Ajinath Gaikwadअनेकांनी आप-आपल्या जिवन कहाण्या लिहल्या. प्रत्येकाची कहाणी वेगळी, प्रत्येकाचा संघर्ष वेगळा. तशीच आहे नांगरणी ही कादंबरी. प्रसिद्ध लेखक व पुणे विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख श्री आनंद यादव सरांचे आत्मचरित्र. त्यांचा जीवनप्रवास झोंबी या कादंबरी पासून ुरु होतो त्यानंतरचा भाग म्हणजे नांगरणी. कणखर सकसता आणण्यासाठी भूमीने स्वतःवर धारदार अवजारांनी आडवे उभे खाऊ घालून घेणे आणि सूर्यभट्टीत अंतर्बाह्य होरपळणे म्हणजेच नांगरणी, उत्तम पिकांच्या समृद्धीसाठी शेत मळ्यावर हिरवी साय साकाळावी, अंगाखांद्यावर गाईगुरांना, माणसाकाणसांना, किड्यामुंग्यांना, चिमण्या-पाखरांच्या इवल्या चोचीना मूठमूठ - चिमूटचिमूट चारा मिळावा, म्हणून भूमीनं स्वतःची केलेली उरस्फोड म्हणजे नांगरणी. नांगरणी या पुस्तकाचे स्पष्ट विवेचन त्यांनी वरील वाक्यात केले आहे. लहानपणी मळ्यात पाचवलेला शेणा -मातीचा वास ते पुणे विद्यापीठात विभाग प्रमुख म्हणून आपल्या केबिनमध्ये असलेला स्वच्छ लखलखीत प्रकाश यातलं अंतर या कादंबरीत आहे. जे ग्रामीण भागात राहून मोठं बनायचे स्वप्न बघत आहे त्या सर्वांसाठी अतिशय प्रेरक व प्रेरणादायी अशी कहानी. परिस्थितीला दोष ना देता त्यातून संघर्षमय वाट काढून फक्त्त आणि फक्त्त ध्येयावर नजर ठेऊन ते खेचून आणण्याची ही कहानी. एक सामान्य मुलगा जिथे शिक्षणाची, राहण्याची, मूलभूत गरजा मिळण्याची सोय नसताना साहित्यातले एक -एक उच्च शिखर गाठतो, ही कहाणीच खूप काही सांगणारी आहे. जे संघर्ष-अवस्थेत आहे, ज्यांना- ज्यांना प्रतिकूल परिस्थितिला झुकवून यश्याच्या शिखरावर अभिमानाने पाय रोवून घट्ट उभे राहायचे आहे त्यांनी -त्यांनी हे आत्मचरित्र जरूर वाचावे. ...Read more
Pravin Vibhuteनांगरणी.. माझी , तुमची आणि प्रत्येक मनांची, प्रत्येकाच्या विचारांची...
काही दिवसांपूर्वी `झोबी` बद्दल लिहील होत. काल `नांगरणी` वाचून पूर्ण झाल. प्रत्येकाने किमान एकदा तरी वाचावं `च` अस.
तुम्ही आम्ही खूपच सुखाचीन आयुष जगतोय हे प्रत्येक पानापानात जणवत.
शिक्षणासाठी केलेला संघर्ष तुम्हाला विचार करायला भाग पडतो.
आनंद यादव यांची वर्णनाची पद्धत प्रत्येक गोष्ट डोळ्यासमोर जशीच्या तशी उभी करते.
नकळत डोळे पाणावतात.
नक्की वाचा. `झोंबी` आणि `नांगरणी` सुद्धा.
त्या अंधारात काळ्या मातीच्या चिखलागत झालेला माझा चेहरा कुणाला दिसत नव्हता.
आई भल्या पहाटे उठली. तिचं जातं घरघरु लागलं नि मला जाग आली. दूर कुणाचं तरी कोंबडं आरवताना ऐकायला येत होतं. गावात नीरव शांतता पसरलेली. घरात भावंडं गाढ झोपलेली. आईच्या जात्याचीच घरघर तेवढी सगळीकडं भरून राहणारी. ठाणवीवर दिवा ठेवून खाली मान घालून ती दळायला बसली होती... लयदार घरघर सुरू झालेली. सगळा सोपा घरघरीनं भरू लागला. सोप्यातली वस्तू नि वस्तू बारीक हदरु लागली. मलाही हलू-हदरु लागल्यासारखं वाटलं.
ल्योक चालला परगावाऽ बाई,
पोशाख अंगी नवाऽ
देवाफुडच्या अंगार्याचाऽ
सोन्या लेकीनो, टिळा लावाऽ
ल्योक चालला परगावाऽ
त्येचा पोशाख अंगी नवाऽ
बैल भुजून मारंल ईऽ धनी,
तुम्हीच दावं लावाऽऽऽऽ.
बाई, म्हंबई शेरातऽ
कुणी देवदूत फुलंऽ
माझ्या लेकाच्या कळीचंऽ
त्येच्या वंजळीत झालं फुलऽऽ –
बाई, म्हंबई शेरातऽ
कुणी देवावणी बयाऽ
माझ्या लेकाची घातलीऽ
न्हाऊ गंगेत तिनं कायाऽऽ
‘सुख सांगावं पित्याला नि दु:ख सांगावं जात्याला
मला सरकारनं कविता लिहिल्याबद्दल बक्षीस दिलं आहे आणि आपल्याला पैसे मिळणार आहेत– हा भाग त्यांना कळला आहे. त्यांना खूप आनंद झाला आहे. त्यासाठी ते माझा घरातच ग्रामीण पद्धतीनं सत्कार करणार आहेत.’’ ‘‘तो आणि कसा काय असतो, बुवा?’’ ‘‘अहो, आज रात्री आई गावाकडं पुरणाच्या पोळ्या नि येळवणीची आमटी करणार आहे.’’
मनासमोर जनावरांच्या दावणीसारखी एक दावण तरळली... हिरा, शिवा, धोंडू, सुंदरा, लक्ष्मी, आनसा ही भावंडं त्या दावणीला बांधलेली. मुकाट कष्टाळू जनावरं. कष्टाच्या अवजारांना कायमची जुंपलेली. मातीतून उगवलेली. मातीत राबणारी. मातीतच वाढून मातीतच विरघळून जाणारी. मातीलाच खतासारखा उपयोग होणारी. पुढची पिढी पिकवायला मदत करणारी... मातीची अखंड कष्टनिर्मिती.
मी जायला निघालो. सगळी भावंडं एका जागी गोळा झाली. वेडीविंद्री, काळी दिसणारी, सुकल्यासुजऱ्या अंगांची, कोरड्या केसांची, फाटक्या कपड्यांची...गरीब शेरडं-मेंढरं. डोळ्यांतपाणी, तोंड रडवेली. तरी माझ्या नीटनेटक्या, स्वच्छ इस्त्रीच्या पोशाखाकडे आदरानंबघणारी. आपलंच एक उजळ रूप पंढरपूरला चाललंय, असं समजणारी... भावंडांच्यात्या वळवळणाऱ्या पुंजक्याचं काय करावं मला क्षणभर कळेना. गलबलल्यागतझालं. आई-दादा त्यांचे दुबळे रखवालदार म्हणून उभे राहिलेले. ...Read more
NEWSPAPER REVIEW‘जीवघेण्या’ साहित्य प्रकाराची मीमांसा…
झोंबी, नांगरणी, घरभिंती आणि काचवेल या चार भागांत ज्यांनी आपले आत्मचरित्र लिहिले आहे, त्या डॉ. आनंद यादव यांनी आत्मचरित्राची वाङ्मयीन व तात्त्विक चर्चा करण्यासाठी ‘प्रस्तुत ग्रंथाचा प्रपंच’ केला आहे. कथा-कादंबरीेक्षा हा साहित्यप्रकार वेगळा कसा, तो वेगळा साहित्यप्रकार म्हणून मानला गेला आहे का, स्वातंत्र्योत्तर काळात आत्मचरित्रे कथा-कादंबऱ्यांपेक्षा जास्त प्रमाणात का आली, तरीही त्यांची एकूण संख्या कमी का, अशा तऱ्हेचे विवेचन कुठेही डॉ. यादव यांना मराठीत आढळले नाही. ही उपेक्षा दूर करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे.
आत्मशोध ही कल्पना भारतीय तत्त्वज्ञानात पूर्वीपासूनच असली, तरी एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासूनच मराठीत आत्मचरित्रे येऊ लागली आहे. त्यामध्ये ‘स्व’चा भौतिक शोध असला, तरी पाश्चात्त्य आत्मचरित्रांपेक्षा ती भारतीय दृष्टिकोनामुळे वेगळी झालेली आहेत. आत्मचरित्र लेखनामागे विविध प्रेरणा असू शकतात. दादोबा पांडुरंग किंवा बाबा पद्मनजी यांच्या आत्मचरित्रांमध्ये वैयक्तिक जीवन गौण स्थानी; तर सामाजिक, सांस्कृतिक कार्याचे इतिवृत्त सांगण्यावर भर होता. सार्वजनिक जीवनात प्रसिद्ध अशा व्यक्ती, आपल्याबद्दल गैरसमज होऊ नयेत म्हणून आत्मवृत्त लिहितात. व्यक्तिगत इतिहास लिहिणे ही काही आत्मचरित्रांची प्रेरणा असते. तर काही भूतकाळात रमण्याच्या उद्देशाने लिहिली जातात. लिखाणाच्या प्ररेणेप्रमाणे त्या त्या आत्मचरित्राला विशेष आकार प्राप्त झालेला असतो.
आत्मचरित्र हा चरित्राचाच उपप्रकार आहे हे आन्द्रे मौरॉज यांचे मत डॉ. यादव यांना मान्य नाही. ‘नायका’च्या व्यक्तिमत्त्वावरून आत्मचरित्रांचे अंतर्मुख व बहिर्मुख असे प्रकार करता येतील. त्यातील पहिला प्रकार वैयक्तिक, प्रापंचिक, आत्मकेंद्रित असा असून सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची आत्मचरित्रे बहिर्मुख स्वरूपाची असतात. लेखनाच्या मांडणीला प्राधान्य देऊन आत्मचरित्रांचे तत्त्वज्ञानात्मक, इतिहासात्मक आणि साहित्यरूपी असे वर्गीकरण करता येईल. बहुसंख्य आत्मचरित्रे इतिहासात्मक वर्गीकरण करता येईल. बहुसंख्य आत्मचरित्रे इतिहासात्मक असतात. कादंबरीच्या स्वरूपात लिहिलेली ‘पोएटिक’ आत्मचरित्रे (श्यामची आई, तुंबाडचे खोत) ही डॉ. यादवांच्या मते कादंबऱ्याच असतात; कारण त्यात काल्पनिक घटना व पात्रे निर्मिलेली असतात. ‘साहित्यरूपात्मक आत्मचरित्र मला आत्मचरित्रच वाटत नाही,’ असे म्हणतात.
निदान ६० वर्षांचे होईपर्यंत आत्मचरित्र लिहू नये, असे सांगून डॉ. यादव म्हणतात की, १९७० नंतर नवजागृत समाजातल्या तरुण पिढीने लिहिलेली आत्मचरित्रे रोचक असली, तरी अर्धकच्ची झाली आहेत.
स्वत:पासून अलिप्त होऊन स्वत:बद्दलचा विचार करण्याची एक विघटनाची प्रक्रिया आत्मचरित्रात असते. घटनाची निवड, रचना, त्यातून आकृतीबंध व नीटसपणा यासाठी प्रतिभेची आवश्यकता असते. त्यात स्मरणशक्ती, संवेदनशक्ती, कल्पकता, उत्कटता इत्यादींचाही सहभाग असतो. आत्मचरित्रातील संभाव्य दोषांबद्दल विवेचन करतानाच ते कसे टाळता येतील, अशीही चर्चा डॉ. यादव यांनी केली आहे. विस्मरण, निवडक स्मरण, वस्तुस्थिती विपर्यास, लज्जास्पद गोष्टी टाळणे असे अनेक धोके या लिखाणात संभवतात. त्यावर कालिक परिणामही होतो. मराठीत आत्मचरित्रांची लाट आल्यावर जी आत्मचरित्रे लिहिली गेली, त्यात उत्साह जास्त, अभ्यास कमी होता. तत्कालीन प्रश्नांना प्राधान्य दिल्याने ती खूप प्रसिद्धी पावली; पण नंतर कालबाह्य ठरली.
‘जो ललित लेखक असतो तो आपल्या कथा, कादंबरी किंवा नाटकात एक प्रकारे आत्मचरित्रच लिहीत असतो... त्यामुळे एखाद्या साहित्यिकाचे समग्र साहित्य हे त्याचे एका अर्थाने परिपूर्ण आत्मचरित्रच असते,’ असे मत जयवंत दळवी यांनी ‘आत्मचरित्राऐवजी’च्या प्रस्तावनेत लिहिले आहे. परंतु डॉ. यादव यांच्या मते प्रत्यक्ष घटना व त्यावर आधारित साहित्यकृती या दोन भिन्न गोष्टी आहेत. त्यामुळे साहित्यिक आत्मचरित्र लिहू शकतो व त्यात त्या त्या घटनांचा साहित्याचा कसा वापर केला हेही सांगू शकतो; परंतु अनेक साहित्यिकांची आत्मचरित्रे फसली आहेत. कारण त्यात जीवनाचा सर्वांगीण अभ्यास दिसत नाही.
‘आत्मचरित्रात्मक कादंबरी’ हा डॉ. यादवांना वदतोव्याघात वाटतो. कारण आत्मचरित्र हे घटित; तर कादंबरी काल्पनिक असते. आत्मचरित्र लिहिण्यासाठी लेखनकौशल्य हवेच. घटनांची काटेकोरपणे निवड न केल्यास ‘कऱ्हेचे पाणी’तल्याप्रमाणे अस्ताव्यस्तपणा येतो. निवडीत अतितटस्थता आली तर ते महर्षी कर्वे यांच्या ‘आत्मवृत्ता’प्रमाणे कोरडे होते. एकाच हेतूने लिहिलेली आत्मचरित्रे संकुचित होतात. उदाहरणार्थ, आनंदीबाई विजापुरे, कांचन घाणेकर, कमल पाध्ये यांची आत्मचरित्रे.
आत्मचरित्रे ही झाडाझडती नसून त्यात घटनांची निवड केलेली असते. निवडीचा दृष्टिकोन लेखकाचा असतो आणि तो मान्य करूनच आत्मचरित्र वाचायचे असते, असे डॉ. यादव सांगतात. ‘आत्मचरित्र हा एका व्यक्तीने स्वत:च, स्वजीवनाचा नेटकेपणाने काढलेला चैतन्यपूर्ण व कलात्मक आलेख असतो’ या वस्तुस्थितीद्वारे आत्मचरित्र समीक्षेची सूत्रे निश्चित करता येतील असे मत मांडून अखेर आत्मचरित्र हा एक जीवघेणा साहित्यप्रकार आहे, असा समारोप डॉ. यादवांनी केला आहे. प्रत्यक्ष जीवन जगलेला ‘मी’ आणि आत्मचरित्र लिहिणारा ‘मी’ यांच्यातील सखोल ताणाचा अपरिहार्य परिणाम अभिव्यक्तीवरही होणारच!
आत्मचरित्रांसंबंधी स्वतंत्र असे हे पहिलेच पुस्तक असले तरी ‘चरित्र आणि आत्मचरित्र’ या श्री. सदा कऱ्हाडे यांच्या ग्रंथात आत्मचरित्रावर एक स्वतंत्र प्रकरण लिहिलेले आहे; परंतु त्यातल्या पहिल्याच वाक्याशी डॉ. यादव सहमत नाहीत. ते वाक्य असे, ‘आत्मचरित्र हा चरित्राचाच एक प्रकार आहे.’ आत्मचरित्रातील सत्यासत्यता हा फारच गुंतागुंतीचा प्रश्न वाटतो. स्वाभाविक विस्मरण, औचित्यासाठी केलेला सत्यापलाप, आठवणींची कल्पनाशक्तीने केलेली भरपाई, इत्यादींमुळे आत्मचरित्रातील सत्य धूसर बनत जाते. चरित्रातील सत्याप्रमाणे ते पडताळून पाहता येत नाही, हे खरेच आहे; परंतु आत्मचरित्राच्या वाचकांनी लेखकावर पूर्ण विश्वास टाकावा, की इतर मार्गांनी त्याच्या लेखनातील खरेखोटेपण शोधून काढावे, हे स्पष्ट होत नाही. त्यामुळेच ‘प्रांजळपणा’ हे मूल्य कसे सिद्ध करता येईल, ते कळत नाही.
‘एका पानाची कहाणी’च्या प्रस्तावनेत आत्मकथा हा लेखनाचा सर्वांत अवघड प्रकार आहे, असे मान्य करून वि. स. खांडेकर म्हणतात की, ‘पूर्ण सत्य सांगता आलं नाही, तरी मर्यादित सत्याला स्पर्श करण्याचा आपण प्रयत्न करावा, असं मला वाटू लागलं,’ आणि म्हणून त्यांनी आत्मकथा लिहिली. तर आत्मचरित्र हा एक लपवाछपवीचा खेळ आहे, असे जयवंत दळवींचे मत असल्याने ते आत्मचरित्राऐवजी लेख लिहितात!
घटनांच्या निवडीइतकेच त्यांचे शब्दांकनही कठीण असते. कारण लेखनसरावाचा आत्मचरित्राला उपयोग होऊ शकत नाही. हे म्हणजे, ‘पहिल्याच बॉलवर षटकार मारण्याची जोखीम’ आहे, अशा योग्य शब्दात डॉ. यादव त्याचे वर्णन करतात. ज्या आत्मचरित्रांमध्ये स्वत:च्या कर्तृत्वाबद्दल अतिशयोक्ती दिसते ती ‘आत्मपूजेची खाजगी देवळे वाटतात’ हे विवेचनही अतिशय नेटके वाटते. तर ‘मनातली मळमळ व्यक्त करण्यासाठी आत्मचरित्रे लिहिणे म्हणजे ढेकूण, डास मारण्यासाठी तोफा डागण्याचा प्रकार असतो’ या विधानात त्यांना आत्मसमर्थनाची वाटणारी चीड व्यक्त होते.
‘विशेषत: स्त्रियांची आत्मचरित्रे संकुचित भावनेने प्रेरित होऊन पूर्व घटनांच्या केवळ स्मरणावर लिहिली जात असावीत.’ हे डॉ. यादव यांचे मत सहजी मान्य होईलसे वाटत नाही. नवजागृत समाजातल्या तरुण पिढीची आत्मचरित्रे आयुष्यात फार लवकर लिहिलेली म्हणून अर्धीकच्ची राहतात, असे डॉ. यादव म्हणतात; तर चंद्रकुमार नलगे व डॉ. गंगाधर पानतावणे यांना असे वाटते की, त्या आविष्काराला आत्मचरित्र न म्हणता आत्मकथन म्हणावे. आत्मचरित्र आयुष्याच्या मावळतीला लिहिली जातात. प्रौढत्वामुळे ती स्थिर व संयमी असू शकतील; परंतु आत्मकथने आयुष्याच्या ऐन उमेदीत लिहिलेली असतात. त्यात तारुण्याच्या तीव्र प्रतिक्रिया असतात. त्यात प्रवाह असतो. आत्मकथने बहुतांशी नाकारलेल्या समाजघटकांनी लिहिलेली आहेत. त्यामुळे त्यांचा सामाजिक संदर्भ महत्त्वाचा असतो. त्यात आत्मपरीक्षण आढळते, इतिहासलेखन नव्हे.
सैद्धान्तिकदृष्ट्या प्रत्येकच जण आत्मचरित्राचा विषय आहे; परंतु प्रत्यक्ष आत्मचरित्र लेखन हा साहित्यप्रकार किती कसोट्यांमधून उतरावा लागतो हे ‘आत्मचरित्रमीमांसा’ वाचल्यावर लक्षात ये, म्हणूनच तो ‘जीवघेणा’ आहे, या डॉ. आनंद यादव यांच्या मताशी आपण सहमत होतो!
-उषा तांबे ...Read more