- LALIT - APRIL 2021
‘नो नॉट नेव्हर’ या कादंबरीचे लेखक बाबाराव मुसळे अत्यंत अभ्यासू वृत्तीचे आहे. या कादंबरीचे कथानक सिद्ध करण्यासाठी त्यांनी अनेकांची मदत घेतली आहे, चर्चा केली आहे. त्या सर्वांविषयीचे ऋण सुरुवातीलाच त्यांनी व्यक्त केले आहे. वयाची पासष्ट वर्षे पूर्ण झाल्यवर ‘टीन ऐजर्स’चा आव्हानात्मक विषय त्यांनी हाताळला. त्यात ते कितपत यशस्वी झाले, ते वाचकांनी ठरवायचे, असेही त्यांनी लिहिले आहे. त्यामुळे त्यांचे मनोगत विशेष महत्त्वाचे आहे.
या कादंबरीतील दोन महत्त्वाची पात्रं म्हणजे अत्यंत ग्रामीण भागातील गरीबाघरची ‘राणी’ आणि श्रीमंताघरची ‘मंकी’ या दोन एकाच वयाच्या पात्रांचे एकत्र येणे. एकत्र प्रवास करणे, पुणे शहरात शिक्षणासाठी एकत्र राहणे, एका वर्गात शिकणे याची कारणे कादंबरीत सापडतात. त्यांचे रूपरंग, त्यांच्यातील वाद-संवाद, त्यांचे स्वभाव, विचार करण्याची प्रवृत्ती, मानसिकता, बौद्धिक क्षमता यातून मुसळे यांनी दोन व्यक्तिमत्त्व डोळ्यांसमोर साक्षात उभी केली आहेत.
इंजिनिअिंरग कॉलेजचे विषय काय असतात? इतकेच नव्हे, तर ते कॉलेजमध्ये कसे शिकवले जातात? किंवा इंजिनिअिंरग शिकताना विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलही करावी लागतात, तर त्या प्रॅक्टिकल्समध्ये काय विषय असतात, इथपर्यंतची सूक्ष्म निरीक्षणे या पुस्तकात त्यांनी नोंदवली आहेत. उदा.
वर्गात त्यांनी ‘सॉलिड स्टेट फिजिक्स’ हे प्रकरण शिकवलं. त्यात पी-एन जंक्शन डायोड आणि झेनर जंक्शन डायोड यांच्या कॅरेक्टरिस्टिक पाहिल्या. त्यापैकी पी-एन जंक्शन डायोडच्या कॅरेक्टरिस्टिक आज तपासून पाहावयाच्या होत्या.
‘राणीचा चेहरा वापरून बनवलेली घाणेरडी व्हिडिओ क्लिप्स आणि त्याद्वारे केलेले ब्लॅकमेलिंग’, ‘स्लीपर कोच ट्रॅव्हल’ विषयीच्या काही नोंदी, ‘इसाक’ची कहाणी, बोल्ड भट्टी, सुचिता मॅडम आणि राणी यांच्यातील संवाद, प्रिन्सिपॉलकडून राणीला ‘आयडॉल ऑफ कॉलेज’चा किताब मिळणे, सिनेमातले काही कथानक, राणीच्या वडिलांना कारण नसताना पडलेला मार याची कथा, मासिक पाळीमध्ये मुली वापरत असलेले पॅड, कॉलेज आवारात बिनदिक्कतपणे निरोधचा वापर या संबंधित कथानक, डेटिंग, ‘भिन्नलिंगी आणि समलिंगी’ संबंधाविषयी चर्चा, रॅगिंग, जीएफ-बीएफ (गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड), जागतिक फ्रेंडशिप डे, (Yolo) (योलो म्हणजे यू ओन्ली लिव्ह वन्स!), सिड हल्ला, आत्महत्या, खोटे अटेंडन्स देणे, ‘टोपो’ नावाचा कॉपीचा नवीन प्रकार, असे कितीतरी विषय एकदाच कादंबरीमध्ये हाताळले आहेत. त्यामुळे ही कादंबरी अगदी तरुण पिढीलाही जवळची वाटेल!
काही चमकदार वाक्ये संपूर्ण कादंबरीमध्ये अधेमधे पेरलेली आहेत.
घरात झोपताना गोधडीवरची स्थिरता येथे क्षणभरही लाभत नव्हती. किंवा भट्टीचं ब्लॅक बॅकग्राऊंडवरचं हे पोल्युटेड पिक्चर तर राणीचं गोल्डन बॅकग्राऊंडवरचं एनर्जेटिक, इन्थुझास्टिक, हाय स्पिरिटेड पिक्चर. दोन्ही परस्परविरोधी असले तरी दोन्हीचं आपापल्या ठिकाणी वेगळं महत्त्व आहे.
उच्च शिक्षण घेताना येणारे आजच्या काळचे सगळे ज्वलंत प्रश्न आणि त्याला सामोरी जाणारी तरुण पिढी याचे उत्कृष्ट चित्रण या कादंबरीद्वारे लेखकाने केले आहे. ज्या तऱ्हेने कादंबरीची सुरुवात आहे त्यानुसार शेवटाकडे ती सरकताना वाचकाच्या मनात एक शेवट असतो, तर त्याला पूर्णत्वाने कलाटणी देणारा शेवट यात आहे, हेही या कादंबरीचे एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. खरोखरी कधी अंगावर शहारे आणणारी तर कधी सुखद रोमांच उठवणाऱ्या या कादंबरीचे वाचक नक्कीच स्वागत करतील! ...Read more
- महाराष्ट्र टाइम्स नागपूर बुधवार १३/१/२०२१
जेष्ठ लेखक बाबाराव मुसळे यांची `नो नॉट नेव्हर...` ही अलीकडेच प्रकाशित बहुचर्चित कादंबरी. ही कादंबरी म्हणजे मुळात सत्तर वर्षे वयाच्या लेखकाने तिसऱ्या पिढीतल्या तरुणाईच्या मानसिकतेत शिरून, तरुणाईची भाषा जाणून घेत, इंजिनिअरिंग कॉलेजमधील त्यांचे ` ऍव्हान्स कॉलेज लाईफ` कादंबरीत हुबेहूब चितारणे, हा एक साहित्यिक चमत्कारच म्हणावा लागेल. हा चमत्कार लेखक बाबाराव मुसळे यांनी करून दाखवल्याबद्दल त्यांच्या सर्जनशीलतेला दाद द्यावी तितकी थोडीच.
पुण्यातले एक इंजिनिअरिंग कॉलेज. विदर्भातल्या वाशीम जिल्ह्यातल्या ब्रम्हा या खेड्यागावातल्या राणी आणि मंकी उर्फ मृणाल या दोन विद्यार्थिनी. दोघींचे स्वभाव अतिभीन्न. अगदी टोकाचे म्हणावे असे. जणू दोन समांतर रूळ एकमेकांसोबत धावणारे; पण कधीही जवळ न येणारे असे.
या महाविद्यालयात प्रवेश करतानाचा विद्यार्थ्यांचा सुरुवातीचा सैरभैरपणा, कॉलेज विश्व् , टीचर्स स्टाफ, कर्मचारी, प्रिन्सिपल, संस्थाचालक, लायब्ररी, कँटीन, व्यवस्थापनाची कडक शिस्त, जर्नल्स, प्रॅक्टिकल्सची रुक्ष बाजू.... सगळं काही अभ्यासपूर्ण शैलीने समजून घेवून तंतोतंत मांडले आहे. यामुळे ते सगळे काही जसेच्या तसे वाचकांच्या अनुभवास येते. कादंबरीचा प्रवास जसा सुरु होतो, तसा आपलाही या महाविद्यालयात प्रवेश होतो . नंतर जे जे घडत जाते त्याला वाचक म्हणून आपण साक्षीदार उरतो. राणी मंकी, भट्टी, मंदार, संजना, जाधव सर, देशपांडे सर.. कादंबरीतील एकएक पात्र हळूहळू आपल्या ओळखीचे होत जाते. कॅमेऱ्याच्या डोळ्यांनी लेखक आपल्याला त्या विश्वात फिरवत राहतो.
लेखकाला परकाया प्रवेश करता यायला हवा, असे म्हणतात. पात्रांच्या मनात शिरून त्यांच्यासारखे, लेखकाला लिहिताना मानसिक पातळीवर जगावे लागते. तरच ती पात्र जिवंत होतात. जिवंतपणे कादंबरीमध्ये वावरू लागतात. इथे तरुण पिढीच्या मनात शिरून त्यांचे जगणे बाबाराव मुसळे हे समरसून जगले आहेत. कोणताही परिसर फक्त बघून निरीक्षण करून ओळखीचा होत नाही; तर त्या परिसरात राहून तो परिसर आपलासा करावा लागतो. तरच तो परिसर, तो माहोल जिवंतपणे उभा करता येतो. लेखक बाबाराव मुसळे यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयात, साहिल मंझील मधील मुलींचे हॉस्टेल बोलते केले आहे. अगदी राणी-मंकीची रूमसुद्धा आपल्या ओळखीची होवून जाते. अध्यापन, व्यवस्थापन, त्यातील खाचाखोचा, त्यातील अदृश्य राजकारण लेखकाने नीटपणे समजून घेतले आहे. शिस्त, नियम, आचारसंहिता याकडे बघण्याची व्यवस्थापनाची बाजू रास्त वाटते; तर तीच विद्यार्थ्याच्या नजरेतून बघताना आणखी वेगळी वाटते.
शरीरसंबंध, कॉन्डोम, पिल्स, डेटिंग, चॅटिंग याबाबत तरुणाई एवढी सहज झालेली आहे कि वाचताना नंतर नंतर धक्कादायक काहीच वाटत नाही. घराबाहेर आपली मुलं किती सुरक्षित असतात? चांगल्या-वाईट संगतीचे त्यांच्यावर कसले परिणाम होतात? मोबाइल, इंटरनेट, चॅटींग,एसएमएस, पोर्नोग्राफी, भिन्नलिंगी आकर्षण, स्वातंत्र्याचा उपभोग घेण्याची मानसिकता, चंगळवादी, मौजमजा करण्याचा दृष्टीकोन, त्यातील धोके, अडचणी, जीवावर बेतणारे प्रसंग, यासारख्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकत ही कादंबरी पुढे सरकत राहते. तरुणाईची भाषा, त्यांचे एसएमएस, चॅटिंग त्यांचे शॉर्टफॉर्म्स, त्यांनी मित्रांना-मैत्रिणींना दिलेली नावे, त्यांचे आपसातील संभाषण, त्यांची अभिव्यक्ती, त्यांचे स्वभाव विशेष.. सर्वकाही नेमकेपणाने साधले गेले आहे. विद्यार्थी-विद्यार्थीनिंची देहबोली, त्यांचे पेहराव, त्यातील बिनधास्तपणा, त्यांच्या आक्रमक फॅशन्स, हे जग कुठेही कृत्रिम वाटत नाही. हे सगळं उभारणं अभ्यासू वृत्तीशिवाय, मेहनतीशिवाय अजिबात शक्य नाही.
कादंबरीच्या कथानकाचा उलगडा करून रसभंग करणे क्षम्य होणार नाही. पण, `ऍटलीस्ट एक तरी कॉन्डोम पर्समध्ये बाळगत जा. कधी कोणता प्रसंग येईल ते सांगता येत नाही. तसा प्रसंग आलाच तर शक्यतो अवॊइड करायचा प्रयत्न करायचा. ते जमलं नाहीच तर त्याला कॉन्डोमचा यूज करायची विनंती करायची.` एका मैत्रिणीने दुसऱ्या मैत्रिणीला दिलेला हा संदेश महाविद्यालयीन तरुणींच्या सेक्स लाईफची भयावहता दर्शवतो. किंवा `नो इंटरकोर्स विदाउट कॉन्डोम` हे सेक्सचं मध्यवर्ती सूत्र सांगणारे संवाद यातील भीषणता दर्शवित असल्याने त्याचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो.
कादंबरीत अनेक बऱ्यावाईट घटना अचानकपणे येवून आदळतात. पण ओढून-ताणून कथानकाची जुळवणी केलेली कुठेही जाणवत नाही. काही घटनांमागील उकल लेखकाने रहस्यकथेच्या शैलीत केली आहे. त्यामुळे वाचताना कथानकाची आणखीनच रंजकता वाढते.
एकंदरीत लेखक बाबाराव मुसळे यांनी आपले वय कमी करून या तरुणाईसोबत तरुण होत नुकतेच अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेतले आहे कि काय? असे वाटावे इतपत ही कादंबरी तरुणाईची झालेली आहे. ही कादंबरी तरुणाईला नक्की आपली वाटणार, या कादंबरीवर तरुणाईच्या नक्की उड्या पडणार यात शंका नाही. तरीही भरकटलेल्या, भरकटू पाहणाऱ्या महाविद्यालयीन तरुण-तरुणींना एक सकारात्मक, आश्वासक संदेश हि कादंबरी देवून हि कादंबरी संपते, हे या कादंबरीचे मोठे यश होय...
...Read more
- दिलीप जिरवणकर
कांदबरीची सुरुवातच ब्रह्मा गांवच पाणीच वेगळ हे राणीच्या यशानं पुन्हा सिद्ध झाल.ही पहिलीच ओळ वाचून मनाला सुखद धक्काच बसला. ब्रह्मा गांवचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात पोहचाविनारे लेखक म्हणून खूप मोठे नांव होउन सुद्धा तुम्ही आपल्या मातीशी किती एकरुप आहात.तुम्ही कांदबरीच्या सुरुवातीलाच गांवाकडील मुलांचे नोकरी, व्यवसाय, छोटे मोठे काम करणाऱ्याचे मोठ्या मनानी कौतुक केले. तुम्ही म्हटल्याप्रमाणे ह्या गांवच पाणीच न्यार ते अगदी तुमच्या बाबतीत अगदी खर आहे. तुम्हीच १० कांदबरी लीहुन अख्खा महाराष्ट्रला ते न्यार पाणी(शब्दरुपी)देऊन तुमच्या बरोबर गांवचे नाव उज्वल केले.
कादंबरी तुम्ही अशी शब्दरुपी साकारली की ती वाचतानी नजरे समोर संपूर्ण घटनेचे चित्र डोळ्यानी बघत आहोत .आपण त्या प्रत्येक घटनास्थळाचे साक्षीदार आहोत असेच वाटते.
कांदबरीत दोन भिन्न विचराच्या तरुण मुली एकत्र राहतात पण त्या आपसात कधी बोलत सुद्धा नाही. त्या कधीच एकत्र येणार नाही असेच वाटत. पंरतु त्या शेवटी एकत्र आनुन लेखकाने एक सुखद धक्का दिला. वाचतानी बर्याच वेळा काळजात ठोके पडतात.
कांदबरीची एक नाईका राणी ब्रह्म्याची असल्याने ती खूप जवळची वाटते की तीच्या विषयी मनात एक आपुलकी, जिव्हाळा आपोआपच येतो. तसेच ब्लॅकमेल मंकीचा सुरुवातीला खूप तिरस्कार यतो की स्वताच्या स्वार्थासाठी कोणत्याही टोकाला जायला तयार होते.परंतु ह्या स्वभावामुळे तिच्यावरच जीवघेण्या समस्या येतात .काही काळानंतर जेंव्हा तीला कळत की आपण ज्या राणीचा तिरस्कार करत होतो .तीच्यामुळेच आपण ह्या नरकातुन सहीसलामत सुटलो आहे. शेवटी तीला राणीचाच आधार वाटतो.त्या नुकत्याच एकत्र येतात मंकी माकडपणा सोडुन म्रूणाल होते. त्याचवेळी सोज्वळ राणीला एका मीत्राचा वात्रट एस.एम.एस.येतो. ती घाबरून जाते पंरतु या त्रासातून शेवटी म्रुणालनेच बाहेर काढले.
कांदबरीचे मुखपृष्ठ खुपच आकर्षक आहे ते बघुनच कांदबरी वाचायला आकर्षित करते. कांदबरी वाचूनच तुम्हाला मंकीची म्रूणाल कशी झाली हे कळेल.
दादा मी कांदबरी वाचताना खूप प्रभावीत झालो .एवढे पात्र साकारणे आणि त्याचे रोल प्रत्येक पेजवर पात्राची लींक न तुटता साकारणे म्हणजे तुम्ही त्या पात्राला मनात कसे साठवले असेल हा मनाला प्रश्न पडतो तुम्ही लीहीलेली कांदबरी वाचून त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी आम्हाला चार ओळी लीहु शकत नाही. दादा तुम्ही फार ग्रेट आहात शब्दात तुमचे वर्णन करण्यापलीकडे आहे.
तुमची हाल्या हाल्या दुधू दे ही कांदबरी जशी आकाशवाणीवर सादरीकरण झाले तशी ही कांदबरी एखाद्या मराठी चँनलवाल्याच्या नजरेस पडली तर तिच्यावर एखादी टिव्ही सिरीयल नक्कीच ते करतील अस मला मनातुन वाटत आहे.
माझी एक विनंती आहे. प्रत्यकाने ही कांदबरी वाचावी पंरतु खासकरून वर्ग १०वी पास विद्यार्थीच्या पालकांनी ती जरूर वाचावी व आपल्या पाल्यास ती वाचावयास भाग पाडावी.मुलांना पुढील शिक्षण घेतांना कोण कोणत्या समस्या येउ शकतात तसेच कोणत्या मीत्राची संगत केली पाहिजे.काँलेज शिक्षण, काँलेज जिवण तेथील एकुण वातावरण कश्या प्रकारे असते. वयानुसार तुमचे शरीर, भावना ह्यात होणारे बदल त्यामुळे आपल्या मनातील चलबिचल, तेथील चांगले,वाइट अनुभव कसे येउ शकतात. ही कांदबरी सत्यपरिस्तीथीच दर्शन घडविते.तुम्हाला संपूर्ण शिक्षण झाल्यावर जे अनुभव येतील तेच अनुभव ही कांदबरी वाचुन तुम्हाला अगोदर कळेल म्हणजे माझा सांगन्याचा हेतू म्हणजे तुमच्या साठी ही कांदबरी मार्गदर्शक ठरावी हे माझ ठाम मत आहे. ...Read more
- Sanjan More
नो नॉट नेव्हर...सत्तरीच्या लेखकाचा साहित्यिक चमत्कार!
ही बाबाराव मुसळे यांची बहुचर्चित कादंबरी वाचली. चार दिवस या कादंबरीने पिच्छा सोडला नव्हता.
पुण्यातलं एक इंजिनिअरिंग कॉलेज. विदर्भातल्या वाशीम जिल्ह्यातल्या ब्रम्हा या खेडेगावातल्या राणी, आणिमंकी ( मृणाल ) या दोन विद्यार्थिनी. दोघींचे स्वभाव अतिभिन्न, अगदी टोकाचे म्हणावे असे. जणू दोन समांतर रुळ एकमेकांसोबत धावणारे पण कधीही जवळ न येणारे असे.
या महाविद्यालयात प्रवेश करतानाचा विद्यार्थ्याचा सुरुवातीचा सैरभैरपणा, कॉलेज विश्व, स्टाफ, कर्मचारी, प्रिन्सिपॉल, संस्थाचालक, लायब्ररी, कॅन्टीन, व्यवस्थापनाची कडक शिस्त, जर्नल्स, प्रॅक्टिकल्सची रुक्ष बाजू... सगळं काही लेखकाने कष्ट घेवून, मेहनत करुन अभ्यासपूर्ण शैलीने समजून घेवून तंतोतंत मांडलंय, त्यामुळे ते सगळं काही जसंच्या तसं वाचकांच्या अनुभवास येतं. कादंबरीचा प्रवास जसा सुरू होतो तसा आपलाही या महाविद्यालयात प्रवेश होतो. नंतर जे जे घडत जातं त्याला आपण साक्षीदार उरतो. राणी, मंकी, भट्टी, मंदार, संजना, जाधव सर, देशपांडे सर... कादंबरीतलं एक एक पात्र हळूहळू आपल्या ओळखीचं होत जातं. कॅमेऱ्याच्या डोळ्यांनी लेखक आपल्याला त्या विश्वात फिरवत राहतो.
मुळात सत्तर वर्षे वयाच्या लेखकाने तिसऱ्या पिढीतल्या तरुणाईच्या मानसिकतेत शिरून, तरुणाईची भाषा जाणून घेवून, इंजिनिअरिंग कॉलेजमधील त्यांचं अॅडव्हान्स्ड कॉलेज लाईफ कादंबरीत हुबेहुब चितारणं हा एक साहित्यिक चमत्कारच म्हणावा लागेल. हा चमत्कार लेखक बाबाराव मुसळे यांनी करुन दाखवलाय.
लेखकाला परकाया प्रवेश करता यायला हवा असं म्हणतात. पात्रांच्या मनात शिरुन त्यांच्यासारखं, लेखकाला लिहताना मानसिक पातळीवर जगावं लागतं, तरच ती पात्रं जिवंत होतात, जिवंतपणे कादंबरीमध्ये वावरू लागतात. इथं बाबाराव मुसळे तरुण पिढीच्या मनात शिरुन त्यांचं जगणं भोगणं समर्थपणे जाणतात।
परीक्षक संजन मोरे ,बारामती ,पुणे ...Read more
- Read more reviews