Hrishikesh Vidar*पर्व*
साधारण फेब्रुवारी - मार्च मध्ये मी रत्नाकर मतकरींची `ऍडम` ही कादंबरी वाचली होती. त्यानंतर मधले २ महिने कुठलेच नवीन पुस्तक वाचले नव्हते. काही दिवसांपूर्वी सहज चाळण्यासाठी `पर्व` हातात घेतली. डॉ.एस.एल. भैरप्पांनी लिहिलेली आणि उमा कुलकर्णींनी नुवाद केलेली ही मी वाचत असलेली पहिलीच कादंबरी. ८६७ पानांची ही कादंबरी `वाचून होईल की नाही` या साशंकतेसह वाचता वाचता ३ दिवसात संपली.
मी कधीच कल्पना केली नव्हती अशी महाभारताची बाजू माझ्यासमोर `पर्व`मुळे आली. या कादंबरीचे मला सर्वात आवडलेले वैशिष्ट्य म्हणजे महाभारतातील सर्व पात्रे ही `माणसे` म्हणून आपल्या समोर येतात. कदाचित, त्यामुळेच कादंबरी जास्त जवळची वाटते. महाभारतातील कुंतीला मिळालेले मंत्र, भीष्माचे इच्छामरण, चिरंजीवत्वाची संकल्पना, शस्त्रास्त्रे इ. चमत्कृतीपूर्ण गोष्टींबद्दल प्रत्येकाला खूप कुतूहल असते. तसेच ते मलाही होते. पण ही कादंबरी वाचून मला बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. या घटना अशाच घडल्या असतील किंवा नाही याबद्दल मला कल्पना नाही. परंतु अशा घडल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही हे नक्की. असे वाटण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे डॉ. भैरप्पांच्या लेखनातून समोर येणारे महाभारतकालीन भौगोलिक, सामाजिक, आर्थिक परिस्थितीविषयक संदर्भ. इसवी सन पूर्व बारावे शतक हा महाभारताचा काळ या कादंबरीत आहे. त्या काळात असणाऱ्या चालीरीती, राज्यांच्या सीमा, आचार-विचार, भौगोलिक रचना, नगररचना, सामाजिक उतरंड इथपासून ते अगदी प्रत्येक राज्यानुसार आहाराच्या सवयींमध्ये होणारा बदलही आपल्याला वाचायला मिळतो. इतका सूक्ष्म अभ्यास करून ही कादंबरी लिहिली असल्याने काही काळानंतर आपण खरा खुरा घडलेला इतिहास वाचत असल्याचे आपल्याला जाणवू लागते. मी वर उल्लेख केल्याप्रमाणे या कादंबरीतील सर्व पात्रे ही `माणसं` म्हणून वापरतात. म्हणूनच त्यांच्या पराक्रमाला, बुद्धीचातुर्याला, सहनशीलतेला, वयोमानाला मर्यादा जाणवतात. त्यामुळे महाभारताच्या या आवृत्तीचा कोणीच नायक नाही. बहुतेकांना खरं वाटणार नाही पण या कादंबरीत `देव` अशा कोणत्याही गोष्टीचा उल्लेख नाही. तसेच श्रीकृष्ण हा दैवी अवतार म्हणून नव्हे तर यादवांचा राजा म्हणून आपल्याला वावरताना दिसतो.
हे पुस्तक वाचताना मला नरहर कुरुंदकरांच्या एका वाक्याची राहून राहून आठवण झाली. ते वाक्य काहीसं या अर्थाचं होतं की, `इतिहासातील पात्रांचे एकदा दैवतीकरण झाले की त्या काळाचा अभ्यास करणे शक्य होत नाही. कारण, इतिहासाचा अभ्यास हा त्या काळातील सर्व बऱ्या-वाईट गोष्टींचा अभ्यास असतो. ऐतिहासिक पात्रांना एकदा देव केले की असा अभ्यास करणे शक्य होत नाही.` भैरप्पांनी महाभारताची केलेली ही मांडणी यामुळेच तो काळ डोळ्यांसमोर उभा करून जाते. वाचताना प्रत्येक व्यक्तिरेखेचा भैरप्पांनी केलेला सखोल अभ्यास आपल्याला सहज दिसून येतो. भीष्म, द्रोण, कृष्णद्वैपायन, धृतराष्ट्र, युधिष्ठिर, भीम, दुर्योधन, कर्ण, कुंती, द्रौपदी अशा सर्व पात्रांची स्वभाव वैशिष्ट्ये भैरप्पांनी जबरदस्त रंगवली आहेत. त्यांवर वयोमान, गर्व, हट्ट, धर्म-अधर्माच्या तत्कालीन संकल्पना, मानापमानाचे अनुभव, लहानपणापासून मिळत आलेली वागणूक इ. सर्व गोष्टींचा प्रभाव जाणवतो. उमा कुलकर्णींनी या कादंबरीचा मराठीत अनुवाद करताना या सर्व गोष्टी विचारात घेतल्याचे दिसून येते. मराठीतच लिहिलेली कादंबरी वाटावी इतक्या सहजसुंदर भाषेत त्यांनी हा अनुवाद केला आहे.
तसं पाहायला गेलं तर महाभारत ही खूप जुन्या काळापासून चालत आलेली गोष्ट आहे. मूळ कथेत काळानुरूप अनेक बदल होत गेले आहेत. स्थळ, काळानुसार त्यात फरकही जाणवतो. त्यामुळे महाभारताची कोणतीच आवृत्ती १००% सत्य आहे हे आपण सांगू शकत नाही. तरीही, मी महाभारतावर आजवर वाचलेल्या कादंबऱ्यांपैकी `पर्व` सर्वात वेगळा दृष्टिकोन देणारी आणि `ही बाजुदेखील असू शकते` हे सांगणारी ठरली आहे.
- हृषिकेश विदार ...Read more
Mahendra Pangarkar`लॉकडाऊन`च्या कृपेने, `पर्व` ही जवळपास आठशे पानी कादंबरी सलग वाचण्याचा योग आला. या अनोख्या, गृहितांना धक्के देणाऱ्या, कादंबरीबद्दल..
`पर्व - एक वास्तववादी महाभारत`
`महाभारत` या महाकाव्यास आत्तापर्यंत अनेक लेखकांनी आपापल्या परीने न्याय द्यायचा ्रयत्न केलाय. `अमर चित्र कथा` ते `मृत्युंजय` पर्यंत, महाभारत व त्यातील पात्रे अनेक वेळा आपल्याला भेटत आली आहेत.
परंतु लेखक, तत्त्वचिंतक डॉ. एस. एल. भैरप्पा यांनी `पर्व` मधून मांडलेलं `महाभारत` म्हणजे एकामाद्वितीय. याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यात कोणताही चमत्कार किंवा कोणत्याही पात्राचे दैवतीकरण नाही. सारं काही आहे ते मानवीय पातळीवर.
बरं त्यांनी हे मनाला येईल तसं कल्पनारम्य लिहिलंय असंही काही नाही बरं. मी तर म्हणेन यापूर्वी कुणीही कधी महाभारत एवढं अभ्यासपूर्ण लिहिलेलं नसावं. चौदा वर्षे अभ्यास करून, महाभारतातील प्रत्येक स्थळांना भेटी देऊन, तिथल्या बारीकसारीक तपशिलांचा अभ्यास करून, महाभारतावर संशोधन करणाऱ्या अभ्यासकांशी चर्चा करून, त्यांनी हे महाभारत लिहिलंय. म्हणूनच हे महाभारत वाचल्यानंतर, आत्तापर्यंत महाभारतावर वाचलेल्या कादंबऱ्या आपल्याला बाल वाङ्मय न वाटल्या तर नवलच!
यात महाभारताची कथा आहे, पण त्यात नाहीत कोणतेही चमत्कार, नाहीत कुणी देव वा नाहीत कुणी दानव.आहेत ते तुमच्या आमच्यासारखे हाडामासाचे माणसं, राजे, योद्धे इ. इ., प्रेम, राग, लोभ, मोह, मत्सर, मैथुन इ साऱ्या मानवीय गुण अवगुणासह. यातील `कृष्ण` कोणी देव नसून एक राजा आहे, जो चतुर आहे, बोलण्यात वाकबगार आहे, सगळ्या आर्यवर्ताची, आजूबाजूची माहिती ठेवणारा, पांडवांचा सखा आहे. इतकेच नव्हे तर `राक्षस` हे सुद्धा कोणी मायावी शक्ती असलेली दृष्ट प्रवृत्ती नसून ते जंगलात राहणारी, शरीराने धष्टपुष्ट, कच्चे मांस खाणारी, काहीशीे अप्रगत (तेंव्हाच्या इतरांच्या तुलनेत) असलेली जमात आहे.
या महाभारताचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे महाभारतातील पात्रांचे तरल मनोविश्लेषण. यावितिरिक्त यात आहेत त्यावेळच्या भौगोलिक परिस्थितीचे अभ्यासपूर्ण वर्णन (त्यावेळच्या नकाशा सहित!) म्हणजे त्यावेळचे विविध राज्ये, त्याच्या सीमा, लगतचे प्रदेश, रस्ते, परिसर इत्यादी सारं तपशीलवार दिलेलं आहे. याबरोबरच त्यावेळची संस्कृती, चालीरीती, रूढी, आहार विहार, युद्धाची पद्धत, धार्मिक आचरण, आर्यांमधील पोटजाती, आर्येतर समाज, समाजांतील परस्पर विवाह आणि लैगिक संबंध, तत्कालीन अरण्य व कृषिभूमीचा तपशील याचीही जोड आहे. या साऱ्या गोष्टी कथेचाच एक भाग बनून येतात, त्यामुळे कथेची विश्वासार्हता नक्कीच वाढते.
इथं आपण महाभारतातील आत्तापर्यंत वाचत आलेल्या प्रत्येक दैवी चमत्काराऐवजी तर्कसंगत, अभ्यासपूर्ण पर्याय दिलेले आहेत. उदाहरणार्थ, यात संजयला कोणतीही दिव्यदृष्टी नाही तर तो हस्तिनापूरहुन घोड्यावरन युद्धाच्या ठिकाणी जातो, व हालहवाला बघून धृतराष्ट्राला सांगायला येतो. यात हस्तिनापूरहून युद्धभूमीचं अंतर, तो निघून पोहचणे यासाठी लागणारी वेळ, तोपर्यंत धृतराष्टाची होणारी तगमग हे सारं इतकं अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडलं आहे की `दिव्यदृष्टी` आपल्याला विनोद वाटू लागते.
आणि असे तर्कनिष्ठतेचे अधिष्ठान असल्यामुळेच द्रौपदीचे पांडवांशी नातेसंबंध, कुंतीची पुत्रप्राप्ती ह्या व इतर अनेक गोष्टी सरळ, परखडपणे, कोणताही आड पडदा न ठेवता, स्पष्टपणे मांडण्याची हिम्मत ते करतात.
पुस्तक वाचायला घेतल्यावर,
पुस्तकाची जातकुळी आपल्याला सुरवातीलाच लक्षात येते व मग पुढील कथेत आपण आत्तापर्यंत ऐलेल्या चमत्काराऐवजी कक्की के घडलं असेल, त्याचं कोणतं लॉजिक असेल, ती घटना म्हणजे नक्की काय असेल ही उत्सुकता पानागणिक वाढत जाते आणि ही जवळपास 800 पानी कादंबरी कधी हातावेगळी होती ते कळतसुद्धा नाही.
`पर्व` मध्ये महाभारतातील `त्या` महायुद्धाचे अगदी तपशीलवार वर्णन तर आहेच, याशिवाय हे युद्ध सुरू होण्याआधी दोन्ही बाजुंनी केलेली सैन्याची जमवाजमव, त्यासाठी दूर दूर वेगवेगळ्या राज्यांत जाऊन, दूत पाठवून, आपली बाजू भक्कम करण्याचा केलेला प्रयत्न, यध्यमागची मानसिकता, नीतिशास्त्र, हे सारं तपशीलवार दिलंय. युद्धभूमी, त्यातील सहभागी सैन्य, त्यांची मनस्थिती, त्यांची व्यवस्था, युद्धभूमीवर जाणवणाऱ्या समस्या, दिवसागणिक बदलत जाणारी युद्धभूमी, युद्धान्तरची विदारक परिस्थिती, इत्यादी सारं बारीकसारीक तपशिलासह दिलंय. म्हणूनच आपण वाचताना फक्त वाचक न राहता प्रत्यक्ष युद्धभूमी अनुभवतो... आपणही सामील होतो युद्धाच्या तयारीत, आपणही अनुभतो तो संहार, अनुभवतो ती योध्यांमधली अपरिहार्यता... आपलेही पावले अडखळतात त्या पडलेल्या प्रेतांच्या खचामध्ये...
...आणि म्हणूनच हे महाभारत वाचून संपले तरी आपल्याला त्या काळातून, त्या मनस्थितीतून बाहेर यायला काही काळ जातो.
- महेंद्र पांगारकर ...Read more