DAINIK SAKAL 12-08-2001‘‘डॉक्टर बाळ रात्री खूपच रडते. झोपतच नाही.’’ ‘‘डॉक्टर, बाळाचे डोळे सारखे चिकटतात, बाळ वर्षाचे झाले तरी अजून उभे राहत नाही.’’ ‘‘डॉक्टर माझा दोन वर्षांचा मुलगा अजून बोलतच नाही. काय करावे.’’ ‘‘डॉक्टर माझी मुलगी पाचवीत आहे; पण वजन खूपच वाढलंय तिचं! सतत टव्ही पाहत असते.’’ ‘‘डॉक्टर आजपर्यंत मुलाचं सगळं व्यवस्थित चालू होते; पण या ९वी, १०वीच्या वर्षात तो अचानक बदललाय. फारसा बोलत नाही. फारच ‘इरिटेबल’ झालाय. त्याच्याशी कसे वागायचे हेच कळत नाही.’’ हे आणि असे असंख्य प्रश्न, शंका पालकांच्या मनात असतात. त्यांना योग्य उत्तरे, योग्य मार्गदर्शन मिळणे मुलांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असते. मुलगा दोन वर्षांचा झाला; पण अजून बोलत नाही म्हणून अतिशय ‘टेन्शन’मध्ये असलेले ‘डॉक्टर, पालक’ मी पाहिलेत. आई, वडील व मुलगा असे तिघांचेच कुटुंब असलेल्या या मुलाच्या कानावर शब्दच पडत नव्हते, तर तो बोलणार काय?
डॉ. सुचित तांबोळी यांचे ‘मुलांच्या समृद्ध जीवनासाठी’ हे पुस्तक या २१व्या शतकातल्या पालकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. बालविकास व बालमानसशास्त्र यावर डॉ. तांबोळी यांचे प्रभुत्व दिसते. तसेच या क्षेत्रातील त्यांचे कार्यही उल्लेखनीय आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचे महत्त्व जास्त वाढते.
‘बाळाच्या जन्मापूर्वी’ या पहिल्याच प्रकरणात होऊ घातलेल्या पालकांनी घ्यावयाच्या काळजीबद्दल माहिती आहे. यात लग्नाच्या वेळेस वधु-वरांच्या रक्तगट, एड्स चाचणी, मेडिकल चेकअप पत्रिकेपेक्षा जास्त आवश्यक आहे, हा मुद्दा स्वागतार्ह आहे.
निरोगी व सृदृढ बाळासाठी या प्रकरणात बाळ जन्माला आल्यावर येणाऱ्या छोट्या छोट्या अडचणी, शंका उदा. गुटी घालावी-घालू नये, टाळू तेलाने भरावी-भरू नये, बाळ उलटी का करते, रडते का? आदींविषयी सखोल चर्चा केली आहे. त्यानंतर बाळाच्या मानसिक वाढीसाठी बाळ जन्मल्यापासूनच काय करावे, बाळाची खोली, बाळाची खेळणी, बाळाचे कपडे, त्याच्याशी बोलणे, त्याला संगीत ऐकवणे इ. टप्प्याटप्प्याने कसे करावे हे सांगितले आहे.
‘मुलांच्या सुयोग्य आहार’मध्ये बाळ जन्मल्यापासून त्याला द्यावयाच्या आहाराबद्दल महत्त्वाची माहिती आहे. बाळाचे वय, उंची, वजन यांच्या इंडियन मुलांसाठीचा चार्ट दिला आहे. नेहमीच्या वापरातले पदार्थ, त्यातील कॅलरिज यांचे कोष्टक आहे. पुढील प्रकरणात मुलातील मतिमंदत्व कसे ओळखावे, त्यासाठी काय नियोजन करावे हा भाग येतो.
बालकांचा मनोविकास, बौद्धिक विकास हा जास्तीत जास्त चांगल्या तऱ्हेने कसा होईल, त्यासाठी पालकांनी काय प्रयत्न केले पाहिजेत, पालकांनी मुलांशी कसे वागले पाहिजे, याचा तक्ताच दिला आहे. सगळ्यांचा सारांश एकच आहे, मुलांना प्रेम द्या. त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण करा. मुलाचा आहे त्या बौद्धिक क्षमतेसह परिपूर्ण स्वीकार करा. त्याच्यातील सुप्त गुण आपोआपच बाहेर पडतील. मुलांचा भाषिक विकास, सामाजिक विकास, शैक्षणिक विकास या पुढील सर्व प्रकरणात सविस्तरपणे पालक-बालक-समाज यांच्यातील संवाद, मुलांची खेळणी, झोप इ. विषयी माहिती आहे. दूरदर्शनचे मुलांवरील परिणाम, ते कसे टाळावेत याचे विवेचन आहे.
डॉ. आनंद पंडित यांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे मानसशास्त्राच्या विद्यार्थ्यांनाही हे पुस्तक पालकांइतकेच उपयुक्त ठरेल. पालकांच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात नक्कीच सापडतील.
-प्रमिला पाटील (मुळे) ...Read more
DAINIK LOKMAT 24-12अपघाताने आई-वडिल होणे शक्य; पण सुजाण पालक होण्यासाठी परिश्रमाची गरज...
डॉ. सुचित तांबोळी यांनी १९९२ साली अहमदनगर येथे चिरंजीव बालविकास केंद्र सुरू केले. पुण्याच्या के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये डॉ. आनंद पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेल्या टीडीएच सेंटरचया द्वारे आजारी नवजात अर्भकाचे भावी आयुष्य सुसह्य करण्याबाबत दक्षता घेण्याचा उपक्रम चालू होता, त्याचा डॉ. तांबोळी यांच्यावर प्रभाव पडला. त्यानंतर बडोदा येथे ह्युमन डेव्हलपमेंट विभागात बेलीज स्केलचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. ‘लवकर हस्तक्षेप उपचार पद्धती’चा अवलंब करून गतिमंद, मतिमंद व वर्तनसमस्या असणाऱ्या मुलांच्या व पालकांच्या मानसिकेतेचा अभ्यास करण्यासाठी खासगी स्वरूपात निघालेले महाराष्ट्रातील पहिले केंद्र म्हणून चिरंजीव बालविकास केंद्राचे महत्व अनन्यसाधारण आहे. पुढे त्याला विवेक पौंगंड क्लिनिकची जोड देण्यात आली. बालविकास केंद्र कसे चालवावे याविषयी बालरोग तज्ज्ञ व मानसशास्त्र यांच्या सहकार्याने संगणकासाठी एक आज्ञावली (सॉफ्टवेअर) त्यांनी विकसित केली आहे.
औषधाची मुलाला गरज पडू नये
बालविकासाचा ध्यास घेतलेल्या डॉ. तांबोळी यांनी आपल्या अभ्यास अनुभवाच्या आधारे पालकवर्गात जाणीव जागृती करण्याच्या दृष्टीने वेळोवेळी लेखन केले. ‘मुलांचा समृद्ध जीवनसाठी’ या पुस्तकातील लेखांद्वारे मुलांच्या सुयोग्य संगोपनाच्या संदर्भात बहुमोल मार्गदर्शन केले गेले आहे. एकतर गरोदर अवस्थेत दक्षता घेतली तर मूल निरोगी व सुदृढ होऊ शकते. औषधाची मुलाला शक्यतो गरज पडू नये, अशा प्रकारे पुढेही त्याचे संगोपन होत राहावे. जन्मानंतर पहिल्या सहा आठवड्यात अर्भकाला वेळोवर दूध पाजले की झाले, बाकी त्याला काय कळते अशी बहुतेक मातापित्यांची भावना असते; परंतु डॉ. तांबोळी हे या काळातही बाळाला रोज तीन तास संगीत ऐकवावे, आवाजाची खेळणी वाजवून दाखवावी, रंगीत व वेगवेगळ्या आकाराची खेळणी त्याच्या पाळण्यावर टांगून ठेवावी, त्याकडे त्याचे लक्ष वेधावे, असे सुचवितात. दुसऱ्या तिसऱ्या महिन्यात संगीताबरोबर हलणारी, मोठी रबराची खेळणी वापरावी, चौथ्या पाचव्या महिन्यात प्लॅस्टिकचे मोठे मणी, विविध स्पर्शाचे प्राणी खेळण्यांमध्ये विविधता आणण्याचा आग्रह धरतात. या खेळण्याद्वारे त्यांची ज्ञानेंद्रिये तल्लख होतात. त्याच्या विविध अवयवांच्या हालचालींना चालना मिळते. जन्मापासून ते पहिल्या दहा वर्षांपर्यंत वापरता येण्याजोगा १०० खेळण्याची त्यांनी वयानुसार दिली आहे. दहाव्या वर्षी खेळणी कुठली असा कोणाला प्रश्न पडेल. (पुस्तके, तिकिट संग्रह, सायकल, स्केटिंग, टेबल टेनिस, क्रिकेट इ. खेळ चित्रकला, नृत्य, पोहणे, समूह खेळ, विज्ञान खेळणी इ.) बालवाड्यांमध्ये मुलांकडून करून घेता येतील असे दीडशे उपक्रमही दिले आहेत. (१३९-१४०)
मुलाच्या शारीरिक वाढीचेही काही ठोकताळे आहेत. त्यानुसार त्याच्या आहारात कोणते घटक असावेत याकडे लक्ष द्यावे लागते, नाष्टा, सकाळाचे व रात्रीचे जेवण, पालेभाज्या, उसळी, सुकामेवा, मधल्या वेळचे पदार्थ, त्यातून मिळाणाऱ्या कॅलरीज यांनी माहिती मुलांच्या सुयोग्य आहार या प्रकरणात देण्यात आली आहे.
बुद्धिमत्ता म्हणजे काय?
बालकांचा मनोविकास, बौद्धिक विकास, भाषिक विकास, समाजिक विकास, इतर मुलांशी संपर्क, मैत्री, भांडणे, हट्टीपणा, भीती इ. याबद्दल वयानुसार किमान तयारी दिसून यायला हवी. तशी ती न दिसली तर त्यांच्या वर्तनसमस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करायची गरज भासते. बुद्धी ही नैसर्गिक व अनुवंशिक असते. ती कोणत्याही औषधाने व आहाराने वाढवता येत नाही. पण आहे ती बुद्धी कुपोषणाने, आळसाने, अयोग्य वातावरणामुळे काम करेनाशी होऊ शकते.
बुद्धिमत्तेमध्ये प्रत्यभिज्ञान (अनुभवग्रहण), स्मृती, भिन्नरचन, संयोजक रचना, मूल्यांकन या बोधात्मक प्रक्रिया मुख्य असतात. सहेतुक, विचारपूर्वक व समर्थपणे परिस्थितीशी समायोजन साधण्याची व्यक्तीची सर्वांगीण क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता ही वेशलेरची व्याख्या डॉ. तांबोळी यांना सोयीची व स्वीकारार्ह वाटते. प्रत्येक मुलाची एक विशिष्ट बौद्धिक क्षमता असते. काही बाबतीत त्याला आरंभापासूनच विशेष गती असते. (भाषा, संगीत, गणित इ.) अंगी असणाऱ्या शक्तींच्या सहाय्याने बाहृयजगतात बालकाची आवड-निवड करण्याची वृत्ती बनते. वृत्ती सवयीच्या झाल्या की त्या स्थिर बनतात व त्यात बदल करणे कठीण होते. वृत्ती म्हणजे एखादे काम करण्याबद्दलची सज्जता. कृतिप्रवण इच्छाशक्ती, लहानापासून चिकाटी, मेहनत, अभ्यास आकलन, शिस्त, इत्यादी गोष्टी त्याच्या मनावर ठसवायला हव्या. पालक-शिक्षक-मित्रसहकारी यांच्या वर्तनाचा, विचारांचा व मूल्य प्रणालीचा प्रभाव मुलांवर पडतो. मात्र मूल भावनाप्रधान असेल व पालकांविषयी त्याची वृत्ती प्रतिकारात्मक असेल तर सूचनेचा उलटाच परिणाम होऊ शकतो. मुलांच्या पूर्वानुभवावरून त्यांच्या आवडीनिवडी तयार होतात. विविध कामे करण्याची आवड त्यांच्यात निर्माण व्हायला हवी. तशी कौशल्ये त्यांनी संपादन करायला हवी. एखाद्या कामात चटकन यश आले तर त्या प्रकारची कामाची टाळाटाळ करतात. योग्य आवडीनिवडीच्या दृष्टीने पालकांना काय करता येईल हे नेमके सांगणे अवघड आहे; परंतु त्यांचे स्वत:चे वर्तन हाच मुलांसमोर प्रारंभी तरी आदर्श असतो हे विसरता कामा नये. त्यामुळे त्यांनी योग्य ते गुण आधी आपल्या अंगी बाणवून ते प्रकट करायला हवे.
भाषिक क्षमता
मुलांची भाषिक क्षमता क्रमाक्रमाने वाढत जाते. एक वर्षांचे मूल तीन शब्द बोलते, पंधरा महिन्याचे मूल १९ अर्थपूर्ण शब्द, १८ महिन्याचे मूल २२ शब्द बोलू शकते. २१ महिन्याचे मूल २२ शब्द बोलू शकते. २१ महिन्याचे मूल शंभरावर शब्द आत्मसात करते. दोन वर्षाचे मूल पावणेतीनशे शब्दापर्यंत मजल मारते. दूरदर्शनमुळे हल्ली मुलांची शब्दसंख्या बरीच वेगाने वाढते.
मुलांनी एकलकोंडे, धुमे, घाबरट लाजाळू असू नये. त्यांना मित्र मिळवता यायला हवे, अनोळखी व्यक्तीशीही संवाद साधता यायला हवा, सहकाऱ्यांबरोबर समंजसपणे राहता यायला हवे, प्रसंगी आपले वर्चस्व व चूक कबूल करण्याने बळ दाखवला यायला हवे. जरूर तेव्हा भांडताही यायला हवे. भांडखोरपणा, हट्टीपणा, अरेरावी वृत्ती, आपलेच म्हणणे सर्वांनी ऐकायला हवे, अशी दादागिरीची वर्चस्व प्रस्थापक वृत्ती यांनाही योग्य त्या टप्प्याबाहेर जाऊ देता कामा नये. मुलांची निणर्यक्षमता ही देखील विकसित करायला हवी. मी माझा निर्णय कसा ठरवणार आहे? तो निर्णय कसा अंमलात अणणार आहे? त्या निर्णयात आवश्यक तो बदल करण्याची तयारी आहे का? याबाबत त्याचा आत्मविश्वास वाढायला हवा. पालकांनी निर्णय घेऊन मुलांनी फक्त आज्ञाधारकपणे त्यापुढे मान तुकवावी, अशी अपेक्षा करणे गैर आहे. आपलं स्वत्व टिकवण्याचा प्रयत्न प्रत्येक मूल वा व्यक्ती स्वाभाविकपणे करीत असते हे विसरता कामा नये. अगदी पहिल्या वर्षांतही मूल आपल्या आवडीनिवडी प्रकट करून आपला स्वतंत्र बाणा प्रकट करण्यासाठी धडपडत असते. मुलांना परावलंबी बनवू नये. मुलांनी निर्णय घेऊन तो अंमलात आणला तर त्या निर्णयाचे परिणाम सहन करण्याची मानसिकताही सिद्ध होते, आणि त्यांची त्यांची क्षमता वाढते.
सुखाबद्दलची कल्पना
सुखाबद्दलची कल्पनाही मुलांच्या नीट लक्षात आणून दिली पाहिजे. सुख म्हणजे काय? ते कशावरून ठरते?
प्रत्यक्ष परिस्थिती कशी आहे आणि तिच्याकडे तुम्ही कसे पाहता यावर सुख ठरते, असे सांगून डॉ. तांबोळी उदाहरण देतात. शेजारच्या बागेकडे आशाळभूपणे बघण्यापेक्षा स्वत:ची बाग काळजीपूर्वक जोपासावी. आपण कोण आहोत, आपल्याजवळ काय आहे याचा स्वीकार करता आला तर सुख लाभणे सुलभ जाते. आपल्या अपेक्षा व उपलब्ध यांच्यात समतोल राहू शकतो. भरमसाट अपेक्षा या बहुतांशी सुखाच्या आड येतात. दु:ख व नैराश्य देतात.
मुलांच्या शारीरिक आजाराची दखल कशी घ्यावी, त्यांना कोणती औषधे द्यावी याबद्दलचे मार्गदर्शन ‘औषधे देताना काय काहजी घ्यावी’ या प्रकरणात कले आहे. लहान मुलांना येणारा ताप, तापामुळे येणारे झटके, जुलाब, बाल दमा किंवा अॅलर्जीचा कफ, सर्दी या संदर्भात अनुभवाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.
मतिमंद व गतिमंद मुलांच्या समस्यांवरही विविध प्रकारचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्यांच्यातील फरक व उपचार यांची माहिती देताना मज्जासंस्था, मेंदू व शिक्षण यांच्याशी आहे. पौंगंडावस्थेतील मुलांच्या प्रश्नांचा संबंध तारुण्यपीटिका, उंची, तोंडावरील कमीजास्त केस, स्तनांची वाढ, स्वप्नावस्था, हस्तमैथुन, लिंग आकार, अश्लील चित्रपट समवस्कांमधील हिंसाचार यांच्याशी असतो तर मुलींबाबत सौंदर्यकल्पना, तारुण्यपीटिका, हातापायावरचे केस, स्तनांचा आकार व वाढ, मासिक पाळी, लैंगिक छळ, लैंगिक आकर्षण, एकान्तपणा असणाऱ्या अडचणींचा मागोवा घरच्या लोकांनी घेऊन त्यांच्यात प्रेम, विश्वास व दिलासा निर्माण होईल, अशी त्यांची हाताळणी केली पाहिजे.
मानसिक आधार
शालेय व सामाजिक अकार्यक्षमता (नापास होणे, वाईट दर्जा मिळणे, मित्र नसणे, शिकण्यात मागे पडणे), शारीरिक आरोग्य (पटकन आजारी पडणे, कायमचा आजार असणे, शारीरिक तक्ररी व दुर्बलता जाणवणे), कौटुंबिक कलह (पालकांशी न पटणे, आई वडीलांतील भांडणे व संघर्ष, वडिलांची व्यसनाधीनता, शारीरिक व लैंगिक अत्याचार पालकांचे दारिद्र्य व विसंवाद), भावनिक प्रश्न (न्यूनगंड, औदासीन्य आत्मविश्वासाच अभाव, तणावर व चिंतन, आत्महत्येच विचार मादक द्रव्ये व व्यसने), लैंगिक समस्या (लैंगिक संबंधातून होणाऱ्या व्याधी, वेश्याव्यवसाय मुलींमध्ये गर्भ राहणे) याबाबत पालकाने जागरुक राहून मुलामुलींना मानसिक आधार दिला पाहिजे.
मुलांच्या कमकुवतपणाचा स्वीकार करून त्यांच्यातील सुप्त शक्तींना प्रोत्साहन द्या, साहसाची संधी द्या. असा सल्ला डॉ. तांबोळी पालकांना देतात. मुलांचे धोक्यापासून रक्षण करा. पण त्याला अतिसंरक्षण देऊ नका. आपण जे करतो ते सर्व मुलांनी सहजपणे करावे, ही अपेक्षाही अवास्तव असते. आपले ध्येय हे मुलांसाठी निरनिराळी दारे उघडून देण्याचे असावे. बंद करण्याचे नव्हे. पालक-शिक्षक-शाळा-मुले-मित्र या सर्वांत एक प्रकारची संवाद सुलभ जवळीक हवी, संगणक, पुस्तके, खेळ, अभ्यास, करमणूक, दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम, लेखल, वक्तत्व, समाजकार्य या सर्वांना दिनक्रमात स्थान हवे.
मुला-मुलींच्या आयुष्याची डौलदार उभारणी होण्यासाठी अनेक बाबतीत भक्कम पाया घालावा लागतो. त्यासाठी अनेक घटकांचे सहकार्य लागते. अनेक समस्यांतून मार्ग काढावा लागतो. डॉ. सुचित तांबोळी यांनी या पुस्तकात ‘बालविकासा’चे विविध पैलू स्पष्ट करून पालकांपुढे एक प्रचंड आव्हानात्मक पट खुला केला आहे. तारुण्यात स्त्री-पुरुषांनी जवळ येणे आणि त्यातून अपत्याचा जन्म होणे हा निसर्गाचा वंशसातत्य टिकवण्याचा एक सहजमार्ग आहे; परंतु अपघातने आई’वडिल होणे शक्य असले तरी चांगले पालक होणे हा अभ्यासाचा जागरुकपणा व परिश्रमाचा भाग आहे, हे सदैव लक्षात ठेवायला हवे. तसा संदेश देणारे हे पुस्तक आहे. सुजाण पालकत्वाचा पाया घालणारे बहुमोल कानमंत्र त्यात पानोपानी विखुरलेले आहेत. ...Read more