की गावोगावी संपत पाल निर्माण झाल्या तर!
- अंजली मुळे ...Read more