DAINIK SAKAL 06-05-2007जीवन व्यवस्थापन...
सध्याच्या स्पर्धेच्या काळात स्वत:चे शरीर, मन व मेंदू कायम सज्ज ठेवावे लागतात. अफाट धावाधाव करताना स्वभावत: काही बरे-वाईट बदल घडत जातात. याबाबत सतर्क करणारे व उपयुक्त मंत्र सांगणारे पुस्तक संजीव परळीकरांनी लिहिले आहे. ‘पुढाकार घ्य : प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे सूत्र’ या पुस्तकातून त्यांनी जीवनाचे व्यवस्थापन करण्यासाठी काही कृतिकार्यक्रम दिले आहेत. तेही सुलभ असल्याने वाचकांना अजमावून पाहावेसे वाटतील.
सवयी, लकबी, वृत्ती, प्रवृत्ती वगैरेबाबत माणसे बरीच संवेदनशील असतात. याबाबत चांगले बदल तर करावेसे वाटतात, पण नेमके ते कसे करावेत, ते समजत नाही. अशांसाठी हे पुस्तक मित्रत्वाचा सल्ला देणारे ठरू शकते. यशस्वी होण्यासाठी मानसिकतेत बदल सुचविणारी पुस्तके गेल्या दोन दशकांमध्ये बऱ्याच प्रमाणात निघाली. त्यात निरनिराळे विचारप्रवाह दिसतात. हे पुस्तक स्वत: पुढाकार घेण्याचा विचार मांडते. त्यामागे वस्तुनिष्ठपणा अधिक आहे. कल्पनेतील भराऱ्या नाहीत. त्यामुळेही हे पुस्तक वाचकांना जवळचे वाटू शकेल. व्यक्तिमत्त्वातील बदलांसाठी आवश्यक असलेली विचारशुद्धी, जगण्याच्या उद्देशाची निश्चिती, दैनंदिन जीवनक्रमाचे नियोजन, भावनांना वळण लावणे, नात्यांमधली स्वत:ची जबाबदारी लक्षात आणून देणे, शांत व स्थिर मनाचे महत्त्व वगैरे अनेक महत्त्वाच्या पैलूंवर यात सोदाहरण विवेचन आहे. कॉर्पोरेट विश्वातली माणसे किंवा गृहिणी अथवा विद्यार्थी, अशा सर्वांनाच कार्यकुशलता व प्रभावीपणा यातला फरक उलगडून सांगायचा यात प्रयत्न आहे.
पुढाकार का घ्यावा, ते सोपे की कठीण, त्यातले फायदे-तोटे कोणते, वगैरे तपशिलात समजावून सांगत लेखक नकळतपणे या संदर्भातल्या स्वाध्यायासाठी वाचकाला प्रवृत्त करतो. नोकरी मिळणे, मनासारख्या गोष्टी घडणे, कौटुंबिक कलह मिटणे व एकूणच आनंदी राहता येण्यासाठी पुढाकाराची गरज आपल्याला आहे. त्यासाठी कोणत्या गोष्टींना केव्हा, किती व कसे महत्त्व द्यायचे, याबाबत कानमंत्र या पुस्तकातून मिळतात.
-निला शर्मा ...Read more
DAINIK LOKMAT 07-05-2007माणूस माणसाला भेटल्यावर प्रथमदर्शनी मनावर ठसतं ते त्याचं व्यक्तिमत्व. माणसाच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख ही त्याच्या विचारातून परस्परांना होते व या विचारांची तार जुळली की नाती, मैत्री असे संबंध प्रस्थापित होतात. केवळ नात्यासाठी व्यक्तिमत्वाचा प्रभाव उपयोी पडतो असे नाही तर समाजात वावरत असताना नोकरी पेशाच्या ठिकाणी, सार्वजनिक स्थळी, गर्दीत व गर्दीबाहेरही आपले साथीदार असते. तेव्हा व्यक्तिमत्त्वाचा विकास हा आपला केवळ स्वत:चाच नाही तर समाजात उमटणाऱ्या प्रतिक्रियाचा पडसाद असतो. हे जाणून इनोव्हसोर्स सोल्यूशन प्रा. लिमिटेडचे कार्यकारी संचालक संजीव परळीकर यांनी प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे सूत्र सांगणारे पुढकार घ्या हे पुस्तक लिहिले व मेहता पब्लिशिंग हाऊसने ते नुकतेच प्रकाशित केले. या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक संजीव परळीकर यांच्याशी चर्चा करताना असे जाणवले की, त्यांना मराठी तरुणाविषयी अतिशय कळकळ आहे. ते म्हणाले की कॉर्पोरेट जगात मराठी तरुण हुशार असूनही बराच मागे दिसतो. त्यांना जर काहीतरी घवघवीत मिळवायचं असेल तर त्यांना या पुस्तकातील विचार उपयोगात आणता येतील. नुसतेच तरुण नव्हे तर स्त्री, पुरुष, युवक, विद्यार्थी की ज्यांना इंग्रजीवर प्रभुत्व नसल्यामुळे अनेक संधीपासून वंचित राहावे लागते. अशा सर्व मंडळीसाठी हे पुस्तक लिहिलेले आहे. जी मंडळी अपयशामुळे खचून गेली आहेत अशा मंडळीसाठी हे पुस्तक लिहिलेले आहे. ज्यांच्या नशिबाचे फासे कायम उलटेच पडत आले आहेत. अशांना या पुस्तकामुळे एक नवीन डाव मांडता येण्याची संधी मिळावी, म्हणून मी हे पुस्तक लिहिलेले आहे. अनेक छोटे उद्योजक ज्यांना चांगले व्यवस्थापन शिकायचे आहे. त्यांच्यासाठी हे पुस्तक लिहिलेले आहे. समस्त होतकरू मराठी तरुणांना ताठ मानेने समाजत वावरण्याकरता हे पुस्तक लिहिलेले आहे.
आपण सर्वचजण अनेक छोट्या प्रसंगात गोंधळून जाऊन चुकीचा निर्णय घेतो व त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वावरही या नकारात्मक विचारसणीचा प्रभाव पडतो व व्यक्तिमत्त्वाचा विकास थांबतो. या समस्येला ओळखून पुढाकार घ्या, या पुस्तकात पुढाकाराची दहा सूत्रे मांडली आहेत. त्यात विचारशुद्धी, जगण्याचा उद्देश, नियोजनाची गरज, नातीगोती कशी सांभाळावी त्याचप्रमाणे दुसऱ्याचे मत, सांघिक बळ, आरोग्य, मनाची स्थिरता व शांतता, समाजाचे ऋण जाणणे व आनंदी जगणे या गोष्टीवर भर दिला आहे.
व्यक्तिमत्त्वाचे दोन प्रकार सांगताना पहिल्या सूत्रात बाह्य व्यक्तिमत्त्वापेक्षा आंतरिक व्यक्तिमत्व अधिक मोलाचे आहे. हे अतिशय सोप्या भाषेत विशद केलेले आहे. या सूत्राला लेखकाने विचारशुद्धी करा असे शीर्षक दिले आहे. या विचारशुद्धीसाठी अतिशय उच्च जीवनमूल्य सुचविलेली आहेत व त्याचा आपल्या दैनंदिन आयुष्यात कसा उपयोग करता येईल. हेसुद्धा सांगितलेले आहे. या विचारांचा एकत्रित समुदाय म्हणजेच दृष्टिकोन व आपले दृष्टिकोन सकारात्मक का ठेवायचे व कसे ठेवायचे, यावर या पुस्तकात प्रामुख्याने भर देण्यात आला आहे. हे दृष्टिकोन सकारात्मक ठेवण्यासाठी निसर्गाने मनुष्यप्राण्याला सजगता, कल्पनाशक्ती, सद्सद्विवेकबुद्धी, इच्छाशक्ती ह्या चार देणग्या दिलेल्या आहेत. व त्याचा वापर जागृतपणे करायचा, हेही उल्लेखलेले आहे.
त्याचबरोबर आपल्या जगण्याचा उद्देश आपण प्रत्येकाने शोधून काढला पाहिजे, असे दुसऱ्या सूत्रात लेखक म्हणतात. तसे केल्याने आपलेच जीवन अर्थपूर्ण होईल. परंतु त्यासाठी पुढाकार हा प्रत्येकाला घ्यावा लागेल असे लेखक म्हणतात. सजगता वापरून व कल्पकता वापरून जगण्याचा उद्देश शोधायचे तंत्र यात सांगितलेले आहे. चौफेर व्यक्तिमत्व साकार करण्यासाठी आपली कौटुंबिक भूमिका, व्यक्तिगत भूमिका व सामाजिक भूमिका यात परिस्थितीजन्य झालेल्या बदलासह स्वत:ला तपासायला सांगितले आहे तर पुस्तकाच्या तिसऱ्या सूत्रात नियोजन कसे करावे, या विषयी अत्यंत मौल्यवान सूचना केलेल्या आहेत. ...Read more
DAINIK AIKYA 31-12-2006प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे सूत्र...
वर्तनशैली, नेतृत्वविकास, व्यक्तिमत्व विकास या विषयांवर अनेक कार्यशाळा घेऊन हजारो तरुणांना प्रशिक्षित करणारे संजीव परळीकर हे इनोव्ह सोर्स सोल्यूशन या कंपनीचे कार्यकारी संचालक आहेत. त्यापूर्वी जीटीएल, युनाटेड कार्बन, िकोलस पिरामल वगैरे कंपन्यात त्यांनी विविध पदावर काम केलेले आहे. कामगार म्हणून सुरुवात करून पुढे महाविद्यालयीन पदवी घेऊन सतरा वर्षात औषध उत्पादक कंपनीत असिस्टंट मॅनेजरपर्यंत त्यांनी मजल मारली. तेथे पुढे बढतीची शक्यता न दिसल्यावर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी कामे केली. ‘सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल’ आणि ‘हाऊ टू स्टे वुईथ अँड विदाऊट अँगर’ या दोन पुस्तकांचा त्यांच्यावर खूपच प्रभाव आहे. त्यावर आधारित कार्यशाळा घेतल्यावर त्यांनी स्वत:चीच एक व्यवस्थापनविषयक विचारधारा विकसित केली.
सुखी होण्यासाठी घ्यावयाच्या पुढाकाराची दहा सूत्रे परळीकरांनी मनाशी निश्चित करून त्यांचे सविस्तर वर्णन करण्यासाठी हे पुस्तक तयार केले आहे. ‘पुढाकार घ्या’ ‘प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे सूत्र’ असे नाव त्यांनी त्या पुस्तकाला दिले आहे. याशिवाय ‘पाल्य व्यक्तिमत्त्वाचा कानमंत्र’, ‘झटपट व्यक्तिमत्त्व विकास’, ‘चार शब्द द्यावे-घ्यावे’ ही पुस्तकेही परळीकरांच्या नावावर जमा आहेत.
शेकडो प्रशिक्षण वर्ग घेतल्याने हसत खेळत, विनोद आणि दृष्टांत देत आपले मुद्दे स्पष्ट करण्याचे कौशल्य परळीकरांनी आत्मसात केले आहे. या पुस्तकातही त्याचा प्रत्यय येतो. समर्पक उदाहरणाद्वारे ते आपले विचार आणि मुद्दे वाचकांना, श्रोत्यांना पटवून देण्यात कसूर करीत नाहीत.
हे पुस्तक म्हणजे एक जादूचा आरसा आहे असे परळीकर म्हणतात. आपल्या मूळ व्यक्तिमत्त्वाला पूर्ण बदलून टाकण्याची जादू या पुस्तकात आहे असा त्यांचा विश्वास आहे.
प्रभावी व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी पुढारीपण, पुढाकार, नेतृत्व जोपसाण्यासाठी या पुस्तकात देण्यात आलेली दहा सूत्रे अशा १) विचारशुद्धी करा. २) जगण्याचा उद्देश शोधा. ३) नियोजन करा. ४) नातीगोती सांभाळा. ५) दुसऱ्यांचे ऐकून घ्या. ६) सांघिक बळ निर्माण करा. ७) आरोग्याची काळजी घ्या. ८) मन स्थिर आणि शांत ठेवा. ९) समाजाचे ऋण फेडा. १०) आनंदी जगा.
प्रभावी व्यक्तिमत्त्वासाठी आपल्याला आपल्या अंत:करणापासून, आंतरिक व्यक्तिमत्त्वापासून आरंभ करायला हवा. चांगली फळे हवी असतील तर बी चांगले हवे. जमिनीत रूजलेल्या मुळांची देखभाल हवी. मुळाशी साठवलेले तण दूर करून योग्य प्रकारे खतपाणी हवे. आपल्या मनात, विचारात, व्यक्तिमत्त्वात अनेक पूर्वग्रह, अनेक विकृती ठाण मांडून बसलेल्या असतात. त्यापासून मुक्त होऊन सम्यक् विचारांची जोपासना करायला हवी. तरच सम्यक आचरण शक्य आहे. आपल्या मनाचे कंडिशनिंग झालेले असते. आनुवंशिकता, कौटुंबिक स्थिती, सामाजिक, राजकीय वातावरण इ. कारण त्यासाठी देता येतात. त्यामुळे आपण अपयशाचे खापर त्यावर फोडत राहतो. परंतु असे कोणाला तरी पुढे करून आपल्या अपयशाचे वा त्रुटीचे समर्थन करणे इष्ट नाही. हे कंडिशनिंग तोडायला हवे. त्यासाठी सजगता, कल्पनाशक्ती, सद्सद्विवेकबुद्धी, इच्छाशक्ती यांचा उपयोग होऊ शकतो. दुसऱ्यावर आरोप करायचा नाही, स्वत:च्या चुकांचं समर्थन करायचं नाही. संपूर्ण जबाबदारी घ्यायची, पुढाकार फक्त सकारात्मक असायला हवा, ही पथ्ये पाळली तर आपल्या विचारांमधील एकांगीपणा कमी होऊ शकेल.
आपली प्रवृत्ती असेल तर आपण कणखर राहू शकता. वास्तव स्वीकारू शकता.
• परिस्थिती वैतागवाणी असली तरी मी खंबीर राहीन.
• मी प्रॉब्लेम सोडवण्यात हुशार आहे म्हणून मला प्रॉब्लेम सोडवण्याच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत.
• मी यातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करीन.
• माझ्या आयुष्यात आलेले हे कसोटीत कठीण प्रसंग इतरांच्याही आयुष्यात येऊ शकतात, आलेले असतील.
• आज मला कमीपणा घ्यावा लागतो आहे, पण असा कमीपणा घ्यायलाही मनाचा मोठेपणा लागतो.
• माझं मन मोठं आहे. मी आनंदाने सगळ्यांना सामावून घेत असतो.
आपली भाषा ही देखील आपल्या नेतृत्वाची निदर्शक असते. सतत मन मारून जगणं हे नेतृत्वाचं लक्षण नाही. सतत पडते घेतल्याने न्यूनगंड निर्माण होतो. आपण जी भाषा वापरतो ती मन मारणारी भाषा नसावी, नेतृत्वाची असावी. जबाबदारी घेणारी असावी. आपल्याला इष्ट वाटणाऱ्या गोष्टींसाठी पुढाकार घ्यायला हवा तसाच टाकाऊ गोष्टी झुगारून देण्यासाठी पुढाकारी घ्यायला हवा. मात्र स्वत:च्या फायद्यासाठी पुढाकार घेताना इतरांना ओरबाडून टाकणे म्हणजे नेतत्व नाही. इतरांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांना बरोबर घेऊन उन्नती करणे त्यासाठी सजगता, विवेकबुद्धी, इच्छाशक्ती या निसर्गदत्त देणग्यांचा पुरेपूर वापर पुढाकार घेताना करावा लागतो.
नोकरी नाही, मनासारख्या गोष्टी होत नाहीत, कुटुंबात कलह आहे, आपल्या मार्गात अडचणी येताहेत त्याबद्दल इतरांना दोष देत बसू नका. त्याबद्दल संपूर्ण जबाबदारी घ्या आणि त्यामधून मार्ग काढण्यासाठी पुढाकार घ्या. प्रश्न सोडवण्यासाठी पुढे पाऊल टाका. एका क्षणात प्रश्न सुटणार नाहीत. पण... प्रश्न सोडवण्याच्या दिशेने पहिले पाऊल तर पडेल.
करिअर डेव्हलपमेंट, मुलांचे संगोपन, आई-वडिलांबाबतीची कर्तव्ये, पती-पत्नी म्हणून जबाबदारी, आरोग्य संवर्धन अशा नानाविध क्षेत्रासंबंधी आपल्याला नियोजन करण्याची गरज असते. आपल्याला मिळणारा वेळ त्यात ही सर्व कामे करण्यासाठी कसरत करावी लागते, दररोज करायची कामे, आठवड्याला करायची कामे, महिन्याला करायची कामे, त्रैमासिक कामे, षण्मासिक कामे, वार्षिक कामे अशी त्यासाठी नोंद करता येईल. तातडीची कामे, गौण कामे, महत्त्वाची कामे सवडीने करायची कामे अशीही विभागणी करता येईल. घराची साफसफाई नातलगांच्या भेटीगाठी, पत्नीबरोबर शॉपिंग वा फिरणे, डायरी, पत्रलेखन, मुलांचा अभ्यास, घरात मदत, व्यायाम, स्कुटरची वा वाहनाची देखभाल, घरातील नळाची गळती थांबवणे, गॅसनोंदणी, किराणा माल खरेदी, वैद्यकिय तपासणी, डिव्हिडंड भरणे, बँकेची कामे करणे, अशी कितीतरी कामे करण्याची निकड असते. त्यासाठी वेळ काढायला लागतो.
त्याचबरोबर काही दीर्घ पल्ल्याची कामे व त्यांचे नियोजनही महत्त्वाचे असते. आर्थिक गुंतवणूक, इन्कम टॅक्सने रिटर्न भरणे, वैद्यकीय तपासणी, वैयक्तिक विकास (व्यायाम, कौशल्य संपादन, प्रशिक्षण) नातेसंबंधांची जपणूक यांनाही टाईम मॅनेजमेंटमध्ये स्थान द्यायला हवे.
आपले आरोग्य उत्तम असेल तरच जगातील सुखांचा, सोयींचा उत्तम प्रकारे आपण उपयोग घेऊ शकतो. शरीराची सहनशक्ती वाढवणे, लवचिकता वाढवणे आणि स्नायूंची शक्ती वाढवणे यासाठी व्यायामाची गरज असते. शारीरिक लवचिकता असेल तर स्वभावात लवचिकता आढळते. आडमुठेपणामुळे दीर्घकालीन यश लाभत नाही. मन शांत आणि स्थिर ठेवणे हे यशाचे, पुढाकाराचे नेतृत्वाचे आठवे सूत्र आहे. मन स्थिर ठेवण्यासाठी ध्यानधारणा, शवासन, विपश्यना, एकांतामध्ये मौन, पूजाप्रार्थना, लेखन यांचा उपयोग होऊ शकतो. ‘पुढाकार घ्या’ या पुस्तकातील एकूणच सर्व विवेचन या दृष्टीने तुम्हाला बळ देणारे ठरेल.
जीवनाकडे सकारात्मक, जबाबदारीच्या दृष्टीने बघण्यास त्यामुळे प्रेरणा मिळेल. आपल्या यशस्वी जीवनाचा भक्कम पाया घालण्याच्या दृष्टीने योग्य ती उद्दिष्ट्ये समोर ठेवून, विवेकाने वेळेचे व नात्यांचे, कामाचे आणि व्यक्तिमत्त्वाचे नियोजन करून आपल्या क्षेत्रात आपणास निकोप मनाने आणि सुदृढ शरीराने प्रगतीचा वेग टिकवता येईल अशी ग्वाही देणारे हे पुस्तक आहे.
...Read more