NEWSPAPER REVIEWइतरांशी संवाद साधण्याची निकड हीच ललित लेखनाची प्रेरणा…
पावसाआधीचा पाऊस हा ललितलेखांचा संग्रह. त्याच शीर्षकाचा लेखही संग्रहात आहे आणि त्यात पावसाची चाहूल लागल्यावर सर्वच निसर्गात जाणवणाऱ्या तरतरीप्रमाणेच मनालाही कशी तरतरी आली आहे ते शांताबार्इंनी खुलून सांगितले आहे.
‘‘झाडांच्या फांद्या खालीवर डोलत होत्या, पाने सळसळत होती, गच्च डवरलेल्या पिवळ्याजर्द फुलांच्या झाडांवरून भरभर पाकळ्या सुटत होत्या. खालच्या जमिनीवर त्यांचे पिवळे गालिचे पसरले होते. हवा ढगाळ होती. आभाळ गडद काळसर झाल होते. पण त्या ढगाळ हवेत एक उत्सुक भाव होता. आभाळाचा काळसर रंग लाघवी वाटत होता. साऱ्या वातावरणातच एक सावळे लाडकेपण लाडिवाळपण काठोकाठ दाटून आले होते...’’ असे काव्यमय वर्णन करताकरताच आपल्या शाळेचे दिवस, आपल्या कॉलेजचे दिवस त्यांच्यापुढे उभे राहतात. जूनमध्ये पावसाळा सुरू होता होता नव्या पुस्तकांबरोबर नवी बॅग, नवे कपडे, नवी छत्री या साऱ्या साजशृंगारासकट पहिल्या पावसाने भिजलेल्या वाटेवरून चालत जाणे आनंददायक असे. कॉलेजच्या दिवसात प्रत्यक्ष पावसापेक्षा कवितेतून भेटणारा पाऊस अधिक भारावून टाकणारा होता. रविकिरण मंडळाच्या कवींनी पावसाचे, पावसाळ्याचे एक वेगळे आकर्षण मनात रुजवले. त्यातील वर्षाऋतूची धुंद उन्मादक शब्दचित्रे, कालिदासाच्या मेघदूतातील वर्णने व प्रेमसंदेश हे सारे पुढेही मनात हिरवेगार, अम्लान, टवटवीत राहिले आहे.
व्यवहारी प्रापंचिक प्रौढ वयात मात्र प्रत्यक्ष पावसातला सारा धुंद उन्माद, सारी काव्यात्मता हरवून जाते, परंतु खऱ्याखुऱ्या पावसापेक्षा पावसाआधीचा पाऊस हा अधिक आकर्षक वाटतो. प्रत्यक्षातल्या पावसाचा उपद्रवीपणा या पावसात नसतो; तो पाण्यावाचून भिजवतो; शरीरवृत्तींना चिंब करून टाकतो. माणसातल्या आदितत्त्वाला आवाहन करतो आणि निसर्गाशी देहापलीकडच्या मनावर, आत्म्यावर झेलता येतो आणि भाववृत्तींना तरतरी देत असतो.
‘आला पाऊस आला’ या लेखात माणसापेक्षा पशुपक्षी हे परस्परांशी अधिक सरळ, बिनगुंतागुंतीचे आणि निरोगी वर्तन ठेवतात हे सूत्र केंद्रस्थानी आहे. त्यांचे प्रेम, त्यांचे वात्सल्य, त्यांचे शत्रुत्व हे सर्व प्राथमिक पातळीवर वावरत असते. पशुपक्ष्यांच्या या जगात एक प्रकारची निष्ठुरता असते. या निसर्गात दुबळेपणाला क्षमा नसते. जगण्याची ताकद असेल तोच जगतो. इतर मरुन जातात. पशुपक्ष्यांना आपले जीवन कधी संपवावे हे कळते. माणसाला ते कळत नाही.
शब्दांचा वेगवेगळ्या पातळ्यांवर शोध घेण्याचा शांताबार्इंना लळा आहे. छंद आहे. अल्कोहोलिकच्या धर्तीवर बनवलेल्या वर्कोहोलिक या शब्दांची त्यांना गंमत वाटते. वर्कोहोलिक म्हणजे कामाच्या आहारी गेलेला माणूस असे सांगतानाच त्या सावधपणे पुस्ती जोडतात. ‘‘इथे काम शब्दाचा अर्थ नेहमी आपल्या मनात आधी येतो तो घ्यायचा नाही’’ अशी वर्कोहोलिक माणसे मग त्यांना आठवतात. सदैव घर आरशासारखे लख्ख ठेवणाऱ्या बाई शांताबार्इंचे कौतुकाचे शब्द ऐकूण घेतात आणि खुलासा करतात, ‘‘अग तूच पाहा. घरात पोर ना बाळ. मग पसारा कोण करणार ? केरकचरा कोण करणार ? मग आपलं आपणचं पुन:पुन्हा सारं जागेवरून काढायचं अनु पुन:पुन्हा नीटनेटकं लावायचं. वेळ बरा जातो. जिवाची तेवढीच करमणूक होते.’’
‘शब्दांचे चेटूक’ या लेखात आपल्याला रंगगंध रूपांसह भेटलेल्या अनेक शब्दांच्या कहाण्या शांताबाई जाग्या करतात. लाललाल यासारखे रुमझुमणाऱ्या नादाचे शब्द, चट्टक, बरं का, टिंगुश, तोठरा, न्याहार, चुणचुणखडा, चिमखडी, धट्टीकट्टी गरीबी आणि लुळीपांगळी श्रीमंती, स्फटिकघराचे दीप, चिमणचेटके चांदणे अशा अनेक शब्दांचे चेटूक त्या स्पष्ट करतात.
‘शब्द सोडलेले धडे’मध्ये कोऱ्या जागांतले गूढ प्रकट होते.
‘मला ओळखलंत का’ असा प्रश्न विचारून आपल्याला पेचात टाकणाऱ्या माणसाशी ‘आव्हान स्वीकारून’ पूर्वभेटीचे तपशील पुरवण्यातले थ्रिल ‘भेट’ मध्ये शांताबाई अनुभवतात तर आपल्यावर निर्हेतुकपणे स्तुतीचा व कॉम्प्लिमेंट्सचा वर्षाव करणारे ‘मिस्टर कॉम्प्लिमेंट’ भेटल्याने त्यांना आनंद होतो. अवतीभवतीच्या इतर अनेक अनाकलनीय, गूढ, विचित्र गोष्टींप्रमाणेच त्याचा स्वीकार करणे इष्ट असे आपले मत देतात. ‘‘हा लेख त्यांना वाचून दाखवला तर त्यात त्या मख्खी त्यांना कळली न कळली तरी ते म्हणणार वा ! काय छान लेख आहे ! एक्सलंट.’’
कॅलिडोस्कोपला झटका दिला की आतील आकृत्यांची रचना बदलते. पहिल्या आकृतीच्या पोटातच दुसरी आकृती दडलेली असते. त्याप्रमाणे एका माणसाच्या मनात आणि व्यक्तिमत्त्वातही अनेक माणसे दबा धरून बसलेली असतात आणि ती अनपेक्षितपणे बाहेर येऊन आपले वेगळे रूप प्रकट करतात. अँथनी क्विन या अभिनेत्याला एका मुलाखतकाराने विचारले, ‘‘तुम्हांला अनेक स्त्रियांचे प्रेम लाभते. स्त्रियांना वश करणारी कोणती जादू तुमच्यापाशी आहे ?’’ त्यावर त्याने उत्तर दिले, ‘‘वेश्येबरोबर वागावे तसा मी राणीशी रंगेलपणाने वागतो तर वेश्येला राणीसारखे सन्मानाने वागतो. कारण प्रत्येक राणीत एक वेश्या दडलेली असते आणि प्रत्येक वेश्येत एक राणी दडलेली असते हे मला माहीत आहे. माणसाच्या साध्या सोप्या रूपात अनेक रूपे दडलेली असतात हे लक्षात घेतले तर त्यांच्याशी आपले मैत्र अधिक बहरू शकेल. आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये अनेक परस्परविरोधी व्यक्तिमत्त्वे एकाच वेळी विद्यमान असतात. त्यांना एकत्र नांदवणे कधीकधी अवघड होते. कधी माणसाचा हॅम्लेट होतो तर कधी अर्जुन. काही वेळा ही रूपे स्वत:लाच थक्क करतात, असा हा तिढा शांताबाई ‘कॅलिडोस्कोप’च्या प्रतिमेद्वारे आपल्यापुढे ठेवतात.
माणूस हा गर्दीत असला की त्याचे वर्तन वेगळ्या प्रकारचे होते. पब्लिक सायकॉलॉजी, झुंडीचे मानसशास्त्र वेगळे असते. बस अचानक थांबल्यावर जमाव ड्रायव्हरवर उखडतो. समोरची गर्दी बघून प्रवासी घाबरतात. काय झालं? कुणी बसखाली आलं तर नाही ना ? म्हणून एकमेकांकडं भीतीच्या नजरेनं पाहतात... पण लोक हसत असतात, नाचत असतात, समोर चित्रपटाचं शूटिंग चालू असल्याने गर्दी झालेली असते, म्हणून बस थांबलीय हे कळल्यावर साऱ्यांना हुश्श वाटते. पण तेवढ्या वेळात झुंडीच्या पाशवी शक्तीचे जे भयानक दर्शन होते ते हादरवून सोडते. ‘बिनशिराचे कबंध’ मधील हा अनुभव आपल्या अंगावरही काटा आणणारा आहे.
‘खिडक्या झरोके’ या लेखात ‘एखाद्या खिडकीतून बाहेरचे दृश्य बघून, त्यावर कल्पनेचे रंग मनसोक्त चढवण्यातले कलाकाराचे कौशल्य अधोरेखित केले आहे. एका इंग्रज लेखकाने पोस्टकार्डवरील जपानी चित्राचे वर्णन करताना म्हटले आहे, ‘‘या चित्राच्या खिडकीतून मी जो जपान बघतो तो आता खास माझा जपान झाला आहे. हा जपान माझ्या एकट्याच्या मालकीचा आहे. तुम्ही कदाचित जपानला भेट देऊन जपान प्रत्यक्ष बघाल. पण माझ्या रंगीत चित्रातून मला दिसणारा जपान फक्त माझ्याच डोळ्यांना दिसणारा आहे, तुम्हाला तो कधीच दिसणार नाही.’’ प्रतिभावंत जेव्हा आपल्या अनुभवाच्या खिडकीतून जन्म, मृत्यू, प्रेम, वात्सल्य, विरक्ती वगैरे सनातन भावनांचे चित्रण करतात तेव्हा त्यांना त्यातून पलीकडचे एक जग दिसत असते. हे जग खास त्यांचे असते. कलावंत प्रतिसृष्टी निर्माण करतो याचा अर्थ त्याने हे स्वत:चे जग आपल्या कलेतून दाखवलेले असते असा असतो. अशा प्रकारचे स्पष्टीकरण शांताबाई देतात आणि कलावंताला होणाNया जीवनदर्शनाच्या वेगळेपणाचे रहस्य प्रकट करतात.
मुंबईच्या विश्वविख्यात चोरबाजारात जाऊन खरेदी करण्याचा अनुभवही असाच उद्बोधक आहे. ‘‘चोरबाजार आहे हा ! इथं कुठलीही चीज केवढ्याही कमी किंमतीत मागता येते’’ असे बरोबर असणाऱ्या सतीशने सांगूनही पंचाहत्तर रुपयांचा चिनी दगडाच्या गणपतीच्या मूर्तीचा भाव पंचवीसतीसपर्यंत खाली आणण्याची घासाघीस करायचा धीर होत नाही. त्या बाजारातील वेगवेगळ्या वस्तू बघताना अनेक शंकाकुशंकांचे वादळ त्यांच्या मनात घोंगावते. मुंबईत आहोत की दुसऱ्याच अपरिचित दुनियेत अशा प्रश्न त्यांना पडतो.
लांब देठ ठेवून खुडलेले आठदहा गुलाब एक मैत्रीण शांताबार्इंना देते. त्या देठांचे काटे काढलेले असतात, त्यामुळे शांताबार्इंना त्या खुडून टाकलेल्या काट्यांची कीव वाटते. बिनकाट्याचे गुलाब भुंडे वाटतात. मैत्रिणीला त्याबद्दल विचारल्यावर ती सांगते. ‘‘खरं सांगायचं तर या अगदी साध्या व्यावहारिक सोयीच्या गोष्टी आहेत. त्यात खंत करण्याजोगे, व्याकुळ होण्याजोगे काहीसुद्धा नाही. तुझ्या हळहळण्यात एक छुपा अहंकार आहे. या दुष्ट, निर्दय, संवेदनाशून्य माणसांच्या जगात आपण मात्र वेगळ्या, हळव्या, संवेदनाक्षम आहोत हा तुझा अविर्भाव होता. आपलं तथाकथित दु:ख तू एन्जॉय करीत होतीस. मी ढोंगीपणा म्हणते तोच हाच ! गुलाबाचे काटे सोयीनुसार खुडले तर त्यात काय मोठंसं बिघडलं ?’’
शाळेतला भज्या हा शाळासोबती. व्हिलनसारखा वागणारा. लहान मुलांना दमदाटी करणारा. पाट्या फोडणारा. त्रास देणारा. या भज्यासारखी माणसं आयुष्यात सतत भेटत राहतात आणि आपण करीत असलेल्या कामाची वासलात लावत असतात. त्यात दोष काढत असतात. दुसऱ्याच्या पायात पाय घालून त्याला पाडायचे, त्याची पाटी फोडायची, त्याला फटाफट शाब्दिक कानफटात मारण्याची अशी कामे ही माणसे करीत असतात.
‘ए कंट्री डायरी ऑफ एडर्विडयन लेडी’ या दैनंदिनीद्वारे एडिथ होल्डन या संशोधक महिलेने वर्षभरातील आपल्या निसर्गविषयक निरीक्षणांची नोंद केली. निसर्गातील पशू, पक्षी, कीटक, ढग यावर लिहिताना वाचलेल्या साहित्यातील व काळातील नेमके संवादी उतारेही जोडलेले आहेत. इंग्रजी कवितांमधील निसर्गविषयक उतारे हे या दैनंदिनीला काव्यात्मकता प्रदान करतात, तसेच तिने स्वत: रेखाटलेली जलरंगातील सुंदर चित्रे या दैनंदिनीच्या देखणेपणात भर घालतात. ‘‘सुंदर चित्रांची नाजुक हलक्या तरल कोवळ्या रंगांची नेत्रसुखद उधळण’’ त्यामुळे होत राहते.
१९०६ साली लिहिलेली ही दैनंदिनी तिच्या मृत्यूनंतर ५७ वर्षांनी, १९७६ साली प्रथम प्रसिद्ध झाली. एडिथचे मूळ हस्तलिखितच आपण पाहत आहोत असे वाटावे अशा प्रकारे याचे यथामूल मुद्रण केलेले आहे. १०११ साली एडिथचे लग्न झाले. १५ मार्च १९२० साली लंडनच्या क्यू गार्डनमध्ये अक्रोडाच्या कळ्या गोळा करताना ती पुलावरून नदीत पडली आणि पाण्यात बुडून मरण पावली.
इनग्रिड बर्गमनचा ‘इन ऑफ दि सिक्स्थ हॅपीनेस’ हा चित्रपट शांताबार्इंचा अत्यंत आवडता. या सहाव्या सुखाच्या सराईची नायिका इनग्रिड ही अमेरिकन नर्सच्या रुपात दिसते. सैन्याच्या सुरक्षापथकातला एक डॉक्टर तिच्या प्रेमात पडतो. युद्धाच्या धुमाळीत त्याच्या त्या प्रेमाच्या उच्चाराने इनग्रिड चकित होते, हर्षभरित होते आणि एक प्रकारच्या कृतार्थतेच्या भावनेने चिंब भिजून निघते. चिनी कल्पनेप्रमाणे सहा सुखे माणसाला हवी असतात. आरोग्य, संपत्ती, नावलौकिक, चांगली पत्नी, चांगली मुलं ही पाच सुखं. सहावं सुख हे ज्यांच त्यालाच हवंहवंस वाटणारं. प्रत्येकाच्या कल्पनेतलं श्रेय. या सहाव्या सुखाचा शोध आपोआप लागतो. तसा तो लागण्यातच खरी गंमत.
शांताबाई आपल्या प्रास्ताविकात आपल्या ललितलेखनाच्या प्रेरणांबद्दल काही महत्त्वाची गुपिते सांगतात. ‘‘विषय कसे सुचतात ?’’ याचे उत्तर त्या देतात, ‘‘डोळे उघडे ठेवून वावरणाऱ्याला विषयाचा तुटवडा पडू नये. आपल्या भोवती इतके घडत असते, दिसत असते, हवेतून आपल्या संज्ञेवर आघात करीत असते की त्यातूनच लिहिण्यासाठी अनेक विषय मिळतात. माणसामाणसांतले गुंतागुंतीचे नातेसंबंध, त्यांच्या वर्तनातील सुसंगती-विसंगती, माणसांचे अपार एकाकीपण, नियतीच्या संदर्भातील त्याची संपूर्ण अगतिकता हे सारे मला फार कुतूहलजनक वाटते, करूण वाटते. त्यातूनही ललितलेखांचे विषय सुचतात. माणसाखालोखाल मला निसर्ग प्रिय आहे. तशाच माझ्या बाळपणच्या आठवणी. माझी वाचनाची आवड. लहानमोठे, बरेवाईट, भव्यक्षुद्र सारे मला वाचायला आवडते. माझ्या आवडत्या मांजरांनीही मला अनेकदा विषय दिले आहेत.’’
सदर लेखनाबद्दल त्या म्हणतात, ‘‘हे लेखन शाश्वत नसते, त्यात फक्त तात्कालिक घटनाप्रसंगांवरच लिहिले जाते, त्याला एक चुरचुरीत उथळपणा असतो, आजचे वृत्तपत्र ही उद्याची रद्दी इ. अनेक आक्षेप वृत्तपत्रांतील सदरांवर घेतले जातात. त्यातल्या काहींमध्ये सत्याचा अंश असू शकेल. तरीही असे सदर चालवणे यात लेखकाला कमीपणा आणणारे काही आहे असे मला वाटत नाही. वाहत्या प्रवाहात अंग झोवूâन पाण्यावर तरंगताना पोहणाराला जो अनुभव मिळतो तोच आनंद असे मुक्त लेखन करताना मला लाभला आहे.’’
ललितलेख लिहिण्यासाठी कोणते गुण आवश्यक असतात ? या प्रश्नाचे उत्तर देताना त्या सांगतात, ‘‘पूर्वग्रहरहितता, मनाचे डोळसपण, जीवनाबद्दलचे उदंड कुतूहल, चटकन प्रतिसाद देणारी संवेदनाक्षम वृत्ती, लिहिण्याची हौस आणि कष्टांची तयारी. निर्मितीचा आनंद, आत्माविष्काराने लाभणारी तृप्ती, इतरांशी संवाद साधण्याची निकड हीच अशा लेखनाची खरी प्रेरणा. खरे पारितोषिक. कविता लिहिताना जे समाधान मळते तीच तृप्ती या ललितलेखनानेही मला अनेकदा दिली आहे.’’
म्हणूनच हे ललितलेख वाचणे म्हणजे शांताबार्इंच्या विदग्ध सहवासात चार घटका काव्यशास्त्र विनोद मैफिल रंगवणे होय.
...Read more