- NEWSPAPER REVIEW
मन:शांती, आरोग्य, यश, चित्तशुद्धी आणि आध्यात्मिक साधना- यासाठी हवी ध्यानधारणा...
आजच्या धावपळीच्या जीवनात आपले स्वास्थ्य आणि मन:शांती टिकवून धरणे अवघड होत चालले आहे. दैनंदिन ताणतणावांमुळे वेगवेगळ्या व्याधींना तोंड द्यावे लागत आहे. त्यावर तोडगा म्हणू ध्यान, मेडिटेशन, विपश्यना, प्राणायाम, योगासने, नामजप वगैरेंचा अवलंब करण्याचा सल्ला दिला जातो. त्यासाठी शिबिरे घेण्यात येतात. वेगवेगळ्या ध्यानपद्धतींचा पुरस्कार केला जातो. आपण कोणत्या ध्यानपद्धतीचा अवलंब करावा असाही प्रश्न पडतो. मनाचा गोंधळ उडतो.
हा गोंधळ कमी करण्यासाठी शुभदा गोगटे यांचे ‘निरामय यशासाठी ध्यान’ हे छोटे पुस्तक काही प्रमाणात तरी उपयुक्त ठरेल.
स्वत: शुभदा गोगटे गेली काही वर्षे ध्यानधारणा करीत आहेत आणि त्यामुळे मानसिक व शारीरिक दृष्ट्या आपली तंदुरुस्ती टिकून राहिली आहे असे वाटते.
ध्यानामुळे बरे वाटते. मन शांत राहते. आरोग्य व यश यासाठी मन शांत आणि तणावरहित असावं लागतं. आणि त्यासाठी ध्यानाचा उपयोग होतो असा त्यांचा अनुभव आहे. ध्यानधारणेत आपण फार मोठी मजल मारलेली आहे किंवा कुंडलिनी जागृती वगैरे अवस्था गाठलेली आहे असा त्यांचा दावा नाही. एक साधक म्हणूनच ध्यानाबद्दल सर्वसामान्य वाचकांना मार्गदर्शन करण्याच्या हेतूने त्यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे.
प्रथम ध्यान म्हणजे काय या प्रश्नाचे उत्तर त्यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे.
मेडिटेशन व ध्यान हे शब्द त्या समानार्थी वापरतात. ध्यान, चिंतन, मनन, या सर्वांचा त्यात अंतर्भाव होतो. ध्यानामुळे मन शांत होते, चित्त समतोल व स्थिर राहते, रक्तदाब वगैरे व्याधी काबूत राहतात, त्याशिवाय अन्य काही आध्यात्मिक व अतींद्रिय अनुभवही येऊ शकतात. पण त्याकडे अनुषंगिक फायदा म्हणून त्या पाहतात. ध्यानाने मिळणाऱ्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर जास्त आहे. त्यांचा भर ध्यानाने आपली एकाग्रता वाढते, स्मृती सुधारते, चिकाटी वाढते, चित्ताची समधातता साधते, मेंदूतील विद्युत तरंगांची गती संतुलित राहून मन शांत व सजग राहते.
हिंदू धर्मात ध्यानधारणेला महत्त्व आहे. चित्तवृत्तिनिरोध साधणे म्हणजे योग; यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी ही योगाची आठ अंगे असल्याचे महर्षी पतंजली यांनी योगसूत्रात सांगितले आहे.
गौतम बुद्ध यांना ध्यानातून ज्ञानप्राप्ती झाली व ‘बौद्धत्व’ लाभले. फालुन गाँग (धर्मचक्राचं पालन करण्यासाठी ध्यान), झेन बुद्धिझम, विपश्यना असे वेगवेगळे ध्यान प्रकार बौद्धधर्मात आढळतात.
जैन धर्मातही सामायिक ध्यान पद्धतीला महत्त्व आहे.
महर्षी महेश योगी यांनी ट्रॅन्सेंडेंटल मेडिटेशन (टीएम) भावातीत ध्यान या पध्दतीचा पुरस्कार केला. गुरूने शिष्याला बीजमंत्र देणे व मनोमन वा मोठ्याने त्याचा उच्चार करीत मंत्राच्या ध्वनीवर लक्ष केंद्रित करणे हे याद्वारे रिलॅक्सेक्शन साधते आणि उच्च रक्तदाब, हृदयविकार, मानसिक तणाव, जन्मव्याधी यांची तीव्रता कमी होते असे प्रयोगान्ती सिद्ध झाल्याचा त्यांचा दावा आहे.
ओशो रजनीश हे ध्यान हाच धर्म मानतात. स्वर्षाप्रकाश ध्यान, विसावा ध्यान हे प्रकार त्यांनी प्रचलित केले,
सिल्व्हर माइंड कंट्रोल पद्धत आणि कल्पनाचित्रण पद्धत या विशिष्ट हेतू मनात ठेवून त्यांच्या प्राप्तीसाठी वापरल्या जातात. डॉ. ऑर्निश हे हृदयरोग्यांसाठी कल्पनाचित्रण पद्धतीचा वापर करतात.
ध्यानामुळे मानसिक ताणतणाव, उच्च रक्तदाब, निद्रानाश, तोतरेपणा, डोकेदुखी, व्यसनासक्ती यात घट होते. तर शांतपणा, आशावाद, उत्साह, सकारात्मक दृष्टिकोन, स्वयंशिस्त, आत्मसन्मानाची भावना यात वाढ होते.
ध्यान कुठे करावे, किती वेळ करावे, कसे करावे, ध्यान करताना कोणते आसन घालून बसावे, श्वासोच्छ्वासावर लक्ष कसे केंद्रित करावे, ध्वनी, अंत:प्रतिमा, मूर्ती वा प्रतिमा यावर लक्ष केंद्रित केल्यास काय होते, शरीरांतर्गत षट्चक्रे कोणती, ध्यानाने त्यांच्यातील सुप्त शक्तीला जाग कशी येऊ शकते वगैरे शंकांचेही समाधान पुस्तकात करण्यात आले आहे.
ध्यानधारणेच्या प्रसारासाठी आज अनेक संस्था जागतिक पातळीवर कार्यरत असून त्यांचा व्याप प्रचंड वाढलेला आहे. रुग्णालयांमध्येही इतर औषधांबरोबर ध्यानधारणेचाही उपचार आता मान्यता मिळवत आहे. हे पुस्तक ध्यानधारणेची सर्व अंगे वाचकांना स्पष्ट दाखवणारे असल्याने उपयुक्त ठरेल. ...Read more
- DAINIK TARUN BHARAT 08-09-2002
आजच्या धकाधकीच्या जीवनात शांतता लाभणे दुरापास्त झाले आहे. प्रत्येकजण अस्वस्थतेने पछाडलेले आहे. अशा कंटाळलेल्या परिस्थितीत दोन चार का होईना शांततेचे, आनंदाचे क्षण अनुभवावे असे प्रत्येकालाच वाटते. हे शांततेचे क्षण अनुभवण्याचा मार्ग म्हणजे ध्यानधारणा. धयानधारणा ही काळाची गरज बनली आहे. मानसिक व शारीरिक आरोग्य टिकवायचे असेल तर ध्यानधारणा महत्त्वाची आहे. ध्यान, योगविद्या हा आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीचं आपल्याला दिलेला समृद्ध वारसा आहे. ध्यानधारणा ही आध्यात्मिक उन्नतीसाठी, परमेश्वराच्या चरणी लीन व्हावं यासाठी करायची साधना आहे. ध्यान करण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्या नीट समजावून घेणे महत्त्वाचे आहे.
‘निरामय यशासाठी ध्यान’ हे शुभदा गोगटे यांचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. शहरी जीवनात माणसाला सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या समस्यांची मांडणी उदाहरण देऊन स्पष्ट केली आहे. सध्या समाजात दिसणारं एकूण ‘लढा किंवा पळा’ ही यंत्रणा शरीरात कशी कार्यरत होते याबद्दल लेखिकेले सांगितले आहे. हार्मोन्सच्या वाढत्या पातळीमुळे शरीरावर होणाऱ्या परिणामांची जंत्री लेखिकेने दिली आहे. दैनंदिन जीवनात ताणतणाव वाढले आहेत. मात्र ते कमी करणं आपल्या हातात आहे आणि त्यासाठी ध्यान ही गुरूकिल्ली आहे असे लेखिका म्हणते. नियमितपणे रोज व्यायाम करणं किंवा एखादा खेळ खेळणं याने निश्चितपणे शारीरिक आणि मानसिक फायदे मिळतात. मनावरचे ताण कमी व्हायला त्यामुळे मदत होते. म्हणूनच सर्वांनी रोज व्यायाम करावा किंवा एखादा खेळ खेळावा हे उत्तम असा सल्ला शुभदा गोगटे यांनी दिला आहे. ध्यानामुळे लक्ष केंद्रित करणे आणि ते एका ठिकाणी अधिक काळ स्थिर ठेवणं यात सुधारणा होते, सततची जुनाट दुखणी हाताळण्यासाठी ध्यानाची मदत होते असे आढळून आले आहे.
विविध ध्यानपद्धतीचा उल्लेख करताना नियम आसनं यांचा उल्लेख केला आहे. धारणेबद्दलही लेखिकेने माहिती दिली आहे. त्यामध्ये समाधी, बौद्ध ध्यान, झेन ध्यान, फालुन गाँग, विपध्यना, जैन ध्यान यांची माहिती दिली आहे. आध्यात्मिक उन्नतीसाठी, परमेश्वराच्या चरणी चित्त लीन व्हावं यासाठी करायची साधना आहे. ध्यान करण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्या नीट समजावून घेणे महत्त्वाचे आहे.
काही आधुनिक ध्यानपद्धती आणि पुरस्कर्ते ओशो रजनीश, स्वर्णप्रकाश ध्यान, विसावा ध्यान यांचा उल्लेख लेखिकेने केला आहे.
ध्यान करायचं म्हटलं की ते कसं करावं, केव्हा करावं, कशासाठी करावं असे अनेक प्रश्न तुमच्या मनात उपस्थित होतील; परंतु त्यांचीही उत्तरे देवून वाचकाचं समाधान केलं आहे.
काळानुरूप बदलताना आपण स्तोत्र म्हणणं, पूजा करणं, जप करणं यासारख्या गोष्टी विसरलो. परंतु या गोष्टी मन:शांतीसाठी महत्त्वाच्या आहेत असे लेखिका सांगते.
मन:शांती, आरोग्य, त्यातून यश, चित्तशुद्धी, अध्यात्माची ओढ या सगळ्या गोष्टी एका ध्यानामुळे टप्प्या टप्प्यानं साधू शकतात. दुखणं कमी व्हावं किंवा नोकरी-धंद्यात यश मिळावं इतक्या साध्या सांसारिक हेतूनं आपण ध्यान करत राहिलो तरी त्यातूनच त्या पलीकडचं बरंच काही मिळत जातं, जाणवत जातं आणि ध्यान आनंददायी होतं असं लेखिका सांगते. ...Read more
- DAINIK SAMANA 22-09-2002
शहरातील स्पर्धेच्या वाढत्या धावपळीच्या आयुष्यात माणसाच्या शरीरमनावर सतत ताण पडत असतो. त्यामुळे ब्लडप्रेशर, हृदयविकार, डायबिटीस असे अनेक आजार उद्भवतात. हा ताण दूर करून मनाला आणि शरीरालाही शांतता प्राप्त करून देण्यासाठी योग, ध्यानधारणा अशा प्राचीन परंपांकडे आता आपण पुन्हा जात आहोत. ध्यान हे ऋषीमुनींनी करायचे आणि तेसुद्धा ईश्वरप्राप्तीसाठी ही समजूत काही वर्षापूर्वीपर्यंत होती. पण ‘मोडेशन’ या शब्दाने किमया केली आणि ध्यान ही पर्यांयी उपचार पद्धती म्हणून वापरली जाऊ लागली. शुभदा गोगटे यांचे निरामय यशासाठी ध्यान हे पुस्तक घरच्या घरी ध्यान करू इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल असेच आहे. ध्यानामुळे ताण कमी होतात, स्मरणशक्ती सुधारते, लक्ष केंद्रित करण्याची शक्ती वाढते, जुनाट दुखणी बरी व्हायला मदत होते असे अनेक फायदे होतात. शिवाय त्यात शारीरिक मेहनत नसल्याने ते कुणालाही करता येते. शुभदा गोगटे यांनी लिहिलेल्या पुस्तकात ध्यान हे फक्त हिंदू धर्मातच नाही तर अन्य धर्मातही असल्याचे म्हटले आहे. विविध ध्यान पद्धती आणि त्यांचे पुरस्कर्ते या प्रकरणात महर्षी महेश योगी, ओशो, होजे सिल्व्हा आदी गुरूंच्या ध्यानपद्धतीची माहिती आहे. ध्यान केव्हा, कसे आणि का करावे? तसेच ध्यान कोणी व केव्हा करू नये हेही यात दिल्याने ध्यान जमत नसतानाही नेटाने करणाऱ्यांना त्याचा पुनर्विचार करावा लागेल. ध्यानातील कल्पनाचित्रे आणि सकारात्मक भावना यांचा उपयोग शारीरिक दुखणी कमी करण्यासाठी होतो हे अभिनव तंत्र अलीकडे विकसित झाले आहे. ...Read more
- NEWSPAPER REVIEW
ध्यान म्हटलं की पद्मासन घालून आणि डोळे मिटून बसलेल्या जटाधारी साधूची मूर्ती आपल्या मन:चक्षूंसमोर उभी राहते. ध्यान-धारणा या गोष्टी आध्यात्मिक विकासासाठी करायच्या असतात. आपली सांसारिक कर्तव्ये नीटपणे पार पाडल्यावर मग उतरत्या वयात या गोष्टींकडे लक्ष देत येतं, तोपर्यंत त्यासाठी वेळच नसतो आणि ध्यान करण्याची गरजही नसते अशी आपली समजूत असते.
पण, ध्यान हे सर्वसामान्य व्यक्तीनाही लाभदायक असतं हे अनेक प्रयोगांनी दिसून आलेलं आहे. नियमित ध्यानामुळे मानसिक ताण, रक्तदाब, निद्रानाश अशी दुखणी कमी होतात. मन शांत होतं. आशावाद, आत्मविश्वास या गोष्टी वाढीस लागतात. स्वस्थ शरीर आणि शांत मन यांमुळे कार्यक्षमता वाढते, यश सहजसाध्य होतं. आपलं ध्येय कुठलंही असलं तरी ते प्राव्त करून घेण्यासाठी ध्यानाची मदत होते.
ध्यानाचे अनेक प्रकार, अनेक पद्धती आणि अनेक गुरू आहेत. त्यांची थोडक्यात माहिती या पुस्तकात दिलेली आहे. आपल्या धकाधकीच्या आणि व्यस्त अशा दिनक्रमातून थोडासा वेळ काढून ध्यान कसं करावं हेही सांगितलेलं आहे. ध्यानासाठी योग्य अशी जागा, वेळ, आसन यांची सविस्तर चर्चा केलेली आहे.
निरामय यशासाठी ध्यान
शहरातील स्पर्धेच्या, वाढत्या धावपळीच्या आयुष्यात माणसाच्या शरीर-मनावर सतत ताण पडत असतो. त्यामुळे ब्लडप्रेशर, हृदयविकार, डाबिटीस असे अनेक आजार उद्भवतात. हा ताण दूर करून मनाला आणि शरीरालाही शांतता प्राप्त करून देण्यासाठी योग, ध्यानधारणा अशा प्राचीन परंपरांकडे आता आपण पुन्हा जात आहोत. ध्यान हे ऋषीमुनींनी करायचे आणि तेसुद्धा ईश्वरप्राप्तीसाठी. ही समजूत काही वर्षांपूर्वीपर्यंत होती. पण ‘मेडिटेशन’ या शब्दाने किमया केली आणि ध्यान हे ही पर्यायी उपचार पद्धती म्हणून वापरली जाऊ लागली. ध्यानाची शिबिरे आता फार मोठ्या प्रमाणावर व्यावसायिकही घेण्यात येऊ लागली. शुभदा गोगटे यांचे निरामय यशासाठी ध्यान हे पुस्तक घरच्या घरी ध्यान करू इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल असेच आहे. ध्यानामुळे ताण कमी होतात, स्मरणशक्ती सुधारते, लक्ष केंद्रित करण्याची शक्ती वाढते, जुनाट दुखणी बरी व्हायला मदत होते असे अनेक फायदे होतात. शिवाय त्यात शारीरिक मेहनत नसल्याने ते कुणालाही करता येते. शुभदा गोगटे यांनी लिहिलेल्या पुस्तकात ध्यान हे फक्त हिंदू धर्मातच नाही तर अन्य धर्मातही असल्याचे म्हटले आहे. विविध ध्यान पद्धती आणि त्यांचे पुरस्कर्ते या प्रकरणात महर्षी महेश योगी, ओशो, होजे सिल्व्हा आदी गुरूंच्या ध्यानपद्धतीची माहिती आहे. ध्यान केव्हा, कसे आणि का करावे? तसेच ध्यान कोणी व केव्हा करू नये हेही यात दिल्याने ध्यान जमत नसतानाही नेटाने करणाऱ्यांना त्याचा पुनर्विचार करावा लागेल. ध्यानातील कल्पनाचित्रे आणि सकारात्मक भावना यांचा उपयोग शारीरिक दुखणी कमी करण्यासाठी होतो हे अभिनव तंत्र अलीकडे विकसित झाले आहे.
ताणतणावमुक्तीसाठी ध्यानधारणेचे महत्त्व
‘ध्यान-मेडिटेशन’ हा आजच्या काळातील सर्वांच्या आकर्षणाचा विषय झाला आहे. गावोगाव ठिकठिकाणी ध्यानधारणा शिबिरांचे आयोजन केले जाते. त्यामुळे या विषयाची ज्यांना जिज्ञासा किंवा उत्सुकता आहे, त्यांच्यासाठी सुबोध विवेचन करून या छोट्याशा पुस्तिकेत एकूण पाच प्रकरणात हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
पहिल्या प्रकरणात ‘ध्यान’ की ‘मेडिटेशन’ याची चर्चा केली आहे. ‘ध्यान आणि मेडिटेशन हे शब्द बरेचसे समानार्थी आहेत; पण खरे म्हणजे मेडिटेशन’ या शब्दाला प्रतिशब्द धारणा हा होईल. एखाद्या वस्तूच्या किंवा विषयाच्या ठिकाणी चित्त स्थिर करणे म्हणजे धारणा. अशी धारणा नित्यनियमाने करीत गेलो, तर त्यातून ध्यान साधते,’’ असे लेखिकेने म्हटले असले तरी पुढे म्हटले आहे की ‘मेडिटेशन’ या शब्दाला ‘ध्यान’ हा प्रतिशब्द हल्ली सर्रास वारला जातो. त्यामुळे या पुस्तकातही हे दोन शब्द समानार्थी वापरले आहेत.
ध्यान हे आपल्या आनंदी जगण्याचे एक द्वार आहे. ध्यान हे केवळ आध्यात्मिक पातळीवर न राहता त्याच्याकडे एका वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही बघितले जावे, असे अनेकजण म्हणतात. ध्यान ही मनाची अवस्था आहे. मानसिक बळ वाढविण्यासाठी ध्यान जणू औषधाचेच काम करते. भगवान रजनीश, महर्षीमहेश योगी, रविशंकरमहाराज आणि आसारामजीमहाराज आणि साधू संतांनीही आपल्या उपदेशात ध्यानाचे स्थान श्रेष्ठ मानले आहे. स्वामी विवेकानंदापासून मोठ्या प्रमाणात सुरू झालेली ही परंपरा आजतागायत सुरू आहे. ध्यान करण्याच्या विविध पद्धतींचा उल्लेख करून त्यांपैकी काहींची माहिती आणि घरच्या घरी ध्यान कसं करावं ते या पुस्तकात सांगितले आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केल्याप्रमाणे योग्याची सुखावस्था ज्या साधनाने प्राप्त होते ते म्हणजे ध्यान होय. ज्ञानेश्वरीतील सहाव्या अध्यायात कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासंबंधीचे जे विवेचन ज्ञानेश्वरांनी केले आहे ते म्हणजे ध्यानाचे तत्त्वज्ञानच होय. गुळवणीमहाराजांच्या चरित्रात ते साधना करीत असताना कुंडलिनी जागृतीच्या विविध अवस्थेत भ्रामरी व जमीन सोडून वर उचलले जाणे, असे वेगवेगळे अनुभव त्यांना येत असतं. आणि निर्विकल्प समाधीही लागत असे, असे लिहिलेले आहे. आध्यात्मिक कामासाठीच नव्हे, तर ऐहिक जीवनात यशस्वी झालेल्या अनेक थोर पुरुषांच्या जीवनात ध्यानाला महत्त्व लाभले आहे. उद्योगपती, कारखानदार, राजकारणी, अशा थोरांची आत्मचरित्रे वाचली म्हणजे ध्यानाचे त्यांनी किती महत्त्व मानले आहे हे लक्षात येते. जीवनाच्या वाटचालीत यशासाठी ध्यानाची मदत होते. ध्यान हे केवळ आध्यात्मिक उन्नतीसाठीच नव्हे, तर शारीरिक आणि मानसिक व्याधी दूर करण्यासाठीसुद्धा उपयुक्त आहे. वैज्ञानिक कसोट्यांवरसुद्धा हे सिद्ध होत आहे. त्यामुळेच तर मानसिक ताण-तणावातून मुक्त होण्यासाठी ध्यानाचा पुरस्कार केला जातो. महाराष्ट्र सरकारने पोलिस अधिकाऱ्यांसाठी ध्यान आवश्यक मानून मुंबईमध्ये तयासाठी खास सोय-सवलत उपलब्ध केली आहे. या पुस्तकात शरीरातील आज्ञाचक्र, आज्ञाहातचक्र, मूलाधारचक्र यांचे स्थान दर्शविणारा वेगवेगळ्या मूर्ती आणि चिन्हे (लक्ष केंद्रित करण्यासाठी) तसेच पद् मासन सिद्धासन, इ. आसने इ. ची चित्रे दिली आहेत. ध्यान केव्हा, कसं करावं, यांच्या तपशीलवार सूचना दिल्या आहेत. अशा तर्हेने सध्याच्या ताण-तणावापासून मुक्त राहण्यासाठी म्हणजेच निरामय यशासाठी ध्यानाचे सुबोध विवेचन करणारे हे पुस्तक उत्तम मार्गदर्शक आहे. ...Read more