- DAINIK KESARI 20-10-1996
‘लज्जा’ ह्या कादंबरीमुळे बहुचर्चित बंगाली लेखिका तसलिमा नसरीन यांच्या ‘निर्बाचितो कलाम’ या मूळ बंगाली पुस्तकाचा अनुवाद, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे यांनी ‘निर्बायित कलाम’ या नावाने प्रकाशित केला आहे. ‘निर्वाचित कलाम’ म्हणजे ‘निवडक लेख’ अनुवादिका आहेत ृणालिनी गडकरी.
पुरुष प्रधान समाजात स्त्रीचे अधिकार आणि स्त्री मुक्ती ह्याविषयी जे काही बोललं जातं, त्यामध्ये बांगला देशाच्या लेखिक तसलिमा नासरीन यांचा आवाज नि:संशय सर्वाधिक वरचा आणि सर्वात अधिक खळबळ माजवणारा आहे.
रुढी न मानणाऱ्या वादविवाद पटू आणि स्पष्टवक्त्या तसलिमा नासरीन ह्यांच्या या पुस्तकामुळे बांग्लादेशात प्रचंड वादळ उठले आणि त्यामुळे त्या चर्चेच्या केंद्रबिंदू ठरल्या.
या धक्कादायक पुस्तकाला ‘आनंद पुरस्कार’ मिळाला आहे. या पुस्तकामध्ये लेखिकेने आपल्या बालपणापासून मनावर कोरल्या गेलेल्या आठवणी कोणताही आडपडदा न ठेवता संग्रहीत केल्या आहे, निखळ प्रामाणिकपणे.
तोंडाची चव गेलेली असतांना झणझणीत ‘खरडा’ खायला मिळावा, तसा अनुभव हे पुस्तक वाचताना येतो. भल्या थोरल्या लेखाचा डोंगर पोखरून उंदीर काढण्यापेक्षा मुळातच ‘पिटुकले’ लेख लिहून डोंगराएवढा आशय त्यात सामावण्याची किमया ह्या निवडक लेखांनी साधली आहे.
तसलिमा नासरीन ह्यांनी आपले विचार स्पष्ट आणि बिनधास्तपणे, कोणताही विधिनिषेध न बाळगता मांडले आहेत. पुस्तकाचे कोणतेही पान उघडून वाचले तरी आपण संदर्भहीन असं काहीतरी वाचतो आहोत, असं वाटत नाही. वरचा मजला कार्यान्वित असलेल्या प्रत्येकाच्या मेंदूला झिणझिण्या असाच एकूण सारा प्रकार आहे. स्व. देशीय धर्मलंड त्यांच्या जिवावर का उठले? ह्या प्रश्नांचं उत्तर ह्या लेखातून मिळते.
आपल्या धर्मात, समाजात, इतक्या अन्यायकारक घडामोडी चाललेल्या असतात, याची कल्पना स्वत:भोवती केबल संस्कृतीचा कोष विणून बसणाऱ्या सुरवंटी माणसांना कधीच येत नाही. अनेक अवतरणे उर्धृत करून त्यांचे खंडन-मंडण लेखिकेने केले आहे. अनेक धार्मिक ग्रंथांचे संदर्भ देऊन आपल्या सर्वंकष वाचनाचे पुरावे सादर केले आहेत. प्रत्येक लेखाचा चमत्कार शेवट हेही एक वैशिष्ट्य आहेच. कोणत्याही लेखाला शीर्षक नाही, हे एक बरं. नाहीतर शीर्षकाशी संबंधीत असं काहीतरी त्या लेखात शोधण्याचा प्रयत्न वाचक करतो. पुस्तकाचे शीर्षक हेच प्रत्येक लेखाचं शीर्षक ठरावं इतकं ‘निर्बाचित कलाम’ हे शीर्षक अर्थपूर्ण आणि चपखल आहे.
तर्कसंगत, तीव्र, उपरोधिक विवेचन ज्याला ‘पोटतिडिक’ हाच शब्द योग्य वाटतो. प्रत्येक लेख मुळातूनच वाचल्याशिवाय याचा प्रत्यय येणार नाही.
-घन:श्याम धेन्डे ...Read more
- DAINIK SAKAL 05-05-1996
निर्बाचित कलाम : पुरुषी वर्चस्वाला सुरुंग लावणारा ग्रंथ...
एखाद्या ‘कॅडलियोस्कोप’मधून पाहिलं असता रंगीबेरंगी काचांच्या नयनमनोहर आकृत्याचं दर्शन घडतं. एक रचना पुन्हा जशीच्या तशी जुळून न येता नवीनच आकृती उभी राहते. नेमका अशाच प्रकारच्या वाचतानुभव तसलमा नासरीन यांच्या ‘निर्बाचित कलाम’ (निवडक स्तंभ) या ग्रंथात येतो. घरी तयार केलेल्या कॅडलियोस्कोपमध्ये बांगड्यांच्या चित्रविचित्र काचाचा वापरल्या जातात. स्वत:ला ‘माणूस’ म्हणवून घेणाऱ्या आणि स्त्रियांना ‘माणूस’ न मानणाऱ्या समाजाच्या मोठ्या भागात कोणकोणत्या विचारधारा आहेत, याचा शोध घेणाऱ्या तसलिमा नासरीन या ग्रंथात स्त्रीसंबंध भावभावना, व्यथावेदना आणि आशा-आकांक्षा यांचं दर्शन घडवतात. तथाकथित ‘वङ्काचुडेमंडित’, ‘कंकणधारिणी’, ‘सौभाग्यवती’, ‘गृहस्वामिनी’ स्त्रीच्या स्थितीगतीचा शोध आणि बोध इथं मांडला आहे. एकूण ७८ लघुलेखांतून किंवा टिपणांमधून लाक्षणिक अर्थानं, स्त्रीच्या हातातल्या पारंपरिक बांगड्यांच्या काचांची तोडमोड करून तिच्या रूपाचा अंतर्बाह्य वेध घेतला आहे. ‘स्त्री ही माणूस आहे, याची तिला स्वत:ला आणि समाजाला जाणीव झाली पाहिजे. तिचा जीवनस्तर उंचावला पाहिजे. तिला मिळणारी वागणूक बदलली पाहिजे या स्त्रीवादी सूत्रात सर्व लेखन माळलेलं आहे. या सूत्राचा अनेकांगी अनेक पदरी विस्तार साधार, सोदाहरण केला आहे. हे सूत्र आत्मप्रत्ययान आणि स्व-स्वतेर निरीक्षणानं अधोरेखित केले आहे.
निर्बाचित कलाममधील लेखन वृत्तपत्रीय थाटणी सोडून निर्मितीची अस्सल नानाविध रूप पाहता पाहता धारण करत. त्यात आत्मकथनाचे अंश विपुल प्रमाणात आहेत. काही लघुलेख ललित निबंधांच्या किंवा लघुकथेच्या अंगाने साकार झाले आहेत. काही ठिकाणी गद्यकाव्य, नाट्यकाव्य यांचा प्रत्यय येतो. ग्रंथ, व्यक्ती, समाज, संस्कृती, इतिहास, परंपरा यांचा परामर्श घेत घेत तसलिमा नासरिन आपलं ‘स्त्री’विषयक मनोगत मांडतात. प्रतिभा संपन्न लेखनाला साहित्य प्रकारची लेबल लावताच येत नाहीत. लेखिकेनंही शीर्षकांचा मोह टाळला आहे. त्यामुळं वाचून झालं त्याचं पुर्विलोकन केलं, तर कधी कथा वाचल्याचा, तर कधी ललित निबंध वाचल्याचा अनुभव येतो. गीता, कुराण, रामायण, वेद वाङ्मय आदीचे संदर्भ काही ठिकाणी पेरलेले असले, तरी हे लेखन पांडित्याचा प्रत्यय देण्याऐवजी लालित्याचीच प्रचीती देतं. अस्मिता, तरलता, काव्यात्मकता, भावनात्मकता, संवेदनशीलता आदी निर्मिती विशेषांचं दर्शन या पुस्तकात घडतं. म्हणनूही त्याला कॅडलियोस्कोप म्हणावंसं वाटतं.
The strongest man in the world is the man who stand most alone (१३२) हे इब्सेननं सांगितलेलं लक्षण तसलिमा नासरिन यांच्या साहित्यिक व्यक्तिमत्त्वाचं वर्णन करणारे आहे. म्हणूनच या अंगभूत वैचारिक व भावनिक अलिप्ततेमुळे ज्ञानाचे कुंपण ओलांडून स्त्रीजीवनाचा समग्र परामर्श घेऊ शकतात. ‘माझा कोणताही गट नाही मी एकटीच आहे, माझी कोणतीही संघटना नाही. संस्था नाही, समिती नाही, परिषद नाही, मी जे लिहिले ते स्वत:च्या जबाबदारीवर लिहिते. असं त्या म्हणतात. भय आणि द्विधा मन:स्थिती हे स्त्रीचे मोठे शत्रू असून तिनं दुसऱ्याच्या आधारानं उभ्या राहणाऱ्या वेलीऐवजी ताठ वृक्षाप्रमाणे बळकट उभं राहावं, असं त्यांना वाटतं. (६६) कारण स्त्रीची धारणक्षमता फार मोठी आहे. स्वत:च्या शरीरात आणखी एक शरीर धारण करण्याची क्षमता जी स्त्रीत आढळते, तिच्यासमोर जगातील सर्व निर्मिती तुच्छ ठरते. ती आपल्याप्रमाणेच आणखी एक अस्तित्व स्वत:मध्येच निर्माण करू शकते. या क्षमतेची तुलना दुसऱ्या कशाशीच होऊ शकत नाही.’ (१२६) शब्दांना शस्त्रासारखं परजणं ही तस्लिमा नसरत यांची खासियत आहे.
आपलं जन्मगाव मयमनसिंह आणि आईवडिलांनी केलेली जडण-घडण यावर त्यांनी हृदयस्पर्शी भाष्य केलेलं आहे. आईची धर्मश्रद्धा त्यांनाच तसूभरही उतरली नाही, उलट कान टोचले म्हणून बाबा रागाने लाल झाले. तस्लिमानं घातलेल्या दोन डझन बांगड्या त्यांनी संतापून फोडायला लावल्या. लीपस्टीक पावडर, कुंकू-काजळ या सौंदर्य प्रसाधनांना विरोध केला. अभ्यास आणि वाचनाची सवय लावली. (६५) त्या डॉक्टर होऊन स्वावलंबी झाल्या. लबाड, लंपट, फसव्या पुरुषाबरोबर संसार न मांडल्यामुळे ‘स्वप्नभंग’ झाला नाही. ‘मी माझी बुद्धिमत्ता़ व्यक्तिमत्त्व, मानवता यांना फार मौल्यवान मानते.’ (१०८-३६) ‘माझ्या प्रतिभेशी एकरूप होणारा कुणीही नाही. माझी बुद्धी आणि मनाचं फार मोठं सौंदर्य समजावून घेण्याची योग्यता इथल्या पुरुषात नाही.’ (१४३-५१) अशा प्रकारच्या विखुरलेल्या विधानांवरून तसलिमा नासरिन यांच्या जगप्रसिद्ध वादळी व्यक्तिमत्त्वाचं रहस्यही उलगडत जातं.
श्वेतर स्त्रीविश्वाचं अतिशय मार्मिक आणि भेदक चित्रण या ग्रंथात केलेले आहे. स्त्रीला गर्दीमध्ये होणारे लाघट पुरुषी स्पर्श, पुरुषांकडून ऐकावे लागणारे शेरे-ताशेरे, स्त्रीसंबद्ध ‘अनाघ्रात’सारखे शब्द व ‘फुलाप्रमाणे पवित्र व सुंदर सारख्या उपमा (७५) स्त्रीची स्वत:कडे पाहण्याची भूमिका, समाजाची पुरुषी, बुभुक्षित दृष्टिकोन, धार्मिक ग्रंथातले पुरुषी वर्चस्वाला भक्कम करणारे आधार (विशेषत: मकछुदोल मोट मेमीन, हादीस कुराण) यांचं मुक्त चिंतन आणि वेधक परामर्श त्यांनी घेतला आहे. हिंदू धर्मातल्या कुमारिकांसाठी सांगितलेल्या शिवव्रत, पुण्यीपुकर व्रत, दश पुतल व्रत, हरिचरण व्रत, अश्वस्थ व्रत, सेंलुलिर व्रत, तूंष तुषली व्रत यांची चर्चा करून त्यांची निरर्थकता स्पष्ट केली आहे. (७८) स्त्रीच्या शरीरात गर्भाशय असतं. पण गर्भाशयावर तिची सत्ता नसते. स्त्रीत्व मातृत्व यांच्या प्रचलित व्याख्या पुरुषानं स्वत:च्या स्वार्थासाठी बनविलेल्या आहेत.’ (२३६) ‘स्त्रीचं चारित्र्य ही एक विलक्षण गोष्ट आहे. शारीरिक संबंधावरून ते चांगलं की वाईट हे ठरवलं जातं हीच त्याची मापन पद्धती आहे. प्रसार करायला चारित्र्यासारखी गोष्ट नाही. (२३२) (बांगला देशात) पुन्हा एकदा मुक्तिसंग्राम व्हायला हवा. असंख्य बलात्कार झाल्यावरच बलात्कारित स्त्रिया मान वर करून अतिशय तिरस्कारनं असभ्य पुरुषांची नाव सांगू शकतील. मुक्तिसंग्रामानं अनेकांना खूप काही दिलं. स्त्रीला काय दिलं? (२३०) ‘पुरुषाला खुद्द अल्लानंच सवलती दिल्यात तो का बरं घेणार नाही?’ (२२७) ‘स्त्री ही जन्मत: संपूर्ण स्त्री नसते. लज्जा आणि लज्जेची सतत वाढणारी भावना तिला पूर्णपणे स्त्री बनवते. (२१९) ‘पतित’ लोकाचं निर्मूलन न झाल्यास ‘पतिता’चा जन्म होत राहणार. (२१७) ‘स्त्री म्हणजे कवेळ एक मासाचा गोळा. या मासाच्या गोळ्याशी पुरुष खेळ करतात आणि त्यांच्या खेळात आनंद निर्माण व्हावा म्हणून या मासाच्या गोळ्याला निरनिराळे आकारधारण करावे लागतात. (२११) ‘स्त्रीला विकाऊ वस्तू बनविण्याविरुद्ध, वेश्यावृत्तीविरुद्ध स्त्रीच्या क्षुद्र, तुच्छ कौटुंबिक गुलामगिरीविरुद्ध, इतिहासात जो स्वर सर्वात वरचा होता तो लेजिनचा होता. त्याच इतिहासाला आज नालायक लोकांनी पायाखाली तुडवलंय. त्यामुळे स्त्रीचं नुकसान सर्वांत जास्त झालंय, हे निश्चित (२०८) ‘स्त्री सर्व ऋणांतून मुक्त व्हावी. हे ऋणच स्त्रीला माणूस होऊ देण्यातील एकमात्र अडचण आहे. नाना ऋणात स्त्रीला जखडून तिला ‘माणूस’ होण्यापासून दूर ठेवण्याचा समाजाचा हा खूप पूर्वीपासूनचा संघटित कट आहे.’ (१६८) ‘स्त्री जोपर्यंत पुरुषाला फाडून खाणार नाही, पुरुषाचं शरीर म्हणजे एक मासाचा गोळा समजून त्याचा उपभोग घेणार नाही. तोपर्यंत स्त्रीच्या तनमनातून ‘पुरुष म्हणजेच परमेश्वर’ हा पारंपरिक संस्कार दूर होणार नाही. स्त्रीनं बलात्कार करायला शिकलं पाहिजे. व्यभिचार करायला शिकलं पाहिजे. स्त्री ‘भक्षक’ झाल्याशिवाय तिच्यावरचा ‘भक्ष्या’चा डाग धुवून जाणार नाही.’ (१४५) अशा काही प्रातिनिधिक अवतरणांवरून तसलिमा नासरिन यांच्या विचार शलकांची भेदकता लक्षात येते. त्यातही दाहकता स्त्री पुरुषयुक्त समाजाला सारखीच जाळणारी आहे.
लेनिन, ईश्वरचंद विद्यासागर, रवींद्रनाथ टागोर, दलमिरा आगुस्लिनी (उरुग्वे) ज्युलिया द. बारजोस, जुमाना फर्नांडिस, मिरिदा नाईत आतिक, (मोरोको) एडिथ शोंडारंगॉ (सेंट पिटस बर्ग) (सर्व कवयित्री) यांचे संदर्भ व काव्याची रसग्रहणं या पुस्तकात आहेत. रामायण, महाभारत, वेदवाङ्मयाप्रमाणे कुराण, सुरानिसा, सुरा बकरा, सुरा बा किंया सुरा रहमान, हादिस मुसता दरक अल हकीम आदी ग्रंथातले पुरुषी वर्चस्वाचे तारस्वर इथं पारखले आहेत. शितावरून भाताची परीक्षा न्यायानं बांगलादेशीय स्त्री इथं चिंतनगर्भात असली, तरी समस्त स्त्री जातीला कवेत घेण्याचं या पुस्तकाचं सामथ्र्य आहे. तसलिमा नासरिन यांचा प्रचंड व्यासंग त्याची साक्ष आहे.
मेहता पब्लिशिंग हाऊसनं तसलिमा नासरिन यांची ‘लज्जा’ कादंबरी लीना सोहोनी यांच्याकरवी मराठीत आणली. निर्बाचित कलामचा अनुवाद मृणालिनी गडकरी यांनी अत्यंत साक्षेपानं, परिश्रमपूर्वक केला आहे. ‘स्त्रियांच्या उद्धरासाठी स्वत:चं सारं आयुष्य वेचणाऱ्या महर्षी कर्वे यांच्या नावानं ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातल्या रस्त्यावरदेखील विकृत दिसते. असं त्या मनोगतात म्हणतात. एवचं, भाषा, भूषा, भवन, भोजन यांच्या भिंती हादरवणारं आणि स्त्रीवादी विचाराचा कोश समृद्ध करणारं हे पुस्तक आहे.
-विजय काचरे ...Read more
- NEWSPAPER REVIEW
चिंतनशील मनाचा वैचारिक उद्वेग…
तसलिमा नसरीन यांची ‘लज्जा’ ही कादंबरी प्रथम प्रसिद्ध झाली तेव्हाच त्यांचे नाव सर्वदूर पसरले होते. बांगला देशातील मुस्लिम समाजातील एका स्त्रीने, स्त्रीच्या व्यथांना ‘लज्जा’ या आपल्या कादंबरीत वाचा फोडली होती.
या कादंबरच्या पाठोपाठ त्यांचे वैचारिक लेख, जे प्रथम स्तंभलेख म्हणून प्रसिद्ध झाले होते. त्याचे एकत्रित पुस्तक प्रसिद्ध झाले, ‘निर्वाचित कलाम’
‘लज्जा’च्या मागे जे स्फोटक व्यक्तीमत्त्व आहे, विचारांची दाहकता आहे, अभ्यासपूर्ण चिंतनशीलतेतून निर्माण झालेली सात्विक भूमिका आहे.
२३५ पृष्ठांच्या या पुस्तकात एकूण ७८ लेख प्रसिद्ध झाले आहेत. वृत्तपत्रातील स्तंभलेखनाबरोबर अन्य लेखांचा त्यात समावेश केला आहे अशी नोंद प्रस्तावनेत व ब्लर्बवरही मिळते. पुस्तकात तसा स्वतंत्र निर्देश नाही. परंतु वाचताना त्यांचे वेगळेपण जाणवते. व्यक्तीगत सूर कधीतरी अधिक जाणवतो. परंतु पुस्तकातील वैचारिकतेला त्याने कोणताच धक्का लागत नाही. तसलिमाला समजावून घेण्यास अशा लेखांची अधिक मदत होते.
स्त्रीवादी भूमिकेतून स्त्रीवरील अन्यायाला वाचा फोडणारे, स्त्रीचा माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून विचार व्हावा यासाठी टाहो फोडणारे हे पुस्तक आहे असे या पुस्तकाचे एका वाक्यात वर्णन करता येईल.
वैयक्तिक अनुभव, इतरांचे अनुभव, निरीक्षणे, सर्व धर्मातील स्त्री जीवनासंबंधीचे विचार, पावलो-पावली दिसणारी दृश्ये, पाक अशा कुराणातील विविध नोंदी या पुस्तकामध्ये समाविष्ट आहेत. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, पुराणातील आख्यायिका इथंपासून पाश्चात्त्य लेखक, विचारवंत प्लेटो, व्हर्जिनिया वुल्फ यांच्यापर्यत, त्यांच्या ग्रंथांपर्यंत तसलिमा आपल्याला हिंडवतात. प्रत्येक ठिकाणी स्त्रीला किती हीन मानले आहे, तिच्या व्यक्तीमत्त्वांची कशी विटंबना केली आहे याचे चिकित करणारे चित्र त्या उभे करतात. त्या स्वत: डॉक्टर असल्याने वैदक शास्त्राचे दाखले देत प्रत्यक्ष आचारणात कशी विसंगती आहे, अभ्यासपूर्ण चिंतनातून निर्माण झालेली तात्त्विक भूमिका आहे. पीडित स्त्रीविषयी अपार सहानुभाव आहे आणि स्त्रीला माणूस म्हणून अस्तित्व मिळावे यासाठी जी जीवघेणी धडपड आहे हे सारे ‘निर्वाचित कलाम’च्या प्रसिद्धतीनंतर लाव्हारसाप्रमाणे बाहेर आले. कादंबरीलेखन वेगळे व वैचारिक, परस्परविरुद्ध आवाज उठवणारे, पवित्र कुराणतील तत्त्वांना विरोध करणारे लेखन वेगळे हे कृत्य धर्मांध समाजाला पचवणे खरोखरच कठीण आहे. त्यानेच तसलिमा नसरीन हे व्यक्तीमत्त्व वादग्रस्त, खळबळ माजवणारे ठरले. त्यांच्या व्यक्तीमत्त्वाभोवती एकच कुतुहलाचं वलय निर्माण झालं. या पुस्तकाला ‘आनंद पुरस्कार’ प्राप्त झाल्याने ‘निर्वाचित कलाम’ व ‘तसलिमा’ दोन्हीने वाचकांना व विचारवंतांना एका आकर्षण व ओढ एकाच वेळी लावली.
सर्वसामान्य वृत्तपत्रीय लेख जसे असतात तसे हे लेख नाहीत ही कल्पना पुस्तक वाचण्यापूर्वी होतीच. ब्लर्बच्या वाचनाने मनाची तयारी काही तरी विलक्षण वाचावयास मिळणार आहे’ अशी झाली होतीच.
मृणालिनी गडकरी यांनी अनुवादित केलेले हे पुस्तक वाचावयास सुरुवात केली आणि आपण एका खोल गुहेत प्रवेश करीत आहोत याची जाणीव झाली. जसजसे वाचत जावे तसे विचाराचे ओझे जाणवत होते. दर्शनाच्या विविध कला प्रकाशित व्हाव्यात व एक विराट रूप देत प्रत्यक्ष आचरणात कशी विसंगती आहे हे सतत दाखवतात.
या सर्वांतून स्त्रीला बाहेर काढणे किती अवघड आहे. ही ‘बिकट वहिवाट’ कशी पार करता येणार, हे कुंठीत करणारे भानही त्या देतात.
‘स्त्रीनं स्वत:ला एक संपूर्ण माणूस समजलं पाहिजे. त्यासाठी सर्वप्रथम तिनं तिच्या नावातून आणि शरीरावरून सधवा वा विधवा असल्याच्या खुणा पुसून टाकल्या पाहिजेत... स्त्रियांनो! सर्व खोट्या परंपरा मोडून तुम्ही प्रथम माणूस व्हा!’ (पृ. १३९)
हाच विचार त्या परोपरीने विविध बाजूंनी परत रत सांगताना दिसतात.
मृणालिनी गडकरी यांनी केलेल्या अनुवादाचं कौशल्य मानलेच पाहिजे. तसलिमा व त्यांचे विचार यांना त्यांनी मराठीत नेमकेपणाने आणले आहे व स्वत: बाजूला झाल्या आहेत.
हे पुस्तक वाचताना एक गोष्ट तीव्रपणे जाणवते की, राजकीय सीमारेषा माणसाच्या सांस्कृतिक विकासात कधीच आड येत नाहीत. बंगलादेशीय तसलिमा या सीमारेषांना ओलांडून वाढल्या आहेत. ज्या व्यापकतेवर त्यांनी आपला व्यासंग, चिंतन, मनन नेले आहे ते बघता ते आजच्या स्त्रीचे आंतरराष्ट्रीय स्त्रीवादी प्रातिनिधीक व्यक्तीमत्त्व वाटते. ...Read more
- DEVGIRI TARUN BHARAT 19-05-1996
कुछ बुंदे …
पुस्तकांच्या दुनियेत सहज डोकावले तर असे दिसते की, बाजारात दरवर्षी शेकडो छापील पुस्तके येतात. त्यातील काही पुस्तकांवर चर्चा- परिसंवाद-परीक्षणे-समीक्षणे यांची झोड उठते. कालांतराने ती धूळ खाली बसते. काही पुस्तके वाचकांना खूप मूलभूत विचार करयला लावतात. वर्षानुवर्षे आपण मनाशी बाळगलेल्या कल्पना, विचारांना मुळातूनच हादरे बसतात. ही पुस्तके वाचकाला संस्कारसंपन्न करतात. ती केवळ कुणा श्रीमंतांच्या पुस्तकांच्या कपाटाची शोभा किंवा प्रतिष्ठा वाढविणारी नसतात, तर ती आपल्याला, आपल्या समाजधारणेबद्दलच्या विचारांना डहुळून काढतात.
‘निर्बाचित कलाम’मधील अनेक लेखांमध्ये तसलिमाने आपल्या लहानपणापासून मनावर कोरल्या गेलेल्या आठवणी आणि त्यांचे प्रौढ प्रगल्भावस्थेत समजलेले अर्थ चितारले आहेत. संग्रहातील पहिलाच लेख तिच्या गावातील एका चमत्कारिक आठवणीशी निगडीत आहे. चित्रपट पाहून रिक्षातन परत येताना गर्दीत थांबलेल्या रिक्षापाशी एक बारा/तेरा वर्षांचा मुलगा येऊन तिच्या दंडावर जळती सिगारेट टेकवतो आणि ती कळवळताच मजेने हसत गर्दीत मिसळून निघून जातो. वास्तविक अशा प्रसंगी आरडाओरडा करून त्या पळून जाणाऱ्या मुलाला पकडून चोप देण्याचे सत्कृत्य कुणी केले असते, पण इथे ती तसे करीत नाही. तसलिमा म्हणते ‘स्त्री हे एक सहावं इंद्रिय असतं! म्हणूनच मी त्या मुलाला शिक्षा करण्याच्या फ़ंदात पडले नाही... जमलेल्या सर्वांनी पाहिली असती ती माझ्या शरीराची गोलाई, माझी रंगकांती, माझी वेदना, माझी व्याकुळता, माझा रंग, माझं रडणं... काही जण अरेरे म्हणून चुकचुकले असते, तर काहींनी... म्हणजेच जमलेल्या सर्वांनी एक प्रकारे माझा उपयोगच करून घेतला असता. माझ्या असाहाय्यतेचा, माझ्या असुरक्षिततेचा फायदा घेतला असता...’ ‘माझा अपराध एकच : मी स्त्री आहे आणि स्त्रीच राहिलेय. माझं शिक्षण, माझी आवड, माझी बुद्धिमत्ता मला माणूस करू शकलेली नाही.’
तसलिमा नासरिन स्वत: मुस्लिम धर्मात जन्मलेली असली तरी बायबल व हिंदू धर्मग्रंथ- ब्राह्मणके, आरण्यके, स्मृतिग्रंथ, पुराणे इ.चा तिचा चांगला अभ्यास आहे. एका लेखात ती निरनिराळे दाखले देत असे प्रतिपादन करते की, वैदिक काळातही भारतात स्त्रीला ‘माणूस’ म्हणून गणले जात नसे. घरातील कुत्रा, मांजर यांच्यासारखीच ती एक. आपस्तंभ धर्मसूत्रे इ. मधील श्लोकांचा आधार घेत ती म्हणत की, काळा पक्षी, गिधाड, मुंगूस, चिचुंद्री, शूद्र व स्त्री यांच्या हत्त्येबद्दल एकच प्रायश्चित सांगितले आहे. ते म्हणजे एक दिवसाचा कडक उपवास. आणखी एका लेखात, बलात्कारितेला समाज स्वीकारीत नाही. याबद्दल प्रचंड खंत व्यक्त करताना तसलिमा म्हणजे ‘युद्धातील सर्व अत्याचार, बूट आणि बॉयनेटचा भयंकर मार आणि मृत्यूची बिभित्सतासुद्धा स्वीकारली जाते. पण बलात्कार मात्र स्वीकारला जात नाही... शत्रूच्या कँपवरून माझी मावशी सोळा दिवसांनी परतली. तिनं परत यावं असं कोणालाच वाटत नव्हतं. एकवीस वर्षाच्या या मावशीवर अंधाऱ्या कँपातील खोलीत दहा पशुरूपी कामुक पुरुषांनी सतत सोळा दिवस बलात्कार केला. शेवटी तिने नाइलाजाने आढ्याला फास लावून घेतला... सर्व लोकांत बेअब्रू होऊ नये म्हणून.’
हादिसा कुराणाचे दाखले देऊन आपल्या लहान वयाच्या पत्नीला छळणारा आणि मारहाण करणारा नवरा जेव्हा धर्मगंरथातून त्या अर्थाच्या ओळी काढून दाखवतो, तेव्हा धर्माने मुस्लिम असणाऱ्या लेखिकेला धक्काच बसतो. ती म्हणते, ‘या सत्ययुगात पृथ्वीच्या पाठीवर कुठेतरी, स्त्रीबद्दल एवढा अविचार, अन्याय, अमर्याद छापील स्वरूपात समाजानं मान्य केलेली आहे आणि समाजातील सभ्य लोक परम निष्ठेने या धर्माच्या रानटीपणाचे पालन करतात यावर माझा विश्वास बसत नाही.’
अनेक लेखांमधून स्त्रीला केवळ ‘स्त्री’ न समजता, तिच्या माणुसपणाच्या मान्यतेबद्दल आग्रह धरणारी तसलिमा केवळ स्त्रीवादी किंवा स्त्री मुक्तिवादी आहे असे नसून ती मानवतावादी असल्याचे स्वच्छ, स्पष्ट जाणवते. ‘स्त्री ही पुरुषाप्रमाणेच एक संपूर्ण माणूस आहे. म्हणून तिलाही पुरुषाप्रमाणेच सर्व बाबतील स्वातंत्र्य असावं’ असे ती आग्रहाने प्रतिपादते. पुराणकालात जे ग्रंथ लिहिले गेले, त्या ग्रंथातील आचारविचार त्या काळाला योग्य असतीलही पण आताच्या काळात ते सर्वच जसेच्या तसे आमलात आणणे अयोग्य आहे. झपाट्याने बदलणाऱ्या काळाबरोबर या धार्मिक शिकवणींना व तत्त्वांना चिकटून राहणे चुकीचे ठरेल. मुस्लिम ग्रंथांबरोबरच तसलिमा इतर धर्मग्रंथांवरही टीका टिप्पण्णी करते; पण त्या धर्मातील लोक तिला मारण्याचा फतवा काढीत नाहीत. कारण ते काळाबरोबरच बदलले आहेत, अधिक सहिष्णू झाले आहेत. तिच्याबरोबर समाजानेही तसे बदलावे, अशी तिची अपेक्षा आहे. तसलिमा शोषितांची बाजू मांडते असे तिच्या बहुतेक लेखनातून दिसते. काही ठिकाणी तिची मते टोकाची, लेखन तर्ककर्कश किंवा भडकपणाकडे झुकणारे वाटत असले, तरी सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी तिने तसे केल्याचा आरोप अगदी तिचे शत्रूसुद्धा तिच्यावर करू शकणार नाहीत. लेखन हे तसलिमाने जीवनकार्य म्हणून एक ‘मिशन’ म्हणून स्वीकारले आहे. हे इथे ध्यानात घ्यायलाच हवे. अन्यथा कधी कधी गैरसमज, गैरअर्थ निघण्याची शक्यता आहे. ‘निर्बाचित कलाम’ या पुस्तकाच्या अनुवादक डॉ. मृणालिनी गडकरी यांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे विचारांची सखोलता, लेखनातून प्रकट होणारी काव्यात्मता, प्रचंड वाचन, सूक्ष्म अभ्यास, प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाऊन ती गोष्ट समजावून घेण्याची अभ्यासू वृत्ती, तडफदारपणा, निर्भयता हे गुण तसलिमाच्या लेखनातून स्पष्ट दिसतात.
पुरुषप्रधान समाजात स्त्रीचे अधिकर आणि स्त्री मुक्ती याविषयी जे काही बोलले जाते, त्यात तसलिमाचा आवाज नि:संशय सर्वाधिक वरचा, सर्वात खळबळ माजवणारा आहे. या पुस्तकाला ‘आनंद पुरस्कार’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आह. या पुस्तकात, पुरुषप्रधान समाजात स्त्रीला एक भोग्यवस्तू मानून कसे वागविले जाते, स्त्रीच्या पायात धर्मशास्त्रसुद्धा कशी बेडी अडकवू पाहते, एवढेच नव्हेतर ईश्वरकल्पनेतही छळांचे इंधन अप्रत्यक्षपणे कसे घातले गेले आहे, व्यवहारात प्रत्येक स्तरावर, पती-पत्नी संबंधातही थोडक्यात संपूर्ण स्त्री जीवनातच पुरुषाची लालसा, नीचपणा, हिंस्रपणा, अधिकार गाजविण्याची कृती, लबाडी आणि प्रत्येक गोष्टीत दखल देण्याची सवय कशी दिसून येते. या विषयीची आपली मते लेखिकेने अगदी धीटपणे मांडली आहेत, ती मुळातूनच वाचली पाहिजेत.
सनसनाटी काहीतरी लिहिण्याच्या इच्छेतून लिहिले गेलेले हे लेखन नाही. स्त्री जातीबद्दलच्या कळवळ्याने, तिच्यावरील अन्याय अत्याचाराने पेटून उठलेलं, मानवतावादी दृष्टीने केलेले हे स्फुट लेखन आहे.
क्वचित कुठे आपल्या गावाचे - मयमनसिंहचे वर्णन करताना लेखिका हळवी होताना दिसत. पण एकूण लेखनात शब्दांचे तुरे-पिसारे पुढे मागे मिरवीत नाही. विषयाला थेट हात घालणारी शैली, प्रसंगांचे टोकदार निवेदन व स्वत: अनुभव घेतल्यासारखे वाटणारे प्रसंग- घटना हे लेखनाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. वृत्तपत्रीय सदराच्या मर्यादित जागेतील लेखनाला अशी सवय लागतेच. पण हे फार अवघड आहे. थेट काळजाला भिडणारे आहे. डोळ्यांपुढे भक्क उजेड झाल्यावर क्षणभर अंधारून येते, तसे हे लेखन वाचून होते.
...Read more