- लोकमत, कोल्हापूर दि. ३१ मे २०१८
मानवी जीवनात ‘पहिलं पाऊल’ विशेष महत्त्वाचे असते. सृष्टीनिर्मितीचा नवारंभ ते मानवी जगातल्या गोष्टींना अनेक अर्थांनी महत्त्व आहे. भुईतून अंकुर बाहेर पडणे, झाडाला फांदी फुटणे,फुलांचे उमलणे, पहिला उच्चार, पहिले अक्षर अशा अनेक गोष्टी या दृष्टीने महत्त्ाच्या ठरतात. पहिल्या अविष्कारात अनेक गोष्टी दडलेल्या असतात. पहिल्या अविष्कारात अनेक गोष्टी दडलेल्या असतात. भविष्यातील घडणींचे भरणपोषण असते. त्यादृष्टीने लेखनातील पहिल्या उर्मीही अशाच आनंददायी, सुफळ असू शकतात. वि.स.खांडेकरांच्या वाङ्मयातील पहिल्या अविष्काराच्या वाटा जाणून घेणं तितकंच कुतूहलजनक आहे. खांडेकरांनी त्यांच्या वाङ्मयाच्या व घडणीच्या अनेक गोष्टी त्यांच्या ‘पहिलं पाऊल’ या आत्मपर लेखनात मांडल्या आहेत.
वि.स.खांडेकरांना लेखक म्हणून अफाट लोकप्रियता लाभली. ध्येयवादाचे आणि स्वप्नकांक्षेची चित्रे त्यांनी रेखाटली. मध्यमवर्गीय ध्येयवादी स्वप्नसृष्टीचे जादूगार म्हणून त्यांनी ख्याती लाभली. भारतीय भाषांमध्ये ते पसरले. अशा या लेखकाच्या एवंâदर पहिल्या उर्मी सांगणारा ‘पहिलं पाऊल’ हा लेखसंग्रह आहे. त्यामध्ये खांडेकरांनी आपल्या आयुष्यभरातील कामगिरीच्या वाटा सांगितल्या आहेत. खांडेकरांचे लेखन, वाचन, संपादन व वक्तृत्वातील आरंभकाळातील अविष्कार रूपे सांगितली आहेत. लोकप्रिय ठरलेल्या लेखकाच्या लेखकाची स्वप्नभूमी घडविलेल्या काळाचे कथन त्यात आहे.वाङ्मयाकडे आकर्षित कसे झाले हे सांगत असताना त्यांनी पुंगीवाल्याची लोककथा दिली आहे. पुंगीच्या सुरांमागे जसे उंदीर जातात, तशा आंतरिक उर्मीतून ते वाङ्मयाकडे ओढले गेले.
सांगली, पुणे, शिरोडे व कोल्हापूर या स्थळावकाशाला खांडेकरांच्या घडवणुकीत महत्त्व आहे. बालपण सांगलीत गेले. सांगलीतील नाट्यवेडाने त्यांना वेगळ्या स्वप्नसृष्टीत नेले. वाङ्मयातील निर्मळ जगाच्या अस्पष्ट हाका या काळात त्यांना ऐकू येत होत्या. बालपणीच्या अनुभवाचा आयुष्यावर झालेल्या परिणाम प्रभावाच्या नोंदी त्यात आहेत. सामाजिक सुधारणा, पुराणमतवादाबद्दल अधिक्षेप, आगरकर व गडकरयांच्या लेखनाने कलेला संस्कार महत्त्वाचा ठरला. लेखनकला चंद्राप्रमाणे मोहक; पण तिचे चांदणे जीवनाच्या सूर्याप्रमाणे अलगद पडल्याचे ते सांगतात. खांडेकरांच्या आदर्शवादी, ध्येयवादी, भावनाप्रधान विचारदृष्टीच्यादेखील खुणा त्यात आहेत. आईप्रमाणे देखकाची मायाही आंधळी असते, असे ते म्हणतात. पुण्यात विद्यार्थीदशेत केशवसुतांची ‘तुतारी’ ही कविता वाचल्यानंतर त्यांना निरभ्र आकाशात वीज चमकल्याचे भासले. पहिले टीकालेखन, कथालेखन, लघुनिबंध, रुपककथा, नाटक, चित्रपट, कथालेखन, लघुनिबंध, रुपककथा, नाटक, चित्रपट, पटकथा व वक्तृत्वातील मनोगत या लेखनात आहे. सुरवंटाचे फुलपाखरात रुपांतर होण्याच्या काळाचे तसेच खांडेकरांच्या लेखनक्रमातील स्थित्यंतर नोंदी आहेत. शिरोड्यातील चिमुकल्या खेड्यात राहताना गांधींच्या रूपानं तेजःपुंज तारा समाजमनाशी सुसंवाद साधन होता असे त्यांनी म्हटले आहे.
कादंबरीकार म्हणून खांडेकरांचे वेगळे असे स्थान आहे. स्वतःच्या कादंबरी रुचीबद्दल खांडेकरांनी विस्तृतपणे माहिती दिली आहे. कृष्णाकाठची काळी कुळकुळीत वांगी, लुसलुशीत कणसे आणि अवतीभोवतीची रसपूर्ण नाटके व भरमसाट वाचन यातून वाचनाचे स्रोत पसरविले. बालपणीच हरिभाऊ आपटे यांच्या ठिकाणी असणाNया निराळ्या शक्तीची जाणीव झाली. ह.ना. आपटे यांच्या ऐतिहासिक व सामाजिक कादंबNयांनी मन उत्कंठीत आणि प्रज्वलित केल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘मी त्यांच्या कादंबNयांचा दोस्त झालो’ असे म्हटले आहे. ‘उषःकाल’ ही कादंबरी त्यांनी रात्रभर जागून वाचून काढली. पहिली कादंबरी लिहित असताना ‘आतल्या उमाळ्यापेक्षा बाह्य परिस्थितीच अधिक कारणीभूत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कलाकृती ही नदीसारखी असते. तसेच लेखन आणि वाचन ही जुळी भांवडे आहेत, अशी वाक्ये या लेखनात ठिकठिकाणी आहेत. स्थळावकाश, वैचारिक, वाङ्मयीन जडणघडण, पहिले लेखनाविष्कार यांचा संबंध दर्शविणारे अतिशय प्रांजळ असे हे आत्मनिवेदनपर लेखन आहे. खांडेकर व्यक्ती आणि लेखक, तसेच त्या काळातील मराठी वाङ्मय समजून घ्यायलाही ‘पहिलं पावलें’ महत्त्वाची ठरतात. एका लेखकाच्या निर्मितीच्या या सृजनवाटा ‘पहिलं पाऊल’ मध्ये आहेत.
...Read more
- DAINIK AIKYA 15-07-2007
खांडेकरांची पहिली पावलं...
ज्ञानपीठाचे मानकरी वि. स. खांडेकर यांनी विपुल लेखन केले. काव्य, टीका, कादंबरी, कथा, लघुनिबंध, नाट्यलेखन, रूपककथा, पटकथा, अनुवाद अशा वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारात त्यांनी स्वैर संचार केला. या प्रत्येक प्रकारातील आरंभीची त्यांच वाटचाल कशी सुरू झाली याबद्दल वाचकांना कुतूहल असते. खांडेकरांनी त्याबद्दल ‘पहिली पावलं’ नावानं एक आत्मकथन लिहिण्याचा संकल्प सोडला होता. परंतु तो काही पूर्ण झाला नाही. ‘एका पानाची कहाणी’ हे त्यांचे आत्मकथन १९८१ मध्ये प्रसिद्ध झाले. त्यात १८९८ ते १९२९ पर्यंतचा तीस वर्षांचा कालखंड, आला आहे. त्याशिवाय ‘सशाचे सिंहावलोकन’ असाही एका आत्मवृत्ताचा खंड त्यांना लिहायचा होता. त्यांचे एक निष्ठावंत अभ्यासक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी त्यांच्या लेखनाचा अपूर्ण राहिलेला हा भाग पूर्ण करण्याचे मनावर घेतले आहे. खांडेकरांनी ‘पहिली पावलं’ आणि ‘सशाचे सिंहावलोकन असे स्वतंत्र लेखन केलेले नसले तरी या शीर्षकांना साजेल असे लेखनसंदर्भ तयांच्या प्रकाशित साहित्यात विखुरलेले आहेत. ते सर्व संकलित करून पुस्तरूपाने प्रसिद्ध करण्याचा डॉ. लवटे यांचा प्रयत्न आहे.
‘पहिली पावलं’ या पुस्तकाच्या प्रकाशनाने त्यातील एक भाग वाचकांना उपलब्ध होत आहे. हे एका अर्थाने स्फुट लेखांच्या रूपातील खांडेकरांचे वाङ्मयीन आत्मकथन आहे असे त्यांना वाटते. मराठी साहित्यिक आत्मकथनाच्या प्रांतातीलही हे पहिले पाऊल असावे, असे डॉ. लवटे यांना वाटते. खांडेकरांची पुस्तके वाचत असताना आणि अप्रकाशित कागदपत्रे बघत असताना विशिष्ट वाङ्मयप्रकारातील आरंभीच्या लेखनाबद्दलचे जे उतारे सापडले, ते संकलित करून डॉ. लवटे यांनी पहिली पावलं हे शंभर पृष्ठांचे पुस्तक सिद्ध केले आहे. यात निवडलेल्या उताऱ्यांपैकी मी वाङ्मयाकडे का आकर्षित झालो, मी लेखक कसा झालो? हे दोन पानी उतारे अप्रकाशित आहेत. पटकथा लेखनासंबंधी जया दडकरांच्या प्रश्नांची उत्तरे देणारे टिपणही अप्रकाशित होते. रुपककथांबद्दलचे विवेचन कलिकाच्या प्रस्तावनेतून घेतले आहे. उमेदवारी आणि काव्यलेखन याबद्दलचा मजकूर ‘ते दिवस ती माणसे’ या पुस्तकातून तर लघुनिबंध लेखनाविषयक मजकूर ‘एका पानाची कहाणी’ या पुस्तकातून घेतला आहे. बाकीचे लेख हे वृत्तपत्रातून व मासिकातून आलेले आहेत. एकूण १५ लेख या पुस्तकात आहेत.
आपण लेखनाकडे, वाङ्मयाकडे आकृष्ट का झालो याचे उत्तर खांडेकरांनी आत्मप्रतिमेच्या परिपुष्टीसाठी असे दिले आहे. नियती, पूर्वकर्म, विशिष्ट ग्रहांचा प्रभाव वगैरे माझ्या बुद्धीला पटत नाही. लेखनाविषयक माझ्या जन्मजात आकर्षणाचं कारण लेखनात माझ्यातला मी ला काहीतरी मोठं समाधान वाटत असलं पाहिजे. मुरलीवाल्याच्या मागं जाणाऱ्या मुलांप्रमाणं त्यांना आंतरिक ओढ लेखन करण्याला प्रेरक ठरली असावी. माध्यमिक शाळेत व महाविद्यालयात असतानाच लेखक व्हावं, चांगला नामांकित लेखक व्हावं अशा विचित्र महत्त्वाकांक्षेने आपल्याल पछाडले, असे म्हणतात. पालक व शिक्षक यांच्यापैकी कुणातच वाङ्मय प्रेम नव्हते, तरीही मॅट्रिक होईपर्यंत खांडेकरांनी भरपूर वाचन केले. कोल्हटकर, गडकरी हे त्यांचे आदर्श.
नाट्यवेड्या सांगलीत त्यांचे बालपण गेले, तेथे नाटककार देवलांच्या अवतीभोवती असणारी गर्दी बघून लेखक या प्राण्याविषयी खांडेकरांच्या मनात विलक्षण भक्तीची भावना निर्माण झाली. नवं जग निर्माण करण्याची लेखकाची शक्ती त्यांना दिव्य भव्य वाटत असावी. काही उताऱ्यांवरून निश्चित काही हाती न लागण्याचीही शक्यता आहे. ‘हृदयाची हाक’ ही कदाचित माझी शेवटचीच कादंबरी म्हणणारे खांडेकर पुढे डझनावर कादंबऱ्या लिहितात तेव्हा लेखकाची विधाने ही त्या वेळेपुरती असतात हेही लक्षात घेणे जरूर असते. खांडेकरांच्या प्रस्तावना, भाषणे, स्वैर चिंतनात्मक लेख, मुलाखती यांचीही दखल घेऊन त्यांच्या लेखनप्रक्रियेचा आणि प्रेरणांचा अधिक खोलात जाऊन अभ्यास व्हायला हवा. अडीच रुपयांच्या कुड्या बायकोला घेणे शक्य व्हावे म्हणून कादंबरी लिहायला घेतली, यासारखी विधाने वाचकांची दिशाभूल करू शकतात. कादंबरीला फक्त अडीच रुपये एवढाच मोबदला मिळाला असाही अर्थ त्यातून निघू शकतो.
अशा ठिकाणी स्पष्टीकरणात्मक, वस्तुस्थितीनिदर्शक टीपाही जरूर ठरतात. तरीही विविध वाङ्मयप्रकारामध्ये रस घेणाऱ्या खांडेकरांच्या त्याबद्दलच्या भावनांची थोडीफार कल्पना येण्यासाठी हे संकलन उपयुक्त आहेच. ...Read more
- DAINIK SAMNA 13-09-2009
ललिता बापट
युगकर्ते आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.स.खांडेकर हे साहित्याच्या सर्व प्रांतात आपला ठसा उमटवून राहिलेले थोर सारस्वत! कथा, कादंबरी, लघुनिबंध, रुपक कथा, वैचारिक लेख, नाटक, काव्य, चरित्र, आत्मचरित्र, व्यक्तिचित्र, पटकथा, गीत लेखन, टीका, भाांतर, भाषण, पत्र, प्रस्तावना, पुस्तक परीक्षण, संपादन, मुलाखत अशा वैविध्यपूर्ण लेखनाने नुसते मराठीच नव्हे तर इतर भाषिक चोखंदळ वाचकांना आकर्षित करणारे थोर साहित्यिक!
एका पानाची कहाणी; पहिली पावलं, सशाचे सिंहावलोकन अशा तीन आत्मकथनांसाठी त्यांनी व्यक्तिगत टिपणे केलेली होती. त्यांपैकी एका पानाची कहाणी - अर्थात वि.स. खांडेकर यांच्या जन्मापासून विवाहापर्यंतची - अर्थात १८९८ ते १९२९ पर्यंतचा त्यांचा जो तीन दशकांचा जीवनकाल त्यांनी शब्दबद्ध केला होता ते आत्मकथनपर पुस्तक १९८१ मध्ये प्रकाशित झाले आहे. १८९८ ते १९७६ या ७८ वर्षांच्या वि. स. खांडेकर तथा भाऊसाहेब खांडेकर यांच्या जीवनकालांपैकी उरलेल्या कालासाठीची दोन आत्मकथनपर टिपणांचा धांडोळा घेऊन ही दोन्ही उर्वरित आत्मकथनपर पुस्तके संपादित करण्याचे महत्त्वाचे काम डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी पूर्ण करण्याचे ठरवले. त्यापैकी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने अभ्यासू, चोखंदळ आणि युगकत्र्या वि. स. खांडेकर यांच्या साहित्यावर नितांत प्रेम करणाऱ्यांच्या हाती ‘पहिली पावलं’ हे दुसरे आणि साहित्यातील विविध प्रांतात टाकलेल्या त्यांच्या पहिल्या पावलांचा साद्यंत मागोवा घेणे शक्य व्हावे असे पुस्तक दिले आहे.
साहित्यिक वि. स. खांडेकर यांच्या अगदी साहित्यप्रांतातील उमेदवारीच्या कालखंडापासून ते त्यांच्या वैविध्यपूर्ण साहित्याचे विविध भाषांमध्ये अनुवाद कसे झाले इथपर्यंतचा मागोवा घेणारे हे ‘पहिली पावलं’ पुस्तक.
मी वाड्:मयाकडे का आकर्षित झालो - अर्थात दुरून डोंगर साजरे हा या पहिल्या पावलांमधील पावलांचे ठसे लक्षात आणून देणारा पहिला लेख! वि. स. खांडेकर यांच्या साहित्याविष्कारांच्या संदर्भातील कुतुहलाची पूर्ती करणारे पंधरा लेख या संपादित ‘पहिली पावलं’मध्ये आहेत. मी लेखक कसा झालो. अंतर्मनातलं पूजास्थान तर माझ्या आयुष्याचा माझ्या लेखनावर परिणाम - प्रांजळपणे उलगडून सांगणारा तिसरा लेख सामाजिक सुधारणेचा कैवार चौथा लेख वाचकांना घेऊन जातो या अष्टपैलू लेखकाच्या उमेदवारी कालखंडातील पहिलं पाऊल - अर्थात, रखरखीत उन्हातील वाटचाल कथन करणाऱ्या जीवनानुभवातून! पाचव्या लेखामध्ये पहिलं पाऊल उमगते ते काव्यलेखन - ज्याची ते स्वत:च ट ला ट री ला री अशी गंमत करीत आपल्या या पहिल्या वाहिल्या काव्याच्या प्रांतातील पावलांचा मागोवा घेताना नवनीतमुळे प्राचीन कवितेची गोडी लागली आणि त्यानंतरचा वृत्तबद्ध काव्यलेखन छंद आणि वृत्तदर्पण कालापासून राजकीय चळवळी, सामाजिक सुधारणांच्या नानाविध पडसादातून मनात उमटलेल्या कवितेच्या मनाला आधार झालेल्या गोल्डन ट्रेझरचे दर्शन घडवतात! सहावा लेख - पहिलं पाऊल आहे - टीका लेखन! रसिकता अधिक डोळस व्हावी म्हणून - म्हणत हत्यारासारखी लेखणी चालविता येते या विचारातून चुरचुरीत, खुसखुशीत आणि लेखणीच्या स्वैरलीलांना पूर्ण अवसर देणाऱ्या रंगमंच विहाराबद्दल बोलता बोलता बऱ्याच सखोल अभ्यासाची गवाक्षे उघडून देतात.
पहिलं पाऊल, कथालेखन - सुकुमार अर्थगर्भकला पहिलं पाऊल - वकृत्त्व - समाजमनाशी सुसंवाद, पहिलं पाऊल संपादन - तांबड्या मातीतील उठा-बशा या नऊ लेखांमधून वाचकांना आपल्या मिश्किल शैलीने, प्रांजळ कथनाद्वारे वि. स. खांडेकर १९२० ते १९३० च्या दशकात असहकार युगाच्या कालखंडात त्यांच्या वैनतेयमधील मजकुराचा माल पुरवणाऱ्या मदतनीसांच्या भूमिकेच्या रंगातून साहित्यिक आणि पत्रकार या अंशत: भिन्न प्रकृतीधर्माच्या जपणुकीने घेतलेले विविधांगी अनुभवच लक्षात आणून देतात. पहिलं पाऊल - पहिलं पुस्तक (नाटक) - मातृपदाच्या सुखाचा (आणि प्रसववेदनेचाही) लाभ - १९२८ साली सांगलीला रंगभूमीवर सादर झालेले ‘रंकाचे राज्य’ आणि या नाटकाने भाऊसाहेबांना त्यांच्या नाटकात नायिकेचे काम करणाऱ्या कमळाबार्इंविषयी चांगले उद्गार काढणारे पत्र पाठवणारे केशवराव दाते या किश्शापर्यंतचा साहित्याचा या सर्व प्रांतातील मुशाफिरीचा घेतलेला प्रामाणिक लेखाजोखा पुन:पुन्हा वाचण्यासारखाच आहे. रायटर्स आर्ट वर्कसारख्या ललित लेखकांचं अंतरंग आणि लेखन प्रक्रिया - त्या मागील प्रेरणा यांचा मागोवा घेणाऱ्या पाश्चात्य पुस्तकांच्या धर्तीवरील हे पहिलं पाऊल संपादक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी संपादन कुशलतेने अत्यंत माहितीपूर्ण करतानाच वि. स. खांडेकर यांच्या लेखन विशेषांचेच दर्शन घडवणारा हा जीवन तसाच लेखन प्रवास आत्मसंवादाच्या जोडीने मनाला भिडणारा आणि तितकाच गमतीजमतींसह खुलवणारा केला आहे.
...Read more