अविनाश मणेरीकर, पुणे `हेलन-अॅलीस डिअर` या ब्रिटिश स्त्रीच्या आयुष्याची, तिच्या कुटुंबाची ही हृदयद्रावक अशी कहाणी आहे. जवळपास साठ वर्षाहून अधिक काळ परक्या देशात तग धरुन राहिलेल्या स्त्रीची-तिच्या आयुष्यात आलेल्या विदारक जीवनप्रवासाची ही सत्यकथा आहे.
१९३७साली पंधरा वर्षाची हेलन आपल्या परिवाराबरोबर लंडनहून बल्गेरिया येथे आजीला भेटायला जाते. तिथे गेल्यावर काही दिवसांमध्येच त्यांना सुरुवातीला नाझी राजवट, युद्धजन्य परिस्थितीमुळे बल्गेरियातून बाहेर पडणे अशक्य आहे हे समजते. त्यानंतर जगण्यासाठी त्यांना ज्या प्रतिकूल आणि घाबरवून सोडणाऱ्या परिस्थितीशी सातत्याने झगडावे लागते त्याची ही करुण कहाणी तिने वाचकांसमोर मांडली आहे.
त्या देशात प्रथम नाझी व नंतर साम्यवादी राजवटीसमोर विदेशी असल्यामुळे सातत्याने संशयाच्या भोवर्यात अडकून, पोलीस, कौन्सिलर, सैनिक यांच्याकडून सतत मारहाण, धमक्या सोसत आणि आयुष्यभर सारखी घरे बदलत कसे जीवन व्यतीत करावे लागले, काय-काय आरोपांना, संकटांना तोंड द्यावे लागले, त्यासाठी किती संघर्ष वयाच्या १५ व्या वर्षापासूनच तिने झेलला याचे वर्णन वाचतांना आपल्या अंगावर काटा उभा राहतो. त्याचबरोबर तिच्या संयमी, शांत, कणखर वृत्तीने तिने भोगलेला हा सारा जीवनप्रवास आपल्याला थक्क करुन सोडतो.
हेलनचे वडील लंडनहून कॅनडामध्ये नव्या नोकरीसाठी जातात. दोन वर्षांनी तिथे नवे घर घेतल्यावर ती, भाऊ ऑक्टेव्ह व आई रोझी यांनाही तिकडे बोलावतात. त्यापूर्वी व्हिएन्नात असणाऱ्या आईच्या आईला भेटण्यासाठी हे तिघे तिथे जातात पण तिची परोपकारी आजी बल्गेरियाला कुणां मैत्रिणीच्या मदतीसाठी गेल्याने ही तिघंही तिकडे पोहोचतात. पण तिथूनच त्यांच्या आयुष्याचा दशावतार सुरु होतो. जर्मन चाल करुन येत आहेत हे कळल्यावर ब्रिटिश दूतावासात जाऊन परत इंग्लंडला परतण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु होतो पण......
त्यानंतर तिच्या आजीचे दवाखान्यात सुईण म्हणून चालू असलेले काम, त्याबरोबर आईसुद्धा कुटुंब चालवायला दवाखान्यात नोकरी सुरु करते. परंतु जागोजागी हे कुटुंब सामान्य आयुष्य कंठत असतानाही फक्त विदेशी म्हणून सातत्याने संशयाच्या फेऱ्यात अडकत राहते. सतत दडपणाखाली जगण्याची लढाई करत राहते. त्यातूनच मोठा असलेला भाऊ लपून-छपून बोटीवर चढून पुन्हा लंडनमध्ये जातो. त्यानंतर आजी, आई व १५ वर्षाची हेलन त्या देशात अवहेलना, अपमान आणि पोलिसांचा ससेमिरा सोसत, मात्र धीराने, शांत पण कणखर वृत्तीने कसे आयुष्य काढतात, त्या सार्या विदारक अनुभवांचे हे कथन लेखिकेने मांडले आहे.
यात पोलिसांकडून, सैनिकांकडून १५ वर्षाच्या हेलनला पुन्हा-पुन्हा चौकशीला बोलावून, तिच्याकडून शरीरसुखाची अपेक्षा करणं, ती हेर आहे या संशयाने मारहाण करणं हे सारं ती भोगत असते. युद्धजन्य परिस्थितीमुळे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा, आईचं आजारपण त्यामुळे हेलनला लहान वयात लपून-छपून नोकरी करायला लागणं.त्यातून पोलिसांच्या अत्याचारापासून वाचण्यासाठी बल्गेरियातील नागरिकाशी लग्न केलं तर तिला इथलं नागरिकत्व मिळवतां येईल म्हणून तिच्यावर दबाव येणं, अखेर कंटाळून व्लादिमीर या २७ वर्षीय तरुणाबरोबर तिचा विवाह होतो. मात्र तरीही तिचा संघर्ष मात्र संपत नाही.
या साऱ्या साधारण ६३ वर्षांच्या कालखंडात ती अनेक कष्टाच्या नोकर्या करते, दिवस-रात्र आपल्या कुटुंबासाठी अर्धपोटी, उपाशी राहून ती संसार चालवते. यादरम्यान तिच्या देखणेपणामुळे आणि कर्तबगारपणामुळे नवरासुद्धा सातत्याने तिच्यावर संशय घेत राहतो. तिला मारझोड करतो. या सार्या प्रवासात तिला तीन मुली व एक मुलगा होतो. त्यांनाही फार कष्टाने ती शिक्षण देते, परंतु हेही सारं तिला एकट्यानेच करावं लागतं. कारण आधी नवरा तिला बाहेरख्याली समजून मित्र, दारु यांच्या आहारी जातो आणि नंतर त्यालाही अनेक नोकऱ्या बदलाव्या लागतात, त्यातच अपघात होऊन तो अपंग होतो, आजाराने ग्रस्त होतो. त्याच्या व आईच्या आजारपणातही ती नोकरी, मुले, संसार सांभाळत त्यांची शुश्रूषा करते. त्यांच्या आजारपणातच तिला सातत्याने भक्कम आधार देणारी तिची आजी स्वर्गवासी होते. त्यानंतर काही महिन्यातच तिचा पतीही हॉस्पिटलमध्ये प्राण सोडतो. त्याचा अंत्यविधी करायलाही पैसे नसताना ती सारे दिव्य पार पाडते.
या साऱ्या करुण नि बिकट परिस्थितीत तिला आईकडेही लक्ष देता येत नाही, तिचीही तब्येत खालावते, तिला दूरच्या दवाखान्यात भरती केलेलं असतं, तिथेच तीही प्राण सोडते.
या साऱ्या प्रवासात हेलन आपल्या मुलांना शेजार्यांच्या, काही दयाळू लोकांच्या मदतीने शिकवते. तिच्या चारही मुलांनी बल्गेरियामध्ये आपापल्या क्षेत्रात नांव कमावलेलं ती पाहते. यथावकाश त्या मुलींची व मुलाचेही लग्न होते. ती याचं वर्णन करताना लिहिते की, "माझ्या मोठ्या मुलीला मुलगी झाली आणि चाळीस वर्षांची असतानाच मी आजी झाले." या सार्या घटनांमधूनच तिच्या वाटेला आलेलं खडतर आयुष्य आपण समजूं शकतो.
लेखिकेच्या आयुष्यातील सारे चढ-उतार सांगणारे प्रसंग, तिच्या कष्टाच्या नोकऱ्या, त्यानंतर अनुवादक म्हणून कौन्सिलमध्ये मिळालेलं काम, त्यानंतर चोरुन घेत असलेली तिची इंग्रजी भाषेची शिकवणी या प्रसंगातून तिची जिद्द, जगण्यासाठीची धडपड आपण अंतर्मुख होऊन वाचतो.सततच्या संघर्षात, कष्टात जीवनाची गाडी हाकताना सतत आपल्या देशात इंग्लंडला कधी जातां येईल हा ध्यास मात्र सतत तिच्या मनाने घेतलेला असतो.
या साऱ्या प्रवासात काही मोजकेच आनंदाचे, तिला मदतीसाठी धावून येणाऱ्या व्यक्तींचे प्रसंग ती सांगते. त्या समाधानाच्या, आनंदाच्या प्रसंगाचे अनुभव आजीने अनेकांवर केलेल्या परोपकारामुळेच मला मिळाले असं ती आवर्जून सांगते.
अखेर 1१९८९ च्या मे महिन्यात दोनच दिवसांत बर्लिनची भिंत पडणार असल्याचे तिला कळतं. इंग्लंडहून आजीला भेटायला आल्याला पन्नासहून अधिक वर्ष झालेली असतात. इतकी वर्षं घरी जाण्यापासून रोखून ठेवणारे अडथळे एका रात्रीत जमीनदोस्त होणार यावर विश्वास ठेवणंही तिला कठीण जातं.
त्यानंतर १९९६-९७ नंतर तिच्या मुलींना ब्रिटिश दूतावासातून इंग्लंडला जाणाऱ्यांना व्हिसा मिळतोय असे कळल्यावर त्या आईला परत मायदेशी जाण्यासाठी प्रयत्न कर सांगतात पण वयाच्या ऐंशीच्या घरात साऱ्या भयानक अनुभवानंतर ती थकलेली असते. पण मुलींच्या आग्रहाखातर ती ब्रिटिश दूतावासात जाते. तिथे प्रथमच बल्गेरियातल्या इतके वर्षांच्या दुःखद आठवणी नंतर तिला सन्मानाची, आदराची वागणूक मिळते. तिथल्या महिला अधिकारी तिला सर्वतोपरी सहाय्य करतात. सर्व कागदपत्रे तयार करुन तिला निवृत्तिवेतन मिळवून देतात.त्यानंतर खुद्द राजदूत व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत तिला सन्मानाने व्हिसा, विमानाची तिकिटे देऊन मायदेशी इंग्लंडला जाण्याची संधीही देतात.
या प्रवासात अथक प्रयत्नानंतरही तिचे वडील, भाऊ वां काका, अन्य नातलग यांचा सुगावा मात्र अखेरपर्यंत लागत नाही. ती आपल्या एका मुलीसमवेत २००० सालानंतर लंडनमध्येच राहूं लागते. तिची मुले लंडन, बल्गेरिया, पूर्व जर्मनी अशा ठिकाणी असतात. अधूनमधून ती या ८० वर्षाच्या आपल्या कर्तुत्ववान, धैर्यशील, जिद्दी आईला भेटायला लंडनला येतात.
पुस्तक एका बैठकीत वाचून खाली ठेवताना तिने लिहिलेल्या या हृदयद्रावक आठवणींनी मन हेलावतं, पण ही गोष्ट आहे तिच्या धीराची, असामान्य कष्टाची, आशावादी नि कृतार्थ आयुष्याची आणि पराभव अमान्य करणाऱ्या तिच्या कणखर मनाची हे वारंवार जाणवत राहतं.गुगल स्त्रोताच्या माहितीतून २००३ साली हेलन- अॅलीस डिअर यांचे निधन झाले. एक अप्रतिम जीवनचरित्र.....मन हेलावणारे असेच! ...Read more